मॉरिशसचे पंतप्रधान माननीय, प्रविंद जुगनॉथ, त्यांच्या पत्नी श्रीमती कविता जुगनॉथ, उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी सुषमा स्वराज, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जगभरातून काशीला आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.
सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. तुम्ही सर्व इथे तुमच्या मातृभूमीवरील प्रेम आणि ओढीमुळे इथे आला आहात. उद्या ज्यांना अनिवासी भारतीय सन्मान मिळणार आहे त्यांना मी आजच शुभेच्छा देतो. आजचा दिवस माझ्यासाठी देखील विशेष आहे. जसे की सुषमाजी सांगता होत्या की, मी तुमच्या समोर पंतप्रधानांसोबतच काशीचा खासदार या नात्याने एक यजमान म्हणून देखील उपस्थित आहे. बाबा विश्वनाथ आणि गंगा मातेचा आशीर्वाद तुम्हावर सदैव राहो अशी मी प्रार्थना करतो.
मित्रांनो, आज तुमच्यासोबत संवादाला सुरवात करण्याआधी मी डॉक्टर श्री श्री श्री शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. तुमकुरच्या श्री सिद्ध गंगा मठात अनेकदा त्यांचे आशीर्वाद मला मिळाले आहेत. आणि मी जेव्हा कधी त्यांना भेटायचो तेव्हा ते माझ्यावर अगदी मुलाप्रमाणे प्रेम करायचे, इतके आशीर्वाद द्यायचे. एवढे महान संत महाऋषि आपल्या मधून निघून जाणे ही आपल्या सर्वांसाठी दु:खद घटना आहे, मानव कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान देश कधीच विसरणार नाही. मी आदराने त्यांना नमन करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
बंधू आणि भगिनींनो, जगभरात वास्तव्य असलेल्या तुम्हा सर्व भारतीयांसोबत संवाद अभियान आपले सर्वांचे प्रिय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरु केले होते. अटलजींच्या निधनानंतरचे हे पहिलेच अनिवासी भारतीय संमेलन आहे. याप्रसंगी मी अटलजींना श्रद्धासुमन अर्पण करतो, त्यांच्या या भव्य विचारासाठी त्यांना वंदन करतो.
मित्रांनो, तुम्ही सर्व काशी मध्ये आहात आणि म्हणूनच मी काशी आणि तुम्हा सर्वांमध्ये एक समानता देखील बघत आहे. बनारस शहर चिरंतन काळापासून भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ज्ञानाच्या परंपरेची ओळख जगाला करून देत आहे. तुम्ही देखील तुमच्या हृदयात भारत आणि भारतीयता जतन करून या भूमीच्या उर्जेचा परिचय सर्व जगाला करून देत आहात.
मित्रांनो, मी तुम्हाला भारताचा ब्रँड अँबेसेडर समजण्यासोबतच भारताचे सामर्थ्य आणि भारताच्या क्षमता, देशाच्या विशेषतांचा प्रतिनिधी आणि प्रतिक देखील समजतो. म्हणूनच तुम्ही आता ज्या देशात राहत आहात, तिथल्या समाजाला देखील तुम्ही आपलेसे केले आहे. तिथल्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेला समृद्ध केले आहे. तुम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’या भारतीय मूल्याचा विस्तार केला आहे. तुम्ही ज्या देशात राहता त्या देशातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तुम्ही नेतृत्व करत आहात, प्रविंद जुगनॉथ आपल्या संपूर्ण क्षमतेसह मॉरिशसचा विकास करत आहेत, पोर्तुगाल, त्रिनाड, टोबॅगो आणि आयर्लंड सारख्या अनेक देशांना असे सक्षम नेतृत्व मिळाले आहे ज्यांचे मूळ भारतात आहे.
मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मागील साडे चार वर्षात भारताने जगात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. पहिल्यांदा लोकं म्हणायचे की, भारत बदलू शकत नाही. आम्ही ह्या विचारांना बदलून टाकले. आम्ही बदल घडवून दाखवला आहे.
