मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरुष मंडळीहो, नमस्कार!
गुलाबी शहर जयपूरमध्ये आपले स्वागत! हा प्रदेश आपल्या चळवळ्या आणि उद्योगी लोकांसाठी ओळखला जातो.
मित्रांनो,
व्यापाराने विचार, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना दिली आहे, याला इतिहास साक्षी आहे. यामुळे लोकांमधील अंतर कमी झाले आहे. व्यापार आणि जागतिकीकरणाने कोट्यवधी लोकांना अत्यंत गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढले आहे.
महोदयहो,
आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक पातळीवर वाटत असलेला आशावाद आणि आत्मविश्वास पाहतो. भारताकडे मोकळीक, संधी आणि पर्यायांचा मिलाफ म्हणून पाहिले जाते. गेल्या नऊ वर्षांत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही 2014 मध्ये 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' अर्थात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मार्गावर आरुढ होऊन वाटचालीला सुरुवात केली. आम्ही व्यवसायात सकारात्मक चुरस आणि पारदर्शकता वाढवली आहे. आम्ही डिजिटलीकरणाचा विस्तार केला आहे आणि नवोन्मेषाला चालना दिली आहे. आम्ही मालहाताळणी केंद्रांचे स्वतंत्र टापू उभारले आहेत आणि औद्योगिक क्षेत्र निर्माण केली आहेत. आम्ही लाल फितीवरुन रेड कार्पेट-लाल गालिचावर आलो आहोत आणि एफडीआय-थेट परकीय गुंतवणूकीची दारे उघडी केली आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत सारख्या उपक्रमांनी उत्पादनाला चालना दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही धोरणांमध्ये स्थैर्य राखले आहे. येत्या काही वर्षात भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा निर्धार आहे.
मित्रांनो,
महासाथीपासून ते भू-राजकीय तणावापर्यंत, सध्याच्या जागतिक आव्हानांनी जागतिक अर्थव्यवस्थेची परीक्षा घेतली आहे. G20 या नात्याने, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीवर विश्वास पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी, आपली आहे. भविष्यातील आव्हाने समर्थपणे झेलून त्यांना तोंड देऊ शकेल अशी लवचिक आणि सर्वसमावेशक जागतिक मूल्य साखळी आपण तयार केली पाहिजे. या संदर्भात, जागतिक मूल्य साखळी आरेखनासाठी एक सर्वसाधारण आराखडा तयार करण्याचा भारताचा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे. या आराखड्याचा उद्देश, त्रुटी समजून घेणे, जोखीम कमी करणे आणि लवचिकता वाढवणे हे आहे.
महोदयहो,
व्यवसाय-व्यापारात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद तंत्रज्ञानात आहे आणि ती निर्विवाद आहे. भारताने वस्तू सेवा कर (जी एस टी) ही ऑनलाइन एकेरी अप्रत्यक्ष करप्रणाली स्वीकारल्यामुळे, आंतर-राज्य व्यापाराला चालना देणारी एकेरी अंतर्गत बाजारपेठ (सर्वांसाठी एक सामायिक बाजारपेठ) निर्माण होण्यास मदत झाली आहे. आमच्या एकात्मिक मालवाहतूक व्यवस्थेमुळे, व्यावसायिक मालवाहतूक स्वस्त आणि अधिक पारदर्शक बनली आहे. वाणिज्य व्यवस्थेच्या डिजिटलीकरणासाठी खुले जाळे, ही आणखी एक कलाटणी देणारी बाब आहे. यामुळे आमच्या डिजिटल बाजारपेठ परिसंस्थेचे लोकशाहीकरण होईल. पैशांच्या देवघेवीसाठी आम्ही आमची एकत्रित आर्थिक व्यवहार प्रणाली राबवून, याआधीच याची सुरुवात केली आहे. डिजिटलीकरणाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सच्या उपयोगामुळे बाजारपेठेच्या उपलब्धतेची क्षमता वाढली आहे. मला याचा आनंद वाटतोय की आपला समूह व्यवसाय विषयक कागदपत्रांच्या डिजिटलीकरणासाठी उच्च स्तरीय तत्त्वांच्या आधारावर काम करत आहे. ही तत्त्वे देशांना आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व्यापार वाढवण्यात आणि अनुपालनांचे ओझे कमी करण्यात मदत करू शकतात. आंतरराष्ट्रीय ई-व्यापार जसजसा वाढत जातोय, तसतशी आव्हानेही उभी ठाकत आहेत. मोठ्या आणि लहान विक्रेत्यांना खात्रीपूर्वक समान न्याय देण्यासाठी, आपल्याला एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. व्यापारात योग्य मूल्य मिळवून देणे आणि तक्रार व्यवस्थापन प्रणालीचा उपयोग करताना ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
महोदयहो,
जागतिक व्यापार संघटनेला (WTO) केंद्रस्थानी मानत, नियमाधारीत, खुल्या, सर्वसमावेशक, बहुपक्षीय व्यापार प्रणालीवर, भारताचा विश्वास आहे. 12 व्या WTO मंत्रीस्तरीय परिषदेत भारताने ग्लोबल साउथ अर्थात दक्षिण जगताच्या हितसंबंधांची पाठराखण केली आहे. लाखो शेतकरी आणि लहान व्यवसायांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकमत निर्माण करू शकलो आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेत एमएसएमई अर्थात सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन आपण त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांमध्ये 60 ते 70 टक्के रोजगार आणि जागतिक जीडीपी-सकल उत्पन्नात याचे 50 टक्के योगदान आहे. या उद्योगांना आपल्या निरंतर सहकार्याची गरज आहे. या उद्योगांचे सक्षमीकरण झाले की सामाजिक सक्षमीकरण होते. आमच्यासाठी, एम एस एम ई चा अर्थ आहे-सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जास्तीत जास्त पाठबळ! भारताने, आपल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस अर्थात सरकारी ई-बाजारपेठ या ऑनलाईन प्रणालीद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सार्वजनिक खरेदीशी जोडले आहे. पर्यावरणात कुठलाही बिघाड निर्माण होऊ नये आणि पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये या दृष्टीने आम्ही आमच्या एमएसएमई क्षेत्राची उभारणी करत आहोत. जागतिक व्यापार आणि जागतिक मूल्य साखळीतील आपला सहभाग वाढवणे याला भारताचे प्राधान्य राहिले आहे. एमएसएमईंना माहितीचा अखंड ओघ सुरु ठेवण्यासाठी, जयपूर पुढाकार या नावाने प्रस्तावित असलेला उपक्रम, एमएसएमईंना भेडसावणाऱ्या बाजारपेठा आणि व्यवसाय-संबंधित माहितीच्या अपुऱ्या उपलब्धतेच्या आव्हानांवर मार्ग काढेल. मला खात्री आहे की जागतिक व्यापार-व्यवसाय सहकार्य व्यवस्थेमध्ये कालानुरुप सुधारणात्मक बदल केल्यामुळे जागतिक व्यापारात एमएसएमईचे योगदान वाढेल.
महोदयहो,
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक प्रक्रियांमध्ये आत्मविश्वास रुजवणे ही कुटुंब म्हणून आपली सामुहीक जबाबदारी आहे. मला विश्वास आहे की जागतिक व्यापार प्रणाली हळूहळू अधिक प्रातिनिधिक आणि सर्वांना सामावून घेणारी करण्यासाठी तुम्ही एकत्रितपणे काम कराल. या बैठकीतून होणाऱ्या विचारमंथनात तुम्हाला यश मिळावे अशा माझ्या सदिच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद!