महामहीम,
नमस्कार !
आमचे लगतचे आणि विस्तारित शेजारी राष्ट्रांमधले आरोग्य अधिकारी आणि तज्ञ आज भेटत आहेत याचा मला आनंद आहे. आजच्या फलदायी चर्चेसाठी आपणा सर्वाना शुभेच्छा देऊन मी सुरवात करतो. महामारीच्या काळात आपल्या आरोग्य यंत्रणांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.कोविड-19 चा गेल्या वर्षी जगाला फटका बसू लागला तेव्हा दाट लोकवस्तीच्या आपल्या प्रांताबाबत अनेक तज्ञांनी विशेष चिंता व्यक्त केली होती. मात्र अगदी सुरवातीपासूनच समन्वयाने प्रतिसाद देत आपण सर्वजण या आव्हानाला सामोरे गेलो. गेल्या वर्षीच्या मार्चमध्येच हा धोका जाणून त्याविरोधात एकत्र लढा देण्यासाठी कटिबद्ध होणारे आपण प्रथम होतो. आपल्या उदाहरणाचे अनेक देशांनी अनुकरण केले.
महामारीशी लढा देण्यासाठी तातडीच्या निधीसाठी आपण कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद निधीची निर्मिती केली. औषधे, पीपीई, चाचणी साहित्य यासारख्या संसाधनाचे आपण आदान प्रदान केले. याशिवाय सर्वात महत्वाच्या आणि मौल्यवान अशा ज्ञानाचे आपण आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समन्वित प्रशिक्षणाद्वारे आदान प्रदान केले. चाचण्या, संसर्ग नियंत्रण आणि वैद्यकीय टाकाऊ कचरा व्यवस्थापन याबाबत वेबिनार, ऑनलाईन कोर्स,आणि माहिती तंत्रज्ञान पोर्टलच्या माध्यमातून परस्परांच्या अनुभवाची आणि त्यातून प्राप्त ज्ञानाची आपण देवाण घेवाण केली. आपल्यासाठी उत्तम ठरलेल्या बाबींवर आधारित आपण आपल्या उत्तम प्रथा विकसित केल्या.अनुभव आणि ज्ञानाबाबतच्या या एकत्रित ज्ञानसंचयात प्रत्येकाने आपले योगदान दिले.
मित्रहो,
सहयोगाची अमुल्य भावना या महामारीने दिली आहे. निर्धार आणि खुलेपणा यातून जगातल्या सर्वात कमी मृत्यू दर असलेल्यापैकी एक आपण राहिलो असून हे प्रशंसेला पात्र आहे. आपला प्रांत आणि जगाचे लक्ष वेगवान लसीकरणाकडे लागले आहे.यामध्येही आपण तेच सहकार्य आणि सहयोगाची भावना कायम राखायला हवी.
मित्रहो,
गेल्या काही वर्षात आपले आरोग्य सहकार्य विस्तारले आहे. याचा अधिक विस्तार करण्याबाबत आपण विचार करू शकतो का ? आजच्या चर्चेसाठी आपणाला काही सूचना करण्याची मला परवानगी द्यावी:
आपल्या प्रदेशात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संबंधित देशाने विनंती केल्यास डॉक्टर आणि परिचारिकांना तत्काळ प्रवास करण्याच्या दृष्टीने विशेष व्हिसा योजना तयार करण्याबाबत आपण विचार करू शकतो का ?
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रादेशिक हवाई रुग्ण वाहिका कराराचा समन्वय आपली नागरी हवाई वाहतूक मंत्रालये साधू शकतात का ?
आपल्या जनतेमध्ये कोविड-19 लसीकरणाच्या परिणामकारतेविषयीचा डाटा अभ्यासणे, त्याचे संकलन करणे यासाठी आपण प्रादेशिक मंच तयार करू शकतो का?
भविष्यात महामारी रोखण्यासाठी, साथरोगाबाबत तंत्र आधारित प्रादेशिक जाळे आपण करू शकतो का ?
कोविड-19 व्यतिरिक्त, यशस्वी सार्वजनिक आरोग्य धोरण आणि योजना यांची परस्परांशी देवाणघेवाण आपण करू शकतो का ?. आपल्या प्रदेशासाठी भारतातून आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजना आपल्या मित्रासाठी उपयुक्त ठरू शकतात. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, निरक्षरता यासारखी अनेक आव्हाने आपल्या सर्वात सामायिक आहेत.मात्र त्याच बरोबर शतकापासून सांस्कृतिक आणि जनतेतल्या संबंधांचे सामर्थ्यही आपल्याकडे आहे. आपल्याला एकत्र जोडणाऱ्या या बाबींवर आपण लक्ष केंद्रित केले तर केवळ सध्याची महामारीच नव्हे तर इतर आव्हानांवरही आपण मात करू शकू.
मित्रहो,
21 वे शतक हे आशियाचे शतक असेल तर दक्षिण आशियाई देशांच्या आणि हिंद महासागर देशांमधल्या अधिक समन्वयावाचून ते साध्य होणार नाही.महामारीच्या काळात आपणा सर्वांनी दाखवलेली प्रादेशिक ऐक्य भावना असा समन्वय शक्य असल्याचे सिद्ध करत आहे. आजच्या फलदायी चर्चेसाठी आपणा सर्वाना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
धन्यवाद !
खूप-खूप धन्यवाद !