जय जगन्नाथ!
जय जगन्नाथ!
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री धर्मेंद्र प्रधान जी, श्री अश्विनी वैष्णव जी, ओडिया समाजाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ प्रधान जी, ओडिया समाजाचे इतर अधिकारी, ओदिशातील सर्व कलाकार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !
ओडिशातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझे नमस्कार आणि जोहार. ओडिशा पर्ब 2024 या ओडिशाच्या संस्कृतीतील भव्य उत्सवात सहभागी होता आले याचा मला अभिमान आहे. तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होत आहे.
ओडिशा पर्ब’च्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे आणि ओडिशाच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या वर्षी स्वाभा कबी गंगाधर मेहेर यांच्या पुण्यतिथीची शताब्दीही आहे. या निमित्ताने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भक्त दासिया बौरी जी, भक्त सालबेगा जी आणि ओडिया भागबताचे संगीतकार श्री जगन्नाथ दास जी यांचेही मी आदरपूर्वक स्मरण करतो. भारताला आपल्या सांस्कृतिक विविधतेतून जिवंत ठेवण्यात ओदिशाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मित्रांनो,
ओडिशाच्या भूमीत नेहमीच संत आणि विद्वानांचा वास राहिला आहे. ओडिशाच्या विद्वानांनी ज्या प्रकारे महाभारत आणि ओडिया भागबतासारखे पवित्र ग्रंथ प्रत्येक घराघरात सोप्या भाषेत पोहोचवले आणि लोकांना ऋषीमुनींच्या ज्ञानाशी जोडले त्यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा खूप समृद्ध झाला आहे. भगवान जगन्नाथ जी बद्दलचे विपुल साहित्य ओडिया भाषेत उपलब्ध आहे. भगवान जगन्नाथाची एक कथा जी मला नेहमी आठवते ती म्हणजे जेव्हा भगवान जगन्नाथ जेव्हा आपल्या मंदिरातून बाहेर पडले आणि त्यांनी वैयक्तिकरित्या युद्धाचे नेतृत्व केले. रणांगणावर जाताना त्यांनी त्यांची भक्त मनिका गौडुनी यांनी दिलेले दही खाल्ले. ही कथा आपल्याला महत्त्वपूर्ण धडे शिकवते. ही कथा आपल्याला आठवण करून देते की जर आपण शुद्ध हेतूने कार्य केले तर प्रभु स्वतःच आपले मार्गदर्शन करतो. प्रत्येक परिस्थितीत, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कधीही एकटे नसतो. देव आपल्यासोबत असतो म्हणून आपण नेहमी “कोणाच्या तरी सोबत” असतो.
मित्रांनो,
ओडिशाचे संत-कवी भीमा भोई म्हणतात,
मो जीवन पछे नर्के पडिथाउ जगत उद्धार हेउ।
याचा अर्थ ‘जर त्यामुळे जगताचा उद्धार होणे निश्चित असेल तर माझे जीवन नरकातच व्यतीत होऊ दे.’ ही भावना ओडिशाच्या संस्कृतीला मूर्त रूप देते. ओदिशाने नेहमीच प्रत्येक युगात राष्ट्र आणि मानवतेची सेवा केली आहे. पवित्र पुरी धामाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ (एक भारत, महान भारत) ही संकल्पना बळकट केली आहे. ओडिशाच्या शूर पुत्रांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. पाईका बंडातील हुतात्म्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. पाईका बंडाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्याचा विशेषाधिकार माझ्या सरकारला मिळाला आहे.
मित्रांनो,
उत्कल केसरी हरेकृष्ण महाताब यांच्या योगदानाचे स्मरण संपूर्ण देश करत आहे. आपण त्यांची 125 वी जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहोत. ओदिशाने संपूर्ण इतिहासात देशाला उल्लेखनीय नेतृत्व दिले आहे. आज, आदिवासी समाजातील ओडिशाच्या कन्या, द्रौपदी मुर्मू जी, भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत - ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण भारतातील आदिवासी समुदायांसाठी हजारो कोटी किमतीच्या कल्याणकारी उपक्रमांना प्रेरणा दिली आहे. याचा फायदा केवळ ओदिशाच नाही तर संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाला झाला आहे.
मित्रांनो,
ओडिशा ही मां सुभद्रेची भूमी आहे, जी ‘नारी शक्ती’ (स्त्री शक्ती) आणि संभाव्यतेचे प्रतीक आहे. ओडिशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा तेथील महिलांची प्रगती होईल. म्हणूनच, मी काही दिवसांपूर्वीच ओडिशातील माता आणि भगिनींसाठी सुभद्रा योजना सुरू केली, ज्याचा राज्यातील महिलांना खूप फायदा होईल. उत्कलच्या या महान सुपुत्रांची माहिती देशाला कळू द्या आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्या. यासाठीच अशा आयोजनांना खूप महत्त्व आहे.
मित्रांनो,
उत्कलने ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा सागरी पराक्रम विस्तारित केला आहे. कालच, ओडिशात भव्य बाली जत्रेची सांगता झाली. यावर्षी देखील, कार्तिक पौर्णिमेपासून म्हणजे 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या जत्रेचा भव्य उत्सव कटकमधील महानदीच्या काठावर आयोजित करण्यात आला होता. बाली जत्रा हे भारत आणि ओदिशाच्या सागरी पराक्रमाचे प्रतीक आहे. शेकडो वर्षांपूर्वी, आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाशिवाय देखील, या भूमीतील खलाशांनी समुद्र पार करून विलक्षण धैर्य दाखवले होते. आपले व्यापारी जहाजांमधून इंडोनेशियातील बाली, सुमात्रा, जावा यांसारख्या ठिकाणी गेले. या प्रवासांतून केवळ व्यापारच नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. आज, ओडिशाचे सागरी सामर्थ्य ‘विकसित भारता’चे (विकसित भारत) स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मित्रांनो,
गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी ओडिशाच्या भविष्यासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. 2024 मध्ये ओदिशाच्या लोकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व आशीर्वादामुळे या दृष्टीला गती मिळाली आहे. आम्ही महान स्वप्नांची कल्पना केली आहे आणि महत्वाकांक्षी ध्येये ठेवली आहेत. 2036 मध्ये, ओडिशा राज्य स्थापनेची शताब्दी साजरी करत असताना, आम्ही ओडिशा हे देशातील सर्वात मजबूत, श्रीमंत आणि सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.
मित्रांनो,
एक काळ असा होता की ओडिशासह पूर्व भारताला ‘मागास भाग’ असे संबोधले जात होते. तथापि, मी मात्र पूर्वेकडील प्रदेशाकडे भारताच्या विकासाचे इंजिन म्हणून पाहतो. त्यामुळे पूर्व भारताच्या विकासाला आमचे प्राधान्य राहिले आहे. संपर्क सुविधा असो, आरोग्यसेवा असो किंवा शिक्षण असो, आम्ही पूर्व भारतातील प्रत्येक क्षेत्रात विकास कामाला गती दिली आहे. एका दशकापूर्वीच्या तुलनेत केंद्र सरकार आता ओडिशाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तिप्पट तरतूद करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे वाटप 30% जास्त आहे. ओडिशाच्या प्रगतीसाठी आम्ही प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने काम करण्यास वचनबद्ध आहोत.
मित्रांनो,
ओडिशात बंदरावर आधारित औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे या भागातील व्यापाराला चालना देण्यासाठी धामरा, गोपाळपूर, अस्तरंगा, पालूर आणि सुवर्णरेखा या बंदरांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. ओडिशा हे भारताचे खाण आणि धातूचे पावरहाऊस देखील आहे, जे पोलाद, ॲल्युमिनियम आणि ऊर्जा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करत आहे. या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आपण ओडिशात समृद्धीचे नवीन दरवाजे खुले करु शकतो.
मित्रांनो,
ओडिशाच्या सुपीक जमिनीतून काजू, ताग, कापूस, हळद आणि तेलबियांचे मुबलक उत्पादन होते. ही उत्पादने मोठ्या बाजारपेठेत पोहोचावीत ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल हे आमचे उद्दिष्ट आहे. ओदिशाच्या समुद्रीखाद्य प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारासाठी देखील लक्षणीय क्षमता आहे. ओडिशा हा समुद्रीखाद्याला उच्च मागणी असलेला जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित करावे हे आमचे ध्येय आहे.
मित्रांनो,
ओडिशा हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण बनवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. राज्यातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. ‘उत्कर्ष उत्कल’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवणुकीला चालना दिली जात आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत ओदिशाने 45,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली. ओडिशाकडे आज याबाबतचा दृष्टीकोन आणि रूपरेषा दोन्ही आहेत. यामुळे गुंतवणूक तर आकर्षित होईलच पण रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. या प्रयत्नांसाठी मी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
ओडिशाच्या क्षमतेचा योग्य दिशेने वापर करून आपण त्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतो. ओडिशाचे मोक्याचे स्थान हा एक महत्त्वाचा फायदा असल्याचे माझे मत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुलभतेने प्रवेश प्रदान करत असून यामुळे ते पूर्व आणि आग्नेय आशियातील व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.भविष्यात जागतिक मूल्य श्रृंखलेत ओदिशाच्या भूमिकेत लक्षणीयरित्या वाढ होईल. राज्यातून निर्यात वाढविण्याच्या दिशेने आमचे सरकार कार्यरत आहे.
मित्रांनो,
ओडिशात शहरीकरणाला चालना देण्यासाठी विपुल संधी आहेत. आमचे सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे. अधिक वेगवान आणि उत्कृष्ट संपर्क यंत्रणा असलेली शहरे उभी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ओदिशातील टियर 2 शहरांमध्येही आम्ही शक्यता धुंडाळत आहोत. खास करून, पश्चिम ओदिशाच्या जिल्ह्यांमध्ये नवीन पायाभूत सुविधांचा विकास होत नवीन संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
ओडिशा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येत आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह, राज्य शिक्षण क्षेत्रात आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. या प्रयत्नांमुळे राज्यातील स्टार्ट-अप परिसंस्थेच्या वाढीला चालना मिळत आहे.
मित्रांनो,
ओडिशा कायमच त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे खास राहिले आहे. ओदिशातील कलाप्रकार सर्वांना मोहित करतात आणि प्रेरणा देतात. ओडिसी नृत्य असो की चित्रे, राज्य कलात्मक उत्कृष्टतेने भरलेले आहे. सौरा चित्रकलेची आदिवासी कला तसेच संबळपुरी, बोमकाई आणि कोटपाड विणकरांची कलाकुसर तितकीच उल्लेखनीय आहे. आपण या कलाप्रकार आणि हस्तकलेचा जितका अधिक प्रचार करू, तितकाच आपल्याला हा वारसा जतन आणि समृद्ध करणाऱ्या कुशल ओडिया कारागिरांचा सन्मान करता येईल.
मित्रांनो,
ओडिशाला वास्तूविशारद शास्त्र आणि विज्ञानाचा अफाट वारसा लाभला आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिर, त्याची भव्यता आणि वैज्ञानिक तेज तसेच लिंगराज आणि मुक्तेश्वर सारखी प्राचीन मंदिरे त्यांच्या वास्तूवैभवाने सर्वांनाच थक्क करून सोडतात. आज जेव्हा लोक या कलाकृती पाहतात तेव्हा ते शतकांपूर्वी ओदिशाचे विज्ञानाचे ज्ञान किती प्रगत होते हे जाणून आश्चर्यचकित होतात.
