भारत माता की – जय
भारत माता की – जय
भारत माता की – जय
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,
तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आला आहात यासाठी मी तुमचे नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. मी पाहतोय की पटणा इथूनही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक सहभागी झाले आहेत. पटणा आणि हजारीबाग इथे होत असलेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांना मी नमस्कार करतो.
मित्रांनो, आदि कुंभस्थळ सिमरिया धाम जिथे आहे, बिहार केसरी श्री कृष्ण सिंह यांनी जिथे सत्याग्रह केला, राष्ट्र कवि रामधारी सिंह दिनकर यांच्यासारखे विद्वान ज्यांनी देशाला दिले त्या बेगुसरायच्या, बिहारच्या पवित्र मातीला मी प्रणाम करतो. देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या पटणाच्या शहीद कॉन्स्टेबल संजय कुमार सिन्हा आणि भागलपुरच्या शहीद रत्न कुमार ठाकुर याना मी श्रद्धांजलि वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोकभावना व्यक्त करतो. आणि तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग आहे ते मला जाणवते आहे. जी आग तुमच्या मनात आहे, तीच आग माझ्याही मनात आहे. आज लोकनायक कर्पूरी ठाकुरजी यांची पुण्यतिथि देखील आहे. सामाजिक न्यायासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कर्पूरी बाबूंचा आशिर्वाद आपणा सर्वांवर कायम राहील या इच्छेसह मी त्याना श्रद्धांजलि अर्पण करतो.
मित्रानो, आज बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी हजारों कोटी खर्चाच्या डझनभर प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. यामध्ये पटणाला आणि या शहराला स्मार्ट बनवण्याशी संबंधित प्रकल्प आहेत. बिहारचा औद्योगिक विकास आणि युवकांना रोजगाराशी संबंधित हे प्रकल्प आहेत आणि बिहारच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा वाढवणाऱ्या प्रकल्पांचाही यात समावेश आहे. या अनेक प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वाना, नीतीशजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप-खूप अभिनंदन करतो. आज भोलाबाबू आपल्यामध्ये असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.
मित्रानो, जसे भारताच्या पश्चिमी भागात आर्थिक घडामोडी होतात, त्याच्याशी बरोबरी करण्याची, मी तर म्हणेन की त्याच्याही पुढे जाण्याची ताकद आपल्या बिहार आणि पूर्व भारतात आहे.ज्याप्रकारे एनडीए सरकार बिहारच्या मदतीने पूर्व भारताच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांसाठी एकामागोमाग एक प्रकल्प सुरु करत आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा हा प्रांत देशाच्या विकासाला नवी गती देणारा महत्वपूर्ण प्रांत बनेल.
बंधू आणि भगिनींनो, बिहारसह पूर्व भारताचा कायापालट करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांपैकी प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना एक आहे. या योजनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिशाला गॅस पाईपलाईनद्वारे जोडण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जगदीशपुर-हल्दिया पाइप लाइनच्या पटणा -फूलपुर भागाचे लोकार्पण थोड्या वेळापूर्वी करण्यात आले आहे. तुम्हाला आठवत असेल सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी जुलै 2015 मध्ये पटणातूनच मी याची पायाभरणी केली होती. गैस पाइप लाइनची सुविधा पुढे नेतानाच हल्दिया-दुर्गापुर एलपीजी पाइप लाइनचा विस्तार मुजफ्फरपुर आणि पटणा पर्यंत केला जात आहे. ज्याची पायाभरणी देखील आज करण्यात आली.
बंधू आणि भगिनींनो, या प्रकल्पामुळे तीन मोठी कामे एकाचवेळी होणार आहेत. एक म्हणजे इथे बरौनीत जो खत कारखाना पुन्हा सुरु करण्यात येत आहे, त्यासाठी गॅस उपलब्ध होईल. दुसरे-पटणामध्ये पाईपच्या माध्यमातून घरांमध्ये गॅस देण्याचे काम होईल. पेट्रोल-डीजलच्या जागी सीएनजी द्वारे गाड्या चालू शकतील. पटणामध्ये तर शहर गॅस वितरणाच्या कारखान्याचे उदघाटन देखील झाले आहे. यामुळे तिथल्या हजारो कुटुंबांना आता पाईपवाला गॅस स्वयंपाकघरापर्यंत पोहचणार आहे. या प्रकल्पाचा तिसरा लाभ म्हणजे इथल्या उद्योगांना पुरेशा प्रमाणात गॅस मिळेल, त्यातून वायू आधारित अर्थव्यवस्थेची नवी परिसंस्था विकसित होईल. युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील,म्हणजे एक प्रकारे ऊर्जा गंगा प्रकल्प इथले लोक आणि विशेषतः मध्यम वर्गाच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन घडवून आणणार आहे.
सीएनजीचा विस्तार झाल्यावर गाड्या चालवणाऱ्या लोकांचा खर्च कमी होईल आणि पेट्रोल-डीझेलसाठी लागणार पैसा देखील वाचेल. याशिवाय पर्यावरणा वरही सकारात्मक प्रभाव पड़ेल.
मित्रांनो, बरौनीचा हा खत कारखाना इथले सुपुत्र आणि पहिले मुख्यमंत्री डॉक्टर श्रीकृष्ण सिंह यांना एक प्रकारे आमची नम्र श्रद्धांजलि आहे. त्यांनी हा कारखाना स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, मात्र तंत्रज्ञान जुनं असल्यामुळे तो बंद पडला. आता इथे गॅस पोहचवणे शक्य झाल्यामुळे तो गॅस आधारित बनवण्यात आला.
बंधू आणि भगिनींनो, बरौनी व्यतिरिक्त गोरखपुर, सिंदरी आणि ओदिशाच्या तालचर इथेही असे कारखाने पुनरुज्जीवित करण्याचे काम वेगाने सुरु आहे. हे सगळे प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेमुळे शक्य झाले आहे.
मित्रानो या खत कारखान्यांमुळे इथल्या शेतकरी बांधवांना पुरेसे खत तर मिळेलच, युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही मिळतील. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींसाठी या अर्थसंकल्पात सरकारने एक ऐतिहासिक योजना जाहीर केली आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत पुढील दहा वर्षात साडे सात लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. याचा खूप मोठा लाभ बिहारच्याही शेतकऱ्यांना मिळणार आहे. विचार करा, जेव्हा एवढा मोठा पैसा देशाच्या ग्रामीण व्यवस्थेत थेट पोहचेल, कुठल्याही दलालाशिवाय पोहचेल, तेव्हा त्या गावाला. गावात राहणाऱ्यांना किती मोठी ताकद देईल.
बंधू आणि भगिनींनो, जेव्हा एखादा उद्योग उभा राहतो, तेव्हा आजूबाजूला रोजगाराचे वातावरण तयार होते, ज्याचा लाभ बिहार बरोबरच संपूर्ण पूर्व भारताला होईल. अशाच प्रकारे बरौनीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे इथे कच्च्या तेलाचा शोध घेण्याची क्षमता वाढेल आणि बिहारसह नेपाळपर्यँत पेट्रोलियमशी संबंधित वस्तू सहज उपलब्ध होतील.
मित्रानो, आमच्या सरकारकडून संपर्क व्यस्थेवर विशेष भर दिला जात आहे. आज इथून रांची-पटणा साप्ताहिक एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याशिवाय बरौनी-कुमेदपुर, मुजफ्फरपुर-रक्सोल, फतुहा-इस्लामपुर, बिहार शरीफ-दनियावान रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मित्रानो, रेल्वे बरोबरच आम्ही शहरांमध्येही समान वाहतूक व्यवस्था विकसित करत आहोत. मी पटनावासियांचे खूप-खूप अभिनंदन करतो. कारण पाटलिपुत्र आता मेट्रो रेल्वेने जोडला जाणार आहे. १३ हजार कोटींहून अधिक खर्चाचे हे प्रकल्प वर्तमानाबरोबरच भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जात आहेत. हे मेट्रो प्रकल्प वेगाने विकसित होत असून पटणा शहराला आणखी नव्या उंचीवर नेतील, नवीन गती देतील. त्याचबरोबर पटणा रिवर फ्रंट विकसित झाल्यावर पटणामध्ये राहणारे लोक आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे.
मित्रांनो, रालोआ सरकारच्या दूरदर्शी योजना आणि आपला विकास प्रवास दोन रुळांवरून एकाच वेळी सुरु आहे. पहिला रूळ आहे पायाभूत विकासाशी संबंधित योजना- औद्योगिक विकास, लोकांना आधुनिक सुविधा आणि दुसरा रूळ आहे – वंचित, शोषित, पीड़ितांचे जगणे सुखकर करणे जे गेली 70 वर्षे मूलभूत सुविधासाठी झगडत आहेत, त्या सुविधांपासून वंचित आहेत. आपल्या या बंधू-भगिनींसाठी पक्की घरे बांधणे, त्यांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करणे, गॅस जोडणी देणे, त्यांच्या घरात वीज पोहचवणे, शौचालये बांधणे , त्यांना वैद्यकीय उपचार पुरवणे, औषधांचा खर्च वाचवणे, मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था अशा अनेक योजना आमच्या सरकारने राबवल्या आहेत. नवीन भारताचा मार्ग याच दोन रुळांवरून जातो. केंद्र सरकारच्या आवास योजनाअंतर्गत बिहारमध्ये गरीबांसाठी 18 लाखांपेक्षा अधिक घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी 50 हजारहून अधिक इथेच बेगुसरायमध्ये बांधण्यात आली आहेत.
अशाच प्रकारे अमृत मिशन अंतर्गत बिहारच्या 27 शहरांना-आरा, हाजीपुर, पटणा, सासाराम, मोतिहारी, भागलपुर, मुंगेर, सिवान याना आधुनिक सुविधांशी जोडले जात आहे. आजही पटणासह बिहारमधल्या दुसऱ्या शहरांसाठी पिण्याचे पाणी, सांडपाणी निचरा आणि स्वच्छतेशी संबंधित 22 प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे करमालीचक, बाड़, सुलतानगंज आणि नोगठियासाठी सीवरेज नेटवर्क आणि सांडपाण्याशी संबंधित प्रकल्प जेव्हा तयार होतील तेव्हा यातून नमामि गंगे अभियानाला आणखी बळ मिळेल. आपली ही शहरे देखील स्वच्छ राहतील, इथले पाणी स्वच्छ असेल.
बंधू आणि भगिनींनो, गैस आधारित अर्थव्यवस्था, संपर्क, स्मार्ट शहरे, गंगेची स्वच्छता,अशा अनेक व्यवस्थांबरोबरच रालोआ सरकारने गरीब आणि मध्यम वर्गाच्या आरोग्यावर सर्वाधिक भर दिला आहे. बिहारमध्ये आरोग्य सेवांच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक दिवस आहे. छपरा आणि पुर्णियामध्ये आता नवीन वैद्यकीय महाविद्यालये तयार होणार आहेत, तर भागलपुर आणि गयाच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा सुधारला जात आहे. याशिवाय, बिहार मध्ये पटणा एम्स व्यतिरिक्त आणखी एक एम्स स्थापन करण्यावर काम सुरु आहे. या सर्व सुविधा विकसित झाल्यांनंतर बिहारच्या लोकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज फारशी भासणार नाही.
बंधू आणि भगिनींनो, मी गरीबांचे दुःख जाणतो जेव्हा ते आपले घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःवर इलाज करत नाहीत. त्यामुळे त्याचा आजार अधिक बळावतो. देशातील प्रत्येक गरीबाला यातून बाहेर काढण्यासाठी रालोआ सरकारने आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री आरोग्य योजना सुरु केली आहे. ही योजना देशभरातील अंदाजे 50 कोटी गरीबांसाठी आशेचा किरण बनली आहे. यापैकी पाच कोटींहून अधिक लोक बिहारमधील आहेत. अजून या योजनेला १५० दिवस देखील झालेले नाहीत, एवढ्या कमी काळात देशातील सुमारे 12 लाख गरीब बंधू-भगिनींना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. अलिकडेच आमच्या सरकारने खुल्या प्रवर्गातील गरीबांसाठी आर्थिक निकषाच्या आधारे 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. इतर वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आले आहे.
मित्रानो, साडेचार वर्षांपूर्वी तुम्ही एक मजबूत सरकार बनवले, जे पूर्ण क्षमतेने, वेगाने निर्णय घेऊ शकते, हे निर्णय प्रत्यक्षात आणू शकते म्हणूनच विकास आणि विश्वासाची कामे शक्य झाली आहेत. आणि म्हणूनच विकासाच्या या योजना नवीन बिहारची ओळख बनतील, युवकांना रोजगार देतील, शेतकऱ्यांना ताकद देतील, पटणाची नवीन ओळख बनतील, आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त बिहारचे स्वप्न पूर्ण करतील यासाठी तुम्हा सर्वाना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. या सर्व गोष्टींसाठी तुमचे खूप-खूप अभिनंदन. नितीश बाबू आणि त्यांच्या टीमचे खूप-खूप अभिनंदन.
खूप-खूप धन्यवाद. माझ्याबरोबर मोठ्याने बोला-
भारत माता की – जय
भारत माता की – जय
भारत माता की – जय
खूप-खूप धन्यवाद।