भारत माता की जय, भिलाई पोलाद प्रकल्प हा छत्तीसगडच्या महतारीमधील कोराचे अनमोल रत्न आहे. छत्तीसगड महतारीच्या प्रतापाचे प्रतीक आहे. छत्तीसगडचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे जुने सहकारी डॉ. रमण सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी चौधरी बिरेंद्र सिंह, मंत्री मनोज सिन्हा, याच भूमीचे सुपुत्र केंद्रातील माझे सहकारी विष्णू देव सहाय, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल, राज्य सरकारचे सर्व वरिष्ठ मंत्रीगण आणि छत्तीसगडचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो.
दोन महिन्यांपूर्वी 14 तारीख होती, आजही 14 तारीख आहे. मला पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे.
मी जेव्हा 14 एप्रिलला आलो होतो, याच भूमीवरून आयुष्मान भारत योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. आज दोन महिन्यांनंतर, 14 तारखेला भिलाईमध्ये तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला पुन्हा एकदा लाभले आहे.
छत्तीसगडच्या इतिहासात छत्तीसगडचे भविष्य मजबूत करणारा आणखी एक सुवर्ण अध्याय आज जोडला जात आहे. थोड्या वेळापूर्वी भिलईमध्ये पोलाद प्रकल्पाचा विस्तार आणि आधुनिकीकरण, दुसरा जगदलपूर विमानतळ, नया रायपूरच्या कमांड सेंटरचे लोकार्पण, अगणित विकास कामे. याशिवाय, भिलईमध्ये आयआयटी संकुलाची निर्मिती आणि राज्यात भारत नेटच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देखील आजपासून सुरु झाले आहे.
सुमारे 22 हजार कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेट छत्तीसगडच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींना आज मी समर्पित करत आहे. या सर्व योजना इथे रोजगाराच्या शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करणार आहे. वाहतुकीची आधुनिक साधने उपलब्ध करून देणार आहेत आणि छत्तीसगडच्या दुर्गम भागांना दळणवळणाच्या आधुनिक तंत्राने जोडणार आहेत. अनेक वर्षांपूर्वी भारतात जेव्हा बस्तरचा विषय निघायचा, तेव्हा पंप, बंदूक, पिस्तूल आणि हिंसेबद्दल बोलले जायचे. आज बस्तरचे नाव विमानतळाशी जोडलेले आहे.
मित्रांनो, ज्या राज्याच्या निर्मितीच्या मागे आपणा सर्वांचे ध्येय, अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न आहे. माझ्या छत्तीसगडवासियांचे कठोर परिश्रम आहेत, तपश्चर्या आहे, त्या राज्याला वेगाने पुढे जाताना पाहणे आपणा सर्वांसाठी एक खूप सुखद अनुभव आहे. आनंद आणि प्रेरणा देणारा अनुभव आहे.
अटलजींचे स्वप्न माझे मित्र मुख्यमंत्री रमण सिंह यांनी अतिशय मेहनतीने पुढे नेले आहे. आता जेव्हा केव्हा मी त्यांच्याशी दूरध्वनीवर बऱ्याचदा बोलत असतो. प्रत्यक्ष भेटतो, दरवेळी ते नवीन कल्पना, नवीन योजना, नवी गोष्ट घेऊन येतात आणि एवढ्या उमेदीने आणि उत्साहाने येतात आणि त्या लागू करून यशाच्या शिखरावर पोहचवण्याचा आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसून येतो.
मित्रांनो, आपणा सर्वाना माहित आहे विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर शांतता, कायदा आणि सामान्य जीवनाची व्यवस्था-याला प्राधान्य असते. रमणजीनी एकीकडे शांतता, स्थैर्य, कायदा, व्यवस्था यावर भर दिला, तर दुसरीकडे विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी छत्तीसगडला पुढे नेत गेले. नव्या कल्पना, नव्या योजना घेऊन येत राहिले आणि विकासाच्या या तीर्थयात्रेसाठी मी रमण सिंह आणि त्यांचे इथले अडीच कोटींहून अधिक माझ्या छत्तीसगडचे बंधू भगिनी यांचे मी अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो.
बंधू भगिनींनो, हे राज्य माझ्यासाठी नवीन नाही. जेव्हा छत्तीसगडची निर्मिती झाली नव्हती, मध्य प्रदेशचा भाग होते, मी कधी या भागात दुचाकीवरून येत असे. मी संघटनेच्या कामासाठी येत असे. हे, माझे सर्व सहकारी, आम्ही पाच-पन्नास लोक भेटायचो. देशाच्या, समाजाच्या, छत्तीसगडच्या, मध्य प्रदेशच्या अनेक समस्या पाहायचो. चर्चा करायचो, तेव्हापासून आतापर्यंत अशी एकदाही वेळ आली नाही जेव्हा छत्तीसगडपासून दूर राहायचे काही कारण घडले. एवढे प्रेम तुम्ही सर्वानी दिले आहे. दरवेळी तुमच्याशी जोडलेला राहिलो. बहुधा 20, 22, 25 वर्ष झाली असतील ज्यात एकही वर्ष असे गेले नसेल जेव्हा मी छत्तीसगडला आलो नसेन. बहुधा इथे असा एकही जिल्हा शिल्लक राहिला नसेल जिथे मी गेलो नसेन आणि इथले प्रेम, इथल्या लोकांचे पावित्र्य मी व्यवस्थित अनुभवले आहे.
बंधू भगिनींनो, आज इथे येण्यापूर्वी मी भिलाई पोलाद कारखान्यात गेलो होतो. 18 हजार कोटींहून अधिक खर्च करून हा प्रकल्प आणखी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन क्षमतांनी युक्त बनवला आहे. आणि माझे सौभाग्य आहे की आज मला या परिवर्तित आधुनिक प्रकल्पाच्या लोकार्पणाची संधी देखील मिळाली. हे पाहून खूप कमी लोकांना माहित असेल की कच्छ ते कटक पर्यंत आणि कारगिल ते कन्याकुमारी पर्यंत स्वातंत्र्यांनंतर जे काही रेल्वेमार्ग बनले त्यात बहुतांश याच भूमीवरून तुमच्याच घामाच्या प्रसादाच्या रूपाने पोहोचले आहेत. भिलईने केवळ पोलादच बनवला नाही तर भिलईने आयुष्य देखील सावरली आहेत, समाजाला सजवले आहे आणि देशही निर्माण केला आहे.
भिलईचा हा आधुनिक परिवर्तित पोलाद प्रकल्प आता नवीन भारताचा पाया देखील पोलादाप्रमाणे मजबूत करण्याचे काम करेल. मित्रांनो, भिलाई आणि दुर्ग इथे तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहे की कशा प्रकारे पोलाद कारखाना उभारल्यानंतर इथले चित्र पालटले. हे वातावरण पाहून मला खात्री आहे की बस्तरच्या शहरात जो पोलाद कारखाना उभारला आहे तो देखील बस्तर अंचलच्या जनतेच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवेल.
बंधू आणि भगिनींनो, छत्तीसगडच्या प्रगतीला गती देण्यात इथल्या पोलाद, लोह, खाण यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. यावर तुमचा आणि खासकरून माझ्या आदिवासी बंधू भगिनींचा अधिकार आहे. हेच कारण आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर एका कायद्यात खूप मोठा बदल केला आहे. आणि आम्ही हे सुनिश्चित केले की जे काही खनिज निघेल, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक हिस्सा तिथल्या स्थानिक नागरिकांना त्यांच्या विकासासाठी खर्च केला जाईल. हे आम्ही कायदेशीररित्या ठरवले आहे. आणि म्हणूनच खाण असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा खनिज फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली.
या कायद्यात बदल केल्यानंतर छत्तीसगडला देखील तीन हजार कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त निधी मिळाला आहे. हे पैसे आता खर्च होत आहेत.. तुमच्यासाठी रुग्णालय बांधण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी . शौचालये बांधण्यासाठी .
बंधू आणि भगिनींनो, जेव्हा विकासाबाबत बोलतो, मेक इन इंडिया बद्दल बोलतो, तेव्हा यासाठी कौशल्य विकास म्हणजेच स्किल डेव्हलोपमेंट देखील तेवढेच आवश्यक आहे. भिलईची ओळख तर अनेक दशके देशातील मोठे शिक्षण केंद्र म्हणून आहे. मात्र एवढी व्यवस्था असूनही इथे आयआयटीची उणीव भासत आहे.
भिलाईला आयआयटी मिळावी यासाठी तुमचे मुख्यमंत्री रमण सिंह गेल्या सरकारच्या काळात देखील यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र ते लोक कोण होते हे तुम्हाला चांगले माहित आहे. रमण सिंह यांची दहा वर्षांची मेहनत पाण्यात गेली. मात्र ज्या छत्तीसगडने आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले आहेत, जेव्हा आमची पाळी आली, रमण सिंह आले आणि आम्ही त्वरित निर्णय घेतला. पाच नवीन आयआयटी आणि जेव्हा पाच नवीन आयआयटी तयार झाले त्यात आज भिलाई येथे शेकडो कोटी रुपये खर्चून एक आधुनिक आयआयटी संकुलाची पायाभरणी देखील होत आहे. सुमारे 1100 कोटी रुपये खर्चून बनणारे आयआयटी संकुल छत्तीसगड आणि देशातील मेघावी विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान आणि तांत्रिक शिक्षणाचे तीर्थक्षेत्र बनेल, त्यांना नवीन काहीतरी करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील.
मित्रांनो, मला काही मिनिटापूर्वी मंचावरच काही युवकांना लॅपटॉप देण्याची संधी मिळाली. भारतीय जनता पार्टीचे सरकार माहिती क्रांतीच्या योजनेच्या माध्यमातून संगणक आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर निरंतर भर देत आहे. तंत्राबरोबर जितक्या जास्त लोकांना आपण जोडू शकू तेवढेच तंत्रज्ञानातून होणारे लाभ आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकू. याच दूरदृष्टीने गेल्या चार वर्षात डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले जात आहे. छत्तीसगड सरकार देखील हे अभियान, त्याचे लाभ घराघरात पोहचवण्याच्या दिशेने काम करत आहे.
मी गेल्यावेळी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी आलो होतो, तेव्हा बस्तरला इंटरनेटने जोडण्याच्या बस्तर नेटप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची मला संधी मिळाली होती. आता आजपासून इथे भारत नेट पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले आहे. अंदाजे अडीच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढल्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. छत्तीसगडच्या चार हजार पंचायतींपर्यंत इंटरनेट यापूर्वीच पोहचले आहे. आता उर्वरित सहा हजार पंचायतींपर्यंत पुढल्या वर्षी पोहोचेल.
मित्रांनो, डिजिटल भारत अभियान, भारत नेट इथल्या राज्य सरकारच्या संचार क्रांती योजनेअंतर्गत पन्नास लाखांहून अधिक स्मार्ट फोनचे वितरण, 1200 पेक्षा अधिक मोबाईल टॉवर्सची स्थापना या सर्व प्रयत्नातून गरीब, आदिवासी, पीडित, वंचित, शोषित यांच्या सबलीकरणाचा एक नवीन पाया तयार होत आहे. एक मजबूत पाया रचला जात आहे. डिजिटल जोडणी केवळ ठिकाणेच नाही, केवळ एका ठिकाणाला दुसऱ्या ठिकाणाशी जोडते असे नाही तर लोकांनाही जोडत आहे.
बंधू भगिनींनो, आज देशाला जल, स्थल, नभ प्रत्येक प्रकारे जोडण्याचे भरपूर प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिणाम आहे कि जुनी सरकारे ज्या भागात रस्ते बांधण्यापासून मागे हटत होती तिथे आज रस्त्यांबरोबरच विमानतळ देखील बांधले जात आहेत.
आणि मी म्हटले तसे माझे स्वप्न आहे की हवाई चप्पल घालणारा देखील विमान प्रवास (हवाई जहाज) करू शकेल या विचारासह उडान योजना चालवली जात आहे. आणि देशभरात नवीन विमानतळ बांधले जात आहेत. असाच एक सुंदर विमानतळ तुमच्या जगदलपूर मध्ये बांधत आहोत. आज जगदलपूर ते रायपूर दरम्यान उड्डाण सुरु झाले आहे. आता जगदलपूर ते रायपूर दरम्यानचे अंतर सहा-सात तासांवरून केवळ 40 मिनिटांवर येणार आहे.
मित्रांनो, हा सरकारच्या धोरणाचाच परिणाम आहे की आता रेल्वेत वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांपेक्षा अधिक लोक विमानातून प्रवास करत आहेत. एके काळी रायपूरमध्ये तर दिवसभरात केवळ सहा विमाने यायची. आता रायपूर विमानतळावर एका दिवसात पन्नास विमाने यायला सुरुवात झाली आहे. येण्या-जाण्याच्या या नवीन साधनांमुळे केवळ राजधानीपर्यंतचे अंतर कमी होणार नाही तर पर्यटनाला चालना मिळेल, उद्योग-धंदे येतील आणि त्याचबरोबर रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.
मित्रांनो, आज छत्तीसगडने खूप मोठी कामगिरी केली आहे. नया रायपूर शहर देशातील पहिले ग्रीन फिल्ड स्मार्ट शहर बनले आहे. याच शृंखलेत मला एकात्मिक कमांड आणि कंट्रोल केंद्राचे उदघाटन करण्याची संधी मिळाली.
पाणी, वीज, पथदिवे, सांडपाणी, वाहतूक असे पूर्ण शहराच्या देखरेखीचे काम याच एका छोट्याशा केंद्रातून होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीच्या आधारे या सुविधांचे संचलन होत आहे. नया रायपूर आता देशातील अन्य स्मार्ट शहरांसाठी देखील एक उदाहरण म्हणून काम करेल.
ज्या छत्तीसगडची मागास, आदिवासींचे जंगल अशी ओळख होती ते छत्तीसगड आज देशात स्मार्ट शहरांची ओळख बनत आहे. याहून अधिक अभिमानाची बाब कोणती असू शकते?
मित्रांनो, आमची प्रत्येक योजना देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान, सुरक्षा आणि स्वाभिमानी जीवन देण्याच्या दिशेने पुढे जात आहे. हेच मोठे कारण आहे की गेल्या चार वर्षात छत्तीसगडसह देशातील मोठं-मोठ्या भागात विक्रमी संख्येने युवक मुख्य प्रवाहाशी जोडले गेले आहेत.
मला वाटते कोणत्याही प्रकारची हिंसा, कोणत्याही प्रकारचा कट यांचे एकच उत्तर आहे, –विकास, विकास आणि विकास. विकासातून निर्माण झालेला विश्वास प्रत्येक प्रकारच्या हिंसेला संपवतो. आणि म्हणूनच केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार असेल किंवा मग छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे सरकार असेल, आम्ही विकासाच्या माध्यमातून विश्वासाचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला आहे.
बंधू आणि भगिनींनो, मी गेल्या वेळी जेव्हा छत्तीसगडला आलो होतो, तेव्हा देशभरात ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात केली होती. गेल्या दोन महिन्यात या अभियानाचा खूपच सकारात्मक परिणाम झाला आहे. हे अभियान विशेषतः देशातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये चालवले जात आहे. जे विकासाच्या शर्यतीत गेली 70 वर्षे मागे पडले होते, यात छत्तीसगडमधील 12 जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये विकासाचे विविध पैलू लक्षात घेऊन नव्या ऊर्जेने काम केले जात आहे. गावातील सर्वांकडे बँक खाते असावे, गॅस जोडणी असावी, प्रत्येक घरात वीज जोडणी असावी, सर्वांचे लसीकरण झालेले असावे, सर्वांना विमा सुरक्षेचे कवच मिळालेले असावे, प्रत्येक घरात एलईडी दिवे असावेत याकडे लक्ष दिले जात आहे.
ग्राम स्वराज अभियान लोकसहभागाचे एक खूप मोठे माध्यम बनले आहे. छत्तीसगडच्या विकासात देखील हे अभियान नवीन आयाम स्थापन करेल. विश्वासाच्या या वातावरणात गरीबाला, आदिवासीला जी ताकद मिळाली आहे त्याची तुलना कधी करता येणार नाही एवढी ताकद मिळाली आहे.
छत्तीसगडमध्ये जन-धन योजनेअंतर्गत आणि हे मी केवळ छत्तीसगडचे आकडे सांगत आहे, संपूर्ण देशाचे नाही. छत्तीसगडमध्ये जन-धन योजनेअंतर्गत एक कोटी तीस लाख पेक्षा अधिक गरीबांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. 37 लाखांहून अधिक शौचालयांचे बांधकाम, 22 लाख गरीब कुटुंबांना उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत जोडणी, 26 लाखांहून अधिक लोकांना मुद्रा योजनेअंतर्गत बँक हमी शिवाय कर्ज, 60 लाखांहून अधिक गरीबांना 90 पैसे प्रतिदिन आणि एक रुपया महिना दराने विमा सुरक्षा कवच, 13 लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे विकासाची एक नवीन गाथा आज छत्तीसगडच्या भूमीवर लिहिली गेली आहे.
बंधू आणि भगिनींनो, इथे छत्तीसगडमध्ये 7 लाख घरे अशी होती जिथे वीज जोडणी नव्हती, प्रधानमंत्री सौभाग्य योजनेअंतर्गत वर्षभरातच यापैकी अंदाजे निम्म्या घरांमध्ये म्हणजे साडेतीन लाख घरांमध्ये वीज जोडणी पुरवण्याचे काम पूर्ण झाले आहे. जवळपास 1100 घरे अशी आहेत जिथे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील वीज पोहोचलेली नव्हती, आता वीज पोहोचली आहे. हा उजेड, प्रकाश विकास आणि विश्वास घरे उजळून टाकत आहे.
मित्रांनो, आमचे सरकार देशातील प्रत्येक बेघराला घर देण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. गेल्या चार वर्षात देशातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये एक कोटी 15 लाखहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेबरोबरच पूर्वीच्या सरकारांच्या काळात अपूर्ण राहिलेल्या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे काम आम्ही पुढे नेले आहे. इथे छत्तीसगडमध्ये देखील सुमारे सहा लाख घरे बांधण्यात आली आहेत. आता दोन तीन दिवसांपूर्वी सरकारने पंतप्रधान आवास योजना आणि हे मी छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा आपल्या देशातील अन्य प्रदेशातील मध्यमवर्गीय लोकांना खास सांगू इच्छितो. एक मह्तवपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याचा लाभ मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सरकारने ठरवले आहे की मध्यम वर्गासाठी बांधण्यात येणाऱ्या घरांवर व्याजात जी सवलत दिली जाते, ती घरे लोकांना छोटी पडतात. मागणी केली जात होती कि क्षेत्रफळ वाढवण्याची परवानगी मिळावी. व्याप्ती वाढवावी. बंधू भगिनींनो, मला अभिमान वाटतो की जनता जनार्दनाची ही इच्छा देखील आम्ही पूर्ण केली आहे. म्हणजे आता अधिक मोठया घरांवर देखील सवलत दिली जाणार आहे. सरकारचा हा निर्णय विशेषतः मध्यम वर्गाला खूप मोठा दिलासा देणारा आहे.
आज इथे केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा अनेक योजना उदा. पंतप्रधान मातृत्व वंदन योजना, उज्वला, मुद्रा आणि स्टँडअप, विमा योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेश देण्याची संधी मला मिळाली आहे. मी सर्व लाभार्थ्याना खूप-खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यासाठी मंगल कामना करतो.
मित्रांनो, या केवळ योजना नाहीत. तर गरीब, आदिवासी, वंचित, शोषित यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ उज्वल बनवण्याचा संकल्प आहे. आमचे सरकार आदिवासी आणि मागास क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील विशेष कार्य करत आहे.
दोन महिन्यापूर्वी बिजापूरमध्ये मी वन-धन योजनेचा शुभारंभ केला होता. त्याची वन-धन विकास केंद्रे उघडली जात आहेत. जंगलातील उत्पादनांना बाजारात योग्य भाव मिळेल याकडे लक्ष दिले जात आहे.
या अर्थसंकल्पात सरकारने 22 हजार ग्रामीण हाट विकसित करण्याची देखील घोषणा केली आहे. सुरवातीच्या टप्प्यात या वर्षी आम्ही 5 हजार हाट विकसित करत आहोत. सरकारचा प्रयत्न आहे की माझ्या आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना गावापासून 5-6 किलोमीटरच्या टप्प्यात अशी व्यवस्था उपलब्ध व्हावी जी त्यांना देशातील कोणत्याही बाजाराशी तंत्रज्ञानाने जोडेल.
याशिवाय आदिवासींचे हित लक्षात घेऊन वन अधिकार कायदा अधिक जोमाने लागू केला जात आहे. गेल्या चार वर्षात छत्तीसगडमध्ये सुमारे एक लाख आदिवासी आणि आदिवासी समुदायांना वीस लाख एकरहून अधिक जमिनीचे मालकी हक्क देण्यात आले आहेत.
सरकारने बांबूंशी संबंधित जुन्या कायद्यात देखील बदल केला आहे. आता शेतात उगवण्यात आलेला बांबू तुम्ही सहज विकू शकाल. या निर्णयामुळे जंगलात राहणाऱ्या बंधू भगिनींना अतिरिक्त कमाईचे एक मोठे साधन मिळाले आहे.
बंधू आणि भगिनींनो, सरकार आदिवासींचे शिक्षण , स्वाभिमान आणि सन्मान लक्षात घेऊन काम करत आहे. आदिवासी मुलांचा शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी देशभरात एकलव्य विद्यालये उघडली जात आहेत.
इथे छत्तीसगडमध्ये देखील प्रत्येक तालुका जिथे माझे आदिवासी बंधू भगिनीची लोकसंख्या पन्नास टक्क्यांहून अधिक आहे किंवा किमान 20 हजार या वर्गातील लोक राहत आहेत तिथे एकलव्य आदर्श शाळांना निवासी शाळा बनवले जाईल.
याशिवाय देशाच्या स्वातंत्र्यात 1857 पासून आदिवासींनी दिलेल्या योगदानाबाबत देशाला आणि जगाला जागरूक करण्याचे अभियान देखील सुरु करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात आपली आहुती देणाऱ्या महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ निरनिराळ्या राज्यांमध्ये संग्रहालये बांधली जात आहेत.
छत्तीसगडच्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी या योजनांमुळे बस्तर ते सरगुजा आणि रायगढ ते राजनंद गावापर्यंत आर्थिक आणि सामाजिक विकासात एकरूपता येईल. प्रदेशातील क्षेत्रीय असमानता संपवण्याचे अभियान देखील वेगाने पूर्ण होईल.
आणि आज छत्तीसगडमध्ये, मी जेव्हा भिलाई कारखान्यात जात होतो, छत्तीसगडने ज्याप्रकारे माझे स्वागत आणि सन्मान केला, जणू काही संपूर्ण भारत छत्तीसगडच्या रस्त्यांवर उतरला होता. भारतातील असा कोणताही कानाकोपरा नसेल ज्याचे दर्शन मला आज झाले नसेल, ज्यांचे आशीर्वाद मला आज मिळाले नसतील.
हा माझा एक छोटा भारत आहे, भिलाई आणि दुर्ग देशभरातून इथे स्थायिक झालेल्या लोकांनी आज देशाच्या एकीचे वातावरण माझ्यासमोर सादर केले आहे, देशाच्या वैविध्याचे वातावरण निर्माण केले आहे. आपापल्या राज्यांच्या परंपराच्या आधारे आशीर्वाद दिले. मी या सर्व लोकांचे, छत्तीसगडच्या दुर्गचे आणि माझ्या या भिलईचे मनःपूर्वक आभार मानतो.
मी जेव्हा-जेव्हा छत्तीसगडला आलो आहे, तेव्हा तेव्हा इथे नवनवीन कामे झाली आहेत नवनवीन निर्माण कामाचं निमित्ताने नवीन काही पाहायला मिळत आहे. छत्तीसगड नवनवीन विक्रम रचून स्वतः एक लक्ष्य निश्चित करत आहे. यामुळेच इथे मोठा विकास होत आहे.
बंधू भगिनींनो, नवीन छत्तीसगड 2022 मध्ये नवीन भारताचा मार्ग प्रशस्त करेल, मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सहकार्याने नवीन भारताचा संकल्प नक्की सिद्धीला जाईल या कामनेसह मी तुम्हा सर्वांचे हृदयापासून अभिनंदन करतो, छत्तीसगड सरकारला शुभेच्छा देत मी माझे भाषण संपवतो.
खूप-खूप धन्यवाद!