आदरणीय सभापतीजी आणि सन्माननीय सभागृह, आपल्या माध्यमातून या 250 व्या सत्राच्या निमित्ताने मी इथं उपस्थित असलेल्या सर्व खासदारांचे खूप-खूप अभिनंदन करतो. परंतु या 250 व्या सत्रांच्या दरम्यान जो काही प्रवास झाला आहे, ज्या प्रकारे वाटचाल झाली आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी- ज्यांनी योगदान दिले आहे, ते सर्वजण अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो.
सभापतीजी, आपण ज्यावेळी अतिशय कलात्मक पद्धतीने दोन वेगवेगळ्या घटनांना जोडून त्या सादर करीत आहात, ते पाहून मला असं वाटतंय की देशामध्ये जे लोक लिहिण्याचा छंद जोपासतात, त्यांचे नक्कीच याकडे लक्ष वेधले जाणार आहे. आत्तापर्यंत पार पडलेल्या 250 सत्रांविषयी ते लिहितील. आपोआपच काळ व्यतीत होतो, असं तर घडत नाही. या काळामध्ये एक विचार यात्राही पुढे पुढे जात असते. ज्याप्रमाणे आपण सांगितलं, की कधी एक अशा प्रकारचे विधेयक आले होते. परंतु ते जाताना अगदी त्याच्यापेक्षा वेगळं विधेयक आले. काळ पुढे चालला आणि बदलतही गेला. परिस्थितीमध्ये परिवर्तन होत गेले आणि या सदनाने बदलत गेलेल्या सर्व प्रकारच्या परिवर्तनाचा स्वीकार करत आपल्यामध्ये तसे बदल घडवून आणण्याचा प्रयत्नही केला. मला ही गोष्ट फार महत्वाची आणि मोठी वाटते. म्हणूनच सभागृहाचे सर्व सदस्य, ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत काम केलं आहे, ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. नाही तर काहीजणांना वाटू शकतं की, अरे बाबा, 20 वर्षांपूर्वी मी एखाद्या विषयावर अशी भूमिका घेतली होती, आता मी ही भूमिका कशी काय बदलू शकणार. परंतु आपण ज्याप्रकारे कलात्मकतेने ही गोष्ट प्रस्तुत केली, ते आमच्या विचार यात्रेचे प्रतिबिंब आहे. भारताच्या विकास यात्रेचे ते प्रतिबिंब आहे. आणि वैश्विक स्तरावरच्या शैलीमध्ये भारत कशा प्रकारे नवनवीन गोष्टींचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे, त्याचेही त्यामध्ये एक प्रतिबिंब आहे. आणि हे काम या सभागृहामध्ये झाले आहे. म्हणूनच सभागृहाच्या दृष्टीने ही एक गौरवाची बाब आहे.
माझ्यासाठी भाग्याचा विषय असा आहे की, या महत्वपूर्ण क्षणाचा मी साक्षीदार बनतोय. या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मला मिळत आहे. जर पुढे कधी काही कारणांमुळे विषय निघाला आणि सभागृह- मग ते कोणतेही असो, परंतु आलेल्या अनुभवावरून असं सांगता येईल की, घटना निर्मात्यांनी जी काही व्यवस्था निर्माण केली आहे, ती अतिशय उपयुक्त ठरत आहे, आणि त्यांनी आपले किती मोठे योगदान दिले आहे, हे आपल्या लक्षात येते. असं आपण हा अनुभव घेतल्यावर स्वच्छपणे म्हणू शकतो. जर कनिष्ठ सभागृह जमिनीशी जोडले गेले आहे. तर हे वरिष्ठ सभागृह जमिनीशी जोडल्या गेलेल्या तत्कालीन गोष्टींचे प्रतिबिंब व्यक्त करणारे आहे. त्यामुळे इथं बसलेल्या महान व्यक्तींना सांगू इच्छितो, यापेक्षाही वरच्या बाजूला आणखी कोणीतरी आहे, आणि ती वरची अज्ञात व्यक्ती थोडं जरा दूरचं पाहू शकते. म्हणूनच दूरदृष्टीचा अनुभव या दोन्हीच्या संयोगातून मिळणार आहे. असो वेगळे एकत्रित रसायन आमच्या या दोन्ही सभागृहांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
या सभागृहाने ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. इतिहास घडवलाही आहे आणि इतिहास घडत असतानाही पाहिले आहे. ज्यावेळी आवश्यकता भासली त्यावेळी तो इतिहास मोडूनही या सभागृहाने खूप मोठे यश प्राप्त केले आहे. याचप्रमाणे या देशाच्या मान्यवर दिग्गज महापुरुषांनी या सभागृहाचे नेतृत्व केले आहे. या सभागृहाच्या कार्यात हे महापुरूष सहभागी झाले आहेत. आणि याच कारणामुळे आमच्या देशाच्या विकासाच्या यात्रेमध्ये आणि स्वातंत्र्यानंतर अनेक गोष्टी केल्या गेल्या आहेत. आता तर 50-60 वर्षांच्यानंतर अनेक गोष्टींना एकप्रकारे व्यवस्थित आकार आलेला आहे. परंतु प्रारंभीच्या काळामध्ये ‘अज्ञानामुळे असलेल्या भयाची भावना’ आमच्यामध्ये होती, त्यातून मार्ग काढावा लागत होता. त्याकाळामध्ये ज्या समंजसपणाने सर्वांनी नेतृत्व केला, नेतृत्व दिले, ही एक खूप मोठी गोष्ट आहे.
आदरणीय सभापती जी, या सभागृहाचे मोठे वैशिष्ट्य आहे आणि दोन अगदी खास म्हणता येतील असे पैलू आहेत. – एक तर या सभागृहाचे असलेले स्थायित्व. याला आपण ‘इटर्नल’ म्हणजेच – ‘शाश्वत’ असंही म्हणू शकतो. आणि दुसरे म्हणजे विविधता. स्थायित्व म्हणजेच शाश्वतता अशासाठी की, लोकसभा तर भंग पावते. मात्र राज्यसभेचा एकदा जन्म झाला आहे, त्यानंतर आत्तापर्यंत हे वरिष्ठ सभागृह कधी भंग पावले नाही. की ते कधी भंग करण्यात येणारही नाही. याचाच अर्थ हे शाश्वत, स्थायी आहे. लोक येतील आणि जातीलही. मात्र सभागृह कायम राहणार आहे. हे या सभागृहाचे एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विविधता! याचे कारण म्हणजे या सभागृहामध्ये राज्यांच्या प्रतिनिधित्वाला प्राथमिकता दिली जाते. एक प्रकारे भारताच्या संघराज्य संरचनेचा इथं आत्मा आहे, तो आपल्याला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत आहे. भारताची विविधता, भारतामध्ये असलेल्या अनेकतेमध्ये जे एकतेचे सूत्र आहे, त्याची सर्वात मोठी ताकद या सभागृहामध्ये दिसून येते. आणि विशेष म्हणजे ही ताकद वेळोवेळी प्रतिबिंबितही होत असते. त्याचप्रकारे आपण या विविधतेच्याबरोबर पुढची वाटचाल करीत आहोत. या सभागृहाचा आणखी एक लाभही आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने निवडणुकीची लढाई लढणे हे काही सोपे आणि सहज काम नसते. परंतु देशाच्या हितामध्ये त्यांची उपयोगिता कमी असते असंही नाही. त्यांचा अनुभव, त्यांचे सामर्थ्य तितकेच मौल्यवान असते. त्यामुळे हे सभागृह ही एक अशी जागा आहे की, इथं सामर्थ्यवान महनीय, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभवी लोक या सभागृहात येतात. त्यांचा मोठा लाभ देशाच्या राजकीय जीवनाला, देशाच्या नीति-निर्धारण कार्यक्रमाला होतो. वेळोवेळी असा लाभ मिळालाही आहे. शास्त्रज्ञ असो किंवा क्रीडाक्षेत्र, कला क्षेत्रातले महनीय लोक असो, लेखणीचे महान धनी असो, अशा अनेक महनीय लोकांना निवडणुकीची लढाई जिंकणे खरोखरीच अवघड असते. परंतु या सभागृहाची व्यवस्था असल्यामुळे आमच्या या बौध्दिक संपदेची संपन्नता आपल्याला मिळू शकली आहे.
आणि या 250 सत्रांचा विचार केला तर मला सर्वात मोठे आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः आहेत, असे वाटते. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने बाबासाहेबांना लोकसभेमध्ये पोहचू दिले गेले नव्हते. परंतु या राज्यसभेमुळेच तर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा लाभ देशाला मिळू शकला. म्हणूनच आपल्या दृष्टीने ही एक गर्वाची गोष्ट आहे की, या राज्यसभेमुळे देशाला बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक महापुरुषांचा आपल्याला खूप मोठा लाभ मिळाला. आणखी एक गोष्ट दिसून आली आहे की, मधल्या प्रदीर्घ कालखंडामध्ये विरोधी पक्ष म्हणून असे फारसे खास कुणी नव्हते. विरोधाची भावनाही अतिशय कमी होती. असा खूप मोठा कालखंड होता. आणि त्या काळात जी शासन व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये जे लोक होते, ते लोक खरोखरीच खूप भाग्यशाली होते. त्यांना जे भाग्य मिळाले, तसे भाग्य आज मिळत नाही. कारण आज प्रत्येक पावला-पावलावर संघर्ष आहे. पावला-पावलावर विरोधाचा भाव व्यक्त होत आहे. परंतु त्या काळामध्ये ज्यावेळी विरोधी पक्ष जणू अस्तित्वातच नव्हता, त्यावेळी या सभागृहामध्ये इतके अनुभवी आणि विव्दान लोक सदस्य म्हणून होते की, त्यांनी कधीही शासन व्यवस्थेमध्ये निरंकुशता येवू दिली नाही. शासनामध्ये असलेल्या लोकांना योग्य दिशेने जाण्यासाठी प्रेरणा देण्याचे कठोर काम या सभागृहामध्ये करण्यात आले. ही एकप्रकारे किती मोठी सेवा झाली आहे, याचा आपण सर्वांनी गर्व केला पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी स्मरण करण्यासारखी आहे.
आदरणीय सभापती जी, आपले पहिले उप-राष्ट्रपती जी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांनी या सदनाविषयी जी गोष्ट व्यक्त केली होती, तीच गोष्ट मी आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करू इच्छितो. डॉक्टर राधाकृष्णनजी यांनी म्हटलं होतं, या खुर्चीवर आसनस्थ होवून त्यांनी जे काही उद्गार काढले होते, ते आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहेत. आणि आपण आदरणीय प्रणव मुखर्जी यांच्या उद्गारांचा उल्लेख करता किंवा तुम्हाला ज्या गोष्टींविषयी दुःख वाटतं, ज्या घटनांमुळे वेदना होतात, त्याचाही उल्लेख त्या उद्गारांमध्ये समाविष्ट होतो आहे. त्या काळामध्ये राधाकृष्णनजी यांनी म्हटलं होतं की, ‘‘आपले विचार, आपला व्यवहार आणि आपली कार्यपद्धती ही दोन सभागृहाच्या संसदीय प्रणालीचे औचित्य सिद्ध करेल. राज्यघटनेचा एक अभिन्न भाग बनलेली ही व्दिसदनी व्यवस्था आहे. या दोन सभागृहांच्या व्यवस्थेमध्ये होत असलेल्या कामामुळे सर्वांचीच परीक्षा घेतली जाईल. आम्ही पहिल्यांदाच आपल्या संसदीय प्रणालीमध्ये दोन सभागृहांची व्यवस्था निर्माण करीत आहोत. आपल्या सर्वांचा असा प्रयत्न असला पाहिजे की, आपले विचार, सामर्थ्य आणि समज देशाच्या या व्यवस्थेचे औचित्य सिद्ध करेल.’’
250 सत्रांच्या या प्रवासानंतर, अनुभवसंपन्न झाल्यानंतर वर्तमानात वाटचाल करणारी पिढीची काही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आणखी वाढते. डॉक्टर राधाकृष्णनजी यांनी जी अपेक्षा केली होती, त्याच्या खाली तर आपण जात नाही ना? आपण त्या अपेक्षांची पूर्ती करीत आहोत का, अथवा या बदलत्या युगामध्ये आम्ही त्या अपेक्षासुद्धा आणखी चांगल्या, मूल्यवर्धित करीत आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. आणि मला विश्वास आहे की, सभागृहामध्ये कार्यरत असलेली वर्तमान पिढी आणि भविष्यात येणारी पिढी ही डॉक्टर राधाकृष्णनजी यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत राहील. आणि त्यामुळे भविष्यात देशाला….. !
आता जर, ज्याप्रमाणे आत्ता आदरणीय सभापतीजींनी सांगितलं, की गेल्या 250 सत्रांचे विवेचन केले तर अनेक महत्वपूर्ण, ऐतिहासिक विधेयके या सभागृहामध्ये मंजूर झाली. ही विधेयके देशामध्ये कायदा निर्माण करण्यासाठी आणि देशाचा कारभार हाकण्यासाठी मजबूत आधार बनली आहेत. आणि मीही जर गेल्या पाच वर्षांचा हिशेब पाहिला तर माझ्या दृष्टीने एक खूप मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे अशा अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. प्रत्येकाचे विव्दत्तापूर्ण विचार ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. आणि अशा अनेक गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मला या सभागृहानं दिली. याचा मला खूप मोठा लाभ झाला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जर आपण ही गोष्ट शिकू शकलो, काही वेगळं समजू शकलो तर आपल्याला खूप काही मिळू शकणार आहे. आणि याचा अनुभव मी इथं घेतला आहे. आपल्या सर्वांमध्ये कधी कधी येवून मला इथं व्यक्त होणारे विचार ऐकायला मिळतात, ही गोष्ट माझ्यासाठी विशेष भाग्याची आहे, असं मला वाटतं.
आपण जर गेल्या पाच वर्षांकडे पाहिलं तर लक्षात येईल, या सभागृहानेच तीन तलाक रद्द करण्याचा कायदा केला. हा कायदा होणार की होणार नाही याची चर्चा होती. तसंच हे विधेयक या सभागृहामध्येच लटकणार, असंही म्हटलं जात होतं. परंतु या सभागृहाची परिपक्वता दिसून आली. या सभागृहाने महिलांना अधिक प्रबळ, शक्तिशाली बनवण्याचं काम केलं. हे या सभागृहाचं मोठं तसंच महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या देशामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रत्येक क्षणाला संघर्षाचे बीज रोवले गेले आहे. देशामध्ये तणावाची स्थिती निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. परंतु गर्वाची- अभिमानाची गोष्ट अशी आहे की, या सभागृहाने सामान्य वर्गातल्या गरीब परिवाराला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु देशामध्ये कुठंही तणाव निर्माण झाला नाही, विरोधाचे वातावरण तयार झाले नाही. तर सहमतीची भावना निर्माण झाली. ही गोष्ट केवळ या सभागृहामुळेच शक्य झाली आहे.
याच प्रकारे आपण सर्वजण जाणून आहोत की, जीएसटी विधेयक – प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होते. शासनामध्ये ज्याच्याकडे याची जबाबदारी होती, त्या सर्वांनी परिश्रम केले. कोणत्या उणिवा आहेत, त्या दूर करण्यासाठी काय सुधारणा केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने सुधारणा केल्या पाहिजेत, या सर्व गोष्टींविषयी चर्चा सुरू होती. परंतु ‘‘वन नेशन, वन टॅक्स सिस्टिम’’ म्हणजेच ‘एक राष्ट्र, एक करप्रणाली’’ हे निश्चित करून, या सभागृहामध्ये सर्वसंमतीने देशाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. आणि त्यामुळेच एक नवा विश्वास निर्माण झाला. आता आपण या नव्या विश्वासानं आपलं म्हणणं संपूर्ण विश्वासमोर मांडू शकतो.
देशाची एकता आणि अखंडता- या सभागृहामध्ये 1964 मध्ये जी वचने देण्यात आली होती, ती एक वर्षाच्या आतच पूर्ण करण्यात येतील. आत्तापर्यंत जे काम झालं नाही, ते म्हणजे कलम 370 आणि 35(अ) हटवण्याचं काम या सभागृहामध्ये झालं आणि देशाला दिशा देण्याचं काम या सभागृहाने सर्वप्रथम केलं. विशेष म्हणजे हे काम त्यानंतर लोकसभेनं केलं. आणि म्हणूनच हे सभागृह म्हणजे देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेताना अतिशय उत्तम भूमिका पार पाडत आहे. ही खूप असामान्य गोष्ट आहे. आणखी एक विशेषता म्हणजे या सभागृहाचे आणखी एका गोष्टीसाठी कायम स्मरण करण्यात येईल. ती गोष्ट म्हणजे 370 वे कलम जारी करणारे श्रीयुत एन. गोपालास्वामी या सभागृहाचे पहिले नेते होते. त्यांनीच हे कलम जारी केलं होतं. आणि आता या सभागृहानेच हे कलम रद्द करण्याचं काम मोठ्या गौरवानं केलं आहे. ही घटना आता एक इतिहास बनली आहे. परंतु हा इतिहास या सभागृहामध्येच घडला आहे.
आपल्या राज्यघटना निर्मात्यांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती निभावणे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची जबाबदारी पेलताना त्याच्या जोडीलाच आणखी एक जबाबदारी आहे, ती म्हणजे- राज्यांचे कल्याण! याचा अर्थ भारत हा कल्याणकारी राज्याच्या रूपामध्ये काम करणारा असला पाहिजे. परंतु त्याच्याबरोबर आणि त्याचवेळी आम्हा लोकांची आणखी एक जबाबदारी आहे. ती म्हणजे राज्यांचेही कल्याण झाले पाहिजे. आणि असे दोन्ही मिळून राज्य आणि केंद्र मिळून देशाला पुढं नेता येणार आहे. आणि हे काम करण्यासाठी या सभागृहाचे महत्व आहे. कारण हे सभागृह सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे आणि पूर्ण ताकदीनिशी सगळेजण सहकारी बनून महत्वाची भूमिका निभावत आहेत. आणि आपल्या राज्यघटनात्मक संस्थांना ताकद देण्याचेही काम आम्ही केले आहे. आपली संघीय संरचना, आपल्या देशाच्या विकासासाठी असलेल्या प्रमुख अटी आणि राज्य आणि केंद्र सरकार मिळून एकत्रितपणे काम केले गेले तरच, त्यावेळी देशाची प्रगती शक्य होणार आहे.
देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे प्रतिस्पर्धी नाहीत, हे राज्यसभा सुनिश्चित करते. परंतु आम्ही एकमेकांच्या कार्यासाठी सहयोगी, सहभागी बनून देशाला पुढे नेण्याचे काम करीत आहोत. इथं ज्या विचारांचे आदान-प्रदान केले जाते, त्याचे जे सार आहे, ते या सभागृहाचे प्रतिनिधी आपल्या राज्यात घेवून जात असतात. आपल्या राज्यांमधल्या सरकारांना त्याची माहिती देत असतात. राज्यातल्या सरकारांना त्याच्याशी जोडले जाण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम करतात. तसंच काम जाणते-अजाणतेपणीही सतर्क राहून आम्ही सातत्याने काही करण्याची आवश्यकता असते.
देशाचा विकास आणि राज्यांचा विकास या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. राज्यांचा विकास झाला नाही तर देशाचा विकास होणे शक्य आहे. आणि देशाच्या विकासाचा नकाशा हा राज्यांच्या विकासाच्या अगदी उलट झाला. तरीही राज्यांचा विकास होवू शकणार नाही. या गोष्टी या सभागृहामध्ये सर्वात जास्त प्रतिबिंबित होतात. विशेष म्हणजे या प्रतिबिंबामध्ये जीवंतपणा असतो. जास्त करून केंद्र सरकार नीतीधोरण निश्चित करते. त्या नीतींमध्ये राज्यांच्या अपेक्षा, राज्यांची स्थिती, राज्यांचे अनुभव, राज्यांना रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये येत असलेल्या अडचणी, या सर्वांचा विचार करून सरकार नीतिधोरणे निश्चित करताना अतिशय सटीक कार्यपद्धती स्वीकार शकत असेल तर ते काम या सभागृहामध्ये होत असते. या सभागृहाचे सदस्य हे महत्वाचे काम करत असतात. आणि त्याचा लाभ संघ राज्य संरचनेला होत असतो. सगळी कामे काही एकावेळेस होत नसतात. काही कामांना पाच वर्षे लागतील, अशी असतात. तर काही कामे पाच वर्षे झाली तरी त्यांची केवळ दिशा निश्चिती झाली आहे, अशीही आहेत. आणि ही सर्व कामे या सभागृहामधून होत आहेत, ही एक मोठी गोष्टी आहे…..!
आदरणीय सभापतीजी, 2003 मध्ये ज्यावेळी या सभागृहाची 200 सत्रं पूर्ण झाली होती, त्यावेळीही एक समारंभ झाला होता. आणि त्यावेळीही देशामध्ये एनडीएचे सरकार होते आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी होते. त्या 200व्या सत्राच्या वेळी आदरणीय अटलजींचे जे भाषण झाले होते, ते अतिशय रंजक आणि उद्बोधक होते. त्यांची बोलण्याची अशी एक खास शैली होती. अटलजी म्हणाले होते की, आपल्या संसदीय लोकशाहीच्या शक्तीवर्धनासाठी दुसरे सभागृह सिद्ध आहे. त्यांनी इशारा दिला होता की, या दुसऱ्या सभागृहाला कोणीही दुय्यम दर्जाचे सभागृह बनवण्याची चूक करू नये. हा इशारा अटलजींनी त्यावेळी भाषणात दिला होता. त्यांचे शब्द असे आहेत- ‘‘या दुसऱ्या सभागृहाला दुय्यम दर्जाचे सभागृह बनवण्याची चूक कोणीही करू नये’’
अटलजींच्या ही वाक्ये मी ज्यावेळी वाचत होतो, त्यावेळी मला वाटलं की, हीच गोष्ट आजच्या स्थितीशी संबंधित आहे, हे जाणून जर वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडायची असेल तर, असं मला सांगता येईल की, राज्यसभा दुसरे सभागृह आहे, मात्र ते दुय्यम सभागृह कधीच नाही. आणि भारताच्या विकासासाइी ते पुरक -आश्वासक सभागृह कायम राहिले पाहिजे.
ज्यावेळी आपल्या संसदीय प्रणालीला 50 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळी अटलजींचे एक भाषण झाले होते. संसदीय प्रणाली च्या 50 वर्ष झाली म्हणून त्यांनी आपल्या भाषणात खूप छान कवित्वाच्या भावनेने एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते – एखाद्या नदीचे किनारे-काठचा प्रदेश जर चांगला मजबूत असेल तरच त्या नदीचा प्रवाह आपल्याला खूप चांगला वाटतो. त्यांनी पुढं असंही म्हटलं होतं की, भारताचा हा संसदीय प्रवाह आहे, तो म्हणजे आपली लोकशाही प्रक्रिया आहे- या प्रवाहाचा एक किनारा लोकसभा आहे तर दुसरा किनारा राज्यसभा आहे. हे दोन्ही किनारे मजबूत राहतील, त्याचवेळी लोकशाही परंपरेचा प्रवाह अतिशय चांगल्या प्रकारे पुढे पुढे वाहत जाईल. ही गोष्ट आदरणीय अटलजींनी त्यावेळी सांगितली होती.
एक गोष्ट नक्की आहे की, भारत संघराज्यीय संरचना आहे, विविधतेने परिपूर्ण आहे. त्यावेळी ही सुद्धा एक अनिवार्य अट आहे की, आपल्याला राष्ट्रीय दृष्टिकोणापासून दूर जाता येणार नाही. राष्ट्रीय कार्य आपल्या डोळ्यासमोरून कधीच धुसर होणार नाही, हे आपण पाहिले पाहिजे. राष्ट्रीय दृष्टिकोण आपल्याला नेहमीच केंद्रस्थानी ठेवावा लागेल. परंतु आपल्याला राष्ट्रीय दृष्टिकोणाबरोबरच क्षेत्रीय हित जपले पाहिजे. या दोन्हीमध्ये सातत्याने संतुलन राखावेच लागेल. त्याचवेळी आम्ही संपूर्ण देशामध्ये संतुलन कायम ठेवून पुढची वाटचाल करू शकणार आहे. आणि हे काम सर्वात चांगल्या पद्धतीने होवू शकेल, असे स्थान म्हणजे हे सभागृह आहे. या सभागृहाच्या माननीय सदस्यांच्याव्दारेच देशाला पुढं नेण्याचं काम चांगल्या पद्धतीने या सभागृहात होणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, हे काम करण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करीत राहणार आहोत.
राज्यसभा एक प्रकारे ‘रोखणे आणि संतुलन राखणे’ या विचारांचे मूळ सिद्धांतानुसार अतिशय महत्वाचे स्थान आहे. परंतु असे करताना मध्येच कुठेही केवळ अडथळा निर्माण होणे, खोडा घालणे असे होवू नये म्हणून यामधले अंतर कायम राखणे खूप आवश्यक आहे. संतुलन राखणे आणि अवरोध उत्पन्न करणे यामध्ये आपल्याला खूप सतर्क राहणे अतिशय जरूरीचे असते. हीच गोष्ट आपल्याकडच्या अनेक महनीय व्यक्तींनी अनेक प्रकारे आणि अनेकवार सांगितली आहे. बंधूंनो, सभागृह हे चर्चा करण्यासाठी असले पाहिजे. संवाद साधण्यासाठी असले पाहिजे. विचार-विनिमय करण्यासाठी असले पाहिजे. अतिशय तीव्र, टोकाचे मतभेद, विवाद असू द्यात, त्याने कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु चर्चे-संवादामध्ये जर अवरोध निर्माण झाला तर मात्र नुकसान होणार आहे. म्हणूनच चर्चेत अवरोध निर्माण करण्याऐवजी आपण संवाद साधण्याचा मार्ग निवडला पाहिजे.
आज इथं मी ज्यांचा उल्लेख करणार आहे, त्यांच्याशिवाय आणखीही काही लोक असतीलही. मात्र मी आज इथं दोन पक्षांचा उल्लेख आवर्जुन करू इच्छितो- एक एनसीपी आणि दुसरा पक्ष आहे बीजेडी! आणखी कोणाचे नाव राहून जात असेल तर मला माफ करावे. परंतु या दोन पक्षांचा मी मुद्दाम उल्लेख करीत आहे. या दोन्ही पक्षांचे वैशिष्ट्य मी सांगणार आहे. या दोन्ही पक्षांनी आपण स्वतःहून एक शिस्त, स्वयंशिस्त निश्चित केली आहे. या स्वयंशिस्तीनुसार या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी ठरवलंय की आपणहून कधीच सभागृहाच्या ‘हौद्यात’ उतरायचं नाही. आणि मी पाहतोय, माझं लक्ष आहे की, या पक्षांच्या एकाही सदस्याने ही शिस्त कधीच मोडली नाही. एकदाही नियम तोडला नाही. आपल्याकडच्या सर्व राजकीय पक्षांनी हे शिकलं पाहिजे, अगदी माझ्या पक्षासह सर्वांनी ही गोष्ट शिकून अशी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. स्वतः घालून घेतलेल्या नियमाचे पालन केले म्हणून काही एनसीपीची राजकीय विकास यात्रा काही कुठंही थांबली नाही, तिला अवरोध उत्पन्न झाला नाही. बीजेडीच्या राजकीय विकासातही कुठंही अडथळा निर्माण झाला नाही. याचाच अर्थ सभागृहाच्या हौद्यात न उतरताही लोकांचे मत, हृदय जिंकता येवू शकते. लोकांचा विश्वास जिंकता येवू शकतो. हे आणि म्हणूनच मला वाटत की, अगदी महत्वपूर्ण पदांसह या लोकांनी ज्या उच्च परंपरा निर्माण केल्या आहेत, त्यांचे कोणत्याही प्रकारे राजकीय नुकसान झालेले नाही. मग आपण त्यांच्याकडून हे चांगले गुण का बरं शिकायचे नाहीत? आम्हीही कधी त्या स्थानी होतो, त्यावेळी अशा गोष्टी केल्या आहेत. तशा गोष्टी आता टाळायला हव्यात. आज आपल्यासमोर अशी स्वयंशिस्त पाळणारे उपस्थित आहेत. त्यामुळे मला या सर्व सभागृहाला सांगावेसे वाटते की, एनसीपी, बीजेडी या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी ज्या उत्तम प्रकारे शिस्तीचे पालन केले, त्याचे कौतुक होण्याची गरज आहे, या पक्षांच्या सदस्यांच्या शिस्तीची चर्चाही झाली पाहिजे. मी त्यांना धन्यवाद देवू इच्छितो. आणि मला वाटतं की, आज ज्यावेळी आपण 250 व्या सत्रासाठी एकत्रित आलो आहोत, तर यावेळी अशा उत्तम घटनेचा उल्लेख होणे आवश्यक आहे. आणि ही गोष्ट लोकांच्याही लक्षात आणून दिली पाहिजे.
मला विश्वास आहे की, सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे, ते सर्व काही करण्यासाठी सदस्य आपाआपली भूमिका पार पाडत राहतील. आपल्या वेदना, व्यथा प्रकट होत राहतात. या 250 व्या सत्रामध्ये आपण सर्वजणांनी काही संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. आपण सर्वांनीच हा संकल्प करायचा आहे. तुम्हा सर्वांना कमीत कमी कष्ट व्हावेत, तुम्हा सर्वांच्या भावनांचा आदर केला जावा आणि आपल्या सर्वांना जसे वाटते, त्याप्रमाणे या सभागृहाचे कामकाज चालावे, यासाठी आम्ही आपले सहकारी बनू आणि सर्वजण शिस्तीचे पालन करण्याचा प्रयत्न करतील.
या संकल्पाबरोबर मी पुन्हा एकदा राज्यसभेच्या या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी इथंपर्यंत पोहोचवले आहे, त्या सर्वांना धन्यवाद देवून माझ्या वाणीला विराम देतो.
खूप-खूप धन्यवाद !!