When the entire country stands with our forces, the strength of our jawans increases 125 crore times: PM Modi during #MannKiBaat
Decision to implement demonetisation wasn’t easy. There will be inconvenience to rid the country of troubles of 70 years: PM #MannKiBaat
Govt, post offices, banks are working hard & with dedication to fight evils of black money & corruption: PM Modi during #MannKiBaat
Despite inconvenience, people across the country have accepted demonetisation drive. This shows their potential: PM during #MannKiBaat
Villages, farmers & small traders have a pivotal role in our country’s economy: PM Modi during #MannKiBaat
Urge small traders to embrace technology by using banking apps & digital payment systems: PM Modi during #MannKiBaat
By embracing technology, we can build a cashless society. This will be a big transformation: PM during #MannKiBaat
We can gradually move from a ‘less-cash’ society to a cashless society. Youth can play a major role in this: PM Modi during #MannKiBaat
Youth can be the agents of change in fighting black money & corruption: PM Narendra Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार,

गेल्या महिन्यात आपण दिवाळी साजरी केली. दर वर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळी आपल्या भारतीय जवानांबरोबर साजरी करण्यासाठी मी भारत-चीन सिमेवर गेलो होतो.

आयटीबीपीचे सैनिक, सैन्य दलाचे जवान, या सर्वांबरोबर हिमालयाच्या उंच भागात मी दिवाळी साजरी केली. दरवेळी जातो, पण या दिवाळीचा अनुभव काही वेगळाच होता. देशातल्या सव्वाशे कोटी नागरिकांनी, ज्या अनोख्या प्रकारे ही दिवाळी सैन्यादलातील जवानांना अर्पण केली, सुरक्षा दलांना अर्पण केली, त्याचं प्रतिबिंब त्या प्रत्येक जवानाच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. भावना त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या दिसत होत्या. इतकच नाही, तर देशवासियांनी जे शुभेच्छा संदेश पाठवले, आपल्या आनंदात सुरक्षा दलांना सहभागी करून घेतलं, विलक्षण प्रतिसाद दिला आणि आपल्या नागरिकांनी केवळ संदेशच नाही पाठवले, ते मनानेही जवानांशी जोडले गेले होते. कुणी कविता केली, कुणी चित्र काढलं, कुणी कार्टून काढलं, काही जणांनी व्हिडिओ तयार केला. म्हणजे प्रत्येक घर जण काही सैन्याची चौकीच झालं होतं, आणि जेव्हा ही पत्रं मी वाचली, तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. किती ही कल्पकता? भावनांनी भरलेली आहेत ही पत्रं. त्याचवेळी ‘माय गोव्ह’ वर एक सूचना आली की, त्यातल्या निवडक गोष्टी एकत्र करून त्याचं कॉफी टेबल बुक बनवता येईल का? ते काम सुरू आहे. आपणा सर्वांचं योगदान, देशाच्या सैन्यदलाच्या जवानांसाठी आपण व्यक्त केलेल्या भावना, आपली कल्पकता हे सगळं त्यात संकलित केलं जाईल. आपल्या सैन्य दलातील एका जवानाने मला लिहिलं, पंतप्रधानजी, आम्हा सैनिकांचा होळी, दिवाळी, प्रत्येक सण हा सीमेवरच असतो. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. पण हो, सणाच्या दिवशी घरची आठवण येतेच. पण खरं सांगू, यावेळी असं वाटलं नाही. असं वाटलं की, जणू आपण सव्वाशे कोटी भारतीयांबरोबर दिवाळी साजरी करीत आहोत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या दिवाळीत आपल्या सैन्य दलाबद्दल आपण व्यक्त केलेल्या भावना, केवळ काही प्रसंगांपुरत्याच मर्यादित राहून कशा चालतील. मी आपल्याला विनंती करतो की, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, आपण ही सवय आपल्याला लावून घेऊ या. कोणताही सण असो, उत्सव असो, आपल्या देशाच्या सैनिकांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्षात ठेवू या. जेव्हा सारं राष्ट्र सैन्यदलाबरोबर उभं राहतं, तेव्हा आपल्या सेनेची शक्ती सव्वाशे कोटी पटीनं वाढते. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर राज्यातले सरपंच मला भेटायला आले होते. ‘जम्मू-काश्मीर पंचायत परिषदे’चे ते सदस्य होते. काश्मीर खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागातून ते आले होते. सुमारे 40-50 जण होते. बराच वेळ त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली. आपल्या गावाच्या विकासाबाबत मुद्दे घेऊन ते आले होते. त्यांच्या काही मागण्या होत्या आणि जेव्हा आमचा संवाद सुरू झाला तेव्हा, साहजिकच काश्मीर खोऱ्यातले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, मुलांचं भवितव्य हे मुद्दे निघाले. साहजिकच होतं ते. आणि इतक्या प्रेमाने, मोकळेपणाने या सरपंचानी संवाद साधला. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करणारी होती. काश्मीरात शाळांना आगी लावल्या जातात, त्याची चर्चा बोलण्याच्या ओघात झाली आणि मी बघितलं, की आपल्या सर्व देशवासियांना जितकं दु:ख होतं, तितकाच त्रास त्यांनाही याचा होतो. ते म्हणतात की, शाळा नव्हे तर मुलांचं भवितव्य जाळलं गेलं आहे. आपण या मुलांच्या भवितव्याकडे लक्ष द्या अशी मी त्यांना विनंती केली. आणि मला सांगायला आनंद होतो की, या सर्व सरपंचांनी मला दिलेला शब्द पाळला, गावागावात जाऊन तिथल्या लोकांना जागृत केलं. काही दिवसांपूर्वीच तिथे बोर्डाच्या परीक्षा झाल्या. काश्मीरच्या मुलांनी आणि मुलींनी, जवळजवळ 95 टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही बोर्डाची परीक्षा दिली. बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं, म्हणजे जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्यासाठी वचनबद्ध आहेत. ह्याचंच लक्षण मानावं लागेल. त्यांनी दाखवलेल्या या उत्साहासाठी मी त्यांचं अभिनंदन तर करेनच, पण त्यांचे आई-वडील, नातेवाईक आणि त्यांचे शिक्षक आणि सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच या सगळ्यांना मी अंत:करणापासून धन्यवाद देतो.

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

यावेळी जेव्हा ‘मन की बात’ साठी मी आपल्याकडून सूचना मागवल्या, तेव्हा मी सांगू शकतो की, एकाच विषयावर सर्वांनी सूचना पाठवल्या. सगळ्यांचं सांगणं होतं की, 500 आणि 1000 च्या नोटांबद्दल सविस्तर बोलावं. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करताना देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महाअभियान सुरू करण्याचा मुद्दा मी मांडला होता. ज्यावेळी मी हा निर्णय घेतला. आणि आपल्यासमोर ठेवला. त्याचवेळी मी सर्वांच्यासमोर सांगितलं होतं की, हा निर्णय साधा नाही. अडचणींनी भरलेला आहे. पण निर्णय घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो अंमलात आणणं सुध्दा महत्त्वाचं आहे. मलाही या गोष्टीचा अंदाज होता की, आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या नव्यानव्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागेल. तेव्हाही मी सांगितलं होतं की हा निर्णय इतका मोठा आहे की, त्याच्या परिणामातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला 50 दिवस लागतीलच. आणि त्यानंतर सुरळीत स्थितीकडे आपण पाऊल टाकू शकू.

70 वर्षांपासून ज्या आजाराला आपण तोंड देत होतो, त्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग सुलभ असू शकत नाही. आपल्याला होणाऱ्या अडचणी मी समजू शकतो. पण जेव्हा या निर्णयाला आपण दिलेला पाठिंबा बघतो, आपण देत असलेलं सहकार्य बघतो, आपल्याला संभ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही कधी कधी मन विचलित करणाऱ्या घटना समोर घडूनही आपण सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला आहे. देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे.

पाचशे आणि हजारच्या नोटा आणि इतका मोठा देश, इतक्या चलनाचा भडीमार, अब्जावधी नोटा आणि हा निर्णय. सारं जग बारकाईनं बघत आहे, प्रत्येक अर्थतज्ञ याचं सखोल विश्लेषण करतोय. मुल्यमापन करतोय, पूर्ण जग हे बघतंय की, हिंदुस्तानातील सव्वाशे कोटी नागरिक अडचणी सोसूनही सफलता मिळवतील का? जगाच्‍या मनात कदाचित प्रश्नचिन्ह असू शकेल. भारताला, भारताच्या सव्वाशे कोटी देशवासियांबद्दल केवळ श्रद्धा आणि श्रद्धाच आहे, विश्वास आणि विश्वासच आहे की, सव्वाशे कोटी देशवासी हा संकल्प पूर्ण करतीलच आणि आपला देश, सोन्याप्रमाणे या आगीतून तावून सुलाखून निघेल त्याचं कारण आपण आहात, यशाचा हा मार्ग चालणं आपल्यामुळेच शक्य झालं आहे.

पूर्ण देशात केंद्र सरकार, राज्‍य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभाग, एक लाख तीस हजार बँक शाखा, लाखो बँक कर्मचारी, दीड लाखाहून जास्त पोस्ट कार्यालये, एक लाखापेक्षा जास्त बँक, मित्र, दिवसरात्र हे काम करत आहेत. समर्पणाच्या भावनेतून जोडले गेले आहेत. अनेक प्रकारचे तणाव असूनही हे सर्व अत्यंत शांत मनाने, या कामाला देशसेवेचा एक यज्ञ मानून एक महापरिवर्तनाचा प्रयत्न मानून कार्यरत आहेत. सकाळी सुरू करतात, रात्री केव्हा पूर्ण होईल? हे माहितही नसतं, पण सगळे करत आहेत आणि त्याचं कारण आहे की भारत यात यशस्वी होणार हे स्पष्ट दिसत आहे. मी बघितलं आहे की, इतक्या समस्या असूनही बँकेतले, पोस्ट ऑफिसमधले सर्व लोक काम करत आहेत आणि जेव्हा मानवतेचा विषय निघतो, तेव्हा ते दोन पावलं पुढे असल्याचं दिसतं. कुणीतरी मला सांगितलं की, खंडव्यात एका ज्येष्ठ नागरिकाला अपघात झाला. अचानक पैशाची गरज भासली. तिथल्या स्थानिक बँक कर्मचाऱ्याला हे कळलं आणि त्याने स्वत: त्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाऊन पैसे पोचवले जेणेकरून उपचारासाठी मदत होईल. हे मला समजलं आणि मला आनंद वाटला. अशा अनेक घटना रोज टीव्ही, वर्तमानपत्र, चर्चा यातून समोर येतात. या महायज्ञात परिश्रम करणाऱ्या, पुरुषार्थ सिद्ध करणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सामर्थ्याची ओळख तेव्हाच होते, जेव्हा कसोटीनंतर यश हाती येतं. मला चांगलं आठवतं, जेव्हा ‘पंतप्रधान जन-धन योजना’ सुरू झाली होती आणि बँक कर्मचाऱ्यांनी त्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता आणि जे काम 70 वर्षात झालं नव्हतं, त्यांनी करून दाखवलं होतं. आज पुन्हा एकदा ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे आणि मला विश्वास आहे की, सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प, सर्वांचा सामूहिक पुरुषार्थ, या राष्ट्राला एक नवीन ताकद देऊन प्रशस्त करेल. परंतु वाईट सवयी इतक्या पसरल्या आहेत की, आजही अनेकांची त्या वाईट सवयी जात नाहीत. अजूनही काही लोकांना वाटतं की, हे भ्रष्टाचाराचे पैसे, हे काळे धन, हे बेहिशोबी पैसे, बेनामी पैसे, काहींना काही रस्ता शोधून व्यवस्थेत पुन्हा आणू. ते आपले पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात अवैध मार्ग शोधत आहेत. दु:ख याचं आहे की यात त्यांनी गरिबांचा वापर करण्याचा मार्ग निवडला आहे. गरिबांना भ्रमीत करून मोह किंवा प्रलोभन दाखवून त्यांच्या खात्यात पैसे भरून किंवा त्यांच्याकडून काही काम करवून घेऊन, पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अशा लोकांना आज सांगू इच्छितो, सुधारणे किंवा न सुधारणे आपली मर्जी, कायद्याचं पालन करणं न करणं आपली मर्जी, ते कायदा बघेल काय करायचं? पण मेहेरबानी करून तुम्ही गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका. तुम्ही असं काहीही करू नका की, नोंदीत गरीबाचं नाव येईल आणि नंतर जेव्हा चौकशी होईल, तेव्हा माझा प्रिय गरीब नागरिक, तुमच्या पापामुळे अडचणीत सापडेल आणि बेनामी संपत्तीबदृदलचा कायदा अतिशय कडक झाला आहे, तो यात गोवला जाईल, किती कठीण परिस्थिती येईल? आणि सरकारला हे नको आहे की आपले देशवासी अडचणीत येतील.

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करून भ्रष्टाचार आणि काळे धन याविरुद्ध सुरू केलेल्या लढाईबद्दल मध्य प्रदेश येथील श्रीमान आशिष यांना दूरध्वनी केला या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणतात, ‘सर नमस्ते, माझं नाव आशिष पारे आहे. मी तिराली गाव, तालुका तिराली, जि. हदरा, मध्य प्रदेश इथला एक सामान्य नागरिक आहे. आपण पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्या, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. माझी इच्छा आहे की मन की बातमधून अशी अनेक उदाहरणे लोकांसमोर आणा की लोकांनी गैरसोय सोसूनही राष्ट्र उन्नतीसाठी या कठोर पावलाचं स्वागत केलं. त्यामुळे लेाक उत्साहवर्धित होतील आणि राष्ट्र निर्मितीसाठी कॅशलेस व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे आणि मी साऱ्या देशासमवेत आहे. आपण पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्या याचा मला फार आनंद झाला आहे.’ तसंच मला एक फोन कर्नाटकातून श्रीमान येलप्पा वेलांतर यांनी केला. मोदीजी नमस्ते, मी कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातून येलप्पा वेलांकर बोलतो आहे, मी आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आपण म्हणाला होतात की, चांगले दिवस येतील, पण आपण इतकं मोठं पाऊल उचलाल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पाचशे आणि हजारच्या नोटा, हे सर्व पाहून काळा पैसा आणि भ्रष्टाचारी लोकांना चांगलाच धडा मिळाला आहे. प्रत्येक भारतीयांसाठी याहून चांगले दिवस कधी येणार नाहीत. या कामासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो.

काही गोष्टी प्रसारमाध्यमांमधून, लोकांच्या माध्यमातून, सरकारी सूत्रांच्या माध्यमातून समजतात. तेव्हा काम करण्याचा उत्साहसुध्दा खूप वाढतो. इतका आनंद होतो, इतका अभिमान वाटतो की माझ्या देशातल्या सामान्य माणसाचं काय विलक्षण सामर्थ्य आहे.

महाराष्ट्रामध्ये अकोला इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच 6 आहे. तिथे एक रेस्टॉरंट आहे. त्यांनी एक मोठा फलक लावला आहे. जर तुमच्याकडे जुन्या नोटा आहेत आणि तुम्हाला खायचं आहे, तर तुम्ही पैशांची चिंता करू नका. इथून उपाशी जाऊ नका, खाऊनच जा आणि जर पुन्हा कधी इकडे येण्याची संधी मिळाली तर अवश्य पैसे देऊन जा. लोक तिथे जातात, खातात आणि 2-4-6 दिवसांनंतर जेव्हा पुन्हा तिथून जातात, तेव्हा पैसे देऊन जातात. ही आहे माझ्या देशाची ताकद, ज्यात सेवा-भाव, त्याग-भाव आहे आणि प्रामाणिकपणाही आहे.

निवडणुकीच्या वेळी मी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम राबवला होता आणि साऱ्या जगभर ही गोष्ट पोचली होती. जगातल्या अनेक देशांमधले लोक ‘चाय पे चर्चा’ हा शब्द बोलायला शिकले. पण मला हे माहित नव्हतं की, ‘चाय पे चर्चा’ मध्ये लग्न जुळवली जातात. गुजरातमध्ये सुरत इथे एका मुलीने तिच्या लग्नात आलेल्या लोकांना फक्त चहा पाजला. कोणताही समारंभ नाही की मेजवानी नाही. काहीही नाही. कारण नोटाबंदीमुळे पैशाचा प्रश्न निर्माण झाला होता. वऱ्हाडी मंडळी त्यालाच आपला मान समजली. सुरतचे भरत मारू आणि दक्ष परमान, भ्रष्टाचाराविरुद्ध काळ्या धनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत त्यांच्या लग्नाच्या माध्यमातून योगदान दिलं. हे प्रेरणादायक आहे. नवपरिणीत भरत आणि दक्षा यांना मी अनेक आशीर्वाद देतो आणि लग्नाच्या या सोहळ्याचं रुपांतर या महान यज्ञात केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि जेव्हा अशी संकटं येतात, तेव्हा लोक नवे, सुंदर मार्ग शोधून काढतात.

मी एकदा टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये बघितलं, रात्री उशिरा आलो तेव्हा बघत होतो. आसाममध्ये धेकीयाजुली या नावाचं एक छोटं गाव आहे. चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार तिथे राहतात. त्यांना आठवड्यातून एकदा मजुरी मिळते. आता जेव्हा 2000 रुपयांची नोट मिळाली, तेव्हा त्यांनी काय केलं? आजूबाजूच्या, शेजारच्या चार महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बाजारात जाऊन एकत्र खरेदी केली आणि 2000 रुपयांची नोट वापरुन पैसे दिले. त्यांना लहान रकमेची गरजच भासली नाही. कारण चौघींनी मिळून खरेदी केली आणि ठरवलं की पुढच्या आठवड्यात भेटू, तेव्हा एकत्र बसून हिशोब करू, लोक आपआपल्या पद्धतीने मार्ग काढत आहेत. त्यातून झालेला बदलसुध्दा बघा, आसामच्या चहामळ्यातले लोक तिथे एटीएम यंत्र बसवण्याची मागणी करत आहेत. पहा, खेड्यातल्या जीवनातसुद्धा कसे बदल घडून येत आहेत. या मोहिमेचा काही लोकांना लगेच फायदा झाला. देशाला तर येणाऱ्या दिवसात फायदा मिळेल, पण काही जणांना तात्काळ लाभ मिळाला. थोडा हिशोब विचारला. काय झालंय, तेव्हा मला छोट्या छोट्या शहरातली माहिती मिळाली. जवळपास 40-50 शहरांमधून अशी माहिती मिळाली की, या नोटा बंद केल्यामुळे त्यांचं जे जुनं येणं बाकीहोतं, लोक पैसे देत नव्हते. कराचे, पाणीपट्टीचे, विजेचे बिलाचे पैसे भरतच नव्हते आणि आपल्याला तर चांगलं माहिती आहे की, गरीब माणसं दोन दिवस आधीच जाऊन पै न पैसे फेडतात. हे जे मोठे लोक असतात ना, ज्यांच्या ओळखी असतात, ज्‍यांना माहिती असतं की त्यांना कुणीच कधी विचारणार नाही, ते पैसे देत नाहीत आणि त्यामुळे खूप थकबाकी राहते. प्रत्येक नगरपालिकेला कराच्या पैशातले जेमतेम 50 टक्के जमा होतात. पण यावेळी 8 तारखेच्या निर्णयामुळे सगळेजण त्यांच्या जुन्या नोटा जमा करायला धावत सुटले. मागच्या वर्षी 47 नागरी विभागात जवळपास तीन-साडेतीन हजार कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल, या एका आठवड्यात त्यांच्याकडे 13 हजार कोटी रुपये जमा झालेत. कुठे तीन-साडेतीन हजार आणि कुठे 13 हजार. तेही समोरून येऊन. आता त्या नगरपालिकांकडे जवळपास चौपट पैसा जमा झाला आहे. आता गरीब वस्त्यांमध्ये गटार बांधल्या जातील, पाण्याची व्यवस्था केली जाईल, अंगणवाडीची सोय होईल, अशी अनेक उदाहरणे सापडत आहेत ज्यात थेट फायदा दिसू लागला आहे.

बंधु आणि भगिनींनो, आपलं गाव, आपला शेतकरी हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक मजबूत आधारस्तंभ आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेतील या नव्या बदलामुळे कठीण परिस्थिती आहे. प्रत्येक नागरिक, स्वत:ला जुळवून घेत आहे. पण माझ्या देशातल्या शेतकऱ्याचं मी आज विशेष अभिनंदन करतो. या हंगामातल्या पीक उत्पादनाची मी नुकतीच आकडेवारी घेत होतो. मला आनंद झाला, गहू असो, डाळी असोत, तेलबिया असोत, नोव्हेंबरच्या 20 तारखेपर्यंतचा माझा हिशोब होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पीक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. अडचणी येऊनही शेतकऱ्यांनी मार्ग शोधला आहे. सरकारनेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात शेतकरी आणि गावांना प्राधान्य दिलं गेलं आहे. तरीही अडचणी आहेतच. पण मला खात्री आहे की, जो शेतकरी आपल्या प्रत्येक समस्येचा नैसर्गिक समस्येला सामोरे जाऊन कठीण प्रसंगाशी नेहमी कसून सामना करतो यावेळीही तो पाय रोवून उभा आहे. आमच्या देशातील छोटे व्यापारी रोजगार पाठवतात तसेच आर्थिकस्थिती वाढविण्यासाठी मदत करतात. मागच्या अर्थसंकल्पात आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मोठमोठ्या मॉलप्रमाणेच आता गावातील छोटे छोटे दुकानदारसुद्धा 24 तास आपला व्यवसाय करू शकतील. कोणताही कायदा त्यांना अडवणार नाही, माझं मत असं होतं की, मोठमोठ्या मॉलना 24 तास मिळतात, मग गावातल्या गरिबांना का नको? मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला गेला. लाखो करोडो रुपये मुद्रा योजनेतून अशा छोट्या छोट्या लोकांना दिले. कारण हा छोटा व्यवसाय करणारे करोंडोंच्या संख्येत आहेत. आणि अब्जावधी रुपयांच्या व्यापाराला ते गती देतात. पण या निर्णयामुळे त्यांनाही समस्या येणे स्वाभाविक होतं. मी बघितलं आहे की, आपले छोटे छोटे व्यापारी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डसच्या माध्यमातून आपआपल्या पध्दतीने ग्राहकांची सेवा करत आहेत. विश्वासाच्या आधारावर करत आहेत. मी आपल्या छोट्या बंधु-भगिनींना सांगू इच्छितो की, संधी आहे आपणही डिजिटल जगात प्रवेश करा. आपणही आपल्या मोबाईल फोनवर बँकांची ॲप डाऊनलोड करा, आपणही क्रेडिट कार्डसाठी पीओएस मशीन ठेवा. नोटा न वापरता व्यापार कसा होऊ शकतो हे आपण शिकून घ्या. आपण बघा, मोठमोठे मॉल, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपला व्यापार वाढवतात, एक छोटा व्यापारीसुध्दा या साधारण ‘युजर फ्रेंडली टेक्नॉलॉजी’मुळे आपला व्यापार वाढवू शकतो. काही बिघडेल अशी शक्यताच नाही. वाढवण्याची संधी आहे. मी आपल्याला आमंत्रण देतो की, कॅशलेस सोसायटी अर्थात रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण फार मोठं योगदान देऊ शकता. आपण आपला व्यापार वाढवण्यासाठी मोबाईल फोनवर पूर्ण बँकिंग व्यवस्था उभी करू शकता आणि आज नोटांव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत. ज्यातून आपण व्यवसाय चालवू शकतो. तंत्रज्ञानाचे रस्ते आहेत, सुरक्षित आहेत, भरवशाचे आहेत आणि जलद आहेत. माझी अशी इच्छा आहे की, हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपण मला मदत करावी. इतकंच नाही तर बदलाचं नेतृत्वही आपण करावं. मला खात्री आहे आपण या बदलाचं नेतृत्व करू शकाल. आपण गावाचा संपूर्ण कारभार या तंत्रज्ञानाच्या आधाराने करू शकता. मला विश्वास आहे, मी श्रमिक, कष्टकरी बंधु-भगिनींना सुध्दा सांगू इच्छितो की, आपलं फार शोषण झालं आहे. कागदावर पगाराचा आकडा एक असतो आणि हातात मिळणारी रक्कम दुसरी असते. कधी हातात पूर्ण पगार मिळतो परंतु बाहेर कुणीतरी उभा असतो. त्याला हिस्सा द्यावा लागतो. या शोषणाचा नाईलाजाने आपण एक भाग बनतो. या नव्या व्यवस्थेत आमची इच्छा आहे की, बँकेत आपलं खातं असावं, पगाराचे पैसे बँकेत जमा व्हावेत. किमान ज्यामुळे वेतन तरतुदींचं पालन केलं जाईल. आपल्याला पूर्ण पैसे मिळतील. कुणी त्यातला हिस्सा मागणार नाही, शोषण होणार नाही. एकदा का आपल्या खात्यात पैसे आले की आपण आपल्या छोट्या मोबाईल फोनचा त्यासाठी स्मार्ट फोनची गरज नाही. आपण ई पाकिटासारखा वापर करू शकता. त्याच मोबाईलचा उपयोग करून आपण जवळपासच्या छोट्यामोठ्या दुकानांतून खरेदी करू शकाल. म्हणून कष्टकरी बंधु-भगिनींना मी या योजनेत सहभागी होण्यासाठी विशेष आग्रह करेन. कारण अंतिमत: इतका मोठा निर्णय मी देशातल्या गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वंचितांसाठी घेतला आहे त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे.

भारत असा देश आहे जिथे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाच्या आतली आहे. मला माहिती आहे, माझा निर्णय तुम्हाला पटला असून या गोष्टीला सकारात्मकतेने पुढे नेण्यासाठी योगदान देत आहात. पण मित्रहो, आपण माझे सच्चे सैनिक, सवंगडी आहात. भारत मातेची सेवा करण्याची एक विलक्षण संधी आपल्यासमोर आहे. देशाला आर्थिक शिखरावर नेण्याची संधी आली आहे. माझ्या तरुण मित्रांनो तुम्ही मला मदत कराल का? मला साथ द्याल का? आपल्याला जितका अनुभव आहे तितक्या जुन्या पिढीला या जगाचा नाही. ॲप काय असतं हे आधीच्या पिढीला माहिती नाही, हे आपण जाणता. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन तिकिट बुकिंग या कशा होतात हे आपण जाणता. त्यात विशेष काही नाही. परंतु आज देश जे महान कार्य करू इच्छितो, जे आपलं स्वप्न आहे, कॅशलेस सोसायटी, हे खरं आहे की, 100 टक्के आपण यशस्वी होणार नाही पण सुरुवातच केली नाही असं नको. आपण जर कॅशलेस सोसायटीचा आरंभ केला तर ध्येय दूर नाही. मला यात आपला प्रत्यक्ष सहभाग हवा आहे. स्वत:चा वेळ हवा आहे, स्वत:चा संकल्प हवा आहे. माझी खात्री आहे की, हिंदुस्थानातच्या गरिबांचं जीवन बदलावं अशी इच्छा असणारे आपण आपोआप कॅशलेस सोसायटीसाठी, बँकिंगसाठी आणि मोबाईल बँकिंगसाठी पुढे आलेल्या या संधीचा फायदा घ्याल. प्रत्येक बँकेचा आपला मोबाईल ॲप आहे. वॉलेट आहे. वॉलेट म्हणजे ई पाकिट. अनेक प्रकारचे कार्डस उपलब्ध आहेत. जन-धन योजनेअंतर्गत भारतातील कोटीकोटी गरीब कुटुंबांकडे रुपे कार्ड आहे. ज्या रुपे कार्डचा फारच कमी उपयोग होत आहे. परंतु 8 तारखेनंतर गरिबांनीही रुपे कार्ड वापरायला सुरुवात केली असून त्याचा वापर जवळजवळ 300 टक्क्यांनी वाढला आहे. ज्याप्रमाणे मोबाईल फोनसाठी प्रिपेड कार्ड मिळतं तसेच बँक खात्यातील पैसे खर्च करण्यासाठी प्रिपेड कार्ड मिळतं. हे काम इतकं सोपं आहे की, ज्याप्रमाणे आपण व्हॉटसॲप पाठवतो तसंच. अगदी अशिक्षित माणसाला सुध्दा व्हॉटसॲप कसं फॉरवर्ड करायचं हे माहीत आहे. एवढंच नाही तर तंत्रज्ञान इतकं सोपं होत आहे की या कामासाठी स्मार्ट फोनची सुध्दा गरज नाही. धोबी असो, भाजी विकणारा असो, दूध विकणारा असो, किंवा वर्तमान पत्र किंवा चहा विकणारा असो. सर्वजण याचा वापर करू शकतात. मी सुध्दा या व्यवस्थेला अधिक सोपं करण्यासाठी जोर लावला आहे. सर्व बँका यावर काम करत आहेत. आणि आतातर ऑनलाईन अधिभार सुध्दा रद्द केला आहे. अशा प्रकारची कार्ड वापरताना जो अधिभार लागायचा तोसुध्दा काढून टाकल्याचं गेल्या दोन-चार दिवसातल्या वर्तमान पत्रात आपण वाचलं असेल. त्यामुळे कॅशलेस सोसायटीच्या चळवळीला गती मिळेल. व्हॉटसवरील मॅसेज, किस्से, नव्या नव्या कल्पना, कविता, घोषवाक्य हे सर्व मी वाचत असतो, बघत असतो. आव्हानांचा सामना करतांना आपल्या तरुण पिढीकडे जी नवनिर्मितीची शक्ती आहे त्यावरुन असं वाटतं की, भारतभूमीचं हे वैशिष्ट्य आहे. कोणा एकेकाळी युद्धाच्या मैदानात गीतेचा जन्म झाला. त्याचप्रमाणे आज मोठ्या परिवर्तनाच्या एका कालखंडातून आपण जात आहोत. त्याचवेळी आपल्यातील मौलिक सर्जनशीलता प्रगट होत आहे. ऑनलाईन खर्च करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असेल. एवढंच नाही तर दररोज अर्धा तास, दोन तास वेळ काढून कमीत कमी दहा कुटुंबांना आपण हे सांगा की, तंत्रज्ञान काय आहे, तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो? आपल्या बँकेचं ॲप कसं डाऊनलोड करता येतं? स्वत:च्या खात्यातील शिल्लक पैसे कसे वापरता येतात? दुकानदाराला पैसे कसे देता येतील? दुकानदारालाही शिकवा की हे वापरून व्यापार कसा करता येतो? आपल्याला स्वच्छेने ही कॅशलेस सोसायटी नोटांच्या जंजाळातून बाहेर काढण्याचं महाअभियान देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं अभियान, काळा पैशातून मुक्त करण्याचं अभियान, लोकांना अडचणींपासून, समस्यांपासून मुक्ती देण्याचं अभियान याचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे. सामान्य नागरिकांना ही व्यवस्था शिकवाल तर कदाचित त्याला कार्य चिंतपासून मुक्ती मिळेल आणि या कामात हिंदुस्थानातल्या साऱ्या युवकांनी स्वत:ला झोकवून दिलं तर फार वेळ लागणार नाही, असं मला वाटतं. एका महिन्याच्या आत आपण जगात आधुनिक हिंदुस्थान म्हणून उभे राहू शकू. आणि आपण हे काम मोबाईल फोनच्या माध्यमातून करू शकता. रोज दहा घरी जाऊन करू शकता. रोज दहा घरांना यात सहभागी करू शकता. आपल्या मी निमंत्रण देतो, या, केवळ समर्थन देऊन थांबू नका, परिवर्तनाचे आपण सेनानी होऊ आणि परिवर्तन घडवून दाखवू. देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी ही लढाई आपण पुढे नेऊया. आणि जगात असे अनेक देश आहेत जिथे तिथल्या नव युवकांनी राष्ट्राचं जीवन बदलून दाखवलं आहे. क्रांती होते ती तरुणांकडूनच. केनिया या देशानं निरधार केला एम-पेसा ही एक मोबाईल व्यवस्था उभी केली. तंत्रज्ञानाचा वापर केला, एम-पेसा हे नाव दिलं. आणि आता आफ्रिकेच्या सर्व भागात केनियातील व्यवहार परिवर्तीत होण्याच्या तयारीत आहेत. एक मोठी क्रांती घडवून आणली आहे या देशानं.

माझ्या युवकांनो, मी पुन्हा आग्रह करतो की, हे अभियान पुढे न्या. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, एनसीसी, एनएसएस, सामूहिक रुपाने, व्यक्तिगत रुपाने हे काम करण्यासाठी मी आपल्याला निमंत्रण देतो.
प्रिय बंधू-भगिनींनो,

आपल्या देशाचे महान कवी श्रीमान हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती आहे. आणि आज हरिवंशराय यांच्या जयंतीदिनी अमिताभ बच्चन यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली आहे. या शतकातील सर्वात लोकप्रिय कलाकार अमिताभजी स्वच्छता मोहिमेला मन लावून पुढे नेत आहेत. असं वाटतंय की, स्वच्छता त्यांच्या नसानसात भिनली आहे. आणि म्हणूनच आपल्या वडिलांच्या जयंती दिनी त्यांना स्वच्छतेचं काम आठवलं. ते लिहितात हरिवंशरायजींची एक कविता, त्यातील एक ओळ,

मिट्टी का तन, मस्ती का मन

क्षणभर जीवन, मेरा परिचय – हरिवंशराय

हरिवंशराय या माध्यमातून आपली स्वत:ची ओळख देत असतात. अमिताभजींनी स्वत: हरिवंशरायजींच्या मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय या ओळींचा वापर करत मला एक छान पत्र लिहून पाठवलं. मी हरिवंशरायजींना आदरपूर्वक नमन करतो आणि अशा प्रकारे मन की बातमध्ये सहभागी झाल्याबद्दल स्वच्छता अभियान पुढे नेण्यासाठी श्रीमान अमिताभजींना धन्यवाद देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आता तर मन की बातच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या भावना, पत्रांमधून, माय गव्ह वर, नरेंद्र मोदी ॲपवर मी आपल्याशी कायमचा जोडला गेलो आहे. 11 वाजता ‘मन की बात कार्यक्रम प्रसारित होतो पण प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद लगेचच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे जिथे हिंदी भाषा प्रचलित नाही तिथल्याही देशवासियांना यात सहभागी होण्याची संधी आवश्यक मिळेल. या नवीन उपक्रमाबद्दल मी आकाशवाणीला धन्यवाद देतो. आपण सर्वांना अनेक अनेक धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government