भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय…
मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, येथील तडफदार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी, संसदेतील माझे अनेक सहकारी, महाराष्ट्राचे मंत्री आणि आमदार गण, आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
बंधू आणि भगिनींनो, अलिकडच्या वर्षांमध्ये मला तिसऱ्यांदा सोलापूरला येण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा जेव्हा मी तुमच्यकडे आशीर्वाद मागायला आलो आहे, तुम्ही मला भरपूर प्रेम दिले आहे. आशीर्वादाची खूप मोठी ताकद दिली आहे. मला आठवतंय की, गेल्या वेळी मी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा मी म्हटले होते की इथे जी बीएसपी म्हणजे वीज,पाणी आणि रस्त्याची समस्या आहे, तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. मला आनंद आहे की या दिशेने अनेक प्रयत्न केले गेले आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना असेल, किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा सौभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक घरात वीज पोहचवण्याचे काम असेल, इथे सर्व बाबतीत जलद गतीने काम होत आहे. प्रत्येक घरात वीज पोहचवण्यासाठी फडणवीस सरकार अतिशय गंभीरपणे काम करत असल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.
बंधू आणि भगिनींनो, आज या कामाचा आणखी विस्तार करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे. थोड्या वेळापूर्वी स्मार्ट शहर, गरीबांची घरं, रस्ते आणि पाण्याशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली. मला तुम्हाला हे देखील सांगायचे आहे की सरकारने सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्चाच्या तुळजापूर मार्गे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे.
तुळजापूर भवानीमातेच्या आशिर्वादाने लवकरच हा रेल्वे मार्ग तयार होईल. यामुळे स्थानिक लोकांबरोबरच देशभरातून भवानीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची देखील सोय होईल. या अनेक प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप अभिनंदन करतो. या यॊजनांबाबत विस्तृतपणे बोलण्यापूर्वी मी आज सोलापूरच्या या भूमीवरून संपूर्ण देशाचे अभिनंदन करू इच्छितो.
काल रात्री उशिरा लोकसभेत एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले. तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटातून मला वाटतंय की तुम्ही देखील काल रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत बसला होतात. सामान्य वर्गातील गरीबांना 10 टक्के आरक्षणावर मोहोर उमटवून ‘सबका साथ, सबका विकास’ हा अधिक मजबूत करण्याचे काम करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गाला पुढे जाण्याची संधी मिळावी, अन्यायाची भावना नष्ट व्हावी, गरीब भले मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो त्याला विकासाचा पूर्ण लाभ मिळावा, संधींमध्ये प्राधान्य मिळावे या संकल्पासह भारतीय जनता पार्टी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे.
बंधू आणि भगिनींनो, किती खोटी वृत्ते पसरवली जातात, कशा प्रकारे लोकांची दिशाभूल केली जाते. कालच्या संसदेतील आमच्या निर्णयामुळे मी आशा करतो, अतिशय निरोगी वातावरणात काल लोकसभेत चर्चा झाली , रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली आणि जवळपास सर्वसहमतीने, काही लोक आहेत ज्यांनी विरोध केला , मात्र तरीही संविधानासाठी एक महत्वपूर्ण निर्णय काल लोकसभेने घेतला. मी आशा करतो आज राज्यसभेत, राज्यसभेसाठी खास एक दिवसाचा अवधी वाढवण्यात आला आहे, राज्यसभेत आपले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, ते देखील या भावनांचा आदर करून समाजाची एकता आणि अखंडता अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नक्कीच सकारात्मक चर्चा करतील आणि कालच्या सारखाच सुखद निर्णय त्वरित घेतला जाईल, अशी मी आशा करतो.
बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशात अशी काही खोटी वृत्ते पसरवली जात होती आणि काही लोक आरक्षणाच्या नावावर दलितांना जे मिळाले आहे त्यातून काही हिरावून घेऊ इच्छित होते, आदिवासींना मिळाले आहे त्यातून काही घेऊ इच्छित होते, ओबीसींना जे मिळाले आहे त्यातून काही काढून घ्यायचे होते, आणि मतांच्या बँकेची, अल्पसंख्याकांचे राजकारण करू पाहत होते. आम्ही दाखवून दिले की जे दलितांना मिळते त्यातून कुणी काही हिरावून घेऊ शकत नाही. जे आदिवासींना मिळते त्यातून कुणी काही घेऊ शकत नाही. जे ओबीसींना मिळते त्यातूनही कुणी काही घेऊ शकत नाही. हे अतिरिक्त दहा टक्के देऊन आम्ही सर्वांना न्याय देण्याच्या दिशेने काम केले आहे. आणि म्हणूनच आम्ही याचे काढून घेऊ, त्याचे काढून घेऊ अशी खोटी वृत्ते पसरवणाऱ्यांना काल दिल्लीत संसदेने असे चोख उत्तर दिले आहे, त्यांना असे काही तोंडघशी पाडले आहे की आता खोटी वृत्ते पसरवण्याची ताकद त्यांच्यात राहिली नसेल.
बंधू आणि भगिनींनो, याशिवाय आणखी एक महत्वपूर्ण विधेयक देखील काल लोकसभेत पारित झाले. हे विधेयक देखील भारतमातेप्रति आस्था असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वपूर्ण आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या भारतमातेच्या मुला-मुलींना भारतमाता की जय म्हणणाऱ्याना , वंदे मातरम म्हणणाऱ्यांना, या देशाच्या मातीवर प्रेम करणाऱ्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
इतिहासातील अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर, अनेक अत्याचार सहन केल्यानंतर आपल्या या बंधू-भगिनीना भारतमातेच्या कुशीत जागा हवी आहे. त्यांना संरक्षण देणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करण्याचे काम देखील भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील सरकारने केले आहे. मित्रांनो,स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने काम करत आले आहे. मात्र जेव्हा भाजपाच्या नेतृत्वात हेच काम होते, तेव्हा जमीन आणि जनतेपर्यंत त्याचा परिणाम पोहचतो.
बंधू आणि भगिनींनो, काल हा कायदा पारित झाला आहे. संसदेत लोकसभेने आपले काम केले आहे. मी आशा करतो की आज राज्यसभा देखील आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ते राज्यसभेत पारित करून लाखो कुटुंबांचे आयुष्य वाचवण्याचे काम करेल.
बंधू आणि भगिनींनो, मी विशेषतः आसामच्या बंधू-भगिनींना, ईशान्येकडील बंधू-भगिनींना विश्वास देऊ इच्छितो की कालच्या या निर्णयामुळे आसाम असेल, ईशान्य प्रदेश असेल, तिथले युवक असतील, त्यांच्या अधिकारांवर कणभर देखील गदा येऊ देणार नाही., त्यांच्या संधींमध्ये अडचण निर्माण होऊ देणार नाही. हा विश्वास मी त्यांना देऊ इच्छितो.
बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या तुलनेत जो मोठा फरक जाणवतो आहे, तो इच्छाशक्तीचा आहे, योग्य इच्छाशक्तीबरोबरच आवश्यक धोरण निर्मितीचा आहे. तुकड्यांमध्ये विचार करण्याऐवजी व्यापक आणि संपूर्णतेने निर्णय घेण्याचा आहे. राष्ट्रहित आणि जनहितार्थ कठोर आणि मोठे निर्णय घेण्याचा आहे. राजकारणाच्या इच्छाशक्तीचा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ आमच्या सरकारची संस्कृती आहे, आमचे संस्कार आहेत आणि हाच आमचा वारसाही आहे आणि आमची परंपरा देखील आहे. गांव, गरीब यांच्यापासून शहरांपर्यंत याच संस्थांबरोबर नवीन भारताच्या नवीन व्यवस्थांची निर्मिती करण्याचा विडा भाजपा सरकारने उचलला आहे.ज्या स्तरावर आणि ज्या वेगाने काम होत आहे त्यामुळे सामान्य जीवन सुलभ बनवण्यात गती आली आहे.
मित्रांनो, पायाभूत विकासाचे उदाहरण घ्या. सोलापूर ते उस्मानाबाद पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी झाला आहे. आणि आज देशासाठी समर्पित देखील झाला आहे. अंदाजे 1 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म, प्रत्येक क्षेत्रातील लोकांची सोय होईल.
मित्रानो, स्वातंत्र्यकाळापासून 2014 पर्यंत देशात सुमारे 90 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते आणि आज चार वर्षांनंतर 1 लाख 30 हजार किलोमीटर पेक्षा अधिक आहेत. गेल्या साडेचार वर्षात सुमारे 40 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात आले आहेत. एवढेच नाही, अंदाजे साडे पाच लाख कोटी रुपये खर्चून सुमारे 52 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर काम सुरु आहे.
बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रीय महामार्गाचे हे प्रकल्प स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी देखील खूप मोठी साधने आहेत. देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार करण्यासाठी जी भारतमाला योजना सुरु आहे, त्याअंतर्गत रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. आणि जेव्हा मी सोलापूरमध्ये पायाभरणीसाठी आलो होतो, तेव्हादेखील मी म्हटले होते की ज्याची पायाभरणी आम्ही करतो त्याचे उदघाटन देखील आम्ही करतो. आम्ही दाखवण्यासाठी काम करत नाही, दगड ठेवा, निवडणुका होऊ द्या, मग तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी ही जी राजकीय नेत्यांनी संस्कृती बनवली होती ती आम्ही पूर्णपणे बंद केली आहे. आणि आज देखील सांगतो की ही जी तीस हजार कुटुंबांसाठी घरे बनत आहेत ना, आज पायाभरणी झाली आहे, चाव्या देण्यासाठी आम्हीच येऊ. सर्वात मोठा पूल असेल, सर्वात मोठा बोगदा असेल, सर्वात मोठा द्रुतगती महामार्ग असेल, सर्व काही याच सरकारच्या कार्यकाळात तयार झाले आहेत किंवा मग त्यावर जलद गतीने काम सुरु आहे.
बंधू आणि भगिनींनो, हे सर्वात मोठे आणि सर्वात लांब आहेत म्हणून त्याचे महत्व आहे असे नाही तर ते यासाठी देखील महत्वपूर्ण आहेत कारण हे तिथे बनले आहेत जिथे स्थिती कठीण होती, जिथे काम सोपे नव्हते.
बंधू आणि भगिनींनो, ही कामे का होत नव्हती, चर्चा होत होती, 40-50 वर्षांपूर्वी चर्चा झाली आहे मात्र तिथे एखादी संसदेची जागा असायची, मते नव्हती, त्यामुळे ह्यांना वाटायचे तिथे जाऊन काय करणार, यामुळे देशाचा पूर्वेकडील भाग जो खूप विकसित व्हायला हवा होता, तो अडकून पडला. पश्चिम भारताचा जसा विकास झाला तसा पूर्व भारताचा झाला असता तर आज देश कुठच्या कुठे पोहचला असता. मात्र बंधू आणि भगिनींनो, तिथे जास्त मते नाहीत. एक-दोन जागांसाठी काय खर्च करायचा. मतांच्या पेटीच्या राजकारणाने विकासात देखील अडथळे निर्माण करण्याचे पाप केले आहे. आम्ही त्यातून बाहेर पडून तिथे मते असतील किंवा नसतील, भाजपासाठी संधी असतील किंवा नसतील, लोकसंख्या कमी असेल किंवा जास्त असेल, देशाच्या कल्याणासाठी जे करायला हवे ते करण्यासाठी आम्ही कधी थांबून राहत नाही.
मित्रांनो, हीच स्थिती रेल्वे आणि हवाई मार्गाची आहे. आज देशात रेल्वेवर अभूतपूर्व काम होत आहे. पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वेगाने रेल्वे मार्गांची निर्मिती आणि रुंदीकरण होत आहे. जलद गतीने विद्युतीकरण होत आहे. तसेच आज विमान प्रवास देखील केवळ श्रीमंत लोकांपुरता मर्यदित राहिलेला नाही, तर आम्ही तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. हवाई चप्पल घालणाऱ्यांना विमान प्रवासाचा आनंद देण्यासाठी उडान सारखी महत्वाकांक्षी योजना सुरु आहे. देशातील टीयर-2, टीयर-3 शहरांमध्ये विमानतळ आणि हैलीपैड बांधले जात आहेत. यात महाराष्ट्रातील देखील चार विमानतळाचा समावेश आहेत. आगामी काळात सोलापूरहून देखील उडान योजनेअंतर्गत विमान उड्डाणे व्हावीत यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
मित्रांनो, जेव्हा संपर्क व्यवस्था चांगली असते, तेव्हा गावे आणि शहरे दोन्हीच्या सामाजिक आणि आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा होते. आपली शहरे, आर्थिक घडामोडींच्या रोजगाराचे मोठे केंद्र असलेल्या सोलापूरसह देशातील अन्य शहरांचा विकास अनेक दशकांतील निरंतर प्रक्रियेमुळे झाला आहे. मात्र हे देखील खरे आहे की जो विकास झाला आहे तो योजनाबद्ध पद्धतीने झाला असता तर आज आपण कुठल्या कुठे पोहचलो असतो. मात्र तसे झाले नाही. देशात अशी खूप कमी शहरे आहेत, जिथे नियोजनासह एका सम्पूर्ण व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की, वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरांमधील पायाभूत सुविधा विकसित झाल्या नाहीत. रस्ते आणि गल्ल्या अरुंद राहिल्या, सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप लाईनमध्ये गळती होत राहिली, कुणी याविरुद्ध आवाज उठवला की थोडेफार काम करून पुन्हा ते अर्धवट सोडून दिले जायचे.
बंधू आणि भगिनींनो, आमच्या सरकारने या कायमस्वरूपी व्यवस्थापनाऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मार्ग निवडला आहे. याच विचारासह देशातील सौर शहरांना स्मार्ट बनवण्याचे एक अभियान सुरु आहे. ज्यात हे आपले सोलापूर देखील आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या सूचनांचा विचार करून राज्य सरकारांच्या मदतीने लोकसहभागाच्या एका व्यापक अभियानांनंतर आपल्या शहरांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त बनवण्याचा विडा आम्ही उचलला आहे. आमच्या या प्रयत्नांची चर्चा आता जगभरात होत आहे. अलिकडेच एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात हे नमूद करण्यात आले की येणाऱ्या दशकांमध्ये जगभरात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या दहा शहरांपैकी सर्वच्या सर्व दहा शहरे भारतातील असतील. कुणाही भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. जगातील दहा शहरे आणि दहाही शहरे भारतातील… भारत किती पुढे जाईल याचे हे संकेत आहेत.
बंधू आणि भगिनींनो, हे जगाला दिसत आहे, मात्र देशात असे लोक आहेत ज्यांना राजकारण करण्याशिवाय दुसरे काही काळात नाही. हे ते लोक आहेत ज्यांच्या शासन काळात आपल्या शहरांची परिस्थिती बिघडत गेली. आज हेच लोक स्मार्ट शहर अभियानाची खिल्ली उडवत आहेत, काही कसर सोडत नाहीत.
मित्रांनो, हे अभियान देशाच्या इतिहासात शहरीकरणाच्या विकासाला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न करत आहे. शहरात प्रत्येक सुविधा, देशाचे एकात्मीकरण करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील सामान्य जनतेच्या जीवनातील समस्या दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षात या अभियानाअंतर्गत, देशात सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची रूपरेषा तयार झाली आहे. यातही सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर वेगाने काम पूर्ण केले जात आहे. याच मालिकेत आज सोलापूर स्मार्ट शहराशी निगडित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी इथे करण्यात आली. यामध्ये पाणी आणि सांडपाण्याशी संबंधित योजना आहेत.
मित्रांनो, स्मार्ट सिटी व्यतिरिक्त देशातील अन्य शहरे आणि गावांमध्ये अमृत मिशन अंतर्गत मूलभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यातही सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांवरील काम प्रगतीपथावर आहे. इथे सोलापूरमध्ये देखील अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा आणि सांडपाण्याशीं संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. जेव्हा ही कामे पूर्ण होतील तेव्हा शहरातील अनेक भागात पाणी गळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. उजनी धरणातून पिण्याच्या पाण्याचा जो प्रकल्प आहे तो तयार झाल्यानंतर शहरात पाण्याची समस्या बहुतांश प्रमाणात कमी होईल.
मित्रांनो, पायाभूत सुविधांबरोबरच शहरातील गरीब आणि बेघर व्यक्तींसाठी एका नवीन विचारासह आमचे सरकार काम करत आहे. देशातील प्रत्येक जण याचा साक्षीदार आहे की कशा प्रकारे एकीकडे चमचमणाऱ्या सोसायट्या बनत आहेत तर दुसरीकडे झोपडपट्ट्यांचा विस्तार होत आहे. आपल्याकडे अशी व्यवस्था होती की जे घरे बांधतात , कारखाने चालवतात, उद्योगांना ऊर्जा देतात, त्यांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्याचे काम अटलजींनी सुरु केले.
