माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वानंदजींच्या प्रचारासाठी आपणाशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. इतक्या अल्प अवधीत आपण सर्वानंद यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले यासाठी मी आसामच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो. आसाममधल्या भारतीय जनता पार्टी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. आसाममधली परिस्थिती किती कठीण होती हे आपण जाणताच. एक आव्हान होते,आसाम एका गर्तेत होता,त्यातून बाहेर यायचे होते. आपण सर्वानी आमच्यावर विश्वास दाखवला. आसाममध्ये सरकार बनवण्याची संधी दिलीत. आज आसाम मधल्या या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे,सर्वानंदजी, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी, आमचे सहकारी पक्ष आणि आसामच्या जनतेचे, हे एक वर्ष पूर्ण होत असताना सफलतापूर्वक आगेकूच करण्याबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो.
बंधू-भगिनींनो,आज एका महत्वपूर्ण कामाच्या भूमी पूजनासाठी आपल्याला भेटण्याची संधी मला मिळाली.हे भूमिपूजन केवळ एका संस्थेचे भूमिपूजन नव्हे,एखादी व्यवस्था उभी राहते आहे त्याचे भूमिपूजन नव्हे,तर आज ज्या कामाचा शुभारंभ होत आहे त्यामुळे येत्या काळात केवळ आसाम नव्हे,ईशान्य भागाचा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानच्या ग्रामीण जीवनाचे भाग्य बदलण्याची क्षमता असलेले हे भूमिपूजन आहे.
भारत कृषिप्रधान देश आहे.आपण असे भाग्यवान आहोत की आपल्याला सर्व ऋतूंचा लाभ मिळतो.जगभरात लोकांना तीन ऋतू परिचित असतील मात्र आपल्याला त्यापेक्षा जास्त ऋतूंचा परिचय आहे.ज्या देशाचे जीवन कृषिप्रधान मानले गेले आहे,महात्मा गांधींनी ज्या देशात ग्राम राज्य ते राम राज्याची कल्पना मांडली त्या देशात 21 व्या शतकाला अनुकूल अशा युगानुसार आपले कृषी क्षेत्र, आपले ग्रामीण क्षेत्र बदलण्याची गरज आहे. प्राचीन पद्धतीने आपण इथवर पोहोचलो आहोत. अधून मधून नव्या गोष्टींशी सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता हळू-हळू पुढे वाटचाल करण्याचा काळ नाही.काळ कोणासाठी थांबत नाही. गेल्या 100 वर्षात विज्ञान तंत्रज्ञान बदलले नसेल तेवढे ते गेल्या 25 वर्षात बदलले आहे. जेव्हा एवढ्या वेगाने बदल होत आहेत तेव्हा त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळायला हवा. आपल्या कृषी क्षेत्राला मिळायला हवा. आपल्या ग्रामीण जीवनाला हा लाभ मिळायला हवा. आपला देश विविधतेने संपन्न आहे. भाषा आणि पेहेरावातच ही विविधता आढळते असे नव्हे तर इथल्या शेतीच्या पद्धती,फळे,फुले, प्रत्येक प्रांताचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्य लक्षात घेऊन संशोधन कसे होईल, वैज्ञानिक बदल कसे करता येतील,आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या दिशेने पाऊले उचलायला हवीत, यासाठी समग्र दृष्टिकोनासह कृषी क्षेत्रात आम्ही आधुनिकता आणू इच्छितो.
आम्ही एक मोठे स्वप्न पाहिले आहे.हिंदुस्तानमधल्या प्रत्येक शेतकऱ्याचे भाग्य बदलण्याचे हे स्वप्न आहे. 2022 मधे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील तोपर्यंत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हायला हवे आणि याच्या पूर्ततेसाठी आम्ही काम करत आहोत. आमच्याकडे पाच वर्षाचा काळ आहे. या पाच वर्षात आम्ही असा बदल घडवू इच्छितो, अशी प्रगती करू इच्छितो ज्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे जे स्वप्न आम्ही पाहिले आहे त्याची पूर्तता होईल.
बंधू- भगिनींनो,
गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. एवढ्या मोठ्या देशात, तीन वर्ष हा काळ फारच कमी आहे.मात्र एवढ्या कमी काळातही मोठ्या प्रमाणात काम झाल्याचे देशाने पाहिले आहे.112 वर्षाची जुनी संस्था दिल्लीत आहे.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागात संशोधनाचे काम या संस्थेने हाती घेतल्यास मोठा लाभ होऊ शकेल.कारण देशाच्या दक्षिण भागातला निसर्ग वेगळा, उत्तर भागातला निसर्ग वेगळा, ईशान्येकडचा वेगळा आणि पश्चिम भागातला निसर्ग वेगळा आहे. हे लक्षात घेऊन आम्ही दोन नव्या संशोधन संस्था सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एका संस्थेचे भूमिपूजन आज होत आहे.या क्षेत्राच्या वैशिष्ट्यावर जास्त संशोधन होईल. इथल्या लोकांचा अनुभव कमी येईल. इथले वैज्ञानिक,इथल्या युवकांना संशोधनाची संधी उपलब्ध होईल. इथे जे संशोधन होईल ते इथल्या लोकांचा परिचयाचे असेल त्यामुळे ते प्रयोगशाळेतून जमिनीपर्यंत सुलभपणे पोहोचवता येईल. म्हणूनच व्यवस्थांचे विकेंद्रीकरण करण्यावर, स्थळ, काळ, परिस्थिनुरूप त्याचा ढाचा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जेणेकरून तातडीने त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी मदत होईल. मागच्या काही दिवसात,आम्ही शेतकऱ्यांसाठी, बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत, विना अडथळा एक साखळी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले. तीन वर्षात आम्ही मृदा आरोग्य पत्रिकेवर भर दिला. आपल्या जमिनीचा प्रकार आपल्या शेतकऱ्याला माहित नव्हता. आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो.डॉक्टर रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतो आणि त्यावरून निदान करतो की कोणता आजार आहे,कशाची कमतरता आहे.जसे मानवी शरीराचे आहे त्याचप्रमाणे आपल्या धरती मातेचेही आहे. आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे हे रक्ताची चाचणी करून, किंवा इतर चाचण्या करून समजते तसेच आपल्या जमिनीचा कस, क्षमता, कोणत्या पिकासाठी ही जमीन उपयुक्त आहे, कोणते खत आवश्यक आहे ह्या बाबी प्रयोगशाळेत निश्चित होऊ शकतात.म्हणूनच हिंदुस्तानमधल्या प्रत्येक शेतकऱ्याला मृदा आरोग्य पत्रिका मिळावी यासाठी आम्ही अभियान सुरु केले आहे.
बंधू-भगिनींनो,
मृदा आरोग्य पत्रिका ही विज्ञानाने केवळ आम्हालाच सांगितली असे नाही. आधीच्या सरकारलाही माहित होते.वैज्ञानिक आमच्या सरकारच्याच काळात पुढे आले, असे आहे का? वैज्ञानिक तर आधीही होतेच. मात्र केवळ नावापुरतेच करण्याच्या पद्धतीमुळे देशात परिवर्तन घडले नाही.आधी केवळ 15 मृदा आरोग्य तपासणी प्रयोगशाळा होत्या.एवढ्या मोठ्या आपल्या देशात अशा फक्त 15 प्रयोगशाळा कशा पुऱ्या पडणार? या प्रयोगशाळेत दिवसभरात 15 शेतकऱ्यांसाठी काम झाले तरी महिन्यात किती होऊ शकणार? एवढ्या मोठ्या देशाची गरज कशी भागणार? यासाठी आम्ही मोठे अभियान चालवले.आज देशात 9000 पेक्षा जास्त मृदा आरोग्य तपासणी प्रयोगशाळा आम्ही उभारल्या आहेत. आणि हे अभियान आणखी पुढे नेण्यासाठी आम्ही युवा पिढीला आमंत्रित केले आहे.स्टार्ट अप साठी आम्ही हिंदुस्तानच्या युवकांना सांगितले की अशी छोटी-छोटी यंत्र बनवा की शेतकऱ्यांच्या घरातूनही प्रयोगशाळेचे काम होऊ शकेल, जमिनीत हे यंत्र वापरल्यावर शेतकऱ्याला त्याचे उत्तर मिळेल.आपली जमीन कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, जमिनीचा कस याबाबत शेतकऱ्याला उत्तर मिळेल.स्टार्ट अप च्या युवकांनी अशी यंत्र बनवली आहेत जी येत्या काळात प्रत्येक गावात दिसू लागतील.कदाचित एखाद दुसऱ्या घरात अशा यंत्राद्वारे प्रयोगशाळेचे कामही होऊ शकेल.किती व्यापक प्रमाणावर काम होऊ शकते याचे हे उदाहरण आहे.
बंधू - भगिनींनो,
मी शेतकऱ्यांना आग्रहाने सांगू इच्छितो की आपण आजारी पडल्यावर रक्ताची चाचणी करतो त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी आपल्या जमिनीचा कस चांगला राहिला आहे ना, त्यात काही कमतरता आहे का हे जाणून घेण्यासाठी, प्रयोगशाळेत परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिका काढून घ्या आणि त्यात सुचवल्याप्रमाणे पीक घ्या. कमी खर्चात जोमदार पीक घेण्याचा मार्ग खुला झालेला तुम्हाला दिसून येईल. हे काम आम्ही करत आहोत.
बंधू-भगिनींनो,
आपल्या देशातल्या शेतकऱ्याला पाणी मिळाले तर तो मातीतून सोने पिकवेल. यासाठी आम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेवर भर दिला आहे. हा प्रदेश भरपूर पाण्याने समृद्ध आहे. त्यामुळे कधी कधी पाण्याचे मोल लक्षात येत नाही. मात्र ज्या भागात पाऊस कमी होतो, नद्या नसतात अशा भागांना पाण्याचे मोल माहित असते. प्रत्येक थेंबातुन अधिक पीक, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन यावर आमचा जोर आहे. आपल्या देशात आम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन अभियान सुरु केले आहे. सुमारे 90 योजना हाती घेतल्या आहेत. हजारो कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इथून शेतापर्यंत पाणी पोहोचावे आणि शेतकऱ्याने त्या पाण्याचा सूक्ष्म सिंचनासाठी उपयोग करावा,देशाच्या ज्या भागात पाण्याअभावी शेती होत नाही त्या जमिनीपर्यंत पाणी पोहोचावे या दृष्टिकोनातून काम सुरु आहे.
बंधू-भगिनींनो,
आम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे.आपल्या देशातला शेतकरी ईश्वराच्या कृपेवर जगतो. पाऊस जास्त झाला तरी त्रास आणि कमी झाला तरी अडचणीत,गारपीट झाली की त्रस्त आणि वादळ आले तरी नुकसान, अशा शेतकऱ्यांना पीक सुरक्षा मिळाली पाहिजे. पहिल्यांदाच देशात अशी प्रधानमंत्री पीक विमा योजना आली आहे आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरली आहे. बँक कर्ज घेत नाहीत असे शेतकरीही पीक विमा योजना घेत आहेत. त्यात सात पट वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना रूचतील अशा योजना तयार झाल्या आहेत. शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास विम्यामुळे, शेतकऱ्याला वर्षभरासाठी आवश्यक पैसा मिळेल. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी एक पीक विमा योजना उपयोगी येईल या दिशेने आम्ही काम करत आहोत.
बंधू-भगिनींनो,
आपल्या देशात, विशेषकरून ईशान्येकडे, सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात शक्य आहे.जगभरात सेंद्रिय शेतातून उत्पादित मालाला मोठी बाजारपेठ आहे.नेहमीचे पीक एक रुपयात विकले जात असेल तर सेंद्रीय पीक एक डॉलरला विकले जाते. आसाम सह ईशान्य भागातल्या प्रदेशाने याकडे लक्ष पुरवावे,सिक्कीमचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. सिक्कीम हे संपूर्ण राज्य सेंद्रिय शेती करणारे राज्य बनले आहे. ईशान्येकडची राज्ये सेंद्रिय शेतीकडे वळली तर ही राज्ये, हिंदुस्तान आणि जगाचा सेंद्रिय शेतीचा मोठा केंद्र बिंदू ठरू शकतात. जगाला सेंद्रिय वस्तू घ्यायच्या असतील तर ईशान्येकडे पाहावे लागेल, आसामकडे पाहावे लागेल,इथल्या मातीचा सुगंध अन्नाला मिळावा ही शक्यता मी आजमावत होतो आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो मी कंपोस्ट खतासाठी मोठे अभियान सुरु केले आहे.सेंद्रिय शेतीसाठी खत उपलब्ध करून देण्यासाठी, कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्मितीसाठी त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्याला सरकार मदत करत आहे. त्याचा लाभ जमिनीचा कस सुधारण्याला, कृषी उत्पादन वाढविण्याला आणि शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दिशेने होईल.
बंधू-भगिनींनो,
कृषी क्षेत्राबरोबरच मी नव भारताबाबत बोलू इच्छितो. आपण आतापर्यंत पहिल्या हरित क्रांतीचे गोडवे गात आलो. दुसऱ्या हरित क्रांतीची चर्चा करत राहिलो.मात्र मला स्पष्ट दिसत आहे की नव भारतात आपल्याला केवळ दुसऱ्या हरित क्रांतीवर थांबायचे नाही. आपल्याला सदाहरित क्रांतीच्या दिशेने आगेकूच करायची आहे. या सदाहरित क्रांतीच्या दिशेने देशाच्या कृषी विज्ञान क्षेत्राला वाटचाल करायची आहे. या कामी या संशोधन संस्थांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. कृषी क्षेत्राशी संलग्न कोणत्या बाबी आहेत, शेतकऱ्याला खर्च कमी कसा येईल, या दृष्टीने लाभ घेता येईल. सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी मोठे अभियान चालवण्यात आले, हळू- हळू या पंपाची किंमत कमी होऊ लागली आहे. शेतातच सौर पॅनल लावून हा पंप सुरु करता येऊ शकतो.विजेचा खर्च कमी होईल.शेतकऱ्याचे मोठे ओझे कमी होईल.या दिशेने काम सुरु आहे. शेतकरी आपल्या शेताच्या कोपऱ्यावर सौर पॅनल लावून शेतीसाठी आवश्यक वीज घेऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर इमारती लाकडाची लागवड करावी,आपल्या देशात आज लाकडी सामानासाठी परदेशातून लाकूड आणावे लागते. आपल्या शेतकऱ्याला आपण या दिशेने जायला प्रोत्साहन दिले तर देशाला हे लाकूड बाहेरून आणावे लागणार नाही. कोणतेही नुकसान होऊ न देता आपण इमारती लाकडाचे उत्पादन घेऊ शकतो. त्यावर आम्ही भर देऊ इच्छितो. कृषी क्षेत्रात आम्ही पशु पालनावर लक्ष देऊ इच्छितो. धवल क्रांतीची चर्चा खूप ऐकली आहे.मात्र आजही जगात प्रति पशु कमी दूध घेणाऱ्या देशात आपली गणना होते.पशु धनाची संख्या वाढवण्यापेक्षा पशुधनाची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने पशुपालन व्हायला हवे.वैज्ञानिक पद्धतीने पशु आहार नियोजन हवे. पशु आरोग्यासाठी वैज्ञानिक व्यवस्था हवी. याबाबत संशोधनावर भर देऊन त्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. मत्स्य उद्योग, कुक्कुट पालन, मधमाशा पालन, यासारख्या क्षेत्रांच्या मदतीने शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतो.त्यावर भर देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
बंधू-भगिनींनो,
आमच्या सरकारला तीन वर्षे झाली आहेत .मी आज आपल्यासमोर देशासाठी, विशेष करून कृषी क्रांतीच्या दिशेने एका योजनेची घोषणा करू इच्छितो. एक योजना समर्पित करू इच्छितो, ती योजना आहे संपदा.कृषी उत्पादनाच्या मूल्य वर्धनासाठी, आपल्या देशात बऱ्याच संधी आहेत.संपदा म्हणजे स्कीम फॉर एग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ एग्रो प्रोसेसिंग क्लस्टर. कृषी उत्पादनाची मूल्य वृद्धी कशी होईल यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आंबे विकले तर पैसे कमी मिळतात मात्र आंब्याचे लोणचे विकले तर जास्त पैसे मिळतात.टोमॅटो विकले तर कमी पैसे मिळतात तर टोमॅटो केचपला जास्त भाव आहे.म्हणूनच आपल्या देशाच्या कृषीमालाची मूल्यवृद्धी व्हावी, कृषी प्रक्रियेला बळ मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.म्हणूनच आज माझ्या सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्या औचित्याने माझ्या विशाल देशातल्या शेतकऱ्यांसाठी,संपदा योजनेद्वारे अन्न प्रक्रियेला महत्व देऊन जगभरातून थेट परकीय गुंतवणूक इथे आणून ग्रामीण जीवनात बदल घडवून युवकांना रोजगार प्राप्तीच्या दिशेने आगेकूच करण्याचा आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे.
बंधू-भगिनींनो,
येत्या काळात कृषी विकासाद्वारे आगेकूच करण्याचा निर्धार आपण केला आहे त्याचवेळी आपला हा ईशान्य भाग, या अष्ट लक्ष्मी प्रदेशाच्या विकासासाठी आम्ही पंच पथ निश्चित केला आहे. या पंच पंथाद्वारे संपूर्ण ईशान्य भारताला, हिंदुस्तानच्या भविष्याशी, युवकांच्या आशा-आकांक्षांशी जोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटचाल करायची आहे.हा पंच पथ 21 व्या शतकाला अनुकूल पायाभूत सोयी-सुविधांशी संबंधित आहे. महामार्ग हा पहिला पथ, दुसरा पथ आहे रेल्वे , तिसरा जलमार्ग, चौथा हवाई मार्ग आणि पाचवा, महामार्ग माहिती पथ, ऑप्टिकल फायबर जाळे. या पाच पथावरून आधुनिक पायाभूत सोयीसुविधा द्वारे, कालपर्यंत ईशान्येकडचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा आणि आताचा हा अष्ट लक्ष्मी प्रदेश कात टाकून नव भारत बनेल आणि नॉर्थ ईस्ट च्या एन ई चा अर्थ ठरेल न्यू इकॉनॉमी अर्थात नवी अर्थव्यवस्था. एनई चा अर्थ होईल न्यू एनर्जी अर्थात नवी ऊर्जा. एन ई चा अर्थ होईल न्यू एम्पॉवरमेंट म्हणजे सबलीकरण. एका अर्थाने हे नवे इंजिन, हिंदुस्तानच्या विकासाचे नवे इंजिन ईशान्य भारत, पूर्वोत्तर भारत, हे नवे इंजिन या नव भारताला घेऊन आगेकूच करेल, या विश्वासाने कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने आलेल्या माझ्या शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. ही संशोधन संस्था आपणा सर्वांची स्वप्ने साकार करेल असा विश्वास देतो. सर्वानंदजी,त्यांचे सहकारी आणि आसामच्या जनतेला या एक वर्षाच्या सफल प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि उर्वरित चार वर्षासाठी, आसामची स्वप्ने पूर्ण व्हावीत याकरिता वेगाने वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आसामच्या जनतेला विश्वास देतो की आसामचे भाग्य घडवण्यासाठी केंद्रसरकार, आसामच्या खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करेल. इथे जनतेत मोठी ऊर्जा आहे. ही ऊर्जा, ही ताकत केवळ आसामचे भाग्य नव्हे तर हिंदुस्तानचे भाग्य बदलण्यासाठी उपयोगी ठरेल, या भावनेने वाटचाल करायची आहे. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.