वाहे गुरू जी का खालसा..वाहे गुरू जी की फतेह !!
देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो.आपणा सर्वाना,संपूर्ण देशाला, लोहडीच्या अनेक शुभेच्छा. विशेष करून आपल्या देशाचा अन्नदाता असलेल्या आपल्या शेतकरी सहकाऱ्यांसाठी कापणीचा हा हंगाम आनंद घेऊन यावा अशी आशा मी करतो.
मित्रहो,आज देश,गुरू गोविंद सिंह महाराज यांचे प्रकाश पर्व साजरे करत आहे.खालसा पंथाचे सृजनकर्ते,मानवतेचे पालनकर्ते, भारतीय मूल्यांसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतले होते अशा गुरू गोविंदसिंह जी यांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो.गुरू गोविंद सिंह यांच्या प्रकाशोत्सव पर्वा निमित्त आपणा सर्वांबरोबरच देश आणि जगभरातल्या शीख पंथाशी जोडलेल्या आणि भारतीय संस्कृती साठी स्वतः ला वाहून घेतलेल्या समर्पित जनांना माझ्या अनेक शुभेच्छा.
मित्रहो,मागचे वर्ष आपण गुरू गोविंद सिंह जी महाराज यांचे 350 वे जयंती वर्ष म्हणून साजरे केले. शीख पंथाच्या या महत्वाच्या प्रसंगी गुरू गोविंद सिंह यांच्या स्मरणार्थ, 350 रुपये मूल्याचे नाणे,देशवासियांना समर्पित करण्याचे भाग्य मला लाभले.
खरं तर गुरू गोविंद सिंह यांचे विचार आपणा सर्वाच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य करत आले आहेत आणि यापुढेही शेकडो वर्षे करत राहणार आहेत.म्हणूनच ज्यांचे कार्य एक मूल्य म्हणून आपल्या जीवनात मार्गदर्शन करते,आपण सर्वाना प्रेरणा देत राहते त्यांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे आणि यासाठी आम्हा सर्वांना त्याचा आनंद होत आहे.
मित्रहो,श्री गुरू गोविंद सिंह यांच्या ठायी अनेक गुणांचा संगम होता.ते गुरू तर होतेच,श्रेष्ठ भक्तही होते.
ते जितके उत्तम योद्धा होते तितकेच उत्तम कवी आणि साहित्यकारही होते.अन्याया विरुद्ध त्यांचा कठोर दृष्टिकोन होता तेवढेच ते शांततेसाठी आग्रही होते.
मानवतेच्या रक्षणासाठी,राष्ट्राच्या रक्षणासाठी,धर्माच्या रक्षणासाठी,त्यांचे सर्वोच्च बलिदान देश आणि जगही जाणतेच.
इन पुत्रन के कारन,वर दिए सुत चार
चार मुए तो क्या हुआ, जीवित कई हजार
हजारो संतानांच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या संतांनाचे, आपल्या वंशाचे बलिदान ज्यांनी दिले,राष्ट्राच्या रक्षणासाठी,धर्माच्या रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाचे यापेक्षा मोठे उदाहरण कोणते असू शकते.
मित्रहो,वीरतेबरोबरच त्यांचे जे धैर्य होते ते अद्भूत होते.ते संघर्ष करत मात्र त्यागाची पराकाष्ठाही अभूतपूर्व होती.समाजातल्या वाईट प्रथा विरोधात ते लढा देत राहिले.उच्च- नीच भेदभाव,जातीवादाचे विष,या विरोधातही गुरू गोविंद सिंह यांनी संघर्ष केला.ही सर्व मूल्ये नव भारताच्या निर्मितीचा पाया आहेत.
मित्रहो,गुरू साहेब यांनी ज्ञानाला केंद्र स्थानी मानून गुरू ग्रंथ साहिब मधला प्रत्येक शब्द जीवन मंत्र मानला.आता गुरू ग्रंथ साहिबच,त्यातला प्रत्येक शब्द,त्याचे प्रत्येक पान आगामी युगात आपल्याला प्रेरणा देत राहील असे त्यांनी म्हटले होते.पंच प्यारे आणि खालसा पंथाची रचना झाली त्यातही,संपूर्ण भारत जोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
खालसा पंथाचा विकास हा गुरू साहेब यांच्या प्रदीर्घ गहन चिंतन – मनन आणि अध्ययनाचा परिपाक होता.ते वेद, पुराण आणि अन्य प्राचीन ग्रंथ जाणत होते.
गुरू साहेब यांना, गुरू नानक देव यांच्यापासून ते गुरू तेग बहादूर यांच्यापर्यंत शीख पंथाची परंपरा,मोगल काळात शीख पंथाशी संबंधित घटनांचे व्यापक ज्ञान होते.देश- समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत त्यांनी आपले विचार मांडले.
