उपस्थित सर्व स्वच्छाग्रही बंधू आणि भगिनींनो,
आज 2 ऑक्टोबर आहे; पूज्य बापूंची जयंती, लाल बहादूर शास्त्रींची जयंती. तीन वर्षात आपण कोठून कुठवर पोहोचलो.मला आठवते आहे, संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीसाठी मी अमेरिकेत होतो,1 ऑक्टोबरला रात्री उशिराने आलो आणि 2 ऑक्टोबरला सकाळी झाडू घेऊन स्वच्छतेसाठी निघालो होतो. मात्र त्या वेळी वर्तमानपत्रे,प्रसारमाध्यमे,सहकारी पक्षातले सहकारी, राजकीय पक्ष, सर्वानी माझ्यावर इतकी टीका केली होती, 2ऑक्टोबर सुट्टीचा दिवस असतो, आमच्या मुलांची सुट्टी घालवली.मुले या दिवशी शाळेत जाणार की नाही, मुलांना या कामाला का लावले,बरेच काही झाले.
बऱ्याच गोष्टी गप्प राहून सहन करण्याचा माझा स्वभाव आहे, कारण जबाबदारीच अशी आहे की असे सहन करावेही लागणार आहे आणि असे झेलण्याची, सहन करण्याची क्षमता मी हळू-हळू वाढवत आहे.मात्र आज तीन वर्षांनंतरही न डगमगता आम्ही या कामात मग्न राहिलो, आणि यासाठी मग्न राहिलो की मला पूर्ण विश्वास होता की महात्माजीनीं जो मार्ग सांगितला आहे,बापूजींनी जो मार्ग सांगितला आहे तो मार्ग कधी चुकीचा असूच शकत नाही.
हीच एक श्रद्धा , याचा अर्थ असा नव्हे की काही आव्हाने नाहीत.आव्हाने आहेत,पण आव्हाने आहेत म्हणून देश असाच राहू द्यायचा का ? आव्हाने आहेत म्हणून अशाच गोष्टी करायच्या का ज्यामुळे तारीफ होईल, जयजयकार होईल, आव्हाने असणाऱ्या कामांपासून पळ काढायचा का? आज सर्व देशवासी एकमुखाने ही बाब बोलत आहेत . आपल्या डोळ्यासमोर अस्वच्छता होत नव्हती असे नव्हे.आपणही त्या अस्वच्छतेत सामील नव्हतो असेही नव्हे आणि आपल्याला स्वच्छता आवडत नाही असेही नव्हे. स्वच्छता आवडत नाही अशी व्यक्ती असू शकत नाही.
आपण रेल्वे स्थानकावर गेलो आणि चार बाकडी असतील आणि त्यातली दोन अस्वच्छ असतील तर आपण त्या अस्वच्छ बाकड्यावर बसत नाही कारण स्वच्छता आवडणे हा आपला मूळ स्वभाव आहे.मात्र आपल्या देशात एक कमतरता राहून गेली ती म्हणजे, एखादी गोष्ट मला करायची आहे.स्वच्छता राखायला हवी यावर देशात मतभेद नाहीत. प्रश्न असा आहे की हे कोणी करायचे ? तुम्हाला एक गोष्ट सांगू का ? तुम्हाला हे सांगण्यात मला कोणताही संकोच नाही, कदाचित या वाक्यानंतर उद्या याबद्दल मला बोल लावला जाईल, पण देशवासियांपासून काय लपवायचे? अगदी 1000 महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारांनी मिळून काम केले तरी स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही,नाही होऊ शकत. मात्र सव्वाशे कोटी देशवासीय एकत्र आले तर बघता बघता हे स्वप्न पूर्ण होईल.
दुर्भाग्याने आपण अनेक गोष्टी सरकारी बनवल्या.गोष्टी जोपर्यंत सर्वसामान्यांच्या असतात तोपर्यंत काही अडचण येत नाही.कुंभ मेळा पहा. कुंभ मेळ्यात, गंगा नदीच्या किनाऱ्यावर युरोपातल्या एका छोट्या देशाइतके लोक जमतात.मात्र त्या सर्व गोष्टी हे लोकच सांभाळतात.आपापली कामे करतात, शतकानुशतके हे सुरु आहे.
समाजाच्या या शक्तीचा आपण स्वीकार केला, जन भागीदारीचा स्वीकार केला, सरकारचा सहभाग कमी करत गेलो समाजाचा सहभाग वाढवत गेलो तर हे अभियान अनेक प्रश्न उपस्थित होऊनही यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे.आज मला आनंद आहे. काही लोक असे आहेत जे अजूनही या अभियानाची चेष्टा करतात,निंदा करतात, हे लोक कधी या स्वच्छता अभियानात सहभागीही झाले नाहीत. त्यांची मर्जी,त्यांना काही अडचणी असतील.मला विश्वास आहे की, पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमे, याची बातमी नाही छापणार की स्वच्छतेच्या अभियानात कोण काम करत आहे, कोण सहभागी झाले आहे. या अभियानापासून पळ काढणाऱ्यांचे,याला विरोध करणाऱ्यांचे फोटो छापले जातील.कारण जेव्हा देश एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा आपल्या मनात असो किंवा नसो, आपल्याला त्यामध्ये सहभागी व्हावे लागते.
आज स्वच्छता अभियान पूज्य बापूजींचे राहिले नाही, किंवा भारत सरकारचे, राज्य सरकारांचे, महापालिकांचे राहिले नाही.आज स्वच्छता अभियान देशाच्या सर्वसामान्य जनतेचे आपले स्वप्न बनले आहे.आतापर्यंत जे साध्य झाले आहे त्याचे श्रेय सरकारचे आहे असा माझा जरासुद्धा दावा नाही. हे भारत सरकारचे नव्हे, राज्य सरकारांचे नव्हे, तर स्वच्छाग्रही देशवासियांनी हे साध्य केले आहे,त्यांचे हे श्रेय आहे.
आपल्याला स्वराज्य मिळाले आहे आणि स्वराज्याचे शस्त्र होते सत्याग्रह.श्रेष्ठ भारताचे शस्त्र आहे, स्वच्छता,स्वच्छाग्रही. स्वराज्याच्या केंद्र स्थानी सत्याग्रही होता तर श्रेष्ठ भारताच्या केंद्र स्थानी स्वच्छाग्रही आहे.आपणही हे जाणतो की जगातल्या कोणत्याही देशात आपण जातो, तिथली स्वच्छता बघितली की इथे आल्यावर चर्चा करतो की अरे किती स्वच्छता होती, मी तर बघतच राहिलो.असे सांगितल्यावर मी त्या लोकांना विचारतो, स्वच्छता पाहिल्यावर आपल्याला आनंद वाटला, पण आपण तिथे कोणाला कचरा करताना किंवा फेकताना पाहिले का? तर उत्तर येत नाही पाहिले. मी सांगतो की ही आपली समस्या आहे.
आणि म्हणूनच मोकळेपणाने यावर चर्चा करायला आपण घाबरतो, माहित नाही की आपण चर्चा का करत नव्हतो.राजकीय नेते चर्चा करत नव्हते, सरकार चर्चा करत नव्हते कारण त्यांना भीती वाटत होती की हे काम आपल्या माथी येईल. अहो, आले तर येऊ द्या, त्यात काय आहे? आम्ही उत्तरदायित्व स्वीकारणारे लोक आहोत, आमची जबाबदारी आहे.
स्वच्छतेमुळे आज काय घडते आहे, स्वच्छतेसाठी ही जी मानांकने दिली जात आहेत, सर्वात स्वच्छ शहर कोणते, दुसऱ्या क्रमांकाचे कोणते, तिसऱ्या क्रमांकाचे कोणते; हे जेव्हा जाहीर होते तेव्हा त्या संपूर्ण शहरात चर्चा होते. दबाव निर्माण होतो, अगदी तळापासून, राजकीय नेत्यांवरही, सरकारांवरही हा दबाव पडतो, त्या शहराला स्वच्छतेत मानांकन मिळाले तुम्ही काय करताय ? मग नागरी समाजही या मैदानात उतरतो, अरे हे शहर तर आमच्या पाठीमागच्या क्रमांकावर होते, ते पुढे गेले, चला आपणही काही करूया.एक सकारात्मक, स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याचाही एक चांगला परिणाम या साऱ्या व्यवस्थेवर दिसून येत आहे.
ही गोष्ट खरी आहे की स्वच्छतागृह बनवतात मात्र त्याचा वापर करत नाहीत.मात्र या ज्या बातम्या येतात ते वाईट नाही.या गोष्टी आपल्याला जाग आणतात, त्यांच्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही.स्वच्छतागृहाच्या वापरासाठी आग्रही भूमिका घ्यावी ही समाजाची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, व्यक्तीची जबाबदारी आहे असे यातून घडत असेल तर चांगलेच आहे.
मी याआधी सामाजिक संघटनांमध्ये काम करत होतो, राजकारणात खूप नंतर आलो.गुजरातमध्ये काम करत होतो.तिथे मोरवीमध्ये माचू धरण दुर्घटनेमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते, संपूर्ण शहर पाण्याखाली गेले होते, त्यानंतर तिथे सफाई करत होतो. सफाई-स्वच्छता, ही सर्व कामे महिनाभर सुरु होती. नंतर आम्ही काही समाजसेवी संस्थांच्या सहाय्याने,समाजाच्या सहाय्याने ठरवले की ज्यांची घरे उध्वस्त झाली आहेत, त्यांच्यासाठी घरे बांधून द्यायची, त्यासाठी आम्ही एक गाव दत्तक घेतले. लोकांकडून पैसे जमा करून गाव पुन्हा वसवायचे होते.छोटेसे गाव होते, साधारणतः 350 -400 घरे असतील.त्यासाठी आराखडा आखत होतो,घरात स्वच्छतागृह असलेच पाहिजे असा माझा आग्रह होता.गावकऱ्यांचे म्हणणे होते की स्वच्छतागृहाची गरज नाही, आमच्या इथे मोकळे मैदान आहे, स्वच्छतागृह बनवू नका, त्याऐवजी खोली थोडी मोठी ठेवा.मी सांगितले की ही तडजोड नाही होणार.आमच्याकडे जितके पैसे आहेत त्यानुसार खोल्या बनवू मात्र स्वच्छतागृह तर असणारच.त्यांना ते मोफत मिळणार असल्याने त्यांनी भांडण केले नाही आणि स्वच्छतागृह बनले.
साधारणतः 10 -12 वर्षांनी मी त्या बाजूला गेलो होतो तर म्हटले जाऊया, जुन्या लोकांना भेटूया.तिथे काही महिने काम केले होते तर भेटूया म्हणून भेटायला गेलो. तिथे गेल्यानंतर मी कपाळावर हात मारून घेतला.जेवढी स्वच्छतागृहे बांधली होती त्या सर्वांमध्ये बकऱ्या बांधल्या होत्या. हा समाजाचा स्वभाव आहे, यात बांधणाऱ्याचा दोष नाही आणि सरकारचाही दोष नाही. समाजाचा एक स्वभाव असतो. या मर्यादा जाणूनही आपल्याला बदल घडवायचा आहे.
कोणी मला सांगेल का, हिंदुस्तानमध्ये आता आवश्यक तितक्या शाळा आहेत की नाहीत ? आवश्यक तेवढे शिक्षक आहेत की नाहीत? गरजेनुसार शाळेत सर्व सुविधा, पुस्तके, सर्व आहे की नाही? बऱ्याच प्रमाणात आहे. त्या तुलनेत शिक्षणाची परिस्थिती मागे आहे.सरकारच्या प्रयत्नानंतरही,निधी खर्च करूनही,इमारत बांधल्यानंतरही, शिक्षक ठेवल्यानंतरही, समाजाचे सहकार्य मिळाले तर शंभर टक्के शिक्षणाचे उद्दिष्ट गाठायला वेळ नाही लागणार.हाच ढाचा, एवढेच शिक्षक शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याकडे नेऊ शकतात. समाजाच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही.
सरकारने विचार केला की आपण इमारत निर्माण करू,शिक्षकांना पगार देऊ की काम झाले.एवढे होते ते केले.मात्र जन भागीदारी हवी. एक-एक मूल शाळेत दाखल होते त्यानंतर शाळेत यायचे बंद होते. आई-वडीलही त्याला याबाबत विचारत नाहीत.स्वच्छतागृहांचेही तसेच आहे. स्वच्छता एक जबाबदारी म्हणून, उत्तरदायित्व म्हणून,आपण एक वातावरण तयार केले तर प्रत्येकाला वाटेल की जरा 50 वेळा विचार करूया.
आपण पहा, आपल्या घरात जी लहान मुले आहेत, ज्या घरात छोटी-छोटी मुले आहेत,नातू आणि नाती आहेत. ही मुले एक प्रकारे स्वच्छतेचे सर्वात मोठे सदिच्छादूत आहेत.घरात आजोबानी कुठेही जरा एखादी गोष्ट टाकली की ही मुले सांगतात आजोबा इथे टाकू नका, असे वातावरण प्रत्येक घरी तयार करा.मुलांना जी गोष्ट पटली आहे ती आपल्याला का पटत नाही?
केवळ हात धुणे, जेवणापूर्वी साबणाने हात न धुतल्यामुळे किती बालकांना मृत्युमुखी पडावे लागत आहे.मात्र हे सांगितले तर आपण म्हणाल लोक साबण कोठून आणतील, लोक पाणी कोठून आणतील ? मोदींना फक्त भाषण करायचे आहे.अरे बाबांनो,जे हात धुवू शकतात त्यांना तर हात धुऊ दे.
मोदींवर टीका करायला हजार विषय आहेत आता. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही देत असतो. मात्र समाजात बदल घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्याला चेष्टेचे किंवा राजकीय रंग देऊ नका. एक सामूहिक जबाबदारीच्या दिशेने आपण वाटचाल करूया, आपल्याला निश्चितच बदल दिसेल.
आपण पहा या मुलांनी जे काम केले आहे.मी रोज या मुलांनी काढलेली चित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत होतो,मोठ्या कौतुकाने पोस्ट करत होतो. मी त्या मुलाला ओळखतही नव्हतो. मात्र मी चित्र पाहिले,मुलाने स्वच्छतेचा उत्साह दाखवला,मी त्याचे चित्र पोस्ट केले,आणि ते करोडो लोकांपर्यंत पोहोचत होते.हे काय करत आहात,या निबंध स्पर्धा,निबंध स्पर्धेने स्वच्छता होते का ?लगेच म्हणाल तर नाही असे उत्तर येईल. चित्रकला स्पर्धेने सफाई होते,नाही.
स्वच्छतेसाठी वैचारिक आंदोलनही आवश्यक आहे. विकासामुळे व्यवस्थेत परिवर्तन होत नाही, त्यासाठी वैचारिक क्रांती व्हावी लागते.हा जो प्रयत्न आहे, चित्रपट बनवा, नाविन्यता आणा, निबंध लिहा; या साऱ्या गोष्टी हे एक वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न आहे.एखादी गोष्ट, विचार म्हणून आपल्यात रुजली, तत्व म्हणून स्थापित झाली की ती गोष्ट करणे एकदम सुलभ होते.
तर याच्याबरोबर आणखी एक गोष्ट जोडली जाते त्यामागे कारणही आहे.एक काळ असा होता मला त्याचा खूप त्रास होत असे; करणाऱ्यांचा यात जराही दोष नाही, त्यांना मी दोष देत नाही.या व्यावसायिक जगात ज्यामुळे कमाई होते ती गोष्ट चालवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, कमाई प्रत्येकाला हवीच असते.
यापूर्वी चार-पाच वर्षांपूर्वी आपण दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमात पाहिले असेल, शाळेतल्या मुलांकडून सफाई करून घेतली तर शिक्षकांना बोल लावला जात असे की मुलांकडून, शाळेत सफाई करून घेता? मग पालकांनाही वाटायचे की आता संधी मिळाली आहे,तर ते पण येत.माझ्या मुलाकडून अभ्यास करून घेणार की सफाई करून घेणार ?आज इतका बदल घडला आहे की एखाद्या शाळेत मुले सफाई करत असतील तर ती दूरचित्रवाणीवर मोठी बातमी बनते.ही बाब छोटी नाही.
या अभियानाला प्रसारमाध्यमानी या तीन वर्षात मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्वच्छतेशी, या अभियानाशी जोडून घेतले,कधी-कधी आमच्या पुढे दोन पावले ही माध्यमे राहिली आहेत.
मी पाहिले आहे की, या मुलांच्या लघुपटांना काही वाहिन्यांनी ठराविक वेळ दिली. सर्वजण या अभियानाशी कसे जोडले गेले, आणखी जास्त लोक जोडले जातील. जगात आपल्या देशाला अग्रेसर ठेवण्याची ही संधी आहे. 2022 पर्यंत आपल्याला देशाला या उंचीवर न्यायचे आहे, असे गप्प बसायचे नाही.हे करायचे असेल तर ती मोठी गोष्ट आहे.
आपल्या घरात केर-कचरा साठला आहे आणि पाहुणे आले, लग्नासाठी आले असतील, इकडे-तिकडे अस्ताव्यस्तता असेल तर विचार करतील की मुलगा खूप शिकलेला आहे पण घर कसे अस्ताव्यस्त ठेवले आहे, इथे मुलगी देऊन काय करणार,परत जाईल ती व्यक्ती. त्याचप्रमाणे कोणी बाहेरून हिंदुस्थान पाहिला आग्रा- ताजमहाल एकदम सुंदर, मात्र आजू बाजूला पाहिले तर त्रासून जाईल, असे झाले तर कसे होईल ?
कोण दोषी आहे, हा मुद्दा नाही.आपण सर्वानी एकत्र येऊन हे केले तर ते साध्य होईल, हे गेल्या तीन वर्षात माझ्या देशवासीयांनी दाखवून दिले आहे, समाजाने दाखवून दिले आहे, माध्यमांनी दाखवून दिले आहे. इतके सर्व पाठीशी असूनही आपण गती प्राप्त करू शकलो नाही तर आपल्या सर्वांना स्वतःलाच उत्तर द्यावे लागेल.
आपण सर्वानी या गोष्टीवर भर द्यावा, याला चालना द्यावी असे मला वाटते.आपण कोठून कोठे पोहोचलो याची आकडेवारी तर मी सांगितली, मात्र अजूनही हे सातत्याने करण्याचे काम आहे, तेव्हाच ते साध्य होईल.
गावात मंदिर असते पण त्यात सगळे जण जातात असे नाही. हा मनुष्य स्वभाव आहे.मंदिर असूनही जात नाहीत. मशीद असली तरी जाणार नाहीत, गुरुद्वारा असले तरी जाणार नाहीत. एखाद्या उत्सवाला जातील. हा समाजाचा स्वभाव आहे, दुनिया चालत राहते.आपल्याला त्याच्याशी जोडून घ्यावे लागते,प्रयत्न करावे लागतात.प्रयत्न केल्यानंतर गाडी नीट चालते.
आकडेवारीवरून हिशोब लावला तर वाटते गती ठीक आहे, दिशा योग्य आहे. शाळांमधून स्वच्छतागृहांच्या दिशेने अभियान चालवले. आता मुली शाळेत जाताना या बाबतीत जागरूक राहतात.विचारतात,व्यवस्था पाहतात मग प्रवेश घेतात.यापूर्वी हा दृष्टिकोन नव्हता,ठीक आहे, चालवून घेऊ.का चालवून घेऊ? आमच्या मुलींनी गैरसोय का झेलावी ?
स्वच्छतेकडे आपण जोपर्यंत महिलांच्या दृष्टिकोनातून पाहत नाही तोपर्यंत या स्वच्छतेच्या ताकदीचा अंदाज आपल्याला येणार नाही.आपण त्या मातेकडे पहा,जिच्या घरात प्रत्येकाला कचरा, वस्तू इकडे तिकडे टाकण्याची सवय आहे.केवळ एकटी ती माता असते जी सर्वजण नोकरी,शाळांमध्ये गेल्यावर दोन दोन तास सफाई करते.कंबर दुखेपर्यंत काम करते.त्या आईला विचारा की आम्ही कामाला जाण्यापूर्वी आपापल्या वस्तू जाग्यावर ठेवल्या तर तुला कसे वाटेल ? आई सांगेल, बाळा माझी कंबर दुखून येत होती, बरे झाले तू सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्यास आता माझे काम दहा मिनिटात निपटेल. मला सांगा,प्रत्येक घरात, मग ते मध्यम वर्गातले असो,उच्च मध्यम वर्गातले असो, कनिष्ठ मध्यम वर्गातले असो,किंवा गरीब असो,त्या घरातल्या मातेचा अर्धा दिवस घराच्या सफाईत जात असतो, अगदी स्वच्छता करण्यात मदत केली किंवा नाही पण जर घरातल्या प्रत्येकाने आपापल्या वस्तू जाग्यावर ठेवल्या तरी त्या आईला केवढा दिलासा मिळेल.आपण हे काम करू शकत नव्हतो का?
आणि म्हणूनच स्वच्छतेचे एकच पारडे माझ्या मनात आहे.आपण कल्पना करू शकता.पुरुषांना मी जरा विचारू इच्छितो. आपण कुठेही नाका दिसला की उभे राहता,या भाषेबद्दल मला माफ करा. बाजारात खरेदी करायला जाणाऱ्या माता-भगिनी, मुलीनांही नैसर्गिक गरजा असतीलच ना? घर येईपर्यंत त्या सोसत राहतात.हे कोणते संस्कार आहेत ?जर त्या मातेने आपल्या घरातल्या आपल्या बहिणीवर, मुलीवर हे संस्कार केले असतील तर माझ्यात ते का नाहीत ? कारण मी पुरुष असल्याने मला हे करायला परवानगी आहे असे मी मानून चालतो ? जोपर्यंत हा बदल घडत नाही तोपर्यंत स्वतः खऱ्या अर्थाने आपल्याला स्वच्छता समजू शकणार नाही.
तुम्ही कल्पना करा गावात राहणाऱ्या माता-भगिनी, अगदी शहरात झोपडीमध्ये राहणाऱ्या माता-भगिनी, सकाळी लवकर उठून सूर्य उगवायच्या आत उठून नैसर्गिक गरजेची पूर्तता करण्यासाठी बाहेर जातील, जंगलात जातील. भीती वाटते म्हणून पाच-सात मैत्रिणींना घेऊन जातील आणि एकदा उजाडले आणि त्यानंतर गरज लागली तरी काळोख पडण्याची वाट पाहतील, शरीराला किती सहन करावे लागत असेल आपण कल्पना करा. त्या मातेच्या आरोग्याची कल्पना करा जिला सकाळी 9-10 वाजता शौचाला जायचे असेल मात्र दिवस असल्याने ती जाऊ शकत नाही आणि काळोख केव्हा पडेल याची वाट पाहायला लागते की कधी काळोख पडेल आणि कधी मला जायला मिळेल.त्या मातेची स्थिती काय होत असेल मला सांगा. एवढी संवेदनशीलता असेल तर स्वच्छता या विषयासाठी आपल्याला दूरचित्रवाणी वरच्या कोणत्याही वाहिन्या पाहाव्या वागणार नाहीत , दूरचित्रवाणीवरचे संबोधन समजून घ्यावे लागणार नाही,आणि कोणत्याही पंतप्रधानांच्या सांगण्याची गरज पडणार नाही आणि कोणत्याही राज्य सरकारची यासाठी आवश्यकता पडणार नाही, हा आपल्या जबाबदारीचा आपोआपच भाग बनेल.
म्हणूनच मी सर्व देशवासियांना आग्रहाने सांगू इच्छितो.युनिसेफने नुकताच एक अहवाल दिला आहे ज्यामध्ये भारतातल्या सुमारे अशा 10 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यांनी नुकतेच स्वच्छता गृह बांधले आहे.आणि तुलना केली.एका कुटुंबात स्वच्छता गृह नसल्यामुळे, स्वच्छतेप्रती जागरूकता नसल्यामुळे आजारपणासाठी वार्षिक 50000 खर्च होतो.कुटुंबाचा प्रमुख आजारी पडला तर बाकी सारे काम ठप्प होते.खूपच आजारी पडला तर कुटुंबातले आणखी दोघेजण त्याच्या सेवेसाठी लागतात.आजारातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या सावकाराकडून जास्त व्याजाने पैसे घ्यावे लागतात.एका प्रकारे50 हजार रुपयांचा बोजा त्या गरीब कुटुंबावर येऊन पडतो.स्वच्छतेला आपण आपला धर्म मानला,स्वच्छतेला आपले कार्य मानले,तर आजारपणाच्या संकटातून,50हजार रुपयांच्या खर्चातून त्या गरीब कुटुंबाला वाचवू शकतो.त्याला आर्थिक मदत करू किंवा न करू मात्र त्याच्या जीवनात हे 50 हजार रुपये खूप उपयुक्त ठरतात.म्हणूनच हे जे अहवाल येतात, जी माहिती मिळते,ती माहिती आपण सामाजिक जबाबदारी या नात्याने स्वीकारली पाहिजे.
पंतप्रधान झाल्यापासून अनेक लोक मला भेटतात.राजकीय कार्यकर्ते भेटतात,निवृत्त अधिकारी भेटतात, सामाजिक कार्यकर्तेही भेटतात. नम्रतेने, प्रेमाने भेटतात.जाता-जाता स्वतःची माहिती असलेला अर्ज हातात देतात आणि माझ्यायोग्य काही सेवा असेल तर सांगा म्हणून सांगतात.इतक्या प्रेमाने सांगतात, मग मी हळूच सांगतो,स्वच्छतेसाठी काही वेळ द्याना;ते पुन्हा येत नाहीत. आता मला सांगा, माझ्याकडे काम मागायला येतात, उत्तम अर्ज घेऊन येतात आणि मी हे करायला सांगितले की येत नाहीत.कोठले काम कमी दर्जाचे नसते.आपण हात लावला तर काम मोठे होईल आणि म्हणूनच त्या कामाला आपण मोठे करायला हवे.
या पंधरा दिवसात पुन्हा एकदा या सर्वामध्ये गती देण्याचा प्रयत्न करण्याचे मोठे काम ज्यांनी केले आहे त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.मात्र ही केवळ सुरवात आहे,मी अजूनही सांगतो की अजून खूप करायचे आहे.ज्या मुलांनी उत्साहाने भाग घेतला, ज्या शाळेतल्या शिक्षकांनी त्यांना यासाठी प्रोत्साहन दिले,कोणी लघुपट बनवला असेल,कोणी निबंध लिहिला असेल,काहींनी स्वतःला या स्वच्छतेशी जोडून घेतले, काही शाळानी दररोज सकाळी सव्वा तास गावात वेग-वेगळ्या भागात जाऊन , वातावरण निर्माण केले. महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी, मला आश्चर्य वाटते,महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी आपण इतकी भांडणे करतो, सर्व राजकीय पक्ष, राजकीय नेते, सर्व लोक.मात्र त्यानंतर सफाईची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नसते.मी या महान नेत्याला मानतो त्याचा पुतळा बसवला पाहिजे,मी त्या महान नेत्याला मानतो त्याचा पुतळा बसवला पाहिजे,असे प्रत्येकाला वाटते.मात्र त्याच समाजाचे, किंवा पुतळा बसवण्यासाठी आग्रही लोक त्याच्या सफाईत पुढाकार घेत नाहीत,मग त्यावर कबुतरे बसली तरी चालतात.
हा समाज जीवनाचा दोष आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांची ही जबाबदारी बनते.आपण सर्वानी विचार केला तर नक्कीच परिणाम घडेल.म्हणूनच मी सत्याग्रही स्वच्छाग्रही, स्वच्छाग्रही सर्व देशवासियांना मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा देतो.पूज्य बापू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आपण पुन्हा एकदा देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेऊया,स्वच्छतेला प्राधान्य देऊया,हे असे काम आहे,की देशसेवेसाठी आणखी काही करण्याची शक्ती ज्याच्याकडे नाही, ती व्यक्तीही हे काम करू शकते.हे इतके सोपे सरळ काम आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या आंदोलनात गांधीजींनी सांगितले होते,’ काही करू शकत नसाल तर टकळी घेऊन बसा’ हे स्वातंत्र्याचे काम आहे. त्याचप्रमाणे मला वाटते श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी हे छोटेसे काम प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्ती करू शकते.रोज 5 मिनिटे,10 मिनिटे, 15 मिनिटे, अर्धा तास काही ना काही करेन.आपण पहा देशात स्वाभाविक बदल घडेल.जगाच्या नजरेतून भारताकडे पाहण्याची सवय आपण ठेवली पाहिजे, असेच करावे लागेल आणि आपण ते करूच.
खूप-खूप धन्यवाद.