अरबी समुद्राची राणी असलेल्या कोचीमध्ये उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. निळा समुद्र, बॅक वॉटर, अतिशय विशाल पेरियार नदी, आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि अतिशय उत्साही जनता यामुळे खरोखरच कोची इतर सर्व शहरांची राणी ठरते.
हीच ती भूमी आहे जिथून महान भारतीय संत आदि शंकराचार्य यांनी भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि देशाचे एकीकरण करण्यासाठी ऐतिहासिक यात्रांची सुरुवात केली होती.
केरळमधील सर्वात मोठी औद्योगिक आस्थापना आज विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हा क्षण केवळ देवभूमीसाठीच अभिमानास्पद नसून संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आहे.
भारत पेट्रोलियमच्या कोची रिफायनरीने केरळ आणि शेजारी राज्यांमधील सर्वसामान्य जनतेमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची आणि प्रदूषण विरहित स्वच्छ इंधनाची लोकप्रियता वाढवण्यात पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
माझ्या बालपणीचा आणि तारुण्याचा काळ मला आठवतो ज्या काळात मी अनेक मातांना त्यांच्या स्वयंपाकाच्या खोलीत लाकडाच्या चुली पेटवण्यासाठी अतिशय त्रास सहन करताना पाहिले होते.तेव्हापासूनच ही परिस्थिती बदलायची आणि भारतातील मातांना आणि भगिनींना निरोगी वातावरण असलेली स्वयंपाकगृहे उपलब्ध करून द्यायची असे मी ठरवले होते.
भारत सरकारची उज्वला योजना हे स्वप्न साकार करण्याचा एक मार्ग आहे. उज्वला योजनेअंतर्गत मे 2016 पासून देशातील गरिबातील गरीब असलेल्यांना सुमारे सहा कोटी एलपीजी धारकांना कनेक्शन्स देण्यात आल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.
मित्रांनो,
तेवीस कोटींहून जास्त एलपीजी ग्राहक पहल योजनेत सहभागी झाले आहेत. पहलमुळे बनावट नावांनी उघडलेली खाती, एकापेक्षा जास्त खाती, निष्क्रिय खाती ओळखणे शक्य झाले. जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून पहलची ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा त्याग करण्याच्या गिव्ह इट अप उपक्रमांतर्गत एक कोटी पेक्षा जास्त ग्राहकांनी अनुदानाचा त्याग केला आहे. अलीकडेच केलेल्या विस्तारानंतर एलपीजी वायूचे उत्पादन दुप्पट करून कोची रिफायनरी उज्वला योजनेसाठी मोलाचे योगदान देत आहे. पर्यावरणातील प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शहरी वायू वितरणाच्या जाळ्याचा विस्तार करून भारत सरकार पर्यावरण स्नेही असलेल्या सीएनजी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देत आहे.
सीजीडी बिडिंग फेरीच्या दहाव्या फेरीच्या यशस्वी पूर्ततेनंतर देशातील 400 हून जास्त जिल्ह्यांमध्ये पाईपाद्वारे गॅस पुरवण्याची सोय उपलब्ध होईल. वायू आधारित अर्थव्यवस्था असावी आणि उर्जेच्या पर्यायांमधील वायूचा वाटा वाढावा यासाठी नॅशनल गॅस ग्रीड किंवा प्रधानमंत्री उर्जा गंगा योजना देखील सुरु करण्यात आली आहे.
अतिरिक्त पंधरा हजार किलोमीटरच्या गॅस पाईपलाईन जाळे तयार करण्याचा सरकारचा विचार आहे.
खनिज तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारने दहा टक्के आयात कमी करण्याच्या व मौल्यवान परकीय चलनाची बचत करण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली आहेत.
यासाठी बारा टूजी इथॅनोल प्रकल्प उभारण्यासाठी तेल कंपन्यांनी लिग्नोसेल्युलोज रुटच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीतील इथॅनोलचा स्वीकार केला आहे. यासाठी यापूर्वीच सहा सामंजस्य करार यापूर्वीच करण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर एक प्रमुख उद्योग म्हणून भारतीय रिफायनरी उद्योगाने स्वतःची चांगली ओळख निर्माण केली आहे.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा देश असलेल्या भारताने मागणीपेक्षा जास्त तेलशुद्धीकरण करून तेल शुद्धीकरणाचे प्रमुख केंद्र बनण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
सध्या देशाची तेलशुद्धीकरण क्षमता 247 एमएमटीपीए पेक्षा जास्त आहे. या निमित्ताने मी आयआरईपीची पूर्तता वेळेवर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करत आहे.
शेवटचे तरीही महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी या कामासाठी दिवसरात्र कष्ट उपसले, त्या कामगारांचे मी अभिनंदन करतो. मला असे सांगण्यात आले आहे की या प्रकल्पाच्या कामाच्या सर्वोच्च टप्प्यात तर वीस हजारपेक्षा जास्त कामगार प्रकल्पस्थळावर काम करत होते.
अनेक प्रकारे या प्रकल्पाचे तेच खरे नायक आहेत. एकात्मिक रिफायनरी विस्तार प्रकल्प ही भारत पेट्रोलियमची बिगर इंधन क्षेत्रात आपला विस्तार करण्याचे एक धोरणात्मक पाऊल होते.
माझ्या मित्रांनो,
पेट्रो केमिकल ही रसायनांमधील अशी एक श्रेणी आहे ज्याबद्दल आपण फारसे बोलत नाही, पण आपल्या आयुष्यात त्यांचे अदृश्य अस्तित्व असते आणि आपल्या रोजच्या जीवनातील अनेक पैलूंशी त्यांचा संबंध असतो. बांधकामाचे साहित्य, प्लास्टिक आणि रंग, पादत्राणे, कपडे आणि इतर प्रकारचे कापडाचे प्रकार किंवा स्वयंचलित वाहनांचे भाग, सौंदर्य प्रसाधने आणि औषधे यांचा त्यात समावेश आहे. मात्र, यापैकी बरीच रसायने इतर देशांमधून आयात केली जातात.
या पेट्रो केमिकल्सचे उत्पादन आपल्या भारतातच झाले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. आयआऱईपी अर्थात एकात्मिक रिफायनरी विस्तार प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर कोची रिफायनरीच्या प्रोपिलिन उत्पादनाच्या क्षमतेचा वापर करून बीपीसीएलने मेक इन इंडिया अंतर्गत अॅक्रिलिक अॅसिड अॅक्रिलेट्स आणि ऑक्झो अल्कोहोलचे उत्पादन करणारे तीन जागतिक दर्जाचे प्लान्ट उभारण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले असल्याबद्दल मला आनंद होत आहे.
या महत्त्वाच्या पेट्रो- केमिकल्सचा उपयोग रंग, शाई, कोटिंग, डिटर्जंट आणि इतर अनेक वस्तूंच्या निर्मितीमध्ये होणार आहे. आता बीपीसीएल एक पेट्रो केमिकल संकुल उभारत असून, त्यात पॉलिओल्सचे उत्पादन करण्यात येईल. याचा वापर फोम्स, फायबर, पादत्राणे, आणि औषध निर्मितीमध्ये करता येईल.
मला खात्री आहे की या सर्वांमुळे अनेक संबंधित उद्योग कोचीमध्ये तयार होणार आहेत.
राज्य सरकारने नियोजित केलेले पेट्रो- केमिकल्स पार्क लवकरच कार्यान्वित होतील आणि बीपीसीएलच्या पेट्रो-केमिकल क्षेत्रातल्या मोठ्या पावलामुळे उपलब्ध झालेल्या व्यवसायांच्या संधीना चालना देईल, अशी मला आशा आहे.
बीपीसीएलने इतर सार्वजनिक उपक्रमांच्या सहकार्याने कौशल्यप्राप्त आणि रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी एका कौशल्य विकास संस्थेची स्थापना केली आहे हे लक्षात घेताना मला आनंद होत आहे. पवित्र महादेव मंदिराजवळ एट्टूमन्नूर येथे या संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे भूमीपूजन करतांना मला अतिशय आनंद होत आहे. या ठिकाणापासून 12 किलोमीटर अंतरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या कोचीन बॉटलिंग प्लांटमध्ये माउंडेड स्टोरेज सुविधा सुरू केली असल्याचे सांगताना देखील मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे एलपीजी साठवणूक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे आणि एलपीजी टँकरची रस्त्यावरील वर्दळ कमी होणार आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात जेव्हा शतकातील भीषण पुराला केरळ सामोरे जात होते तेव्हा सर्व अडचणींना तोंड देत बीपीसीएलची कोची रिफायनरी सुरूच राहिली होती हे ऐकून मला अतिशय अभिमान वाटत आहे. अनेक कर्मचारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे उत्पादन सुरू राहावे यासाठी या रिफायनरीमध्ये राहात होते असे मला समजले. यामुळे मदतकार्य करणारी वाहने आणि हेलिकॉप्टरना इंधन उपलब्ध होत राहिल्याने त्यांचे मदतकार्य कोणताही खंड न पडता करता आले.
बीपीसीएलच्या कोची रिफायनरीने कष्ट करण्याची, सामाजिक बांधिलकीची आणि नवनिर्मितीची ही भावना अशीच कायम ठेवावी असे मी आवाहन करत आहे. या भावनेमुळे विकासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाता येणार आहे. राष्ट्रउभारणीमध्ये कोची रिफायनरीच्या योगदानाबद्दल मला अभिमान आहे.
पण आता माझ्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. कोची रिफायनरीने दक्षिण भारतातील पेट्रो- केमिकल क्रांतीचे नेतृत्व करावे आणि न्यू इंडियाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाठबळ द्यावे अशी मी कामना करतो.
जय हिंद!