गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी जी, स्थायी समितीचे अध्यक्ष डी. राजगोपालन जी, संचालक प्राध्यापक एस. सुंदर मनोहरन जी, विविध शाखांचे अध्यापक सदस्य, पालक आणि माझे सर्व युवा मित्रांनो!
पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभानिमित्त आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! जे मित्र आज पदवीधर होत आहेत, त्यांना आणि त्यांच्या माता-पित्यांना खूप-खूप शुभेच्छा! आज देशाला आपल्यासारखे ‘उद्योग सज्ज पदवीधर’ मिळत आहेत. आपले अभिनंदन, आपण घेतलेल्या परिश्रमासाठी, आपण या विद्यापीठामध्ये जे शिकले आहे, त्यासाठीही शुभेच्छा. राष्ट्रनिर्माणाचे जे मोठे लक्ष्य समोर ठेवून आपण इथून प्रस्थान करणार आहात , यशोशिखर गाठण्याच्या या नवीन प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा !!
आपल्याकडचे कौशल्य, आपली प्रतिभा, आपले व्यवसायिक गुण यामुळे तुम्ही आत्मनिर्भर भारताची एक मोठी ताकद बनणार आहात, असा मला विश्वास आहे. आज पीडीपीयू’शी संबंधित पाच वेगवेगळ्या प्रकल्पांचेही उद्घाटन आणि शिलान्यास झाला आहे. या नवीन सुविधा, पीडीपीयू ला देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्येच नाही तर व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास आणि स्टार्ट-अप परिसंस्थेचे एक प्रमुख केंद्र बनवणार आहेत.
मित्रांनो,
अगदी प्रारंभीच्या काळापासूनच मी या विद्यापीठाच्या प्रकल्पांबरोबर जोडला गेलो आहे आणि म्हणूनच या गोष्टी पाहून मला खूप आनंद होतो. आज पीडीपीयू देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपले स्वतःचे एक स्थान तयार करीत आहे, आपली ओळख निर्माण करीत आहे. मी आज इथे मुख्य अतिथी म्हणून नाही तर आपल्या या महान संकल्पाचा जो परिवार आहे, त्या परिवाराचा एक सदस्य म्हणून आपल्यामध्ये आलो आहे.
हे विद्यापीठ आपल्या काळाच्याही खूप पुढे गेल्याचे पाहून मला खूप अभिमान-गर्व वाटतो. एक काळ असाही होता की, लोक अनेक प्रश्न विचारत होते. अशा पद्धतीचे विद्यापीठ चालले की नाही, पुढे त्याचे काय होणार? परंतु इथल्या विद्यार्थ्यांनी , प्राध्यापक मंडळींनी, इथून बाहेर पडलेल्या व्यावसायिकांनी आपल्या कर्तृत्वाने या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
गेल्या दीड दशकामध्ये पीडीपीयूने पेट्रोलियम क्षेत्राबरोबरच संपूर्ण ऊर्जा क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्येही आपला विस्तार केला असून पीडीपीयूची प्रगती पाहून आज मी गुजरात सरकारलाही आवाहन करतो की, ज्यावेळी मी हे काम सुरू करण्याविषयी विचार करीत होतो, त्यावेळी माझ्या मनामध्ये पेट्रोलियम विद्यापीठाचा विषय आला. याचे कारण म्हणजे गुजरात पेट्रोलियम क्षेत्रामध्ये खूप पुढे जाऊ इच्छित होता. परंतु आता ज्या प्रकारे देश आणि जगाची आवश्यकता आहे, त्यानुसार या विद्यापीठाने आपले एकओळख निर्माण केली आहे , त्यामुळे या विद्यापीठाला फक्त पेट्रोलियम विद्यापीठापुरते मर्यादित न ठेवता एक ऊर्जा विद्यापीठाच्या स्वरूपामध्ये परिवर्तित करणे खूप योग्य ठरणार आहे. माझा गुजरात सरकारला आग्रह आहे की, आवश्यकता भासली तर यासाठी कायद्यामध्ये परिवर्तन करण्यात यावे . कारण या विद्यापीठाचे स्वरूप- कार्यकक्षा आता खूप विस्तारणार आहे. आपण लोकांनी इतक्या कमी कालावधीमध्ये जे काही कमावले आहे, जे काही देशाला दिले आहे, कदाचित त्यापेक्षाही खूप जास्त लाभ ऊर्जा विद्यापीठ म्हणून या संस्थेचा विस्तार केला तर देशाला होईल. पेट्रोलियम विद्यापीठ ही कल्पना माझी होती आणि माझ्याच कल्पनेचा विस्तार करून मी पेट्रोलियमच्या जागी संपूर्ण ऊर्जा क्षेत्राला याबरोबर जोडण्याचा आपल्याला आग्रह करीत आहे. तुम्ही लोकांनी विचार करावा आणि जर योग्य वाटत असेल तर माझ्या सल्ल्याविषयी निर्णय घ्यावा.
