Quote"आपली मंदिरे, मठ आणि पवित्र स्थळे हे एकीकडे श्रद्धा व संसाधन केंद्र राहिले आहेत आणि दुसरीकडे ती विज्ञान आणि सामाजिक जाणीवांचीही केंद्र आहेत": पंतप्रधान
Quote"आयुर्वेद आणि योगशास्त्र हे विज्ञान आपल्या ऋषींनी दिले, जे आज संपूर्ण जगात नावाजले गेले आहे": पंतप्रधान
Quote"जेव्हा देशाने मला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र सरकारचा संकल्प बनवला आणि 'सबका साथ, सबका विकास' हा संकल्प सर्वांसाठी उपचार, सर्वांसाठी आरोग्य यावर आधारित आहे": पंतप्रधान

भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।

(भावांनो, सगळे बोला मतंगेश्वर भगवान यांचा विजय असो, बागेश्वर धामचा विजय असो, जय जटाशंकर धामचा विजय असो. आपणा सर्वांना, माझ्या तर्फे दोन्ही हात जोडून राम-राम)

कार्यक्रमाला उपस्थित असलेले मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री भाऊ मोहन यादव, जगतगुरू पूज्य रामभद्राचार्य, बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेन्द्र शास्त्री, साध्वी ऋतंभरा, स्वामी चिदानंद सरस्वती, महंत बालक योगेश्वरदास, या भागाचे खासदार विष्णुदेव शर्मा, इतर मान्यवर आणि प्रिय बंधू-भगिनींनो...

माझे भाग्य की मला पुन्हा एकदा या वीरांची भूमी असलेल्या बुंदेलखंडामध्ये येण्याचा मान मिळाला आहे. यावेळी तर मला बालाजींचे बोलावणे आले आहे. मारुतीच्या कृपेने, श्रद्धेचे हे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार आहे. मी नुकतेच इथे बागेश्वर धाम  वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा  भूमिपूजनाचा विधी पार पाडला आहे. हे संस्थान 10 एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच येथे 100 खाटांची सुविधा निर्माण केली जाईल. मी या पवित्र कार्यासाठी धीरेन्द्र शास्त्री जी यांचे अभिनंदन करतो आणि बुंदेलखंडच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.  

 

|

मित्रांनो,  

आजकाल आपण पाहतो की काही नेते असे आहेत जे धर्माची टिंगल करतात, उपहास करतात, लोकांना विभाजित करण्याच्या प्रयत्नात असतात आणि अनेकदा परकीय शक्तीदेखील त्यांना साथ देऊन देश आणि धर्माला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. हिंदू श्रद्धेचा तिरस्कार करणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहिले आहेत. गुलामीच्या मानसिकतेने ग्रासलेले हे लोक आमच्या विचारसरणी, श्रद्धा, मंदिरे, संत, संस्कृती आणि तत्वज्ञानावर टिका करतात. हे लोक आमच्या सणांना, परंपरांना आणि प्रथांना नाव ठेवतात. जी संस्कृती स्वभावतःच प्रगतिशील आहे, तिच्यावर हे चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात. आपला समाज विभागला जावा, त्याची एकता नष्ट व्हावी, हेच त्यांचे धोरण आहे. अशा परिस्थितीत, माझे लहान भाऊ धीरेन्द्र शास्त्री जी बऱ्याच काळापासून देशभर एकतेचा मंत्र घेऊन लोकांना जागरूक करत आहेत. आता त्यांनी समाज आणि मानवतेच्या हितासाठी आणखी एक संकल्प केला आहे आणि या कर्करोग उपचार केंद्राच्या उभारणीचे कार्य हाती घेतले आहे. म्हणजेच आता बागेश्वर धाममध्ये भजन, भोजन आणि निरोगी जीवन या तिन्हींचे आशीर्वाद मिळणार आहेत.  

मित्रांनो, 

आपली मंदिरे, आपले मठ, आपली तीर्थस्थळे ही पूजन आणि साधनेची केंद्रे तर आहेतच, पण त्याच वेळी ती विज्ञान आणि सामाजिक चिंतनाची तसेच सामाजिक जागृतीची केंद्रेही आहेत. आपल्या ऋषींनी आपल्याला आयुर्वेदाचे विज्ञान दिले. आपल्या ऋषींनीच आपल्याला योगाचे ज्ञान दिले, ज्याचा झेंडा आज संपूर्ण जगभर फडकत आहे. आपली धारणा आहे – 'परहित सरिस धर्म नाही भाई'. याचा अर्थ, दुसऱ्यांची सेवा करणे, दुसऱ्याच्या दुःखाचे निवारण करणे, हाच खरा धर्म आहे. त्यामुळेच, "नरात नारायण, जीवात शिव" ही भावना घेऊन प्रत्येक प्राणीमात्राची सेवा करणे हीच आपली परंपरा राहिली आहे.  

 

|

आजकाल महाकुंभची सर्वत्र चर्चा सुरू आहे. महाकुंभ आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी तिथे पोहोचून श्रद्धेची डुबकी घेतली आहे, संतांचे दर्शन घेतले आहे. जर आपण या महाकुंभकडे पाहिले, तर सहजच जाणवते की हा एकतेचा महाकुंभ आहे. पुढील अनेक शतकांसाठी, 144 वर्षांनंतर पार पडलेला हा महाकुंभ, एकतेचा संदेश देणारा राहील आणि देशाच्या ऐक्याला बळकट करणारे अमृत वाटत राहील. लोक सेवाभावाने कार्यरत आहेत. जो कोणी कुंभात गेला आहे, त्याने एकतेचे दर्शन घेतले आहे. पण ज्यांनी ज्यांनी माझी भेट घेतली, तो प्रत्येकजण दोन गोष्टी आवर्जून सांगत होता;

पहिली गोष्ट – ते भरभरून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करत होते. हे स्वच्छता कर्मचारी 24 तास सेवा भावाने, एकतेच्या या महाकुंभात स्वच्छतेचे कार्य संभाळत आहेत. मी आज त्यांना मानाचा मुजरा करतो.  

दुसरी गोष्ट – जे आपल्या देशात कमी ऐकायला मिळते, पण यावेळी मी पाहतो आहे, की एकतेच्या या महाकुंभात पोलिसांनी जी भूमिका पार पाडली आहे, ती एक सेवकाच्या भूमिकेसारखी, साधकाच्या भूमिकेसारखी आहे. त्यांनी अत्यंत नम्रतेने, संपूर्ण सेवाभावाने देशभरातून आलेल्या लाखो जनतेची काळजी घेतली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी देशवासीयांचे मन जिंकले आहे आणि तेही कौतुकास पात्र आहेत.  

पण बंधू आणि भगिनींनो,  

प्रयागराजच्या या महाकुंभात, या सेवाभावाने विविध समाजसेवी उपक्रमही राबवले जात आहेत. ज्याकडे माध्यमांचे लक्ष जाणे कठीण आहे, त्यामुळे यावर फार चर्चा झालेली नाही. जर मी या सर्व सेवा प्रकल्पांवर बोलायला लागलो, तर माझा पुढील कार्यक्रम विस्कळीत होईल. पण मी एका विशेष उपक्रमाचा उल्लेख करू इच्छितो.  

 

|

या एकतेच्या महाकुंभात "नेत्र महाकुंभ" सुरू आहे. या नेत्र महाकुंभात देशभरातून आलेल्या यात्रेकरूंची, गरीब कुटुंबातील लोकांची डोळ्यांची तपासणी मोफत केली जात आहे. देशातील प्रतिष्ठित नेत्रतज्ज्ञ दोन महिने तिथे बसले आहेत. आतापर्यंत या नेत्र महाकुंभात 2 लाखांहून अधिक लोकांची डोळ्यांची तपासणी झाली आहे. सुमारे 1.5 लाख लोकांना मोफत औषधे आणि चष्मे देण्यात आले आहेत. काही लोकांना मोतीबिंदू असल्याचे आढळले, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज होती. अशा 16,000 लोकांना चित्रकूट आणि आसपासच्या ठिकाणी नेत्र रुग्णालयांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्या गेल्या आहेत.  

बंधू-भगिनींनो,  

हे सर्व कोण करत आहे? आपल्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हजारो डॉक्टर, हजारो स्वयंसेवक पूर्ण समर्पणाने, सेवाभावाने या कार्यात झटत आहेत. जे लोक एकतेच्या या महाकुंभात जात आहेत, ते या प्रयत्नांचे भरभरून कौतुक करत आहेत.  

बंधू आणि भगिनींनो,

अशाच प्रकारे, भारतात अनेक मोठमोठी रुग्णालये देखील आपल्या धार्मिक संस्थांद्वारे चालवली जात आहेत. आरोग्य आणि विज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक संशोधन संस्था धार्मिक ट्रस्ट द्वारे चालवल्या जात आहेत. या संस्थांमध्ये अनेक कोटी गरिबांवर उपचार केले जात असून त्यांची सेवा देखील केली जात आहे. माझ्या दीदी मां येथे बसलेल्या आहेत. अनाथ मुलींसाठी त्या ज्या समर्पण भावाने काम करत आहे, आपले जीवन त्यांनी या मुलींसाठी समर्पित केले आहे.


मित्रांनो,

येथे जवळच आपल्या बुंदेलखंड मधील प्रभू राम यांच्याशी संबंधित पवित्र तीर्थ चित्रकूट आहे, ते दिव्यांग आणि रुग्णांच्या सेवेचे किती तरी मोठे केंद्र आहे. या गौरवशाली परंपरेत बागेश्वर धामाच्या रूपात एक नवीन अध्याय जोडला जात आहे, याचा मला आनंद आहे. आता बागेश्वर धाममध्ये आरोग्याचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. येथे दोन दिवसानंतर, महाशिवरात्रीच्या दिवशी 251 मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे मला सांगण्यात आले. मी या पावन कार्यासाठी देखील बागेश्वर धामची प्रशंसा करतो. मी सर्व नवविवाहित दांपत्यांना, माझ्या मुलींना सुंदर आणि सुखी जीवनासाठी आत्ताच शुभेच्छा देत आहे, हृदयपूर्वक आशीर्वाद देत आहे.

 

|

मित्रांनो,

आपल्या शास्त्रात सांगितले आहे की - शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्. म्हणजेच आपले शरीर हेच आपले आरोग्य, आपला धर्म, आपले सुख आणि आपल्या सफलतेचे सर्वात मोठे साधन आहे. म्हणूनच, जेव्हा देशाने मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा मी ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राला सरकारचा संकल्प बनवले. ‘सबका साथ, सबका विकास’ च्या याच संकल्पाचा एक मोठा आधार आहे, ‘सबका इलाज-सबका आरोग्य!’ हा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्तरावर लक्ष केंद्रित करत आहोत. आजारांपासून बचाव यावर आम्ही सर्वात जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. तुम्हीच मला सांगा इथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गावात शौचालये बांधण्यात आली आहेत की नाही? यामुळे तुम्हाला मदत झाली आहे की नाही? शौचालये बांधल्यामुळे आणखीन एक फायदा झाला आहे. तो तुम्हाला माहिती आहे का? शौचालये बांधल्यामुळे अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण देखील कमी झाले आहेत. ज्या घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत त्या घरात आजारांवर खर्च होणारे हजारो रुपये वाचले आहेत, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.


मित्रांनो,

2014 मध्ये आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी, अशी स्थिती होती की देशातील गरीब लोक जितके आजारांना घाबरत होते त्याहीपेक्षा जास्त त्यांना उपचारांच्या खर्चाची भीती वाटत होती. कुटुंबात एखादी व्यक्ती जर गंभीर आजाराने ग्रस्त झाली तर संपूर्ण कुटुंब संकटात सापडत होते. मी देखील तुमच्याप्रमाणेच एका गरीब कुटुंबात वाढलो आहे. मी देखील त्रासात दिवस काढले आहेत. म्हणूनच उपचारांवर होणारा खर्च कमी करण्याचा आणि तुमच्या खिशात जास्तीत जास्त पैसे शिल्लक राहतील यासाठी काम करण्याचा संकल्प मी केला आहे. मी तुम्हाला वरचेवर आमच्या सरकारच्या काही कल्याणकारी योजनांची माहिती देत असतो, जेणेकरून एकही गरजवंत या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. म्हणूनच मी आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी परत एकदा येथे सांगत आहे. तुम्ही या सर्व बाबी लक्षात ठेवाल आणि आपल्या परिचितांना देखील सांगाल अशी मी अपेक्षा करतो. सांगाल ना, नक्की सांगाल, हे देखील एक प्रकारचे सेवा कार्यच आहे. आजारांच्या उपचारावरील खर्चाचा बोजा कमी झाला पाहिजे की नाही? म्हणूनच मी प्रत्येक गरिबाला मोफत उपचार मिळावेत अशी व्यवस्था केली आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कोणत्याही खर्चाशिवाय! कोणत्याही मुलाला आपल्या आई-वडिलांच्या उपचारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागणार नाही. येथे दिल्लीमध्ये जो तुमचा सुपुत्र बसला आहे तो यासाठी काम करेल. मात्र यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे लागेल. येथे अनेक लोकांनी आयुष्मान कार्ड नक्कीच बनवले असतील, अशी मी आशा करतो. ज्यांनी अजून हे कार्ड बनवले नाही त्यांनी लवकरात लवकर बनवून घ्यावे. मी मुख्यमंत्र्यांना देखील सांगू इच्छितो की या भागात जर कोणी अजून कार्ड बनवले नसेल तर ते काम जलदगतीने पूर्ण करुन घ्यावे.

मित्रांनो,

अजून एक बाब तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आता गरीब, श्रीमंत, मध्यम वर्गीय कोणत्याही कुटुंबातील 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांला देखील मोफत उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. हे कार्ड ऑनलाईन देखील तयार करता येते. यासाठी कोणालाही, कोठेही पैसे देण्याची गरज नाही. आणि, जर कोणी पैसे मागितले, तर थेट मला पत्र लिहा. बाकी काम मी पूर्ण करेन. जर कोणी पैसे मागितले तर तुम्ही काय कराल? मला पत्र लिहाल. मी या संत महात्म्यांना देखील सांगू इच्छितो की त्यांनी देखील आपले आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे, जेणेकरून तुमच्या आजारपणात मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल. आजाराची तुमच्यावर नक्कीच वक्रदृष्टी पडणार नाही पण जर कधी चुकून आजारी पडला तर….

 

|

बंधू आणि भगिनींनो,

अनेक वेळा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत नाही. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घरीच राहून खावी लागतात. अशावेळी औषधांच्या दुकानातून सवलतीच्या दरात औषधे मिळावीत याची देखील मी सोय केली आहे. हा खर्च कमी करण्यासाठी देशात 14000 हून अधिक जन औषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. ही जन औषधी केंद्र अशी आहेत की जिथे बाजारात 100 रुपयात मिळणारे औषध केवळ 15 -20 /25 रुपयात उपलब्ध असते. मग आता तुमचे पैसे वाचतील की नाही? मग तुम्ही जन औषधी केंद्रातून औषधे विकत घेतली पाहिजेत की नाही? मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. आज-काल अनेक गावांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असल्याच्या बातम्या कानावर पडत आहेत. मग जेव्हा मूत्रपिंडाची संबंधित आजार वाढतात तेव्हा नियमित डायलिसिस करण्याची गरज असते, त्यासाठी खूप दूर जावे लागते आणि भरपूर पैसे देखील खर्च करावे लागतात. तुमचा हा त्रास कमी व्हावा या उद्देशाने देशातील 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये दीड हजाराहून अधिक डायलिसिस सेंटर उघडण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे. सरकारच्या या सर्व योजनांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या परिचितांना देखील सांगितली पाहिजे. तर मग माझे इतके काम करणार ना? जरा सर्वांनी हात वर करून सांगा की तुम्ही हे काम करणार ना ? तुम्हा सर्वांना पुण्यलाभ होईल. कारण हे सेवा कार्य आहे.

मित्रांनो,

बागेश्वर धाममध्ये कर्करुग्णांसाठी एवढे मोठे रुग्णालय सुरू होणार आहे.  कारण कर्करोग आता सर्वत्र एक मोठी समस्या बनत चालला आहे, म्हणून आज सरकार, समाज, अध्यात्मिक गुरु , सर्वजण मिळून कर्करोगाविरुद्धच्या लढाईत  प्रयत्न करत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

गावात एखाद्याला कर्करोग झाला तर त्याच्याशी लढणे किती कठीण असते हे मला माहीत आहे.  बरेच दिवस तर कर्करोग झाला आहे हेच कळत नाही.  ताप आणि वेदनांसाठी लोक सहसा घरगुती उपाय करतात आणि काही लोक पूजा जप जाप्य करण्यासाठी देखील जातात, काही जण एखाद्या तांत्रिकाच्या हातात सापडतात….वेदना जेव्हा खूप वाढतात किंवा गाठ दिसू लागते, तेव्हा ते बाहेर जाऊन दाखवतात, तेव्हा कळते की  कर्करोग झाला आहे.  आणि कर्करोगाचे नाव ऐकताच संपूर्ण घर दुःखाने भरून जाते, सगळे घाबरतात, सर्व स्वप्ने भंग पावतात आणि कुठे जायचे…. कुठे उपचार करायचे हे देखील समजत नाही.  बहुतेक लोकांना फक्त दिल्ली आणि मुंबईबद्दल माहिती आहे.  म्हणूनच आमचे सरकार या सर्व समस्या सोडवण्याच्या कामी लागले आहे.  या वर्षीच्या अर्थसंकल्पात कर्करोगाशी लढण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत आणि मोदींनी ठरवलंय की कर्करोगाची औषधे आणखी स्वस्त करायची.  पुढील 3 वर्षांत देशातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग तात्काळ उपचार केंद्र (डे केअर सेंटर) उघडली जातील. या  डे केअर सेंटरमध्ये तपासणी आणि विश्रांती (उपचार) ची सुविधा असेल.  तुमच्या परिसरातील जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांमध्येही कर्करोग चिकित्सा केंद्र उघडली जात आहेत.

पण बंधू आणि भगिनींनो,

तुम्हाला माझी एखादी गोष्ट आवडेल किंवा आवडणार नाही, पण तुम्हाला त्याबद्दल काहीतरी करावे लागेल, ते लक्षात ठेवावे लागेल आणि ते तुमच्या आयुष्यात लागू करावे लागेल; कर्करोगापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल…..जागरूक रहावे लागेल.  पहिली खबरदारी म्हणजे कर्करोगाचे वेळेवर निदान करणे, कारण एकदा कर्करोग पसरला की त्यावर मात करणे खूप कठीण होते.  म्हणूनच आम्ही 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांची चाचणी करण्यासाठी मोहीम राबवत आहोत.  तुम्ही सर्वांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि त्यात सहभागी व्हावे.  निष्काळजी राहू नका.  जर थोडीशीही शंका असेल तर कर्करोगाची त्वरित चाचणी करावी.  दुसरी गोष्ट म्हणजे कर्करोगाबद्दल योग्य माहिती असणे देखील खूप महत्वाचे आहे.  हा कर्करोग कोणाला स्पर्श केल्याने होत नाही, हा संसर्गजन्य आजार नाही, तो स्पर्शाने पसरत नाही, विडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू आणि अति मसालेदार पदार्थांपासून कर्करोगाचा धोका वाढतो… आता हे ऐकून माता आणि भगिनींच्या चेहर्‍यावर  मला समाधानयुक्त  आनंद दिसत आहे.  म्हणून तुम्ही या सर्व कर्करोग पसरवणाऱ्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे आणि इतरांनाही त्यापासून दूर ठेवले पाहिजे.  तुम्हाला तुमच्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.  आणि मी अशी आशा करतो…जर तुम्ही सावध राहिलात तर बागेश्वर धाममधील कर्करोग रुग्ण रुग्णालयावर ओझे बनणार नाहीत…तुम्हाला इथे येण्याची गरज भासणार नाही.  तर… तुम्ही खबरदारी घेणार ना?  निष्काळजीपणा तर दाखवणार  नाही ना?

मित्रांनो,

मोदी तुमचा सेवक म्हणून तुमची सेवा करण्यासाठी झटत आहे.  गेल्या वेळी जेव्हा मी छत्तरपूरला आलो होतो तेव्हा मी हजारो कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली होती आणि आत्ताच मुख्यमंत्रीजींनी त्याचे वर्णनही केले.  तुम्हाला आठवत असेल की यामध्ये 45,000 कोटी रुपयांचा केन बेतवा नदी जोड प्रकल्प होता.  हा प्रकल्प इतक्या दशकांपासून प्रलंबित होता, इतकी सरकारे आली आणि गेली, प्रत्येक पक्षाचे नेतेही बुंदेलखंडला येत असत.  पण येथील पाण्याची टंचाई वाढतच गेली.  तुम्हीच सांगा….मागील कोणत्याही सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले का?  तुम्ही मोदींना आशीर्वाद दिल्यावर, हे कामही सुरू झाले.  पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठीही वेगाने काम केले जात आहे.  जल जीवन मिशन म्हणजेच हर घर जल प्रकल्पा अंतर्गत, बुंदेलखंडातील प्रत्येक गावात पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  गावांपर्यंत पाणी पोहोचावे आणि आमच्या शेतकरी बंधू-भगिनींच्या समस्या कमी व्हाव्यात आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत आहोत.

बंधू-भगिनींनो,

बुंदेलखंड समृद्ध होण्यासाठी, आपल्या माता आणि भगिनींनीही तितकेच सक्षम होणे महत्त्वाचे आहे, यासाठी आम्ही लखपती दीदी आणि ड्रोन दीदी सारख्या योजना सुरू केल्या आहेत.  आम्ही 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवून काम करत आहोत.  भगिनींना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.  सिंचनाचे पाणी बुंदेलखंडात पोहोचले, भगिनींनी ड्रोन वापरून पिकांवर फवारणी केली, शेतीत मदत केली, तर मग आपला बुंदेलखंड समृद्धीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करेल.

बंधू-भगिनींनो,

गावात ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी एक महत्त्वाचे काम होत आहे.  मालकी हक्क योजनेअंतर्गत, ड्रोन वापरून जमिनीचे मोजमाप केल्यानंतर भरभक्कम कागदपत्रे दिली जात आहेत. इथे  मध्य प्रदेशात याबद्दल बरेच चांगले काम झाले आहे.  आता लोक या कागदपत्रांच्या आधारावर  बँकांकडून सहजपणे कर्ज घेऊ लागले आहेत, हे कर्ज नोकरी आणि व्यवसायात उपयुक्त ठरत आहे, लोकांचे उत्पन्न वाढत आहे.

मित्रांनो,

बुंदेलखंडच्या या महान भूमीला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी डबल इंजिन सरकार दिवसरात्र मेहनत घेत आहे.  मी बागेश्वर धाम मध्ये प्रार्थना करतो……बुंदेलखंड, समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर असाच पुढे जात राहो आणि आज जेव्हा मी हनुमान दादांच्या चरणी आलो तेव्हा मला प्रश्न पडला की हे धीरेंद्र शास्त्री एकटेच चिठ्ठी काढतील की मलाही एखादी चिठ्ठी काढायची संधी मिळेल?  म्हणून मी विचार केला की आज हनुमान दादा मला आशीर्वाद देतील की नाही.  तर, हनुमान दादाजींनी मला आशीर्वाद दिला आणि आज मी पहिली चिठ्ठी काढली… त्यांच्या आईची चिठ्ठी काढली आणि शास्त्रीजींनी तुम्हाला त्याचे महत्त्व सांगितले.

बरं तर मित्रांनो,

ही एक मोठी संधी आहे, एक मोठे काम आहे. जर संकल्प मोठा असेल, संतांचे आशीर्वाद असतील आणि देवाची कृपा असेल तर सर्वकाही वेळेच्या आत पूर्ण होते आणि तुमच्यापैकी काहींना वाटते की मी त्यांच्याकडे उद्घाटनाला यावे, तर दुसऱ्याने सांगितले आहे की मी त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत यावे. मी आज जाहीरपणे वचन देतो की मी दोन्ही गोष्टी करेन. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. खूप खूप आभार, हर हर महादेव!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
No foreign power can enslave us: Farmers across India hail PM Modi's agri trade stance

Media Coverage

No foreign power can enslave us: Farmers across India hail PM Modi's agri trade stance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister receives a telephone call from the President of Uzbekistan
August 12, 2025
QuotePresident Mirziyoyev conveys warm greetings to PM and the people of India on the upcoming 79th Independence Day.
QuoteThe two leaders review progress in several key areas of bilateral cooperation.
QuoteThe two leaders reiterate their commitment to further strengthen the age-old ties between India and Central Asia.

Prime Minister Shri Narendra Modi received a telephone call today from the President of the Republic of Uzbekistan, H.E. Mr. Shavkat Mirziyoyev.

President Mirziyoyev conveyed his warm greetings and felicitations to Prime Minister and the people of India on the upcoming 79th Independence Day of India.

The two leaders reviewed progress in several key areas of bilateral cooperation, including trade, connectivity, health, technology and people-to-people ties.

They also exchanged views on regional and global developments of mutual interest, and reiterated their commitment to further strengthen the age-old ties between India and Central Asia.

The two leaders agreed to remain in touch.