मंचावर उपस्थित दालमिया भारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक भाई दालमिया, युथ फॉर डेव्हलपमेंटचे मार्गदर्शक मृत्युंजय सिंह जी , अध्यक्ष प्रफुल निगम, ग्रामीण यशस्वीता मिळवलेले चैत राम पवार, इथे उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि माझे प्रिय युवा मित्र, इथे देशभरातल्या काही उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांना सन्मानित करण्याची संधी मला लाभली आहे जे या विशेष उपक्रमाला सहकार्य करत आहेत. एक वाचनालय सुरु करण्यात आले. आणि ग्रामीण भारतासंबंधी एक श्वेतपत्रिका देखील जारी करण्यात आली आहे. तुम्ही सर्व देशाच्या गरजा ओळखून , त्या गरजांना प्राधान्य देत आपल्या कार्याची रचना करत आहात हे पाहून मला आनंद झाला आहे. तुम्ही सर्वानी आतापर्यंत जे साध्य केले आहे त्यासाठी मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो. आणि हे प्रयत्न यशस्वी होवोत आणि निरंतर पुढे सुरु राहोत यासाठी सरकारचे सहकार्य देखील मिळेल आणि माझ्या शुभेच्छा देखील असतील.
मित्रानो, सध्या आपला देश परिवर्तनाच्या एका महत्वपूर्ण कालखंडातून मार्गक्रमण करत आहे. गेल्या चार वर्षात तुम्हाला देखील जाणवले असेल की कशा प्रकारे देश २१ व्या शतकात नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी पुढे जात आहे. चार वर्षात देशाची प्रतिमा उंचावली, गौरव वाढला आणि सव्वाशे कोटी भारतीयांनी जगाला इशारा दिला आहे की आता भारताने भरारी घेतली आहे.
मित्रांनो, ते दिवस गेले जेव्हा भारताकडे ‘नाजूक अर्थव्यवथा ‘ असलेल्या पाच देशातील एक म्हणून म्हणून पाहिले जायचे. आज, आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. सव्वाशे कोटी भारतीयांच्या सामर्थ्याने आपण आणखी वेगाने विकास करू. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतातील गरीबी विक्रमी गतीने कमी होत आहे. या अहवालानुसार गेल्या दोन वर्षात ५ कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. हे कशामुळे शक्य झाले असेल असे तुम्हाला वाटते? भारतातील लोकांमुळे. सरकार केवळ प्रोत्साहन देऊ शकते. ही युवा मंडळी केवळ उपलब्ध संधींचा वापर करत नाही तर स्वतः नवीन संधी निर्माण करत आहे. हा ‘चलता है ‘ वृत्ती असलेला भारत नाही. तो काळ गेला. हा आपला नवीन भारत आहे.
मित्रानो, नवीन भारताचे निर्माणकर्ते सव्वाशे कोटी भारतीय आहेत , मात्र त्याचा आधार युवा भारत आहे. युवकांची युवा शक्ती आहे जी जुनी व्यवस्था, जुनी कार्यप्रणाली, जुन्या पद्धती या जुन्या विचारांच्या ओझ्यापासून मुक्त आहे. हा तरुण वर्ग आहे ज्याने व्यवस्थांना बदलण्यासाठी प्रेरित केले आहे. युवकांचा हाच समूह आज नवीन भारताची ओळख बनत आहे. काही लोक परिवर्तनासाठी ऋतुचक्र बदलण्याची वाट पाहत असतात, काही लोक परिवर्तनाचा संकल्प करून ऋतुपालट करतात. तुम्ही प्रतीक्षा करणारे नाही तर ऋतू बदलणारे तरुण आहात. कारण तुमच्याकडे बदल घडवून आणणारे मन आहे, मिशन आहे, काही करून दाखवण्यासाठी ऋतू नव्हे तर मन हवे . इच्छा शक्ती हवी. आज देशात याच दुर्दम्य इच्छा शक्तीसह युवक राष्ट्र निर्माणाच्या कार्यात गुंतले आहेत.
मित्रांनो, आजचा भारत छोटे काहीच करत नाही. युवकांच्या आकांक्षा आणि शक्तींप्रमाणेच भारत मोठ्या परिवर्तनकारी गोष्टी करत आहे. 3 कोटीपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण करण्यात आले असून भारताच्या भावी पिढीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. हा एक मोठा आकडा आहे. याचे नेतृत्व कोण करत आहेत ? तरुण डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस आणि स्वयंसेवक . भारताने मागील 4 वर्षांत 1.75 लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधले. हे कोणी बांधले? तरुण मजूर आणि कामगारांनी . भारताने गेल्या चार वर्षात प्रत्येक गावात वीज पोहोचवली. अठरा हजार गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आणि हे उद्दिष्ट वेळेवर पूर्ण झाले. आता, आम्ही प्रत्येक घराचे विद्युतीकरण करत आहोत. 85 लाख घरांचे ऑक्टोबर 2017 पासून विद्युतीकरण करण्यात आले आहे. आपल्या सहकारी नागरिकांच्या घरांना कोणी उजळले? तरुण इलेक्ट्रिशियन आणि तंत्रज्ञ यांनी. 4 कोटी आणि 65 लाख गॅस जोडण्या गरीबांपर्यंत कुणी पोहचवल्या? पुन्हा एकदा, भारतातील युवकांनी . आणि, त्यांनी हे आपल्या स्वत: साठीच नव्हे तर गरीब महिलांप्रति काळजी आणि सेवा म्हणून केले, यापैकी अनेक महिला ग्रामीण भागात राहतात. गेल्या चार वर्षात गरीबांकरता एक कोटीपेक्षा जास्त घरे बांधली गेली आहेत. हे कोणी केले? तरुण अभियंते, कामगार आणि मजुरांनी हे शक्य करून दाखवले. हा आकडा कोटींमध्ये आहे. हे मोठे आकडे आहेत. ही मोठी संख्या का शक्य झाली ? आणखी एका मोठ्या संख्येमुळे , भारतातील 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या.80 कोटी लोकांमुळे हे शक्य झाले.
ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा शक्ती असेल तर कुणालाही त्याचा हेवा वाटणारच. आणि म्हणूनच मला वाटते की तुम्ही या कार्यक्रमाचे अगदी योग्य घोषवाक्य निवडले आहे. तुम्ही म्हटले आहे आता आमची पाळी आहे. आणि आमची म्हणजे एका नागरिकाची देखील आहे आणि भारताची देखील. मित्रानो, एक काळ होता जेव्हा केवळ राजघराण्यांची राजवट असायची. शतकांपूर्वी असे होते. स्वातंत्र्यानंतर, बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली, त्यानंतर लोकशाही नंतर नव्या प्रकारची राजघराणी जन्माला आली. स्वातंत्र्यानंतर राजकारणात देखील तीन-तीन पिढ्यांचे राज्य होते. काही घराण्यांच्याच नियंत्रणात सत्ता होती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आणि हे तुम्ही बदलवले आहे, देशवासियांनी बदलवले आहे. तुम्ही बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्र्पती आणि मी स्वतः छोट्या गावातून आलो आहे. आमचे पूर्वज राजकारणात नव्हते. तुमच्यासारख्याच कुटुंबातून आलो आहोत. लोकशाही पद्धतीने निवडून आलो आहोत. यातून हे दिसून येते की कशा प्रकारे देशाचे जन-मन बदलले आहे. ही गोष्ट केवळ तीन पदांनाच लागू होत नाही.
तुम्ही वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील पहा. योगी आदित्यनाथ, त्रिपुराचे विप्लवदेव , उत्तराखंडचे त्रिवेन्द्र सिंह रावत, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान,बिहारचे आमचे नितीश जी, हरियाणाचे मनहोर लाल जी, झारखंडचे रघुवर दास जी . हे सर्वजण अतिशय सामान्य कुटुंबातून आले असून जनता जनार्दनने त्यांना या पदापर्यंत पोहचवले आहे. ते अतिशय सामान्य आयुष्य जगले आहेत, आणि म्हणूनच आजही प्रत्येक गरीबाप्रती , त्यांच्या समस्यांप्रति ते अधिक संवेदनशील आहेत. त्यांनी युवकांसोबत काम करत, त्यांच्या आशा अपेक्षांनुसार काम करत आपले आयुष्य व्यतित केले आहे. ते परिपक्व आहेत , त्यांना माहित आहे नवीन भारतातील युवकांना काय हवे आहे.
माझ्या तरुण मित्रांनो, हा बदल नाहीये का, आणि मला वाटते देशाच्या लोकशाहीसाठी हा अतिशय सकारात्मक ठेवा आहे , एक खूप मोठा सकारात्मक संकेत आहे की आता अशा प्रकारचे वातावरण राजकारणच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमधून आयएएस , आयपीएस बनणाऱ्या, प्रशासकीय सेवेत येणाऱ्या युवकांची संख्या सातत्याने वाढत आहे. छोट्या शहरांतील लोकांची मोठी स्वप्ने देखील आता पूर्ण होत आहेत. हे परिवर्तनच तर आहे जी नवीन भारताची ओळख बनत आहे. आज तुम्ही क्रीडा क्षेत्र घ्या, १० वी आणि १२ वीत अव्वल आलेले पहा , ते आता मोठ्या शहरातील मोठया शाळांचे नसतात. छोट्या गावातील छोटे शहर , छोट्या शाळेची सरकारी शाळेची मुले आता दहावी बारावीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावतात. क्रीडा क्षेत्रच पहा, मोठं-मोठी शहरे, मोठमोठ्या गावातून नाही तर छोट्या छोट्या गावातून खेळाडू पुढे आले आहेत. हे परिवर्तन आहे.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी, आसामच्या भातशेतीतील 18 वर्षांच्या एका तरुणीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मी हिमा दास बद्दल बोलत आहे तिच्यात तुम्हाला दुर्दम्य इच्छशक्ती दिसेल. खरं तर, असे अनेक युवा खेळाडू आहेत जे देशाला पदके मिळवून देत आहेत, विक्रम नोंदवत आहेत. ते नवीन भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला, दृढ निर्धाराद्वारे त्यांनी यशाला गवसणी घातली. आपण बॅडमिंटनमध्ये सर्वोच्च कामगिरी करत आहोत, नेमबाजी, भारोत्तोलन, आणि अन्य क्रीडा प्रकारात चांगले प्रदर्शन करत आहोत. पदक मिळवणारे जे आहेत ते लहान शहरातून आलेले आहेत. ते साध्या मध्यमवर्गीय किंवा नव-मध्यम वर्ग कुटुंबातील आहेत. युवा भारताला वाटते “काहीही शक्य आहे! सर्वकाही प्राप्त करण्याजोगे आहे. ” ही भावनाच देशाच्या विकासाला चालना देईल.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जी पत वाढली आहे, प्रतिष्ठा पुन्हा स्थापित झाली आहे, त्यामुळे युवकांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. समान संधी आहेत. पारदर्शकता, गुणवत्तेची पारख आणि सन्मानाचाच हा परिणाम आहे. नव्या दृष्टिकोनासह, कौशल्य भारत, स्टार्टअप भारत, स्टँडअप भारत , खेलो इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक प्रयत्नांतून नवीन भारताचा पाया मजबूत होत आहे. आता घुसमट संपवून तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे. देशाच्या गरजा काय आहेत ते जाणून घेऊन त्यानुसार योजना आखल्या जात आहेत. तरुण, उद्योजक, महिला, शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्या छोट्या छोट्या समस्या दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करण्याचे काम केले जात आहे.
मित्रांनो, भारताला रस्त्याच्या पायाभूत सुविधांची गरज आहे, भारतमाला त्यासाठी हजारो किलोमीटर रस्त्यांची उभारणी करत आहे. भारताला बंदर-प्रणित विकासाची आवश्यकता आहे . सागरमाला यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करत आहे. भारताला सार्वजनिक सेवा देण्यासाठी डिजीटल होण्याची आवश्यकता आहे . जेएएम ट्रिनिटी आपल्याला तिथे घेऊन आली आहे. भारताला स्वच्छ अर्थव्यवस्थेची गरज आहे , डिजिटल देयके वाढली आहेत आणि BHIM ऍप सारखे नावीन्यपूर्ण प्रयोग आपल्याला तेथे घेऊन जात आहे. भारताला एकात्मिक/आणि सरलीकृत कररचना हवी आहे आणि त्यासाठी जीएसटीचे प्रावधान आहे. भारताला हवाई प्रवासाची ताकद खुली करण्याची गरज आहे, उडानमुळे गरीबांना देखील हवाई प्रवास करता येत आहे. भारताला अधिक कुशल मनुष्यबळ हवे आहे आणि त्यासाठी कौशल्य भारत आहे. भारताला हायवे शी जोडलेली गावे हवी आहेत, आम्ही 2.7 लाख कि.मी. ऑप्टिकल फाइबर जाळे पसरवून एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायतींना जोडत आहोत. भारताला अधिक उद्योजकांची गरज आहे आणि त्यासाठी मुद्रा आणि स्टॅन्ड अप भारत आहेत. भारताला स्वस्त आरोग्यसेवा आवश्यक आहे , त्यासाठी आयुष्मान भारत आहे. आज भारताला स्टार्ट अपद्वारे भरभराट होण्याची गरज आहे , त्यासाठी तुम्ही त्वरित स्टार्टअप नोंदणी करू शकता. स्टार्टअप साठी सरकारी खरेदीत समान संधी आहेत. आम्ही भारताचे भवितव्य प्रत्येक प्रकारे सुरक्षित करत आहोत, नवीन भारताला भरारी घेण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करत आहोत.
मित्रांनो, कल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन नेहमीच भारताच्या सामान्य जीवनाचा भाग राहिले आहेत. मात्र युवकांच्या या सामर्थ्याचा राष्ट्र निर्माणात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी पोषक वातावरण आता निर्माण केले जात आहे. देशाच्या तरुणांच्या आकांक्षा आणि अपार क्षमतांनाही सरकार नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. शाळेतच संशोधनाला पूरक वातावरण तयार व्हावे यासाठी अटल इनोव्हेशन अभियान सुरु करण्यात आले आहे, देशातील शाळा-महाविद्यालयांमध्ये संशोधनाची पूरक व्यवस्था बनवण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक रुची वाढावी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात २४०० पेक्षा अधिक अटल डिजिटल प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे. इथे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सारखे कार्यक्रम राबवले जात आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील युवकांना देशाच्या समस्या सोडवण्याच्या कार्यात थेट सहभागी करून घेतले जात आहे. याच मार्गावरून चालत युवक स्टार्ट अपच्या जगात पाऊल ठेवतील.
आपण पाहिले आहे की काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात सरकारची कारवाई आणि जीएसटीची मागणी, कशा प्रकारे विक्रमी संख्येने लोक पुढे नेत आहेत. हे बदललेल्या वातावरणाचे द्योतक आहे. मला आठवतंय जेव्हा डिजिटल देयकाबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा मोठमोठ्या दिग्गजांनी काय म्हटले होते की भारतासारखा गरीब देश डिजिटल देयकात पुढे जाऊ शकणार नाही. आज डिजिटल देयकाची प्रगती पहा, हे युवकच आहेत ज्यांच्यामुळे आज देशातील प्रत्येक गावात डिजिटल देयक व्यवस्था पोहचली आहे. लोक डिजिटल भरणा करू लागले आहेत.
मित्रांनो, जेव्हा विकास हा आपला एकमेव उद्देश असतो, तेव्हा आम्ही लोकांच्या चिंता आणि आकांक्षा लक्षात घेतो. जेव्हा आपण लोकांच्या सूचना स्वीकारतो, तेव्हा त्याचे प्रतिबिंब धोरणे अधिक सोपी होण्यात दिसून येते. जेव्हा आम्ही लाल-फितीचा कारभार बंद केला आणि धोरणे अधिक सोपी केली तेव्हा आम्ही आणखी थेट परकीय गुंतवणूक आणली, भारतात आणखी उद्योग निर्माण केले. जेव्हा आपण अधिक उद्योग तयार करतो, तेव्हा आपण रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करतो. जेव्हा आपण अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करतो, तेव्हा आपण युवकाला त्याचे भवितव्य सुधारण्यासाठी सक्षम करतो. जेव्हा प्रत्येक नागरिकाचे भविष्य सुधारते, तेव्हा भारताचे भवितव्य आणि जगातील भारताची पत सुधारते.
मित्रांनो, आपल्याकडे आज एक उत्तम संधी आहे, आपण त्या पिढीतील आहोत ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावण्याचे सौभाग्य लाभले नाही मात्र राष्ट्र निर्माणासाठी जगण्याचे आणि देशासाठी काही करण्याची संधी आपल्याला नक्की मिळाली आहे. इतिहास साक्ष आहे, स्वातंत्र्याच्या आंदोलनातही युवकांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारले. तरुणांचा उत्साह आणि जोश यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत निर्णायक भूमिका पार पाडली होती. आज नवीन भारतासाठी देखील तीच भूमिका तुम्ही सर्वजण पार पाडणार आहात . तुम्ही सर्वानी मिळून एका अशा नवीन भारताची निर्मिती करायची आहे ज्याचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिले होते. देशासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्यांनी पाहिले होते.
मित्रांनो, नवीन भारत ही अशी भूमी आहे जिथे तुम्ही तुमचे नाव कमावू शकता , तुमचे नाव तुम्हाला घडवत नाही. जिथे तुमच्या कल्पनांना महत्व आहे, तुमच्या प्रभावाला नाही. जिथे अडथळ्यांऐवजी संधी तुम्हाला निमंत्रण देतात. जिथे अब्जावधी आकांक्षांना मुक्त संचार करण्याची संधी मिळते. जिथे काही निवडक मार्गांऐवजी एकाच मार्गाने प्रवास होतो. ही अशी जागा आहे, जेथे प्रक्रियेवर प्रभाव पाडणाऱ्या लोकांच्या ऐवजी प्रक्रियाच प्रगतीला चालना देतात. जिथे प्रत्येक गोष्ट सरकारची असण्याऐवजी सरकार सर्वांचे असेल.
जिथे निराशाजनक द्वेषावर आशावादी शक्तीचे साम्राज्य असेल.
जिथे 125 कोटी भारतीय सर्व काही नियतीवर सोपवण्याऐवजी स्वतः त्यांचे नशीब लिहितील. हा आमचा नवीन भारत आहे.
मित्रानो, तुम्ही भारताचा वर्तमान आणि भविष्य आहात. भारताला तुमचा सहभाग हवा आहे, केवळ ऐकणारे नाही , आम्हाला सूचना करणारे, आमच्यावरोबर खांद्याला खांदा भिडवून काम करणारे युवक हवे आहेत.
तुम्ही यशस्वी झालात तर देश यशस्वी होईल. तुमचे संकल्प सिद्धीस गेले तर देशाचे संकल्प सिद्धीस जातील. पुन्हा एकदा या उत्तम उपक्रमासाठी , युथ फॉर डेव्हलपमेंटच्या संपूर्ण चमूला खूप-खूप शुभेच्छा देतो आणि ज्या लोकांचा आज गौरव झाला त्यांचे मी खास अभिनंदन करतो. कारण त्यांच्या प्रत्येक कामाची, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाची चर्चा होईल. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणा बनेल. आणि मला वाटते शब्दांपेक्षा अधिक कृतीची ताकद असते. आणि तुम्ही ते लोक आहात , तुम्ही ते कर्मयोगी आहात, ज्यांनी दूर एखाद्या वस्तीत, एखाद्या गावात आपली स्वप्ने साकार करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले, एक काम हातात घेतले ते पूर्ण करून दाखवले. आणि त्याचाच परिणाम आहे की आज तुम्ही समाधानाची अनुभूती घेत आहात . आणि स्वान्त सुखाय, जे काम स्वान्त सुखाय करता, त्याची प्रेरणा अध्यात्मिक सामर्थ्यापेक्षा कित्येक पट अधिक असते. ही स्थिती प्राप्त करणाऱ्या त्या सर्व युवकांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.
खूप-खूप धन्यवाद.