नमस्कार !
या विशेष कार्यक्रमात उपस्थित दुर्गा जसराजजी, शारंगदेव पंडितजी, पंडित जसराज कल्चरल फाऊंडेशनचे सह-संस्थापक नीरज जेटलीजी, देशातील आणि जगातील सर्व संगीतज्ञ आणि मान्यवर कलाकार, बंधू आणि भगिनींनो!
आपल्या येथे संगीत, सूर आणि स्वर यांना अमर मानले जाते. असे म्हणतात की आवाजाची ऊर्जा देखील अमर आहे, तिचा प्रभाव देखील अमर आहे. अशा स्थितीत संगीत जगणारा, ज्याचे संगीत अस्तित्वाच्या प्रत्येक कणात निनादत आहे, असा महान आत्मा देह सोडल्यानंतरही विश्वाच्या उर्जेत आणि चैतन्यात अमर राहतो.
आज या कार्यक्रमात संगीततज्ञ, कलाकारांचे सादरीकरण होत आहे, ज्या पद्धतीने पंडित जसराज जी यांचे संगीत, त्यांचे संगीत आज आपल्यामध्ये निनादत आहे, संगीताच्या या चैतन्यात, पंडित जसराजजी आपल्यामध्ये आहेत, असे वाटते. साक्षात पंडीतजीच सादरीकरण करत आहेत असे वाटते.
मला आनंद आहे की तुम्ही सर्वजण त्यांचा सांगीतिक वारसा पुढे चालवत आहात, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी आणि युगांसाठी जपत आहात. आज पंडित जसराजजी यांच्या जयंतीचाही शुभ मुहूर्त आहे. पंडित जसराज सांस्कृतिक फाउंडेशनच्या स्थापनेच्या या अभिनव कार्यासाठी मी आजच्या दिवशी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. दुर्गा जसराजजी आणि पंडित शारंगदेवजी यांना मी विशेष शुभेच्छा देतो. तुमच्या वडिलांची प्रेरणा, त्यांची तपश्चर्या संपूर्ण जगाला समर्पित करण्याचा तुम्ही विडा उचलला आहे. मलाही अनेकवेळा पंडित जसराजजींना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग आला आहे.
मित्रांनो,
संगीत हा अतिशय गूढगहन विषय आहे. मी याबद्दल फारसा जाणकार नाही, पण आपल्या ऋषीमुनींनी स्वर आणि नाद याबद्दल जे व्यापक ज्ञान दिले आहे, ते अद्भूत आहे. आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे-
नाद रूपः स्मृतो ब्रह्मा, नाद रूपो जनार्दनः।
नाद रूपः पारा शक्तिः, नाद रूपो महेश्वरः॥
म्हणजेच विश्वाला जन्म देणार्या, संचालित करणाऱ्या आणि त्याचा लय करणार्या शक्ती या नादरुपच आहेत. या उर्जेच्या प्रवाहात नाद समजून घेण्याची, संगीत पाहण्याची ही शक्ती भारतीय शास्त्रीय संगीताला असाधारण बनवते. संगीत हे एक असे माध्यम आहे जे आपल्याला ऐहिक कर्तव्याची जाणीवही करून देते आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्तही करते. संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे भले त्याला स्पर्श करता येत नसला तरी तो अनंतापर्यंत निनादत राहतो.
मला सांगण्यात आले आहे की पंडित जसराज सांस्कृतिक फाउंडेशनचे प्राथमिक उद्दिष्ट भारताच्या राष्ट्रीय वारसा, कला आणि संस्कृतीचे संरक्षण, विकास आणि संवर्धन हे असेल. हे फाऊंडेशन नवोदित कलाकारांना पाठबळ देईल आणि कलाकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करेल हे जाणून मला आनंद झाला. तुम्ही या फाऊंडेशनच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाचे कार्य पुढे नेण्याचा विचार करत आहात.
आपण जी कार्य योजना, जो कृती आराखडा तयार केला आहे तो म्हणजे पंडित जसराज यांच्यासारख्या थोर व्यक्तीमत्वासाठी मोठी श्रद्धांजली आहे. त्यांच्या शिष्यांसाठी एका प्रकारे गुरु दक्षिणा देण्याची ही वेळ आहे असे मी मानतो.
मित्रहो,
आज आपण अशा काळात भेटत आहोत जेथे संगीत जगतात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला आहे. या सांस्कृतिक प्रतिष्ठानने दोन बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे अशी माझी विनंती आहे. आपण जागतिकीकरणाच्या संदर्भात बरेच काही ऐकतो,मात्र जागतिकीकरणाची जी व्याख्या आहे,जो संदर्भ आहे तो वित्त केन्द्री राहतो,अर्थव्यवस्थेच्या पैलुंशी निगडीत राहतो. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात, भारतीय संगीतानेही आपली जागतिक ओळख ठसवावी, जागतिक स्तरावर आपला प्रभाव निर्माण करावा ही आपण सर्वांची जबाबदारी आहे.
भारतीय संगीतात अंतर्मनाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य आहे. त्याच बरोबर निसर्ग आणि परमात्मा यांच्या एकात्मतेची प्रचीतीही यातून प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय योग दिन- आता अवघ्या जगाने योग आपलासा केल्याचे आढळत आहे. यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भारताच्या या वारश्याचा अवघ्या मानव जातीला, संपूर्ण जगाला लाभ झाला आहे. जगातली कोणतीही व्यक्ती भारतीय संगीत समजून-जाणून शिकून, त्याचा लाभ घेऊ शकते. हे पवित्र कार्य पूर्णत्वाला नेणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
माझी दुसरी
सूचना म्हणजे, जेव्हा तंत्रज्ञानाचा प्रभाव जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आहे तर संगीत क्षेत्रातही तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली पाहिजे. संपूर्णपणे संगीत क्षेत्राला समर्पित, भारतीय वाद्यांवर आधारित, भारतीय संगीत पर्माप्रेवर आधारित असे स्टार्ट अप्स भारतात तयार व्हावेत.
भारतीय संगीताचा प्रवाह हा गंगा जलाप्रमाणे पवित्र आहे. हे संगीत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासंदर्भात खूप कार्य करण्याची आवश्यकता आहे. हे करताना आपली गुरु-शिष्य परंपरा तर अबाधित राहिली पाहिजे मात्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक जागतिक बळ प्राप्त झाले पाहिजे, मूल्य वर्धन झाले पाहिजे.
मित्रहो,
भारतातले ज्ञान,भारतातले तत्वज्ञान,चिंतन,आपले आचार-विचार, आपली संस्कृती,आपले संगीत, मानवतेची सेवा हा स्थायीभाव घेऊन शतकानुशतके आपल्या जीवनात चैतन्य निर्माण करत आहेत. संपूर्ण जगाच्या कल्याणाची सदिच्छा त्यातून दिसून येते.म्हणूनच आपण भारताला, भारतीय परंपराना आपण जितके शिखरावर नेत राहू, मानवतेच्या सेवेच्या तितक्याच संधी खुल्या होत राहतील.
हीच आज भारताची मनीषा आहे, हाच आज भारताचा मंत्र आहे.
काशी सारख्या आपल्या कला आणि संस्कृतीच्या केंद्रांचे आपण पुनरुज्जीवन करत आहोत, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाप्रती आपले जे साहचर्य आहे, त्या माध्यमातून भारत आज जगाला सुरक्षित भविष्याचा मार्ग दाखवत आहे. वारसाही आणि विकासही हा मंत्र घेऊन भारताच्या सुरु असलेल्या या प्रवासात 'सबका प्रयास', सर्वांच्या प्रयत्नांचे योगदान राहिले पाहिजे.
पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपणा सर्वांच्या भरीव योगदानाने यशाचे नवे शिखर गाठेल असा मला विश्वास आहे. हे प्रतिष्ठान, संगीत सेवेचे,साधनेचे आणि देशाप्रती आपल्या संकल्पांच्या पूर्ततेचे एक महत्वाचे माध्यम ठरेल. याच विश्वासासह आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद आणि या नूतन प्रयत्नासाठी अनेक शुभेच्छा !
धन्यवाद!