इंडिया टुडे समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अरुण पुरीजी,
तुमच्या समूहातील सर्व पत्रकार मित्र,
वृत्तविभागात या क्षणी काम करणारे सर्व पत्रकार,
तुमच्या बरोबर असलेले वार्ताहर (स्ट्रिंगर्स),
येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझ्या मित्रांनो,
इंडिया टुडे परिषदेशी संबंधित सर्व लोकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.
तुमच्या समूहाने ज्याप्रकारे स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला, लोकांना जागरूक केले, त्यासाठीही तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात.
मित्रांनो,
देशाचे नेतृत्व करत असताना मला काय काय शिकायला मिळाले याबाबत माझे अनुभव मी तुम्हाला सांगावेत असे मला सांगण्यात आले आहे.
2014 मधील निवडणुकांनंतर मी जेव्हा दिल्लीत आलो होतो तेव्हा खरोखरच अनेक गोष्टी मला माहित नव्हत्या. केंद्र सरकार कसे चालते, कशी व्यवस्था असते, यंत्रणा कशी असते, याबाबत फार माहिती नव्हती. आणि मला वाटते की माझ्यासाठी हे वरदान ठरले.
जर मी जुन्या व्यवस्थेचा भाग असतो, तर निवडणुकीनंतर एका साच्याप्रमाणे त्यात अडकून पडलो असतो. मात्र असे झाले नाही.
मित्रांनो,
मला आठवतंय, 2014 पूर्वी तुमच्या स्टुडिओत देखील चर्चा व्हायची की जगात काय चालले आहे, ते मोदींना माहीतच नाही, अशा वेळी आपल्या परराष्ट्र धोरणाचे काय होईल?
मात्र गेल्या काही दिवसातील घटनाक्रमातून तुम्हाला दिसलेच असेल की भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रभाव किती आहे. दिसला आहे की नाही?
चला, तुम्ही मान्य तर केलात.
मित्रांनो,
आजचा भारत नवीन भारत आहे. बदललेला भारत आहे. आपल्यासाठी प्रत्येक वीर जवानाचे रक्त मौल्यवान आहे. यापूर्वी काय व्हायचे, कितीही लोक मारले जावोत, जवान शहीद होवोत, मात्र क्वचितच एखादी मोठी कारवाई व्हायची.
मात्र आता कुणी भारताकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करू शकत नाही. आमचे सरकार देशहिताचा प्रत्येक निर्णय घेण्यासाठी वचनबद्ध आहे. भारत आज एका नवीन धोरण आणि पद्धतीनुसार चालत आहे. आणि संपूर्ण जग देखील हे मान्य करत आहे.
मित्रांनो,
आजचा नवीन भारत निडर आहे, निर्भय आहे, आणि निर्णायक आहे. कारण आज सरकार सव्वाशे कोटी भारतीयांचा पुरुषार्थ, त्यांच्या विश्वासासह पुढे वाटचाल करत आहे.
भारतीयांच्या या एकीनेच देशात आणि देशाबाहेर काही देशविरोधी लोकांमध्ये एक भीती निर्माण केली आहे. आज हे जे वातावरण तयार झाले आहे, मी हेच म्हणेन की ही भीती चांगली आहे.
जर शत्रूंमध्ये भारताच्या पराक्रमाचे भय असेल, तर हे भय चांगले आहे. जर दहशवादाच्या प्रमुखांमध्ये जवानांच्या शौर्याबाबत भीती असेल, तर ही भीती चांगली आहे. जर फरारी गुन्हेगारांमध्ये कायदा आणि आपली मालमत्ता जप्त होण्याचे भय असेल, तर हे भय चांगले आहे.
जर मामाच्या बोलण्यामुळे मोठ-मोठी कुटुंबे हादरून जात असतील, तर हे भय चांगले आहे. जर भ्रष्ट नेत्यानांही तुरुंगात जायची भीती सतावत असेल, तर ही भीती चांगली आहे. जर भ्रष्टाचाऱ्यांमध्ये कायद्याची भीती असेल, तर ही भीती चांगली आहे.
मित्रांनो ,
स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये देशाने खूप सहन केले.
आता हा नवीन देश आपले सामर्थ्य, आपली साधने, आपल्या संसाधनांवर विश्वास ठेवत पुढे चालला आहे, आपल्या मूलभूत उणिवा दूर करण्याचा, आपली आव्हाने कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु, मित्रांनो, पुढे जात असलेल्या या भारतासमोर आणखी एक आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान आहे, आपल्याच देशाचा विरोध आणि आपल्याच देशाची चेष्टा मस्करी करून आत्मसंतुष्ट होण्याची प्रवृत्ति.
मला आश्चर्य वाटतंय की आज जेव्हा संपूर्ण देश आपल्या जवानांसह खांद्याला खांदा भिडवून उभा आहे, तेव्हा काही लोक आपल्या सेनादलांवरच संशय घेत आहेत. एकीकडे आज संपूर्ण जग दहशतवादाविरोधातील लढाईत भारताची साथ देत आहे, तर दुसरीकडे काही पक्ष दहशतवादाविरोधातील आपल्या लढयावरच संशय घेत आहेत.
हे तेच लोक आहेत, त्यांची वक्तव्ये, ज्यांचे लेख पाकिस्तानी संसद, रेडियो आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर भारताविरोधात वापरले जात आहेत. हे लोक मोदी विरोध करता करता देश विरोध करू लागले आहेत. देशाचेच नुकसान करत आहेत.
मी आज या मंचावरून अशा सर्व लोकांना विचारू इच्छितो की तुम्हाला आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे की संशय आहे? मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुमचा आपल्या सैन्याच्या म्हणण्यावर विश्वास आहे का तुम्ही त्या लोकांवर विश्वास ठेवत आहात जे आपल्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घालत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
मी अशा सर्व लोकांना आणि पक्षांना सांगू इच्छितो की मोदी येतील आणि जातील, मात्र भारत कायम राहणार आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे की, कृपया आपल्या राजकीय फायद्यासाठी, आपल्या बौद्धिक अहंकाराच्या समर्थनासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळणे सोडून द्या, भारताला दुर्बल करणे बंद करा.
मित्रांनो ,
राफेलची उणीव आज देशाला जाणवली आहे.आज भारत एकसुरात म्हणत आहे की जर आमच्याकडे राफेल असते तर काय झाले असते? राफेलबाबत यापूर्वी स्वार्थी धोरणामुळे आणि आता राजकारणामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
मी या लोकाना स्पष्ट सांगतो की मोदी विरोध करायचा असेल तर अवश्य करा, आमच्या योजनामध्ये त्रुटी असतील तर त्याचा काय परिणाम होत आहे, काय होत नाही ते सांगा. यावरून सरकारवर टीका करा, तुमचे नेहमीच स्वागत आहे, मात्र देशाच्या सुरक्षा हिताचा, देशाच्या हिताचा विरोध करू नका.
मोदी विरोधाच्या या हट्टामुळे मसूद अजहर आणि हाफिज सईद यांच्यासारख्या दहशतवाद्यांना, दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आश्रय मिळणार नाही, ते आणखी मजबूत होणार नाहीत याकडे कृपया लक्ष द्या.
मित्रांनो
ज्यांनी देशात वर्षानुवर्षे राज्य केले त्यांना खैरात आणि सौदेबाजी या दोन गोष्टीतच स्वारस्य होते.
खैरात आणि सौदेबाजीच्या संस्कृतीने आपल्या देशाच्या विकास यात्रेला हानी पोहोचली. या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा फटका कुणाला बसला तुम्हाला माहित आहे का? आपले जवान आणि किसान.
मला सर्वप्रथम संरक्षण क्षेत्राबद्दल बोलायचे आहे. गेली अनेक वर्षे देशात सत्तेत असणाऱ्यांच्या काळात एवढे संरक्षण घोटाळे कसे झाले? त्यांनी जीपने सुरुवात केली आणि नंतर शस्त्रे, पाणबुड्या , हेलिकॉप्टरकडे वळले. या प्रक्रियेत संरक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
जर एखाद करार होऊ शकत नसेल तर संरक्षण आधुनिकीकरण होऊ शकत नाही. सौदे करणाऱ्या प्रत्येकाचे कुणाशी संबंध आहेत ? मध्यस्थांचे कोणाशी संबंध आहेत? संपूर्ण देशाला माहित आहे.
आणि ल्युटेन्स दिल्लीला तर नक्कीच माहित आहे.
मित्रांनो,
हे सामान्य ज्ञान आहे की आपल्या सशस्त्र दलांना नियमितपणे आवश्यकता भासणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट्स. 2009 मध्ये आपल्या दलांनी एक लाख शहाऐशी हजार बुलेट प्रूफ जॅकेट्सची विनंती केली होती.
तुम्हाला हे ऐकून लाज वाटेल की 2009 ते 2014 दरम्यान एकही , मी पुन्हा सांगतो एकही बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी केलेले नाही. आमच्या कार्यकाळात आम्ही दोन लाख तीस हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केली.
आमच्या कार्यकाळात, सत्तेच्या मार्गिकाही दलालांपासून मुक्त आहेत कारण त्यांना माहित आहे की हे सरकार भ्रष्टाचार सहन करणार नाही. आता मला खैरातींबद्दल बोलू दे. जे सत्तेत होते त्यांना खैरात द्यायला आवडायचे. गरीबांना सक्षम करणे हा या खैरातीचा उद्देश नव्हता.
गरीब गरीबच राहावेत आणि राजकीय नेत्यांच्या दयेवर राहावेत यासाठी या खैराती दिल्या जात होत्या. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. कोणताही अर्थशास्त्रज्ञ किंवा धोरण तज्ज्ञ कधीही असे म्हणणार नाही की शेतकऱ्यांची कर्ज माफी आपल्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करू शकेलं. हा तात्पुरता उपाय आहे.
दर दहा वर्षांनी युपीए सरकार कृषी कर्जमाफी कल्पना घेऊन आहे.
त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकाळात काहीही केले नाही आणि शेवटच्या क्षणी कृषी कर्ज माफी देऊ केली.
त्यांच्या कर्जमाफीत काहीही स्पष्टता नाही. 20% हून कमी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. तरीही, कृषीकर्जावरून त्यांना निवडणूक लढवायला आवडते. आम्ही वेगळा दृष्टिकोन राबवला.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान किसान सम्मान निधी ही सर्वसमावेशक योजना आणली.
खैराती नाहीत, सौदे नाहीत- केवळ चांगले कार्य. भारताच्या 12 कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये दिले जाणार.
१ फेब्रुवारी रोजी ही योजना जाहीर करण्यात आली आणि २४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आली. आम्ही २४ तास अथक काम करून २४ दिवसात ही योजना राबवली. पूर्वी कुटुंबातील कोणत्या सदस्याचे नाव या योजनेला द्यायचे या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात बराच काळ खर्ची पडायचा.
पंतप्रधान किसान सम्मान निधी ही कर्जमाफी नाही तर दीर्घकालीन आणि शाश्वत सहाय्य देणारी योजना आहे. आमचे अन्य योजनाही अशाच आहेत- मग ते मृदा आरोग्य कार्ड असेल, पंतप्रधान कृषी सिंचन योजना असेल, ई-नाम असेल, त्या खैराती नाहीत, तर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी ठोस दीर्घकालीन उपाययोजना आहेत.
रालोआ सरकारने शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवण्याचे महत्वपूर्ण काम केले.
यापूर्वीचे सरकार सत्तेत असताना किमान आधारभूत किंमतीची फाईल सुमारे सात वर्षे शीतगृहात ठेवण्यात आली होती.
अशा तऱ्हेने ते 10% कमिशनसाठी काम करतात तर आम्ही 100% मिशनसह काम करतो. आणि जेव्हा सरकार एका ठोस ध्येयासह काम करते तेव्हा सर्वांगीण विकास शक्य होतो.
मित्रांनो,
आमचे पंचावन्न महिने आणि इतरांच्या पंचावन्न वर्षांनी प्रशासनाला दोन परस्परविरोधी दृष्टिकोन दिले.
त्यांचा ‘टोकन अप्रोच ‘ तर आमचा ‘टोटल अप्रोच’ होता. प्रत्येक गोष्टीसाठी ते टोकन द्यायचे. मी सविस्तरपणे सांगतो. भारत गरीबीविरोधात लढा देत होता मात्र त्यांनी प्रतीकात्मक घोषवाक्य दिले -गरीबी हटाओ.
ते कसे साध्य करायचे हे नमूद केले नव्हते आणि त्यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी कुठलेही प्रयत्न देखील केले नाहीत. मात्र ते सगळीकडे सांगत फिरत होते-गरीबी हटाओ, गरीबी हटाओ. भारताला वित्तीय समावेशकतेवर काम करायची गरज आहे हे माहित होते. त्यासाठी त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
त्यांनी गरीबांच्या नावाखाली हे केले मात्र त्यांच्यापैकी कुणीही गरीबांसाठी बँकांचे दरवाजे खुले आहेत कि नाहीत हे तपासायची तसदी घेतली नाही. एक पद, एक निवृत्तिवेतनचे उदाहरण घ्या.
चाळीस वर्षे जुनी मागणी अधांतरी होती मात्र २०१४ मध्ये त्यांच्या शेवटच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची प्रतिकात्म तरतूद त्यांनी केली. त्याना चांगले माहित होते की आवश्यक निधीपेक्षा हा निधी खूपच कमी आहे. परंतु तरीही, पुन्हा एकदा टोकन.
आणि निवडणुका जवळ येत होत्या. 2014 पूर्वी त्यांचा निवडणुकीचा मुद्दा काय होता – गॅस सिलेंडर 9 वरून 12 पर्यंत वाढवणे.
कल्पना करा- एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष अनेक वर्षे सत्तेत असूनही सिलेंडर 9 वरून 12 करण्यावरून निवडणूक लढत आहे. टोकन देण्याची ही पद्धत आम्हाला स्वीकारार्ह नाही. जर काम करायचे असेल तर ते समग्रतेने व्हायला हवे, टोकन स्वरूपात नाही.
म्हणूनच आमच्या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट 100 % आहे. जनधन -वित्तीय समवेशकता आणि सर्वांसाठी बँकिंग. सर्वाना घरे – 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर. आणि आम्ही त्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहोत.
युपीएच्या २५ लाख घरांच्या तुलनेत दीड कोटी घरे याआधीच बांधून तयार आहेत. सर्वाना आरोग्य सुविधा – आयुष्मान भारत -कुणीही भारतीय चांगल्या आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही. या योजनेचा लाभ 50 कोटी भारतीयांना होईल.
एक पद एक निवृत्तीवेतन – त्यांचे 500 कोटी आणि रालोआ सरकारने ओआरओपी चा भाग म्हणून दिलेले ३५ हजार कोटी रुपये यांची तुलना करा.
उज्वला योजना- ते ९ आणि १२ सिलेंडर देण्यात व्यग्र होते तर आम्ही कोट्यवधी कुटुंबांना धूरमुक्त स्वयंपाकघर देण्यासाठी काम केले.
सर्वांसाठी वीज- प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबात वीज जोडणी. तब्बल सत्तर वर्षे काळोखात असलेल्या 18,000 गावांचे आता विद्युतीकरण झाले असून प्रत्येक घरात वीज पोहचवण्यावर भर दिला जात आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही वेग आणि व्याप्ती या दोन्हीसह काम करत आहोत.
प्रत्येक गोष्ट सर्वांसाठी हवी, केवळ ठराविक लोकांसाठी नाही. प्रतिकात्मकवाद पुरे झाला, आता संपूर्ण परिवर्तन करायची वेळ आली आहे ज्यामध्ये विकासाची फळे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचतील.
मित्रांनो,
आज तक चांगले प्रश्न विचारण्याबाबत ओळखला जातो. मात्र आज मी देखील आज तकच्या मंचावरून काही प्रश्न विचारू इच्छितो. आतापर्यंत कोट्यवधी लोक उघड्यावर शौचाला जाण्यासाठी विवश का होते?
आतापर्यन्त सरकार दिव्यांगांप्रती संवेदनशील का नव्हती?
आतापर्यन्त गंगेचे पाणी एवढे प्रदूषित का होते? आतापर्यन्त ईशान्य राज्य उपेक्षित का राहिले?
आतापर्यन्त आपल्या देशातील सैन्यदलाच्या वीर जवानांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक का नव्हते?
आतापर्यन्त आपल्या वीर पराक्रमी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पोलीस स्मारक का नव्हते?
आतापर्यन्त आझाद हिंद सेनेच्या सरकारच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाल किल्यात झेंडा का नाही फडकावला गेला?
आज तकच्या मंचावरून मी प्रश्नांची मालिका जर अशीच सुरु ठेवली तर कित्येक तासांचे ‘विशेष’ बातमीपत्र बनू शकते.
या प्रश्नांवर तुम्ही हल्ला बोल करा किंवा करू नका, कथांची मालिका बनवा किंवा बनवू नका.
– मात्र हे एक सत्य आहे की यापूर्वी या देशातील गरीब , पीड़ित, शोषित आणि वंचितांना व्यवस्थेशी जोडण्याचे सार्थक प्रयत्न केले गेले नाहीत.
परंतु मी इथे केवळ प्रश्न विचारण्यासाठी आलेलो नाही, काही उत्तरेही द्यायची आहेत तुम्ही विचारल्याशिवाय, की आम्ही काय मिळवले आणि काय मिळवत आहोत.
तुम्ही लोक स्वतःला ‘सबसे तेज’ म्हणता. तुमची टॅगलाईन हीच आहे ना – सबसे तेज
म्हणून मी ठरवले की आज मी देखील तुम्हाला माझ्याबद्दल आणि माझ्या सरकारबद्दल सांगावे की आम्ही किती तेज आहोत.
आम्ही सर्वात जलद गतीने भारतातील गरीबी दूर करत आहोत. आज आपण सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. 1991 पासून पाहिलेत तर गेल्या 5 वर्षांच्या काळात आम्ही स्थूल राष्ट्रीय उत्पादन सर्वात वेगाने वाढवत आहोत.
1991 पासून पाहिलेत तर गेल्या 5 वर्षांच्या काळात आम्ही सर्वाधिक वेगाने महागाई दर खाली आणला आहे.
आज देशात सर्वाधिक गतीने रस्ते बांधले जात आहेत.
आज सर्वात जलद गतीने रेल्वेची विकासकामे होत आहेत.
आज आम्ही सर्वात जलद गतीने गरीबांसाठी घरे बांधत आहोत.
आज देशात सर्वात वेगाने मोबाइल निर्मिती कारखाना उभारण्याचे काम झाले आहे.
आज देशात सर्वात जलद गतीने ऑप्टिकल फाइबर जाळे टाकण्याचे काम होत आहे
आज देशात सर्वात जलद गतीने सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक येत आहे.
आज देशात सर्वात जलद गतीने स्वच्छतेची व्याप्ती वाढत आहे.
तर जशी ‘सबसे तेज़’ तुमची tagline है, तशीच ‘सबसे तेज’, आमच्या सरकारची जीवनरेषा आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मी 2013 मध्ये जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला दोन मित्रांची एक कथा ऐकवली होती. गोष्ट अशी होती की एकदा दोन मित्र जंगलात फिरायला जातात. घनदाट जंगलात निघाले होते म्ह्णून त्यांनी चांगल्या प्रकारची बंदूक स्वतःकडे ठेवली होती जेणेकरून जर एखादे क्रूर जनावर भेटले तर आपले प्राण वाचवता येतील. जंगलात पायी चालण्याची त्यांना इच्छा झाली. तर घनदाट जंगलात चालले होते, तेवढ्यात अचानक एक सिंह समोर आला.
आता काय करायचे, बंदूक तर गाडीत राहिली आहे. मोठी अडचण होती, कशा प्रकारे या संकटाचा सामना करायचा, कुठे पळून जायचे?
मात्र, त्यांच्यापैकी एकाने आपल्या खिशातून बंदुकीचा परवाना काढून सिहाला दाखवला , म्हणाला हे बघ माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे.
मित्रांनो,
त्यावेळी मी गोष्ट ऐकवली तेव्हा सरकारची अशीच परिस्थिती होती. पूर्वीच्या सरकारने अभिनय तर चांगला केला मात्र त्यात कृती नव्हती. आता सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही अभिनयाबरोबरच कृतीही करून दाखवली आहे … तेव्हाच्या आणि आताच्या काळात किती फरक पडला आहे, त्याची आणखी काही उदाहरणे द्यायची आहेत.
मित्रांनो,
बेनामी मालमत्ता कायदा 1988 मध्ये पारित करण्यात आला होता. मात्र कधी तो लागू केला गेला नाही. म्हणजे कृती प्रत्यक्षात साकारली नाही.
आमच्या सरकारने तो लागू करण्याचे काम केले आणि हजारो कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली.
गेल्या सरकारच्या काळात तुम्ही अन्न सुरक्षा कायद्याचे काय झाले ते पाहिले असेल, खूप गाजावाजा करून तो आणण्यात आला. मात्र जेव्हा माझे सरकार आले तेव्हा मी हे पाहून चक्रावून गेलो की हा कायदा केवळ 11 राज्यांमध्ये अर्धवटरित्या लागू करण्यात आला आहे.
आमच्या सरकारने सर्वप्रथम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कायदा लागू केला. आणि हे सुनिश्चित केले की प्रत्येक माणसापर्यंत याचा लाभ पोहचेल.
यापूर्वीही हेच सरकारी अधिकारी होते, याच फायली होत्या अन हेच कार्यालय होते, मात्र परिणाम काय होता तुम्हा सर्वाना माहित आहे.
आज आम्ही कृतीवर भर दिला आहे. आणि पहा देशात किती वेगाने विकासकामे होत आहेत.
मित्रांनो,
2014 ते 2019 चा हा कालखंड म्हटलं तर पाच वर्षांचा आहे, मात्र जेव्हा तुम्ही विकासाच्या मार्गावर धावून आमच्या सरकारच्या कामकाजाचे विश्लेषण केले तर तुम्हाला असे वाटेल जणू विकासाचा अनेक दशकांचा प्रवास करून परतत आहोत.
ही गोष्ट जेव्हा मी पूर्ण निग्रहाने सांगतो तेव्हा त्यामागे आमच्या सरकारची पाच वर्षातील कठोर मेहनत आणि सव्वाशे कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि भागीदारी आहे.
2014 ते 2019 आवश्यकता पूर्ण करण्याचा कालखंड होता तर 2019 पासून पुढे आकांक्षा पूर्ण करण्याची वेळ आहे.
2014 ते 2019 मूलभूत गरजा प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्याची वेळ होती,
तर 2019 पासून पुढे वेगाने प्रगती करण्यासाठी झेप घेण्याची वेळ आहे.
2014 ते 2019 आणि 2019 पासून पुढे सुरु होणारा हा प्रवास बदलत्या स्वप्नांची कथा आहे.
निराशेच्या स्थितितून आशेच्या शिखरापर्यंत पोहचण्याची कथा आहे.
संकल्प ते सिद्धिच्या दिशेने घेऊन जाणारी कहाणी आहे.
मित्रानो, आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की एकविसावे शतक भारताचे असेल.
गेल्या पाच वर्षातील मेहनत आणि परिश्रमाने आम्ही देशाचा पाया मजबूत करण्याचे काम केले आहे.
या पायावर नवीन भारताची भव्य इमारत उभी राहिल.
आज मी पूर्ण विश्वासाने सांगतो कि हो, एकविसावे शतक भारताचे असेल.
याच विश्वासासह मी माझं भाषण संपवतो.
तुम्ही मला इंडिया टुडे परिषदेत बोलवलंत, माझं मत मांडण्याची संधी दिलीत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.