आदरणीय राष्ट्रपती महोदय, श्रीयुत प्रणव मुखर्जी, नवनिर्वाचित राष्ट्रपती महोदय श्री रामनाथ कोविंदजी, आदरणीय उपराष्ट्रपती महोदय, उपस्थित सर्व मान्यवर,
मिश्र भावनांची सरमिसळ असलेला हा क्षण आहे. प्रणवदांच्या कार्यकाळाचा राष्ट्रपती भवनातील हा अखेरचा दिवस आहे. एका प्रकारे या समारंभात मी उभा असतांना अनेक आठवणींना उजाळा मिळणे स्वाभाविक आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कर्तृत्व याची ओळख आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे आहे. मात्र, मनुष्याचा एक नैसर्गिक स्वभाव असतो आणि हे स्वाभाविक देखील आहे की तो आपल्या भूतकाळाची तुलना आपल्या वर्तमानकाळाशी केल्या शिवाय राहू शकत नाही.
प्रत्येक घटनेची, प्रत्येक निर्णयाची, प्रत्येक पुढाकाराची आपल्या जीवनाच्या कार्यकाळाशी तुलना करणे नैसर्गिक असते.
माझ्या तीन वर्षांच्या काळातील त्यांच्या विषयीचा अनुभव अतिशय आश्चर्यकारक होता. इतकी वर्षे ते सरकारांमध्ये राहिले, सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर राहिले, पण त्यांनी वर्तमान सरकारच्या कोणत्याही निर्णयाची तुलना आपल्या भूतकाळातील घडामोडींशी केली नाही किंवा त्यांचे त्या स्वरूपात मूल्यमापन केले नाही. प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन त्यांनी वर्तमानाच्या संदर्भात केले. त्याची हीच मोठी ओळख आहे, असे मला वाटते.
सरकार अनेक गोष्टींसंदर्भात पुढाकार घेत होते आणि माझे सर्वात मोठे भाग्य होते की मला प्रत्येक क्षणी त्यांना भेटण्याची संधी मिळत असे. त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करण्याची संधी मिळत होती आणि ते सुद्धा अतिशय लक्षपूर्वक प्रत्येक गोष्ट ऐकत असत. कुठे काही सुधारणा करायची झाली तर ती सुचवण्याचे काम करत असायचे, जास्त करून प्रोत्साहन द्यायचे. म्हणजेच एका पालकाच्या रुपात, एका पितृतुल्य व्यक्तिमत्वाच्या रूपात राष्ट्रपतींची भूमिका काय असते, तिला कायदे-नियमांच्या चौकटीच्या बाहेर नेऊन आपुलकीने, प्रेमाने या संपूर्ण राष्ट्राच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांचे मार्गदर्शन होत असायचे.
माझ्या सारख्या नवख्या व्यक्तीला, ज्याच्याकडे अशा प्रकारचा कोणताही अनुभव नव्हता, मी एका राज्याचा कारभार चालवून आलो होतो. त्यांच्यामुळेच मला अनेक गोष्टी समजून घेण्यात, निर्णय घेण्यात खूप मदत झाली आणि त्यामुळेच गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाची कामे आम्हाला करता आली.
ज्ञानाचे भांडार, वागण्यात सहजपणा, सरळपणा या गोष्टी कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करतात. मात्र, आमच्या दोघांची जडण-घडण दोन वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये झाली, वेगळ्या प्रकारच्या कार्य-संस्कृतीमध्ये झाली. आमच्या दोघांच्या अनुभवातही, माझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठे अंतर आहे. मात्र, त्यांनी कधीही मला याची जाणीव होऊ दिली नाही आणि ते एक गोष्ट सांगतात की बघा मी राष्ट्रपती जेव्हा झालो तेव्हा झालो. आज राष्ट्रपती असलो तरी लोकशाही हे सांगते की देशाच्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला आहे. तुमचे हे दायित्व आहे की तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करा. राष्ट्रपतीपद, राष्ट्रपतीभवन आणि प्रणव मुखर्जी स्वतः त्यासाठी जे काही करता येईल ते करतील, असे ते सांगायचे. ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे, एक अतिशय मोठी बाब आहे आणि म्हणूनच मी राष्ट्रपती महोदयांचा मनापासून आभारी आहे.
माझा असा ठाम विश्वास आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या साच्यामध्ये मला घडवण्यामध्ये जी भूमिका बजावली आहे तिचा उपयोग मला भावी आयुष्यात होणार आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे. मला स्वतःला असे वाटते, अशी जाणीव होत राहते आणि कदाचित ज्यांनी त्यांच्या सोबत काम केले आहे त्या सर्वांना देखील हे भाग्य लाभले असेल. माझ्या साठी हा सर्वात मोठा ठेवा आहे.
हा ठेवा म्हणजे माझी वैयक्तिक पूंजी आहे आणि त्यासाठी देखील मी त्यांचा अतिशय आभारी आहे.
आज या ठिकाणी अनेक अहवाल सादर करण्यात आले. राष्ट्रपती भवनाला लोक-भवन बनवणे, हे सर्व यामुळे शक्य झाले कारण प्रणवदा या धरणीशी जोडलेले आहेत. जनतेमधून वर आले आहेत. त्यांच्यातच राहून आपला राजकीय प्रवास केला असल्याने, त्यांना लोकशक्ती काय असते, लोकभावना काय असते याची माहिती पुस्तकातून घेण्याची गरज लागली नाही. याची जाणीव त्यांना असायची आणि तिला लागू करण्याचा प्रयत्नही ते करत राहायचे. याच कारणामुळे भारताचे राष्ट्रपती भवन, लोक-भवन बनवण्यात आले. एका प्रकारे सर्वसामान्य जनतेसाठी याची प्रवेशद्वारे खुली झाली.
ते स्वतः इतिहासाचे विद्यार्थी होते आणि मी पाहिले आहे की इतिहासातील प्रत्येक घटना त्यांच्या बोटावर असते. कधी विषय निघाला तर तारखेसकट तिची माहिती ते देतात. मात्र, या ज्ञानाला, इतिहासाच्या महात्म्याला पुढे कसे नेता येईल. राष्ट्रपती भवनात ज्या प्रकारे ते आहे त्याविषयी आताच अमिताजी संपूर्ण अहवाल सादर करत होत्या. मुखर्जी यांच्या कार्यकाळात इतिहासाचा एक अमूल्य खजिना तयार आहे आणि मी हे सांगू शकतो की इथले वृक्ष असतील, पक्षी असतील, दगड असतील, प्रत्येकासाठी काही ना काही इतिहास आहे, प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य असेल आणि हे सर्व आता पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. हे एक खूप मोठे काम येथे झाले आहे आणि मी यासाठी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. मी पुन्हा एकदा प्रणवदांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो.
त्यांचा इतका प्रदीर्घ कार्यकाळ, प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या नव्या इनिंगमध्येही माझ्या सारख्या लोकांना वैयक्तिक रुपात आणि देशाला नैसर्गिक स्वरूपात नेहमीच लाभदायक ठरेल. हा माझा ठाम विश्वास आहे.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे आभार.