मित्रांनो, जग आज आपल्या गोष्टींना, आपल्या सूचनांना गंभीरतेने ऐकत देखील आहे आणि ते समजून देखील घेत आहे. पर्यावरणाची सुरक्षा आणि जगाच्या प्रगतीत भारताच्या योगदानाला जग स्विकारत आहे. संयुक्त राष्ट्राचा सर्वात मोठ्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पर्यावरण पुरस्कारासोबतच सेउल शांती पुरस्कार मिळणे हे याचेच प्रतिक आहे.
मित्रांनो, आज भारत अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजेच आयएसए असेच एक व्यासपीठ आहे. या माध्यमातून आपण जगाला एक विश्व, एक सूर्य, एक ग्रीडच्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितो. हे आमच्या त्या उद्दिष्टाचा एक भाग आहे ज्या अंतर्गत, आम्ही भारताच्या समस्यांवर अशा उपाययोजना शोधत आहोत ज्यामुळे दुसऱ्या देशांच्या समस्यांचे देखील निराकरण होऊ शकेल. आम्ही लोकल सोल्युशन ग्लोबल अप्लिकेशन या दृष्टीकोनासह आम्ही काम करत आहोत. सुधारणा, कामगिरी, परिवर्तन आणि सबका साथ-सबका विकास या सूत्रावर काम करत देशाने मागील साडे चार वर्षात काम साध्य केले आहे याचे चित्र मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो.
आज भारत जगातील वेगाने विकसित होणारी आर्थिक सत्ता आहे. तर दुसरीकडे क्रीडा क्षेत्रात देखील आम्ही मोठी शक्ती बनण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. आज पायाभूत सुविधेचे मोठे आणि आधुनिक स्रोत तयार होत आहेत, तर अंतराळ क्षेत्रात देखील नवीन विक्रम होत आहेत.
आज आपण जगातील सर्वात मोठी स्टार्ट अप प्रणाली आहोत तर जगातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा योजना आयुषमान भारत देखील सुरु आहे. आज आमचा युवक मेक इन इंडिया अंतर्गत विक्रमी स्तरावर मोबाईल फोन, कार, बस, ट्रक, ट्रेन बनवत आहे तर दुसरीकडे विक्रमी स्टारवर अन्नधान्य उत्पादन होत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
मित्रांनो, तुमच्यातील अनेक लोकांनी आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानांचे भ्रष्टाचारा संबंधित एक वक्तव्य नक्कीच ऐकले असेल. ते म्हणाले होते की, केंद्रसरकार दिल्लीवरून जे पैसे पाठवते त्यातील केवळ 15 टक्केच रक्कम लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे जर दिल्लीवरून एक रुपया दिला जात असेल तर गावापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे गायब होतात. हे एका माजी पंतप्रधानांनी आपल्या देशातच सांगितले होते. इतकी वर्षे ज्या पक्षाचे सरकार आपल्या देशात होते, त्यांनी जी व्यवस्था आपल्या देशात लागू केली होती त्याचं वास्तव त्यांनी पंतप्रधान म्हणून स्वीकारले होते. परंतु खेदाची बाब ही आहे की, नंतर आपल्या 10-15 वर्षाच्या शासनकाळात देखील त्यांनी ही लुट, ही गळती थांबवण्याचे प्रयत्न केले नाही. आजार माहित झाला, तो स्वीकारला देखील परंतु त्यावर उपचार करण्याचा विचार केला नाही. देशातील मध्यमवर्ग प्रामाणिकपणे कर भरत आहेत आणि 85 टक्क्यांची ही लुट देखील सुरु होती.
मित्रांनो, आता मी तुम्हाला आजची वास्तविकता देखील सांगू इच्छितो. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या 85 टक्क्यांच्या लुटीला 100टक्के आळा घातला आहे. मागील साडे चार वर्षांमध्ये अंदाजे 5 लाख 80 हजार कोटी रुपये….म्हणजे अंदाजे 80 अब्ज डॉलर आमच्या सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत थेट लोकांना दिले आहेत, त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. कोणाला घरासाठी, कोणाला शिक्षणासाठी, कोणाला शिष्यवृत्तीसाठी, कोणाला गॅस सिलेंडरसाठी, कोणाला धान्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. आता तुम्ही विचार करा जर देश आपल्या जुन्या पद्धतीनेच कारभार सुरु असता तर आजदेखील या 5 लाख 80 हजार कोटी रुपयांपैकी अंदाजे साडे चार लाखांहून अधिक हजार कोटी… साडे चार लाखांहून अधिक हजार कोटींहून अधिक…..रक्कम गायब झाली असती, गळती झाली असती, जर आम्ही व्यवस्थेत बदल केला नसतं तर ही रक्कम पण जसं माजी पंतप्रधानांनी स्वीकारले होते तशी लुटून नेली असती.
मित्रांनो, या सुधारणा पूर्वी देखील शक्य होत्या परंतु वृत्तीच नव्हती, इच्छाशक्ती नव्हती आणि धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे जरा कठीण आहे. सरकार द्वारे देण्यात येणारी प्रत्येक मदत थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याच्या मार्गाचा अवलंब आमच्या सरकारने केला आहे. मी तुम्हाला अजून एक आकडा सांगतो. मागील साडे चार वर्षांमध्ये आमच्या सरकारने अंदाजे सात कोटी बनावट लोकांची व्यवस्थेतून हकालपट्टी केली आहे. हे ते सात कोटी लोकं होते जे कधी जन्मालाच आले नव्हते, जे वास्तवात कुठेच नव्हते परंतु हे सात कोटी सरकारी सुविधांचा लाभ घेत होते. ते कागदोपत्री होते, कागदोपत्री त्यांचा जन्म झाला, मोठे झाले आणि लाभ घेत राहिले. तुम्ही विचार करा संपूर्ण ब्रिटन मध्ये जितकी लोकं आहेत, संपूर्ण फ्रांस मध्ये जितकी लोकं आहते, संपूर्ण इटली मध्ये जितकी लोकं आहेत अशा अनेक देशांच्या लोकसंख्येहून अधिक लोकं आपल्याकडे होती जी केवळ कागदोपत्री जिवंत होती आणि कागदोपत्रीच सरकारी सुविधांचा लाभ जायचा. या 7कोटी बनावट लोकांना हटवण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. ही या बदलांची एक झलक आहे जे मागील साडे चार वर्षांपासून देशात घडत आहेत.
मित्रांनो, ही देशात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बदलांची नव भारताच्या नवीन आत्मविश्वासाची एक झलक आहे. भारताचा गौरवशाली इतिहास पुन्हा स्थापन करण्यासाठी 130 कोटी भारतवासीयांनी घेतलेल्या संकल्पाचा हा परिणाम आहे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की, या संकल्पात तुम्ही देखील सहभागी आहात.
मित्रांनो, सरकारचे हे प्रयत्न आहेत की तुम्ही सर्व जिथे राहाल तिथे सुखी रहा आणि सुरक्षित रहा. मागील साडे चार वर्षांमध्ये संकटात सापडलेल्या 2 लाखांहून अधिक भारतीयांना सरकारच्या प्रयत्नांतून जगातील वेगवेगळ्या भागात मदत पोहोचवली आहे. तुमच्या सामाजिक सुरक्षेसोबतच पारपत्र, व्हिजा, पीआईओ आणि ओसीआई कार्डच्या सर्व प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्न करत आहे. अनिविसी भारतीयांसाठी काही महिन्यांपूर्वीच एक पाऊल उचलण्यात आले आहे. जगभरातील आपले दूतावास आणि वाणिज्य दुतावासांना पारपत्र सेवा प्रकल्पाशी जोडण्यात येत आहे. यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी पारपत्र सेवेशी निगडीत एक केंद्रीय प्रणाली तयार होईल. याहून एक पाऊल पुढे म्हणजे, चीप बसवलेले ई पारपत्र जारी करण्याच्या दिशेने काम सुरु आहे.
मित्रांनो, पारपत्रा सोबतच व्हीजाशी निगडीत नियम देखील शिथिल केले जात आहेत. ई व्हिजा च्या सुविधेमुळे तुमच्या वेळेची बचत होत आहे आणि समस्या देखील कमी होत आहेत. अजूनही यात काही समस्या असतील तर त्यात सुधारणा करण्यासाठी देखील पाऊले उचलली जात आहेत.
तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित असेल की, आमच्या सरकारने पीआईओ कार्डाला ओसीआई कार्डात बदलण्याच्या प्रक्रियेला देखील सुलभ केले आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मातृभूमीपासून जरी दूर असलात तरी नव भारताच्या निर्मितीमध्ये तुमच्या सक्रीय सहभागात….आणखी वृद्धी व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न सुरु आहेत. भारतात जे बदल घडत आहेत, ज्या नवीन संधी निर्माण होत आहेत त्यामध्ये तुमचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. बदलणाऱ्या या भारतात तुम्ही संशोधन आणि विकास आणि नवोन्मेशनात मोठी भूमिका बजावू शकता. भारतातील स्टार्ट अप आणि एनआरआय मार्गदर्शक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरंक्षण उत्पादन हे देखील तुमच्यासाठी एक प्रमुख क्षेत्र असू शकते.
बंधू आणि भगिनींनो, भारत मातेच्या सुरक्षा अर्थव्यवस्थेसोबतच आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसामध्ये तुमची रुची अधिक मजबूत व्हावी यासाठी अनिवासी तीर्थ दर्शन योजना देखील सुरु करण्यात येत आहे. मी या व्यासपीठावर याआधी देखील सांगितले होते आणि आज पुन्हा सांगू इच्छितो की, तुम्ही कोणत्याही देशात राहत असाल तिथून तुमच्या आजूबाजूच्या कमीत कमी पाच कुटुंबाना आणि ते देखील परदेशी पाच कुटुंबाना भारतात येण्यासाठी प्रेरित करा. तुमचे हे प्रयत्न देशात पर्यटन वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील. त्याचसोबत तुम्ही यावर्षी गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशात राहून कशाप्रकारे त्यांच्या मूल्यांना, भारतीय मूल्यांना इतर लोकांपर्यंत पोहचवू शकाल याचा देखील विचार करा. नुकताच, सुषमाजींच्या नेतृत्वाखाली जगभरातील कित्येक देशांमध्ये एक चांगला प्रयोग झाला. तिथल्या आपल्या सर्व दुतावासांनी गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्या देशातील सर्व कलाकारांना गांधीजींचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ गाण्याची विनंती केली. यु ट्युबवर याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. हे ऐकताना, एकप्रकारे गांधीजी हे जागतिक नेते होते याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि म्हणुनच तुम्ही काही विशेष कार्यक्रम करू इच्छित असाल तर भारतीय दुतावासाद्वारे तुमची सर्वतोपरी मदत केली जाईल. यावर्षी आपण गुरुनानकजींची 550 वी जयंती देखील साजरी करत आहोत. गुरुवाणीला आपण कशाप्रकारे दुसऱ्या देशातील लोकांपर्यंत पोहचवू शकतो, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख त्यांना कशी करून देता येईल, याविषयी देखील तुम्ही ज्या देशात राहता तिथे काय योजना तयार करता येतील यावर विचार करा असे मला वाटते. मित्रांनो, यासर्व गोष्टी एक सूचना म्हणून मी तुमच्यासमोर मांडत आहे. मला माहित आहे की तुमच्यातील अनेक लोकं यागोष्टी आधीपासूनच करत देखील असतील, परंतु आपल्यासोबतच्या स्नेहपूर्ण नात्यामुळे मी स्वतःला थांबवू शकत नाही.
मी आज,
विशेषतः उत्तरप्रदेश सरकारचे अभिनंदन करू इच्छितो; सर्वसाधारणपणे कोणत्याही राज्यात अनिवासी भारतीय दिनाच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर, जिथे जगभरातून इतके पाहुणे येणार असतील, तर त्या राज्याला खूप परिश्रम करावे लागतात, खूप नियोजन करावे ;लागते. जवळ जवळ यासगळ्यासाठी एक वर्ष लागते. आणि एक कार्यक्रम केल्यानंतर त्याचा थकवा जायला जवळ जवळ एक वर्ष जाते. मी उत्तर प्रदेशचे यासाठी अभिनंदन करू इच्छितो की, कुंभ मेळाव्यासारखा इतका मोठा कार्यक्रम सुरु आहे, इतकी मोठी व्यवस्था त्यासाठी करण्यात आली आहे, कुंभ मेळ्यासाठी 2-3 वर्ष सतत काम करावे लागते. आणि मला संकोच वाटत होता की, कुंभ मेळ्याची जबाबदारी उत्तरप्रदेश सरकारकडे आहे, सर्व सरकारी यंत्रणा त्यात व्यस्त आहे. 10 कोटी लोकं तिथे येण्याची शक्यता आहे. यातच काशीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करावे की नाही. माझ्या मनात संकोचाची भावना होती, परंतु मी योगीजींचे, त्यांच्या पूर्ण टीमचे, उत्तरप्रदेश प्रशासन आणि सरकारचे मनापासून अभिनंदन करतो की, त्यांनी इतके दोन मोठे कार्यक्रम एकत्र आयोजित केले; या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनाने जगाला हे दाखवून दिले आहे की, उत्तरप्रदेश सरकार, उत्तरप्रदेशची नोकरशाही, उत्तरप्रदेशचे अधिकारी हे जगात कोणापेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.
मी काशिवासियांना नतमस्तक होऊन प्रणाम करू इच्छितो, कारण मी अनिवासी भारतीय दिनाचे आयोजन गुजरात मध्ये देखील केले होते. आणि कदाचित गुजरातचा मुख्यमंत्री म्हणा किंवा मग आज प्रधानमंत्री म्हणून, मी भारतातील एक असा व्यक्ती आहे जो जवळजवळ सर्व अनिवासी भारतीय दिन कार्यक्रमाला उपस्थित आहे. जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा पण यायचो, प्रधानमंत्री झाल्यानंतर तर ती जबाबदारीच झाली. केवळ एकदाच मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालो होतो; नाहीतर बाकीवेळी प्रत्यक्ष हजर होतो. मी इतके कार्यक्रम पाहिले आहेत,गुजरातमध्ये देखील मी यजमान होतो, परंतु काशीमध्ये ज्याप्रकारे या कार्यक्रमाला सरकारी कार्यक्रमाचे स्वरूप येऊ दिले नाही, लोकांचा कार्यक्रम बनविले, प्रत्येक काशिवासियांनी याला आपला कार्यक्रम समजला. अंदाजे चारशे लोकं कुटुंबांमध्ये राहत आहेत आणि इथल्या तंबू शहराचे (टेंट सिटीचा) दृश्य असे आहे की, मला असे सांगण्यात आले आहे की, कित्येक लोकं जे हॉटेल मध्ये राहत होते त्यांनी हॉटेल सोडून या तंबू शहराचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. एक नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत. मला माहित आहे आणि मागील दोन महिन्यांपासून मी सतत बघत होतो. काशिवासियांनी काशीला एकप्रकारे जागतिक मुख्यालयाचे स्वरूप दिले आहे. इथे आलेला प्रत्येक पाहुणा हा काशिवासियांना आपल्या स्वतःच्या घरी आलेल्या पाहुण्यासारखा वाटत आहे. याआधीच्या अनिवासी भारतीय संमेलनात मी असे वातावरण पाहिले नव्हते, जे काशिवासियांमुळे मला दिसले. आणि म्हणून मी काशिवासियांना खासकरून प्रणाम करतो. मी स्थानिक प्रशासन, इथले अधिकारी यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी स्वतःच्या मेहनतीने इतकी मोठी व्यवस्था निर्माण करून तिला चालवले. आणि या सर्वांच्या पाठीमागे सुषमाजींचे नेतृत्व आणि आणि त्यांची पूर्ण टीम अभिनंदनाचे मानकरी तर आहेतच. काशीच्या गौरवात वृद्धी झाली तर इथला खासदार म्हणून माझा आनंद चौपट वाढतो.
तुम्ही परिश्रम घेतले, तुम्ही योजना तयार केली, तुम्ही घाम गाळलात, दिवसरात्र न थकता तुम्ही कामे केलीत, परंतु लोकं माझी पाठ थोपटत आहेत. हे तुमचे प्रेम आहे, तुमची मेहनत आहे ज्यामुळे हे शक्य झाले आणि म्हणूनच काशीचा खासदार म्हणून माझी ही कर्मभूमी या नात्याने आज मला विशेष आनंद होत आहे आणि मला विश्वास आहे माझी काशी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपले स्थान निर्माण करेल आणि प्रत्येकाला काशीला यायची इच्छा होईल. मी शेवटी पुन्हा एकदा तुम्ही काशीला आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. भारतातील तुमचा हा प्रवास सुखाचा होवो, या सदिच्छेसह तुमचे धन्यवाद मानतो. मी व्यक्तीशः पंतप्रधान म्हणून नाही, खासदार म्हणून नाही तर माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी मागील एक-दोन वर्षापासून कार्यक्रम करत आहे. भारतात मार्च महिना हा परीक्षांचा असतो आणि 10 वी, 12 वी ची परीक्षा म्हणजे घरात वर्षभर तणावाचे वातावरण असते. प्रत्येकाला वाटत असते की आपल्या मुलाला दहावीत जास्त गुण मिळावे, बारावीत जास्त गुण मिळावेत, एक तणावाचे वातावरण असते. त्यामुळे माझा हा नेहमी प्रयत्न असतो की, परीक्षेच्या आधी मी सर्व मुलांशी, त्यांच्या पालकांशी, त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधून परीक्षेला खूप मोठे संकट समजू नये ही बाब त्यांना पटवून सांगू शकेन. मला आनंद आहे की, या 29 जानेवारीला मी देशभरातील आणि यावेळी परदेशातील लोकं देखील सहभागी होत आहेत; त्यांची मुलं देखील, त्यांची कुटुंब देखील नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून, व्हिडीओच्या मध्यातून सहभागी होत आहेत. कोट्यावधी कुटुंबांसोबत मी परीक्षेच्या युद्धा संदर्भात संवाद साधणार आहे. मुलांशी गप्पा मारणार आहे आणि परीक्षेचा ताण ते घेणार नाहीत यासाठी ज्या काही पद्धती मी त्यांना सांगू शकतो त्या सर्व सांगणार आहे, 29 जानेवारी, 11 वाजता, मला विश्वास आहे की, तुम्ही देखील तुमच्या कुटुंबातील कोणी जर या परीक्षेच्या कालावधीत असेल तर त्याला याचा लाभ घ्यायला सांगाल.
मी पुन्हा एकदा या भव्य आयोजनासाठी आणि आपले मित्र प्रविंद जुगनॉथ सहपरिवार इथे आले, आपला वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या वडीलांनी मॉरिशसच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावली होती. एक प्रकारे आधुनिक मॉरिशसचे ते वास्तुशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे देखील आपल्यावर तितकेच प्रेम आहे. त्यांचे वडील नुकतेच विशेषतः आपल्या कुटुंबासोबत कशी यात्रेला आले होते, आज प्रविंदजी सहपरिवार त्यांच्या पत्नी कविताजी यांना घेऊन आले. त्यांचे भारताप्रती असलेले प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यांनी आपला वेळ दिला, शोभा वाढवली, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छांसह तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.