माननीय उपराष्ट्रपती जी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी, गुलाम नबीजी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख श्रीमान हरिवंशजी, चंद्रशेखरजींचे सर्व कुटुंबीय आणि त्यांच्या विचारांवर चालणारे सर्व सहकारी बंधू…
आजकालच्या राजकीय जीवनात आणि राजकीय वातावरणात आयुष्य घालवल्यानंतर दोन वर्षानंतरही जगणे कदाचित खूप कठीण असते. लोकही विसरुन जातात, सहकारी देखील विसरुन जातात आणि कदाचित असे व्यक्तिमत्व इतिहासाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हरवून जाते.
मात्र, त्यांच्या निधनाला 12 वर्षे उलटल्यानंतरही, आजही चंद्रशेखरजी त्याच रुपात आपल्यात जीवंत आहेत ही गोष्ट आपण नमूद केली पाहिजे. मी हरिवंशजींचे अभिनंदन करु इच्छितो- एक म्हणजे त्यांनी हे काम केले आणि दुसरे म्हणजे त्यांनी हे काम करण्याचे धैर्य दाखवले. धैर्य यासाठी कारण काही काळापासून आपल्या देशात असे वातावरण तयार झाले आहे ज्यामुळे राजकीय अस्पृश्यता इतक्या तीव्रतेने वाढते. कालपर्यंत हरिवंशजी पत्रकारितेच्या जगातून आलेले ईमानदार आणि राज्यसभेत उपसभापती म्हणून काम करणारी व्यक्ती म्हणून ओळखले जात. परंतु कदाचित या पुस्तकानंतर माहिती नाही हरिवंशजींवर काय-काय शिक्के लागतील.
चंद्रशेखर जी- त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य तर आम्हाला लाभले नाही, जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो ते 1977 मध्ये. तेव्हा भेटण्याची संधी मिळाली. काही प्रसंग मी नक्कीच येथे सांगू इच्छितो. एकदिवस मी आणि भैरोसिंह शेखावत दोघेही पक्षाच्या कामासाठी दौऱ्यावर जात होतो आणि दिल्ली विमानतळावर आम्ही दोघे बसलो होतो. चंद्रशेखरजी सुद्धा आपल्या कामानिमित्त कुठेतरी जाणार होते तेव्हा विमानतळावर दूरुनच दिसले की चंद्रशेखरजी येत आहेत तेव्हा भैरोसिंहजी मला पकडून बाजूला घेऊन गेले आणि त्यांच्या खिशात जे काही होते ते सगळे माझ्या खिशात टाकले. हे इतक्या वेगाने झालं, मी त्यांना विचारतच होतो, हे सगळं तुम्ही माझ्या खिशात का टाकत आहात? तेवढ्यात चंद्रशेखरजी पोचलेच….., आल्यावर पहिल्यांदा चंद्रशेखरजीनी काय काम केले तर , भैरोसिंहजीच्या खिशात हात घातला आणि एवढी लोकं होती, तेव्हा मला लक्षात आले कि त्यांनी यांच्याच खिशात हात का घातला, कारण भैरोसिंहजीना पान-पराग आणि तंबाखू खाण्याची सवय होती आणि चंद्रशेखरजींचा या गोष्टींना विरोध होता. जेव्हा भैरोसिंहजी भेटायचे तेव्हा ते हिसकावून घ्यायचे आणि कचराकुंडीत फेकून द्यायचे. आता यातून वाचण्यासाठी भैरोसिंहजीने आपल्या वस्तू माझ्या खिशात टाकल्या.
कुठे जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांची विचारसरणी आणि कुठे चंद्रशेखर जी आणि त्यांची विचारसरणी, परंतु एक मोकळेपणा, हा आपलेपणा आणि भविष्यात भैरोसिंहजीना काही होता कामा नये, याची चिंता चंद्रशेखरजींना होती अतिशय मोठी गोष्ट आहे. चंद्रशेखरजी अटलजींना नेहमी व्यक्तीश: आणि सार्वजनिकरित्या सुद्धा गुरुजी म्हणून हाक मारायचे आणि नेहमी गुरुजी या नात्याने संबोधत असत आणि काहीही सांगण्यापूर्वी सभागृहातही बोलायचे, तर गुरुजी तुम्ही मला क्षमा करा, मी तुमच्यावर जरा टीका करणार आहे, असे म्हणायचे. आपण जर आजही जुन्या नोंदी पाहिल्या तर त्यात त्यांचे हे संस्कार आणि त्यांची प्रतिष्ठा प्रत्येकक्षणी आपल्याला जाणवेल.
ज्यावेळी काँग्रेस पक्ष भरभराटीला होता, त्याचे भवितव्य उज्ज्वल होते, चारही बाजूंनी जयजयकार चालू होता, अशा काळात असे कोणते तत्व असेल, काय प्रेरणा असेल, ज्यामुळे त्याने बंडखोरीचा मार्ग निवडला; कदाचित बंडखोर बलिया यांचे संस्कार असतील, कदाचित बंडखोर बलियाच्या मातीत आजही तो गंध असेल. आणि कदाचित या संस्कारांचेच परिणाम म्हणून इतिहासातील दोन अतिशय महत्वपूर्ण घटना मला आठवतात- जयप्रकाश नारायण जी-बिहार, तर महात्मा गांधी- गुजरातचे होते.देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडण्याची वेळ एका गुजराती माणसावर आली त्यावेळी त्याने एका गुजराती नसलेल्या व्यक्तीला निवडले आणि लोकशाहीची लढाई जिंकल्यानंतर एका बिहारी व्यक्तीला पंतप्रधान निवडण्याची वेळ आली, त्याने एका गुजराती माणसाला पंतप्रधानपदी निवडले.
त्यावेळी असे होते- चंद्रशेखरजी पंतप्रधान बनणार की मोरारजी भाई बनणार? आणि त्यावेळी मोहल लाल धारिया, कारण चंद्रशेखरजींच्या काही सहकाऱ्यांच्या संपर्कात मी पण जास्त वेळ होतो, त्यात मोहन धारियाजीं बरोबर होतो, जॉर्ज फर्नांडीस बरोबर होतो आणि त्यांच्या बोलण्यातून चंद्रशेखरजींचे आचार-विचार नेहमीच प्रकट व्हायचे आणि आदरणीय असायचे. आणखी लोकं देखील असतील कदाचित त्यांच्याशी माझा संपर्क आला नसेल.
चंद्रशेखरजी आजारी होते आणि त्यांच्या मृत्यूच्या काही काळ आधी, काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला दूरध्वनी आला, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ते म्हणाले, तू दिल्लीला कधी येणार आहेस? मी म्हणालो- सांगा साहेब काय काम आहे? नाही, असेच एकदा आलात तर घरी या, बसू या, माझी प्रकृती बरी असती तर मीच स्वत: आलो असतो. मी म्हणालो, तुम्ही मला आठवणीने फोन केलात हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी त्यांच्या घरी गेलो आणि मी थक्कच झालो, त्यांची प्रकृती ठीक नव्हती, खूप वेळ माझ्याशी चर्चा केली आणि गुजरातविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, सरकारच्या रुपात काय-काय चालू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर देशाच्या संबंधी त्यांचे विचार काय आहेत, काय समस्या दिसत आहेत, कोण करणार, कसे करणार- तुम्ही लोकं तरुण आहात बघा काय ते, म्हणजेच खूप उस्फूर्तपणे आणि काळजीने बोलत होते ते. ती त्यांच्याशी माझी शेवटची भेट होती. परंतु आजही ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची अमिट छाया, विचारांची स्पष्टता, सर्वसामान्यांप्रतीची वचनबद्धता, लोकशाही व्यवस्थेविषयीची भक्ती मला आठवते- हे सगळे गुणविशेष त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसून यायचे, प्रकट व्हायचे.
चंद्रशेखरजींविषयी हे पुस्तक हरिवंशजींनी लिहिले आहे, त्यात आपल्याला चंद्रशेखरजीना समजून घेण्याची संधी तर मिळेलच , परंतु त्यावेळेच्या ज्या घटना आहेत, त्या घटनांसंबंधी आम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले गेले आहे त्याहून खूप काही वेगळे यात आहे आणि त्यामुळे असेही होऊ शकते की, कदाचित एखादा वर्ग देखील या पुस्तकाचे त्या रूपात विश्लेषण करेल कारण त्या काळात इतकं … आणि एक गोष्ट अशी आहे की आपल्या देशात अशी फॅशन आहे की काही लोकांनाच काही हक्क आहेत, तिथे आरक्षण आहे.
आज छोटे-मोठे नेताही 10-12 किलोमीटर चालले तर ते 24 तास दूरदर्शन दाखवेल. माध्यमं पहिल्या पानावर छापेल. चंद्रशेखरजीनी निवडणुकीत भाग घेतला नाही, पूर्णत: ग्रामीण-गरीब शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून पदयात्रा केली. या देशाने त्यांना जेवढा सन्मान द्यायला पाहिजे होता, तेवढा दिला नाही. आपण चुकलो आणि दुर्दैव- मला खूप वाईट वाटतय सांगताना, दुर्दैव आहे हे आपल्या देशाचे.
त्यांच्या विचारांविषयी मतभेद असू शकतात, आजही कोणाला आक्षेप असू शकतात. पण तेच तर लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. परंतु अतिशय जाणीवपूर्वक, विचारसरणीच्या रणनीतीनुसार चंद्रशेखरजींच्या त्या यात्रेला देणग्या, भ्रष्टाचार, भांडवलदारांचे पैसे याबद्दलच्या चर्चेत ठेवले गेले. असा घोर अन्याय काही व्यक्तीवर सार्वजनिक जीवनात होतो. हरिवंशजींनी तो या पुस्तकात घेतला आहे की घेतला नाही हे मला माहिती नाही, परंतु मी त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता.
आपल्या देशात अजून एक गोष्ट आहे. आजच्या पिढीला जर विचारले की, आपल्या देशात किती पंतप्रधान होते -बहुधा कोणाला माहित नाही. कोण झाले- खूप कमी लोकांना माहित असेल, खूप प्रयत्नपूर्वक विसरले गेले आहेत. अशा परिस्थितीत हरिवंशजी आपण खूप मोठे धैर्य दाखवले, तुम्ही कौतुकाला पात्र आहात. प्रत्येकजण योगदान देत आहे, परंतु एक जमात आहे, मला माफ करा- देशाच्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काय तयार केली, सरदार वल्लभ भाई पटेल यांची प्रतिमा काय तयार केली – त्यांना काहीच समजत नाही; ते अगदी सामान्य व्याक्ती होते, अशी काहीशी प्रतिमा मुद्दाम करण्यात आली.
लाल बहादूर शास्त्रीजी- ते पण जर जिवंत होऊन पर आले असते किंवा जिवंत असते तर ही जमात त्यांनाही कोणकोणत्या रुपात प्रदर्शित करत राहिली असती हे त्यांनाही समजले नसते. लाल बहादूर शास्त्री वाचले कारण त्यांनी केलेले कष्ट आणि भोगलेल्या यातना.
त्यानंतर पंतप्रधान काय पितात- माहितीच असेल मोरारजी भाईंच्या बाबतही चर्चा चालू होती. काही पंतप्रधान बैठकीत झोपतात, काही पंतप्रधान पलटवार करतात. म्हणजेच जेवढे होते केवळ त्यावरुन त्या प्रत्येकाला एक अशी उपाधी दिली गेली की जेणेकरुन त्यांचे संपूर्ण कार्य, त्यांची ओळख जगाला होताच कामा नये, जग त्यांना विसरले पाहिजे, अशी व्यवस्था केली गेली.