आज इथे स्थापित होत असलेल्या 45 मेगावॅटच्या सौर पॅनल उत्पादनाचा प्रकल्प असो अथवा ‘जल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र’ असो पीडीपीयूची देशासाठी असलेली दूरदृष्टी प्रकट करते.
मित्रांनो,
संपूर्ण दुनियेमध्ये कोविड महामारीच्या उद्रेकामुळे ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येत आहे आणि अशाच काळात आपण उद्योग विश्वात पाऊल ठेवत आहात, विद्यापीठातून बाहेर पडून उद्योगाच्या दिशेने पुढे जाणार आहात. अशा काळामध्ये आज भारतात ऊर्जा क्षेत्रामध्ये वाढीच्या, उद्योग संस्थांचे काम सुरू करण्यासाठी, रोजगार निर्मितीमध्ये अपार संभावना आहेत. याचाच अर्थ आपण अगदी योग्य वेळी, योग्य क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहात. या दशकामध्ये केवळ तेल आणि वायू क्षेत्रामध्येच लाखो कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. म्हणूनच आपल्यासाठी संशोधनापासून ते उत्पादनापर्यंत अनेक संधीच संधी उपलब्ध आहेत.
मित्रांनो,
आज देशाने कार्बन उत्सर्जन 30 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, त्यादिशेने काम सुरू केले आहे. मी ही गोष्ट सांगितली त्यावेळी सर्वांनी नवल व्यक्त केले. भारत हे करू शकतो का? असा प्रश्न उपस्थित झाला. प्रयत्न असा आहे की, या दशकामध्ये आपल्या ऊर्जेच्या गरजेपैकी नैसर्गिक वायूचा हिस्सा चौपट वाढविण्यात येणार आहे. देशाची तेल शुद्धिकरणाची क्षमताही आगामी पाच वर्षांमध्ये जवळ-जवळ दुप्पट करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. यामध्येही तुम्हा सर्वांसाठी अनेक संभावना आहेत. देशाच्या ऊर्जा सुरक्षेविषयी संबंधित स्टार्ट-अप परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम सुरू आहे. या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यासाठी एक विशेष निधीही तयार करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे काही नवसंकल्पना असेल, काही उत्पादन असेल किंवा कोणतीही संकल्पना असेल आणि ती तुम्ही ‘इनक्यूबेट’ करू इच्छित असाल तर हा निधी आपल्यासाठी एक चांगली संधी देणार आहे. ही तर सरकारच्यावतीने एक भेट आहे.
आज ज्यावेळी मी आपल्याशी बोलतो आहे, त्यावेळी थोडी काळजीही तुम्हाला वाटत असणार. आपण विचार करीत असणार की, कोरोनाचा काळ आहे, सर्व काही ठीक होईल की नाही, माहिती नाही. आणि यामध्ये आपल्या मनामध्ये ज्या चिंता येत आहेत, त्या अगदी स्वाभाविकही आहेत याची मला जाणीव आहे. संपूर्ण जगापुढे एका खूप मोठ्या समस्येचे आव्हान असताना तुम्ही पदवी संपादन करीत आहात, ही काही फार सोपी गोष्ट नाही. मात्र तुमच्यामध्ये असलेली क्षमता या आव्हानांपेक्षा खूप मोठी, प्रचंड आहे. हा विश्वास मनाशी पक्का ठेवा, असा विश्वास कधीही ढळू देऊ नका.
समस्या काय आहे, त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे की, आपला उद्देश काय आहे, आपले प्राधान्यक्रम काय आहेत आणि आपले नियोजन काय आहे? आणि म्हणूनच एक गोष्ट आवश्यक आहे की, आपल्याजवळ एक उद्देश असला पाहिजे, प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे आणि त्याच्यासाठी अतिशय ‘परफेक्ट’ आराखडाही तयार केला पाहिजे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये काही पहिल्यांदाच अवघड प्रसंगाला सामोरे जात आहात, असे नाही. त्याचबरोबर ही तुम्हाला आलेली अखेरची समस्या आहे, असेही नाही. कोणाही यशस्वी व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागत नाही, असेही कधी नसते. मात्र जी व्यक्ती आव्हानांचा स्वीकार करतो, जी व्यक्ती आलेल्या समस्येशी दोन हात करतो आणि समस्येवर मात करतो, जी व्यक्ती समस्यांवर उपाय शोधतो तोच जीवनामध्ये यशस्वी होत असतो. कोणाही यशस्वी व्यक्तीला तुम्ही पहा, प्रत्येकजण आलेल्या आव्हानांना सामोरे जाऊनच, त्या प्रश्नांची सोडवणूक करून पुढे गेला आहे.
मित्रांनो,
जर तुम्ही शंभर वर्षांपूर्वीचा काळ आठवलात आणि मला वाटते की आज माझ्या देशातील तरुणांनी तो शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आठवावा. आज आपण 2020 मध्ये आहोत, विचार करा, 1920 मध्ये जो तुमच्या वयाचा होता, आज तुम्ही 2020 मध्ये त्या वयाचे आहात. 1920 मध्ये जो तुमच्या वयाचा होता त्याची स्वप्ने काय होती? 1920 मध्ये जो तुमच्या वयाचा होता त्याच्या भावना काय होत्या, त्याचे विचार काय होते? जरा शंभर वर्षे जुना इतिहास नजरेघालून घाला. आठवलंत तर लक्षात येईल की 1920 पासून सुरु झालेला कालखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्वाचा होता.
तसेही स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान, गुलामगिरीच्या कालखंडात एकही वर्ष असे नव्हते की स्वातंत्र्याची लढाई लढली नाही. 1857 चा स्वातंत्र्य संग्राम हा निर्णायक टप्पा ठरला होता, मात्र 1920 पासून 1947 पर्यंतचा जो कालखंड होता, तो एकदम वेगळा होता. आपल्याला त्या काळात इतक्या घटना दिसतात, देशातील प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वर्गात म्हणजे संपूर्ण देशातील प्रत्येक मुले, प्रत्येक घटकातील व्यक्ती, गाव असो, शहर असो, शिकले-सवरलेले असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईतील सैनिक बनला होता. लोकं एकजूट झाली होती. स्वतःच्या आयुष्यातील स्वप्नांना लोकांनी आहुती दिली होती आणि स्वातंत्र्याचा संकल्प केला होता. आणि आपण पाहिले आहे 1920 पासून 1947 पर्यंतची जी तरुण पिढी होती, ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. आज अनेकदा आपल्याला तेंव्हाच्या पिढीचा हेवा वाटतो. कधीकधी मनात येते माझाही जन्म 1920 ते 1947 दरम्यानच्या काळात झाला असता तर मी देखील देशासाठी भगतसिंग बनलो असतो. आठवलंत तर असे वाटत असेल. मात्र मित्रांनो, आपल्याला त्यावेळी देशासाठी प्राण देण्याची संधी मिळाली नाही, मात्र आज आपल्याला देशासाठी जगण्याची संधी मिळाली आहे.
त्यावेळचे तरुणही आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करून केवळ एका उद्दिष्टासाठी काम करत होते आणि ते उद्दिष्ट काय होते, एकच उद्दिष्ट होते -भारताचे स्वातंत्र्य, भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणे आणि त्यातही अनेक प्रवाह होते, वेगवेगळ्या विचारांचे लोक होते, मात्र सर्व प्रवाह एकाच दिशेने जात होते आणि ती दिशा होती- भारतमातेचे स्वातंत्र्य. मग ते महात्मा गांधी यांचे नेतृत्व असेल, सुभाषबाबूंचे नेतृत्व असेल, भगत सिंह, सुखदेव,राजगुरू यांचे नेतृत्व असेल, वीर सावरकरांचे नेतृत्व असेल, प्रत्येकजण, विचारसरणी वेगवेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील रस्ते वेगळे असतील मात्र ध्येय एकच होते – भारतमातेचे स्वातंत्र्य.
काश्मीरपासून काळ्या पाण्यापर्यंत, प्रत्येक क्षणाला कोठडीत, फाशीच्या सुळावर एकच आवाज घुमायचा, भिंतीमधून एकच आवाज यायचा, फाशीचे दोरखंड एकाच नाऱ्याने सुशोभित व्हायचे आणि तो नारा होता, तो संकल्प होता, जीवनाची श्रद्धा होती -स्वतंत्र भारत .
माझ्या तरुण मित्रांनो,
आज आपण त्या काळात नाहीत, मात्र आजही मातृभूमीच्या सेवेची संधी तशीच आहे. जर त्यावेळी तरुणांनी आपल्या तारुण्याचा काळ स्वातंत्र्यासाठी समर्पित केला तर आपण आत्मनिर्भर भारतासाठी जगायला शिकू शकतो. जगून दाखवू शकतो. आज आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी स्वतःलाच एक चळवळ बनवायचे आहे, या चळवळीतील सैनिक व्हायचे आहे, एका चळवळीचे नेतृत्व करायचे आहे. आज आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाला, विशेषतः माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्याकडून मला अपेक्षा आहेत, आपल्याला स्वतःला यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
आजचा भारत, परिवर्तनाच्या एका मोठ्या कालखंडातून जात आहे. तुमच्यावर वर्तमानाबरोबरच भविष्यातील भारत निर्माण करण्याची देखील खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही विचार करा, कुठल्या सुवर्णकाळात तुम्ही आहात. कदाचित तुम्ही देखील विचार केला नसेल, स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे 2047 मध्ये पूर्ण होत आहेत. याचा अर्थ ही 25 वर्षे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची वर्षे आहेत. देशाची 25 महत्वपूर्ण वर्षे आणि तुमची महत्वपूर्ण 25 वर्ष एकाचवेळी आहेत. असे सौभाग्य क्वचितच कुणाला लाभत असेल जे तुम्हाला लाभले आहे.
तुम्ही पाहा, आयुष्यात तेच लोक यशस्वी होतात, तेच लोक काही करून दाखवतात, ज्यांच्या आयुष्यात जबाबदारीची जाणीव असते. यशाची सर्वात मोठी सुरुवात, त्याचा ठेवा ही जबाबदारीची जाणीव असते. आणि कधी तुम्ही बारकाईने पाहाल तर जे अयशस्वी होतात त्यांच्या आयुष्याकडे पाहिलेत, तुमच्या मित्रांकडे पाहिलेत तर त्याचे कारण असेल, त्यांच्या मनात जबाबदारीच्या भावनेऐवजी दबावाची भावना असते, त्याच्या ओझ्याखाली ते दबलेले असतात.
हे पाहा मित्रांनो,
जबाबदारीची भावना व्यक्तीच्या जीवनात संधीची जाणीव देखील निर्माण करते. त्याला मार्गात कधीही अडथळे दिसत नाहीत तर केवळ संधीच दिसतात. जबाबदारीची भावना व्यक्तीच्या आयुष्यातील उद्देशाशी सुसंगत असेल तर त्यात विसंगती असायला नको. त्यांच्यात संघर्ष व्हायला नको. जबाबदारीची भावना आणि आयुष्याचा उद्देश हे असे दोन रूळ आहेत ज्यावर तुमच्या संकल्पांची गाडी अतिशय जलद गतीने धावू शकते.
माझी तुम्हाला विनंती आहे कि आपल्या अंतर्मनात एक जबाबदारीची जाणीव जरूर कायम ठेवा. ही जबाबदारीची जाणीव देशासाठी असावी, देशाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असावी. आज देश अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे.
मित्रांनो,
इच्छांपेक्षा संकल्पाची ताकद अपरंपार असते. करायला खूप काही आहे, देशासाठी मिळवायचे खूप काही आहे, परंतु तुमचा संकल्प, तुमचे लक्ष्य, विखुरलेले असू नये. तुकड्यांमध्ये विखुरलेले असू नये. तुम्ही वचनबद्धतेसह पुढे जाल, ऊर्जेचा एक विशाल साठा तुम्हाला जाणवेल. तुमच्या मनात ऊर्जेचा जो साठा आहे, तो तुम्हाला पुढे नेईल, नवनवीन कल्पना देईल, नव्या उंचीवर घेऊन जाईल. आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी, आज आपण जे काही आहोत, जिथे कुठे पोहचलो आहोत, थोडे मनाला विचारा, तुम्ही यामुळे तिथपर्यंत पोहचला आहात का कारण तुम्हाला चांगले गुण मिळाले होते, तुमच्या आईवडिलांकडे पैसे खूप होते, की तुमच्याकडे प्रतिभा होती. ठीक आहे, या सर्व गोष्टींचे योगदान असेल, मात्र जर असा दृष्टिकोन असेल तर हा दृष्टिकोन खूप अपूर्ण आहे. आज आपण जिथे आहोत, जे काही आहोत, आपल्यापेक्षा अधिक आपल्या आसपासच्या लोकांचे योगदान आहे, समाजाचे योगदान आहे, देशाचे योगदान आहे, देशातील गरीबातील गरीबांचे योगदान आहे. तेंव्हा कुठे मी आज इथे पोहचलो आहे. कधी-कधी आपल्याला याची जाणीवच नसते.
आज देखील ज्या विद्यापीठात आहात, ते उभारण्यासाठी कितीतरी मजूर बंधू भगिनींनी आपला घाम गाळला आहे, कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपला कर भरला असेल, तेंव्हा कुठे हे विद्यापीठ उभे राहिले आहे. या विद्यापीठात तुमचे शिक्षण होईल, असे अनेक लोक असतील ज्यांची नवे तुम्हाला देखील माहित नसतील. मात्र त्यांचेही तुमच्या आयुष्यात काहींना काही ऋण आहे. त्यांचेही तुमच्या आयुष्यात काहीना काही योगदान आहे. आपल्याला नेहमी ही जाणीव असायला हवी की आपण त्या लोकांचे देखील ऋणी आहोत, आपल्यावर त्यांचेही कर्ज आहे. आपल्याला समाजाने, देशाने इथपर्यंत पोहचवले आहे, म्हणूनच आपण देखील संकल्प करायला हवा की आपणही देशाचे जे माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज मी फेडेन, मी ते समाजाला परत करेन.
मित्रांनो,
मानवी जीवनासाठी गति आणि प्रगती अनिवार्य आहेत. त्याचबरोबर आपल्याला भावी पिढीसाठी निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे देखील तितकेच आवश्यक आहे. उदा- स्वच्छ ऊर्जा उज्ज्वल भविष्याची आशा आहे, तसेच आयुष्यात देखील दोन गोष्टी आवश्यक आहेत- एक कोरी पाटी आणि दुसरी स्वच्छ मन. आपण अनेकदा ऐकतो, तुम्ही सांगत देखील असाल, तुम्ही ऐकतही असाल, सोड मित्रा, हे तर असेच असते, काही होणार नाही, छोड़ यार, आपले काय आहे चला एडजस्ट करा, चलो, चलते चलो, नाही होऊ शकणार. अनेकदा लोक म्हणतात की देशात हे सगळे असेच चालेल, आमच्याकडे तर असेच चालत आले आहे. अरे बाबा, हीच तर आपली परंपरा आहे. असेच होणार आहे.
मित्रांनो,
या सर्व गोष्टी हार मानलेल्या मनातील गोष्टी आहेत. या तुटलेल्या मनातील गोष्टी असतात. एक प्रकारे गंज लागलेल्या मेंदूतील गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी काही लोकांच्या मनात मेंदूत चिकटलेल्या असतात, ते याच दृष्टिकोनातून प्रत्येक काम करत असतात. मात्र आजची जी पिढी आहे, 21 व्या शतकातील जो तरुण आहे त्याला एका स्वच्छ पाटीसह पुढे जावे लागेल. काही लोकांच्या मनात ही जी दगडावरची रेघ बनली आहे काही बदलणार नाही, ती रेषा आपल्याला पुसून टाकायची आहे. त्याचप्रकारे स्वच्छ मन, याचा अर्थ मला समजावा लागणार नाही. स्वच्छ मनाचा अर्थ आहे निर्मळ मन.
मित्रांनो,
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीविषयी पूर्व-ग्रह मनात ठेऊन पुढे जाता तेव्हा आपण नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी स्वतःहून दरवाजे बंद करत असतो.
मित्रांनो,
वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा तेथे अनेक आव्हाने होती, वेगवेगळ्या स्तरावर काम सुरु होते. मी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलो होतो, आधी मी दिल्लीत काम करायचो, अचानक गुजरातला यावे लागले, मला इथे राहायला जागा नव्हती, तेव्हा मी गांधीनगरच्या सर्किट हाऊसमध्ये एक खोली बुक केली, कारण अजून शपथ विधी झाला नव्हता. पण मी हे निश्चित झाले होते की मी मुख्यमंत्री होणार आहे. म्हणूनच लोक पुष्पगुच्छ घेऊन भेटायला येत होते. पण जे लोक मला भेटायला यायचे ते मला सांगायचे की मोदी जी तुम्ही मुख्यमंत्री झालात की, एक काम करा मित्रांनो,
जेव्हा आपण एखद्या गोष्टीविषयी पूर्व-ग्रह मनात ठेऊन पुढे जाता तेव्हा आपण नवीन गोष्टी आत्मसाद करण्यासाठी स्वतःहून दरवाजे बंद करतो.
मित्रांनो,
वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो. तेथे अनेक आव्हाने होती, वेगवेगळ्या स्तरावर काम सुरु होते. मी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलो होतो, आधी मी दिल्लीत काम करायचो, अचानक गुजरातला यावे लागले, मला इथे राहायला जागा नव्हती, तेव्हा मी गांधीनगरच्या सर्किट हाऊसमध्ये एक खोली बुक केली, कारण अजून शपथ विधी झाला नव्हता. पण मी हे निश्चित झाले होते की मी मुख्यमंत्री होणार आहे. म्हणूनच लोक पुष्पगुच्छ घेऊन भेटायला येत होते. पण जे लोक मला भेटायला यायचे ते मला सांगायचे की मोदी जी तुम्ही मुख्यमंत्री झालात की, एक काम करा काहीही करा पण कमीत कमी, संध्याकाळी जेवताना तरी वीज असावी, असे काही तरी करा. सुमारे 70-80 टक्के लोक असेच म्हणायचे, तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल.यावरून तुम्ही विचार करू शकता की त्यावेळी विजेची स्थिती काय होती.
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती की मला पण विजेचे महत्व माहित होते. मी देखील विचार करत होतो यावर कायमस्वरूपी तोडगा काय आहे? याविषयी मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा ते सांगायचे की ही परिस्थिती अशीच राहील. आपल्याकडे जेवढी वीज उपलब्ध आहे त्यामध्ये आपण इतकीच वीज देऊ शकतो. जेव्हा आपण जास्त वीजनिर्मिती करू तेव्हा याचे निराकरण होईल. मी विचारले, सद्यस्थितीमध्ये काही तोडगा निघू शकतो का? देवाच्या कृपेने, एकंदर परिस्थिती लक्षात घेता मला एक कल्पना मनात आली. मी म्हणालो आपण एक काम करू शकतो का? कृषी फीडर आणि घरगुती वापरासाठी दिली जाणारी वीज या दोघांना आपण वेगळे करू शकतो का ? कारण लोकांनी अशी वातावरण निर्मिती केली होती की, शेतात वीज चोरी होते, अमुक होते तमुक होते अशा नाना गोष्टी मी ऐकत होतो. या सर्व वातावरणात मी नवीन होतो, त्यामुळे मला सर्व काही समजावून सांगण्यात अडचण येत होती कारण सगळे मोठे मोठे अधिकारी त्यांना गोष्टी समजतील की नाही हा प्रश्न होता.
अधिकारी माझ्याशी सहमत नव्हते. कारण याबाबत पूर्वधारणा होत्या, असे होऊ शकत नाही. कोणीतरी म्हणाले हे शक्य नाही. काहींनी आर्थिक स्थिती नसल्याचे म्हटले तर काहींनी वीज नसल्याचे सांगितले. आपणास आश्चर्य वाटेल की यासाठी जे दस्तावेज तयार करण्यात आले त्याचे वजन देखील 5-7-10 किलो पर्यंत पोहोचले असेल. प्रत्येक वेळी प्रत्येक पर्याय नकारात्मक होता.
आता मी विचार करत होतो की मलाच काहीतरी करावे लागेल. यानंतर मी दुसर्या पर्यायावर काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर मी उत्तर गुजरातमधील 45 गावांशी सलंग्न असणाऱ्या एका सोसायटीला बोलवले. मी म्हणालो, माझे एक स्वप्न आहे, तुम्ही मला मदत करू शकता का? ते म्हणाले आम्हाला विचार करायला वेळ द्या. मी त्यांना म्हणालो की तुम्ही यासाठी अभियांत्रिकी इ. ची मदत घ्या. मी त्यांना सांगितले की माझी एक इच्छा आहे की, खेड्यात शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी जी वीज वापरली जाते त्याचा पुरवठा वेगवेगळा कारायचा आहे. ते पुन्हा आले, ते म्हणाले सर, आम्हाला कोणत्याही मदतीची गरज नाही. यासाठी गुजरात सरकारने आम्हाला 10 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिली पाहिजे. मी म्हणालो, ही माझी जबाबदारी आहे. आम्ही परवानगी दिली.
त्यांनी हे काम सुरू केले. मी अभियंत्यांना हे काम करण्यासाठी थोडा आग्रह केला आणि त्या 45 गावातील घरगुती आणि कृषी वीज पुरवठा वेगळा केला. परिणामी, शेतीला जितकी विजेची आवश्यकता होती तेवढी दिली जायची, शेतीत वीजपुरवठा करावा लागणारा वेळ वेगळा होता, आणि घरांमध्ये आता 24 तास वीज पुरवठा होऊ लागला होता. त्यांनतर मी शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यापीठातील तरुणांना तिथे पाठवले आणि त्यांच्याकडून स्वतंत्र मूल्यांकन केले. आपणास आश्चर्य वाटेल की गुजरातमध्ये जिथे रात्रीच्या जेवणाच्या वेळी वीज मिळणे देखील अवघड होते, तिथे 24 तास वीज उपलब्ध झाली. शिंपीदेखील इलेक्ट्रिक शिवण यंत्र वापरू लागले. परिट देखील कपड्यांना इस्त्री करण्यासाठी विजेची इस्त्री वापरायला लागले. स्वयंपाकघरातही बर्यापैकी विद्युत उपकरणे येऊ लागली. लोकांनी एसी, पंखे, टीव्ही खरेदी करण्यास सुरवात केली. एक प्रकारे संपूर्ण आयुष्य बदलू लागले. सरकारचे उत्पन्नही वाढले.
या प्रयोगामुळे त्या काळातील सर्व अधिकाऱ्यांची मने बदलली. शेवटी निर्णय झाला की मार्ग योग्य आहे. आणि संपूर्ण गुजरातमध्ये एक हजार दिवसाचा कार्यक्रम तयार केला. एक हजार दिवसात कृषी फीडर आणि घरगुती फीडर वेगळे केले जातील. आणि एक हजार दिवसात गुजरातमधील सर्व घरात चोवीस तास वीज मिळणे शक्य झाले. जर मी तो पूर्वग्रह धरून बसलो असतो तर हे शक्य झाले नसते, माझी पाटी कोरी होती. मी नव्याने विचार करायचो आणि त्याचाच हा सकारात्मक परिणाम झाला.
मित्रांनो,
एका गोष्टीचा विचार करा: निर्बंधाने फरक पडत नाही, तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे. मी आणखी एक उदाहरण देतो. आपल्या स्तरावर सौर धोरण राबविणारे गुजरात हे पहिले राज्य होते. तेव्हा असे म्हटले गेले की सौरऊर्जेची किंमत प्रति युनिट 12 ते 13 रुपये होईल. त्यावेळी ही किंमत खूप जास्त होती कारण औष्णिक उर्जा दोन, अडीच, तीन रुपयांमध्ये उपलब्ध होती. तीच वीज आता 13 रुपये प्रति युनिटआहे, आता तुम्हाला हे माहित आहे की आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये कमतरता शोधण्याची, खोड काढण्याची फॅशन झाली आहे, त्यावेळी तर माझ्यासाठी ही खूपच मोठी समस्या होती. आता हा विषय माझ्यासमोर आला. सर, मोठे वादळ उठले आहे. कुठे 2-3 रुपयांनी मिळणारी वीज आणि कुठे 12-13 रुपयांनी मिळणारी वीज.
पण मित्रांनो,
माझ्यासमोर असा एक क्षण आला होता की मी माझ्या प्रतिष्ठेची चिंता करावी की माझ्या भावी पिढीविषयी चिंता करावी? मला माहित होते की प्रसारमाध्यमे या निर्णयाबद्दल वाईट प्रचार करतील, माझ्यावर विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप होतील, बऱ्याच गोष्टी घडतील. पण माझे विचार आणि मन स्वच्छ होते. आपली जीवनशैली बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस करावेच लागेल हे मला माहित होते.
अखेरीस आम्ही निर्णय घेतला. सौर उर्जा वापरण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही हा निर्णय प्रामाणिकपणाने घेतला. उज्ज्वल भविष्यासाठी, एक दृष्टीकोन समोर ठेऊन.
गुजरातमध्ये सौरऊर्जा उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. पण ज्यावेळी गुजरातने धोरण बनविले, त्याच वेळी केंद्र सरकारने देखील अगदी तसेच धोरण बनवले. परंतु त्यांनी काय केले, त्यांनी 18-19 रुपयांची किंमत निश्चित केली. आता आमचे अधिकारी माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर, आपण 12-13 रुपयांनी देत आहोत , जर त्यांनी 18-19 रुपयांनी दिले तर आपल्याकडे कोण येईल. मी म्हणालो, अजिबात नाही , मी 12-13 वर ठाम आहे, मी 18-19 देण्यास तयार नाही, विकासासाठी आपण अशी एक व्यवस्था तयार करू, आपण पारदर्शकतेने, वेगाने काम करू. संपूर्ण जग आपल्याकडे येईल, सुशासनाच्या मॉडेलसह पुढे मार्गक्रमण करूया आणि सौर उर्जा उत्पादनात गुजरात आज कोठे पोहचला आहे हे आपण पाहत आहात. आणि आज विद्यापीठ स्वत: हे काम पुढे नेण्यासाठी पुढे आले आहे.
12-13 रुपयांनी सुरू झालेल्या प्रवासाने आज संपूर्ण देशात सौर चळवळीचे रूप घेतले असून येथे आल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय सौर युती ही संस्था स्थापन केली, सुमारे 80-85 देश या संस्थेचे सदस्य झाले आहेत आणि संपूर्ण जगभर आता ही एक चळवळच झाली आहे. पण हे निश्चित आहे की, हे सर्व मी अगदी स्वच्छ मनाने केले आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज भारत सौर उर्जा क्षेत्रात मोठ्या जलद गतीने पुढे मार्गक्रमण करत आहे. आज, प्रति युनिट किंमत 12-13 रुपयांनी कमी होऊन ती दोन रुपये इतकी कमी झाली आहे.
