आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही वाटत आहे.
आधीतर नोकरदार, व्यावसायिक यांनाही कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. पथ विक्रेते, हातगाडीवरून वस्तूंची विक्री करणारे तर बँकांमध्ये जाण्याचाही विचार करीत नव्हते.
परंतु आज बँका स्वतःहून त्यांना कर्ज देत आहेत.
कोणत्याही प्रकारची धावपळ न करता, आपले काम सुरू करण्यासाठी कर्ज मिळत आहे.
आपल्या सर्वांचे हे आनंदी चेहरे पाहून मलाही खूप खूप आनंद वाटतोय.
तुम्हा सर्वांना तुमच्या कामासाठी, आत्मनिर्भर होवून पुढे जाण्यासाठी स्वतःची प्रगती करीत उत्तर प्रदेशाला आणि देशाला पुढे घेवून जाण्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यावेळी आज मी आपल्याशी संवाद साधत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आले की, खूप कमी शिकलेली आणि सामान्य-अगदी गरीबीमध्ये जगणारी आमची भगिनी प्रीती किती आत्मविश्वासाने आधुनिक तंत्रज्ञानही शिकत आहे. आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी काम करीत आहे आणि संपूर्ण कुटुंबालाही बरोबर घेवून जाताना त्यांची काळजी घेत आहे, त्याच प्रकारे बनारसच्या बंधुंबरोबर मी ज्यावेळी बोलत होतो, त्यावेळी अरविंदजी यांनी एक जी गोष्ट सांगितली, ती अगदी सर्वांनी शिकण्यासारखी आहे.
आणि मला असं वाटतंय की, देशातले अगदी शिकले-सवरलेले लोकही ही गोष्ट नक्की शिकतील. सामाजिक अंतर कायम राहण्यासाठी ते, आपण ज्या गोष्टी स्वतः बनवतो, त्यापैकी एक गोष्ट मोफत देतात. जर तुम्ही नियमांचे पालन केले, तर ही मोफत भेट ते देतात. पहा, लक्षात घ्या, एक लहान व्यवसाय करणारी व्यक्ती किती मोठे काम करीत आहे. यापेक्षा मोठी, दुसरी प्रेरणा काय असू शकते. आणि ज्यावेळी आम्ही लखनौमध्ये विजय बहादूर जी यांच्याबरोबर बोलत होतो, त्यावेळी ते ठेल्यावर काम करीत होते. परंतु व्यवसायाचे व्यवस्थापन मॉडेल कशा पद्धतीने वेळेची बचत करू शकते आणि त्यामुळे काम कसे वाढविता येवू शकते, यांचे तज्ञ त्यांनी अगदी बारकाईने आत्मसात केले आहे. लक्षात घ्या, हीच आमच्या देशाची ताकद आहे. याच लोकांमुळे देश पुढे मार्गक्रमणा करीत असतो. तुम्हा सर्व लोकांच्या प्रयत्नांमुळेच तर देश पुढे जातोय.
आमचे पथविक्रेते मित्र या कामासाठी सरकारला धन्यवाद देत आहेत. माझे आभार व्यक्त करीत आहेत. परंतु याचे श्रेय सर्वात प्रथम मी आमच्या सर्व बँकांना, आमच्या सर्व बँक कर्मचा-यांनी केलेल्या परिश्रमाला देतो. बँक कर्मचा-यांच्या सेवा भावनेशिवाय हे काम इतक्या कमी कालावधीत इतके प्रचंड काम होवू शकले नसते. आमच्या बँकेच्या सर्व कर्मचा-यांचे मी आज अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. या गरीब लोकांच्या मनाची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी काम करून लोकांचा उत्साह अनेक पटींनी वाढवला, त्यांनाही मी आज शुभेच्छा देतो. या सर्व गरीबांचे आशीर्वाद सर्वात प्रथम तर बँक कर्मचारी बांधवांना मिळाले पाहिजेत. त्यांनीच सातत्याने प्रयत्न करून आपल्या आयुष्याची गाडी पुन्हा एकदा रूळावरून धडधडत पुढे जाण्यासाठी परिश्रम केले आहेत. म्हणूनच आपले सर्व आशीर्वाद, आपल्या सर्व शुभेच्छा बँकेच्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे.
आपल्या या प्रयत्नांमुळे गरीबांना सण -उत्सव आनंदामध्ये साजरा करता येणार आहे. हे खूप मोठे काम आहे.
या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर जोडले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेश सरकारमधले इतर मंत्रीगण, उत्तर प्रदेशातल्या सर्व जिल्ह्यांमधून जोडले जात असलेले स्वनिधी योजनेचे हजारो लाभार्थीगण, सर्व बँकांमधून जोडले गेलेले महनीय आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनी, आजचा हा दिवस आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे.
अतिशय अवघड, कठीणातल्या कठीण परिस्थितीशी सामना हा देश कसे करतो, उत्तर प्रदेशातले लोक संकटाशी दोन हात करण्याची ताकद बाळगून आहे, आजचा हा दिवस याची साक्ष देणारा आहे.
कोरोनाने ज्यावेळी संपूर्ण दुनियेवर हल्ला केला होता, त्यावेळी भारतातल्या गरीबांविषयी अनेक प्रकारच्या आशंका व्यक्त करण्यात येत होत्या.
माझ्या गरीब बंधू भगिनींना कशा प्रकारे कमीत कमी त्रास होईल, या गरीबांना आलेल्या संकटातून कसे बाहेर काढता येईल, याची चिंता सरकारच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी होती. याच विचारातून देशाने 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची गरीब कल्याण योजना सुरू केली. देशातल्या एकाही गरीब व्यक्तीला भोजना वाचून उपाशीपोटी झोपावे लागू नये, याची चिंता सरकार करीत होते. 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेजची घोषणा सरकारने केली, त्यामध्ये गरीबाचे हित, त्याचे रोजच्या कमाईचे साधन यांचा विचार केला आणि त्यालाच सर्वोच्च प्राधान्य देवून योजना तयार केली. आणि आज, आपल्या देशातल्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखविले, ते म्हणजे कितीही मोठे संकट आले तरी, ते परतवून लावण्याची ताकद आमच्या सामान्य जनतेमध्ये आहे.
पीएम स्वनिधी योजनेने गरीबांच्या श्रमाला एक प्रकारे मदतच केली आहे. आणि आज, आमचे पथविक्रेते, ठेले, हातगाडीवाले सहकारी पुन्हा एकदा आपले काम सुरू करणार आहेत.
हे सर्व लोक आत्मनिर्भर होवून पुढे, प्रगती करीत आहेत.
मित्रांनो, देशात दि. 1 जून रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला प्रारंभ झाला होता. आणि दि. 2 जुलैला म्हणजेच एक महिन्यांमध्ये ऑनलाइन पोर्टलवर या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्राप्तही होवू लागले होते.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी इतक्या वेगाने झालेले काम देशामध्ये झाले, अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली. गरीबांसाठी करण्यात आलेल्या घोषणां इतक्या वेगाने, प्रभावीपणाने प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात येणे, याचे नवल वाटत होते. कोणत्याही योजनांचा भूतकाळ पाहिला तर इतक्या वेगाने अंमजबजावणी कधीच झालेली दिसून येत नाही. पथ विक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय परवडणाऱ्या व्याजदरामध्ये ऋण-कर्ज मिळू शकते, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर पथ विक्रेत्यांसाठी अशी विनातारण कर्ज योजना पहिल्यांदाच आली आहे. आज देश तुम्हा सर्वांबरोबर ठाम उभा आहे. तुमच्या श्रमांचा सन्मान करीत आहे.
आज देश, सामाजिक ताणे-बाणे यांच्यामध्ये आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये तुमच्या योगदानाचे महत्वही जाणतोय.
मित्रांनो,
पथविक्रेते, ठेलेवाले, हातगाडी चालवित व्यवसाय करणारे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, त्यांना आपले काम विना व्यत्यय करता यावे, याची काळजी या योजनेच्या प्रारंभीपासूनच घेण्यात आली आहे. ऋण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, यासाठी प्रारंभी काही लोक त्रासले गेले होते. आपण तारण म्हणून काय द्यायचे, हे अनेकांना लक्षात येत नव्हते. त्यामुळेच गरीबांसाठी बनविण्यात आलेल्या योजनेचा लाभ योग्य त्या लोकांना मिळावा, त्यांची गरीबी दूर व्हावी, असे धोरण आहे. म्हणूनच या योजनेमध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय, कोणाच्याही हमी शिवाय तसेच कोणाही मध्यस्थांशिवाय आणि कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारण्याविना, स्वतःच एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाइन अर्ज ‘अपलोड’ करता येवू शकते. तुम्ही स्वतःही हे करू शकता किंवा कोणत्याही कॉमन सॆव्हीस सेंटर वरून तसेच नगर पालिका कार्यालय अथवा बँकेच्या शाखेत जावूनही आपला अर्ज अपलोड करता येतो.
याचे चांगले परिणाम आज दिसून येत आहेत. कोणाही पथ विक्रेत्याला, ठेला, हातगाडी वाल्याला, आपले काम पुन्हा एकदा सुरू करणे शक्य झाले आहे. कर्जासाठी इतर कोणाकडेही जाण्याची गरज आता राहिलेली नाही. बँक स्वतः येवून, तुम्हाला पैसे देत आहे.
मित्रहो, उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत स्ट्रीट व्हेंडर्स (फेरीवाले) महत्वाची भूमिका बजावतात. एवढी मोठी लोकसंख्या, एवढे मोठे राज्य, पण रस्त्यावरील हातगाड्यांमुळे अनेकजण आपापल्या शहरात, गावांमध्ये लोकांच्या गरजा भागवतात वर थोडेफार कमावतातही. युपीतून जे स्थलांतर होत होते ते कमी करण्यात या हातगाडी व्यवसायाचा मुख्य हातभार आहे. म्हणूनच पीएम स्वनिधी योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोचवण्यात संपूर्ण देशात युपी पहिल्या क्रमांकावर आहे. शहरी फेरीवाला म्हणून सर्वात जास्त अर्ज युपीतून आले आहेत.
देशातून आतापर्यंत जवळपास 25 लाख स्वनिधी कर्जासाठीचे अर्ज आले आहेत, आणि 12 लाखाहून जास्त अर्ज स्वीकारलेही गेले आहेत.
यापैकी साडेसहा लाखांहून जास्त अर्ज तर फक्त युपीतूनच आले आहेत, ज्यामधून जवळपास पावणे चार लाख अर्जांना मंजूरीही दिली गेली आहे. फेरीवाल्यांसाठी एवढ्या तत्पर असलेल्या युपी सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांची टीम या सर्वांना मी विशेष धन्यवाद देतो. मला सांगितले गेले आहे की आता युपीत स्वनिधी योजनेच्या कराराला स्टँप ड्यूटीतून मुक्त करण्यात आले आहे. युपीत कोरोनाच्या या कठिण काळात 6 लाख फेरीवाल्यांना हजारो रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. यासाठी मी युपी सरकारला धन्यवाद देतो.
मित्रहो, गरीबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी देशात असे वातावरण निर्माण केले होते की गरीबांना लोन दिले तर ते पैसे परत येणारच नाहीत. स्वतः घोटाळे आणि कमिशनबाजी करणाऱ्यांनी बेईमानीचे सारे खापर कायम गरीबांवर कसे फुटेल यासाठीच प्रयत्न केले आहेत.
पण, मी याआधीही म्हटले होते आणि आता पुन्हा सांगतो की आपल्या देशातील गरीब प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मानाशी कधीच तडजोड करत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गरीबांनी पुन्हा हेच सत्य सिद्ध केलं आहे. देशासमोर आपल्या प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवले आहे. आज देशात ज्या फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेतून लोन दिलं गेलं त्यापैकी जास्तीत जास्त लोक आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड करतात. आपल्या युपीतील फेरीवाले मेहनत करून कमाई करतात आणि हप्ताही फेडतात. ही आपल्या गरीबांची इच्छाशक्ती आहे, ही आपल्या गरीबांची श्रमशक्ती आहे, हा आपल्या गरीबांचा प्रामाणिकपणा आहे.
मित्रहो, पीएम स्वनिधी योजनेबद्दल आपल्याला बँकेकडून, इतर संस्थांकडून आधीच माहिती मिळाली आहे. याबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगणं आवश्यक आहे. या योजनेत आपल्यासाठी सहजगत्या कर्ज उपलब्ध तर आहेच आणि त्याची वेळेवर परतफेड केल्यास व्याजात 7टकक्यांची सवलत मिळेल. डिजीटल व्यवहार केल्यास महिना 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक म्हणून आपल्या खात्यात जमा होईल म्हणजेच मिळू लागेल, म्हणजेच या दोन गोष्टी केल्यावर आपलं जे लोन आहे ते पूर्णपणे व्याजमुक्त होईल , व्याज फ्री होईल आणि पुढील खेपेस आपल्याला याहून जास्त कर्ज मिळू शकेल.
हा पैसा आपल्याला आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्यास, व्यवसायवाढीला उपयोगी पडेल. मित्रहो, आज बँकांचे दरवाजे आपल्यासाठी उघडे आहेत. बँका ज्या प्रकारे आपल्यापर्यंत स्वतःहून येत आहेत हे एका दिवसात झालेले नाही. ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या तत्वाचा, एवढ्या वर्षांचा परिपाक आहे. गरीबांना बँकिंग सिस्टीमशी जोडून काहीही साध्य होणार नाही असे म्हणणाऱ्यांनाही हे उत्तर आहे.
मित्रहो, देशात जेव्ही गरीबांसाठी जनधन खाती उघडली गेली तेव्हाही काहीजणांनी शंका व्यक्त केली होती, थट्टा केली होती. पण एवढ्या मोठया संकटात ती जनधन खाती गरीबांच्या कामी येत आहेत, गरीबांना पुढे जायला मदत करत आहेत. आज गरीबवर्ग बँकांशी जोडला गेला आहे, अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेला आहे. बड्या बड्या देशांनी ज्यापुढे गुढगे टेकले असं जागतिक संकट, अश्या संकटाशी दोन हात करण्यात, त्यावर विजय मिळवण्यात आपल्या देशातील सामान्यवर्ग खूप पुढे आहे.आज आपल्या माता बहिणी गॅसवर अन्न शिजवतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांना धूराच्या त्रास सोसत अन्न शिजवावे लागले नाही.
गरीबांना रहाण्यासाठी प्रधानमंत्री आवास मिळत आहे. सौभाग्य योजनेमुळे घराघरात विजेची जोडणी मिळाली आहे. आयुष्मान योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार विनाशुल्क मिळतात. आज गरीबांना विमा योजनांचे कवच आहे.
गरीबांचा सर्वंकष विकास, त्यांच्या जीवनाचे समग्र प्रयत्न, हे आज देशाचे संकल्प आहेत. आज या प्रसंगी मी जेवढे हातगाडी विक्रेते, श्रमिक, मजूर , शेतकरी सोबत जोडले गेले आहेत त्यांना मी आश्वस्त करतो की, देश आपल्याला आपले काम पुढे आणायला आपले जीवन उत्कृष्ट आणि योग्य बनवण्यात आपल्याला मदतच करेल.
मित्रहो, कोरोना संकटाचा आपण ज्या ठामपणे सामना केलात, ज्या जागरुकतेने आपण सुरक्षानियमांचे पालन करत आहात, त्यासाठी मी एकवार पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. अशी सावधगिरी बाळगण्याने देश या महामारीला संपूर्ण पराजित करेल. मला विश्वास आहे की लवकरच आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू. आणि हो, “दोन हात अंतर, मास्कचा वापर” हा मंत्र आपल्याला सणासुदींच्या दिवसात जास्तच लक्षात राखायचा आहे, कोणतीही कसर सोडायची नाही.
याच शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले जीवन प्रगतीपथावर राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.
खूप खूप धन्यवाद