परम श्रद्धेय स्वामी गौतमानंदजी महाराज, स्वामी जीतकामानंदजी महाराज, स्वामी निर्भयानंद सरस्वतीजी, स्वामी विरेशानंदजी सरस्वतीमहाराज, स्वामी परमानंदजी महाराज, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेले ऋषीमुनी आणि संतगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या युवा मित्रांनो,
शतायुषि परमपूज्य सिद्दगंगा महास्वामी जी
यवरगे प्रणाम गळु
टुमकूरु रामकृष्ण आश्रमइप्पत ऐदू वर्ष
स्वामी विवेकानंद शिकागो संदेशानूरा इप्पत ऐदू वर्ष
भगीनी निवेदितानूराएवतने जन्म वर्ष
निम्म युवा समावेशा – त्रिवेणी संगमा
श्री रामकृष्णा, श्री शारदा माते
स्वामी विवेकानंदर संदेश वाहकराद नन्नु प्रीतय सोदर सोदरियेरगी प्रीतिया शुभाषयगळू
टुमकुरुचे मैदान यावेळी हजारो विवेकानंद आणि हजारो भगिनी निवेदिता यांच्या उर्जेची चमक अनुभवते आहे. सगळीकडे पसरलेला हा केशरी रंग ह्या उर्जेला अधिकच शक्ती आणि बळ देतो आहे. खरं तर मला प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून तुमच्यातल्या या उर्जेचा आशीर्वाद घ्यायचा होता. म्हणूनच तीन दिवसांपूर्वी जेव्हा स्वामी विरेशानंद सरस्वती यांचे पत्र आले, त्यावेळी मी तिथे येण्यासाठी आनंदाने होकार दिला होता. मात्र काळाच्या काही मर्यादा असतात. आणि तुम्ही जाणताच की संसदेच्या अधिवेशनाचा पुढचा टप्पा उद्यापासून सुरु होतो आहे, त्यामुळे माझे इथून निघणे कठीण झाले आहे. मी प्रत्यक्ष तर तुमच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. मात्र आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला मिळाले आहे.
युवाशक्ती सोबत कुठलाही संवाद झाला तरी मला त्यातून नेहमीच काहीतरी शिकायला मिळालं आहे. आणि म्हणूनच, युवकांना भेटण्याचा, त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, त्यांचे विचार आणि अनुभव जाणून घ्यायला मला आवडतं. त्यांच्या आशा आकांक्षा जाणून घेत, त्यानुसार काही काम करता यावे असा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
या विशाल युवा महोत्सवाचे आणि साधुसंतांच्या संमेलनाचा शुभारंभ करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. तीन वर्षांपूर्वी मी पूज्य शिवकुमार स्वामी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमकुरुला आलो होतो, त्यावेळी मला तिथल्या जनतेचा, विशेषतः तिथल्या युवकांचा जो स्नेह मिळाला त्याच्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही. भगवान वसवेश्वर आणि स्वामी विवेकानंद यांच्या आशीर्वादाने पूज्य शिवकुमार स्वामी यांनी स्वतःला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात समर्पित केले आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो, अशी मी परमेश्वराकडे नेहमीच प्रार्थना करतो.
मित्रांनो, तीन महत्वाच्या घटनांचा उत्सव एकाचवेळी साजरा करण्याची संधी मिळणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, खूप कमी वेळा ही संधी मिळते.मात्र आज तुमकुरू येथे हा त्रिवेणी उत्सव साजरा करण्याचा दैवी योगायोग आपल्याला लाभला आहे. तुमकुरू इथे स्वामी रामकृष्ण आश्रमाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण, शिकागो इथल्या स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण होणे आणि भगिनी निवेदिता यांची दीडशेवी जयंती ! या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या युवा संमेलनाचे विशेष महत्व आहे असे मी मानतो. या त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी कर्नाटकाच्या हजारो युवकांनी येथे एकत्र येणे, ही स्वतःच एक अद्भुत घटना आहे, एक मोठे यश आहे. यासाठी, या महोत्सवाचे आयोजक, पूज्य स्वामीजी, रामकृष्ण मिशन यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि ज्येष्ठांना वंदन करतो.
आजच्या तिन्ही आयोजनांच्या केंद्रस्थानी स्वामी विवेकानंद आहेत आणि आपल्याला हे चांगलेच माहिती आहे की, कर्नाटकवर स्वामी विवेकानंदांचे विशेष प्रेम होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी, कन्याकुमारीला जाण्यापूर्वी ते कर्नाटक इथे काही काळ थांबले होते. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आध्यात्मिक बैठकीला काळाच्या गरजांशी जोडले होते. त्यांनी आपल्या गौरवशाली इतिहासाला आपल्या वर्तमानाशी जोडले होते. आजच्या आपल्या या कार्यक्रमात साधू संतांच्या संमेलनाच्या निमित्ताने आध्यात्मिक विस्तार आणि युवा संमेलनाच्या निमित्ताने आपले वर्तमान एकत्र आले आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. ह्या दोन्ही शक्ती इथे एकत्र येऊन, खांद्याला खांदा देत, रेल्वे रुळांप्रमाणे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
देशभरातला संत समाज आणि आणि युवाशक्ती या कामी लागली आहे. इथे तीर्थक्षेत्रांची चर्चा होतेय त्याचवेळी तंत्रज्ञानाचीही चर्चा होतेय. इथे परमेश्वराविषयी चर्चा होतेय त्याचवेळी नव्या संशोधनांवरही बोललं जातंय. कर्नाटकात आध्यात्मिक उत्सव आणि युवक महोत्सव एकत्र साजरा करण्याचा नवा पायंडा पडतो आहे. ह्या आयोजनातून इतर राज्यांनाही प्रेरणा मिळेल अशी मला आशा वाटते. भविष्यातल्या तयारीसाठी ऐतिहासिक परंपरा आणि वर्तमानातली युवा शक्ती यांचा हा संगम अद्भूत आहे !
जर आपण आपल्या स्वातंत्र्यलढ्याकडे बारकाईने पहिले आणि एकोणीसाव्या-विसाव्या शतकातल्या त्या कालखंडाकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की त्या काळातही वेगवेगळ्या स्तरावर अनेक वेगवेगळे संकल्प केले जात होते. मात्र हे वेगवेगळे संकल्प एकाच ध्येयासाठी होते, देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून सोडवण्याच्या ध्येयासाठी ! तेव्हा संत असो की भक्त असोत, आस्तिक असोत अथवा नास्तिक, गुरु असोत किंवा शिष्य, कामगार असोत किंवा व्यापारी, व्यावसायिक समाजाच्या सर्व स्तरातले लोक केवळ एक संकल्प मनात घेऊन त्या दिशेने वाटचाल करत होते.
त्यावेळी आपला द्रष्टा संत समाज हे स्पष्टपणे बघू शकत होता की विभिन्न जाती धर्माने विखुरलेला हा समाज इंग्रजांचा सामना करु शकत नाही. भारतीय समाजाची ही मोठी उणीव लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्यासाठीच देशाच्या विविध भागात भक्ती आंदोलने झालीत, सामाजिक चळवळ राबवली गेली. या चळवळीतून देशाला एकत्रित केले गेले, देशात असलेल्या आंतरिक उणीवा, चुकीच्या प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी देशातल्या सर्वसामान्यांना एकसमान दर्जा दिला, सर्वाना बरोबरीचे स्थान दिले, प्रत्येकाला प्रतिष्ठा दिली, त्यांचा सन्मान केला. देशाची गरज ओळखून आपल्या आध्यात्मिक प्रवासाला त्यांनी देश स्वतंत्र करण्याच्या मुख्य प्रवाहासोबत विलीन केले, त्याच्याशी स्वतःला जोडून घेतले. जनसेवा हेच ईश्वरसेवेचे माध्यम बनवले.
मित्रांनो, ह्याच काळात देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होत होते. वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर.. वेगवेगळ्या व्यवसायातले लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाचा पाया मजबूत केला.
हे दोन्ही प्रयत्न जेव्हा एकत्रितरीत्या झाले तेव्हा देश बौद्धिक आणि सामाजिक पातळीवर उभा राहिला आणि सर्व भारतीयांनी एकत्र येऊन इंग्रजांना देशाबाहेर घालवले. असे वेगवेगळे संकल्प असले तरी पूर्ण होऊ शकतात, याचे प्रत्यक्ष उदाहरणाच यातून बघायला मिळाले.
स्वातंत्र्यानंतर कित्येक दशकांनी आज मला इथे तशीच संकल्प शक्ती पुन्हा दिसते आहे. अशा संकल्प शक्तीचे दर्शन आपल्याला कधीकधीच होत असते. तुम्ही पाहीलं असेल, कालच ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. परवा सगळा देश होळीच्या विविध रंगांनी नाहून निघाला होता. आणि काल ईशान्य भारतातल्या निकालानंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुम्हाला वाटत असेल की मी या कार्यक्रमात या निकालांचा उल्लेख का करतो आहे? मला वाटतं की तुमच्याशी बोलतांना मी माझ्या मनातल्या भावना नक्कीच सांगाव्यात ईशान्य भारतात ज्या निवडणुका झाल्या त्यात कोणता पक्ष जिंकला, कोणाची हार झाली, हा पक्ष मोठा ठरला आणि तो पराजित झाला अशा राजकीय पक्षांच्या दृष्टीकोनातून मी या निकालांकडे बघत नाही.
महत्वाचे हे आहे, की ईशान्य भारतातील लोकांच्या आनंदात सगळा देश सहभागी झाला आहे. ईशान्य भारतातील जनतेचा आनंद-दुख: याच्याशी संपूर्ण देश जोडला जाण्याचे प्रसंग खरोखरच खूप कमी येतात आणि गेल्या दोन दिवसांत आपण पाहिलं की ईशान्य भारतातल्या या निकालांकडे सगळा देश बघत होता. त्यांच्या भाव भावनांशी अनुरूप होत होता. दिवसभर टीव्हीसमोर बसून निकाल आणि त्यांचे विश्लेषण बघत होता.
माझ्या मते, माझ्या ईशान्येकडील बंधू भगिनींनी जो जनादेश दिला आहे आणि त्याच्या देशभर ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, हे एक मोठे परिवर्तन आहे. रामकृष्ण मिशन असो, विवेकानंद केंद्र असो हजारो कार्यकर्ते, आपले आयुष्य समर्पित करणारे युवक साधू संत या सगळ्यांनी ईशान्य भारतातल्या जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे इथे बसलेल्या अनेकांना तिथली प्रत्यक्ष परिस्थिती अगदी नीट माहिती आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की, ईशान्य भारतातल्या निवडणूकीच्या निकालांनंतर देशभरातून ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यातून संपूर्ण देश आपल्यासोबत असल्याचा संदेश तिथल्या जनतेपर्यत पोचला आहे. देशाच्या एकतेसाठी, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ संकल्पसिद्धीसाठी अशा भावनांची ताकद खूप मोठी असते.
मित्रांनो याआधी आपल्या देशात अशी धोरणे राबवली आणि असे काही निर्णय झालेत की ईशान्य भारतातील जनतेच्या मनात दुजाभाव केल्याची भावना निर्माण झाली. केवळ विकासाच्याच नाही ,तर विश्वास आणि आपलेपणाच्या देशभावनेपासून आपल्याला दूर ठेवलं जात आहे, असे तिथल्या जनतेला वाटू लागले होते. मुख्य प्रवाहापासून आपल्याला वेगळे ठेवलेय, असे त्यांना वाटत असे. तिथल्या अनेक समस्यांमुळे ही भावना आणखीनच वाढली. गेल्या चार वर्षांच्या काळात आमच्या सरकारने अनेक धोरणे आणि निर्णयांच्या मदतीने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न तर केलाच, त्याशिवाय तिथल्या लोकांमध्ये निर्माण झालेली वेगळेपणाची, अलिप्ततेची भावनाही दूर करण्याचा प्रयत्न केला. ईशान्य भारताच्या भावनात्मक एकात्मतेला वाढवण्याचा आम्ही संकल्प केला आहे आणि तो पूर्णही करतो आहोत.