परंतु तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निश्चय केला आहे- दिल्लीचे सर्व माजी पंतप्रधान, सगळे- त्यांचे खूप मोठे अत्याधुनिक संग्रहालय बनणार. सर्व माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्र परिवाराला माझे आवाहन आहे की , त्यांच्या सर्व वस्तू एकत्र करा जेणेकरुन येणाऱ्या पिढीला त्यांच्याविषयी जाणून घेता येईल. चंद्रशेखरजी आपले पंतप्रधान होते आणि त्यांच्या आयुष्यात ही वैशिष्ट्य होती, त्यांचे अमुक योगदान होते. चरण सिंगजींची अशी वैशिष्ट्य होती, योगदान होते, देवगौडाजींचे योगदान, आय के.गुजरालजींचे योगदान आहे; डॉक्टर मनमोहन सिंहजीचे योगदान आहे. राजकीय अस्पृश्यतेच्या पलीकडे जात सर्व पंतप्रधानाचे कार्य आणि कर्तृत्व याची ओळख यात करुन द्यायची आहे.
अशा एका नव्या राजकीय संस्कृतीची देशाला गरज आहे, त्याला आम्ही अशाप्रकारे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. चंद्रशेखरजी जर योग्य रुपात लोकांच्या समोर आले तर आजही नव्या पिढीला प्रेरणा देऊ शकतील. आजही त्यांच्या विचारांनी तरुणाईचे धैर्य लोकशाही मूल्यासह उफाळून येईल. आपले धेय्य प्राप्त करण्यासाठी त्याला लोकशाही विरोधी मार्गाने जावे लागणार नाही.
मला बरोबर लक्षात आहे जेव्हा त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायचा होता येथे दिल्लीमध्ये वादळ आले होते आणि ते ही कोणत्यातरी आईबी पोलिसामुळे, म्हणजेच सरकार, जगात जेव्हा लिहिले जाईल की, कोणत्या पोलिसामुळे सरकारं पडू शकतात.
त्या दिवशी मी नागपुरमध्ये होतो, अटलजी, आडवाणीजींचा कार्यक्रम होता तिथे. परंतु त्यांचे विमान नंतर येणार होते, मी आधी पोहोचलो होतो. मी जिथे थांबलो होतो, तिथे चंद्रशेखरजींचा फोन आला. मी फोन घेतला, ते स्वत:च फोनवर होते. ते म्हणाले-अरे, गुरुजी कुठे आहेत? मी म्हणालो साहेब, अजून तरी त्यांचे विमान पोहोचलेले नाही, कदाचित यायला एक तास लागेल. म्हणाले- मी थांबलो आहे, त्वरित माझ्याशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा मी राजीनामा देण्यासाठी माझ्या मनाची तयारी केली आहे परंतु मला त्यांच्याशी बोलायचे आहे.
दिल्लीमध्ये ज्या काही घटना होत होत्या, त्यावेळी अटलजी नागपुरमधे होते. परंतु चंद्रशेखरजी त्यावेळी सुद्धा गुरुजी म्हणजे अटलजींना मानायचे. आपल्या शेवटच्या निर्णयाआधी त्यांचा सल्ला घेण्यासाठी ते खूप उत्सुक असायचे.
अशा अनेक वैशिष्ट्यांबरोबर ज्यांनी देशासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. देशातले दलित, पीडित, शोषित, वंचित, गरीब-ज्यांची दु:ख, यातना आपल्यात सामावून एक व्यक्ती 40 वर्ष आपले आयुष्य याच परिसरात आपले सगळे आयुष्य त्यांच्यासाठी व्यतीत करुन गेली, खासदाराच्या रुपात. याच परिसरात आज आपण पुन्हा एकदा शब्दरुपी त्यांचे पुण्यस्मरण करत आहोत. त्यांच्या आठवणींना, कार्यकर्तृत्वाला उजाळा देत आहोत. त्यांची प्रेरणा घेऊन आपणही देशाच्या सामान्य लोकांसाठी काहीतरी करुया. हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
मी पुन्हा एकदा हरिवंशजीचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण करत आपले भाषण संपवतो.
धन्यवाद.