महामहीम, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, सारा नेतन्याहू , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, आयक्रियेटशी संबंधित तमाम विद्वान,नवउन्मेषक,संशोधक, अधिकारीगण आणि इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो,
मला आनंद होत आहे की, आज इस्रायलच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत देशातील तरुण नवउन्मेशकांना समर्पित या संस्थेचे लोकार्पण होत आहे. मी नेतन्याहू यांचा खूप आभारी आहे. त्यांनी गुजरातमध्ये येण्याचे निमंत्रण स्वीकारले आणि कुटुंबासह आले. या कार्यक्रमासाठी इथे येण्यापूर्वी आम्ही साबरमती आश्रमात गेलो होतो. तिथे पूज्य बापूना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली. पतंग उडवण्याचीही संधी मिळाली.
मी जेव्हा गेल्या वर्षी इस्रायलला गेलो, तेव्हाच मनात ठरवले होते- या संस्थेचे इस्रायलबरोबर आणखी मजबूत संबंध असायला हवेत आणि तेव्हापासूनच मी माझे मित्र नेतन्याहू भारतात येण्याची वाट पाहत होतो. मला आनंद होत आहे की, त्यांनी केवळ गुजरातला भेट दिली असे नाही तर आज आपण त्यांच्या उपस्थितीत या संस्थेच्या संकुलाचे लोकार्पण सुध्दा करत आहोत. मी नेतन्याहू आणि त्यांच्याबरोबर प्रतिनिधिमंडळाच्या अन्य सदस्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो.
आज आपण आयक्रियेटचे लोकार्पण करतांना दिवंगत प्रा. एन.व्ही. वसानी यांचे स्मरण मी करू इच्छितो. मला चांगले आठवतंय की इथे
आयक्रियेटची संकल्पना आखली गेली तेव्हा त्याला मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी सुरुवातीला प्रा. वसानी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने ते प्रदीर्घ काळ बेशुद्धावस्थेत होते, आपल्याला सोडून गेले. आज ते आपल्यात नाहीत, मात्र सुरुवातीच्या काळात त्यांनी जे प्रयत्न केले आणि नंतर अन्य लोक सामील झाले आणि आज आपण आयक्रियेटला या भव्य रूपात पाहत आहोत.
शेतकरी एक छोटेसे रोपटे लावतो आणि अनेक भावी पिढ्यांना त्या विशाल वृक्षाची फळे मिळत राहतात. आणि शेतकऱ्याचा आत्मा जिथे कुठे असेल, हे पाहून निश्चितच सुखावत असेल. आज आयक्रियेटचे लोकार्पण करताना आम्हाला सर्वाना त्या आनंदाची प्रचिती येत आहे की एक बियाणे पेरले होते आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.
कोणत्याही संस्थेचे महत्व . त्याचा अंदाज तिच्या जन्माच्या वेळी बांधता येत नाही.आपणा सर्वाना माहित आहे की आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात औषध क्षेत्रात गुजरातचे नाव आहे, गुजरातींचे नाव आहे. मात्र खूप कमी लोकांना याची पार्श्वभूमी माहित असेल 50-60 वर्षांपूर्वी अहमदाबादच्या काही दूरदर्शी उद्योगपतींच्या प्रयत्नामुळे एका फार्मसी महाविद्यालयाचा प्रारंभ झाला होता, त्याची सुरुवात झाली होती आणि ते देशातील पहिले फार्मसी महाविद्यालय होते. आणि त्या फार्मसी महाविद्यालयाने अहमदाबाद आणि संपूर्ण गुजरातमध्ये औषध क्षेत्रात एक मजबूत परिसंस्था उभी केली. आणि आज देश हीच अपेक्षा आयक्रियेट आणि तिथून बाहेर पडणाऱ्या माझ्या तरुणांकडून, विद्यार्थ्यांकडून ठेवतो आहे की नवनिर्मिती आणि संशोधन क्षेत्रात ते भारताचे नाव जगभरात उज्वल करतील.
मला आठवतंय काही वर्षांपूर्वी जेव्हा आयक्रियेट सुरु केले होते त्यावेळी मी म्हटले होते की इस्रायलला आयक्रियेटशी जोडायचे आहे. माझा हेतू हाच होता की इस्रायलच्या अनुभवाचा फायदा, त्याच्या स्टार्टअप वातावरणाचा लाभ या संस्थेला, देशाच्या तरुणांना मिळावा. इस्रायलचे तंत्रज्ञान आणि सृजनशीलता संपूर्ण जगाला प्रभावित करते, विशेषतः अशी क्षेत्रे जी भारताच्या गरजांशी जोडलेली आहेत, त्यात इस्रायलच्या सहकार्याचा लाभ भारताच्या नवउन्मेषकांना देखील मिळू शकेल.
जल-संवर्धन, कृषी उत्पादन,कृषी उत्पादनाची दीर्घकाळ देखभाल, अन्न प्रक्रिया, वाळवंटातील कमी पाण्याच्या परिसरातील शेती, सायबर सुरक्षा-असे किती तरी विषय आहेत ज्यात भारत आणि इस्रायलमध्ये भागीदारी होऊ शकते.
मित्रांनो , इस्रायलच्या लोकांनी संपूर्ण जगात हे सिद्ध करून दाखवले आहे कि देशाचा आकार नव्हे, तर देशवासियांचा संकल्प देशाला पुढे घेऊन जातो, नव्या उंचीवर नेतो.
मला एकदा इस्रायलचे माजी राष्ट्रपती आणि महान मुत्सद्दी शिमॉन पेरेज यांना भेटण्याचे भाग्य लाभले होते त्यांची एक गोष्ट मला आजही आठवते. शिमॉन पेरेज म्हणायचे“, नवनिर्मितीला मर्यादा नसते आणि अडथळे नसतात हे आम्ही सिद्ध करून दाखवू,. नवसंशोधनामुळे देश आणि जनता यांच्यात संवाद निर्माण होऊ शकतो. त्यांचे हे म्हणणे आज १०० टक्के खरे ठरले आहे. भारत आणि इस्रायलच्या लोकांना आणखी जवळ आणण्यात नवसंशोधनाची खूप मोठी भूमिका आहे.
बंधू आणि भगिनींनो, शिमॉन पेरेज यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट मी आज पुन्हा सांगू इच्छितो. ते म्हणायचे,”स्वप्न जेवढे मोठे असेल, त्याचे परिणाम तितकेच नेत्रदीपक असतात. इस्रायलची हीच विचारसरणी नोबेल पुरस्काराबरोबरच्या त्यांच्या नात्याला अधिक मजबूत करते. इस्रायलच्या शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या क्षेत्रात मिळालेले नोबेल पुरस्कार याचे साक्षीदार आहेत.
बंधू आणि भगिनींनो, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे तेवढेच प्रसिद्ध एक वक्तव्य आहे- ” ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची आहे. ” ही कल्पनाशक्ती, ही स्वप्ने, या कल्पना आपल्याला नव्या उंचीवर घेऊन जातात. या स्वप्नांना कधीही मरू द्यायचे नाही. या स्वप्नांना कधीही थांबू द्यायचे नाही. मुलांचे कुतूहल जोपासण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. संकोच हा नवसंशोधनाचा शत्रू आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांकडे लक्षपूर्वक पहा. जर तुम्ही त्यांना सांगितले की लवकर झोपायला हवे, ते लगेच विचारतात, का झोपायचे लवकर? जर तुम्ही त्यांना सांगितले की मला हे संगीत आवडते, ते लगेच विचारतात, तुम्हाला हे संगीत का आवडते? एकदा गणिताच्या एका वर्गात शिक्षकांनी समजावून सांगितले की जर तीन फळे आहेत आणि तीन विद्यार्थ्यांना दिली तर प्रत्येकाला एक फळ मिळेल, आणि जर सहा फळे असतील आणि सहा विद्यार्थ्यांना दिली तर, तरीही प्रत्येकाला एकच फळ मिळेल. मग शिक्षक म्हणाले कि याचा अर्थ जेवढी फळे असतील तेवढेच विद्यार्थी असतील तर प्रत्येकाला एक फळ मिळेल. तेव्हा एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने शिक्षकांच्या डोळ्याला डोळा भिडवत विचारले के जर शून्य फळे असतील आणि विद्यार्थीही शून्य असतील तर तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला एक फळ मिळेल का ? हे ऐकून संपूर्ण वर्ग हसायला लागला. शिक्षक देखील त्या मुलाकडे पाहत राहिले. मात्र तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम होते असे म्हणतात आणि त्या एका प्रश्नाने गणितातील एक महत्वाचा प्रश्न स्पष्ट केला की शून्याला शून्याने विभागले तर उत्तर एक असू शकते का?