त्रिपुराच्या आदिवासी बहुल भागातल्या निवडणुकांचे जे निकाल आले आहेत, ते माझ्यासाठी खूप समाधानकारक आहेत. मी त्याविषयी तुम्हाला विस्तृतपणे काही सांगू इच्छितो. मित्रांनो, त्रिपुरासारख्या इतक्या छोट्या राज्यात विधानसभेच्या 20 जागा आदिवासी बहुल भागात आहेत. आणि आपल्याकडे एकभ्रम जाणूनबुजून पसरवला जातो की जिथे आदिवासी आहेत, तिथे माओवाद आहे, नक्षलवाद आहे, डाव्यांचा अतिवाद आहे, अशा खूप चर्चा केल्या जातात. असा भ्रम मिर्माण करून लोकांना विभागण्याचा प्रयत्न केला जातो, कारण त्यात देश तोडणाऱ्या मनोवृत्तींसाठी पोषक वातावरण तयार केले जाऊ शकते. मात्र काल आलेल्या निकालांनी एक नवा पायंडा पाडला आहे. ईशान्य भारतातील जनतेने भारतीय जनता पार्टीला मतदान करून नकारात्मकतेच्या, द्वेषाच्या राजकारणाला नाकारलं आहे.
मित्रांनो, कट्टरतावादाला, अतिवादाला, एकात्मतेच्या भावनेतूनच उत्तर दिले जाऊ शकते.देशातला कोणताही प्रदेश, कोणताही वर्ग स्वतःला मुख्य प्रवाहापासून वेगळे समजणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. आमचे सरकार यासाठी कटिबध्द असून निरंतर प्रयत्न करत आहेच, मात्र सगळ्या देशानेच यासाठी कृतज्ञ होऊन पूर्ण ताकदीने देशाच्या एकतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. संकल्पाच्या शक्तीचा हा प्रवाह सध्या कर्नाटकमधल्या या मैदानावरही जाणवतो आहे. जे श्रद्धेय मान्यवर आता व्यासपीठावर आहेत, ते याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतील.
मित्रांनो, राष्ट्रनिर्माणाच्या कामाला समर्पित असा हा संकल्प स्वामी विवेकानंदाच्या एका संदेशातून आणखी उत्तम प्रकारे समजला जाऊ शकतो. स्वामीजी म्हणाले होते – “आयुष्य छोटे आणि अनिश्चित आहे. मात्र आत्मा अमर आणि शाश्वत आहे. आणखी एक गोष्ट आयुष्यात शाश्वत सत्य आहे, ती म्हणजे- मृत्यू! म्हणूनच एखाद्या भव्य संकल्पाला उद्दिष्ट म्हणून स्वीकारा आणि आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्च करा.”
आज इथे बसलेल्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मी तुम्हा सर्वांना प्रश्न विचारू इच्छितो, की आपला संकल्प काय असला पाहिजे? अनेकदा मी अनुभवलं आहे, एखाद्या युवकाला अचानक प्रश्न विचारला की त्याच्या आयुष्याचे ध्येय काय आहे? तर तो थेट उत्तर देऊ शकत नाही. आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांविषयी तो स्वतःच गोंधळलेला असतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातले संकल्प आणि लक्ष्य जेव्हा स्पष्ट असतील, तेव्हाच आपण काहीतरी सिद्ध करु शकू, देशासाठी, मानवतेसाठी काहीतरी भरीव कार्य करु शकू, मोठे योगदान देऊ शकू. मित्रांनो, आपल्या संकल्पांच्या बाबतीतच जेव्हा आपल्या मनात गोंधळ असतो, शंका असतात, तेव्हा आपले लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. रेल्वे फलाटावर पोचल्यावर तिथे अनेक गाड्या उभ्या असतील आणि आपल्याला माहीतच नसेल की आपल्याला कोणत्या गाडीत बसायचं आहे, तर ना तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यत पोचू शकता आणि ना तुमच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करु शकता.
