कोरोनाशी भारताचा लढा म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचे द्योतक : पंतप्रधान
इतक्या व्यापक स्तरावरचे लसीकरण जगाने अद्याप पाहिले नसल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
कोरोनासंदर्भात भारताच्या प्रतिसादाची जागतिक स्तरावर दखल : पंतप्रधान
आघाडीच्या कोरोना योद्ध्यांप्रती अर्पण केली आदरांजली

माझ्या प्रिय देशवासियांनो,

नमस्कार!

संपूर्ण देश आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. कित्येक महिने, देशातील प्रत्येक घरातील मुले, वृद्ध आणि तरूण प्रत्येकाच्या मुखात एकच प्रश्न होता - कोरोनाची लस कधी येईल? आणि आता कोरोनाची लस आली आहे ती फार कमी कालवधीत. काही मिनिटांत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे. यासाठी, मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाची लस तयार करण्यासाठी अहोरात्र काम करणारे शास्त्रज्ञ, लस संशोधनात सहभागी असलेले अनेक लोकं विशेष कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कोणते सणवार साजरे केले नाहीत, दिवसाची रात्र केली. बहुतांश वेळा लस तयार करण्यासाठी बरीच वर्षे लागतात. परंतु अल्पावधीतच एक नाही तर दोन-दोन मेक इन इंडिया लस तयार झाल्या आहेत. इतकेच नाही तर इतरही अनेक लसींवर काम वेगाने सुरू आहे. हा भारताचे सामर्थ्य, भारतातील वैज्ञानिक कौशल्यांचा, भारताच्या प्रतिभेचा जिवंत पुरावा आहे. अशाच कामगिरीसाठी राष्ट्रकवि रामधारीसिंग दिनकर म्हणाले होते- मानव जब ज़ोर लगाता है, पत्थर पानी बन जाता है !!

बंधू आणि भगिनींनो,

भारताची लसीकरण मोहीम अत्यंत मानवी आणि महत्त्वपूर्ण तत्त्वांवर आधारित आहे. ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे, त्याला प्रथम कोरोना लस मिळेल. ज्याला कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका आहे त्याला पहिले लस दिली जाईल. आमचे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील स्वच्छता कामगार, वैद्यकीय-निमवैद्यकीय कर्मचारी यांना सर्वात आधी कोरोना लस मिळाली पाहिजे, त्यांचा अधिकार पहिला आहे. मग ते सरकारी रुग्णालयातील असो किंवा खाजगी रुग्णालयातील, सर्वांना ही लस प्राधान्याने मिळेल. यानंतर, अत्यावश्यक सेवा आणि देश व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांना लसी दिली जाई. आमचे सुरक्षा दल, पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, सफाई कामगार या सगळ्यांना प्राधान्याने लस दिली जाईल आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे - त्यांची संख्या जवळजवळ 3 कोटी आहे. या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार करणार आहे.

मित्रांनो,

या लसीकरण मोहिमेच्या संपूर्ण तयारीसाठी राज्य सरकारांच्या मदतीने देशाच्या कानाकोपऱ्यात चाचण्या घेण्यात आल्या आहेत, ड्राय रन केले आहेत. खास तयार केलेल्या को-विन डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये लसीकरणासाठीच्या नोंदणीपासून ट्रॅकिंगपर्यंतची प्रणाली आहे. तुम्हाला पहिली लस दिल्यानंतर दुसरा डोस कधी देणार याची माहिती तुम्हाला फोनवरून दिली जाईल. आणि मला सर्व देशवासीयांना पुन्हा आठवण करून द्यायची आहे की कोरोना लसीचे 2 डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस विसरून चालणार नाही, अशी चूक करू नका. पहिल्या आणि दुसर्‍या डोस दरम्यान, सुमारे एक महिन्याचे अंतर देखील असले पाहिजे, तसे तज्ञांचे मत आहे. आपल्याला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की दुसऱ्या डोसच्या केवळ 2 आठवड्यांनंतर, आपल्या शरीरामध्ये कोरोना विरूद्ध आवश्यक शक्ती विकसित होईल. म्हणूनच, लस घेतल्यानंतर लगेचच तुम्ही कोणताही निष्काळजीपणा करू नका, मास्क नेहमी घाला, सहा फुटाचे अंतर ठेवा, हे सर्व नियमित करा. मी तुम्हाला विनंती करतो याचे काटेकोरपणे पालन करा आणि मला आणखी एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची आहे, कोरोना विरुद्धच्या लढाईत ज्याप्रकारे तुम्ही सहनशीलता दाखवलीत तीच सहनशीलता लसीकरणाच्या वेळी देखील तुम्ही दाखवा.

मित्रांनो,

याआधी इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली गेली नव्हती. ही मोहीम किती मोठी आहे, याचा अंदाज तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच येईल. जगात 100 पेक्षा जास्त देश आहेत ज्यांची लोकसंख्या 3 कोटींहून कमी आहे आणि लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच भारत 3 कोटी लोकांना लस देत आहे. दुसऱ्या टप्प्यात हा आकडा आम्हाला 30 कोटींवर न्यायचा आहे. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना पुढील टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की 30 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले जगात फक्त तीन देश आहेत - भारत, चीन आणि अमेरिका. यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला असा कोणताही देश नाही. म्हणूनच भारताची लसीकरण मोहीम इतकी मोठी आहे आणि म्हणून ही मोहीम भारताचे सामर्थ्य दाखवते आणि मला देशवासीयांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे. लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची वैज्ञानिक आणि तज्ञांकडून खातरजमा झाल्यानंतरच मेड इन इंडिया लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. म्हणून देशातील जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

मित्रांनो,

भारतीय लस वैज्ञानिक, आमची वैद्यकीय प्रणाली, ही संपूर्ण जगात विश्वासार्ह आहे. आम्ही आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर हा विश्वास मिळवला आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

जगभरातील 60 टक्के मुलांना दिली जाणारी जीवरक्षक लस ही भारतात तयार केली जाते, कठोर भारतीय वैज्ञानिक चाचण्या पार करून जाते, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. भारताचे वैज्ञानिक आणि लसीशी संबधित आमच्या कौशल्यावर जगाचा विश्वास मेड इन इंडिया कोरोना लसीमुळे अधिक मजबूत होणार आहे. याबाबत आणखी काही विशेष बाबी मला आज देशवासियांना सांगायच्या आहेत. परदेशी लसीच्या तुलनेत ही भारतीय लस फारच स्वस्त आहे आणि ती वापरणे देखील तितकेच सोपे आहे. परदेशातील काही लसींचा एक डोस पाच हजार रुपयांपर्यत आहे आणि त्या उणे 70 डिग्री तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्या लागतात. त्याच वेळी, भारतातील लस ही वर्षानुवर्षे पारखलेल्या आणि चाचणी केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केली आहे. लसीची साठवण ते वाहतुकीपर्यंतची सर्व व्यवस्था ही भारतीय परिस्थिती अनुरूप आहे. ही लस आता कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताला निर्णायक विजय मिळवून देईल.

मित्रांनो,

कोरोना विरुद्धचा आमचा हा लढा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचा आहे. ही कठीण लढाई लढण्यासाठी आपला आत्मविश्वास दुर्बल होऊन चालणार नाही, प्रत्येकाने ही शपथ घेतल्याचे दिसून येत आहे. कितीही मोठे संकट असले तरी देशवासीयांचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही. कोरोना जेव्हा भारतात आला तेव्हा देशात कोरोना चाचणीची एकच प्रयोगशाळा होती. आम्ही आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि आज आमच्याकडे 2300 हुन अधिक प्रयोगशाळांचे जाळे आहे. सुरुवातीला आम्ही मास्क, पीपीई किट्स, चाचणी किट, व्हेंटिलेटर सारख्या आवश्यक वस्तूंसाठी आयातीवर अवलंबून होतो. आज आपण या सर्व वस्तूंच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहोत आणि आता त्या निर्यातही करत आहोत. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या या सामर्थ्याला आपल्याला लसीकरणाच्या या टप्प्यातही बळकट करायचे आहे.

मित्रांनो,

महान तेलगु कवी गुरुजाडा अप्पाराव म्हणाले होते- सौन्त लाभं कौन्त मानुकु, पौरुगुवाडिकि तोडु पडवोय् देशमन्टे मट्टि कादोयि, देशमन्टे मनुषुलोय ! अर्थात आपण इतरांना उपयोगी पडले पाहिजे ही निःस्वार्थ भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. देश फक्त माती, पाणी, दगडांनी बनत नाही, तर देशाचा खरा अर्थ आहे आपली माणसे. संपूर्ण देशाने याच भावनेने कोरोनाविरूद्ध लढा दिला आहे. आज जेव्हा आपण मागील वर्षांकडे पाहतो, तेव्हा एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण बरेच काही शिकलो, बरेच काही पाहिले आहे, समजले आहे.

आज जेव्हा भारत आपली लसीकरण मोहीम सुरू करीत आहे, तेव्हा मलाही मागील दिवस आठवत आहेत. कोरोना संकटाचा तो काळ, जेव्हा प्रत्येकाला काहीतरी करायचे होते, परंतु त्यांना नक्की मार्ग माहित नव्हता. सर्वसाधारणपणे, एखद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असली की संपूर्ण कुटुंब त्या आजारी व्यक्तीची एकत्रित काळजी घेते. पण या आजाराने तर आजारी व्यक्तीला एकटे पाडले. बर्‍याच ठिकाणी लहान आजारी मुलांना आईपासून दूर रहावे लागले. त्यावेळी आई अस्वस्थ असायची, रडायची, पण इच्छा असूनही काही करू शकत नव्हती, ती मुलाला आपल्या कुशीत घेऊ शकत नव्हती. कुठेतरी वृद्ध वडिलांना, रुग्णालयात एकट्यानेच या आजाराविरुद्ध लढा द्यावा लागत होता. मुलांची इच्छा असूनही ते त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हते. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार देखील झाले नाहीत. आपण त्यावेळेचा जितका जास्त विचार करतो तितके मन व्यथित होते, निराश होते.

परंतु मित्रांनो,

संकटाच्या त्याच काळात, निराशेच्या त्याच वातावरणात, कोणीतरी आशेचे किरण देखील दाखवत होते, आपला जीव संकटात टाकून आम्हाला वाचवत होते. हे सगळे होते आमचे डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, आशा कामगार, सफाई कामगार, पोलिस कर्मचारी आणि इतर आघाडीचे कामगार यासगळ्यांनी मानवतेप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्यापैकी बरेचजण आपल्या मुलांपासून, कुटुंबीयांपासून दूर राहिले, बरेच दिवस आपल्या घरी गेले नाहीत. असे शेकडो मित्र आहेत जे कधीच आपल्या घरी परत गेले नाहीत, एक-एक जीव वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणून आज, कोरोनाची पहिली लस आरोग्य सेवेशी संबंधित लोकांना देऊन समाज एकप्रकारे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मानवी इतिहासामध्ये अनेक संकटे आली, साथीचे रोग आले, भयंकर युद्धे झाली, परंतु कोरोनासारख्या आव्हानाची कुणी कल्पना देखील केली नव्हती. हा एक साथीचा रोग होता ज्याचा अनुभव आजपर्यंत विज्ञान किंवा समाजाने घेतला नव्हता. सगळ्या देशांमधून ज्या बातम्या येत होत्या, त्या संपूर्ण जगासोबत प्रत्येक भारतीयाला विचलित करीत होत्या. अशा परिस्थितीत जगातील मोठे तज्ञ भारताबद्दल अनेक शंका व्यक्त करत होते.

परंतु मित्रांनो,

भारताची लोकसंख्या हा आपला सर्वात मोठा कमकुवतपणा असल्याचे सांगितले जात होते, त्या लोकसंख्येलाच आम्ही आमचे सामर्थ्य बनविले. भारताने संवेदनशीलता आणि सहभागालाच या लढ्याचा आधार केला. भारताने चोवीस तास दक्ष राहून, प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. 30 जानेवारी रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, हा रुग्ण आढळण्याआधी दोन आठवड्यांपूर्वीच भारताने एक उच्चस्तरीय समिती गठित केली होती. मागच्या वर्षीच्या याच दिवसापासून भारताने पाळत ठेवण्यास सुरुवात केली. 17 जानेवारी 2020 रोजी भारताने आपली पहिली एडवायजरी प्रसिद्ध केली. आपल्या विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू करणाऱ्या काही देशांपैकी भारत एक होता.

मित्रांनो,

कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने दाखविलेली इच्छाशक्ती, धैर्य, सामूहिक शक्ती ही येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. जनता कर्फ्यू आठवतोय, कोरोनाविरूद्ध आपल्या समाजाचा संयम आणि शिस्तीची ही परीक्षा होती, ज्यामध्ये प्रत्येक देशवासी यशस्वी झाला. जनता कर्फ्यूने देशाला मानसिकदृष्ट्या लॉकडाऊनसाठी तयार केले. टाळी-थाळी व दीप प्रज्वलित करुन आम्ही देशाचा आत्मविश्वास उंचावला.

मित्रांनो,

कोरोनासारख्या अज्ञात शत्रूची क्रिया-प्रतिक्रिया ओळखण्यामध्ये मोठेमोठे सामर्थ्यवान देश सक्षम नव्हते, त्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जो जिथे आहे तिथेच राहणे. म्हणूनच देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सोपा नव्हता. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला घरात बसविणे अशक्य होते, हे आम्हाला माहित होते आणि आता तर देशात सर्व काही बंद होणार होते, लॉकडाउन होणार आहे. यामुळे लोकांच्या उपजीविकेवर याचा काय परिणाम होईल, याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याचेही आम्हाला मूल्यांकन करायचे होते. पण 'जान है तो जहां है' या मंत्राचा अवलंब करत देशाने प्रत्येक भारतीयांचे प्राण वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. आणि संपूर्ण देश, संपूर्ण समाज कसा या भावनेने उभा राहिला हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. छोट्या पण महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देण्यासाठी मी अनेकदा देशवासियांशी थेट संवाद साधला. एकीकडे गरिबांना मोफत जेवण दिले जात होते, तर दुसरीकडे दूध, भाज्या, रेशन, गॅस, औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित केला जात होता. देशात योग्य प्रकारे कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी गृह मंत्रालयाने 24X7 नियंत्रण कक्ष सुरु केला जिथे हजारो कॉलला उत्तर देण्यात आले, लोकांच्या शंकांचे निरसन केले गेले.

मित्रांनो,

कोरोनाविरूद्धच्या या लढाईत आम्ही वेळोवेळी जगासमोर उदाहरण प्रस्थापित केले आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना चीनमधील वाढत्या कोरोनाच्या संकटात मायदेशी परत आणले नाही त्यावेळी भारताने चीनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीला देशात परत आणले आणि केवळ भारतीयच नाही तर आम्ही इतरही अनेक देशांतील नागरिकांना परत आणले. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 45 लाखाहून अधिक भारतीयांना परदेशातून भारतात आणले. मला आठवते, एका देशात भारतीयांच्या चाचण्या करण्यासाठी मशीन कमी होत्या त्यावेळी भारताने संपूर्ण चाचणी प्रयोगशाळा येथून पाठविली आणि तिथे स्थापन केली जेणेकरुन तिथून भारतात येणाऱ्या लोकांना चाचणी करण्यामध्ये त्रास होणार नाही.

मित्रांनो,

आज भारताने ज्या प्रकारे या रोगाचा सामना केला आहे, त्याचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे, स्थानिक संस्था, प्रत्येक सरकारी संस्था, सामाजिक संस्था एकत्र येऊन काम करू शकतात याचे उदाहरणही भारताने जगासमोर ठेवले आहे. इस्रो, डीआरडीओ, सैनिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि कामगार हे एका संकल्पासाठी कसे काम करू शकतात हे भारताने दाखवून दिले आहे. ‘सहा फुटाचे अंतर आणि मास्क आवश्यक आहे’ यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रणी होता.

बंधू आणि भगिनींनो,

आज, या सर्व प्रयत्नांमुळेच भारतातील कोरोनाचा मृत्यू दर कमी आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशात असे अनेक जिल्हे आहेत जिथे एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या उपचारानंतर बरा होऊन घरी गेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाची एकही घटना घडली नाही. इतकेच नाही लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणणाऱ्या देशांमध्ये देखील भारत जगात आघाडीवर आहे. या कठीण काळात 150 पेक्षा अधिक देशांना आवश्यक औषधे आणि आवश्यक वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या काही निवडक देशांपैकी भारत एक आहे. पॅरासिटामॉल असो, हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन असो, चाचणी संबंधित उपकरणे असो, इतर देशातील लोकांना वाचविण्यासाठी देखील भारताने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आज भारताने आपली लस तयार केली आहे, यावेळी देखील संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. आमची लसीकरण मोहीम जसजशी पुढे जाईल तसतसे जगातील अनेक देशांना आपल्या अनुभवांचा फायदा होईल. भारताची लस, आपली उत्पादन क्षमता संपूर्ण मानवतेच्या फायद्याची ठरेल, ही आमची वचनबद्धता आहे.

बंधू आणि भगिनींनो,

ही लसीकरण मोहीम बराच काळ सुरू राहील. आम्हाला लोकांचा जीव वाचविण्याची संधी मिळाली आहे. म्हणूनच, या मोहिमेशी संबंधित कामांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून स्वयंसेवक पुढे येत आहेत. मी त्यांचे स्वागत करतो, अजून स्वयंसेवकांनी या सेवा कार्यात सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो. होय, मी आधी म्हटल्याप्रमाणे, लसीकरणाच्या वेळी आणि नंतरही मास्क, 6 फुटांचे अंतर आणि स्वच्छता आवश्यक आहे. तुम्ही लस घेतली याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोरोनापासून वाचण्याच्या इतर मार्गांचा अवलंब करणे बंद करायचे आहे. आता आपल्याला नवीन व्रत घ्यावे लागेल - औषध तसेच काटेकोरपणा ! तुम्ही सगळ्यांनी निरोगी राहावे या सदिच्छेसह, या लसीकरण मोहिमेसाठी मी संपूर्ण देशाला शुभेच्छा देतो! मी विशेषतः देशातील वैज्ञानिकांचे, संशोधकांचे, प्रयोगशाळेशी निगडीत प्रत्येक व्यक्ती ज्यांनी संपूर्ण वर्ष एका तपस्वी प्रमाणे संपूर्ण वर्ष प्रयोगशाळेत घालविले आणि देश आणि मानवतेला ही लस दिली आहे त्यांचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या मोहिमेचा तुम्ही लवकर फायदा घ्या. तुम्ही देखील निरोगी राहा, तुमचे कुटुंब देखील निरोगी राहो. संपूर्ण मानवजात या संकटाच्या काळातून बाहेर यावी आणि आपल्या सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छेसह तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 डिसेंबर 2024
December 25, 2024

PM Modi’s Governance Reimagined Towards Viksit Bharat: From Digital to Healthcare