आपल्या तरुणांमध्ये ऊर्जाही आहे , कुतूहल देखील आहे. त्यांना थोडेसे प्रोत्साहन, थोडेसे मार्गदर्शन, थोडेसे नेटवर्क, थोडासा संस्थात्मक पाठिंबा हवा आहे. जेव्हा हे थोडे-थोडे तरुणांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाला मिळते, तेव्हा मोठे -मोठे परिणाम मिळणे निश्चित होते. आज आपण देशात संपूर्ण यंत्रणेला नवसंशोधन अनुकूल बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत. आमचा मंत्र आहे- कुतूहलातून निर्माण व्हावी इच्छा, इच्छेच्या ताकदीने बनाव्या कल्पना, कल्पनांच्या शक्तीने नवसंशोधन आणि नवसंशोधनाच्या शक्तीने आपला नवा भारत बनावा.
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या मनात, प्रत्येक तरुणाच्या मनात काही ना काही नवीन करण्याची , अभिनव संशोधन करण्याची इच्छा असते. त्याच्या मनात विचार येतात आणि जातात. जे विचार येतात ती तुमची संपत्ती आहे. मात्र ते विचार निघून जाणे, हरवणे, प्रत्यक्षात न उतरणे , मला वाटते ती समाजाची, सरकारची , व्यवस्थेची त्रुटी आहे. मी हीच व्यवस्था बदलत आहे. तरुणांचे विचार असे संपुष्टात येऊ नये हे पाहणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. तरुणांना त्यांची स्वप्ने साकार करता यावी , आपल्या सामर्थ्याची ओळख संपूर्ण जगाला देऊ शकतील आणि यासाठी साहाय्य करणाऱ्या संस्था उभारणे, ही सरकारची आणि समाजाची जबाबदारी आहे. याच विचारातून आयक्रियेटचा जन्म झाला आहे.
मला आनंद आहे कि आयक्रिएटने देशातील तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात, त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना साकार करण्यात खूप मदत केली आहे. आयक्रिएटच्या अभिनव उत्पादनांबाबत जेव्हा मला समजले,आज पाहिलंही , खूप समाधान वाटत आहे. मला सांगण्यात आले आहे कि बायो स्कॅन लेबर अड्डा, स्पेक्ट्रम्स पार्ट, आयकॉन सारखी अनेक नाविन्यपूर्ण संशोधन आयक्रिएटच्या मदतीमुळे शक्य झाली आहेत आणि यशाची पहिली अट असते-धाडस. जो धाडस करू शकतो, तो कोणताही निर्णय घेऊ शकतो. तुम्ही सहमत आहात ना माझ्या मताशी? सहमत आहात ना तरुणांनो? जर धाडस नसेल तर माणूस निर्णय घेऊ शकत नाही. आयक्रिएटच्या माध्यमातून नवसंशोधन करणाऱ्या धाडसी तरुणांना मी खूप-खूप शुभेच्छा देतो. परंपरा आणि नवसंशोधन यांच्यात नेहमी खेचाखेची होत असते. जेव्हा कधी कुणी काही नवीन करू इच्छितो, तेव्हा एक वर्ग त्याची थट्टा करतो , विरोध करतो. बहुतांश लोकांना कालिदासाच्या ‘मेघदूत ‘ आणि ‘शाकुंतल‘ बद्दल माहिती असेलच मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की कालिदासाने परंपरा आणि नवसंशोधनाच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट सांगितली आहे- माल विक्रागिनमित्रम्- जे त्यांनी लिहिले आहे. या माल विक्रागिनमित्रम् मध्ये कालिदासांनी म्हटले आहे-
पुराणमित्येव न साधु सर्वं न चपि काव्यं नवमित्यवद्यम्।
सन्त: परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढ़: परप्रत्ययनेयबुद्धि:।।
याचा अर्थ एखादी वस्तू जुनी आहे, म्हणजे ती चांगली असेलच असे आवश्यक नाही. त्याचप्रमाणे एखादी वस्तू नवीन आहे , म्हणून वाईट आहे असे मुळीच नाही. बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक गोष्टीला गुणांच्या आधारे तोलतो आणि मूर्ख दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपले मत बनवतो. शतकांपूर्वी कालिदास हे सांगून गेले आहेत आणि किती सुंदर प्रकारे कालिदासांनी परंपरा आणि नवसंशोधन यांच्यातील मतभेदांवर उपाय सांगितला आहे.
मित्रांनो, ही आपल्या वैज्ञानिकांची क्षमता आहे की जेवढ्या रुपयांत हॉलिवूडमध्ये विज्ञानावर काल्पनिक चित्रपट बनतो, त्याहून कमी पैशात खरे मंगळयान खऱ्या मंगळ ग्रहावर पोहोचते,हे आपल्या वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. आता चार दिवसांपूर्वीच इसरोने उपग्रह प्रक्षेपणाचे शतक पूर्ण केले आणि असे यश सहज मिळत नाही. यासाठी जी समर्पित वृत्ती लागते, परिश्रम लागतात, जी स्वप्नांची उंच भरारी लागते, ती ऊर्जा भारतीय तरुणांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे आणि याची प्रचिती मला दिवस-रात्र येत असते.
बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहिले आहे आयक्रिएटचा जो ‘i’ आहे तो छोट्या अक्षरात आहे. जेव्हा आयक्रिएटचे नाव ठरत होते, तेव्हा i छोटा का ठेवला, याच्यामागे देखील एक कारण आहे. मित्रांनो, सर्जनशीलतेत (creativity) सर्वात मोठा अडथळा असतो “i” मोठा असणे. (creativity) सर्जनशीलतेबरोबर जर ‘i ‘ मोठा असेल, तर त्याचा अर्थ आहे अहं आणि अहंकार आड येतो. आणि म्हणूनच सुरुवातीपासूनच य संस्थेला, इथल्या सर्जनशीलतेला अहं आणि अहंकारापासून मुक्त ठेवले आहे. मात्र यात एक गोष्ट महत्वाची होती. सर्जनशीलतेची सुरुवात छोट्या ‘i ‘ ने झाली मात्र स्वप्न मोठ्या ‘i ‘ चे ठेवले, म्हणजे individual पासून सुरुवात करून India पर्यंत पोहोचणे. आमचे उद्दिष्ट होते छोट्या ‘i ‘ कडून मोठ्या ‘I ‘ पर्यंत खूप मोठी झेप घेणे. एका व्यक्तीपासून सुरु करून संपूर्ण भारतात व्याप्ती वाढवणे.
आपल्या तरुणांनी देशासमोरील समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची आज गरज आहे. निर्व्याज संशोधन असायला हवे. सामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा कमीत कमी खर्चात कसा उंचावेल यासाठी संशोधन करायला हवे. जर मलेरियाचा धोका असेल तर आपण संशोधन करायला हवे – मलेरियापासून गरीबातील गरीब कुटुंब कसे वाचेल? अशी कोणती व्यवस्था उभी करायची? जर क्षयरोगापासून त्रस्त असतील,सिकल सेलने त्रस्त असतील, अस्वच्छतेने त्रस्त असतील. आपण नासाडी पाहतो आहोत, अन्नाची नासाडी पाहतो, कृषी उत्पादनाची नासाडी पाहतो आहोत. मला वाटते या समस्यांच्या निराकरणासाठी संशोधन व्हायला हवे.
आज देशभरात स्वच्छ भारताचे एक खूप मोठे अभियान सुरु आहे. स्वच्छतेशी संबंधित आपण नव-नवीन संशोधन करू शकतो का? कचरा ते संपत्ती या एका विषयात नावीन्यपूर्ण संशोधनाच्या अमाप संधी आहेत. देशात नावीन्यपूर्ण संशोधन, सर्जनशीलता, उद्यमशीलता आणि तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी अशा प्रकारची दूरदृष्टी आणि icreate सारख्या समर्पित संस्थांची देशाला खूप गरज आहे. हेच लक्षात घेऊन केंद्रीय स्तरावर स्टार्टअप इंडिया , स्टँडअप इंडिया , मुद्रा यांसारख्या अनेक योजना चालवल्या जात आहेत. सरकारने अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशभरात 2,400 पेक्षा अधिक अटल टिंकरींग लॅब्सना देखील मंजुरी दिली आहे. आमचा प्रयत्न आहे कि शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील ज्या नावीन्यपूर्ण कल्पना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आधुनिक संदर्भात नवीन प्रयोग करण्यासाठी देशभरात एक व्यासपीठ तयार व्हावे.
गेल्या वर्षी माझ्या इस्रायल दौऱ्यादरम्यान आम्ही 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा एक फंड स्थापन केला जो भारत आणि इस्रायलचा एक संयुक्त उपक्रम असेल. यामुळे दोन्ही देशांच्या गुणवत्तेला तंत्रज्ञान संशोधनाच्या दिशेने काहीतरी नवीन करण्यासाठी मदत मिळेल. या संयुक्त उपक्रमात खाद्यान्न, पाणी, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर दिला जाईल. आम्ही नाविन्यपूर्ण पुलाची देखील कल्पना केली . ज्याअंतर्गत दोन्ही देशांच्या स्टार्टअप मध्ये आदान प्रदान सुरु राहील.
मला आनंद वाटतो कि या प्रक्रियेदरम्यान नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून काही विजेत्यांची निवड करण्यात आली आणि आज त्यांना स्टार्टअप पुरस्कार देखील देण्यात आले. आताच तुम्ही पाहिले – इस्रायलची टीम आणि भारताची टीम- दोन्ही आता इथे मंचावर आहेत. भारत-इस्रायल नाविन्यपूर्ण पुल एक ऑनलाईन मंच आहे. आगामी काळात दोन्ही देशांच्या स्टार्टअपमध्ये खूप मोठा संपर्क म्हणून उदयाला येईल.
दोन दिवसांपूर्वी जेव्हा दिल्लीत दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक होती, तेव्हा तिथेही आम्ही या प्रयत्नांना समर्थन द्यायला सांगितले. मित्रांनो, भारताकडे अथांग सागरी सामर्थ्य आहे. 7,500 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा आमचा सागरी किनारा, सुमारे 1,300 छोटे-मोठे द्वीप आणि काही द्वीप तर सिंगापूरपेक्षा मोठे आहेत. अंदाजे २५ लाख चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र- हे आमचे एक असे सामर्थ्य आहे, ज्याला तोड नाही. या सामर्थ्याचा वापर देशाच्या प्रगतीत अधिक व्हावा यासाठी नवनवीन संशोधन गरजेचे आहे. नवीन संशोधन नील क्रांतीसाठी नवी ऊर्जा बनू शकते. आमच्या मच्छिमार बांधवांचे आयुष्य बदलू शकते.