स्वामी विवेकानंदांचे एक महत्वाचे वाक्य आहे. ते म्हणत- एक संकल्प घ्या, तो संकल्प पूर्ण करणे तुमच्या आयुष्याचे ध्येय बनवा, त्याचा विचार करा, त्याची स्वप्ने बघा, ती कल्पना साकार करण्यासाठी जगा, तुमचा मेंदू, तुमची शक्ती, तुमच्या चेतना, तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणा, बाकी सगळ्या कल्पना, सगळे विचार बाजूला ठेवा. केवळ एक संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन कामाला लागा. यशाचा हा एकच मंत्र आहे.
आज या महोत्सवात आलेल्या प्रत्येक युवकाला माझा आग्रह आहे की त्याने आपल्या संकल्पाविषयी स्पष्ट राहावे. त्याला आयुष्यात काय करायचं आहे, त्याविषयी त्याला नीट माहिती असले पाहिजे.
बंधू-भगिनीनो, आज आपला भारत देश जगातला सर्वात युवा देश आहे. 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. युवा शक्तीची ही अपार ऊर्जा देशाचे भविष्य घडवू शकते, भाग्य बदलू शकते. संपूर्ण देशाला उर्जावान बनवू शकते. 2014 जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही ह्या युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवून ह्या उर्जेचा वापर राष्ट्रनिर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत आणि ही प्रक्रिया अखंड सुरु आहे.
तुम्हाला माहित असेल की आम्ही सत्तेवर आलो आणि त्यानंतर लगेचच देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशातल्या तरुणांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र कौशल्य विकास मंत्रालय सुरु केले. याआधीही कौशल्य विकास ही संकल्पना होती, मात्र त्याचा संबंध 40-50 मंत्रालयांशी असे. त्यामुळे त्या संदर्भातली कामे, निर्णय रखडले जात. कधीकधी प्रत्येक मंत्रालयाची दिशा वेगळी, प्राधान्यक्रम वेगळा, त्यातून अनेकदा काही मंत्रालयांमध्ये मतभेदही होत. हे सगळं टाळण्यासाठी आम्ही कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु केले. आता सगळं काम एकाच मंत्रालयातर्फे होतं, त्यामुळे निर्णय झटपट होतात. या मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्योगक्षेत्राच्या गरजा आणि मागणी लक्षात घेऊन या केंद्रात युवकांना अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. युवक आपल्या भरवशावर आपला उद्योग सुरु करु शकतील. त्यांना त्यासाठी काही तारण न ठेवता, हमी न देता कर्ज मिळेल यासाठी आम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत देशात आतापर्यत सुमारे 11 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. कर्नाटकमधल्या युवकांचेही एक कोटी 14 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. मुद्रा योजनेमुळे देशाला सुमारे 3 कोटी नवे स्वयंउद्योजक मिळाले आहेत. इतक्या कमी वेळात, तीन कोटी नवउद्योजक देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्यात योगदान देत आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, मित्रांनो !
कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याशिवाय आमच्या सरकारने युवकांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचेही काम केले आहे. सरकराने यासाठी काही धोरणात्मक बदल केले आहेत, ज्यामुळे सरकारी खरेदी प्रक्रियेत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य मिळेल. या व्यतिरिक्त आणखी एक व्यवस्था विकसित केली गेली आहे, ती म्हणजे, जीईएम (जेम) म्हणजे सरकारी-ई बाजार. या ऑनलाइन बाजाराच्या माध्यमातून आता कोणीही युवक, कोणीही महिला, गावातला कोणताही व्यक्ती आपल्या कंपनीत किंवा घरातही बनवलेली उत्पादने असतील किंवा मग काही सेवा असतील त्या सरकारला पुरवू शकते,सरकार त्या सेवा किंवा उत्पादने विकत घेऊ शकते. यासाठी आता कुठल्या मध्यस्थांची गरज नाही, निविदांची गरज नाही, मोठमोठ्या कंपन्यांची गरज नाही, सर्वसामान्य लोकांकडून ह्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात. आम्ही राज्य सरकारांनाही आवाहन केले आहे की त्यांनीही आपापल्या राज्यातल्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, या पोर्टलचा भाग व्हावे. आतापर्यत देशातल्या 20 सरकारांनी या अभियानात सहभाग नोंदवला आहे.
मित्रांनो, आमच्या सरकारनं सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातले युवक आज उद्योग जगताच्या गरजेनुसार प्रशिक्षण घेऊन आपल्या भरोश्यावर स्वयंरोजगार आणि उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देत आहे. आपापल्या देशातला युवक आज स्वतःच्या बळावर काहीतरी तयार करतो आहे आणि आपली उत्पादनं बाजारात विकतोही आहे. देशात असा वातावरण निर्माण होणं किती आवश्यक आहे हे कर्नाटकचे युवक उत्तम प्रकारे समजू शकतात. तुमच्या सारख्याच कोट्यवधी युवकांच्या आशा आकांक्षा समजून घेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया ह्यासारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत.
आमच्या सरकारने पहिल्यांदाच रोजगाराला पहिल्यांदाच करात मिळणाऱ्या सवलतींशी जोडले आहे. ज्या कंपन्यांमध्ये युवकांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी दिली जात आहे, अशा कंपन्यांना सरकार करात सवलत देत आहे. युवा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी पगारातून कापल्या जाणाऱ्या रकमेत सरकार आर्थिक मदत करत आहे. ज्या युवकांच्या कंपन्यांची उलाढाल 2 कोटी रुपयांपर्यंत आहे आणि ज्या कंपन्यांमध्ये डिजिटल व्यवहार केले जातात, त्यांनाही सरकारकडून करात सवलत दिली जाते.
आपल्या देशातल्या युवकांमध्ये एखादं काम मिशन म्हणून करण्याची उर्मी नक्कीच आहे, ह्यावर माझा विश्वास आहे. देशातल्या गोष्टी अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर करण्यासाठी ते आपल्या कल्पना आणि संशोधनाच्या मदतीने प्रभावी उपाय सुचवण्यास उत्सुक आहेत. अशा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जे जे काही करायला हवं, ते सर्व आमचे सरकार करत आहे.
मित्रांनो, संशोधन हाच उज्ज्वल भवितव्याचा आधार आहे. आमच्या शिक्षण व्यवस्थेविषयी या विचाराचा अंगीकार करत संशोधनाला शालेय संस्कृती आणि अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शाळांमधल्या छोट्या मुलांच्या डोक्यात असलेल्या अभिनव कल्पनांना संशोधनात बदलवण्यासाठी सरकारने एटीएम म्हणजेच अटल टिंकरिंग मिशनची सुरुवात केली आहे. आजपर्यत देशभरातल्या 2 हजार 400 पेक्षा जास्त शाळांमध्ये अटल टिंकरिंग मशीन्सना मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्र सरकार आणखी एका मोठ्या अभियानावर काम करते आहे. ते अभियान म्हणजे देशात जागतिक दर्जाच्या 20 शिक्षण संस्था उभारण्याचे काम! या अभियानाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील निवडक 10 संस्थांना एका निश्चित कालावधीत एकून 10 कोटी रुपये निधी दिला जाईल. त्यातून या संस्था विकसित केल्या जातील. देशातल्या या संस्था आधुनिक शिक्षण क्षेत्रात जगात आपले महत्वाचे स्थान निर्माण करतील. शिक्षणक्षेत्रात भारताला आपले पूर्वीचे स्थान मिळवून देतील.
या अर्थसंकल्पात आम्ही राईज या नावाने आणखी एका योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत सरकार येत्या चार वर्षात देशात शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एक कोटी रुपये निधी खर्च करणार आहे.
याच अर्थसंकल्पात, सरकारने प्रधानमंत्री अभ्यासवृत्ती योजनेचीही घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत, देशात एक हजार हुशार आणि गुणवान विद्यार्थी आहेत, त्याना पीएचडी करण्यासाठी पाच वर्षे 70 ते 80 हजार रुपये महिना आर्थिक मदत दिली जाईल.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आम्ही मनुष्यबळाकडे लक्ष पुरवत अनेक योजना सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनांचा लाभ कर्नाटकातल्या युवकांना मिळणे शक्य आहे आणि सोपेही आहे. केंद्र सरकारने संशोधन क्षेत्रात केलेले कार्य, कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे, कर्नाटकच्या युवकांसाठी अनेक संधी निर्माण केल्या आहेत. विशेषतः स्मार्ट सिटी अभियानामुळे कर्नाटकसह देशभरातल्या युवकांच्या प्रतिभांना संधी मिळते आहे.
मित्रांनो, भगिनी निवेदिता एकदा म्हणाल्या होत्या, की असं काय करावे ज्यामुळे भारतातले युवक इतर कुठल्याही देशातील युवकांची नक्कल करणार नाहीत, त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार नाहीत, तर स्वयंपूर्ण होऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतील. याबद्दल आपले विचार मांडताना भगिनी निवेदिता म्हणाल्या होत्या की-
“तुमचे शिक्षण हे तुमचे ‘हृदय आणि आत्म्याचे शिक्षण असायला हवे आणि आत्म्यासोबतच तुमच्या मेंदूचेही शिक्षण असायला हवे’. हे शिक्षण म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचा भूतकाळ आणि आधुनिक जग यांच्यात परस्परसंबंध निर्माण करणारे असावे.” म्हणजेच आपण आपला इतिहास, आपले वर्तमान आणि आपले भविष्य यांच्यात सांगड घालणे आवश्यक आहे. आपण आपल्या परंपरांशी जितके घट्ट बांधलेले असू, तितकाच देशातला युवक स्वतःला मजबूत समजेल, आधुनिक जगात पाय खंबीरपाने रोवून उभा राहील.
बंधू भगिनीनो, आपल्या परंपरांचा सन्मान ठेवण्याची भावना निर्माण करण्यासाठी सरकारने ‘खेलो इंडिया’ स्पर्धा सुरु केल्या. जो खेळतो तोच सदृढ होतो, निरोगी होतो! यासाठीच आम्ही आमच्या क्रीडा धोरणात मोठा बदल केला आहे. क्रीडाक्षेत्रात गुरुशिष्य परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार केवळ खेळाडूंच्या वर्तमान प्रशिक्षकांचाच नाही तर अशा प्रत्येक गुरुचा सन्मान करणार आहे ज्यांनी त्या खेळाडूचे बोट पकडून त्याला खेळायला शिकवले, त्याला खेळाचे प्राथमिक धडे दिले. खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यास आता त्याच्या आधीच्या गुरुनांही पुरस्काराच्या रकमेतला काही भाग दिला जाईल.
भारतीय क्रीडा परंपरा लक्षात घेऊन आम्ही खेलो इंडीया कार्यक्रमात कबड्डी आणि खो खो सारख्या स्वदेशी खेळांना प्राधान्य दिले. या योजनेअंतर्गत, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या मुलांची क्रीडा नैपुण्यता ओळखून त्यांना क्रीडाक्षेत्रात एक व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरवर्षी एक हजार युवा खेळाडूची निवड करत त्यांना आधुनिक पायाभूत सुविधा असलेल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी 5 लाख रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मित्रानो, ‘विद्यार्थी देवो भव:’ हा केवळ तुमचाच नाही, आमचाही मंत्र आहे. आणि तुमची संमती असेल तर मी यात आणखीही काही जोडू इच्छितो- युवा देवो भव:- युवाशक्ती देवो भव:!” माझ्या दृष्टीने युवकांमध्ये दैवी शक्ती असते, कारण युवा या संकल्पनेला मी परिस्थिती किंवा वयाशी जोडत नाही तर ती एक मानसिक अवस्था आहे असे मी मानतो. खरी युवावृत्ती असा विचार कधीच करत नाही की जे आधी होतं ते जास्त चांगलं होतं. तर युवक असा विचार करतो की जुन्या गोष्टींपासून शिकवण घेत वर्तमान आणि भविष्य अधिक उत्तम कसे बनवावे? आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणूनच तो देश बदलण्याचे काम करतो. आपले आणि देशाचे भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यापेक्षा अधिक उत्तम आणि मजबूत असावे, अशी युवकाची इच्छा असते.
आणि म्हणूनच मी देशाच्या या युवाशक्तीला पुन्हा वंदन करतो आहे.’एक भारत-श्रेष्ठ भारत’ शब्द तुम्ही ऐकलेच असतील. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकत्र करण्याचे भगीरथ काम केले. या एकसंध भारताला ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ बनवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज इथे इतके युवक बसले आहेत, तुमच्यापैकी अनेकांची इच्छा असेल की आपण फ्रेंच भाषा शिकावी, स्पानिश भाषा शिकावी, ही चांगलीच गोष्ट आहे. जगातली कोणतीही भाषा शिकणे नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र कधी आपल्याला वाटतं का की आपला एवढा मोठा देश, या देशात 100 भाषा आहेत, 1700 बोली भाषा आहेत, त्यातल्या किमान 10-12 भाषा तरी आपण शिकाव्यात. आपल्या देशातल्या भाषेत 5-50 वाक्ये तरी बोलायला शिकावीत. इतर राज्यांमधली दोन चार गाणी गुणगुणायला शिकवीत. मला वाटते, देशात एकसंधतेची भावना निर्माण करण्यासाठी भाषेचे सामर्थ्य खूप महत्वाचे आहे. आणि मनात आणले तर आपण हे कौशल्य सहज विकसित करु शकतो. मीही आताच आपल्या मोडक्या तोडक्या कन्नड भाषेत दोन चार वाक्ये बोललो, ती नक्कीच तुमच्या मनाला भिडली असतील. ते ऐकतांना तुम्ही हा विचार नाही करत की मोदींनी उच्चार चुकीचे केलेत, त्यांचे व्याकरण बरोबर होते की नाही, तुम्हाला हेच समजले की तुमच्या हृदयापर्यत पोहचण्यासाठी मी तुमच्या भाषेत बोललो. हीच देशाला एकसंघ ठेवणारी ताकद आहे, हीच ताकद देशाला जोडते.
संकल्पातून सिद्धीच्या ज्या वाटेवर देश चालतो आहे, न्यू इंडियाचे जे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळे धडपडतो आहोत, त्याची सर्वात मोठी जबाबदारी देशातल्या युवकांवर आहेत. त्याना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की आपण कायम स्वामी विवेकानादांचे स्मरण ठेवावे. जन सेवा हीच परमेश्वर सेवा – जीवातच शिव बघावे, हेच तत्त्वज्ञान आपल्या देशाच्या परिवर्तनात उपयुक्त ठरेल. मग ते स्वच्छ भारत असो, की बेटी बचाओं-बेटी पढ़ाओ योजना असो, किंवा इतर योजना , लोकांपर्यत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. मला विश्वास आहे की या तुमकुरच्या भूमीत साधू संतांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही सगळे एक नवी प्रेरणा घेऊन कामाला लागाल.
तुम्ही सगळे नरेंद्र मोदी एप्पवर तुमच्या भावना, विचार मांडत असालच. माझीही तुमच्याशी निरंतर संवाद साधण्याची इच्छा आहे. तुम्ही माझ्याशी बोला, तुमच्या भावना माझ्यापर्यत पोचवा. मला कन्नड भाषा येत नाही, त्यामुळे मी हिंदीत बोललो. मात्र तुम्हाला माझे बोलणे कन्नड भाषेत वाचायचे असेल तर मी माझ्या चमूला विनंती करतो की माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे तुम्ही कन्नड भाषेत भाषांतरित करून नरेंद्र मोदी एप्पवर टाका.
आज या त्रिवेणी संगमासाठी, या संमेलनाच्या आयोजनासाठी रामकृष्ण-विवेकानंद आश्रमाचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि त्यांचे अभिनंदन करतो. सर्व संत महंतांना पुन्हा एकदा वंदन करतो. शिवगिरी मठाला नमन करतो. आणि तुम्हा सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो!!
खूप खूप धन्यवाद !!