शहरातील गरीबांसाठी घरे बांधण्याचे एक अभियान राबवले. या अंतर्गत वर्ष 2000 मध्ये इथे सोलापूरमध्ये राहणाऱ्या कामगारांना झोपड्या आणि अस्वच्छतेच्या आयुष्यातून मुक्ती देण्याचा प्रयत्न झाला होता. सुमारे दहा हजार कामगार कुटुंबानी एक सहकारी संस्था स्थापन करून अटलजींच्या सरकारकडे प्रस्ताव पाठवला आणि पाच-सहा वर्षांच्या आत त्यांना चांगल्या आणि पक्क्या घरांच्या चाव्या देखील मिळाल्या.
मला आनंद आहे की 18 वर्षांपूर्वी जे काम अटलजींनी केले होते ते विस्तारण्याची , पुढे नेण्याची संधी पुन्हा एकदा आमच्या सरकारला मिळाली आहे. आज गरीब कामगार कुटुंबांच्या 30 हजार घरांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज इथे झाली आहे. याचे जे लाभार्थी आहेत ते कारखान्यांमध्ये काम करतात, रिक्षा चालवतात, ठेले चालवतात. मी तुम्हा सर्वाना विश्वास देतो की अगदी लवकरच तुमच्या हातात तुमच्या स्वतःच्या घराची चावी असेल हा मी तुम्हाला विश्वास देतो.
बंधू आणि भगिनींनो, हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकलो कारण गेल्या साडेचार वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाखों गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावले आहे. शहरांमध्ये पूर्वी घरे कशी बांधली जायची आणि आता कशी बांधली जातात. पूर्वीच्या सरकारचा वेग काय होता आणि आम्ही किती वेगाने काम करत आहोत. आज मला जरा याचेही उदाहरण द्यायचे आहे.
मित्रांनो, 2004 ते 2014 या दहा वर्षात दिल्लीत रिमोट कंट्रोल वाले सरकार चालत होते. 2004 ते 2014 या दहा वर्षात शहरात राहणाऱ्या गरीब बंधू-भगिनींसाठी केवळ १३ लाख घरे बांधण्याचा निर्णय कागदावर झाला, आणि यापैकी 13 लाख म्हणजे काहीच नाही. एवढ्या मोठ्या देशात, तरीही तो निर्णय कागदावरच राहिला. काम किती झाले, एवढ्या मोठ्या देशात केवळ 8 लाख घरांचे काम झाले. दहा वर्षात 8 लाख म्हणजे एका वर्षात 80 हजार, एवढ्या मोठ्या देशात एका वर्षात, हे मोदी सरकार पहा, एकट्या सोलापूरमध्ये 30 हजार. भाजप सरकारच्या काळात गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या काळात 13 लाख असा कागदावर निर्णय झाला होता. आम्ही 70 लाख शहरी गरीबांच्या घरांना मंजुरी दिली आहे. आणि जे आतापर्यन्त 10 वर्षात करू शकले नाहीत, आम्ही चार वर्षात 14 लाख घरे बांधून तयार झाली आहेत.
एवढेच नाही ज्या वेगांने काम सुरु आहे, नजीकच्या काळात आणखी 38 लाख घरांचे काम पूर्ण होणार आहे. विचार करा, त्यांचे दहा वर्षातील काम आणि आमचे साडेचार वर्षतले काम. एवढा जमीन अस्मानाचा फरक आहे. जर आम्ही त्यांच्या गतीने चाललो असतो तर तुमच्या मुलांची मुले, त्यांच्या मुलांच्या मुलांची घरे देखील बांधली गेली असती की नाही हे मी सांगू शकत नाही. हा फरकच हे दाखवून देतो की त्यांना गरीबांची किती चिंता होती. यामधून सगळं अंदाज येतो.
मित्रांनो, आमचे सरकार शहरातील गरीबांचीच नाही तर येथील मध्यम वर्गाची देखील चिंता करत आहे. यासाठी जुन्या पद्धतींमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे.
बंधू आणि भगिनींनो, अल्प उत्पन्न गटातील लोकांबरोबरच 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम वर्गातील कुटुंबांना आम्ही या योजनेच्या कक्षेत आणले आहे. या अंतर्गत लाभार्थीला 20 वर्षे गृहकर्जावर अंदाजे सहा लाख रुपयांपर्यंत बचत सुनिश्चित करण्यात आली आहे. सहा लाखांची ही बचत मध्यम वर्गीय कुटुंब आपल्या मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणासाठी वापरू शकते. हेच सुलभ जीवनमान आणि हेच सबका साथ सबका विकास आहे.
बंधू आणि भगिनींनो, इथे आलेल्या कामगार मित्रांना मी हे देखील सांगू इच्छितो की, तुमची घरे तर तयार होतीलच, याशिवाय तुम्हा सर्वांसाठी विमा आणि निवृत्ती वेतनाच्या सर्वोत्तम योजना सरकार राबवत आहे. अटल पेंशन योजनेअंतर्गत, तुम्हा सर्वांना 1 हजार ते 5 हजार पर्यंत निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार अतिशय कमी योगदानावर दिला जात आहे.
या योजनेत देशातील सव्वा कोटीपेक्षा अधिक कामगार सहभागी झाले असून यापैकी 11 लाख कामगार आपल्या या महाराष्ट्रातीलच आहेत. याशिवाय, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना 90 पैसे प्रतिदिन, 90 पैसे एक रुपया देखील नाही, चहा देखील आज एक रुपयात मिळत नाही, हे चहावाल्याला माहीत असते. 90 पैसे प्रतिदिन आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना प्रति महिना 1 रुपया म्हणजे एका दिवसाचे केवळ 3-4 पैसे. एक रुपया प्रति महिना प्रीमियमवर या खूप मोठ्या दोन योजना सुरु आहेत. या दोन्ही योजनांमधून 2-2 लाख रुपयांचा विमा गरीबासाठी सुनिश्चित करण्यात आला आहे. या योजनेत देशभरातील 21 कोटी लोक सहभागी झाले आहेत. यामध्ये सव्वा कोटींहून अधिक आपल्या महाराष्ट्रातील गरीब लोक आहेत. या योजनांमुळे संकटप्रसंगी 3 हजार कोटी रुपयांहून अधिक लाभ लोकांना मिळाला आहे. 2-2 लाख रुपयांप्रमाणे ज्यांच्या कुटुंबावर संकटे आली आहेत त्यांना पैसे मिळाले आणि इतक्या कमी वेळेत 3 हजार कोटी रुपये या कुटुंबांपर्यंत पोहचले, संकटप्रसंगी पोहचले. जर मोदींनी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली असती तर भारतातील सर्व वृत्तपत्रांमध्ये ठळक बातमी असती की मोदींनी गरीबांसाठी 3 हजार कोटी रुपये दिले. न बोलता, ठळक बातमी न छापता, कुठलाही गाजावाजा न करता गरीबांच्या घरी 3 हजार कोटी रुपये पोहचले, त्यांच्या खात्यात जमा झाले. आज अडचणींवर तोडगा निघतो. संकटप्रसंगी सरकार उपयोगी पडते. तेव्हाच खरा विकास होतो आणि मन स्वच्छ असल्याचा हाच तर पुरावा आहे.
मित्रांनो, तुमचे सरकार ही सर्व कामे करू शकत आहे, तर त्यामागे एक मोठे कारण आहे… तुम्हाला माहित आहे हे सगळे कसे होत आहे, तुम्ही सांगा, एवढा सारा पैसा आम्ही खर्च करत आहोत, एवढ्या योजना राबवत आहोत. हे कसे होत आहे, काय कारण आहे. तुम्ही सांगू शकाल… मोदी नाही, हे यामुळे होत आहे कारण पूर्वी दलाल मलई खायचे, आज ते सगळं बंद झालं आहे. चोरी, लूट यांच्या दुकानांना टाळे लागले आहे.गरीबांच्या हक्काचं गरीबाला मिळत आहे. आणि म्हणूनच पै-पैचा सदुपयोग होत आहे. सर्वात मोठे कारण आहे की दलाल गेले, कमिशन खाणाऱ्यांविरोधात एक व्यापक स्वच्छता अभियान सुरु आहे. जेव्हा मी शहरातील स्वच्छतेबाबत बोलतो, गावातील स्वच्छतेबाबत बोलतो, तशी मी सरकारमध्येही सफाई मोहीम सुरु केली आहे.
दिल्लीत सत्तेच्या मार्गिकेपासून बाजार, शिधावाटप केंद्रापर्यंत दलालांना हटवण्याची मोहीम या चौकीदाराने हाती घेतली आहे. आणि याचाच परिणाम आहे की जे सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार समजत होते, पिढ्यानपिढ्या राज परंपरेप्रमाणे ही खुर्ची त्यांच्याच नावावर लिहिण्यात आली होती. असेच ते समजत होते. असे मोठमोठे दिग्गज देखील आज कायद्याच्या पिंजऱ्यात उभे दिसत आहेत. संरक्षण खरेदी विषयक सौद्यात भ्रष्टाचाराला त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. घाम सुटत आहे, तुम्ही पाहिले डोळे विस्फारलेले आहेत.
बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या सरकारने दलालांच्या ज्या संस्कृतीला व्यवस्थेचा भाग बनवले होते, त्यांनी गरीबांचा अधिकार तर हिरावून घेतलाच होता. देशाच्या सुरक्षेशी देखील खेळ केला. मी काल वर्तमानपत्रांमध्ये पाहत होतो की हेलिकॉप्टर घोटाळ्यातील ज्या दलालांचा शोध सरकार घेत आहे, त्या दलालांपैकी एकाला परदेशातून इथे आणण्यात आले आहे. आता तो तुरुंगात आहे. त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार तो केवळ हेलिकॉप्टर सौद्यात सहभागी नव्हता, तर पूर्वीच्या सरकारच्या काळात लढाऊ विमानांचा सौदा जिथे होत होता त्यातही त्याचा सहभाग होता. प्रसारमाध्यमे म्हणत आहेत की, हा मिशेलमामा कुठल्यातरी दुसऱ्या कंपनीच्या विमानांसाठी लॉबिंग करत होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे की काँग्रेसचे नेते आता जो आवाज उठवत आहेत त्याचा मिशेलमामाशी काय संबंध आहे. याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल कि नाही, द्यायला हवे की नको , या मिशेलमामाशी कुणाचे नाते आहे हे सांगायला हवे की नको. मला जरा सांगा, देश लुटू द्यायला हवा का… पै-पैचा हिशोब मागायला हवा कि नको. चौकीदाराने आपले काम करायला हवे की नको… चौकीदाराने जागे राहायला हवे कि झोपायला हवे… चौकीदाराने मोठ्या हिमंतीने पुढे यायला हवे की नको.. चौकीदाराला तुमचा आशीर्वाद आहे कि नाही.. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून चौकीदार लढत आहे. मोठमोठया दिग्गजांविरोधात लढत आहे. मिशेलमामाच्या सौदेबाजीमुळे त्यावेळी करार रखडला होता का.
मित्रांनो, या असंख्य प्रश्नांचे उत्तर तपास यंत्रणा तर शोधतच आहेत, देशातील जनता देखील उत्तर मागत आहे. दलालांचे हे जे सगे सोयरे आहेत त्यांना देशाच्या सुरक्षेशी करण्यात आलेल्या तडजोडीचे उत्तर द्यावे लागेल. लाचलुचपत खोरांचे सगळे मित्र एकत्र येऊन चौकीदाराला घाबरवण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र मोदी आहे दुसऱ्या मातीचा बनला आहे… त्याला विकत घेऊ शकणार नाही किंवा त्याला घाबरवू शकणार नाही. तो देशासाठी पै-पैचा हिशेब घेईलच. मात्र मला माहित आहे की त्यांच्या हाती निराशा येणार आहे. कारण हा चौकीदार झोपत नाही आणि कितीही अंधार असला तरी तो अंधार पार करून चोरांना पकडण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे.
बंधू आणि भगिनींनो, चौकीदाराच्या या शक्तीमागचे कारण काय?… मी तुम्हाला विचारतो,या चौकीदाराच्या शक्तिमागचे कारण काय आहे… अशी कोणती ताकद आहे… बंधू आणि भगिनींनो, तुमचे आशीर्वाद हीच चौकीदाराची ताकद आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की ते लोक मला लाख शिव्या देऊ दे , सातत्याने खोटे बोलतील, पुन्हापुन्हा खोटे बोलतील, जिथे हवे तिथे खोटे बोलतील, जोरजोरात खोटे बोलतील मात्र हा चौकीदार हे स्वच्छता अभियान बंद करणार नाही. नवीन भारतासाठी दलालांपासून मुक्त व्यवस्था निर्माण व्हायला हवी.
याच विश्वासासह पुन्हा एकदा अनेक विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. अनेक शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद!