इथे उपस्थितीत बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील आजचा हा माझा चौथा कार्यक्रम आहे. याआधी मी ठाण्यात होतो. तिथे देखील हजारो-कोटींच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.
यामध्ये गरिबांसाठीच्या घरांचे प्रकल्प पण होते आणि मेट्रो विस्ताराशी संबंधित प्रकल्प पण होते.
8 हजार कोटी रुपये खर्च करून निर्माण होत असलेल्या पुणे मेट्रो लाईनच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी करण्याची संधी आता थोड्यावेळापूर्वी मला मिळाली. हिंजेवाडी पासून शिवाजी नगर पर्यंत जोडणाऱ्या या मेट्रो प्रकल्पामुळे देशातील सर्वात व्यस्त आयटी केंद्रांपैकी एक असलेल्या या क्षेत्राला यामुळे खूप सुविधा होणार आहे.
महाराष्ट्र आणि देशातील कानाकोपऱ्यातून इथे काम करायला येणाऱ्या आयटी व्यावसायिकांचे, इथल्या स्थानिक नागरिकांचे जीवन यामुळे सुकर होईल.
मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी मला पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले होते. मला आनंद आहे की, ज्या दोन कॉरीडोरवर हे काम सुरु करण्यात आले होते, तिथे जलद गतीने काम सुरु आहे. मला आशा आहे की, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पुण्यात 12 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावायला सुरुवात होईल.
शिवाजी नगर पासून आज तिसऱ्या टप्प्याचा देखील शुभारंभ झाला. जेव्हा हा टप्पा पूर्ण होईल तेव्हा, लोकांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या चार वेगवेगळ्या कोपऱ्यापासून हिंजेवाडी आयटी पार्कला पोहोचणे खूपच सोयीचे होईल.
इथे उपस्थितीत आयटी क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांचे मी यासाठी विशेष अभिनंदन करतो. आज इथे ज्या प्रकल्पांच्या कामांची सुरुवात झाली हे, ते केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या त्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे ज्याच्या केंद्रस्थानी पायाभूत सुविधा आहेत.
गेल्या चार-साडे चार वर्षांपासून तुम्ही बघतच आहात की, कशाप्रकारे केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे.
देशभरात कनेक्टिव्हिटी, म्हणजेच महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग आणि आय-वे चा विस्तार-वेग वाढवण्यासाठी जलद गतीने काम सुरु आहे.
मित्रांनो, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कामरूपपर्यंत जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल कोणत्या वेगाने आणि किती मोठ्या प्रमाणावर काम चालु आहे.
सरकारच्या वचनबद्धतेमुळे हे सर्व शक्य झाले आहे, त्याचसोबत स्थानिक लोकं, शेतकरी कामगार, व्यवसायिक यांच्या इच्छा- आकांक्षा आणि सहकार्य देखील आहेच.
विकासाच्या महामार्गापासून आज कोणीही वंचित नाही. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने कोणी कितीही समर्थ अथवा असमर्थ असुदे, परंतु तो त्याचा वेळ केवळ प्रवास करण्यामध्ये फुकट घालवू इच्छित नाही. कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे त्याचे पीक, उत्पन्न, त्याचे दुध-दही, त्याचे उत्पादन वाया जावे अशी त्याची बिल्कुल इच्छा नसते. त्याच्या मुलांना शाळेत यायला जायला कमी वेळ लागावा अशी त्याची इच्छा असते जेणेकरून तो जास्तवेळ अभ्यास करू शकेल आणि त्याला खेळायला पुरेसा वेळ मिळेल. तो तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून 8-9 तासाच्या कार्यालयीन वेळेला 12-13 तास करू इच्छित नाही. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो. आपल्या वेळेचा सदुपयोग करू इच्छितो. याच कारणास्तव गावापासून शहरापर्यंत, पुढील पिढीच्या पायभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्राच्या एकीकरणावर लक्ष दिले जात आहे.
मित्रांनो, याच विचारा सोबत केंद्र सरकार इथे देवेंद्र फडणवीस याच्या सरकार सोबत महाराष्ट्रात पुण्याची पायभूत सुविधा मजबूत करण्याचे काम करत आहे.
हिंजेवडी- शिवाजीनगर मेट्रो लाईन अजून एका दृष्टीने खास आहे. सरकारने देशातील मेट्रोच्या विकासासाठी पहिल्यांदा जे मेट्रो धोरण बनवले, त्या अंतर्गत तयार होणाऱ्या प्रकल्पांपैकी हा पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प पीपीपी म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून तयार होत आहे.
एका वर्षापूर्वी सरकारने जे नविन मेट्रो धोरण तयार केले आहे, ते देशातील मेट्रोच्या विस्ताराप्रती आमचा संकल्प दर्शवितो. हे धोरण आल्यानंतर मेट्रो निर्माण कार्य वेगाने होत आहे, कारण नियम-कायदे स्पष्ट झाले आहेत.
शहरांमध्ये वाहतूक क्षेत्राच्या वेगवेगळ्या एजन्सींमधील ताळमेळ पद्धती निश्चित केल्या आहेत. या मेट्रो रेल्वे धोरणात सुधारणा केल्या आहेत. मेट्रो ट्रेनबरोबरच मेट्रो स्टेशन पर्यंत फीडर बस, नवीन फुटपथ, नवीन पदपथ देखील विकसित केले जातील. आता मेट्रो मध्ये अंतर्भूत शहरी वाहतूक प्राधिकरण द्वारे सिंगल कमांड सिस्टम अंतर्गत काम चालू आहे. यामुळे लोकांच्या आवश्यक गरजांची माहिती मिळत आहे आणि आगामी काळात अजून आणखी शहरे यात जोडली जातील.
गेल्या चार वर्षांत 300 किलोमीटरचे नवीन मार्ग अधिकृत केले आहे आणि 200 किलोमीटरचे नवीन प्रस्ताव पारित केले आहेत. परिणामी, याच कालावधीत 500 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो लाइन कार्यान्वित आहे आणि जवळजवळ 650 किलोमीटर लांबीच्या मार्गाची पूर्तता होणार आहे.
महाराष्ट्रात देखील केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे 200 किलोमीटरहून अधिक लांबीच्या मेट्रो लाइनचे निर्माण करत आहेत.
बंधू आणि भगिनींनो, आज देशात जो मेट्रोचा विस्तार होत आहे त्याला अटलजींच्या सरकारने खऱ्या अर्थाने गती दिली होती. अटलजींनी शहर आणि गावामध्ये पायाभूत सुविधेवर जोर दिला, 10 वर्षानंतर आमच्या सरकारने त्याला वेग दिला आणि त्याची उंची देखील वाढवली.
मला असे सांगण्यात थोडा देखील संकोच वाटत नाही की, अटलजींच्या सरकारला अजून थोडा वेळ मिळाला असता तर कदाचित आज मुंबई आणि आजूबाजूचा परिसर, महाराष्ट्रातील अनेक शहरे मेट्रोशी जोडली गेली असती.
दिल्लीत अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात मेट्रोचे काम सुरू झाले. आज जवळजवळ संपूर्ण दिल्ली मेट्रोने जोडली आहे.
मित्रांनो, आधीच्या सरकारने वाहतूक आणि पायाभूत सुविधेला जितके प्राधान्य द्यायला हवे होते ते दिले नाही.
मित्रांनो, त्यांना त्यांच्या विचारांसोबत आनंदी राहूदे, देशातील कोपरानकोपरा, कण आणि कण जोडला जावा, देशाचा संतुलित विकास व्हावा असा आमचा विचार आहे. आम्ही एक भारत-उत्कृष्ट भारत निर्माण करण्याचे मिशन हाती घेऊन बाहेर पडलो आहोत.
होय मला या गोष्टीची नक्कीच आठवण करून द्यायची आहे की, 2004 पासून- 2004 आणि 2018 च्या कालखंडात, एका पिढीचा फरक पडला आहे, विचारांमध्ये फरक आला आहे, आकांक्षा बदलल्या आहेत.
बंधू आणि भगिनींनो, सुलभ जीवन पद्धती आणि सुलभ व्यापार सुनिश्चित करण्यावर सरकारचे प्राधान्य आहे. याच कारणास्तव देशभरात जवळपास शंभर स्मार्ट सिटी विकसित होत आहेत.
पुण्यासह महाराष्ट्रातही 8 शहरांना स्मार्ट बनविण्यात येत आहे. देशभरात या अभियानाखाली 5 हजार पेक्षा जास्त प्रकल्पांची निवड केली गेली आहे.
या प्रकल्पांवर आगामी काळात दोन लाख कोटी रुपये खर्च होतील. 10 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आणि 53 हजार कोटी रुपयांचे 1700 प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे.
मित्रांनो, पुण्यासह महाराष्ट्रातील 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अंदाजे दीड हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली असून साडेतीन हजार कोटी रुपयांची काम वेगाने पूर्ण होत आहेत.
पुण्याची एकीकृत कमांड आणि नियंत्रण प्रणाली सुरु झाली आहे. येथून आता संपूर्ण शहरांच्या व्यवस्थांचे निरीक्षण केले जात आहे.
इतकेच नाही अमृत मिशन अंतर्गत महाराष्ट्राच्या 41 पेक्षा जास्त शहरांमध्ये देखील वेगाने काम चालू आहे.
रस्ता, विद्युत, पाणी, सांडपाणी यासारख्या प्राथमिक सुविधांशी निगडीत जवळजवळ 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या स्तितीत आहेत.
त्याचबरोबर शहरांना प्रकाशमान करण्यासाठी, त्यांची सुंदरता वाढविण्यासाठी, कमी विजेत अधिक प्रकाशासाठी एलईडी पथ दिवे लावले जात आहेत.
महाराष्ट्रात वेगळ्या शहरांमध्ये जवळजवळ एक लाख असे पथ दिवे लावले आहेत. यामुळे शेकडो कोटी रुपयांच्या विजेची बचत होत आहे.
मित्रांनो, सामान्य नागरिकांची बचत व्हावी, तसेच त्यांना सहजपणे सरकारी सेवांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल इंडिया अभियानाने व्यापक स्वरूप घेतले आहे.
आज जन्माच्या दाखल्यापासून हयातीच्या दाखल्यापर्यंत अशा शेकडो सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
वीज, पाणी बिलापासून रुग्णालयात वेळ घेणे, बँकांचे व्यवहार, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, प्रवेश, आरक्षण, जवळजवळ प्रत्येक सुविधा ऑनलाइन केली जाते. जेणेकरून रांगेत उभे रहावे लागणार नाही आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल.
आता डीजी-लॉकर मध्ये तुमची सर्व प्रमाणपत्रे सुरक्षित राहू शकतील. देशभरात अंदाजे दीड कोटी खाती उघडली आहेत.
एवढेच नाही, आता वाहनचालक परवान्यासह दुसरी कागदपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. मोबाइल फोनवर त्याच्या सॉफ्ट कॉपी किंवा मग डीजी-लॉकर द्वारे काम होईल.
बंधू आणि भगिनींनो, सरकारचा हा प्रयत्न आहे की, आमच्या व्यावसायिकांनी त्यांची दिनचर्या आमचे उद्योग आणि देशाच्या नवीन गरजानुसार नियम-कायदे तयार करावेत आणि ते बदलावेत. नियम सरळ देखील असावेत आणि सुलभ आणि पारदर्शक देखील.
डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाने सरकारच्या या प्रयत्नांना वेग दिला आहे. आज जर सामान्य ते सामान्य व्यक्तीपर्यंत तंत्रज्ञान पोहोचत असेल तर स्वस्त मोबाइल फोन, स्वस्त आणि जलद इंटरनेट डेटा यात मोठ्या प्रमाणत भूमिका बजावत आहे.
मोबाइल फोन आता स्वस्त झाले, कारण भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन बनविणारा देश बनला आहे. देशभरात जवजवळ सव्वाशे मोबाईल फोन उत्पादन कंपन्या कार्यरत आहेत. चार वर्षापूर्वी फक्त दोनच कंपन्या होत्या. साडे चार ते पाच लाख युवक या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. आता याचा अजून विस्तार होणार आहे. भारत मोबाईल सह संपूर्ण इलेक्ट्रोनिक्स उत्पादनाचे मोठे हब बनत आहे.
मित्रांनो, हार्डवेअरसह स्वस्त आणि जलद डेटा गाव-गाव, गल्ली-गल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे. देशभरात जवळजवळ सव्वा लाख ग्रामपंचायती पर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचले आहे.
तीन लाख पेक्षा अधिक सामान्य सेवा केंद्र गावांमध्ये काम करत आहे. त्यात काम करणारे जवळजवळ दहा लाख युवक, गावांना ऑनलाइन सुविधा देत आहेत.
एक लाखापेक्षा जास्त टपाल कार्यालयांमध्ये आता ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध आहे, घरपोच सेवा केंद्र देखील बनत आहे.
देशभरातल्या अंदाजे 700 रेल्वे स्टेशनवर मोफत वाई-फाई सुविधा उपलब्ध आहे.
मित्रांनो, 2014 पूर्वी देशात जे डिजिटल व्यवहार होत होते, ते आता 6 पटीने वाढले आहेत. देशांत आतापर्यंत 50 कोटीहून अधिक रुपे, डेबिट कार्ड वितरीत केले गेले आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये यूपीआय, भिम आणि इतर डिजिटल व्यासपीठांच्या माध्यमातून व्यवहारात लाखो पटीने वाढ झाली आहे.
बंधू आणि भगिनींनो, पुणे – शिक्षण, आयटी, अभियांत्रिकी आणि व्यवसाय केंद्र देखील आहे. हे ज्ञानाचे केंद्र आहे, तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. इथेच नव भारताची ओळख पटणार आहे.
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक पायभूत सुविधा आमच्याकडे तयार आहेत आणि इथे उपस्थित हजारो युवकांप्रमाणे एकाहून एक नवोन्मेश कल्पनांची फौज आमच्याकडे तयार आहे.
स्टार्टअप इंडिया आणि अटल नवोन्मेश अभियानाद्वारे भारत भविष्यातील तंत्रज्ञानाचे एक मोठे केंद्र बनत आहे. स्टार्टअपमध्ये भारत जगातील दुसरी मोठी कार्यप्रणाली बनला आहे. देशभरात जवळपास 500 जिल्ह्यांमध्ये 14000 हून अधिक स्टार्टअपची स्टार्टअप इंडिया अभियान अंतर्गत निवड करण्यात आली आहे.
आपल्या देशात कल्पनांची कमतरता नाही. कमतरता होती तर टी त्यांना दिशा देण्याची, हात पकडून त्यांना पुढे नेण्याची. सरकार आता कल्पनांना उद्योग बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.
कमी वयातच तंत्रज्ञासाठी प्रवृत्ती विकसित केली जात आहे. शाळांमध्ये अटल टिंकरींग लॅब सुरु केल्या जात आहेत तर स्टार्ट अप साठी अटल इंक्यूबेशन सेंटर देशभरात सुरु केले जात आहेत.
नव भारताच्या नवीन केंद्रांमध्ये देशाचे भविष्य निर्माण होत आहे. जगातील सर्वात मोठे प्रतिभा केंद्र तयार होईल. नव भारताच्या निर्मितीमध्ये तुम्हा सर्वांची, पुण्याची, महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
याच विश्वासा सोबत पुन्हा एकदा मेट्रो लाईनचे काम सुरु झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात यासाठी तुमचे मनापसून आभार मानतो.
खूप-खूप धन्यवाद!