मी इस्रायलच्या पंतप्रधानांचे आभार मानतो , त्यांनी गेल्या वर्षी माझ्या दौऱ्यादरम्यान मला समुद्राचे पाणी स्वच्छ आणि वापरण्याजोगे बनवणारे एक मोटरेबल यंत्र दाखवले होते. त्यांनी स्वतः गाडी चालवून मला तिथे नेले होते. एवढेच नाही, तसे एक यंत्र त्यांनी आज आपल्याबरोबर आणले आहे, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण आताच तुम्ही पडद्यावर पाहिले. बनासकांठा जिल्ह्यात, सीमेवरील एका गावात ही नवीन प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे सीमेवर तैनात जवान आणि आसपासच्या गावांमधील लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी तर मिळेलच , भारतात अशा प्रकारचे तंत्रज्ञान चाचपण्याची एक संधीही मिळेल.
बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे कि इस्रायलबरोबर कृषी क्षेत्रात सहकार्यांशी संबंधित 28 पैकी 25 सर्वोत्कृष्ट केंद्रे तयार झाली आहेत. याद्वारे क्षमता निर्मिती, माहिती आणि जनुकीय संसाधनांच्या आदान प्रदानात मदत मिळत आहे. या सर्वोत्कृष्ट केंद्रांपैकी तीन आपल्या गुजरातमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. या कार्यक्रमानंतर मी आणि पंतप्रधान प्रांतीय तालुका, साबरकंठा जिल्ह्यातील भदराड गावात जाणार आहोत. तिथेही इस्रायलच्या मदतीने कृषी क्षेत्रात सर्वोत्कृष्ट केंद्र बनले आहे. तिथूनच आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कच्छमध्ये खजुरावर जे संशोधन केंद्र सुरु आहे, त्याच्याबरोबर देखील आम्ही संवाद साधू. भदराड केंद्रातून गुजरातच्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याची नवी रोपे वितरित केली जात आहेत. या केंद्रात 10 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 35 हजारांहून अधिक शेतकरी हे केंद्र पाहण्यासाठी येऊन गेले आहेत. इथल्या काही लोकांना इस्रायलमध्येही प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारत आणि इस्रायल दरम्यान हे सहकार्य, ही परस्पर विकासाची भावना दोन्ही देशांच्या उज्वल भविष्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.
२१ व्या शतकात दोन्ही देशांची ही साथ मानवतेच्या इतिहासात नवा अध्याय लिहील. मित्रांनो, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर, एकमेकांच्या परंपराचा आदर आपले संबंध नेहमी मजबूत करत राहील. भलेही कमी संख्येने असतील, मात्र ज्यू समुदायाचे लोक अहमदाबाद आणि त्याच्या आसपास परिसरात शांततेने आपले आयुष्य जगत आहेत. ते गुजरातच्या इतिहासाशी , गुजरातच्या संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. गुजरातच्या ज्यू समुदायाने आपले स्थान देशाच्या अन्य भागात आणि इस्रायलमध्येही निर्माण केले आहे. भारत आणि इस्रायलच्या संबंधाचा विस्तार आणखी वाढावा, आणखी मजबूत व्हावा, याच इच्छेसह माझे भाषण संपवतो. आणि आज यानिमित्ताने icreate साकार करण्यात ज्या लोकांनी सहकार्य दिले, त्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो.
नारायण मूर्ति , दिलीप सिंघवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी icreate निर्माण करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडली, आपला बहुमूल्य वेळ दिला आहे. मी आशा करतो कि या संस्थेत नाविन्यपूर्ण संशोधनाचे जे वातावरण तयार होईल , ते संपूर्ण देशातील तरुणांना सशक्त करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडेल. आणि मी पंतप्रधानांचे, सारा यांचे हृदयापासून आभार मानतो. माझे चांगले मित्र म्हणून आमची मैत्री , दोन्ही देशांच्या मैत्रीत एक नवीन ताकद बनून उदयाला येत आहे. आज त्यांनी भारतासाठी जी खास भेट आणली आहे- ज्याचा व्हिडिओ आताच आपण पाहिला. मला वाटते तुमची ही भेट भारताच्या सामान्य माणसाच्या हृदयाला भावणारी आहे. आणि यासाठी मी तुमचे मनापासून खूप-खूप आभार मानतो.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो आणि icreate ला अनेक -अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद.