In the last 8 years, we have made our democracy strong and resilient: PM Modi
Japan is an important partner in building infrastructure & manufacturing capacity in India: PM Modi
India is optimistic about a tech-led, science-led, innovation-led and talent-led future: PM Modi

भारत माता की जय, भारत माता की जय, जेव्हा जेव्हा मी जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी मी पाहतो की तुमचा स्नेह वर्षाव दरवेळी वाढतच असतो. तुमच्यापैकी अनेकजण असे आहेत जे अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत.  जपानची भाषा, इथली  वेशभूषा, संस्कृती , खाणे-पिणे एक प्रकारे तुमच्या आयुष्याचा भाग बनले आहे.आणि तो भाग बनण्याचे  एक कारण हे देखील आहे की  भारतीय समुदायाचे संस्कार समावेशक आहेत. मात्र त्याचबरोबर जपानमध्ये आपली  परंपरा, आपली  मूल्य, आपले  आयुष्य, आपल्या भूमीप्रति जी बांधिलकी आहे ती  खूप खोलवर रुजलेली आहे. आणि या दोन्हीचा संगम झाला आहे. म्हणूनच स्वाभाविकपणे एक आपलेपणा जाणवणे अगदी नैसर्गिक आहे.

मित्रांनो ,

तुम्ही इथे राहत आहात, अनेकजण इथे स्थायिक झाले आहेत. मला माहित आहे, अनेकांनी इथेच लग्न देखील केले आहे.  आणि ते योग्यही आहे, कित्येक वर्षे इथे राहिल्यानंतर देखील भारताप्रति तुमची श्रद्धा , भारताबद्दल चांगले वृत्त ऐकल्यानंतर तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. होते ना असे? आणि कधी एखादी वाईट बातमी आली तर सर्वात जास्त दुःख देखील तुम्हालाच होते. हे आपल्या लोकांचे वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या कर्मभूमीशी तनामनाने जोडले जातो, अथक परिश्रम करतो, मात्र मातृभूमीप्रति जे प्रेम आहे ते कधी कमी होऊ देत नाही, आणि हेच आपले सर्वात मोठे  सामर्थ्य आहे.

मित्रांनो ,

स्वामी विवेकानंद जेव्हा आपल्या  ऐतिहासिक भाषणासाठी शिकागोला जात होते तेव्हा ते आधी जपानला आले होते, आणि जपानने त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पाडला.जपानी लोकांची  देशभक्ति, जपानी लोकांचा आत्मविश्वास, इथली शिस्त ,  स्वच्छता प्रति जपानी लोकांची जागरुकता, याची विवेकानंद मोकळेपणाने  प्रशंसा करायचे.  गुरुदेव रवींद्रनाथ जी टैगोर देखील म्हणायचे की जपान  एक असा  देश आहे जो  प्राचीनही आहे आणि  आधुनिक देखील आहे. टागोर म्हणाले होते , “Japan has come out of the immemorial east like a lotus blossoming in easy grace, all the while keeping its firm hold upon the profound depth for which it has sprung”. म्हणजे त्यांना म्हणायचे होते की कमळाच्या फुलाप्रमाणे जपान जितक्या मजबुतीने आपल्या मुळांना घट्ट धरून आहे, तेवढ्याच भव्यतेने ते सर्वत्र सुंदरता देखील पसरवत आहे. आपल्या  या महापुरुषांच्या या पवित्र भावना जपानबरोबरचे आपले दृढ संबंध स्पष्ट करतात.

मित्रांनो ,

यावेळी मी जपान दौऱ्यावर  असताना , आपल्या राजनैतिक  संबंधांना  सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत . सात  दशके. मित्रांनो, तुम्हालाही इथे राहताना अनुभव आला असेल. भारतात देखील प्रत्येकजण अनुभवत आहे की  भारत आणि जपान नैसर्गिक भागीदार आहेत. भारताच्या  विकास यात्रेत जपानची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जपानशी आपले संबंध जिव्हाळ्याचे आहे, अध्यात्मिक आहेत, जपानबरोबर आपले नाते सहयोगाचे आहे,  आपुलकीचे आहे. आणि म्हणूनच एक प्रकारे हे संबंध आपल्या सामर्थ्याचे आहेत, आपल्या सन्मानाचे आहेतआणि हे संबंध जगासाठी सामायिक संकल्पाचे देखील आहेत. जपानबरोबर आपले नाते बुद्धाचे आहे, ज्ञानाचे आहे. आपले  महाकाल आहेत तर जपानमध्ये  daikokuten आहे. आपले  ब्रह्मा आहेत, तर जपानमध्ये bonten आहे, आपली माता सरस्वती आहे तर जपानमध्ये  benzaiten आहे. आपली  महादेवी लक्ष्मी आहे तर जपानमध्ये  kichijoten आहे. आपले  गणेश आहेत तर जपानमध्ये   kangiten आहे. जपानमध्ये  जैन परंपरा आहे तर आपण ध्यानधारणेला आत्म्याशी तादात्म्य पावण्याचे माध्यम मानतो.

21 व्या शतकातही  भारत आणि जपान दरम्यानचे हे  सांस्कृतिक संबंध आपण पूर्ण वचनबद्धतेसह  पुढे नेत आहोत, आणि मी तर काशीचा खासदार आहे आणि मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो की  जपानचे माजी पंतप्रधान  शिया पी जेव्हा काशीला आले होते , तेव्हा त्यांनी काशीला एक सुंदर भेट दिली. काशीमध्ये जपानच्या सहकार्याने  उभारण्यात आलेले  रुद्राक्ष आणि जी माझीही कधी  कर्मभूमी होती त्या अहमदाबादमधील  जैन गार्डन,आणि कायझेन अकादमी या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला किती जवळ आणतात .  इथे तुम्ही सर्व जपानमध्ये राहून हे ऐतिहासिक बंध आणखी  मजबूत बनवत आहात, आणि सशक्त करत आहात.

मित्रांनो ,

आज जगाला भगवान बुद्ध यांच्या विचारांनी , त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे.हाच मार्ग आहे जो आज जगातील कुठलेही आव्हान , मग तो हिंसाचार असो,  अराजकता असो, दहशतवाद असो किंवा हवामान बदल असो, या सर्वांपासून मानवतेला वाचवण्याचा हाच मार्ग आहे.   भारत सौभाग्यशाली आहे कारण त्याला भगवान बुद्धाचा साक्षात  आर्शीवाद मिळाला आहे. त्यांचे  विचार आत्मसात करत  भारत निरंतर मानवतेची सेवा करत आहे. आव्हाने कुठल्याही प्रकारची असो, कितीही मोठी असो, त्यावर उपाय भारत शोधूनच काढतो.  कोरोनामुळे जगासमोर जे गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठे संकट उभे ठाकले, ते आपल्यासमोर आहे आणि जेव्हा ते सुरु झाले होते तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे.  सुरुवातीला तर असे वाटत होते कि तिथे आला आहे , इथे काय होईल. कुणालाही माहित नव्हते त्याला सामोरे कसे जायचे? आणि लस देखील नव्हती.  आणि या गोष्टीची कल्पनाही नव्हती की लस केव्हा बनणार . लस येईल की नाही इथपर्यंत शंका वाटत होती.  सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील भारताने जगभरातील अनेक देशांमध्ये औषधे पाठवली. जेव्हा लस उपलब्ध झाली तेव्हा भारताने भारतात निर्मित लस आपल्या कोट्यवधी नागरिकांनाही दिली आणि जगातील शंभरहून अधिक देशांनाही पाठवली.

 

 

मित्रांनो ,

आपल्या आरोग्यसेवा अधिक दर्जेदार बनवण्यासाठी भारत अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे .  दुर-सुदूर भागातही आरोग्य सुविधा पोहचाव्यात यासाठी देशात लाखो नवीन निरामयता केंद्रे उभारली जात आहेत. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल, कदाचित आज तुम्ही ऐकलेही असेल, जागतिक आरोग्य संघटनेने  (WHO) भारताच्या आशा वर्कर्सना , आशा कार्यकर्त्याना  जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या  ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्काराने  सम्मानित केले आहे. भारताच्या लाखो आशा कार्यकर्त्या प्रसूती सेवेपासून लसीकरणापर्यंत ,  पोषण पासून स्वच्छतेपर्यंत  देशातील गावांमध्ये आरोग्य  अभियानाला गति देत आहे.  मी आज जपानच्या भूमीवरून आपल्या सर्व आशा कार्यकर्त्यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.  त्यांना सलाम करतो.

मित्रांनो ,

भारत आज कशा प्रकारे जागतिक आव्हानांचा सामना करण्यात मदत करत आहे.  याचे आणखी एक उदाहरण पर्यावरणाचे देखील आहे.  आज हवामान बदल हे जगासमोर एक महत्वपूर्ण संकट बनले आहे. आपण भारतात हे आव्हान पाहिले देखील आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी मार्ग शोधण्याच्या दिशेने आपण पुढे मार्गक्रमणही केले.  भारताने 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाप्रति वचनबद्धता व्यक्त केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या जागतिक उपक्रमाचे देखील  नेतृत्व केले आहे. हवामान बदलामुळे जगावर नैसर्गिक आपत्तीचा धोका देखील वाढला आहे. या आपत्तीचे  धोके , त्यांच्या प्रदूषणच्या दुष्परिणामांना जपानच्या लोकांशिवाय कोण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. नैसर्गिक आपत्तीमुळे  जपानची लढण्याची क्षमता वाढली आहे.  ज्याप्रकारे जपानच्या लोकांनी या आव्हानांचा सामना केला आहे. प्रत्येक समस्येतून काही ना काही धडा घेतला आहे.  त्यावर उपाय शोधले आहेत आणि व्यवस्था देखील  विकसित केली आहे. व्यक्तींवर देखील तशाच प्रकारचे  संस्कार केले आहेत. हे प्रशंसनीय आहे. या दिशेने भारतानेही CDRI (आपत्ती रोधक पायाभूत विकास आघाडी ) चे नेतृत्व केले आहे.

मित्रांनो,

भारत आज हरित भविष्य, हरित रोजगार करिअर रुपरेषेवर वेगाने काम करत आहे. भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला व्यापक प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रीन हायड्रोजनला हायड्रोकार्बनचा पर्याय बनवण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. जैव-इंधनाशी संबंधित संशोधन आणि पायाभूत सुविधा निर्मितीवर खूप मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. भारताने या दशकाच्या अखेरपर्यंत आपल्या एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेच्या 50 टक्के बिगर-जीवाष्म इंधनाद्वारे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

मित्रांनो,

समस्या सोडवण्याबाबत भारतीयांमध्ये हा जो आत्मविश्वास आहे, तो  आत्मविश्वास आज प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक दिशेत, प्रत्येक पावलावर दिसून येतो.गेल्या दोन वर्षांत जागतिक  पुरवठा साखळीचे  ज्या प्रकारे नुकसान झाले आहे. संपूर्ण पुरवठा साखळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. आज संपूर्ण जगासाठी ते एक मोठे संकट बनले आहे. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपण  आत्मनिर्भरतेचा  संकल्प घेऊन पुढे जात आहोत आणि आपला  आत्मनिर्भरतेचा  संकल्प केवळ भारतापुरताच मर्यादित नाही.स्थिर, विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळीसाठी ही एक मोठी गुंतवणूक आहे.आज संपूर्ण जगाला हे जाणवत आहे की भारत ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात काम करू शकतो ते  अभूतपूर्व आहे.आपली  ही क्षमता निर्माण करण्यासाठी  जपान हा महत्त्वाचा भागीदार आहे याचा मला आनंद आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे असो, दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका  असो, समर्पित मालवाहतूक मार्गिका  असो, ही भारत-जपान सहकार्याची उत्तम उदाहरणे आहेत.

मित्रांनो,

भारतात होत असलेल्या बदलांमध्ये आणखी एक खास गोष्ट आहे. आम्ही भारतात बळकट  आणि लवचिक, जबाबदार लोकशाहीची ओळख निर्माण केली आहे.गेल्या आठ वर्षांत आम्ही याला  लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे माध्यम बनवले आहे.आपण याचा एक भाग आहोत याचा  ज्यांना  कधीच अभिमानाने अनुभव घेता येत नव्हता, ते लोकही भारताच्या लोकशाही प्रक्रियेशी जोडले जात आहेत.प्रत्येक वेळी, प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मतदान होत आहे आणि त्यातही इथे ज्या आपल्या माता-भगिनी आहेत त्यांना या गोष्टीचा  थोडा आनंद होईल. जर तुम्ही भारतीय निवडणुकांचा तपशीलवार विचार केला तर तुमच्या लक्षात आले असेल की पुरुषांपेक्षा महिला जास्त मतदान करत आहेत. भारतातील लोकशाही सामान्य नागरिकांच्या हक्कांबाबत किती जागरूक आहे, किती समर्पित आहे आणि प्रत्येक नागरिकाला किती सामर्थ्यशाली  बनवते  हा याचा पुरावा आहे.

मित्रांनो,

मुलभूत सुविधांसोबतच भारताच्या आकांक्षेलाही आपण नवी उंची देत आहोत, एक नवा आकार  देत आहोत.भारतात, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सर्वसमावेशक,गळतीरोधक प्रशासनाची म्हणजेच अशी वितरण व्यवस्था,  अशी  एक यंत्रणा विकसित केली जात आहे; जेणेकरुन  जो ज्या गोष्टीसाठी पात्र आहे त्या  त्याला कोणत्याही त्रासाशिवाय, कोणत्याही शिफारशीशिवाय, कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय त्याचा हक्क मिळू शकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी यासाठी कार्यरत आहोत.  तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे थेट लाभ हस्तांतरणाच्या या व्यवस्थेने  कोरोनाच्या या कठीण काळात गेल्या दोन वर्षांत   भारताच्या आणि विशेषतः भारतातील दुर्गम गावांमध्ये  राहणाऱ्या, जंगलात राहणाऱ्या  आपल्या नागरिकांच्या हक्कांचे मोठे संरक्षण केले आहे.  त्यांना मदत केली आहे.

मित्रांनो,

या कठीण परिस्थितीतही भारताची बँकिंग व्यवस्था अखंडपणे चालू आहे आणि याचे एक कारण म्हणजे भारतात आलेली डिजिटल क्रांती.डिजिटल नेटवर्कने जे सामर्थ्य निर्माण केले आहे, त्याचेच हे फलित मिळत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हे जाणून आनंद होईल की संपूर्ण जगात जे डिजिटल व्यवहार होतात  कॅशलेस , इथे जपानमध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाची चांगली ओळख आहे. पण हे ऐकून आनंद, आश्चर्य आणि अभिमान वाटेल की, संपूर्ण जगात जे डिजिटल व्यवहार होतात त्यापैकी 40 टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात.कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये  जेव्हा सर्व काही बंद होते, त्या संकटाच्या काळातही, भारत सरकार एका बटणाच्या क्लिकच्या मदतीने एकाच वेळी कोट्यवधी भारतीयांपर्यंत त्यांना हवी असलेली मदत सहज पोहोचवू शकत होते. आणि ज्याला ती  मदत द्यायची  होती, त्याला ती मिळाली, वेळेवर मिळाली आणि या संकटाला सामोरे जाण्याचे बळही मिळाले.भारतात आज खर्‍या अर्थाने लोकाभिमुख प्रशासन कार्यरत आहे.प्रशासनाचे  हे मॉडेल वितरण कार्यक्षम बनवत आहे. लोकशाहीवरील सतत वाढत चाललेल्या विश्वासाचे हे सर्वात मोठे कारण आहे.

मित्रांनो,

आज जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75  वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यामुळे येत्या 25 वर्षांत  म्हणजेच स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत  भारताला कुठे घेऊन जायचे आहे.कोणती उंची गाठायची आहे.? जगात आपला झेंडा  कुठे आणि कसा रोवायचा आहे, आज भारत तो मार्गदर्शक आराखडा  तयार करण्यात व्यस्त आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याचा हा अमृत काळ   भारताच्या समृद्धीचा संपन्नतेचा बुलंद इतिहास लिहिणार आहे मित्रांनो. मला  माहीत आहे की, हे जे संकल्प आम्ही हाती घेतले आहेत ते संकल्प  खूप मोठे आहेत.पण मित्रांनो, माझे ज्याप्रकारे पालनपोषण झाले आहे , मला जे संस्कार मिळाले आहेत , ज्या ज्या लोकांनी मला घडवले आहे , यामुळे  मलाही  सवय झाली आहे.मला लोण्यावर रेघ मारायला  आवडत नाही, मी दगडावर रेघ मारतो. पण मित्रांनो, प्रश्न मोदीचा नाही.आज भारतातील 130 कोटी लोक आणि मी जपानमध्ये बसलेल्या लोकांच्या डोळ्यात तेच पाहतो आहे,आत्मविश्वास  130 कोटी देशवासीयांचा आत्मविश्वास, 130 कोटी संकल्प, 130 कोटी स्वप्ने आणि ही 130 कोटी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही अफाट शक्ती परिणाम निश्चितपणे देईल. मित्रांनो, आपल्या स्वप्नातील  भारत आपण पाहणारच आहोत. आज भारत आपल्या सभ्यतेचा  , संस्कृतीचा  , संस्थांचा   गमावलेला विश्वास परत मिळवत आहे.आज जगभरातील कोणताही भारतीय भारताबद्दल मोठ्या अभिमानाने, डोळ्याला डोळे भिडवून   बोलतो. हा बदल झाला  आहे.आज इथे येण्याआधी, मला भारताच्या महानतेने प्रभावित  होऊन  आयुष्य व्यतीत करणाऱ्या काही लोकांना भेटण्याची  संधी मिळाली. आणि मोठ्या अभिमानाने ते योगाभ्यासाच्या  गोष्टी सांगत होते. ते योगाभ्यासाला  समर्पित आहेत. जपानमध्ये क्वचितच असा कोणी असेल ज्याला योगाभ्यासाची  कल्पना नसेल.आपला आयुर्वेद, आपली पारंपरिक चिकित्सा  पद्धती, आजकाल तर आपल्या  मसाल्यांची मागणी सर्वत्र वाढत आहे.लोक आपली  हळद मागवत आहेत. इतकेच  नाही  मित्रांनो आपली खादी, नाहीतर स्वातंत्र्यानंतर हळूहळू ती  नेत्यांचा  पोशाख म्हणूनच  उरली होती .आज तिचे पुनरुज्जीवन झाले आहे. खादी जागतिक होत आहे. हे भारताचे बदलते चित्र आहे मित्रांनो.आजच्या भारताला त्याच्या भूतकाळाचा जितका अभिमान आहे, तितकाच तो तंत्रज्ञानाच्या आधारे , विज्ञानाच्या आधारे , नवनिर्मितीच्या आधारे , प्रतिभेच्या  आधारे भविष्याबद्दलही  आशावादी आहे.जपानने प्रभावित होऊन  स्वामी विवेकानंदांनी एकदा सांगितले होते की आपल्या भारतीय तरुणांनी आयुष्यात एकदा तरी जपानला भेट दिली पाहिजे.ही वाक्ये वाचून तुम्ही लोक आला असाल   यावर माझा विश्वास नाही.पण विवेकानंदांनी भारतवासीयांना सांगितले होते की बंधूंनो , एकदा बघून तर या  जपान कसा आहे?

मित्रांनो,

विवेकानंदांनी त्या काळात जे सांगितले होते, आजच्या युगानुरुप तीच सद्भावना पुढे नेत मी सांगू इच्छितो की, जपानमधील प्रत्येक तरुणाने आयुष्यात एकदा तरी भारताला भेट दिली पाहिजे.तुम्ही तुमच्या कौशल्याने, तुमच्या प्रतिभेने, तुमच्या उद्यमशीलतेने जपानच्या या महान भूमीला मंत्रमुग्ध केले आहे. भारतीयत्वाच्या रंगांशी , भारताच्या शक्यतांशीही ओळख  तुम्हाला जपानला  सतत  करून द्यायची आहे. श्रद्धा  असो वा साहस, भारत हे जपानसाठी नैसर्गिक   पर्यटन स्थळ आहे.आणि म्हणूनच  भारतात या, भारताकडे पहा, भारताशी जोडले जा या संकल्पासह , मी जपानमधील प्रत्येक भारतीयाला यात सहभागी  होण्याचे आवाहन करतो. .मला विश्वास आहे की तुमच्या सार्थ  प्रयत्नांमुळे भारत-जपान मैत्रीला नवीन उंची मिळेल.या अप्रतिम स्वागतासाठी आणि मी आत येताना पाहत होतो,आजूबाजूला जोश , घोषणा, उत्साह आणि  तुम्ही स्वतःमध्ये भारत जगण्याचा जितका काही प्रयत्न करत आहात,ते खरोखरच हृदयस्पर्शी आहे.

तुमचे हे प्रेम स्नेह असेच कायम राहो. इतक्या मोठ्या संख्येने येऊन आणि मला सांगण्यात आले की, आज टोक्योहूनच नव्हे तर जपानबाहेरूनही  काही मित्र आले आहेत. मी पूर्वी यायचो.यावेळी येऊ शकलो नाही, तुम्हीदेखील आलात.  तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मला मिळाली हे मला आवडले. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.भारत माता की जय, भारत माता की जय,खूप खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi