विशाल संख्येने आलेल्या दमणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
बहुधा दमणच्या इतिहासात यापूर्वी ना कधी एवढा मोठा जनसमुदाय आला असेल आणि ना कधी दमण, दीवच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या गेल्या असतील -यापूर्वी बहुधा कधीही असे झाले नसेल.
बंधू, भगिनींनो, ज्या प्रकारे दमण-दीव, दादरा नगर हवेली-या संपूर्ण भागात विकासाचे एक नवीन वातावरण निर्माण झाले आहे. आज दमण एक प्रकारे छोटा भारत बनला आहे. दमणमध्ये भारतातील कुठलेही राज्य नसेल जिथली दोन-पाच कुटुंबे दमणमध्ये राहत नसतील. प्रत्येकाने दमणला आपले घर बनवले आहे. आणि म्हणूनच ज्या गोष्टी आपण दिल्ली-मुंबईत पाहत आहोत, तसेच सामाजिक जीवन आपल्याला दमणमध्ये आढळून येते. एक आपलेपण, एक बंधुभाव, अनेक भाषांमध्ये बोलणाऱ्या लोकांचा समूह आणि आज जेव्हा मी विमानतळावरून इथे येत होतो, मी संपूर्ण रस्ताभर दोन्ही बाजूला पाहत होतो, जणू काही भारताचा कानाकोपरा उमंग आणि उत्साहाने भरलेला आहे.
बंधू आणि भगिनींनो ,
दमणमध्ये एवढी स्वच्छतेप्रति जागरूकता आणि दमण मध्ये एवढे मोठे स्वच्छतेचे अभियान, दमण एक प्रकारे पर्यटन केंद्र बनले आहे आणि जेव्हा साफ-सफाई केली जाते तेव्हा लोकांना बाहेरून येण्याची इच्छा होते. जर पर्यटन वाढले तर इथल्या लोकांना रोजगार मिळतो. आणि आज दमण दीवशी जोडले गेले आहे, हेलिकॉप्टर सेवेशी जोडले गेले आहे आणि म्हणूनच दक्षिण भारतातून जे प्रवासासाठी येऊ इच्छितात, ज्यांना सोमनाथला जायचे आहे, गिरचे सिंह पहायला जायचे आहे ते दमणला येतील आणि हेलिकॉप्टरने जातील, तुम्ही बघाल दमणचा किती विकास होईल. आणि आता दीवला अहमदाबादशीही जोडण्यात आले आहे. म्हणजेच एक प्रकारे दीव आणि दमण विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले आहेत.
बंधू आणि भगिनींनो, मला सांगण्यात आले की केंद्रशासित प्रदेशांमध्ये दमणने ओडीएफ रूपात स्वतःला सज्ज केले आहे, उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त. इथे 2000 पेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आली. या कामासाठी मी प्रशासनाला आणि इथल्या जागरूक नागरिकांचे मनापासून खूप अभिनंदन करतो. तुम्ही हे सार्वजनिक ठिकाण शौचापासून मुक्त केले. ही एक प्रकारे मातृसन्मानाची चळवळ आहे, नारी सन्मानाची चळवळ आहे.
आणि मी जेव्हा एकदा उत्तर प्रदेशात गेलो होतो, माझ्याच लोकसभा क्षेत्रात शौचालये बांधण्याचे अभियान होते, तर मी पाहिले की उत्तर प्रदेश सरकारने एक छान काम केले आहे – त्यांनी शौचालयावर बोर्ड लावला आहे आणि त्याचे नाव ठेवले आहे – इज्जतघर हे वास्तव आहे, शौचालय -हे इज्जतघर आहे. आपल्या माता, भगिनींच्या सन्मानासाठी शौचालय असणे खूप आवश्यक आहे. तर आज तुम्ही ते काम देखील केले.
दमणमध्ये एक हरित चळवळ सुरु आहे- स्वच्छतेचे अभियान असेल, ई-रिक्षा असेल, सीएनजी टॅक्सी असेल. आता तुम्हालाही दमणमध्ये एक नवीन रूप पहायला मिळेल- इथल्या भगिनी-मुली ई-रिक्षा घेऊन दमणमध्ये चालवत असतील आणि दमणच्या पर्यावरणाचे देखील संरक्षण करतील.
आणि ज्या दमणमध्ये- एक प्रकारे हा शांतताप्रिय प्रदेश आहे, दंगली घडणारा प्रदेश नाही. मिळून-मिसळून राहणाऱ्यांचा प्रदेश आहे- इथे माता, भगिनी याच ई-रिक्षा चालवतील, तेव्हा स्वाभाविकपणे तिथे प्रवासी म्हणून येतील त्यांच्या मनात देखील माता-भगिनींप्रती आदर अधिक वाढेल आणि दमणची एक नवीन ओळख तयार होईल.
सीएनजी चळवळ असेल, ई-रिक्षा असेल किंवा इथे एलईडी दिवे लावण्याचे अभियान असेल-सुमारे एक लाख 40 हजार दिवे एवढ्या छोट्याशा प्रदेशात वितरित करण्यात आले आहेत आणि यामुळे ज्यांच्या घरात वीज आहे, त्या घरांच्या विजेच्या बिलात जी घट झाली आहे, विजेच्या बिलाचे पैसे वाचले आहेत. एकट्या दमणमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांची एलईडी दिव्यांमुळे विजेच्या बिलात सुमारे सात कोटी रुपयांची बचत झाली आहे. आणि हे दरवर्षी होणार आहे.
मला वाटते की इथे दीर्घकालीन विचार करून योजना तयार करण्यात आल्या आहेत. आजही आपल्या देशात कारखाने उभारले जातात, मात्र मजुरांना त्यांच्या नशीबावर सोडले जाते. ते कारखान्यात येतात, काम करतात, मात्र कुठे राहतात, काय खातात, त्यांची काही प्रतिष्ठा आहे कि नाही? त्याकडे कुणी लक्ष देत नाही.
मी प्रफुल्लभाई पटेल यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. दमण एक औद्योगिक शहर आहे. देशभरातील लोक इथे कामासाठी येतात. एकेका लहान लहान खोल्यांमध्ये 15-15, 20-20 लोक राहतात. ते जेव्हा कामावर जातात, तेव्हा अन्य लोक झोपी जातात. ते कामावरून परत येतात, तेव्हा ते झोपतात आणि आधीचे कामावर जातात. झोपण्यासाठी देखील शिफ्ट प्रणाली चालते.
सार्वजनिक-खासगी भागीदारीचे एवढे उत्तम मॉडेल तयार करून दमण मध्ये मोलमजुरीसाठी आलेल्या लोकांसाठी एक उत्तम प्रकारची राहण्याची व्यवस्था- तिचाही आज शुभारंभ होत आहे. यामुळे मजुरांच्या जीवनात बदल होईल. आणि सर्वात महत्वाचे, जे उद्योजक यात सरकारबरोबर भागीदारी करण्यासाठी पुढे आले आहेत, मी त्याना विश्वास देतो- या मजुरांना, या आपल्या श्रमजीवी बंधू-भगिनींना राहण्याची जर चांगली जागा मिळाली तर ते त्यांची जी ताकद आहे ती पूर्णपणे तुमच्या कारखान्याच्या उत्पादनात वापरतील, तुमचे उत्पादन वाढेल. तुम्ही घरांमध्ये जी गुंतवणूक करणार आहात त्यापेक्षा अधिक पैसे , हे आपले मजूर जास्त उत्पादन करून एक वर्षात तुमचा नफा वाढवतील असा मला विश्वास वाटतो.
इथे बहुतांश आपले कामगार बंधू-भगिनी एकटे राहतात , गावी आईवडिलांना सोडून इथे आले आहेत आणि जे काही मिळेल ते खाऊन गुजराण करत आहेत. ही आनंदाची बाब आहे की आज या कामगार बंधू-भगिनींना चांगले जेवण मिळावे, एक मजूर खर्च करू शकेल एवढ्या पैशात मिळावे यासाठी सार्वजनिक रित्या भोजनाचे आयोजन करण्याचा देखील आज इथे शुभारंभ होत आहे. याचाही लाभ आगामी काळात इथल्या मजूर बंधू-भगिनींना मिळणार आहे. चांगले जेवण मिळेल, चांगली झोप लागण्यासाठी जागा मिळेल, सकाळी प्रातःविधी आंघोळीची व्यवस्था असेल-मला वाटते तो मजूर दमण आणि या देशाच्या विकासासाठी कधी मागे हटणार नाही असा मला विश्वास वाटतो.
जल-प्रक्रिया केंद्र- आजही आपल्या देशात अनेक शहरे असतील जिथे 100 टक्के प्रक्रिया केलेले पाणी पोहचत असेल की नसेल सांगणे कठीण आहे. मात्र आता मला इथे सांगण्यात आले कि दमण मध्ये जल प्रक्रिया केंद्रामुळे आता दमणच्या नागरिकांना प्रक्रिया केलेले पाणी मिळते., पिण्यायोग्य शुद्ध पाणी त्यांना मिळते, म्हणजेच सामान्य माणसाच्या सुखाची चिंता आज इथे करण्यात आली आहे.
आपल्या देशात माता मृत्युदर, शिशु मृत्युदर कमी करण्यासाठी, कुपोषणापासून मुक्त करण्यासाठी भारत सरकारकडून अब्जावधी रुपये खर्च केले जातात. मात्र आज दमणने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. भारत सरकारच्या या योजनेत , अशा कुटुंबांमध्ये जिथे 14-18 वर्षांच्या मुली आहेत, जिथे प्रसूती झालेल्या माता आहेत, जिथे लहान-लहान मुले आहेत त्यांना पोषक आहार
मिळावा-यासाठी एक आहाराचे किट त्यांना दर महिन्याला देण्याचे काम आणि आज माझ्या हस्ते त्या काही कुटुंबाना देण्याचे सौभाग्य मला मिळाले. मी आशा करतो कि या कुटुंबांना सरकारकडून जी मदत मिळाली आहे, त्याचा उपयोग असा होऊ नये कि आता हे मिळाले आहे तेव्हा घरी आधी जे आणायचो ते बंद करू असे करायचे नाही. आधी जो खर्च करत होतात, त्या व्यतिरिक्त हे आहे- तेव्हा कुठे तुमच्या 14-18 वर्षांच्या मुलीच्या शरीराचा विकास होईल.
जर त्या मुलीच्या शरीराचा विकास झाला, ती जर सशक्त झाली, जेव्हा आई होईल तेव्हा तिचे बाळ देखील सशक्त होईल. आणि ज्या देशाचे मूल सशक्त असेल, तो देश देखील सशक्त बनेल, हे काम या योजनेअंतर्गत होत आहे.
बंधू आणि भगिनींनो, दीव, आता स्मार्ट शहरांमध्ये त्याचा क्रमांक लागला आहे. विविध योजना दीवशी जोडल्या आहेत. इथे तुमचे विद्यापीठाचे स्वप्न होते , होते ना? तुम्हाला वाटायचे की किती दिवस सुरत-नर्मदा विद्यापीठात जायचे ? भारत सरकारने तुम्हाला देखील विद्यापीठ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपले मच्छीमार बांधव, केरोसिनवर व्हॅट . मला आनंद आहे कि आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींसाठी व्हॅट शुल्क शून्य केले जाणार आहे जेणेकरून… मात्र त्याचबरोबर मी माझ्या मच्छीमार बांधवांना सांगू इच्छितो आणि प्रफुल्लभाई आणि इथल्या खासदारांनाही सांगू इच्छितो की -आपल्याला केवळ इथेच थांबायचे नाही. आता भारत सरकारने नील क्रांतिअंतर्गत आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींसाठी एक लांब पल्ल्याची बोट उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. जर तुम्ही पाच-दहा मच्छिमार एकत्र आलात आणि गट बनवला तर तुम्हाला बँकेतून कर्ज दिले जाईल. त्यात सवलत दिली जाईल. आणि तुम्ही ही नवीन बोट घेऊन खोल समुद्रात जाऊ शकाल आणि खोल समुद्रात तुम्ही मोठ्या प्रमाणावर मासळी पकडू शकता, उत्तम दर्जाची मासळी पकडू शकता. इथे आसपास तुम्ही फिरत राहता आणि 12 तास काम करूनही जेवढे मासे पकडू शकता, तेवढेच मासे या नवीन बोटीच्या साहाय्याने खोल समुद्रात जाऊन दोन तासात पकडून आणू शकाल.
माझी इच्छा आहे की दमणच्या समुद्र किनाऱ्यावर, दीवच्या समुद्र किनाऱ्यावर एक विशेष प्रकल्प हाती घेतला जावा आणि त्या प्रकल्पाअंतर्गत, इथल्या मच्छीमार कुटुंबियांकडून सी बेडची शेती केली जावी, समुद्राच्या आत खाऱ्या पाण्यात होऊ शकते. आणि त्यात जे पिकेल ते आपल्या शेतांमध्ये लोक टाकतील, त्यापेक्षा उत्तम खत असू शकत नाही, त्यापेक्षा उत्तम पीक असू शकत नाही. अगदी सहज हे काम होऊ शकते. आणि मला वाटते प्रफुल्लभाई यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि देशासमोर एक नवीन मॉडेल म्हणून हे काम सादर करावे. आणि मला विश्वास वाटतो की दीव-दमण भागात हे काम अगदी सहजपणे होऊ शकते.
बंधू आणि भगिनींनो, संपर्क व्यवस्था असेल, डिजिटल जोडणी असेल, घरांमध्ये एलईडी दिवे लावणे असेल, रस्ते बनवणे असेल, पूल बांधणे असेल सागरी मार्गाने देखील दीवला जोडण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. तुम्ही कल्पना करू शकता, 15-15 तास जिथे लागायचे, अर्धा तास, एका तासात तुम्ही पोहचू शकाल-किती वेळ वाचेल, किती पैसे वाचतील आणि इथल्या लोकांना किती फायदा होईल.
बंधू आणि भगिनींनो, दमणने विकासाच्या नव्या उंचीवर जावे, आपले दीव-दमण, सिल्वासा पासून संपूर्ण क्षेत्र देशासमोर एक मॉडेल म्हणून उभे राहील. असा मला विश्वास आहे आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येऊन मला जे प्रेम दिले, आशीर्वाद दिलेत यासाठी मी मनापासून तुमचा खूप-खूप आभारी आहे.
धन्यवाद !