नमस्कार,
लोकसभा सभापती ओम बिरलाजी , मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रह्लाद जोशी , हरदीप पुरी, या समितीचे अध्यक्ष सीआर पाटिल, उपस्थित खासदार, आणि बंधू भगिनींनो ! दिल्ली मध्ये लोकप्रतिनिधींसाठी निवासाच्या या नवीन सुविधेबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन ! आज आणखी एक सुखद योगायोग आहे. आज आपले कर्तृत्ववान , मितभाषी , सभापती ओम बिर्ला यांचा वाढदिवस देखील आहे. ओम जी यांना खूप-खूप शुभेच्छा. तुमचे आरोग्य उत्तम राहो, दीर्घायु व्हा, आणि देशाची अशीच सेवा करत रहा, देवाकडे मी हीच प्रार्थना करतो.
मित्रानो,
खासदारांसाठी गेल्या वर्षी नॉर्थ एवेन्यु इथे घरे बांधून तयार झाली होती. आणि आज बीडी मार्गावर या तीन बहुमजली इमारती वितरणासाठी तयार आहेत. गंगा, यमुना आणि सस्वती, या तीन इमारतींचा संगम, तिथे राहणाऱ्या लोकप्रतिनिधीना नेहमी तंदुरुस्त ठेवो, कार्यरत आणि आनंदी ठेवो अशी मी इच्छा व्यक्त करतो. या घरांमध्ये अशा प्रत्येक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ज्यामुळे खासदारांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यात मदत होईल. संसद भवनाच्या जवळ असल्यामुळे इथे राहणाऱ्या खासदारांना ते सोयीचे होईल.
मित्रानो,
दिल्लीमध्ये खासदारांसाठी घरांची अडचण कित्येक वर्षांपासून आहे. आणि जसे आता बिरला जी सांगत होते खासदारांना प्रदीर्घ काळ हॉटेलमध्ये रहावे लागत आहे. यामुळे आर्थिक भार देखील खूप पडतो. त्यांना देखील हे बरे वाटत नाही मात्र नाईलाजाने करावे लागत होते. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी 2014 नंतर गांभीर्याने विशेष प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्या अनेक दशकांपासूनची समस्या , टाळून नव्हे तर त्यावर तोडगा शोधून समाप्त होते. केवळ खासदारांचे निवासस्थान नाही तर इथे दिल्लीत असे अनेक प्रकल्प होते, जे कित्येक वर्ष रखडलेले होते, अपूर्ण होते. अनेक इमारतींचे बांधकाम या सरकारच्या कार्यकाळातच सुरु झाले. आणि निर्धारित वेळेत , निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण देखील झाले. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते तेव्हा अटलजी यांच्या काळात ज्या आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची चर्चा सुरु झाली होती, त्याचे बांधकाम , इतकी वर्षे लागली, हे सरकार स्थापन झाल्यावरच त्याचे काम झाले. 23 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे बांधकाम देखील याच सरकारच्या काळात झाले. केंद्रीय माहिती आयोगाच्या नव्या इमारतीचे बांधकाम याच सरकारच्या काळात झाले. देशात अनेक दशकांपासून युद्ध स्मारकाबाबत चर्चा होत होती. आपल्या देशाच्या वीर जवानांना दीर्घ काळापासून याची आशा होती, मागणी करत होते. देशाच्या वीर शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडिया गेट जवळ युद्ध स्मारकाचे बांधकाम, ते पूर्ण करण्याचे सौभाग्य देखील आमच्या सरकारला मिळाले. आपल्या देशात हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आपले आयुष्य वेचले. हजारो पोलीस जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे काम देखील याच सरकारकडून झाले. आज खासदारांसाठी नव्या घरांचे लोकार्पण देखील याच मालिकेतले एक आवश्यक आणि महत्वपूर्ण पाऊल आहे. मला आनंद आहे आपल्या खासदारांची दीर्घ प्रतीक्षा आता संपत आहे. या घरांचे बांधकाम करताना पर्यावरणाचा विचार करण्यात आला आहे. ऊर्जा संर्वधनाचे उपाय असतील, सौर प्रकल्प असेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असेल, हरित इमारतींच्या या संकल्पना, या घरांना आणखी आधुनिक बनवत आहेत.
मित्रानो
मी लोकसभेचे सभापती, लोकसभा सचिवालय आणि याच्या बांधकामाशी निगडित नगर विकास मंत्रालय असेल, अन्य विभाग असतील, सर्वांचे अभिनंदन करतो, , त्यांनी इतक्या कमी वेळेत इतक्या उत्तम सुविधा निर्माण केल्या आहेत. आणि आपणा सर्वाना चांगले माहित आहे, आपल्या लोकसभा सभापतीचा तसेही गुणवत्ता आणि बचत यावर विश्वास आहे. सभागृहात ते हे सुनिश्चित करतात कि वेळेचीही बचत व्हावी आणि चर्चा देखील उत्तम प्रकारे व्हावी. आणि या बांधकामातही या सर्व गोष्टींचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला आहे. आपल्याला सर्वाना आठवत असेल अलिकडे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील सभापतींच्या या कार्यशैलीची झलक पाहिली आहे. कोरोना काळात अनेक प्रकारची खबरदारी घेत , नवीन व्यवस्थेसह संसदेचे अधिवेशन पार पडले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकेका क्षणाचा सदुपयोग केला. दोन्ही सभागृहांचे आलटून-पालटून काम करणे असेल किंवा मग शनिवार आणि रविवार या दिवशीही कामकाज सुरु ठेवणे असेल, प्रत्येकाने सहकार्य केले. सर्व पक्षांनी सहकार्य केले.
मित्रानो आपल्या संसदेची ही जी ऊर्जा वाढली आहे, त्यामागे आणखी एक मोठे कारण आहे. याची देखील सुरुवात एक प्रकारे 2014 पासून झाली आहे. तेव्हा देशाला एका नव्या दिशेने जायचे होते, बदल हवा होता आणि म्हणूनच त्यावेळी देशाच्या संसदेत 300 हून अधिक खासदार प्रथमच संसदेवर निवडून आले होते आणि मी देखील प्रथमच आलेल्यांपैकी एक होतो.या 17 व्या लोकसभेत देखील 260 खासदार असे आहेत जे प्रथमच निवडून आले आहेत. म्हणजे यावेळी 400 पेक्षा अधिक खासदार असे आहेत जे प्रथमच निवडून आले आहेत किंवा मग दुसऱ्यांदा संसदेत आले आहेत. एवढेच नाही, 17 व्या लोकसभेच्या नावावर सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्याचा विक्रम आहे. देशाची ही तरुण विचारसरणी , हा नवीन स्वभाव संसदेच्या संरचनेतही दिसून येतो. हेच कारण आहे कि आज देशाच्या कार्य प्रणालीमध्ये , प्रशासनात एक नवीन विचार आणि नवी पद्धत दिसून येत आहे. हेच कारण आहे कि देशातील संसद आज एका नव्या भारतासाठी पुढे पाऊल टाकत आहे., अतिशय जलद गतीने निर्णय घेत आहे. यापूर्वीच्या 16 व्या लोकसभेने त्याआधीच्या तुलनेत 15 टक्के जास्त विधेयके पारित केली होती. 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात निर्धारित वेळेपेक्षा 135 टक्के काम झाले. राज्यसभेनेही शंभर टक्के काम केले. ही कामगिरी मागील दोन दशकातील सर्वात उत्तम कामगिरी आहे. मागील हिवाळी अधिवेशनात देखील लोकसभेची उत्पादकता 110 टक्क्यांहून जास्त होती.
मित्रानो,
संसदेच्या या उत्पादकतेत तुम्ही सर्व खासदारांनी उत्पादन आणि प्रक्रिया या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले. आपली लोकसभा आणि राज्यसभा, दोन्हींच्या खासदारांनी या दिशेने एक नवीन उंची गाठली आहे. आणि निश्चितपणे यामध्ये त्या खासदारांचे देखील योगदान आहे, जे आता सभागृहाचा भाग नाहीत. तुम्ही पहा, आपण कायकाय साध्य केले आहे. एकत्रितपणे कितीतरी नवीन गोष्टी केल्या आहेत. मागील केवळ एक-दीड वर्षांबाबत बोलायचे झाले तर देशाने शेतकऱ्यांची दलालांपासून सुटका करण्याचे काम केले आहे. देशाने ऐतिहासिक कामगार सुधारणा केल्या आहेत, कामगारांच्या हितांचे रक्षण केले आहे. देशाने जम्मू कश्मीरच्या लोकांनाही विकासाचा मुख्य प्रवाह आणि अनेक कायद्यांशी जोडण्याचे काम केले आहे. प्रथमच जम्मू कश्मीरमध्ये आता भ्रष्टाचाराविरोधात काम होईल असे कायदे बनले आहेत.
देशाने महिलांना त्रिवार तलाक सारख्या सामाजिक कुप्रथांपासून मुक्ती दिली आहे.याच्या अगदी आधीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर , निष्पाप मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद देखील याच काळात केली गेली. आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी जीएसटी, दिवाळखोरी आणि नादारी संहिता सारखे कितीतरी मोठे निर्णय झाले आहेत. त्याचबरोबर भारताची जी संवेदनशील ओळख आहे, तिच्याप्रती बांधिलकी जपत आपण सर्वानी मिळून सुधारित नागरिकत्व कायदा देखील पारित केला. आपली ही कामे, हे यश जर आपली उत्पादने आहेत तर ते करण्याची प्रक्रिया देखील तेवढीच शानदार आहे. कदाचित, अनेकांनी लक्ष दिले नसेल, मात्र 16 व्या लोकसभेत 60 टक्के विधेयके अशी होती जी मंजूर करण्यासाठी सरासरी 2 ते 3तास चर्चा झाली आहे. आपण त्यापूर्वीच्या लोकसभेपेक्षा अधिक विधेयके मंजूर केली, मात्र तरीही आपण पूर्वीपेक्षा अधिक चर्चा केली आहे.
यावरून हे दिसते कि आपण उत्पादनावरही लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रक्रिया देखील समृद्ध केली आहे. आणि हे सर्व तुम्ही माननीय खासदारांनी केले आहे. तुमच्यामुळे झाले आहे. मी यासाठी तुम्हा
सर्व खासदारांचे सार्वजनिकरित्या आभार मानतो, अभिनंदन करतो.
मित्रानो,
सामान्यपणे असे म्हटले जाते कि तरुणांसाठी 16-17-18 वर्षांचे वय, जेव्हा ते 10 वी -12 वी मध्ये असतात, खूप महत्वपूर्ण असते. 16-17-18 चे हे वय कुठल्याही युवा लोकशाहीसाठी देखील तितकेच महत्वपूर्ण आहे. तुम्ही पहा, आताच 2019 च्या निवडणुकांबरोबर आपण 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. हा काळ देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी खूपच ऐतिहासिक राहिला आहे. 2019 नंतर 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ सुरु झाला आहे. याकाळात देखील देशाने जे निर्णय घेतले आहेत, जी पावले उचलली आहेत, त्यामुळे या लोकसभेची इतिहासात नोंद झाली आहे. आता यानंतर 18 वी लोकसभा असेल. मला विश्वास आहे, पुढची लोकसभा देखील देशाला नव्या दशकात पुढे घेऊन जाण्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल. आणि म्हणूनच मी हे 16-17-18 चे महत्व तुमच्यासमोर विशेष रूपात मांडले. देशासमोर कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला या काळात साध्य करायच्या आहेत. मग ते आत्मनिर्भर भारत अभियान असेल, अर्थव्यवस्थेशी संबंधित उद्दिष्टे असतील, किंवा मग असे कितीतरी संकल्प , हे सगळे आपल्याला या काळात साध्य करायचे आहे आणि म्हणूनच 16व्या , 17 व्या , 18 व्या लोकसभेचा हा कालखंड आपल्या तरुण देशासाठी खूप महत्वाचा आहे. देशासाठी इतक्या महत्वपूर्ण काळाचा भाग बनण्याचे सौभाग्य आपणा सर्वांना लाभले आहे. आणि म्हणूनच आपली सर्वांची जबाबदारी आहे कि जेव्हा इतिहासात लोकसभेच्या निरनिराळ्या कार्यकाळांचा अभ्यास केला जाईल तेव्हा हा कार्यकाळ देशाच्या प्रगतीचा सुवर्ण अध्याय म्हणून आठवला जाईल.
मित्रानो,
आपल्याकडे म्हटले आहे – “क्रियासिद्धि: सत्वेभवति महताम् नोपकरणे”
अर्थात, कर्माची सिद्धि आपला सत्य संकल्प , आपल्या प्रामाणिकपणामुळे साध्य होते.
आज आपल्याकडे साधन देखील आहे, आणि दृढ संकल्प देखील आहे. आपण आपल्या संकल्पांसाठी जेवढे अधिक परिश्रम करु, सिद्धि तितकी लवकर आणि मोठी असेल. मला विश्वास आहे कि आपण सर्व मिळून 130 कोटी देशवासियांची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करू. याच शुभेच्छांसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन .
खूप खूप धन्यवाद !