व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर , देश आणि जगभरातून आजच्या पवित्र दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले सर्व भाविक बंधू आणि भगिनींनो,
श्री गुरु रविदास जी यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांना आणि जगभरात पसरलेल्या श्री रविदास यांच्या अनुयायांना मी शुभेच्छा देतो.
गुरू रविदास यांच्या कृपेने आणि आशीर्वादामुळे मी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या समोर पुन्हा एकदा आलो आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. वर्ष 2016 मध्ये आजच्याच पवित्र दिवशी मला इथे डोकं टेकण्याची आणि लंगरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी, या संपूर्ण परिसराचे सौन्दर्यीकरण आणि विकास करण्याचा मनोदय मी तुमच्यासमोर व्यक्त केला होता. त्यानंतर जेव्हा उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार आले तेव्हा यासंदर्भात एक व्यापक अहवाल तयार करण्याचा आग्रह मी त्यांच्याकडे धरला. मला अतिशय आनंद आहे, की जी मागणी तुम्ही दशकापासून करत होतात, ज्याची इथे नितांत गरज होती,ते काम आज होत आहे. अनेक सरकारे आली आणि गेली, प्रत्येकाने आश्वासने दिली, मात्र तुमच्या आशा कधीही पूर्ण झाल्या नाहीत. तुमच्या इच्छा आणि आणि आशा पूर्ण करण्याच्या दिशेने एका मंगल कामाची आज सुरुवात झाली आहे, शुभारंभ झाला आहे.
भाविकांनो, पाहिल्या टप्प्यात सुमारे 50 कोटी रुपये निधी खर्चून विस्तारीकरण आणि सौन्दर्यीकरण केले जाणार आहे. या अंतर्गत, इथून बनारस हिंदू विश्वविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे.हा 12 किलोमीटरचा रस्ता असेल. गुरु रविदासजी यांचा एक कांस्य पुतळा बनवला जाईल. एक मार्गाचे निर्माण होईल. समुदाय केंद्र आणि इतर सार्वजनिक सुविधाही तयार केल्या जातील. म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आणि इथे येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा मिळतील.
मित्रांनो, संत रविदास यांचे हे जन्मस्थळ कोट्यवधी लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय तर आहेच, त्याशिवाय इथला खासदार म्हणून, या भूमीची सेवा करण्याचे सदभाग्य मला लाभले, याचा मला विशेष आनंद आहे. भारताच्या सामाजिक जीवनाला दिशा देणारी, प्रेरणा देणारी ही पवित्र भूमी आहे. संत रविदास यांच्या विचारांचा विस्तार अमर्याद, असीम आहे. त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण हीच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला जगण्याची दिशा आणि दीक्षा दिली आहे. संत रविदास म्हणतात-
‘ऐसा चाहू राज मैं, जहां मिले सबन को अन्न,
छोट-बड़ो सब समान बसे, रविदास रहे प्रसन्न।’
म्हणजे, गुरुजींनी अशा भारताची कल्पना केली होती, जिथे कुठलाही भेदभाव न होता, सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातील.
मित्रांनो, केंद्रातील सरकार गेल्या साडे चार वर्षात या भावनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रामाणिकपणे अहोरात्र काम करते आहे.’सबका साथ-सबका विकास’ आणि विकासाची पंचधारा म्हणजेच- मुलांसाठी शिक्षण,युवकांना रोजगार, वृद्धांना औषधोपचार, शेतकऱ्यांना सिंचन आणि प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना हे सगळे सर्वांना मिळावे, यासाठी आमचे सरकार सतत काम करते आहे, प्रयत्न करते आहे. आता थोड्यावेळाने मी बनारसमधल्या दोन कर्करोग उपचार रुग्णालयांचे आणि इतर अनेक आरोग्य सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहे. त्याशिवाय, वाराणसी आणि पूर्वांचलातील नागरिकांचे जीवन सोपे बनवण्यासाठी इतर अनेक योजना देखील आजपासून सुरु होत आहेत. या सर्व सुविधांचे समान लाभ समाजातील प्रत्येक वर्गातल्या नागरिकांना मिळणार आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक योजना पूज्य श्री गुरु रविदास जी यांच्या भावनेशी अनुरूप आहे. गरीब कुटुंबांना पक्की घरे, प्रत्येक घरात शौचालये, प्रत्येक कुटुंबाला उज्ज्वला योजनेअंतर्गत, गैस सिलेंडरचे वितरण, गरिबांना मोफत वीजेची जोडणी, गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार, गरीब आणि मध्यम वर्गातील युवकांना मुद्रा योजनेअंतर्गत विनातारण, विना हमी कर्ज, शेतकऱ्याच्या शेतात, सिंचनाचे पाणी पोहोचवणे, देशातील 12 कोटीं गरीब शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट मदत, अशा अनेक योजना सुरु आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे. समाजातल्या वंचित, उपेक्षित वर्गातील लोकांच्या उत्थानासाठी अशा अनेक योजना सरकार राबवत आहे.
गुरुदेव नेहमी असं म्हणत की कुठलीही जात, वर्ग, संप्रदाय या सर्वांच्या पलिकडे जात, कुठलाही भेदभाव न होता, केवळ व्यक्ती म्हणून सर्वांना सर्व योजनांचा समान लाभ मिळायला हवा आणि मला समाधान वाटते की तसा लाभ त्यांना मिळतो आहे.मित्रांनो, पूज्य रविदासजी यांना अशाच प्रकारचा समाज अपेक्षित होता जिथे जाती आणि वर्गाच्या आधारावर कोणताही भेदभाव नसेल. ते म्हणत-
जाति-जाति में जाति है, जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड़ सके, जब तक जाति न जात।।
याचा अर्थ-जात ही केळ्याच्या पानासारखी असते. जसे केळीच्या पानांच्या आता पाने असतात, तशाच जातीमध्ये अनेक पोटजाती असतात. अशात जेव्हा जातीच्या आधारावर समाजात भेदभाव होत राहील, तोपर्यत, सगळी माणसे एकमेकांशी समरस होऊ शकणार नाहीत, एकत्र येऊ शकणार नाही. सामाजिक समरसता शक्य होणार नाही. मित्रांनो गुरु रविदासजी यांनी सांगितलेल्या मार्गावरुन जर आपण पूर्ण प्रामाणिकपणे वाटचाल केली असती, तर आज भारत जाती जातींमुळे होणाऱ्या भेदभाव आणि अत्याचारापासून मुक्त झाला असता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही.
बंधू आणि भगिनींनो, नवा भारत ही परिस्थिती बदलणार आहे. ,आमचे युवा मित्र, आजच्या डिजिटल भारताच्या युगात तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा भाग बनणार आहेत. आपण सगळे मिळून ही स्थिती बदलणार आहोत. मात्र, जे लोक फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी, आपले काम व्हावे,म्हणू जाती-पातीचे राजकारण करत असतात, त्यांचे स्वार्थी हेतू आपण समजून घ्यायला हवेत.
मित्रांनो, आणखी एका चुकीच्या गोष्टीकडे गुरूंनी आपले लक्ष वेधले आहे. एक अशी वाईट गोष्ट ज्यामुळे आपला समाज आणि आपल्या देशाची खूप हानी झाली आहे.ही वाईट गोष्ट आहे, भ्रष्टाचार, बेईमानी. दुसऱ्यांचा हक्क हिरावून आपला स्वार्थ साधण्याची वृत्ती. गुरुजी म्हणाले होते-
श्रम कऊ इसर जानी केई, जऊ पुजे ही दिन-रैन।
म्हणजे खरे परिश्रम हेच ईश्वराचे रुप असते . प्रामाणिकपणे जे काम केले जाते, त्यातून मिळणारी कमाई आपल्या आयुष्यात सुख आणि शांती घेऊन येते. गुरुजींच्या ह्याच भावनेला राजकीय आणि सामाजिक आयुष्यात मूर्त रुप देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने गेली साडे चार वर्षे केला आहे. नोटबंदी असेल, बेनामी संपत्तीच्या विरोधात केली जाणारी कठोर कारवाई असेल किंवा मग काळा पैसा कमावण्याऱ्या वृत्तीं विरोधात केलेली कारवाई आणि अशी वृत्ती संपवण्याचे प्रयत्न असोत, ज्यातून भारतात ‘ सब चलता हैं’ ही मानसिकता रुजली होती, ती बदलण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
मित्रांनो, संत रविदास जी यांच्या आशीर्वादामुळे नव्या भारतात, बेईमानी आणि भ्रष्टाचाराला काहीही थारा दिला जाणार नाही. जी व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्या श्रमाने प्रगती करण्याचा प्रयत्न करेल, सरकार त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक पावलावर त्याची साथ देईल. आपण नुकतेच पाहिले असेल, की जे लोक प्रामाणिकपणे कर भारतात, अशा मध्यमवर्गाच्या कोट्यवधी प्रामाणिक लोकांना पाच लाख रुपये उत्पन्नापर्यतच्या करात सरकारने सवलत दिली आहे. एकीकडे जनतेचा पैसा लुटणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जात आहे तर दुसरीकडे प्रामाणिकपणाचा सन्मानही केला जात आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपण सगळे जण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला असे गुरु, ऋषीमुनी, विद्वान महापुरुषांचे मार्गदर्शन लाभले. गुरूंचे हे ज्ञान, त्यांनी दिलेल्या परंपरा अशाच आमच्या अनेक पिढ्यांना मार्ग दाखवत राहतील. या संत महात्म्यांची भारताच्या वैभवशाली परंपरेची माहिती भारताला व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी मी स्वतः मगहर इथे संत कबीर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी गेलो होतो. त्याचप्रमाणे, सारनाथ येथे भगवान बुद्ध यांचे जीवन आणि संस्कारांच्या, पवित्र स्थानांना आम्ही संरक्षण दिलं आहे, त्याचे सौन्दर्यीकरण केले आहे. त्याचप्रमाणे, गुरुनानक देव यांच्या 550 व्या जयंतीचा उत्सव संपूर्ण जगात व्यापक प्रमाणात साजरा केला जात आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्या देशासाठी, समाजासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्यांना त्यांचा यथोचित सन्मान मिळावा, यासाठी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार पूर्णपणे समर्पित आहे. आमचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा आमची शक्ती आहे, आमची प्रेरणा आहे. तुमचं आयुष्य सुकर व्हावं, यासाठी गुरु रविदासजी यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला अधिक सशक्त करणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पूज्य गुरु रविदास यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. गुरु रविदास यांच्या जन्मस्थळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाच्या शुभारंभासाठीही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, आणि गुरु रविदास महाराज यांच्या चरणांना वंदन करत, माझे भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद !