महापौरांना त्यांच्या शहरांच्या पुनरुज्जीवनासाठी करता येण्यायोग्य अनेक उपाययोजना पंतप्रधानांनी सुचवल्या
“आधुनिकीकरणाच्या या युगात आपल्या शहरांचा पुरातन वारसाही तितकाच महत्त्वाचा आहे”
"आपली शहरे स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत"
“नद्या शहरी जीवनाच्या पुन्हा केंद्रस्थानी आणल्या पाहिजेत. यामुळे आपल्या शहरांना नवसंजीवनी मिळेल”
“आपली शहरे ही आपल्या अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहेत. आपण शहराला चैतन्यदायी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनवले पाहिजे”
“आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये एमएसएमईला कसे बळकट करायचे याचा विचार करण्याची गरज आहे”
“महामारीने पथ विक्रेत्यांचे (फेरीवाल्यांचे) महत्त्व दाखवून दिले आहे. ते आपल्या प्रवासाचा भाग आहेत. आपण त्यांना मागे सोडू शकत नाही"
"काशीसाठीच्या तुमच्या सूचनांसाठी मी कृतज्ञ राहीन आणि मी तुमचा पहिला विद्यार्थी होईन"
"सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होते आणि देश आजही त्यांचे स्मरण करतो"

हर - हर महादेव!

नमस्कार,

कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री- जनता जनार्दनासाठी उपयोगी कार्य करणारे योगी आदित्यनाथ, मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आशुतोष टंडन, नीलकंठ तिवारी, अखिल भारतीय महापौर मंडळाचे अध्यक्ष नवीन जैन, काशीमध्ये उपस्थित असलेले आणि देशाच्या काना-कोप-यातून जोडले गेलेले आपण सर्व महापौर सहकारी मंडळी, आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

काशीचा खासदार म्हणून माझ्या काशीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून खूप - खूप स्वागत करतो. मला स्वतः काशीमध्ये उपस्थित राहून आपल्या सर्वांचे स्वागत आणि आपला सन्मान करता आला असता तर ही गोष्ट माझ्यासाठी अधिकच भाग्याची, आनंदाची झाली असती. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मी स्वतः उपस्थित राहून आपले स्वागत करू शकलो नाही. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, काशीवासियांनी आपल्या आदरातिथ्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली नसणार. तुमचा चांगला पाहुणाचार त्यांनी केला असणार, तुमची तितकीच काळजीही घेतली असणार. आणि जर काही अभाव तुम्हाला जाणवला असेल, त्यामध्ये दोष काशीवासियांचा असणार नाही तर तो दोष माझा असेल, त्यामुळे तुम्ही जरूर माफ कराल. आणि काशीच्या या आदरातिथ्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्यावा. तसेच सर्वांनी एकत्रित बसून भावी भारतासाठी, भारतातल्या शहरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले अनुभव सांगावेत. अनेक गोष्टी एकमेकांकडून शिकता येतात. आणि आपआपल्या शहराला आपआपल्या पद्धतीने आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी, आपले शहर सुंदरात सुंदर बनविण्यासाठी, आपले शहर  सळसळते-चैतन्यमय बनविण्यासाठी, आपले शहर जागरूक शहर बनविण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सर्व जण महापौर म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या शहरासाठी काही- ना-काही विशेष भेट आपल्या शहराला देऊ इच्छित असणार. आपल्या शहरामध्ये अशी काही तरी विशेष गोष्ट केली जावी, की आगामी 5,50,20 वर्षांनंतरही त्या शहरामध्ये झालेल्या कामाची कुणी चर्चा केली तर त्यावेळी आपले नाव घेवून अमूक सज्जन इथे महापौर होते, किंवा अमूक भगिनी इथल्या महापौर होत्या, त्यावेळी या शहरात हे काम झाले आहे, असे आपले नाव घेतले जावे, असे तुम्हालाही नक्कीच वाटत असणार. आपल्या शहरात  आपण केलेल्या कामाची  एक चांगली आठवण बनवी, शहराच्या कामाला एक दिशा दिली जावी असे प्रत्येकाच्या मनामध्ये हे स्वप्न असले पाहिजे. यासाठी आपले काम हा संकल्प बनला पाहिजे आणि या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपण जीव तोडून काम केले पाहिजे. आणि जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे. संपूर्ण नगराची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे तर आपल्याला हे काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आपण सर्वांनी या दिशेने काही-ना- काही काम सुरू केले असणार आहे. या कामाचा चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असणार. आणि आपण सर्वांनी या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी बनारसची निवड केली, माझ्या काशीची निवड केलीत. यासाठी आज मी शहरी विकास मंत्रालयाचे, उत्तर प्रदेश सरकारचे आणि आपल्या सर्वांचे खूप -खूप अभिनंदन करतो. देशाच्या विकासासाठी आपण जे संकल्प करणार आहात, त्याला आता बाबा विश्वनाथाच्या आशीर्वादाची जोड मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण काही ना काही नवीन प्राप्त करून, नवीन प्रेरणा घेवून, नव्या उत्साहाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये परतणार आहात. काशीमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये मी अनेक शक्यतांची जोड देवून, त्याकडे पाहत आहे. आणखी एक बनारससारखं जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक स्थान, आणि दुसरीकडे आधुनिक भारताच्या आधुनिक शहरांची रूपरेषा! अगदी अलिकडेच ज्यावेळी मी काशीमध्ये होतो, त्यावेळी म्हणालोही होतो की, काशीचा विकास, संपूर्ण देशासाठी विकासाचा एक पथदर्शी प्रकल्प बनू शकतो. आपल्या देशामध्ये बहुतांश शहरे ही पारंपरिक शहरे आहेत. पारंपरिक पद्धतीनेच ती विकसित झाली आहेत. आधुनिकीकरणाच्या या युगामध्ये आपल्या या शहरांचा प्राचीनपणा तितकाच महत्वपूर्ण आहे. आपण आपल्या प्राचीन शहरांमध्ये, तिथल्या प्रत्येक गल्ल्यातून, तिथल्या अगदी प्रत्येक पाषाणातून -दगडातून, प्रत्येक क्षणी, इतिहासातल्या अनेक गोष्टींविषयी खूप काही शिकू शकतो. त्यांच्या ऐतिहासिक अनुभवांतून आपण आपल्या जीवनात प्रेरणा घेवू शकतो. आपली परंपरा जतन करण्यासाठी नवीन पद्धती आपण विकसित करू शकतो. या शहरांमधल्या लोकांकडे असलेल्या स्थानिक कला-कौशल्यांचा विकास करून त्या पुढे घेवून जाण्यासाठी काही पद्धती तयार करू शकतो, तसेच स्थानिक कौशल्ये आणि उत्पादने त्या शहराची स्वतंत्र ओळख बनू शकतात. अशा अनेक गोष्टी आपण शिकू शकतो.