मित्रांनो,
ओडिशा ही पर्यटनासाठी अमर्याद क्षमता असलेली भूमी आहे. या संभाव्यतेची जाणीव होण्यासाठी, आपल्याला अनेक प्रतलांवर कार्य करणे आवश्यक आहे. आपण पाहू शकता की ओडिशात तसेच राष्ट्रीय पातळीवर, आपली अशी सरकारे आहेत जी ओडिशाचा वारसा आणि ओळख यांचे जतन करतात आणि त्यांचा आदर करतात. गेल्या वर्षी, G-20 शिखर परिषदेदरम्यान, आम्ही भव्य सूर्य मंदिराचे दर्शन जागतिक नेते आणि मुत्सद्दींना घडवून त्याचे महत्त्व अधोरेखित केले. रत्न भांडारासह महाप्रभू जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे आता उघडण्यात आले आहेत याचा मला आनंद आहे.
मित्रांनो,
ओडिशाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे. उदाहरणादाखल, आपण बाली जत्रा दिवस घोषित करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तो नावारूपाला आणू शकतो. त्याचप्रमाणे, आपण शास्त्रीय ओडिसी नृत्य प्रकार साजरा करण्यासाठी ओडिसी दिन सुरू करू शकतो. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासह विविध आदिवासी वारसा साजरे करण्यासाठी नवीन परंपरा सुरू केल्या जाऊ शकतात. यामुळे जनजागृती होईल, तसेच पर्यटन आणि लघुउद्योगात संधी निर्माण होतील. लवकरच, भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीय दिवस देखील आयोजित केला जाईल, ज्यामुळे जगभरातील लोक आकर्षित होतील. ओडिशा पहिल्यांदाच अनिवासी भारतीय दिवसाचे यजमानपद भूषवणार आहे. राज्यासाठी ही एक उल्लेखनीय संधी ठरणार आहे.
मित्रांनो,
बदलत्या काळात अनेक ठिकाणचे लोक आपली मातृभाषा आणि संस्कृती विसरत आहेत. तथापि, माझे असे निरीक्षण आहे की ओडिया समुदाय, कोठेही वास्तव्यास असला तरी, त्यांची भाषा, संस्कृती आणि सण यांच्याशी खोलवर जोडलेला राहिला आहे. आपल्या मातृभाषेची आणि सांस्कृतिक मुळांची ताकद आपल्याला आपल्या वारशाशी जोडून ठेवते. अलीकडेच, मी दक्षिण अमेरिकेतील गयाना येथे या चैतन्यशील भावनेचा साक्षीदार झालो. 200 वर्षांपूर्वी स्थलांतरित होऊनही शेकडो कामगारांनी रामचरितमानस आणि प्रभू रामाचे नाव सोबत घेऊन, भारताशी असलेले त्यांचे नाते जपले आहे. अशा वारशाच्या जपणुकीबरोबरच जेव्हा विकास होतो, तेव्हा त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे आपण ओदिशाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो.
मित्रांनो,
या आधुनिक युगात आपण आपली मुळे मजबूत करत समकालीन बदलांचा स्विकार केला पाहिजे. ओडिशा पर्वासारखे कार्यक्रम यासाठी एक माध्यम म्हणून काम करू शकतात. येत्या काही वर्षात हा कार्यक्रम दिल्लीतील सध्याच्या सीमा ओलांडून आणखी विस्तारीत होईल अशी मला आशा आहे. शाळा, महाविद्यालये आणि राज्यांमधील लोकांचा अधिकाधिक सहभाग आपण सुनिश्चित केला पाहिजे. इतर राज्यांतील लोकांनी ओडिशाबद्दल जाणून घेणे आणि इथली संस्कृती जवळून अनुभवणे महत्त्वाचे आहे. नजीकच्या काळात ओडिशा पर्वाची स्पंदने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत सामूहिक सहभागासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनतील याचा मला विश्वास आहे. या भावनेने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
खूप खूप आभार !
जय जगन्नाथ !