मित्रहो,आपल्यापैकी अनेकांनी ' श्री दसमग्रंथ साहेब ' वाचला असेल.साहित्य आणि भाषेवर त्यांची उत्तम पकड होती.जीवनातल्या प्रत्येक रसाबाबतचे व्याख्यान सामान्य व्यक्तीच्या मनालाही स्पर्श करून जाते.भाषेचे अलंकार,पदाची रचना,छंद, सर्व काही मंत्रमुग्ध करणारे आहे.भारतीय भाषांची त्यांची जाण उत्तम होती.
मित्रहो, गुरू गोविंद सिंह यांचे काव्य,भारतीय संस्कृती,आपल्या जीवनाचे दर्शन घडवणारी अभिव्यक्ती आहे.त्यांचे व्यक्तिमत्व जसे बहू आयामी होते त्याप्रमाणे त्यांचे काव्यही अनेक विषयांना स्पर्श करणारे आहे.साहित्याचे अनेक जाणकार त्यांना साहित्यकारांचे प्रेरक मानतात.
मित्रहो,कोणत्याही देशाची संस्कृती,त्या देशाचा गौरव अधिक वृद्धिंगत करते.संस्कृती समृद्ध करणे,संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे यांना नेहमीच परंपरेत प्राधान्याचे स्थान राहिले आहे.आमच्या सरकारचा गेल्या साडेचार वर्षात हाच प्रयत्न राहिला आहे.
भारताकडे असलेला सांस्कृतिक आणि ज्ञानाचा वारसा जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवण्याचा व्यापक प्रयत्न केला जात आहे. योगापासून आयुर्वेदापर्यंत आपली प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यात देश यशस्वी ठरला आहे.हे कार्य अखंड जारी आहे.
मित्रहो,जागतिक आरोग्य,समृद्धी आणि शांतता याबाबत आपल्या ऋषी मुनींनी जो संदेश दिला आहे त्याचा लाभ संपूर्ण जगाला व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.गुरू गोविंद सिंह जी यांचे 350 वे प्रकाश पर्व आपण साजरे केलेच ,आता गुरू नानक देव जी यांच्या 550 व्या जयंती समारंभाची तयारी सुरू आहे.या पवित्र प्रसंगात सहभागी होण्याची संधी आमच्या सरकारला मिळाली हे आमचे भाग्य आहे.
हा प्रकाशोत्सव देशाची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जाईलच त्याच बरोबर जगभरातल्या आपल्या दूतावासातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एवढेच नव्हे तर केंद्र सरकारच्या अथक आणि अभूतपूर्व प्रयत्नामुळे करतारपूर कॉरिडॉर निर्माण होणार आहे हे आपण जाणताच.गुरू नानक यांच्या शिकवणीला अनुसरून वाटचाल करणारा प्रत्येक भारतीय,प्रत्येक शीख,व्हिझा शिवाय नारोवालला जाऊन स्वतःच्या डोळ्याने गुरुद्वारा दरबार साहिब यांचे दर्शन करू शकेल.
ऑगस्ट 1947 मध्ये जी चूक झाली त्याचे हे परिमार्जन आहे.आमच्या गुरूंचे सर्वात महत्वाचे स्थान अवघे काही किलोमीटर दूर होते मात्र ते आपल्यासमवेत घेतले गेले नाही.हा कॉरिडॉर म्हणजे हे नुकसान कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
मित्रहो,गुरू गोविंद सिंह किंवा गुरू नानक देव असोत,आपल्या प्रत्येक गुरूंनी न्यायाच्या बाजूने उभे राहण्याची शिकवण आपल्याला दिली आहे.त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून केंद्र सरकार वाटचाल करत आहे,1984 मध्ये सुरू झालेल्या अन्याय पर्वातल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे.अनेक दशके माता भगिनींचे, मुला-मुलींचे अश्रू पुसण्याचे काम आता कायदा करेल.
मित्रहो,आजच्या या पवित्र दिवशी,गुरू गोविंद सिंह जी महाराज यांनी दाखवलेल्या 11 सूत्री मार्गावरून वाटचाल करण्याचा संकल्प पुन्हा करण्याची आवश्यकता आहे.आज भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून स्थापित होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे अशा काळात देशभावना अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
गुरू जी यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करत आपण सर्वजण नव भारताचा आपला संकल्प अधिक दृढ करू याचा मला विश्वास आहे.
प्रकाश पर्वानिमित्त आपण सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा.आपणा सर्वांसाठी नवे वर्ष आनंददायी ठरावे या सदिच्छेसह
जो बोले, सो निहाल! …. सत् श्री अकाल!