नमस्कार आसाम !
श्रीमंत शंकरदेव यांचे कर्मस्थळ आणि सत्रांची भूमी मजूलीला माझा प्रणाम ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी, रविशंकर प्रसाद, मनसुख मांडविया, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मेघालयचे मुख्यमंत्री, कोनरेड संगमा , आसामचे अर्थमंत्री डॉक्टर हिमंता बिस्वा सरमा आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो . असे वाटत आहे कि आलि-आये-लिगांग उत्सवाचा उत्साह दुसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. काल मिसिंग समुदायासाठी शेती आणि कृषीच्या उत्सवाचा दिवस होता आणि आज मजूलीसह संपूर्ण आसाम आणि ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा एक खूप मोठा महोत्सव आहे. ताकामे लिगांग आछेँगेँ छेलिडुंग!
बंधू आणि भगिनींनो,
भारतरत्न डॉक्टर भूपेन हज़ारिका यांनी लिहिले आहे - महाबाहु ब्रह्मपुत्र महामिलनर तीर्थ(अ) कत(अ) जुग धरि आहिछे प्रकाखि हमन्वयर अर्थ(अ)! म्हणजे ब्रह्मपुत्रचा विस्तार बंधुत्वाचे, बंधुभावाचे, मिलनाचे तीर्थ आहे. वर्षानुवर्षे ही पवित्र नदी, मिलाफाचा, कनेक्टिविटीचा पर्याय राहिली आहे. मात्र हे देखील खरे आहे की ब्रह्मपुत्रवर संपर्क व्यवस्थेशी संबंधित जितकी कामे यापूर्वी व्हायला हवी होती तेवढी झाली नाहीत. यामुळे आसाममध्ये आणि ईशान्य प्रदेशाच्या अन्य भागांमध्ये कनेक्टिविटी हे नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. महाबाहु ब्रह्मपुत्रच्या आशीर्वादाने आता या दिशेने वेगाने काम होत आहे. मागील वर्षांमध्ये केंद्र आणि आसामच्या दुहेरी इंजिन सरकारने, या संपूर्ण प्रदेशाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक, दोन्ही प्रकारच्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही ब्रह्मपुत्रच्या शाश्वत भावनेला अनुरूप, सुविधा, सुसंधी आणि संस्कृतीचे पूल बांधले आहेत, सेतु बांधले आहेत. असामसह संपूर्ण ईशान्य प्रदेशाच्या भौतिक आणि सांस्कृतिक अखंडतेला मागील वर्षांमध्ये अधिक मजबूत करण्यात आले आहे.
मित्रानो,
आजचा दिवस आसामसह संपूर्ण ईशान्य प्रदेशासाठी ही व्यापक दृष्टी विस्तारणारा दिवस आहे. डॉक्टर भूपेन हज़ारिका सेतु असेल, बोगीबील पूल असेल, सरायघाट पूल असेल, असे अनेक पूल आज आसामचे जीवन सुलभ बनवत आहेत. ते देशाची सुरक्षा मजबूत करण्याबरोबरच, आपल्या वीर सैनिकांना देखील मोठी सवलत देत आहेत. आसाम आणि ईशान्य प्रदेशच्या विविध भागांना जोडण्याचे हे अभियान आज आणखी पुढे नेण्यात येत आहे. आजपासून आणखी 2 मोठ्या पुलांचे काम सुरु होत आहे. काही वर्षांपूर्वी मी माजूली बेटावर गेलो होतो, तेव्हा तिथल्या समस्या जवळून जाणून घेता आल्या होत्या. मला आनंद आहे की सर्बानंद सोनोवाल यांच्या सरकारने या समस्या दूर करण्यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न केले आहेत. मजूली इथे आसामचा पहिला हेलीपोर्ट देखील बांधण्यात आला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आता मजूलीवासियांना रस्त्यांचा देखील वेगवान आणि सुरक्षित पर्याय मिळणार आहे. तुमची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पुलाच्या भूमीपूजनासह पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे. कालीबाड़ी घाटाला जोहराटशी जोडणारा 8 किलोमीटरचा हा पूल मजूलीच्या हजारो कुटुंबियांची जीवनरेखा बनेल. हा पूल तुमच्यासाठी सुविधा आणि संधींचा सेतु बनणार आहे. त्याचप्रमाणे धुबरी ते मेघालयमधील फुलबारी पर्यंत 19 किमी लांब पूल जेव्हा तयार होईल तेव्हा बराक खोऱ्याची कनेक्टिविटी मजबूत होईल. एवढेच नाही, या पुलामुळे मेघालय, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरा ते आसाम हे अंतर देखील खूप कमी होईल. विचार करा, मेघालय आणि आसाम दरम्यान आता रस्तेमार्गे जे अंतर सुमारे अडीचशे किलोमीटर आहे, ते भविष्यात केवळ 19-20 किलोमीटर एवढेच राहील. हा पूल अन्य देशांबरोबर आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल.
बंधू आणि भगिनींनो
ब्रह्मपुत्र आणि बराकसह आसामला अनेक नद्यांची जी भेट मिळाली आहे, ती समृद्ध करण्यासाठी आज महाबाहू ब्रह्मपुत्र कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. हा कार्यक्रम, ब्रह्मपुत्रच्या पाण्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रदेशात जल मार्ग व्यवस्था, बंदर प्रणित विकास मजबूत करेल. या अभियानाची सुरुवात म्हणून आज नीमाती-मजूली, उत्तर आणि दक्षिण गुवाहाटी, धुबरी-तसिंगीमारी दरम्यान 3 रो-पैक्स सेवांचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आसाम हे एवढ्या मोठया प्रमाणात रो-पैक्स सेवेशी जोडले जाणारे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. याशिवाय जोगीघोपा येथे अंतर्गत जलवाहतूक टर्मिनलसह ब्रह्मपुत्र नदीवर 4 ठिकाणी पर्यटक जेट्टी उभारण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. मजूलीसह आसामला, ईशान्य भागाला उत्तम कनेक्टिविटी देणारे हे प्रकल्प या प्रदेशात विकासाचा वेग आणखी वाढवतील. 2016 मध्ये तुम्ही दिलेल्या एका मताने काय काय करून दाखवले आहे. तुमच्या मताची ही ताकद आता आसामला आणखी उंची गाठून देणार आहे.
बंधू आणि भगिनींनो
गुलामगिरीच्या काळातही आसाम देशातील संपन्न आणि अधिक महसूल देणाऱ्या राज्यांपैकी एक होते. त्याकाळी चितगांव आणि कोलकाता बंदरापर्यंत चहा आणि पेट्रोलियम पदार्थ, ब्रह्मपुत्र-पदमा-मेघना नदी आणि रेल्वेमार्गे पोहचत होते. कनेक्टिविटीचे हे नेटवर्क आसामच्या समृद्धीचे मोठे कारण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर या पायाभूत सुविधा आधुनिक बनवणे गरजेचे होते, मात्र त्यांना तसेच वाऱ्यावर सोडून दिले गेले. जलमार्गाकडे लक्ष दिले गेले नाही , त्यामुळे ते जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते. या प्रदेशात अव्यवस्था आणि अशांति यामागे विकासाकडे दुर्लक्ष हे एक मोठे कारण होते. इतिहासात केलेल्या त्या चुका सुधारण्याची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. आता त्यांचा आणखी विस्तार केला जात आहे. आणि गतिमान केले जात आहे. आता आसामच्या विकासाला प्राधान्य देखील दिले जात आहे आणि यासाठी दिवस-रात्र प्रयत्न देखील होत आहेत.
बंधू आणि भगिनींनो
मागील पाच वर्षात आसामच्या मल्टी मॉडेल कनेक्टिविटीच्या पुनर्स्थापनेसाठी एकापाठोपाठ एक अनेक पावले उचलण्यात आली. आसामला, ईशान्य प्रदेशाला अन्य पूर्व आशियाई देशांबरोबर आपल्या सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच अंतर्गत जलमार्ग ही इथली मोठी ताकद बनवण्यावर काम सुरु आहे. अलिकडेच बांग्लादेशबरोबर जलमार्गाद्वारे संपर्क मजबूत करण्यासाठी एक करार देखील करण्यात आला आहे. ब्रह्मपुत्र आणि बराक नदीला जोडण्यासाठी हुगली नदीमध्ये भारत -बांग्लादेश प्रोटोकॉल मार्गावर काम सुरु आहे. यामुळे आसाम व्यतिरिक्त मेघालय, मिजोरम, मणिपुर आणि त्रिपुराला हल्दिया, कोलकाता, गुवाहाटी आणि जोगीघोपासाठी एक पर्यायी कनेक्टिविटी मिळेल. म्हणजे आता ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी ज्या अरुंद क्षेत्रावर आपण अवलंबून होतो , ते अवलंबत्व यामुळे कमी होईल.
बंधू आणि भगिनींनो, जोगीघोपाचे IWT टर्मिनल या पर्यायी मार्गाला अधिक मजबूत बनवेल आणि आसामला कोलकात्याशी , हल्दिया बंदराशी जलमार्गे जोडेल. या टर्मिनलवर भूतान आणि बांग्लादेश मालवाहतूक, जोगीघोपा मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क कार्गो आणि ब्रह्मपुत्र नदीवर विविध स्थानांसाठी येण्याजाण्याची सुविधा मिळेल.
मित्रानो
सामान्य माणसाची सोय ही जर प्राथमिकता असेल आणि विकासाचे ध्येय अटळ असेल तर नवे मार्ग निर्माण होतात. मजुली ते नेमाटी दरम्यान रो-पॅक्स सेवा हा असाच एक मार्ग आहे. यामुळे आता तुम्हाला रस्तेमार्गे सुमारे सव्वा चारशे किलोमीटर फिरून येण्याची गरज भासणार नाही. आता तुम्ही रो-पॅक्स द्वारे केवळ 12 किलोमीटरचा प्रवास करून, आपली सायकल, स्कूटर, दुचाकी किंवा कार बोटीतून नेऊ शकता. या मार्गावर ज्या 2 बोटी चालवण्यात येत आहेत त्या एकाच वेळी सुमारे 1600 प्रवासी आणि डझनभर वाहने घेऊन जाऊ शकतील. गुवाहाटीतील लोकांना देखील आता अशीच सुविधा मिळेल. आता उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीमधील अंतर 40 किलोमीटरवरून कमी होऊन केवळ 3 किलोमीटरपर्यंत सीमित होईल. त्याचप्रमाणे धुबरी ते हत्सिंगमारी हे अंतर सुमारे सव्वा दोनशे किलोमीटरवरून 30 किलोमीटरपर्यंत कमी होईल.
मित्रानो
आमच्या सरकारने केवळ जलमार्गच बांधले जात नाहीत तर ते वापरणाऱ्यांना योग्य माहिती देखील मिळावी यासाठी आज ई-पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. कार-डी पोर्टलद्वारे राष्ट्रीय जलमार्गावरील सर्व मालवाहू आणि क्रूझशी संबंधित वाहतूकीची माहिती वास्तविक वेळेत संकलित करण्यात मदत होईल.
त्याचप्रमाणे पाणी पोर्टल, नौवहन व्यतिरिक्त, जलमार्गाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती देखील देईल. जे इथे फिरण्यासाठी किंवा व्यापार -उदीमासाठी येऊ इच्छितात त्यांना जीआयएस-आधारित भारत मॅप पोर्टल हे मदत करते. आत्मनिर्भर भारतासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी देशात विकसित होत आहे, आसाम त्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरणार आहे.
बंधू आणि भगिनींनो
आसाम आणि ईशान्य भागाच्या जलमार्ग-रेल्वे-महामार्ग जोडणी बरोबरच इंटरनेट जोडणी देखील तितकीच महत्त्वाची आहे. यावरही सातत्याने काम केले जात आहे. आता शेकडो कोटींच्या गुंतवणूकीने गुवाहाटीत ईशान्येकडील पहिले आणि देशातील सहावे डाटा सेंटर बांधले जाणार आहे. हे केंद्र ईशान्येकडील सर्व 8 राज्यांसाठी डेटा सेंटर हब म्हणून काम करेल. हे डेटा सेंटर तयार झाल्यावर आसामसह संपूर्ण ईशान्य प्रदेशात आयटी सेवा आधारित उद्योगासह स्टार्टअप्सना बळ मिळेल. मागील वर्षांपासून ईशान्येकडील तरुणांसाठी तयार केली जात असलेली बीपीओ परिसंस्था आता बळकट होईल. म्हणजेच एक प्रकारे हे केंद्र ईशान्य प्रदेशात डिजिटल इंडियाची कल्पना बळकट करेल.
बंधू आणि भगिनींनो,
भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांनी लिहिले आहे : - कर्मइ आमार धर्म, आमि नतुन जुगर नतुन मानब, आनिम नतुन स्वर्ग, अबहेलित जनतार बाबे धरात पातिम स्वर्ग ! म्हणजे आमच्यासाठी काम हाच आमचा धर्म आहे. आम्ही नवीन युगातील नवीन लोक आहोत. ज्यांची कधीच काळजी घेतली गेली नाही, त्यांच्यासाठी आपण एक नवीन स्वर्ग निर्माण करू, आम्ही पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या एकाच भावनेने आज आसाम आणि ईशान्य प्रदेशासह संपूर्ण देशात सरकार काम करत आहे. ब्रह्मपुत्रच्या सभोवताली समृद्ध झालेली आसामी संस्कृती, आध्यात्म, आदिवासींची समृद्ध परंपरा आणि जैवविविधता हा आपला वारसा आहे. हा वारसा मजबूत करण्यासाठी श्रीमंत शंकर देव जी देखील मजुली बेटावर आले होते. त्यानंतर मजुलीची ओळख अध्यात्माचे केंद्र म्हणून, आसामच्या संस्कृतीचा आत्मा म्हणून झाली. तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने सत्र संस्कृतीला पुढे नेले ते कौतुकास्पद आहे. मुखा शिल्प आणि रास उत्सवाबद्दल देश आणि जगात ज्या प्रकारे उत्साह वाढत आहे तो अद्भुत आहे. ही ताकद, हे आकर्षण फक्त तुमच्याकडे आहे. ते जतनही करायचे आहे आणि पुढेही न्यायचे आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मी सर्वानंद सोनोवाल जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. त्यांनी मजुलीचे, आसामचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिक सामर्थ्य वाढवण्यासाठी कौतुकास्पद कार्य केले आहे. सत्रे व इतर महत्वाच्या ठिकाणांना अवैध अतिक्रमणापासून मुक्त करण्याचे अभियान असेल, सांस्कृतिक विद्यापीठ स्थापन करणे असेल, मजुलीला "जैवविविधता वारसा स्थळाचा" दर्जा देणे असेल, तेजपूर-मजुली-शिवसागर हेरिटेज सर्किट असेल, नमामि ब्रह्मपुत्र आणि नमामी बराक यासारख्या उत्सवांचे आयोजन असेल, अशा उपायांमुळे आसामची ओळख आणखी समृद्ध होत आहे.
मित्रानो
आज, ज्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली आहे, त्यामुळे आसाममध्ये पर्यटनासाठी नवी दालने खुली होणार आहेत. क्रूझ पर्यटनाच्या बाबतीत आसाम देशाचे एक मोठे ठिकाण बनू शकते. नेमाती, विश्वनाथ घाट, गुवाहाटी आणि जोगीधोपा येथे पर्यटन जेट्टी बनल्यामुळे आसामच्या पर्यटन उद्योगाला एक नवीन आयाम मिळेल. जेव्हा क्रूझमधून फिरण्यासाठी देश आणि जगातील जास्त खर्च करणारा पर्यटक पोहोचेल, तेव्हा आसाममधील तरुणांचे उत्पन्नाचे साधन देखील वाढेल. पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये कमीतकमी शिकलेला आणि कमीतकमी गुंतवणूक करणारा देखील कमवतो आणि कुशल व्यावसायिक देखील कमावतो. हाच तर विकास आहे, जो गरीबांमधील गरीब, सामान्य नागरिकांनाही पुढे जाण्याची संधी देतो . आपल्याला विकासाचा हाच क्रम कायम ठेवायचा आहे आणि गती द्यायची आहे. आसामला, ईशान्य प्रदेशला आत्मनिर्भर भारताचा मजबूत स्तंभ बनवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे. नव्या विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
खूप-खूप धन्यवाद !