मित्रांनो,

आपल्यापैकी अनेकजण याआधी कधी -ना कधी काशीला येवून गेलेच असणार. आज आपण सर्वजण ज्यावेळी बनारसमध्ये फिरणार आहात, त्यावेळी त्या जुन्या आठवणींच्याबरोबरच नवीन झालेल्या बदलांकडे तुलनात्मक रूपाने तुम्ही पहाल. आणि त्याचबरोबर तुमच्या मनात आपल्या शहराची प्रतिमाही उमटेल. आणि तुमच्या डोळ्यांसमोर प्रत्येक क्षणाला दृष्य दिसेल. आपण ज्या शहरातून आलो आहोत, तिथली गल्ली-बोळ-रस्ते आणि काशीतल्या या गल्ल्या. मी ज्या शहरातून आलो आहे, तिथली नदी आणि इथली नदी, अशा प्रत्येक गोष्टीची क्षणा-क्षणाला तुलना करण्याचा तुमच्याकडून प्रयत्न होईल. आणि तुमच्याबरोबर जे कोणी आणखी इतर महापौर आहेत, त्यांच्याशीही तुम्ही याविषयी तुलना कराल. यातूनच नवीन कल्पना मिळतील, नवीन कार्यक्रमांची रचना निश्चित होईल. आणि त्या सर्व गोष्टी आपल्या शहरामध्ये जावून करण्यासाठी नेतृत्व करणे, त्यासाठी पुढाकार घेण्याचे काम केले जाईल. यामुळे आपल्या शहरातल्या लोकांना, आपल्या राज्यांच्या लोकांना एक नवीन आनंद मिळेल, नवा विश्वास मिळेल. आणि आपण असे प्रयत्न केलेही पाहिजेत. आपण उत्क्रांतीवर, विकासावर विश्वास ठेवला पाहिजे, भारताला आता क्रांतीची गरज नाही. आपल्याला कायाकल्प करण्याची आवश्यकता आहे. प्राचीन गोष्‍टी, त्या जुन्या आहेत म्हणून तोडून टाकणे, फोडून टाकून नष्ट करणे हा काही आमचा मार्ग नाही. परंतु जुने जे काही आहे, ते जतन करताना त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. आधुनिक युगाच्या दृष्टीने आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. यासाठी आपण लोकांनीच विशेष प्रयत्न करीत राहिले पाहिजे. आता आपण पहा, स्वच्छता अभियान सुरू आहे. पूर्ण देशामध्ये प्रत्येक वर्षी स्वच्छ शहराची घोषणा केली जात आहे. यामध्ये मी पाहतोय की, काही शहरांनी तर आपले पक्के स्थानच बनवले आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु इतर शहरे निराश होवून बसली आणि पारितोषिक तर त्यांनाच मिळणार आहे, तेच पुढे जाणार आहे, आम्ही तर करू शकणार नाही, अशी मानसिकता असणे योग्य नाही. तुम्ही सर्व महापौरांनी एक संकल्प करावा. आता येणाऱ्या वर्षात स्वच्छतेच्या स्पर्धेत आपण कोणत्याही बाबतीत मागे असणार नाही, आपले शहर कोणत्याही इतर शहरांपेक्षा मागे असणार नाही, असा संकल्प तुम्ही करू शकता. हे काम तुम्ही नक्कीच करू शकता. मी तर म्हणतो की, आपल्या हरदीप पुरींनी आणखी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही देशातल्या सर्वात स्वच्छ शहराला पुरस्कार तर देतच आहात. त्या शहराचा असा चांगला सन्मानही करता. त्याचबरोबर ज्या शहरांमध्ये चांगले, स्वच्छ बनण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, त्या शहरांनाही ‘उत्तम प्रयत्न’ म्हणून चिन्हीत करावे, त्यांच्या नावांची स्वतंत्र घोषणा करावी. इतकेच नाही तर ज्या शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचे काम होत नाही. ते अगदीच डोळे झाकून बसले आहेत, आपले शहर स्वच्छ व्हावे म्हणून काहीही केले नाही अशा गावांचीही एक यादी तयार करावी. त्या राज्यांमध्ये जाहिरात करावी की, पहा- या राज्यातल्या या तीन शहरांमध्ये स्वच्छतेचे कोणतेही काम केले जात नाही! त्यामुळे जनतेचे दडपण इतके वाढेल की, प्रत्येकाला काम करावे, असे वाटायला लागेल. आणि सर्व महापौरांना माझे आग्रहाने सांगणे आहे की, तुम्ही स्वच्छता अभियानाकडे फक्त वर्षभराचा कार्यक्रम म्हणून अजिबात पाहू नका. तुम्ही प्रत्येक महिन्याला वार्डांमध्ये - प्रभागांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करू शकता का? परीक्षक निश्चित करून या महिन्यामध्ये कोणत्या प्रभागाने सर्वात जास्त स्वच्छतेचे पुरस्कार घेतले आहेत ते पहा. जर शहरातल्या स्पर्धा झाली तर बोर्ड कॉन्सिलरांमध्ये स्पर्धा होईल. त्याचा एकत्रित परिणाम होईल. या प्रभावामुळे संपूर्ण शहराचे रूप पालटण्यामध्ये मदत होईल. आणि यासाठी मी आणखी एक सांगू इच्छितो की, ज्याप्रमाणे स्वच्छतेचे एक महत्व आहे, त्याचबरोबर सौंदर्यकरणही व्हावे, असे मला वाटते. जगात सौंदर्य स्पर्धा होतात, त्या स्पर्धा ज्याप्रकारे होतात, त्याविषयी मला काही बोलायचे नाही. मात्र आपल्या शहरात शहर सौंदर्य स्पर्धा घेवू शकतात का? कोणते वॉर्ड सर्वात जास्त सुंदर आहे? स्वच्छेतेचे मापदंड निश्चित केले जावू शकतील. यामध्ये सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेवून मापदंड ठेवता येतील. प्रत्येक नगराला आपली ओळख सिद्ध करता येईल, परीक्षक नियुक्त करावेत. भिंतींना कशा पद्धतीने रंगवता येतील? दुकानांचे फलक कशा पद्धतीने लावले जावेत, साईन बोर्ड लावले जाणार असतील तर पत्ता विशिष्ट पद्धतीने कसा लिहिला जाईल. अशा अनेक गोष्टी असतात, त्यांच्याकडे आपण सातत्याने लक्ष दिले, आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी स्पर्धेमध्ये जोडत राहिले पाहिजे. अलिकडेच एक स्पर्धा झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण तीन गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत. ते सर्व आपण सामान्य माणसांकडून करून घेवू शकता. एक म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा घ्यावी. मात्र रांगोळी केवळ सौंदर्याच्या दृष्टीने असून चालणार नाही, तर स्वातंत्र्याच्या आंदोलनातल्या कोणत्या ना कोणत्या घटनेशी संबंधित ती रांगोळी असावी. तुम्ही संपूर्ण शहरामध्ये ही स्पर्धा घेवू शकता. यादृष्टीने आगामी 26 जानेवारीपर्यंत खूप चांगली वातावरण निर्मिती करण्यात यावी. यामुळे किती मोठा बदल घडून येतो की नाही हे तुम्हालाच दिसून येईल. त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही आंदोलन झाले असणार, त्यावर गीत लेखन करण्याची स्पर्धा घेतली जावी. आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे त्यावेळी आंदोलन झाले असणार, त्यावर गीत लेखन स्पर्धा व्हावी. देशातल्या महान घटनांना जोडून त्याविषयावर गीत लिहिले जावे. यामुळे परिवर्तन घडून येत असल्याचे नक्कीच तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रकारे आमच्या माता-भगिनींना एकत्र आणण्यासाठी एक मोठा कार्यक्रम करता येईल. आपल्याकडे एक खूप जुनी परंपरा होती, लहान मुलांना झोपविण्यासाठी अंगाई गीत गायले जायचे. आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये माता- भगिनी अशा अंगाई म्हणत होत्या. आता आधुनिक अंगाई त्या बनवू शकतात. आधुनिक रूपातली अंगाई प्रत्येक घरातल्या माता भगिनी आज बनवू शकतील. त्यामध्ये आधुनिक स्वरूपातला भावी भारत कसा असेल, 2047 मध्ये ज्यावेळी देश 100 वर्षांचा होईल, त्यावेळी मुले कोणती स्वप्ने पाहत असतील, जे बाळ आज जन्माला आले आहे, त्याला त्याची आई अंगाई गीत ऐकवताना, त्याच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा धरणार आहेच, अशावेळी या अंगाई गीतातून ती कसा संस्कार कसा करेल? त्या बालकावर आत्तापासूनच संस्कार करताना ती माता काय विचार करेल, याचे दर्शन या अंगाई गीतांमधून सर्वांना होईल. सर्वांनी मिळून 2047 मध्ये ज्यावेळी हिंदुस्तान स्वातंत्र्याचे 100 वे वर्ष साजरे करीत असेल, त्यावेळी असे करता येईल का, तसे करता येवू शकेल का? आता असे आहे पहा, कदाचित काल तुम्हाला पाहण्याची संधीही मिळाली असेल, किंवा तुम्ही मंडळी आज जाणार असाल, गंगेचे घाट पाहिले असतील, इथे अवघ्या दुनियेतून पर्यटक येतात. काशीच्या अर्थव्यवस्थेचे चक्र निरंतर चालू ठेवण्यामध्ये गंगामातेची महत्वपूर्ण भूमिका आहे. गंगामातेच्या तटावर जे काही होते, त्यामुळेच काशीच्या अर्थव्यवस्थेला ताकद मिळते. आपल्या देशामध्ये नदी किनारी  वसलेली  अनेक शहरे आहेत.  बहुतेक शहरांमधून नदी वाहते. मात्र काळ्याच्या रेट्यामुळे ती नदी एकप्रकारे नष्ट झाली आहे. किंवा तिचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. नाही तर,  अनेक शहरांमध्ये नदीचे रूपांतर घाण नाल्यामध्ये झाले आहे. ज्यावेळी पावसाळ्यात पाणी येते, त्यावेळीच तिथे नदी आहे, हे दिसते. आपल्याला या नदीविषयी अतिशय संवेदनशील बनले पाहिजे. आज ज्यावेळी संपूर्ण जगात जलसंकटाची चर्चा केली जाते, आज ज्यावेळी संपूर्ण जगात तापमानवाढ, हवामान बदल यांची चर्चा केली जाते,  त्यावेळी आपण आपल्या शहरातल्या नदीची साधी पर्वासुद्धा करीत नाही. त्या नदीचे चांगले संवर्धन करणे, त्या नदीचे सुशोभीकरण करणे, त्या नदीचे महत्व जाणून घेवून आपण जर ही गोष्टी केली नाही तर मग आपण कोणत्या गोष्टीचा गौरव करू शकणार आहे.

आपण एक काम करू शकतो का पहा! सर्वांनी वर्षभरातले सात दिवस मग ते कोणतेही तुमच्या सोईनुसार असले तरी चालेल, हे सात दिवस नदी उत्सव साजरा करण्यात यावा. नदी उत्सव साजरा करताना, त्यामध्ये संपूर्ण शहराला सहभागी करून घ्यावे. या काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने नदी स्वच्छता करण्यात यावी. आपल्या गावातल्या नदीचा इतिहासाशी, जुन्या घटनांशी जो संबंध आहे, त्याविषयी चर्चा केली जावी, नदीच्या किनारी घडलेल्या घटनांविषयी चर्चा, कार्यक्रम होवू शकतात. नदीचे गुणगान करणारे कार्यक्रम करू शकता. त्याचबरोबर नदीच्या किनारी एकत्रित जमून काही समारंभ, कार्यक्रम केले जावू शकतात. नदीकाठी कवी संमेलन आयोजित करणे शक्य आहे. याचा अर्थ नदीला केंद्रस्थानी ठेवून नगराच्या विकासाच्या यात्रेमध्ये नदीला पुन्हा एकदा जीवंत स्थान दिले जावे. ज्या ठिकाणी नदी आहे, ते स्थान काही साधेसुधे ठेवून, सोडून देवून आपल्याला चालणार नाही. तुमच्या लक्षात येईल, असे करण्यामुळे आपल्या शहराला एक नवीन जन्म मिळाल्यासारखे होईल, सर्वांमध्ये एक नवीन उत्साह येईल. नदीचे महत्व कशा पद्धतीने वाढू शकेल, यासाठी आपल्याला हे सर्व काही करावे लागणार आहे.

याचप्रमाणे आपण पाहिले असेल की, एकल वापराच्या प्लास्टिकविषयी आपण आपल्या नगरामध्ये खूप सजग राहिले पाहिजे.आपण दुकानदारांना समजावून सांगितले पाहिजे, व्यापाऱ्यांना समजावले पाहिजे. आपल्या नगरामध्ये एकदाच वापरले जावू शकणाऱ्या प्लास्टिकचा वापर केला जावू नये, हे सुनिश्चित केले पाहिजे. आपल्या रोजच्या वापराच्या एकूणच व्यवस्थेतून असे प्लास्टिक हद्दपार केले पाहिजे. आणि गरीबांनी बनवलेल्या वर्तमानपत्राच्या रद्दीच्या लहान - लहान पिशव्यांचा वापर आपण केला पाहिजे. तसेच खरेदीसाठी घरातून बाहेर पडताना पिशवी बरोबर घेवून जाण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. आता तर संपूर्ण दुनियेत ‘चक्राकार अर्थव्यवस्थे’चे महत्व वाढले आहे. टाकाऊतून सर्वोत्तम टिकावू बनवले जात आहे. कधी - कधी शहरामध्ये याविषयीही एक स्पर्धा घेतली जावू शकते. चला मित्रांनो, टाकाऊतून उत्तम टिकावू बनवून त्याचे प्रदर्शन भरवून विपणन करण्यासाठी मेळावा भरवता येईल. आपल्याकडे जितके कौशल्य, बुद्धी आहे, डिझायनर बनविण्याची कला आहे, जुन्या-जुन्या गोष्टींच्या अतिशय सुरेख, सुंदर गोष्टी लोक बनवतात. आणि अशा प्रकारे एखाद्या चौकामध्ये त्या गोष्टी ठेवल्यातर एक स्मारक बनू शकेल. आपण एखाद्या उत्तम व्यवस्थापन संस्थेला मदतीला घेवून त्यातून महसूल कसा मिळेल, याचे मॉडेल बनवू शकता. हे मॉडेल कसे बनू शकेल, या दिशेने आपल्याला काम केले पाहिजे. आणि काही शहरांनी असे काम केलेही आहे. आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करता येवू शकतो. उद्यान, बागांमध्ये आपण हे पाणी कसे वापरता येईल, याविषयी प्रकल्प  सुरु करू शकतो. जर गावांमध्ये शेतकरी बांधवांना पाणी मिळणे बंद झाले आणि आपण शहरांना पाणी द्या अशी मागणी केली तर  काय परिस्थिती निर्माण होईल.

आपल्याकडे जे पिण्यासाठी पाणी वापरले जाते, त्याशिवाय इतर कामांसाठी पाण्याची गरज भागवताना सांडण्यावर प्रक्रिया करून ते वापरता येईल. बागा, उद्यानांसाठी असे प्रक्रिया केलेले पाणी मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणता येऊ शकते. म्हणजे जे वाया जाणार आहे, वेस्ट आहे, ते वेल्थमध्ये  रूपांतरीत होईल. आणि पाण्यातली घाण आहे, तीही दूर केली जाईल. आणि शहराच्या आरोग्यामध्ये खूप मोठे परिवर्तन दिसून येईल. जर आपण शहराच्या आरोग्यासाठी अशा संरक्षणात्मक गोष्टींवर भर दिला नाही तर, आपण कितीही रूग्णालये बनविली तरी ती कमीच पडतील.  हे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आपण आपले शहर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हा सर्व लोकांचा प्रयत्न असला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आपण घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापासून ते आपल्या स्वयंपाकघरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून, गल्ली-बोळातल्या कचऱ्यापर्यंत अथवा जुन्या इमारती तोडून तिथे नवीन इमारत उभी राहणार असेल तर तिथेही एक विशिष्ट स्थान निश्चित करून तिथेच कचरा टाकला जाईल, इतकेच पाहिले पाहिजे, असे नाही. तर त्याही पुढे आपल्याला जायचे आहे. ते कसे जायचे, यासाठी कसा पुढाकार घ्यायचा हे पाहिले पाहिजे. आता सूरत शहरामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एक आधुनिक प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. तिथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते पाणी औद्योगिक वसाहतींना विकले जाते. आणि यातून महानगर पालिकेच्या समितीला मोठी कमाई होत आहे. असे प्रकल्प अनेक शहरामध्ये सुरूही असतील. मला सूरतच्या प्रकल्पाची माहिती होती म्हणून मी त्याचा उल्लेख इथे केला आहे. अशा अनेक शहरांमध्ये आज ही गोष्ट केली जाते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या महसुलामध्ये वाढ होवू शकते. आणि आपला एक प्रयत्न असला पाहिजे की, शहराचा महसूल या पद्धतीने वाढला पाहिजे. मला असे वाटते की, प्रत्येकाला आपल्या शहराचा जन्मदिवस माहिती असला पाहिजे. आपल्या शहराचा जन्मदिन कधी आहे, हे माहिती नसेल तर जुन्या, प्राचीन गोष्टीं, कागदपत्रे, जुन्या नोंदी शोधून काढून आपल्या शहराच्या जन्मदिवसाची माहिती करून घेतली पाहिजे. अशा जुन्या नोंदींवरून ही माहिती उपलब्ध होवू शकेल. आपल्या शहराचा जन्मदिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला पाहिजे. 

आपल्या शहराचा अभिमान वाटावा, आपल्या शहराने इतर शहरांशी स्पर्धा करावी, आणि माझे शहर कसे असावे, अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण व्हावी, माझे शहर मला असे घडवायचे आहे, यासाठी मी हे करणार आहे, आणि यासाठी मी हे प्रयत्न करेन. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत काय होईल की  करांमध्ये वाढ केली  की कपात केली, अमुक  केले की तमुक केले याचीच चर्चा होत असते.

आता योगीजी त्यांच्या भाषणात एलईडी दिव्यांबाबत चर्चा करत होते. तुम्ही ठरवू शकता की माझ्या शहरात अशी एकही गल्ली नसेल, असा एकही खांब नसेल की ज्यावर एलईडी दिवे नसतील. तुम्ही बघाल की नगरपालिकेचे,  महानगरपालिकेचे वीज बिल बरेचसे कमी होईल आणि प्रकाशाची गुणवत्ता बदलेल, ती वेगळी. आता या मोठ्या मोहिमेसाठी मला हे काम दोन महिन्यात  तीन महिन्यांत पूर्ण करायचे आहे, असे ठरवले पाहिजे.  एलईडी नाही असा एकही दिवा नसेल. त्याचप्रमाणे  तुम्ही तुमच्या शहरातील मतदारांना, शहरातील नागरिकांना खूश करण्यासाठी एक गोष्ट करू शकता. प्रत्येक घरात एलईडी दिवे असतील, मध्यमवर्गीय कुटुंबात एलईडी दिवे लावले असतील  तर त्यांचे वीज बिल दोनशे, पाचशे, हजार,  दोन हजारांनी कमी होईल, मध्यमवर्गीयांचे पैसे वाचतील. हा प्रयत्न आपण करायला हवा आणि या सर्वांसाठी नवीन योजना उपलब्ध आहेत. या उपलब्ध योजनांचा वापर करून आपण या गोष्टी कशा अंमलात आणणार याचा विचार करा.

आता  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. असं बघा, शहराचा  विकासही लोकसहभागाने व्हायला हवा, लोकसहभागावर भर द्यायला हवा, आमची इच्छा आहे की  तुमच्या शहरातील  शाळांमध्ये एनसीसी युनिट सुरू असेल तर एनसीसी युनिटमधील  लोकांशी तुम्ही बोला. तुमच्या इथे  जितके पुतळे उभारलेले असतील,  बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल,  महात्मा गांधींचा पुतळा असेल, कुठे स्वामी विवेकानंदांचा पुतळा असेल, कुठे शहीद वीर भगतसिंगांचा पुतळा असेल, कुठे महाराणा प्रतापांचा पुतळा असेल. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, विविध पुतळे असतील, असे पुतळे उभारताना आपण खूप जागरूक असतो. हे पुतळे उभारण्याचे काम  आपण अतिशय लक्षपूर्वक आणि मनापासून करतो, परंतु हे पुतळे उभारल्यावर त्याच्याकडे कोणी  पाहत देखील नाही. वर्षातून एक दिवस, जेव्हा त्यांची जयंती  असते,  तेव्हाच आपण ते पाहतो. त्यामुळे आपण आपल्या एनसीसी कॅडेट्सची टीम बनवून, दररोज सर्व पुतळे स्वच्छ करावेत आणि त्यांची साफसफाई करावी. आणि जी मुले जमतील, त्या मुलांनी ज्या व्यक्तींचे पुतळे आहेत त्यांच्याबाबत  पाच मिनिटे  भाषण करावे. रोज नवीन मुलं आली तर त्यांना कळेल की, अच्छा, हा यांचा पुतळा आहे. या महापुरुषाने हे काम केले आहे. आता आपली पाळी आहे, आम्हाला हा चौक स्वच्छ करण्याची संधी मिळाली आहे. या गोष्टी छोट्या आहेत, मात्र  संपूर्ण शहरात  परिवर्तन  घडविण्याची  मोठी ताकद यात आहे.

तुमच्या कार्यकाळात स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आला आहे. या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्ताने तुमच्या शहरातील किमान एक चौक, एखादे सर्कल जिथून चार ते सहा रस्ते बाहेर पडतात. असे एखादे छानसे सर्कल जिथे  सार्वजनिक-खासगी भागीदारीतून, सरकारी  किंवा महापालिकेच्या पैशानी  नव्हे, तर लोकसहभागातून स्मारक उभारले जाऊ  शकते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी, स्वातंत्र्याच्या चळवळीशी किंवा देशाप्रती असलेल्या कर्तव्याच्या जाणिवेशी सुसंगत असे अनोखे स्मारक, उज्वल भविष्यातील भारताचे प्रातिनिधिक दर्शन घडवणारे सर्कल, त्यासाठी सुशोभीकरण स्पर्धा आयोजित करा,  कलाकारांना विचारा रचना कशी असावी, यासाठी  स्पर्धा भरवा आणि स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे द्या. मग त्यातून सर्वोत्कृष्ठ निर्मितीची निवड करावी. हे क्षण तुमच्या कायमचे आठवणीत राहतील. आणि मला विश्वास आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण भर देऊ शकतो. याचप्रमाणे आपल्या शहराची एक ओळख असायला हवी. तुम्हाला वाटत नाही का की आपल्या शहराची एक ओळख असावी, कदाचित असे एखादे शहर असेल जे तेथील विशिष्ट खाद्यपदार्थासाठी ओळखले जाते, त्याच्याशी त्या शहराची ओळख निगडीत असावी. उदाहरणार्थ आता बनारसचे पान घ्या,  कुठेही विचारा, लोकं बनारसी पान असेच म्हणतात.  कुणीतरी मेहनत केली असेल,  एक ओळख बनली असेल, कदाचित हे सगळे महापौरदेखील हे बनारसचे  पान खाऊन पाहतील. मात्र  मला असे म्हणायचे आहे की तुमच्या शहरात एक विशिष्ट उत्पादन असेल, तसेच एक विशिष्ट ऐतिहासिक ठिकाण देखील असेल, तर त्या उत्पादनाला, त्या ठिकाणाला तुमच्या शहराचा ब्रांड बनवू शकता.

जर तुम्ही कधी उत्तर प्रदेशात गेलात, तर तुम्ही बघाल की उत्तर प्रदेशात एक खूप चांगला कार्यक्रम सुरू आहे. एक जिल्हा, एक उत्पादन आणि त्यांनी  पाहणी करून कोणत्या जिल्ह्यात कोणती गोष्ट जास्त प्रसिद्ध आहे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याची आठवण म्हणून वस्तू तयार केल्या आहेत,  शक्य असल्यास तिथले  मुख्यमंत्री ते तुम्हाला देतील. तुम्ही पहाल, याचा असा परिणाम निर्माण झाला आहे, जसे एखादे क्षेत्र असेल. तेथे क्रीडा विषयक उपकरणे  निर्माण होत असल्याने ती त्याची ओळख बनली आहे. तुमच्या शहराची खासियत काय आहे, जी भारतातील कुणालाही माहित नसेल, जसे की, बनारसी साडी प्रसिद्ध झाली. जगाच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात कोठेही लग्नसमारंभ असेल, तर एखादी बनारसी साडी खरेदी करावी, अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असते. कोणीतरी याचे ब्रांडिंग केले. तुमच्या शहरात अशी एक गोष्ट आहे का, जी संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध व्हावी, जसे की पाटणामध्ये ही गोष्ट खूप चांगली आहे, हैदराबादमध्ये ही गोष्ट चांगली आहे, कोचीमध्ये हे खूप छान आहे, तिरुअनंतपुरममध्ये हे उत्तम मिळते, चेन्नईत ही गोष्ट चांगली आहे. तुमच्या शहराची काय खासियत आहे? संपूर्ण शहराने मिळून ठरवा,  होय, हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे, ती कशी वाढवायची, तुम्ही पहाल  ते आर्थिक घडामोडींचे  एक मोठे साधन बनेल. म्हणजेच शहरांचा विकास  आपल्याला नव्या उंचीवर न्यायचे आहे, त्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत. आता तुम्ही पाहतच  आहात की शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे, गतिशीलतेमुळे, वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. आता किती उड्डाणपूल बांधायचे? आता तुम्ही कधी सुरतला जाल तर बघाल की दर शंभर मीटरनंतर एखादा उड्डाणपूल दिसतोच.  कदाचित ते उड्डाणपुलाचे शहर झाले आहे. कितीही उड्डाणपूल बांधले तरी मूळ समस्या सुटणार नाही. लोकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर, मेट्रोवर भर दिला आहे, आपल्या देशात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत. जोपर्यंत आपण समाजाचा स्वभाव  बदलत नाही, या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही तोपर्यंत या गोष्टींचे महत्त्व  कळणार नाही. आता दिव्यांगजन पहा, माझ्या शहरात दिव्यांगजनांसाठी जे काही आवश्यक आहे. कोणतीही नवीन इमारत बांधली जाईल, कोणताही नवीन रस्ता बांधला जाईल, जिथे छेद मार्ग असेल. मी सुगम्य भारत मोहिमेअंतर्गत त्याच्या रचनेच्या नियमांमध्ये तरतूद करून ठेवीन, जेणेकरून दिव्यांगांसाठी समाजात स्थान असेल. शौचालये बांधताना दिव्यांगांच्या गरजेनुसार बांधली जातील, रस्ते बांधताना दिव्यांगांसाठीच्या सोयीसुविधांचा विचार केला जाईल, बसमध्ये चढण्यासाठी दिव्यांगांच्या अडचणींचा विचार करून पायऱ्या असतील. या तरतुदी आपल्या योजनांच्या स्वरूपाचा भाग बनवावा लागेल. तरच ते होईल आणि एक गोष्ट खरी आहे की आपल्या अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आपले शहर आहे. आपल्या शहराला चैतन्यपूर्ण अर्थव्यवस्था केंद्र बनवायला हवे. त्यासाठी नवीन उद्योग उभारता येतील अशा जागा ओळखण्यावर आपला भर असायला हवा. लोकांना राहण्यासाठी, मजुरांना राहण्यासाठी जागा उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, त्यांना तेथे काम मिळेल आणि तेथेच  राहण्याची त्यांची सोयही होईल. हा एकात्मिक दृष्टीकोन, सर्वांगीण दृष्टीकोन आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये आपण ठेवला पाहिजे, तरच प्रत्येकजण आर्थिक घडामोडींकडे आकर्षित होईल, की  येथे एक परिसंस्था आहे. ही व्यवस्था आहे, मी जाऊन माझा उद्योग करू शकतो, मी माझा कारखाना काढू शकतो, आणि मी रोजगार निर्माण करू शकतो, मी उत्पादन करू शकतो. आपल्या विकास मॉडेलमध्ये एमएसएमईचे सक्षमीकरण कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि माझी तुम्हा सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे आणि सर्व महापौरांना सांगतो की मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकाल किंवा शकणार नाही, पण तुम्ही एक गोष्ट केलीत तरी  तुम्हाला खूप आनंद मिळेल, तुम्हाला खूप समाधान मिळेल आणि ती म्हणजे पीएम स्वनिधी योजना.

तुम्हाला हे चांगलंच माहित आहे की प्रत्येक शहरात फेरीवाले विक्रेते असतात, जे रस्त्यावर आपला माल विकत असतात. प्रत्येकाच्या जीवनात त्यांचे  खूप महत्त्व आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्थेतही ते एक मोठी शक्ती आहेत. मात्र ते सर्वात दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांना विचारणारे कोणी  नाही. हे गरीब लोक सावकारांकडून खूप चढ्या व्याजदराने पैसे घेतात, घरचा गाडा रेटतात, अर्धा पैसा व्याजात जातो, त्यांना गरिबीशी लढायचे असते, कष्ट करायचे असतात, दिवसा रस्त्यांवर ओरडून, गल्ल्यांमध्ये जाऊन माल विकत असतात. आपण कधी त्यांची काळजी करतो का? ही पंतप्रधान स्वानिधी योजना यांच्यासाठी आहे. आणि कोरोना काळामध्ये असे दिसून आले की या लोकांशिवाय जगणे कठीण आहे. कारण कोरोनाच्या काळात सुरुवातीला ते लोक नव्हते, हे आधी कळले नाही, पण जेव्हा भाजीविक्रेते 2 - 2 दिवस आले नाहीत, तेव्हा मोठी अडचण झाली. मग आठवले की अरे, भाजीवाला आला नाही, दूधवाला आला नाही, वर्तमानपत्र आले नाही, घरची कामवाली बाई आली नाही, स्वयंपाकीण आली नाही, कपडे धुणारा आला नाही, सगळ्यांना  घाम फुटला होता.

कोरानाने आपल्याला हा संपूर्ण वर्ग, जो आपल्याला मदत करतो, ज्यांच्या भरवशावर आपले जीवन चालते, तो  किती मौल्यवान आहे, किती बहुमोल आहे, हे आपल्याला समजावून सांगितले आहे, आपल्याला त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवणे, त्यांना कधीही एकटे न सोडणे ही आपली जबाबदारी आहे. ते आपल्या जीवन प्रवासाचाच एक अविभाज्य भाग आहेत. आपण त्यांच्या प्रत्येक क्षणांचा संघर्ष पाहणार आहोत आणि त्यासाठी आम्ही पीएम स्वानिधी योजना आणली आहे. पीएम स्वानिधी योजना खूप चांगली योजना आहे. तुमच्या शहरात त्यांची यादी बनवा आणि त्यांना मोबाईल फोनद्वारे व्यवहार कसे करायचे ते शिकवा. त्यांना बँकेतून पैसे मिळतील. त्यांनी  घाऊक विक्रेत्याकडून माल आणायला जावे. जिथे तो भाजीपाला विकतो, सकाळी बाजारात जातो आणि 500 रुपयांची भाजी घेऊन आपला ट्रक भरतो, मग त्यांना मोबाईलवरूनच पैसे द्यावेत. त्यानंतर तो 200 ते 300 घरांमध्ये भाजीपाला विकायला जातो, त्यांच्याकडून त्याने मोबाईलद्वारेच पैसे घ्यावेत, रोख  घेऊ नये, डिजिटल घ्यावे. जर त्याचा 100%डिजिटल रेकॉर्ड बनवला तर बँकवाल्यांना कळेल की त्यांचा व्यवसाय चांगला आहे. म्हणजे जर तुम्ही आता 10000 रुपये दिले असतील तर तो 20,000 करेल, 20000 दिले तर तो 50000 करेल. आणि मी असेही म्हटले आहे की जर तुम्ही 100% डिजिटल व्यवहार केले तर खात्यावर जे व्याज बसते ते जवळजवळ शून्य होते. आपल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना बिनव्याजी पैशांचा इतका मोठा व्यवसाय मिळाला तर मला खात्री आहे की ते खूप चांगले काम करतील, ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतील, ते चांगल्या दर्जाच्या वस्तू विकू लागतील, ते मोठे व्यवसाय करू लागतील, आणि तुमच्या शहरातील लोकांना चांगली सेवा देतील. तुम्ही प्रधानमंत्री स्वानिधी योजनेला प्राधान्य देऊ शकता का? तुम्ही काशीच्या भूमीतून गंगा मातेच्या तीरावर असा संकल्प करा की या 2022 मध्ये जेव्हा 26 जानेवारी येईल तेव्हा 26 जानेवारीला आपण हे सर्व प्रथम करू. 26 जानेवारीपूर्वी आपल्या शहरातील 200, 500, 1000, 2000 जे काही फेरीवाले  विक्रेते आहेत, त्यांचे बँक खाते उघडले जाईल, त्यांना डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण दिले जाईल. ज्या व्यापाऱ्यांकडून ते माल खरेदी करतात त्यांनाही डिजिटल प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ते जिथून आपला माल विकतात, त्यांना डिजिटल प्रशिक्षण दिले जाईल, यातून  डिजिटल व्यवसायही वाढेल. आणि माझ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना कमीत कमी व्याजावर शक्य झाल्यास शून्य व्याजासह त्यांचा व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी मिळेल.

खूप गोष्टी आहेत मित्रांनो, तुम्ही इथे काशीमध्ये आला आहात, तुम्ही काशीला खूप जवळून पाहाल आणि अनेक नवीन सूचना तुमच्या मनात असतील, जर तुम्ही मला सूचना पाठवल्या तर तुम्ही मला माझ्या काशीतील कामात खूप मदत होईल. महापौर म्हणून तुम्ही जे काम केले आहे आणि मोदीजींनी काशीत असे काम करावे असे तुम्हाला वाटते. जर तुम्ही मला सूचना पाठवल्या तर मी तुमचा ऋणी राहीन. कारण मला तुमच्याकडून शिकायचे आहे. म्हणूनच तुम्हाला आमच्या काशीवासीयांना काहीतरी शिकवण्यासाठी बोलावले आहे, तुम्ही जे काही केले आहे ते समजावून सांगा, आम्ही काशीत तुमच्याकडून नक्कीच शिकू. तुमच्याकडून गोष्टी शिकून घेतल्यावर आम्ही माझ्या काशीत नक्कीच अमलात आणू आणि मी सर्वात पहिला विद्यार्थी असेन. या गोष्टी मी शिकेन.

आपण सगळे राजकारणाशी जोडलेले लोक आहोत. तुम्हा सर्वांना माहित असेलच की हे एक असे पद आहे, जिथून राजकीय जीवनात पुढे जाण्याच्या खूप चांगल्या संधी मिळतात.  अहमदाबाद शहर अगदी छोटे  असताना, तेथे एक नगरपालिका होती, गुलामगिरीच्या काळात  सरदार वल्लभभाई पटेल साहेब तिथले  महापौर झाले, अध्यक्ष झाले आणि तिथूनच त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला हे तुम्हा सर्वांना माहीत असेल. आणि आजही देश त्यांची आठवण काढत आहे. असे अनेक नेते आहेत, ज्यांचे जीवन अशा नगरपालिकेतून सुरू झाले, कुठल्यातरी महानगरपालिकेपासून सुरू झाले. तुमचे आयुष्यही अशाच टप्प्यावर आहे, मला खात्री आहे की तुम्हीही तुमच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी समर्पित वृत्तीने झोकून देऊन तुमच्या क्षेत्राच्या विकासात सहभागी व्हाल. आधुनिक शहरे  बनवावी लागतील, वारसा देखील जतन करावा लागेल. वारसा देखील हवा, विकासही हवा, तुम्ही तुमची सर्व स्वप्ने बाळगत वाटचाल करा.  पुन्हा एकदा माझ्या कडून काशीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि मला खात्री आहे की काशीमध्ये तुमचे चांगले आदरातिथ्य  होईल. काशीचे लोक खूप प्रेमळ आहेत, ते तुम्हाला कसलीही उणीव भासू देणार नाहीत, त्या प्रेमाचा स्वीकार करून तुम्ही  जा.

खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi remembers the unparalleled bravery and sacrifice of the Sahibzades on Veer Baal Diwas
December 26, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi remembers the unparalleled bravery and sacrifice of the Sahibzades on Veer Baal Diwas, today. Prime Minister Shri Modi remarked that their sacrifice is a shining example of valour and a commitment to one’s values. Prime Minister, Shri Narendra Modi also remembers the bravery of Mata Gujri Ji and Sri Guru Gobind Singh Ji.

The Prime Minister posted on X:

"Today, on Veer Baal Diwas, we remember the unparalleled bravery and sacrifice of the Sahibzades. At a young age, they stood firm in their faith and principles, inspiring generations with their courage. Their sacrifice is a shining example of valour and a commitment to one’s values. We also remember the bravery of Mata Gujri Ji and Sri Guru Gobind Singh Ji. May they always guide us towards building a more just and compassionate society."