सौरऊर्जा ही देशाचा प्रमुख प्राधान्यक्रम बनली आहे. आम्ही 2022 पर्यंत 175 गिगा वॉट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही 2022 च्या आधी तो पूर्ण करू. आणि 2030 पर्यंत आम्ही 450 गिगा वॉट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे एक मोठे लक्ष्य आहे. हे देखील वेळेआधी पूर्ण होईल, असा माझा विश्वास आहे.
असे काहीही नाही जे घडणार नाही. एकतर – मी ते घडवून आणीन 'किंवा मी ते घडवून आणणार नाही. हा विश्वास नेहमी तुमच्या कमी येईल.
मित्रांनो,
बदल स्वतःमध्ये करायचा असो की जगात, तो घडवून आणायचा असतो, बदल एका दिवसात, आठवड्यात किंवा वर्षात होत नाहीत. परिवर्त घडवून आणण्यासाठी आपल्याला निरंतर थोडे थोडे प्रयत्न करावे लागतात. नियमितपणे केलेली छोटी कामे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणतात. आपण दररोज किमान 20 मिनिटांसाठी काहीतरी नवीन वाचण्याची किंवा लिहिण्याची सवय लावू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हा देखील विचार करू शकता की काहीतरी नवीन शिकण्यासाठी दररोज 20 मिनिटांचा वेळ देऊया !
जर आपण सुरुवातीला पहिले तर ही केवळ 20 मिनिटे असतात. परंतु या वीस मिनिटांची एका वर्षातील बेरीज जवळपास 120 तास इतकी होते. या 120 तासांच्या प्रयत्नांमुळे आपल्यात किती मोठा बदल होईल हे लक्षात आल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
मित्रांनो,
तुम्ही क्रिकेटमध्येही पाहिले असेलच, जेव्हा एखाद्या संघाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागतो तेव्हा फलंदाज त्याला एकूण किती धावा कराव्या लागतील याचा विचार करत नाही.तो हा विचार करतो की प्रत्येक षटकात त्याला किती धावा करायच्या आहेत.
बरेच लोकं आर्थिक नियोजनात देखील हाच मंत्र वापरतात. ते दरमहा पाच हजार रुपये जमा करतात आणि दोन त्यांच्याकडे एक लाखाहून अधिक रुपये जमा होतात. असे निरंतर प्रयत्न, शाश्वत प्रयत्न तुमच्यामध्ये ती क्षमता निर्माण करतात, ज्याचे परिणाम अल्प कालावधीत दिसून येत नाहीत, परंतु दीर्घकाळासाठी ती तुमची खूप मोठी शक्ती बनते.
राष्ट्रीय स्तरावर जेव्हा देशदेखील असेच निरंतर कायमस्वरूपी प्रयत्न करत राहतो तेव्हा त्याचेही असेच सकारात्मक परिणाम दिसून येतात. उदाहरण म्हणून स्वच्छ भारत अभियान घ्या. आम्ही केवळ गांधी जयंती ऑक्टोबरमध्येच स्वच्छतेचा विचार करत नाही तर त्यासाठी दररोज आम्ही प्रयत्न करतो. मी देखील 2014 पासून 2019 पर्यंत जवळपास मन की बात च्या सर्व भागांमध्ये देशवासियांसोबत स्वच्छतेबद्दल बोललो आहे, चर्चा केली आहे, त्यांना विनंती केली आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयांवर थोडी-थोडी चर्चा व्हायची. परंतु कोट्यवधी लोकांच्या छोट्या प्रयत्नांनी स्वच्छ भारत एक जनआंदोलन झाले. हा निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे. परिणाम असेच दिसून येतात.
मित्रांनो,
21 व्या शतकात जगाच्या भारताकडून अनेक आशा-अपेक्षा आहेत आणि भारताच्या आशा आणि अपेक्षा तुमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्याला वेगाने चालावे लागेल, आपल्याला पुढे जावे लागेल. पंडित दीन दयाल उपाध्याय जी यांनी आपल्याला अंत्योदयाचा दृष्टीकोन दिला, त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या राष्ट्र प्रथम या तत्त्वाला आपल्याला अधिक मजबूत करायचे आहे. आपले प्रत्येक कार्य, हे देशासाठी असले पाहिजे हीच भावना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
पुन्हा एकदा, आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद !!