मला येथे येण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे पंतप्रधानांनी, पोर्तुगालच्या सरकारने, इथल्या लोकांनी आमचे स्वागत केलं, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि हे स्वागत-सन्मान एका व्यक्तीचे नसून सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वागत आहे.
हे राधाकृष्ण मंदिर एक प्रकारे येथील सामाजिक चेतनेचे प्रतीक आहे. सर्व धर्मांचे लोक, त्यांच्या प्रतिनिधींना भेटण्याचे सौभाग्य मला आज लाभले. कोणताही भेदभाव नाही आणि हेच भारताचे वैशिष्ट्य आहे, हे वैविध्य हीच भारताची ओळख आहे आणि हीच भारताची ताकद आहे.
काही दिवसांपूर्वी, पोर्तुगालमध्ये जंगलात आग लागल्यामुळे एक खूप मोठी दुर्घटना घडली. कित्येक निर्दोष लोक त्या आगीत होरपळले. ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्या सर्वाना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.
भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणून पोर्तुगालचा अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. मात्र गुजरातबरोबर त्यांचे एक विशेष नाते आहे. आपण सगळे ऐकत आलो आहोत की वास्को दि गामा जेव्हा भारतात आले, असे सांगितलं जाते की कांजी मालम या गुजराती माणसाने वास्को दि गामा यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मदतीने वास्को दि गामा भारतात पोहोचले. कांजी मालम गुजरात मधून बाहेर पडले आणि आफ्रिकेत स्थिर स्थावर झाले, तिथे एका बंदरावर त्यांची भेट वास्को दि गामा यांच्याशी झाली आणि तिथूनच भारतात जाण्याची त्यांची योजना बनली. तर अशा प्रकारे कांजी मालम यांच्या माध्यमातून संपूर्ण युरोपच्या भारताबरोबरच्या व्यापारी संबंधांना सुरुवात झाली आणि पोर्तुगालचे मोठे महत्व आहे. तर हे नाते ज्यांच्याबरोबर आमचे आहे, जुने नाते आहे.
ही गोष्ट खरी आहे की 70वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतातून एक पंतप्रधान द्विपक्षीय दौऱ्यासाठी इथे आले आहेत आणि हे सौभाग्य मला लाभले आहे. जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा ते इथे आले होते, मात्र त्यावेळी त्यांचा दौरा द्विपक्षीय दौरा स्वरूपाचा नव्हता, युरोपिअन संघटनेच्या एका परिषदेसाठी ते आले होते. मला आज हे सौभाग्य लाभले इथे येण्याचे आणि जसे पंतप्रधानांनी सांगितले, अनेक विषयांवर चर्चा झाली, अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि भारत आणि पोर्तुगाल एकत्रितपणे, आम्हा दोघांकडे जो अनुभव आहे, दोघांकडे जी ताकद आहे, दोघांच्या ज्या गरजा आहेत त्यांचा विचार करून पुढे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पोर्तुगालचे महान नेते मारिओ सोरेस 1992 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्याच कार्यकाळात भारत आणि पोर्तुगालच्या संबंधांना एक नवीन ऊर्जा, नवीन चेतना मिळाली होती आणि जेव्हा पंतप्रधान भारतात आले होते त्याच वेळी त्यांचे इथे निधन झाले, तेव्हा भारतातील लोकांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामूहिकरीत्या त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अशा प्रकारे पोर्तुगालबरोबर भारताची आदर भावना राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी मला इथले माजी पंतप्रधान आणि आता संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस असलेले अँटोनिओ गुटेरेस यांना रशियामध्ये भेटण्याचे सौभाग्य लाभले आणि मी इतका आनंदी होतो की त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणात त्यांनी योगबाबत इतकी सविस्तर चर्चा माझ्याबरोबर केली. ते म्हणाले की माझ्या कुटुंबातील सर्वजण योगशी जोडलेले आहेत. योगप्रति त्यांची आदरभावना आणि आजही मी पाहिले इथल्या नागरिकांनी योगाची छान प्रात्यक्षिके केली. ओंकार मंत्राचा जप केला, ओम नमः शिवायचा जप केला. आज पंतप्रधान माझ्याशी चर्चा करत होते सर्वांगीण आरोग्याबाबत, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत, कमी खर्चाच्या आरोग्य सेवेबाबत आणि त्यातही ते खूप आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही पोर्तुगालमध्ये योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्याची चळवळ आणि शाळांमध्येही योगच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मी पंतप्रधानांचे मनापासून अभिनंदन करतो, योगाची चळवळ पुढे नेण्यात संपूर्ण युरोपचे नेतृत्व पोर्तुगालने केले आहे आणि अलिकडेच 21जून रोजी जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिन पार पडला, संपूर्ण जग हा योग दिन साजरा करत असताना पोर्तुगालनेही मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला. मी पोर्तुगालच्या योगप्रेमी बंधू-भगिनींचे देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि मानव कल्याणासाठी शून्य खर्चाच्या आरोग्य सेवेसाठी ही जी योग चळवळ सुरु आहे, त्याला स्वतः पंतप्रधान आशीर्वाद देत आहेत, मला खात्री आहे की पोर्तुगालच्या भावी पिढीच्या आयुष्यासाठी ही खूप मोठी भेट असेल आणि पुढील अनेक शतके लोक त्यांची आठवण काढतील.
पोर्तुगालने स्टार्टअपच्या क्षेत्रात नाव कमावले. इथल्या तरुणांनी, त्यांच्या प्रतिभेने आणि सरकारच्या कृतिशील धोरणांमुळे स्टार्टअप चळवळीला एक खूप मोठी ताकद लाभली आहे. आणि पोर्तुगाल एक प्रकारे स्टार्टअपचे एक खूप मोठे निर्मिती केंद्र बनू शकतं. आज भारताने आणि पोर्तुगालने एक पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये स्टार्टअप क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात काम करणारे तरुण एकत्र येऊन आपले अनुभव, आपण मिळवलेले यश याबाबत सांगू शकतील, एक जागतिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या दिशेने पुढे येऊ शकतील. काही दिवसांपूर्वी इथे जो स्टार्टअप कार्यक्रम पार पडला होता, भारतातून सातशेहून अधिक स्टार्टअप संबंधित काम करणारे, अभिनव काम करणारे तरुण इथे आले होते आणि अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम, प्रेरणादायी कार्य इथे झाले होते.
पोर्तुगाल क्रीडा जगतातही भारताशी जोडलेला आहे. आणि खेळाचा विषय निघतो, तेव्हा क्रिस्टियानो रोनाल्डो याची आठवण कुणाला येणार नाही? असे क्षमतावान लोक फ़ुटबाँलच्या जगासाठी प्रेरक आहेत. भारतातही रोनाल्डोचे नाव ऐकताच फ़ुटबाँलच्या खेळाडूंमध्ये एक नवीन ऊर्जा आणि चेतना निर्माण होते. तर एक प्रकारे अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात आपण एकत्रितपणे खूप काही काम करू शकतो. आपली लोकशाही मूल्ये आहेत. आपण जगातील सर्व समुदायांना आपल्याबरोबर घेऊन जाणाऱ्या स्वभावाचे देश आहोत. आपण एकत्रितपणे केवळ भारत आणि पोर्तुगालचेच भले करायचे नाही तर जगाच्या कल्याणासाठी देखील आपण खूप मोठे योगदान देऊ शकतो आणि आज तशी संधी मला दिसत आहे, इथली ताकद मला जाणवत आहे.
बंधू-भगिनीनो, भारत खूप वेगाने पुढे जात आहे. विकासाची नवी शिखरे सर करत आहे. भारत भाग्यवान आहे, आज तो तरुण देश आहे. 65टक्के लोकसंख्या 35 पेक्षा कमी वयोगटातील आहे. ज्या देशाकडे अशी तरुणाई असते, त्या देशाची स्वप्ने देखील तरुण असतात आणि त्या तरुण स्वप्नांचे सामर्थ्य काही वेगळेच असते. आणि त्या आधारे भारत नव्या सीमा पार करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. प्रत्येक क्षेत्रात आज भारत विकासाची नवी उंची गाठत आहे.
गेली तीन वर्षे देशाचा प्रधान सेवक म्हणून सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे आणि तुम्हाला अनुभव येत असेल, तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचत असतील आणि आजकाल तर समाज माध्यमांमुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी NarendraModiApp आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केलं असेल. नसेल केले तर अवश्य करा. मी प्रत्येक क्षणी तुमच्या खिशात असतो. तुमच्या मोबाईल फोनमध्ये उपलब्ध असतो. भारतातील प्रत्येक घडामोडीची ओळख, विकास किती वेगात होत आहे, किती क्षेत्रात होत आहे हे तुम्हाला समजेल.
अंतराळ विश्वात भारताच्या तरुणांनी, भारताच्या वैज्ञानिकांनी कमाल करून दाखवली. कालच 30 लघु उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम भारताच्या अंतराळ वैज्ञानिकांनी केले. काही दिवसांपूर्वी आमच्या अंतराळ वैज्ञानिकांनी जागतिक विक्रम नोंदवला. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून जगाला अचंबित केले. हि शक्ती भारताकडे आहे. भारत एका नवीन उर्जेसह सामर्थ्याबरोबर विकासाची नवी शिखरे पार करत आहे.
आर्थिक क्षेत्रातही नित्य नवे बदल होत आहेत. नियम बदलत आहेत. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी अनेक कवाडे खुली झाली आहेत. भारतात 21व्या शतकाला अनुकूल पायाभूत सुविधा कशा प्रकारे निर्माण होतील, आपले रस्ते, रेल्वे 21व्या शतकाला अनुरूप जागतिक दर्जाचे कसे बनतील या दिशेने सध्या भारत सातत्याने प्रयत्न करत आहे. जलद गतीने पुढे जात आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही पूर्वीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात भारताने जगाचे लक्ष वेधले आहे. भारताला जाणून घेणे, ओळखणे, भारताकडून काही मिळवणे हे जगभरात आकर्षणाचे केंद्र बनले आहे. गेल्या एका वर्षातच भारतात खूप मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत विकासाची नवी उंची गाठत आहे.
आणि मला विश्वास आहे की जगभरात विखुरलेले माझे भारतीय समुदायाचे बंधू-भगिनी आणि जिथे भारतीय गेले आहेत, तिथे त्यांनी आपल्या परंपरांचे जतन केले. आपला सांस्कृतिक वारसा जपला. इथे अनेक लोक असतील, कुणी दुसऱ्या पिढीतले असतील, कुणी तिसऱ्या पिढीतील असतील, काही नव्या पिढीतील असतील, मात्र आजही आपल्या या महान परंपरांप्रती तेवढाच अभिमान आहे. मात्र त्याचबरोबर ज्या भूमीतील भाकर खातो, जिचे मीठ खातो, त्या देशासाठी देखील मनापासून काम करतात. तुम्ही पोर्तुगालसाठी देखील त्याच भावनेने काम करत आहात, समर्पित भावनेने काम करत आहात. आणि जगात जिथे जिथे भारतीय गेले आहेत, त्या समाजाबरोबर मिसळणे, त्या समाजाच्या विकासासाठी आपले योगदान देणे, जे काही सकारात्मक करायचे आहे ते करत राहणे, आपल्या परंपरा जपणे हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे.
सर्वसमावेशक स्वभाव आहे आपला, कारण भारतात आपले पालन-पोषण, ज्या देशात शंभर भाषा बोलल्या जातात, ज्या देशात 1700 हून अधिक बोलीभाषा आहेत, ज्या देशात दर 20 मैलानंतर खाण्या-पिण्याच्या नव्या चवीची अनुभूती मिळते, एवढ्या विविधतेत जे वाढले आहेत, त्यांच्याकडे जगातील प्रत्येक विविधता स्वतःमध्ये सामावून घेण्याचे सामर्थ्य असते. आणि त्या संस्कारांमुळे आज जगात एक स्वीकृत समाज म्हणून भारतीय समाजाने आपले स्थान निर्माण केले आहे. हे काम तुम्ही केले आहे, तुमच्या पूर्वजांनी केले आहे. एक प्रकारे भारताचे सच्चे दूत म्हणून तुम्ही सर्व भारतवासी काम करत आहात. मी तुमचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.
आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. खूप-खूप धन्यवाद. तुम्हा सर्वाना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. विवा पुर्तगाल.