हे माझे सौभाग्य आहे की, मला पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली आहे. गेल्या महिन्यात लुधियानाला आलो होतो, तेव्हा मी म्हटले होते वेळेअभावी मी भटिंड्याला जाऊ शकत नाहीये , मात्र लवकरात लवकर मी भटिंड्याला येईन आणि आज मी ते आश्वासन पूर्ण करत आहे.
देशाच्या विकासात रस्ते,विमानतळ,रेल्वे यांचे जेवढे महत्व आहे, त्याहीपेक्षा अधिक सामान्य नागरिकांसाठी सामाजिक पायाभूत सुविधा, ज्यामध्ये शाळा,रुग्णालये असतील. गरीबातील गरीबाला सेवा मिळेल , गरीबातील गरीबाला शिक्षण मिळेल तेव्हा कुठे समाज ताकदवान होईल. आज भारत सरकार आणि पंजाब सरकार एकत्रितपणे, खांद्याला खांदा लावून गाव, गरीब, शेतकरी, दूरवरील दुर्गम भागातील परिसर, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, जिथे वीज नाही, वीज पोहोचावी,जिथे पाणी नाही तिथे पाणी पोहोचावे, जिथे रुग्णालय नाही तिथे रुग्णालय व्हावे, जिथे शाळा नाही तिथे शाळा बनावी, या कामांवर भर देत आहे.
त्याच अंतर्गत आज भटिंडा मध्ये सव्वानऊशे कोटी रुपयांहून अधिक, जवळपास हजार कोटी रुपये खर्चून एम्सचे रुग्णालय बांधले जाणार आहे. हे एम्स केवळ गरीबांचे आजार बरे करेल असे नाही , निमवैद्यकीय शिक्षण, नर्सिंगचे शिक्षण, डॉक्टरीचे शिक्षण, येथील तरुणांच्या जीवनात, त्यांचे संपूर्ण भविष्य, आणि एका पिढीचे नव्हे तर येणाऱ्या पिढीचे देखील भवितव्य बदलण्याची ताकद या एम्सच्या योजनेत आहे.
किती मोठे कल्याण होईल या भागाचे, माझ्या आधि इथे उपस्थित वक्त्यांनी याबाबत विस्तृत चर्चा केली आहे. आणि जसे बादल साहेब म्हणायचे, उदघाटनाची चर्चा या सरकारचा स्वभाव आहे. ज्या कामाचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे उदघाटन देखील आमच्याच कार्य काळात करतो, नाही तर पूर्वीची सरकारे निवडणुका जाहीर झाल्याबरोबर प्रत्येक गल्लीबोळात जाऊन दगड उभे करून यायची. लोकांना समजवायचे असे होईल, तसे होईल, आणि नंतर विसरून जायचे. आम्ही योजना आखतो तेव्हा विचारतो की, कोणत्या तारखेला पूर्ण कराल, आणि तेव्हा कुठे देशात वेग येतो. आणि सध्या तर मी पाहत आहे, भारत सरकार जो प्रकल्प हाती घेतो, त्याची तारीख निश्चित करतो, मग बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. काही लोक तर वेळेपूर्वी पूर्ण करतात आणि अशा लोकांना मी पुरस्कार देखील देतो, जेणेकरून देशात वेगाने काम करण्याची सवय लागेल.
बंधू,भगिनींनो, येथून पाकिस्तान दूर नाही.सीमेवर राहणारे सीमेपलीकडून होणारा छळ सहन करत असतात. सैन्याचे जवान छातीत दम असून, हातात शस्त्र असून, देखील आपला पराक्रम दाखवू शकत नाहीत, त्यांना सहन करावे लागते. बंधू,भगिनींनो, आपल्या सैन्याचे सामर्थ्य पहा, २५० किलोमीटर लांबीच्या टापूवर जेव्हा आपल्या सैन्याच्या शूर जवानांनी सर्जिकल हल्ला केला, सीमेपलीकडे मोठी भीती निर्माण झाली, अजूनही ते त्यातून सावरलेले नाहीत. मात्र मी आज पाकिस्तानच्या शेजारी उभा आहे , सीमेवर उभा आहे, तेव्हा मी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधू इच्छितो.
मला पाकिस्तानच्या जनतेला सांगायचे आहे , हा भारत आहे, येथे सव्वाशे कोटी देशबांधव आहेत. जेव्हा पेशावर येथे मुलांना ठार मारले जाते, सव्वाशे कोटी भारतीयांच्या डोळ्यांत पाणी येते. तुमचे दुःख प्रत्येक भारतीयाला आपले दुःख वाटते. पाकिस्तानच्या जनतेने ठरवावे, त्यांच्या सरकारकडे उत्तर मागावे, अरे लढायचे असेल तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, लढायचे असेल तर काळ्या पैशाविरुद्ध लढा, लढायचे असेल तर बनावट नोटांविरुद्ध लढा, अरे, लढायचे आहे तर गरीबीविरोधात लढा.
असे भारताबरोबर लढाई लढून स्वतःचेही नुकसान करत आहात आणि निर्दोषांच्या मृत्यूचे गुन्हेगार बनत आहात,आणि म्हणूनच पाकिस्तानी जनतेलाही गरीबीपासून मुक्तता हवी आहे. काहीही कारण नाही, आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असे तणावाचे वातावरण निर्माण केले जाते. आणि आता पाकिस्तानने पाहिले आहे आपल्या सैनिकांची ताकद किती आहे , आता ओळख करून दिली आहे.
बंधू, भगिनींनो, सिंधू पाणी करार,सतलज, व्यास, रावी या तीन नद्यांचे पाणी, यामध्ये भारताच्या हक्काचे जे पाणी आहे, ते माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्काचे पाणी आहे. ते पाणी तुमच्या शेतात येत नाही, पाकिस्तानच्या माध्यमातून समुद्रात वाहून जाते. ना पाकिस्तान त्याचा वापर करतो, ना भारताच्या शेतकऱ्यांच्या नशिबी ते येते. मी एका निग्रहाने पुढे जात आहे. मी एक कृतीदल स्थापन केले आहे, हा जो सिंधू पाणी वाटप करार आहे, ज्यामध्ये भारताच्या हक्काचे जे पाणी आहे, जे पाकिस्तानात वाहून जाते, आता त्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून मी पंजाब, जम्मू-काश्मीर , भारताच्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी आणण्यासाठी कटिबद्ध आहे.
बंधू-भगिनींनो, काहीही कारण नाही, आपण आपल्या हक्काचे पाणी देखील न वापरण्याचे. आणि माझा शेतकरी पाण्यावाचून तहानलेला राहण्याचे. मला तुमचे आशिर्वाद हवेत बंधू-भगिनींनो, तुमच्या शेतांनाही मुबलक पाण्याने भरण्याचा माझा विचार आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा आहे. मिळून-मिसळून मार्ग काढता येऊ शकतो. पाकिस्तानात पाणी वाहून गेले, आणि दिल्ली मध्ये सरकार आले. गेले, सुस्त राहिले,आणि माझा शेतकरी रडत राहिला.
बंधू-भगिनींनो, पंजाबच्या शेतकऱ्याला जर पाणी मिळाले तर मातीतून सोने पिकवून देशाची तिजोरी भरतो, देशाचे पोट भरतो. त्या शेतकऱ्यांची चिंता करणे, त्यांना हक्क मिळवून देणे, हे दिल्लीत बसलेले सरकार देखील बादल साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून चालणारे सरकार आहे.
बंधू-भगिनींनो, मला आज शेतकऱ्यांना आग्रहपूर्वक एक गोष्ट सांगायची आहे. कोणी असे म्हणेल कि मोदींना राजकारण येत नाही, निवडणुका समोर आहेत आणि शेतकऱ्यांना असे सल्ले देत आहेत. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, मला निवडणुकीच्या गणिताशी काहीही देणेघेणे नाही. माझ्या शेतकऱ्यांचे भले व्हावे, हाच माझा हिशोब आहे. तुम्ही मला सांगा, आधी आपल्याला पूर्ण ज्ञान नव्हते, शेतात पीक कापणी झाल्यावर जे शिल्लक राहायचे ते आपण जाळून टाकायचो. तेव्हा आपल्याला अधिक माहिती नव्हती, आपल्याला वाटायचे कि यामुळे शेताचे नुकसान होत आहे, जाळून टाकूया. कधी घाई-गडबड असायची म्हणून जाळा. मात्र आता विज्ञानाने सिद्ध केले आहे कि ज्या शेतात जे पीक असते, त्याची कापणी झाल्यानंतर जे टाकाऊ निघते, ते त्या शेतात जी जमीन आहे तिचे सर्वोत्तम खाद्य असते. त्यावर जर एकदा मशीन फिरवले, ट्रॅक्टर चालवला, जमिनीत गाडले तर तुमच्याच शेतासाठी, त्या धरती मातेसाठी उत्तम खत असते.
माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, जशी धरती मातेला पाण्याची तहान लागते, त्याचप्रमाणे धरती मातेला भूक देखील लागते, तिला खाणे देखील हवे. हा टाकाऊ माल जर तिच्या पोटात पुन्हा टाकला, तर हि धरतीमाता तुम्हाला आशिर्वाद देते, त्यापेक्षा दहा पटीने आशिर्वाद देईल आणि तुमचे शेत फुलेल बहरेल, बंधू-भगिनींनो. आणि म्हणूनच ते जाळू नका, ही तुमची संपत्ती आहे. अब्ज-खरब रुपयांची संपत्ती जाळू नका. आणि मी केवळ पर्यावरणाच्या नावावर बोलणारा माणूस नाही, मी तर साधासुधा शेतकऱ्यांचे भले चिंतिणारा माणूस आहे. आणि म्हणूनच, पंजाब असो, हरियाणा असो, पश्चिम उत्तर प्रदेश असो, उत्तरी राजस्थान असो, आपण ते जाळायचे नाही. आणि आता तर विज्ञान प्रगती करत आहे, कचऱ्यापासून इथेनॉल बनवण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे.
भारत सरकार त्यावर अतिशय वेगाने काम करत आहे. आगामी काळात आपल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, आणि जेव्हा लाभ मिळेल तेव्हा टाकाऊ मालापासून देखिल पैसे मिळतील. आणि म्हणूनच, माझ्या बंधू, भगिनींनो, आजपासून संकल्प करूया आपल्या या धरती मातेच्या हक्काचे जे खाद्य आहे, ते आपण जाळणार नाही, ते त्याच जमिनीत गाडून टाकू, त्याचे खत बनेल, मातेचे पोट देखील भरेल, उत्तम पीक देखील येईल, ज्यामुळे देशाचेही पोट भरेल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला विनंती करायला आलो आहे.
बंधू,भगिनींनो, तुम्हाला माहित आहे भ्रष्टाचाराने, काळ्या पैशाने या देशाच्या मध्यम वर्गाला लुटले आहे , त्यांचे शोषण केले आहे आणि भ्रष्टाचार, काळ्या पैशाने गरीबांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे. मला मध्यम वर्गाचे शोषण बंद करायचे आहे, त्यांच्यासाठी जी लूट होत आहे, ती लूट बंद करायची आहे आणि मला गरीबांचे जे हक्क आहेत ते हक्क मिळवून द्यायचे आहेत. कोणतेही काम करा, मुलांना शाळेत घालायचे आहे तर शाळावाले म्हणतात, धनादेशाद्वारे इतके घेऊ, रोख इतके घेऊ, जमीन खरेदी करायची आहे, म्हणतात रोख इतके घेऊ, धनादेश द्वारे इतके घेऊ, रुग्णालयात डॉक्टरांकडे जायचे आहे , इतके रोख द्या, इतके धनादेशाद्वारे द्या.
हा काळा व्यवसाय देशाला वाळवीप्रमाणे खात चालला आहे. आणि म्हणूनच बंधू,भगिनींनो, ५००आणि १००० रुपयांच्या नोटांवर प्रतिबंध घातला आहे, नवीन नोट हळू-हळू येणार आहे आणि देशाच्या जनतेने जो त्रास सहन केला आहे, अडचणींचा सामना केला आहे, बंधू, भगिनींनो, कोट्यवधी देशबांधवांचे आभार मानण्यासाठी माझे शब्द देखील कमी पडतात. तुम्ही एवढ्या हाल-अपेष्टा सहन करूनही या चांगल्या कामाला तुम्ही पाठिंबा दिलात, प्रामाणिक कामाला तुम्ही पाठिंबा दिलात.
बंधू,भगिनींनो,अडचणींचा मार्ग देखील आहे आणि त्या मार्गासाठी मी तुमची मदत घ्यायला आलो आहे. तुम्ही, तुमच्याजवळ जो मोबाईल फोन आहे , तो नुसता मोबाईल फोन नाही. तुमच्या मोबाईल फोनला तुम्ही तुमची स्वतःची बँक बनवू शकता, तुमच्या मोबाईल फोनला तुम्ही तुमचा बटवा बनवू शकता, एक रुपयाचीही रोख नोट नसली तरीही , आजचे विज्ञान असे आहे, तंत्रज्ञान असे आहे, जर तुमचे पैसे बँकेतील खात्यात जमा असतील तर तुम्ही मोबाईल फोन द्वारे बाजारातून खरेदी करू शकता, मोबाईल फोन द्वारे पेमेंट करू शकता, हाताला, पैशाला स्पर्श न करताही तुम्ही तुमचे पूर्ण व्यवहार करू शकता.
आपल्या देशात जेवढी कुटुंबे आहेत, त्यापेक्षा चारपट फोन लोकांच्या हातात आहेत. मोबाईल फोन आहेत. आज मोबाईल बँकिंग चालते, भविष्यात देखील भ्रष्टाचाऱ्यांना पुन्हा उभे राहू द्यायचे नसेल,काळा पैसा असणाऱ्यांना मान वर काढू द्यायची नसेल , तर मी देशबांधवांना आवाहन करतो कि तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्येही बँकेची शाखा तयार करा. मोबाईल फोनवर बँकांचे अँप असतात, ते डाऊनलोड करा. मी तरुणांना सांगतो, विद्यापीठांना सांगतो, राजकीय नेत्यांना सांगतो कि तुमच्या परिसरातील नागरिकांना प्रशिक्षण द्या, व्यापाऱ्यांना प्रशिक्षण द्या. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जर अँप आले तर मी ज्या दुकानात जाईन त्याला सांगेन कि माझ्याकडे हे अँप आहे, मला २०० रुपयांचे सामान हवे आहे, तुम्ही मोबाईल फोनवर नंबर लावा , २०० रुपये एका सेकंदात त्याच्याकडे जातील, आणि तो बघेल हो, माझे २०० रुपये आले, तुमचे काम झाले.
बंधू,भगिनींनो, आता तो काळ निघून गेलाय जेव्हा खिशात नोटा भरून जावं लागायचं, चोर-दरोडेखोरांचीही आता भीती नाही. बंधू,भगिनींनो, बनावट नोटांनी आपल्या देशातल्या तरुणांचं नुकसान केले आहे. माझ्या देशाच्या तरुणांना वाचवण्यासाठी बनावट नोटांचा बिमोड करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू,भगिनींनो मी तुम्हाला विनंती करतो,मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, की तुम्ही पूर्ण पाठिंबा देऊन, देशाला महान बनवण्याचे हे जे अभियान सुरु आहे, त्या अभियानात खांद्याला खांदा भिडवून चला, प्रत्येकाची मदत करा, आणि आपल्या पंजाबला पुढे घेऊन जा.
हे पंजाबचं सौभाग्य आहे की बादल साहेबांसारखे एक महान नेते पंजाबमध्ये आहेत. या देशाला या गोष्टीचा अभिमान आहे, जेव्हा भारताच्या सर्वात तरुण मुख्यमंत्र्याबाबत चर्चा व्हायची तेव्हा म्हटलं जायचे की भारताचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कुणी असतील तर ते प्रकाश सिंग बादल आहेत. आणि आज भारतात सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री कोण आहेत या बाबत चर्चा होते तेव्हा देखील प्रकाश सिंग बादल यांचेच नाव येते. इतका प्रदीर्घ काळ जनता-जनार्दनाचा एका व्यक्तीवर विश्वास, हा किती मोठा तपश्चर्येचा मार्ग आहे याचा अनुभव आपण घेत आहोत.
चला बंधू, भगिनींनो, पंजाबच्या बंधू, भगिनींनो, पंजाबच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही दिल्ली तुमच्या सोबत आहे; मनापासून तुमच्या बरोबर आहे, एकत्रितपणे वाटचाल करायची आहे, नवीन पंजाब घडवायचा आहे, सशक्त पंजाब बनवायचा आहे, येथील तरुणाचे जीवन बदलणारा पंजाब बनवायचा आहे; आणि एम्स द्वारा एक नवीन अध्याय सुरु होत आहे जो तंदुरुस्त पंजाबच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो, बादल साहेबांचे आभार मानतो.