सरकारच्या विविध योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला गेल्या काही दिवसांपासून मिळते आहे. त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे विचार, अनुभव जाणून घेण्याची ही संधी म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो आणि मला नेहमीच थेट संवाद साधायला आवडतं. फाईल्सच्या पलीकडेही “लाईफ’ आहे आणि लोकांच्या “लाईफ’मध्ये जे परिवर्तन आले आहे, त्याचे अनुभव थेट त्याच्या तोंडून ऐकताना मनाला एक वेगळं समाधान मिळतं. काम करण्याची एक नवी ऊर्जा मला तुमच्याशी होणाऱ्या संवादातून मिळते. आज मला डिजिटल इंडियाच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.
मला सांगण्यात आलं आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला देशभरातील सुमारे तीन लाख सामायिक सेवा केंद्रांशी एकत्र संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. असे सगळे लोक आज इथे उपस्थित आहेत ते आज मला या सामायिक सेवा केंद्राना चालवणारे स्वयंसेवक आणि या केंद्रातून विविध सेवा घेणारे नागरिक यांच्याबद्दलचे आपले अनुभव सांगू शकतील. त्याशिवाय देशातल्या विविध भागातल्या राष्ट्रीय माहिती केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल इंडिया उपक्रमाचा लाभ मिळालेले लाभार्थी पण आज इथे जमले आहेत. राष्ट्रीय ज्ञान केंद्राशी संलग्न अशा 1600 संस्थामधले विद्यार्थी, संशोधक, शास्त्रज्ञ, व्यावसायिक आज आपल्यासोबत आहेत. देशभरात सरकारच्या योजनांसाठी जे बीपीओ केंद्र स्थापन झाली आहेत, त्या केंद्रांमध्ये काम करणारे युवकही या केंद्रातून आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. इतकेच नाही, तर मोबाईल उत्पादक कंपन्यांसाठी काम करणारे युवकही आज इथे आपल्यासोबत आहेत. ते आपल्या कंपन्या आपल्या सर्वांना दाखवतील आणि त्यांचे अनुभवही आपल्याला सांगतील.
आज देशभरातले लाखो लोक मायगोव्ह अँपवर सक्रिय आहेत, हे सगळे स्वयंसेवकही आपल्यासोबत आहेत. आपण जवळपास 50 लाख लोक आज एकत्र येऊन एकाच विषयावर संवाद साधणार आहोत, हा माझ्यासाठी एक अत्यंत अनोखा अनुभव आहे. सर्वांशी संवाद साधण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची एक अपूर्व संधी आपल्याला आज मिळाली आहे. जेव्हा डिजिटल इंडिया अभियान सुरु झालं होतं, तेव्हा देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला, पीडित, गरीब, शेतकरी, ग्रामीण युवक सगळ्यांना या डिजिटल जगाशी जोडण्याचा संकल्प आम्ही केला होता.
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या चार वर्षात आम्ही डिजिटल सक्षमीकरणाच्या प्रत्येक पैलूवर बरेच काम केले आहे. मग ते गावांना फायबर ऑप्टिकलने जोडणे असो किंवा कोट्यवधी लोकांना डिजिटली साक्षर करणे असो, सर्वसामान्य लोकांपर्यत सरकारी सुविधा आणि योजनांचे लाभ थेट मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवणे असो, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असो, स्टार्ट अप योजनांना प्रोत्साहन देणे, दुर्गम भागात बीपीओ केंद्र सुरु करणे, अशा अनेक योजना आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. निवृत्तिवेतन मिळणाऱ्या वृद्धांना आज कित्येक मैल दूर जाऊन आपण जिवंत असल्याचा दाखला नाही द्यावा लागत, तर ते आपल्या गावातच सामायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून आपले जीवन प्रमाणपत्र सहजपणे भरु शकतात. शेतकऱ्यांना हवामानाची माहिती हवी असेल, पिकांबद्दल माहिती हवी असेल,जमिनीची तपासणी करायची असेल, तर त्याला ती बसल्या जागेवर सहज उपलब्ध होऊ शकते. यासोबतच, ‘ई नाम’ या डिजिटल बाजारपेठेच्या पोर्टलवर तो आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा सामायिक सेवा केंद्राच्या मदतीने तो हे काम सहज करु शकतो.
गावांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आज केवळ शाळा-कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांवर अवलंबून नाहीत. ते इंटरनेटचा वापर करुन डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून लाखो पुस्तके मिळवू शकतात, वाचू शकतात. शिष्यवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी तो आता शाळा-कॉलेजच्या व्यवस्थानवर अवलंबून नाही, त्याच्या शिष्यवृत्तीची रक्कम आता थेट त्याच्या बँक खात्यात जमा होते. हे सगळं शक्य झालं आहे, तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेल्या दूरसंचार आणि डिजिटल क्रांतीमुळे !
अगदी काही वर्षांपूर्वी महानगरापासून दूर, छोट्या शहरात, गावांत, खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांनी या डिजिटल क्रांतीची कल्पनाही केली नसेल. रेल्वेस्टेशनवर गेल्याशिवाय, रांगेत उभे राहिल्याशिवाय घरच्याघरी तिकीट मिळू शकेल, आरक्षण मिळू शकेल किंवा रांगेत तासनतास वाया न घालवता स्वयंपाकाचा गॅस आपल्या घरापर्यत पोचू शकेल. कर, वीज, पाण्याचे बिल हे सगळं कोणत्याही सरकारी कार्यालयाचे खेटे ना घालता आपल्याला घरुन विनासायास भरता येईल. मात्र आज हे सगळे शक्य झाले आहे. तुमच्या आयुष्याशी संबंधित सगळी महत्वाची कामे आता एका बोटाच्या क्लिकवर होऊ शकतात. आणि असे नाही, की केवळ काही मोजक्या लोकांसाठी ह्या सुविधा उपलब्ध आहेत, या सुविधा सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता जास्तीत जास्त सुविधा आपल्या घरातच उपलब्ध होऊ शकतात. अगदी घराजवळ या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही देशभर सामायिक सेवा केंद्रे सुरु केली आहेत. ह्या केंद्रांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
आतापर्यत देशात 3 लाख सामायिक सेवा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. डिजिटल सेवा सुविधा केंद्रे आज देशातल्या 1 लाख 83 हजार ग्रामपंचायतीमध्ये पोहोचली आहेत. आज लाखो युवक ग्रामीण पातळीवर स्वयंउद्योजक म्हणून काम करत आहेत आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे, यात 52 हजार महिलांचा स्वयंउद्योजकांचा समावेश आहे.
या केंद्राच्या माध्यमातून 10 लाख पेक्षा अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. समग्रपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की, ही केंद्रे केवळ एम्पॉवरमेंट म्हणजे सक्षमतेचे माध्यम नसून, त्यातून शिक्षण, स्वयंउद्योजकता आणि रोजगार या सगळ्यांनाच त्यांच्यामुळे गती मिळाली आहे.
आज सुमारे 60 लाख स्वयंसेवक ‘मायगोव्ह’ अँपशी संलग्न झाले आहेत. म्हणजे, एका तऱ्हेने आपण ज्याला ‘नागरिकांचे सरकार’ म्हणू तसे याचे स्वरुप झाले आहे.सरकारला विविध कल्पना आणि सूचना देण्यासोबतच, हे युवक वेगवेगळ्या उपक्रमांमध्येही उत्साहाने सहभागी होताना दिसतात.
नागरिकांच्या विविध सूचना, कल्पना, संबंधित मंत्रालयांपर्यत पोचवणे,त्यांच्या अंमलबजावणीच्या शक्यता पडताळणे आणि जास्तीतजास्त युवकांना या सर्व प्रक्रियांशी जोडून घेणे, यासाठी ‘माय गोव्ह’ एक मजबूत व्यासपीठ बनले आहे.
