माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,
आमच्या चमनलाल यांच्या सारखे अनेक जुने चेहरे मी पाहतोय. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. राज्यातला आजचा माझा हा चौथा कार्यक्रम आहे. आज सकाळ पासून लेह-लडाखचे उंच-उंच डोंगर, काश्मीर खोऱ्यातून आता जम्मूत येताना विकासाची गंगा वाहताना मी पाहतोय. या कार्यक्रमांच्या दरम्यान मला उशीर झाला. वेळेवर येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
लेहला उर्वरित भारताशी जोडणारी झोजीला खिंड असो, बांदिपोराचा किशन गंगा प्रकल्प असो किंवा किश्तवाड मधे चिनाब नदीवर तयार होणारा जल विद्युत प्रकल्प असो यामुळे जम्मू काश्मीरच्या भरभराटीची नवी द्वारे उघडत आहेत. जम्मू काश्मीरची जल धारा येत्या काळात इथल्या विकास धारेला गती देणार आहे.
एक जल विद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणे आणि दुसऱ्याचे भूमिपूजन करणे; आजचा दिवस संस्मरणीय झाला आहे. थोड्या वेळापूर्वी जम्मूच्या पायाभूत क्षेत्राशी सबंधित 4 मोठ्या योजनांचे भूमी पूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. आज जम्मू काश्मीर मधे जेवढी वीज निर्मिती होते त्यापैकी एक तृतीयांश वीज केवळ या एका विद्युत प्रकल्पातून निर्माण होणार आहे.
प्रधान मंत्री विकास कार्यक्रमा अंतर्गत, हा प्रकल्प तयार होत आहे. एक हजार मेगावॅटचा हा प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी सज्ज आहे. 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प या भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणार आहे. सुमारे अडीच हजार लोकांना तर थेट रोजगार मिळणार आहे. या शिवाय भाजीवाले, दुधवाले असतील. प्रत्येक प्रकारची कामे करणाऱ्या लोकांना नवी संधी प्राप्त होणार आहे.
मित्रहो, देशाच्या विकासाचा एक नवा दृष्टीकोन घेऊन आमचे सरकार काम करत आहे. ‘आयसोलेशन टू इंटीग्रेशन’ म्हणजे कोणत्याही कारणाने देशाचा जो भाग विकासात मागे राहिला आहे, वेगळा पडला आहे त्या भागांना प्राधान्य दिले जात आहे. ईशान्य भाग असो किंवा जम्मू काश्मीर, जेवढे जास्त करता येईल तेवढे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधीच्या पंतप्रधानांना अशी संधी मिळाली किंवा नाही हे मला माहित नाही. राजनैतिक कामाशिवाय मी पंतप्रधान या नात्याने एक डझनाहून अधिक वेळा तरी जम्मू काश्मीरला आलो असेन. आपणा सर्वांनी या आधी मला अनेक दिवस इथे ठेवून लालन-पालन केले आहे.
दळण वळणातून विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम करत आहोत. रस्ते जोडणे असो किंवा हृदये जोडणे असो आम्ही कोणतीही कसर ठेवत नाही. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी जी पाऊले उचलली जात आहेत त्यातून हे राज्य नव भारताचा उगवता तारा बनण्याची क्षमता बाळगेल. कल्पना करा की, देशाच्या नकाशातले, देशाचे मुकुट स्थान, हिऱ्याच्या मुकुटा प्रमाणे चमकेल आणि त्याची प्रभा संपूर्ण देशाला विकासाचा मार्ग दाखवेल.
बंधू-भगिनीनो, हेच अभियान हाती घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकारांच्या सहकार्याने कामे पूर्णत्वाला नेत आहे.जम्मू शहराला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठीच्या रिंग रोडचे थोड्याच वेळापूर्वी भूमी पूजन झाले. येत्या तीन वर्षात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. हा रिंग रोड झाल्या नंतर आपणा सर्व जम्मू वासियांना आणि पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे.
आपण पाहू शकता, ज्यांना विकासाचे आरेखन समजते, त्यांच्या लक्षात येईल, सुमारे 50 किलो मीटरपेक्षा जास्त लांबीचा हा मार्ग, स्वतःमधे एक नवे जम्मू वसवेल. कसा विस्तार होईल,विकास कसा होईल, मी पाहू शकतो. यामुळे, जम्मू शहर आणि आसपासच्या परिसरातली वाहतूक कोंडी तर कमी होईलच एवढेच नव्हे तर पुंछ, राजौरी, नौशेरा, अखनूर क्षेत्राच्या सीमावर्ती भागात अवजड यंत्र घेऊन जाणाऱ्या लष्करी वाहनांची वाहतुकही हा रिंग रोड सुलभ करणार आहे.
मित्रहो, आपले हे जम्मू शहर, स्मार्ट सिटी म्हणून निवडले गेले आहे. इथे वाहतुकीपासून सांडपाण्या पर्यंत, स्मार्ट व्यवस्था तयार होत आहे. राज्य सरकार या कामात मग्न आहे. केंद्र सरकार कडून यासाठी निधीही मंजूर झाला आहे.
बंधू-भगिनीनो, विकासासाठी, आम्ही पायाभूत सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. महामार्ग असू दे, रेल्वे असू दे, जल मार्ग असू दे, आय वे असू दे, 21 व्या शतकासाठी हे आवश्यकच आहे. सव्वाशे कोटी जनतेचे जीवनमान उंचावायचे असेल तर त्यांचे जीवन सरळ आणि सुलभ करणे आवश्यक आहे असा सरकारचा स्पष्ट विचार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण याला स्मार्ट व्यवस्थाही म्हणू शकता. या विचाराचा परिपाक म्हणजे आज भारतमाला प्रकल्पा अंतर्गत देशभरात महामार्गांचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे.
जम्मू काश्मीर असू दे, पश्चिम भारत असू दे, ईशान्य भाग असू दे, देशाला महामार्गाने जोडणारा हा प्रकल्प आहे. या वर्षाच्या अर्थ संकल्पात, या योजने अंतर्गत तयार होणाऱ्या सुमारे 35 हजार किलो मीटर रस्त्यासाठी 5 हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर मधेही या योजने अंतर्गत सुमारे 2700 कोटी रुपये खर्च केले जातील.
बंधू-भगिनीनो, जम्मू काश्मीर मधे इथेही महामार्गाच्या अनेक प्रकल्पावर काम होत आहे. जम्मूला श्रीनगर आणि देशाच्या दुसऱ्या भागाशी जोडणाऱ्या हजारो कोटी रुपयांचे काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही योजनांवर वेगाने काम सुरु आहे. जम्मू-पुंछ, उधमपूर-रामबन, रामबन-बनिहाल, श्रीनगर-बनिहाल आणि काझीगुंड-बनिहाल यासारख्या अनेक महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु आहे आणि येत्या काळात हे प्रकल्प या क्षेत्राची जीवन रेखा ठरणार आहेत. सुमारे 15 हजार कोटी रुपये यावर खर्च केले जाणार आहेत. या योजने अंतर्गत गेल्या दोन वर्षात सुमारे एक लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले गेले आहेत. जम्मू काश्मीरच्या गावातही गेल्या दोन वर्षात साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते तयार केले आहेत.
मित्रहो, जम्मू काश्मीर साठी, पर्यटन हा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. खास करून इथे श्रद्धास्थाने खूप आहेत. बाबा बर्फानी असो किंवा माता राणीचा दरबार, देश-विदेशातून इथे लाखो भाविक येतात. भाविकांना इथे सुविधा मिळाव्यात आणि इथल्या जनतेला रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.
आता कटरा इथे मातेच्या दरबारा पर्यंत रेल्वे पोहोचली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. या रेल्वे मार्गामुळे मातेच्या भक्तांची मोठी सोय झाली आहे. एवढ्यावरच आम्हाला समाधान मानायचे नाही, म्हणूनच आज दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी एक पर्यायी मार्ग आहे तर दुसरा, मातेच्या द्वारापर्यंत सामान पोहोचवणारा रोप वे आहे.
मित्रहो,मातेच्या दर्शनासाठी, भाविक आता ताराकोटा मार्गानेही जाऊ शकतात. कटरा आणि अर्धकुंवारी दरम्यान पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हा पर्यायी मार्ग आहे. यामुळे गर्दी पासूनही सुटका होईल. दीड किलोमीटरच्या लिंक रोड द्वारे सध्याच्या पायी मार्गाला, हा मार्ग जोडला जाणार आहे, यामुळे पायी मंदिर यात्रा करण्यासाठी, उपलब्ध दोन मार्गापैकी एकाची निवड करता येईल. माता राणीच्या भक्तांसाठी हा सुरक्षित मार्ग आहे. त्यामध्ये प्रत्येक सुविधे कडे लक्ष पुरवण्यात आले आहे.
मित्रहो, पर्यायी मार्गाखेरीज मातेच्या द्वारापर्यंत सामान पोहोचवणाऱ्या रोपवेचेही उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. या रोप वे मुळे सामान वाहतूक खूपच सुलभ होणार आहे. श्री माता वैष्णो देवी देवस्थान, या सुविधेचा अधिकाधिक उपयोग करून भाविकांना सहजपणे भोजन विषयक सुविधा उपलब्ध करून देऊ शकेल. मंदिरा च्या जवळ कचरा प्रबंधनासाठीही या रोपवे मुळे मोठी मदत होणार आहे, कटरा पासून मंदिरापर्यंत सामान जाईल आणि परतताना कचरा घेऊन येईल.
मित्रहो,सामानासाठीच्या रोप वे च्या धर्तीवर भाविकांसाठीही अशी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. 60 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेले भैरो घाटी भवन लवकरच पूर्ण होणार आहे. तासाला 800 लोकांना घेऊन जाण्याची या रोप वे ची क्षमता राहील. यामुळे वयोवृध्द आणि दिव्यांग भाविकांना मदत होईल. हा रोप वे पूर्णपणे कार्यान्वित झाला की एका वेळी 3 मिनिटात 40 -45 लोकांना घेऊन जाण्याची याची क्षमता असेल. या रोप वे मधे दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर ऑटोमेटीक तिकीट यंत्रणा असेल. भाविकांना सुविधा देण्यासाठी श्राइन बोर्ड ज्या पद्धतीने काम करत आहे त्या बद्दल अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन.
बंधू-भगिनीनो,जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सोयी सुविधा मुळे पर्यटन वाढेल आणि पर्यटनामुळे रोजगार वाढेल. मात्र रोजगारात शिक्षण आणि कौशल्य विकासाची, महत्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारने राज्यात शिक्षण विषयक मोठ्या संस्थाना मंजुरी दिली आहे. जम्मूमधे निर्माण होणारे आय आय एम असो किंवा आय आय टी असो या संस्था राज्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.याशिवाय जम्मू काश्मीर मधल्या 16 हजार हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनीना देशातली मान्यवर विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप दिली गेली आहे.
बंधू-भगिनीनो, महिला सबलीकरणाला सरकारचे प्राधान्य आहे. गेल्या चार वर्षात महिलांनाआर्थिक आणि सामाजिक बळ देणाऱ्या अनेक योजना सरकारने चालवल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत देशभरात सुमारे साडेनऊ कोटी महिला उद्योजकांना छोट्या उद्योगासाठी हमी वाचून कर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये जम्मू काश्मीर मधल्या 50 लाखाहून अधिक महिलांचा समावेश आहे.
उज्वला योजने अंतर्गत देशातल्या गरीब माता- भगिनींना धूर मुक्त स्वयंपाक घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विशेष करून गावातल्या माता भगिनी, दलित असो, वंचित, मागास अशा सर्व समाजातल्या माता भगिनींसाठी ही योजना लाभदायक सिध्द होत आहे. देशभरात 4 कोटी मोफत एल पी जी जोडण्या दिल्या गेल्या तर जम्मू काश्मीर मधल्या साडे चार लाख पेक्षा अधिक माता भगिनींपर्यंत उज्ज्वला योजना पोहोचली आहे.
मित्रहो, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशाला हागणदारी मुक्त करण्याचे अभियान चालवले जात आहे. हा केवळ स्वच्छतेचा विषय नाही तर महिलांच्या सन्मानाचाही आहे. जम्मू काश्मीर मधल्या महिला या अभियाना बाबत किती जागरूक आहेत याचे उत्तम उदाहरण देशाने आणि जगानेही पाहिले. प्रसार माध्यमात मी स्वतः उधमपुरच्या 87 वर्षीय वृध्द मातेचा उत्साह पाहीला.या वयात एक एक वीट जोडून त्या स्वच्छता गृह बनवत होत्या. ना कोणाची मदत, ना कोणते साहित्य, स्वच्छता अभियानात योगदान द्यायचा एकच ध्यास.
मित्रहो, असे प्रयत्न पाहिले की उत्साह द्विगुणीत होतो. कुठे 5 वर्षाची बालिका तर कुठे 87 वर्षाची वृध्द माता या अभियानाशी जोडली गेली आहे. यावरून अंदाज बांधता येतो की स्वच्छता आणि सन्मानाची भावना किती प्रबळ आहे याचा. यामुळेच ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढून आता 80 टक्क्या पेक्षाही जास्त झाली आहे. जम्मू काश्मीर मधेही या योजने अंतर्गत सुमारे साडे आठ लाख घरात स्वच्छता गृहे बनली आहेत.
मित्रहो, जो पर्यंत कौशल्य विकासावर लक्ष दिले जाणार नाही तोपर्यंत महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण अपुरे राहील. म्हणूनच जम्मू काश्मीरच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. सुमारे 5 हजार महिलांना हस्त कला, शिवणकाम, कृषी आणि संबंधित व्यवसायाशी प्रशिक्षण दिले गेले आहे.
बंधू-भगिनीनो, मी दोन वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा मी युवकांना, आपणा सर्वाना, सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. इथल्या युवकांनी सरकारी योजनांचा मोठा लाभ घेतला आहे हे सांगताना मला आनंद होत आहे.
प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत सुमारे 20 लाख लोकांनी बँकेत खाती उघडली आहेत. या खात्यात आजच्या तारखेला सुमारे 800 कोटी रुपये जमा आहेत, मी केवळ जम्मू- काश्मीर बाबत सांगतोय. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या कामगार बंधुंसाठी चालवण्यात येणाऱ्या अटल निवृत्तीवेतन योजनेशी इथले 40 हजार पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. कमी हप्तेवाल्या दोन योजना सरकार कडून चालवल्या जातात, त्यामध्ये राज्यातले सुमारे 9 लाख लोक जोडले गेले आहेत.या योजनांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपये दाव्यांबाबत दिले गेले आहेत.
मित्रहो, सैन्यात भर्तीसाठी, इथला युवक नेहमीच आघाडीवर राहिला आहे. परंपरेला अनुसरून सुरक्षा दलात, या राज्यातल्या युवकांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लष्कर, केंद्रीय सशत्र बल, पोलीस दल, भारतीय राखीव बटालियन यांच्याकडून राबवलेल्या विशेष भर्ती अभियानात 20 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या देण्यात आल्या.
मित्रहो, ही डोग्राची भूमी आहे, वीर भूमी आहे. इथे शौर्य आहे आणि संयमही आहे आणि त्याच बरोबर इथे मधुर संगीतही आहे. बासमतीच्या शेतातून येणारा सुगंधही आहे. आमचा संकल्पही मजबूत आहे आणि रस्ताही योग्य आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने आणि आपणा सर्वांच्या परिश्रमाने हे राज्य विकासाची नव-नवी शिखरे गाठेल, यशस्वी ठरेल याविषयी मला जराही शंका नाही.
धन्यवाद.