आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी शिवराज सिंह चौहान, राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्र आणि राज्य सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि दूरदूरवरून आलेले बंजारा समाजातील माझे बंधूभगिनी, देशभरातील शेतकरी बंधू भगिनी आणि इतर सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधू-भगिनींनो, वाशीमच्या या पावन भूमीतून मी पोहरादेवी मातेला वंदन करतो. आज नवरात्री दरम्यान माता जगदंबेचा आशीर्वाद तिच्या मंदिरात घेण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. मी संत सेवालाल महाराज आणि संत राम-राव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. या व्यासपीठावरून मी या दोन महान संतांना माथा झुकवून नमन करतो.
आज महान योद्धा आणि गोंडवाना राणी दुर्गावती यांची जयंती आहे. गेल्या वर्षी देशाने त्यांची 500 वी जयंती साजरी केली. राणी दुर्गावतीलाही मी नमन करतो.
मित्रांनो,
हरियाणात आज मतदानही होत आहे. मी हरियाणातील सर्व देशभक्त लोकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. तुमचे मत हरियाणाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल.
मित्रांनो,
नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर, मला आता पीएम किसान सन्मान निधीचा 18 हप्ता जारी करण्याची संधी मिळाली आहे. आज देशातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार तर येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 1900 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आज शेकडो कोटी रुपयांचे कृषी, पशुसंवर्धन आणि शेतकरी उत्पादक संघ-एफपीओशी संबंधित प्रकल्प लोकांसाठी समर्पित केले आहेत. पोहरादेवीच्या आशीर्वादाने मला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे सौभाग्यही मिळाले आहे. या योजनेमुळे महिला शक्ती वाढते आहे. मी महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचे आणि देशातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज येथे येण्यापूर्वी मला पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्यही लाभले. हे संग्रहालय देशातील नवीन पिढ्यांना देशाची महान बंजारा संस्कृती, एवढा मोठा वारसा, एवढी प्राचीन परंपरा यांची ओळख करून देईल आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, स्टेजवर बसलेल्यांनाही मी विनंती करतो की, आज जाण्यापूर्वी या बंजारा विरासत संग्रहालयाला भेट द्या. मी देवेंद्रजींचे अभिनंदन करतो. ही संकल्पना त्यांनी पहिल्या सरकारच्या काळात मांडली होती आणि आज ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली गेल्याचे मी पाहिले, त्याचे मला खूप समाधान आणि आनंद आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तर ते पहाच, पण नंतर तुमच्या कुटुंबालाही थोडा वेळ काढून ते बघण्यासाठी जरूर पाठवा. मी आताच पोहरादेवीला बंजारा समाजातील काही महान व्यक्तींना भेटून आलो. या संग्रहालयाच्या माध्यमातून आपली विरासत सर्वमान्य झाल्याचे समाधान आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर होता. बंजारा विरासत संग्रहालयासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांची मोदी पूजा करतात. आपल्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि भारताच्या निर्माण प्रवासात मोठी भूमिका निभावली आहे. कला, संस्कृती, अध्यात्म, राष्ट्ररक्षण, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात या समाजातील कोणत्या महापुरुषांनी, विद्वानांनी देशासाठी काय केले नाही? राजा लखीशाह बंजारा याने परकीय राज्यकर्त्यांकडून किती अत्याचार सहन केले! त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. संत सेवालाल महाराज, स्वामी हाथीराम जी, संत ईश्वरसिंह बापूजी, संत डॉ. रामराव बापू महाराज, संत लक्ष्मण चैत्यन बापूजी, असे कितीतरी संत आपल्या बंजारा समाजाने दिले आहेत, ज्यांनी भारताच्या आध्यात्मिक चेतनेला प्रचंड ऊर्जा दिली. पिढ्यानपिढ्या, शेकडो हजारो वर्षांपासून हा समाज भारताच्या संस्कृती आणि परंपरांचे पालन आणि जतन करत आला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ब्रिटिश सरकारने या संपूर्ण समाजाला गुन्हेगार घोषित केले होते.
पण बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देणे ही देशाची जबाबदारी होती. आणि त्यावेळी काँग्रेस सरकारांनी काय केले? काँग्रेसच्या धोरणांमुळे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिला. स्वातंत्र्यानंतर ज्या घराण्याने काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतली, त्यांची विचारसरणी सुरुवातीपासूनच परकीय आहे. ब्रिटीश राजवटीप्रमाणे ही काँग्रेस घराणीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना आपल्या बरोबरीचे मानत नाहीत. त्यांना असे वाटते की भारतावर फक्त एका घराण्याने राज्य केले पाहिजे, कारण ब्रिटिशांनी त्यांना हा अधिकार दिला होता. त्यामुळे या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमीच अपमानास्पद वृत्ती बाळगली.
मित्रांनो,
रालोआच्या केंद्र सरकारने भटक्या-विमुक्त समाजासाठी कल्याणकारी मंडळाचीही स्थापना केली आहे. या समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेला योग्य सन्मान मिळावा यासाठी भाजप सरकार आणि रालोआ सरकार सातत्याने या दिशेने काम करत आहेत. विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी अभियानही सुरू केले आहे.
मित्रांनो,
आमच्या या प्रयत्नांमध्ये काँग्रेस आणि महाआघाडीचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन काय होता हेही तुम्ही लक्षात ठेवावे. फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी योजना आखण्यात आली होती. पण, मध्येच महाआघाडी सरकार आले आणि त्यांनी या कामाला विराम दिला.
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतरच पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास झाला. आज या योजनेवर 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार असून आजूबाजूच्या परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
भाजपला आपल्या धोरणातून वंचित समाजाला पुढे करायचे आहे. तर काँग्रेसला फक्त लोकांना लुटायचे कसे हे माहीत आहे. काँग्रेसला गरीबांना गरीबच राहू द्यायचे आहे. कमकुवत आणि गरीब भारत काँग्रेस आणि त्याच्या राजकारणाला खूप अनुकूल आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांनी काँग्रेसबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. आज काँग्रेस पूर्णपणे शहरी नक्षली टोळी चालवत आहे. सर्वांनी एकत्र आल्यास देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा उद्देश फसेल, असे काँग्रेसला वाटते! त्यामुळे त्यांना आम्हाला आपापसात भांडायला लावायचे आहे. काँग्रेसच्या या उद्देशाला सध्या कोणाचा पाठिंबा मिळतोय हे सारा देश बघतोय! ज्यांना भारताची प्रगती थांबवायची आहे तेच आजकाल काँग्रेसचे जवळचे मित्र आहेत! यातून बोध काय तर, संघटित होण्याची वेळ आली आहे. आपली एकजूटच देशाला तारेल.
बंधू-भगिनींनो,
मला महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसच्या आणखी एका कृतीबद्दल सांगायचे आहे. नुकतेच दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल.यातली खेदजनक बाब म्हणजे या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण निघाला? काँग्रेसचाच एक नेता निघाला. तरुणांना नशेच्या आहारी ढकलून काँग्रेसला त्या पैशातून निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे. या धोक्याची जाणीव ठेवून इतरांनाही सावध केले पाहिजे. ही लढाई आपल्याला एकत्र जिंकायची आहे.
मित्रांनो,
आज आपल्या सरकारचे प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण विकसित भारताला समर्पित आहे. आणि आपले शेतकरी हे विकसित भारताचा सर्वात मोठा पाया आहेत. आज शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने अनेक मोठी पावले उचलली गेली आहेत. आज 9200 शेतकरी उत्पादक संघ देशाला समर्पित करण्यात आले आहेत. सध्या शेतीसाठीच्या अनेक पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटनही झाले आहे. यामुळे कृषी उत्पादनांची साठवणूक, प्रक्रिया आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढेल. या सर्व प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. बरं, इथे महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिलही शून्य केले आहे. आम्हाला बिल येत आहे, शेतकरी दादा, त्यावर शून्य लिहिले आहे, नाही का?
मित्रांनो,
महाराष्ट्र आणि त्यात ही विदर्भातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपासून मोठ्या संकटांचा सामना केला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारांनी शेतकऱ्यांना कंगाल आणि गरीब करण्यात काहीही कसूर ठेवली नाही. जोपर्यंत येथे महाआघाडीचे सरकार होते, तोपर्यंत त्यांचे दोनच उद्देश होते. पहिलं, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प बंद करणे. दुसरं, या प्रकल्पांच्या पैशात भ्रष्टाचार करणे. केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही पैसे पाठवायचो, पण महाआघाडीचे सरकार वाटून खात असे. काँग्रेसने शेतकऱ्यांचे जगणे नेहमीच कठीण केले आहे. ती अजूनही तोच जुना खेळ खेळत आहे. म्हणूनच काँग्रेसला पीएम-किसान सन्मान निधी योजना आवडत नाही. काँग्रेस या योजनेला घेऊन गंमत करते आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाला विरोध करते. कारण, शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जाणाऱ्या पैशातून यांना पैसे कमवण्याची, कपात करण्याची आणि भ्रष्टाचार करण्याची संधी नाही. आज शेजारील कर्नाटक राज्य बघा! ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील महायुती सरकार किसान सन्मान निधीसोबत वेगळे पैसे देते, त्याचप्रमाणे कर्नाटकातील भाजप सरकार पैसे देते. माझी कर्नाटकातील अनेक बंजारा कुटुंबे येथे आली आहेत. पण, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच त्यांनी ते पैसे देणे बंद केले. तेथील अनेक सिंचन प्रकल्पांकडे राज्य सरकारने पाठ फिरवली. काँग्रेसने कर्नाटकातही बियाणांच्या किमती वाढवल्या. प्रत्येक निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे खोटे आश्वासन ही काँग्रेसची आवडती खेळी! कर्जमाफीचे आश्वासन देऊन हे लोक तेलंगणात सत्तेवर आले! पण सरकार स्थापन होऊन इतका वेळ निघून गेला! आता कर्जमाफी का झाली नाही, असा सवाल शेतकरी करत आहेत.
बंधू-भगिनींनो,
महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाची किती कामे बंद पाडली, हे आपण विसरता कामा नये! राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यावर या दिशेने वेगाने काम केले गेले. वैनगंगा-नळगंगा नद्या जोडण्याच्या योजनेला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर आणि वर्धा येथील पाणीटंचाई दूर होणार आहे. कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करत आहे. कापूस आणि सोयाबीनसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जात आहेत. अमरावतीच्या टेक्सटाईल उद्यानाची नुकतीच पायाभरणीही झाली आहे. या उद्यानामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
मित्रांनो,
आपल्या महाराष्ट्रामध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करण्याची अफाट क्षमता आहे. गाव, गरीब, शेतकरी, मजूर, दलित, वंचित अशा सर्वांना पुढे घेऊन जाण्याची मोहीम जोरात सुरू राहील तेव्हाच हे घडेल. मला खात्री आहे, तुम्ही सर्वजण तुमचे आशीर्वाद कायम ठेवाल. आपण सर्व मिळून विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू. या शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा आमच्या शेतकरी मित्रांचे आणि बंजारा समाजातील माझ्या सर्व बंधू भगिनींचे अभिनंदन करतो. माझ्यासोबत भारत माता की जय म्हणा,
भारत माता चिरंजीवी होवो!
भारत माता चिरंजीवी होवो!
खूप खूप धन्यवाद.