दोन-तीन दिवसांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि आपण सर्व भगिनी इतक्या मोठ्या संख्येने राखी घेवून आला आहात. याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. देशभरातल्या माता-भगिनींनी आशीर्वाद देवून मला जे रक्षा कवच दिलं आहे, आशीर्वाद दिले आहेत, त्यासाठी मी या सर्व माता-भगिनींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.
रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर आला आहे आणि गुजरातमध्ये एक लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना, बहिणींना त्यांच्या नावावर आपले घर मिळत आहे. मला वाटते की, रक्षाबंधनाची यापेक्षा चांगली भेट दुसरी कोणतीही असू शकणार नाही.
आपल्याला घर नाही, त्याचा जो त्रास होत असतो, घराशिवाय आयुष्य कसं कंठावं लागतं, भविष्य कसं अंधःकारमय आहे, ही भावना मनात कशी निर्माण होते. आपलं हक्काचं घर बांधायचं असं,रोज सकाळी एक स्वप्न पाहतच असा बेघर माणूस उठत असतो. संध्याकाळ होईपर्यंत त्याचं हे स्वप्न धुळीला मिळत असतं. अशाचप्रकारे झोपडपट्टीमध्ये मग आयुष्य काढावं लागतं. ज्या भगिनींना आज घर मिळाले आहे, त्यांनी याचा अनुभव घेतला असणार.
परंतु आता या भगिनींचे स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांची स्वप्नही सत्यामध्ये उतरली आहेत. आता आपली नवीन स्वप्ने ते पाहू शकणार आहेत आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण कुटूंब, यामध्ये अबालवृद्धही मेहनत करणार आहेत. पुरुषार्थ दाखवणार आहेत. अशा पद्धतीनेच आयुष्यामध्ये परिवर्तन घडून येण्यास प्रारंभ होत असतो.
या राखी पौर्णिमेच्या पवित्र सणाच्या आधीच मी या सर्व माता-भगिनींना, एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांना घरकुलाची भेट देत आहे. आपला भाऊ म्हणून ही भेट देतांना मला खूप आनंद होत आहे.
आज आणखी एका योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे. 600 कोटी रूपये खर्चून ही योजना पूर्ण होणार आहे. ही योजनाही एक प्रकारे राखी पौर्णिमेच्या सणापूर्वी आमच्या माता- भगिनींना दिलेली भेटच आहे. पाण्याच्या समस्येचा त्रास आपल्या परिवारामध्ये सर्वात जास्त होतो, तो म्हणजे घरातल्या महिलावर्गाला. माता-भगिनींना पाणीटंचाईच्या सर्वात जास्त झळा जाणवतात. संपूर्ण कुटुंबाला लागत असलेले पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या घरांमध्ये माता-भगिनीच उचलत असतात. त्याचबरोबर प्यायला जर स्वच्छ, शुद्ध पाणी उपलब्ध होवू शकले नाही तर मात्र त्या घराला जणू आजारपणाचा शाप लागतो. पेयजल जर शुद्ध असेल तर, त्या कुटुंबाचा अनेक आजारांपासून बचाव होवू शकतो.
माझ्या आयुष्यातली अनेक वर्षे मी आदिवासी क्षेत्रामध्ये घालवली आहेत. ज्यावेळी मी धर्मपूर सिदम्बाडी या भागात वास्तव्य करत होतो, त्यावेळी माझ्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच उपस्थित व्हायचा की, या भागामध्ये इतका चांगला पाऊस होतो तरीही दिवाळीनंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर फारसा पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे या भागातल्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्याकाळातल्या गोष्टी मला चांगल्याच स्मरणामध्ये आहेत. धर्मपूरमध्ये सिदम्बूर, आणि त्या पूर्ण पट्ट्यामध्ये सगळे या भागातल्या आदिवासींपासून उमरगांव ते अम्बाजीपर्यंत वास्तविक खूप चांगला पाऊस पडतो. आदिवासी पट्ट्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. पावसाचे हे सगळे पाणी आमच्या बाजूला म्हणजे सागराच्या दिशेला जाते. पावसाचे पाणी असेच वाहून जात असल्यामुळे, तो संपूर्ण भाग काही महिन्यातच कोरडा पडतो. हे माझ्या त्याचवेळी लक्षात आले होते.
यानंतर ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री बनलो, त्यावेळी हजारों कोटी रूपये खर्चाची तरतूद केली. या निधीतून उमरगांवापासून ते अम्बाजीपर्यंतचा संपूर्ण आदिवासी पट्टा आहे, त्या गुजरातच्या पूर्वेकडील भागामधल्या प्रत्येक गावाला आणि गावातल्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.
आत्ता आपल्याला जी ध्वनिचित्रफीत दाखवली, त्यामध्ये सांगितलं आहे की, या प्रकल्पामध्ये एकूण दहा योजनांचा समावेश आहे. त्यापैकी आज अखेरच्या दहाव्या योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात येत आहे. ज्या लोकांनी ही ध्वनिचित्रफीत पाहिली आहे, त्यांनाही खूप आश्चर्य वाटत असेल. या योजनेतून सर्वात जास्त उंचीवर पाणी पोहोचणार आहे, सोप्या शब्दात सांगायचं तर, त्या भागात इमारत जर 200 मजल्यांची असेल, तरीही शेवटच्या मजल्यावरच्या घरामध्ये पाणी घेवून जाता येणार आहे. याचाच एक अर्थ असा आहे की, नदीच 200 मजले उंचीवर घेवून जाण्यात येणार आहे आणि तिथून पाणी खालच्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. हे तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेले आश्चर्य आहे.
आमच्या देशामध्ये अतिशय दुर्गम स्थानी गिरच्या जंगलामध्ये एक निवडणूक मतदान केंद्र होतं. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी फक्त एक मतदार होता. त्या एका मतदारासाठी घनदाट जंगलामध्ये मतदान केंद्र उघडण्यात आलं होतं. या बातमीला प्रसार माध्यमांनी अगदी चैकटीमध्ये विशेष स्थान दिलं होतं. हिंदुस्तानामध्ये निवडणूक प्रक्रिया अशीच आहे. गिरच्या जंगलामध्ये केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र सुरू करण्याची सर्व व्यवस्था करण्यात येते.
मला वाटतं की, ही योजनासुद्धा सर्वांच्या दृष्टीने एक नवलपूर्ण गोष्ट बनणार आहे. या भागात अगदी वरच्या बाजूला एक छोटंस गाव आहे. या गावाची लोकसंख्या 200-300 आहे. या लोकांच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी एक संवेदनशील सरकार 200 मजल्यांपर्यंत उंचीवर पाणी नेणार आहे. प्रत्येक नागरिकांविषयी आमच्या मनामध्ये असलेला भक्तीचा भाव दाखवणारे हे एक जीवंत उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल.
याआधीही सरकारांनी सत्ता उपभोगली आहेच. आदिवासी मुख्यमंत्रीही होवून गेले आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री होण्याच्याआधी एक आदिवासी नेते मुख्यमंत्री होते. मी ज्यावेळी नव्यानं मुख्यमंत्री झालो, त्यावेळी या माजी आदिवासी मुख्यमंत्र्याच्या गावी गेलो होतो त्यावेळी दिसून आले की, गावात पाण्याची टाकी आहे, परंतु त्यामध्ये पाणीच नाही. त्यांच्या गावाला पाणी देण्याचे काम मी केले, हे माझे सौभाग्य मानतो.
जर कोणी पाणपोई सुरू करतो आणि येणा-या -जाणा-या वाटसरूंसाठी पेयजलाची सुविधा व्हावी म्हणून एक- दोन माठ पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था करतो, तर त्या कुटुंबाविषयी परिसरामध्ये खूप आदराने बोलले जाते. या परिवाराविषयी अभिमानाने सांगितले जाते.
ज्यांनी पाण्यासाठी कार्य केलं, त्या लाखा बलधाराची कथा आजही सांगितली जाते. गुजरात आणि राजस्थानातल्या गावां गावांमधून ही कथा लोकांच्या तोंडी असते. मला सांगा, असं कोणीतरी पाण्यासाठी काम केलं आहे का? गुजरात सरकारने घरा घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवण्याचे कार्य केलं आहे, यासाठी या सरकारने जी मोहीम सुरू केली आहे, त्याचा मला गर्व वाटतो.
भविष्यामध्ये आमचा गुजरात कसा असेल, गरीबातल्या गरीब व्यक्तीचं आयुष्य कसं असेल, आमचे स्वप्ने काय आहेत, या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, ती साकार करण्यासाठी आम्ही नेमके कसे प्रयत्न करणार आहोत, याचे सगळे चित्र आता स्पष्ट होत आहे.
आपण सर्वांनीच आत्ता पाहिलं असेल. अर्धा-पाऊण तासाच्या काळात मला आज एक प्रकारे संपूर्ण गुजरातचा जणू दौरा करण्याची संधी मिळाली. तिथल्या माता भगिनींशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. मी त्या काय बोलत आहेत, हे ऐकत होतो. त्याचबरोबर माझं लक्ष त्यांच्या घराकडे होती. त्यांनी घर कसं बनवलं आहे, हे तर तुम्हीही पाहिलं असेल. प्रधानमंत्री आवास योजना, सरकारी योजनेतून इतकं चांगलं घरकूल बनवणं शक्य आहे का? असा प्रश्न ती छान घरं पाहून तुम्हालाही नक्कीच पडला असेल. आता हे कसं शक्य आहे ते सांगतो. आम्ही ‘कट’ कंपनी बंद केली आहे, म्हणूनच हे शक्य होवू शकलं आहे.
दिल्लीमधून ज्यावेळी एक रूपयाची मदत दिली जाते, त्यावेळी या गरीबाच्या घरामध्ये अगदी पूर्णच्या पूर्ण 100 पैसे पोचतात. हे सरकारचे खरे काम आहे. यामुळेच अशी कामे शक्य होत आहेत. आज या इथं असंख्य टी.व्ही.वाले उपस्थित आहेत. अनेक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आलेले आहेत. इतक्या प्रचंड संख्येने जनता उपस्थित आहे. आणि संपूर्ण देश दूरचित्रवाणी पाहत आहे. या सगळ्यांसमोर कोणत्याही एका लाभार्थी माता – भगिनीला कुणीही प्रश्न विचारू शकतो की, ‘‘या घरासाठी आपल्याला कोणाला लाच तर द्यावी लागली नाही ना? कोणी दलाली तर घेतली नाही ना?’’ असे प्रश्न विचारण्याची कोणीही हिम्मत दाखवू शकतो.
आम्ही राष्ट्राच्या चरित्राच्या निर्माणाचे काम करत आहोत. कोणाच्याही अशा प्रश्नांवर आमच्या माता-भगिनी जे उत्तर देतात, त्यामुळे मी आज जास्त आनंदी आहे. ज्यावेळी या माता भगिनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि अतिशय आनंदाने सांगतात ‘‘ नाही, नाही. आम्ही कोणालाही लाच, दलाली दिली नाही. आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळत आहे. नियमित नियमांप्रमाणे ते मिळत आहे. आम्हाला कोणालाही एक नवा रुपयाही द्यावा लागला नाही.’’ त्यांच्या उत्तराने मी अधिक संतुष्ट आहे.
ही घरकुले आपण पाहिलीच आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमधून बांधण्यात आलेल्या या घरांचा दर्जा ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी तुम्हालाही प्रश्न पडला असेल, सरकारने बनवलेली घरे इतकी चांगली कशी काय असू शकतील? आपल्याला पडलेला प्रश्नही, तुम्ही केलेला विचार अगदी बरोबर आहे. सरकारने निधी दिला आहे. परंतु सरकारच्या निधीबरोबरच या लाभार्थी कुटुंबाच्या मेहनतीचा घामही त्यामध्ये मिसळला आहे. आपलं घर कसं असावं, हे या लोकांनीच ठरवलं होतं. कोणते सामान वापरले पाहिजे, कशा पद्धतीने घर बांधलं जावं, हेही या कुटुंबांनीच ठरवलं आहे.
सरकारी कंत्राटदारांच्या भरवशावर आम्ही काम केलेलं नाही. आम्ही या लाभार्थी कुटंबांवर विश्वास टाकला. आणि ज्यावेळी एखादे कुटुंब स्वतःला राहण्यासाठी आपलं घरकूल बनवतो, त्यावेळी ते त्याच्यासाठी सर्वोत्तम असतं. म्हणूनच आज हे परिवार अतिशय आनंदात आहेत. त्यांना हवं तसं घर त्यांनी बनवलं आहे. गुजरातमधल्या प्रत्येक गावामध्ये या कुटुंबियांनी आपल्याला हव्या असलेल्या सुविधांनी युक्त अशी घरे बनवली आहेत. यासाठी मी या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.
देशाला गरीबीमधून मुक्त करण्याची खूप मोठी मोहीम आम्ही सुरू केली आहे. यामध्ये गरीबांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे आधीपासूनच बँका आहेत. परंतु या बँकांमध्ये गरीबाला प्रवेश नव्हता. आम्ही बँकच आता गरीबाच्या घरासमोर आणून उभी केली आहे. प्रधानमंत्री जन-धन योजना यासाठीच सुरू केली.
गावांमध्ये श्रीमंतांच्या घरामध्ये विजेचे कनेक्शन असायचे. गरीबाच्या घरी विजेची जोडणी कधीच केली गेली नाही. माझ्या घरातला अंधःकार कधी जाणार, तो कधी काळी जाईल की नाही? असा प्रश्न त्याला पडलेला असायचा. आज उजाला योजनेअंतर्गत सौभाग्य योजना राबवून प्रत्येक घरा घरामध्ये विजेची जोडणी देण्याची मोठी मोहीम आम्ही राबवली आहे. आगामी एक ते दीड वर्षामध्ये हिंदुस्तानामधल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचलेली असेल. वीजेची जोडणी नाही, असे घरंच येत्या एक-दीड वर्षांनंतर दिसणार नाही.
प्रत्येकाकडे स्वमालकीचे घर असावे, घरामध्ये शौचालय असावे, घरामध्ये वीज असावी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा त्या घराला नळाव्दारे पुरवठा केला जावा, घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस असावा. यासाठी आम्ही योजना राबवत आहोत. एकप्रकारे गरीबाच्या आयुष्यात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण लोकांनी मला मोठं बनवलं आहे. तुम्ही गुजरातच्या लोकांनी माझं पालन-पोषण केलं आहे. गुजरातने मला खूप काही शिकवलं आहे. आणि आपल्याकडून मी जे काही शिकलो आहे, त्याचा परिणाम म्हणजे मी कोणतेही स्वप्न अतिशय काटेकोर वेळेचे नियोजन करून निश्चित केलेल्या समय सीमेमध्येच ते कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करीत असतो. आता 2022 मध्ये, ज्यावेळी हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होतील, त्यावेळी या आपलं स्वतःच घर नाही, असे एकही कुटूंब असणार नाही. प्रत्येक परिवाराचे स्वमालकीचे घर असेल,असा हिंदुस्तान बनवण्याचे स्वप्न मी पाहिले आहे.
आत्तापर्यंत नेत्यांनी बनवलेल्या आपल्या मोठ-मोठ्या घरांच्या बातम्या येत होत्या. नेत्यांनी आपल्या घराची सजावट कशी केली आहे, याच्या बातम्या आत्तापर्यंत येत होत्या. आता मात्र गरीबांसाठी कशा रितीने घर बनवले आहे, त्याची वृत्ते येत आहेत. गरीबांच्या घराची सजावट कशी केली गेली आहे, या बातम्या आता येत आहेत.
एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये हे परिवार आज वास्तुप्रवेश करत आहेत आणि त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी वलसाडच्या भूमीवर आज पंतप्रधान आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कुटुंबियांच्या आनंदामध्ये मी सहभागी होत आहे, यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेला उत्साह, पाहून त्यांच्याइतकाच आनंदीत होणारा हा प्रधानमंत्री आहे.
बंधू-भगिनींनो, गेला आठवडा आपल्यासाठी खूप दुःखद ठरला. अटल बिहारी वाजपेयीजी आपल्याला सोडून निघून गेले. परंतु त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये पक्का रस्ता बांधून ते गाव शहराला जोडण्याचे काम आम्ही निश्चित केलेल्या अवधीमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत आहोत.
एकूण समाजामध्ये अमुलाग्र परिवर्तन आणण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज इथे आपण पाहिलेच असेल की कौशल्य विकासाचे कार्य कसे सुरू आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी भागात, जंगलांमध्ये वास्तव्य करत असलेल्या युवतींनी कौशल्य विकसनाचा लाभ घेतल्यानंतर त्यांना रोजी-रोटी कमावण्यासाठी किती चांगल्या संधी मिळत आहेत. या कन्यांना प्रमाणपत्र देण्याची मला आज संधी मिळाली आहे.
आपण अशा प्रकारे पुढाकार घेवून योजनांचा लाभ घेतला तर आपोआपच देशाला अनेक समस्यांमधून मुक्त करता येवू शकते. देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
वलसाडच्या माझ्या बंधू-भगिनींनो, वास्तविक या आधीच, काही दिवसांपूर्वीच मी इथं येणार होतो. तसा कार्यक्रमही ठरवला होता. परंतु पावसामुळे ठरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला. पाऊसही काही वेळेस आला की खूप जोरदार येतो. आणि नाही आला तर त्याचा काही आठवडे पत्ताच नसतो. गुजरातमधल्या काही भागामध्ये तर यंदा अजिबातच पाऊस झाला नाही. त्यामुळे खूपच चिंता निर्माण झाली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सर्वदूर झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीने गुजरातच्या काही भागाची समस्या संपुष्टात आली आहे. या पावसामुळे आगामी वर्ष पाण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगले जाईल. कृषी क्षेत्रालाही या पावसाचा खूप चांगला लाभ होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
वलसाडचे माझे प्रिय बंधू, भगिनी इतक्या मोठ्या संख्येने आपण इथं आलात आणि दीर्घकाळ आपण अगदी मनापासून इथं बसून राहिलात, त्याबद्दल आपले किती आभार मानावेत, तेवढे कमी आहेत.
सर्व माता, भगिनींनो, राखी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप- खूप शुभेच्छा देवून आपल्या सर्वांना खूप -खूप धन्यवाद देतो.