हे स्वयंसेवक आणि एकाप्रकारे तुम्हा सर्वांच्या सरकारमधील योगदानाची काही उदाहरणे मी तुम्हाला देतो. केंद्र सरकार दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात जनतेने दिलेल्या सूचनांचा समावेश करते. स्वच्छ भारत अभियान, जन धन योजना, डिजिटल इंडिया यांसारख्या अनेक योजनांच्या टॅगलाईन (ब्रीदवाक्य) आणि लोगो देखील मायगोव्हच्या माध्यमातून जनतेने सुचवल्या आहेत. त्यात सरकारचा वेळ गेला नाही. सरकारसाठी हे एक जनसहभागाचे व्यासपीठ बनले आहे.
दर महिन्याला ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी मला सूचना आणि प्रेरणा देणाऱ्या माणसांच्या कथा मला याच अँपवर पाठवल्या जातात. डिजिटल इंडिया आज देशातल्या कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणत आहे. डिजिटल इंडियामुळे 4 ई- साध्य केले जात आहेत. एज्युकेशन (शिक्षण,) एम्प्लॉयमेंट (रोजगार), आंत्रप्रिन्युअरशिप (स्वयंउद्यमशीलता) आणि एमपॉवरमेन्ट (सक्षमता). ‘डिजिटल इंडिया’मुळे सर्वसामान्य माणसाचे आयुष्य अधिकाधिक सुखकर बनावे या शुभकामनांसह मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मात्र आज मी तुम्हाला एका कामासाठी आग्रह करणार आहे. त्यातही सामयिक सेवा केंद्राकडून माझ्या जास्त अपेक्षा आहेत. सामायिक सेवा केंद्रात काम करणारे सगळे लोक ऐकत आहात ना? मी तुम्हा सर्वाना इथल्या पडद्यावर बघू शकतो आहे, सामायिक सेवा केंद्रात असलेल्या लोकांनी जरा हात वर करा. माझे एक काम कराल का तुम्ही सगळे? मला जरा हात उंचावून सांगा… बीपीओमध्ये काम करणारेही सांगू शकतात…
मी तुम्हाला सांगतो, मला काय हवे आहे? तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा. या महिन्याच्या 20 तारखेला बरोबर सकाळी साडे नऊ वाजता मी देशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तुम्ही माझी मदत करु शकाल का? आज तुम्ही जसे आपापल्या केंद्रात बसले आहात तसेच 20 तारखेला तुम्ही तुमच्या या केंद्रात 50-100 शेतकऱ्यांना बसवू शकाल का? मी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधेन. जरा हात उंचावून सांगा.. कोण कोण करेल हे काम? आपण सगळे मिळून शेतकऱ्यांशी बोलू, त्यांच्या प्रश्नांवर बोलू.
या संवादामुळे तुमचे सामाईक सेवा केंद्र अतिशय प्रभावी होईल. तुमच्या तीन लाख केंद्रावरुन मी थेट शेतकऱ्याशी संवाद साधेन. तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांशी मी थेट बोलेन आणि त्यांना सांगेन की मला लसीकरणाच्या आधी तुम्हा सर्वांशी बोलायचे आहे. लक्षात घ्या, असा थेट संवाद साधल्याने लसीकरणाच्या मोहिमेला किती बळ मिळेल. टीव्हीच्या जाहिरातींपेक्षाही हा थेट संवाद जास्त प्रभावी ठरतो. म्हणूनच माझी इच्छा आहे की 20 तारखेला सकाळी साडे नऊ वाजता तुम्ही आपापल्या केंद्रांवर 50 ते 100 शेतकऱ्यांना घेऊन या. मी त्यांच्याशी बोलेन. कृषीक्षेत्रात कसे परिवर्तन घडत आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो आहे की नाही, हे त्यांच्याचकडून ऐकून घ्यायला मला आवडेल.
मित्रांनो, तुमच्याशी संवाद साधतांना मला आज खूप आनंद मिळाला. माझ्या भारतात आज जे परिवर्तन होत आहे, ते परिवर्तन तुम्ही सगळे आणता आहात. तुमच्या बोटांवरच्या शक्तीमुळे हे परिवर्तन आले आहे.
ही प्रगती, हा विश्वास हाच देशाचा विकास, सुधारणा, परिवर्तन घडवून आणणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद! नमस्कार !