E-governance is easy, effective and economical. It is also environment friendly: PM Modi
Technology has the power to transform our economic potential as well, says PM Narendra Modi
IT + IT = IT. This means 'Information technology + Indian Talent = India Tomorrow': PM Modi
The impact of artificial intelligence is going to increase. Space technology is becoming important: PM

सभागृहात उपस्थित आदरणीय वरिष्ठ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मित्रवर्ग, बंधू आणि भगिनींनो

आज बुद्ध पौर्णिमा आहे.बुद्ध पौर्णिमेच्या या पावन प्रसंगी आपणा सर्वाना आणि देशवासियांना खूप- खूप शुभेच्छा. 

देशात बदल घडत आहे,सुट्टी आहे, आपण काम करत आहोत.आज 10  मे या दिवसाला आणखी एक महत्व आहे,देशाचा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा,1857  च्या स्वातंत्र्य लढ्याला 10  मे रोजी सुरुवात झाली होती. 

आज  आधुनिकतेच्या दिशेने  आणखी एक पाऊल आणि तेही न्याय व्यवस्थेने टाकलेले पाऊल आहे.मी सरन्यायाधीश साहेब आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. अलाहाबाद इथे एका कार्यक्रमात आपण भेटलो होतो तेव्हा सर न्यायाधीशांनी देशासमोरच्या प्रलंबित खटल्यांची विस्तृत आकडेवारी सादर करतानाच न्याय यंत्रणेला सुट्टीच्या काही दिवसात काम करण्याचे आवाहन केले होते.हे वक्तव्य माझ्यासाठी आनंददायी होते. प्रेरणादायी होते. 

उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयातले वकील, सुट्टी कमी करून देशातल्या गरिबांसाठी आपला वेळ देणार आहेत या वृत्तामुळे मला आनंद झाला असून या निर्णयासाठी मी या वर्गाचा आभारी आहे. याचा खटल्यांच्या प्रमाणावर काय परिणाम होईल ही वेगळी गोष्ट आहे.मात्र अशा प्रकारचा भाव संपूर्ण वातावरणात  बदल घडवतो.जबाबदारीच्या भावनेला हा भाव पोषक ठरतो त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या मनात एक नवा विश्वास निर्माण करतो, नव भारतासाठी हा विश्वास आवश्यक आहे. त्यासाठी मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. 

तंत्रज्ञानाबाबत सरकारचा जो अनुभव आहे, मी राज्यातही काम केले आहे, इथेही काम केले आहे.सरकार किंवा सरकारशी संबंधित व्यवस्थांनी दुर्दैवाने तंत्रज्ञानाचा मर्यादित म्हणजे हार्डवेअर पुरताच सीमित अर्थ ठेवला, हार्डवेअर खरेदी करणे, ते बसवणे,त्यालाच आपण तंत्रज्ञान मानले.काही कार्यालयात आपण पूर्वी पाहिले असेल टेबलावर एक फुलदाणी असायची,मोठा अधिकारी असेल तर ताज्या फुलांची मोठी फुलदाणी आणि त्याखालोखालच्या अधिकाऱ्यांसाठी छोटी फुलदाणी असे, मात्र फुलदाणी जरूर असे. काळ बदलला,आधुनिक काळात फुलदाणीच्या जागी चांगला संगणक आला, त्याला कोणी हात लावला नाही, कोणी तो उघडला नाही, मात्र तो संगणक दिसायला .चांगला वाटतो . म्हणूनच समस्या तंत्रज्ञानाची किंवा निधीची कमी आणि मानसिकतेची जास्त आहे.आज बुद्ध पौर्णिमा आहे.भगवान बुद्धांची एक गोष्ट प्रेरक आहे, ते नेहमी सांगत मन बदला,मत बदला,तेव्हाच बदलाला  सुरवात होईल.भगवान बुद्धांचा हा  मोठा प्रेरक संदेश आहे. आज आपण पाहतो,प्रत्येकाला वाटते, सहा महिने झाले मोबाईल जुना झाला,आता नवे मॉडेल घेऊ या, कितीही नवा मोबाईल घेतला तरी खिशात फोन क्रमांकाची डायरी असतेच. मोबाईल फोन मध्ये फोन क्रमांकाच्या यादीची व्यवस्था असतेच तरीही डायरी बाळगली जाते कारण आपण मित्रांबरोबर असतो तेव्हा हातात चांगला मोबाईल असला पाहिजेहिरव्या किंवा लाल लाईटवरून जास्त काही समजत नाही . आपण अशा स्थितीत आहोत की आपण स्वतःला बदलत नाही, एस एम एस केल्यावरही त्यानंतर आपण फोन करतो की माझा एस एम एस मिळाला का म्हणून.म्हणूनच सॉफ्टवेअरचे आव्हान नाही,हार्डवेअरचे आव्हान नाही, त्यासाठी सामूहिक मानसिकता घडवावी लागते.ही एक साखळी आहे, ती एकदा तुटली की प्रक्रिया अडकते. माझ्यासह आपल्यापैकी प्रत्येकालाच हातात वर्तमानपत्र घेऊन वाचल्या खेरीज आनंद मिळत नाही. आजची मुले वर्तमानपत्राला हातही न लावता जगभरातल्या बातम्या घेऊन येतात.हा जो बदल आहे त्याच्याशी स्वतःला जोडून घेता आले पाहिजे,त्यासाठी वातवरण निर्माण करायला लागते, तेव्हा हे घडून येते.एखाद्या व्यक्तीलाच रुची असेल तो करत राहील तर संपूर्ण व्यवस्था वेगळी  होऊन पडते. म्हणूनच सर न्यायाधीश साहेब मला सांगत आहेत की आम्ही आतापासूनच यासंदर्भात चर्चेचे काम सातत्याने करत आहोत की हे शेवटच्या स्तरापर्यंत कसे पोहोचेल. तंत्रज्ञानाची अद्‌भूत ताकत आहे. याचा वापर करणाऱ्यालाच, याचा उपयोग कसा करायचा याचा अंदाज येईल. सुरुवातीला याचे भय वाटते,आपल्याला हे जमणार नाही असे वाटते.आपल्या घरी आपण उत्तम टेलिव्हिजन आणलेला असतो, व्ही सी आर आणलेला असतो मात्र आपल्याला काही समजत नाही तेव्हा आपण नातवाला बोलावतो आणि सांगतो बघ रे जरा काय झाले आहे आणि तो नीट करून देतो. एवढी जनरेशन गॅप आहे या साऱ्या प्रकारात.

आणि म्हणूनच याच्याशी जुळवून घेणे एका पिढीसाठी  थोडे कठीण आहे.मात्र त्या पिढीने जुळवून घेतले नाही तर ते नंतरच्या पिढ्यांपर्यत झिरपणे अशक्य आहे.म्हणूनच एक सर्वात मोठे आव्हान याबरोबर जोडले गेले आहे. 

माझ्या दृष्टीने ई गव्हर्नन्स म्हणजे इझी गव्हर्नन्स अर्थात सुलभ प्रशासन,इफेक्टिव्ह गव्हर्नन्स अर्थात प्रभावी प्रशासन,इकॉनॉमिकल गव्हर्नन्स अर्थात किफायतशीर प्रशासन आणि एनव्हायरमेन्ट फ्रेंडली गव्हर्नन्स म्हणजे पर्यावरण स्नेही प्रशासन आहे. हे ई प्रशासन आपण आपल्या जीवनात कसे आणू शकू? आपण A 4 आकाराचा जो कागद वापरतो त्या एका कागदासाठी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान 10 लिटर पाणी लागते असे एका संशोधनात आढळून आले आहे.10 लिटर पाणी, याचा अर्थ असा आहे की आपण कागद विरहित कामकाजाच्या दिशेने वाटचाल करत असू तर भावी पिढ्यांसाठी आपण किती मोलाचे काम करत आहोत.मी किती जंगले वाचवेन,किती वीज वाचवेन, मी जेव्हा वीज वाचवेन तेव्हा पर्यावरणविषयक किती मुद्द्यांची दखल घेईन,थोडक्यात ही व्यवस्था एक ताकद आहे.मात्र याचे संपूर्ण स्वरूप आपण जाणत नाही तोपर्यंत आपण म्हणतो जाऊ दे, हे आपल्या आवाक्यातले काम नाही.आधीचे सर्व वाईट होते, जुने होते आणि आत्ता करतो ते आधुनिक आहे या दृष्टीने याकडे पाहण्याची गरज नाही. तर ही सोपी आणि उपयोगी गोष्ट आहे, आजच्या काळात वेळेचा प्रश्न आहे तेव्हा वेळेची बचत करण्याचे काम याद्वारे होते या व्‍यापक दृष्टीने पाहण्याची आणि लोकांना ते समजावण्याची गरज आहे. 

सर्वसाधारणपणे सरकारी विभागांची अशी धारणा असते की आम्ही जे करतो, आमचा विभाग जे करतो ते बरोबर  असते. आमच्या काही चुका होत नाहीत आमच्या कामात त्रुटी नाहीत.तिथे जो काम करतो त्याने असे मानणे स्वाभाविक आहे.दोन महिन्यांपूर्वी मी सगळ्या खात्यांना विचारले की आपल्या इथे काही समस्या, काही चुका घडत असतील तर त्या सुधारण्यासाठी काय करता येईल, प्रक्रियेत काही सुलभता आणता येईल  का ते सुचवा. काही दिवस सगळ्यांनी  सांगितले की काही नाही सगळे व्यवस्थित आहे, काही समस्या नाहीत. मी आग्रह धरल्यानंतर वेगवेगळ्या खात्यांचे सुमारे 400 मुद्दे समोर आले ज्यात काही सुधारणा करण्याची गरज होती किंवा काही मध्यस्थीची गरज होती.मी विद्यापीठांकडे हे काम सोपवले विशेषकरून 18  ते 20  -22  वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे हे काम दिले. त्याचा हॅकॆथॉन कार्यक्रम तयार झाला 36  तास बसून  निराकरण करण्यासाठी 400 मुद्दे सरकारने त्यांना दिले.शंभराहून अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या 42000 विद्यार्थ्यांनी 36  तास अथक काम केले.बऱ्याचशा मुद्द्यांवर त्यांनी तोडगा दिला हे पाहून मी आश्यर्यचकित झालो.त्यांनी  प्रक्रियेसंदर्भात तोडगा दिला या मुद्द्यासाठी हा मार्ग आहे, याच्यासाठी हा आहे असे त्यांनी सरकारला सुचवले.काही खात्यांनी या सूचनांचा स्वीकारही केला.गेल्या दोन महिन्यात हे घडले आहे. याचा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न केला तर आपल्याकडे भरपूर शक्यता आहेत.आपल्या देशातल्या तंत्रज्ञानविषयक विद्यार्थ्यांना आपण असे मुद्दे दिले आणि त्यांना सांगितले यावर काय उपाय आहे ते शोधा,कोणते सॉफ्टवेअर बनू शकते का,कोणते तंत्रज्ञान उपयोगी ठरेल ते सांगा, तर मला विश्वास आहे ते इतके सरस उपाय  देतील,की आपण सहज त्याचा  स्वीकार  करू शकू. IT + IT = IT  असे माझे मत आहे.जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा IT  म्हणजे  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात माहिती तंत्रज्ञान +  इंडियन टॅलेंट म्हणजे भारतीय प्रतिभा =इंडिया टुमारो म्हणजे  उद्याचा भारत मला अभिप्रेत आहे, एवढे सामर्थ्य यात आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून आपण आगेकूच कशी सुरु ठेवू हे पाहिले पाहिजे. 

एक काळ होता जेव्हा चलन म्हणून मातीची नाणी बनत, काळ बदलला,कधी तांब्याची नाणी आली, कधी चांदीची आली, कधी सोन्याची आली, कधी चामड्याची आली,हळू हळू कागदाचे चलन आले.आता आपण हा बदल स्वीकारला आहे, युगाला अनुसरून आता वेळ आली आहे की कागदाच्या चलनाचा काळ संपत आला आहे,आता डिजिटल चलन आपलेसे करावे लागेल. 

विशेषकरून  8नोव्हेंबरनंतर ज्या क्षेत्रात मला विशेष अनुभव नव्हता,त्या क्षेत्रात जास्त रुची घेण्याची संधी आली.विमुद्रीकरणाची   तारीख होती 8 नोव्हेंबर.मी पाहिले की नोटांची छपाई, त्यांची सुरक्षितता, त्यांची वाहतूक,या साठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे. एक एटीएम सांभाळण्यासाठी सहा सहा पोलीस लागतात. खिशात चलन किंवा नोटा  न ठेवताही आपले काम होऊ शकते असे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे.सरकारने पुढाकार घेऊन भीम सारखे अँप बनवले आहे.एकही रुपयाचा  खर्च नाही.आपण मोबाईलवर डाउनलोड करा,समोरच्याकडे ते असेल, आपले काम सुरु करा, काही समस्या नाही.देशाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल तर गरिबांसाठी, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ते उपयोगी पडतील. 

संपूर्ण आर्थिक वातावरण बदलू शकण्याची ताकत तंत्रज्ञानात आहे.आपण ते कसे उपयोगात आणायचे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा कसा वापर करायचा यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.याचे सामर्थ्य लोकांच्या खूप लवकर लक्षात आले आहे असा माझा अनुभव आहे.आपल्याला येत नसेल तर एखाद्या युवकाची मदत घेऊ शकतो, मला माझ्या कामात मदत कर, मला याची सवय नाही, तर तो मदत करतो.आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगतो, गेल्या हजार वर्षात तंत्रज्ञानाने जी भूमिका बजावली आहे,त्याच्या तिपटीनेगेल्या तीस वर्षात  तंत्रज्ञानाने भूमिका बजावली आहे.जे काम हजार वर्षात झाले नाही ते तीस वर्षात झाले आहे. सध्या जे तंत्रज्ञान आहे ते आणखी काही काळाने बाद ठरू शकते इतक्या वेगाने तंत्रज्ञान बदलत आहे.बऱ्याच काळानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता वर्चस्व गाजवेल,नोकऱ्या राहणार की नाही यावर चर्चा होतील,चालक रहित गाड्या येतील,कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या गाड्या येणार आहेत.चालकांचे काय होईल? कृत्रिम बुद्धिमत्ता  आल्यावर रोजगार निर्मितीच्या शक्यता आहेत का? या क्षेत्रातल्या तज्ञांनुसार रोजगार निर्मितीच्या शक्यता खूप वाढणार आहेत.संपूर्ण जग एका नव्या विचाराच्या दिशेने  जाणार आहे.त्यासाठी नवी पिढी तयार होणार आहे.जग किती वेगाने बदलत आहे, तंत्रज्ञान मानवाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान घेत आहे, आपण त्याबरोबर थोडे जुळवून घेतले नाही तर अंतर इतके वाढेल की आपण त्यात विसंगत ठरू, आपल्याला कोणी विचारणार नाही. 

अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या देशाने मोठे नाव कमावले आहे, प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. आपण मंगळावर यान नेले. तिथे कोणीही पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरले नाही, तिथे भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी  ठरला,आणि खर्च किती आला असेल ? आज आपण टॅक्सी, भाड्याने घेतली तर एक किलोमीटरला 10  किंवा 11 रुपये पडतात धरू या, आपण मंगळवार  7रुपयात एक किलोमीटर गेलो.जगात हॉलीवूडच्या चित्रपट निर्मितीसाठी जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात हिंदुस्थानने मंगळ मोहीम यशस्वी केली.आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांची ही कमाल आहे, आपल्या शास्त्रज्ञाचे हे सामर्थ्य आहे.अंतराळ तंत्रज्ञात एवढी मोठी झेप घेणारा भारत व्यावहारिक विज्ञानात, विज्ञानाचा  उपयोग करण्यात खूप मागे पडला आहे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. सगळ्या सहसचिवांची मी खातेनिहाय कार्यशाळा घेतली.अनेक   दिवस कार्य शाळा घेतली. आज आपण  अशा पद्धतीने रस्ते तयार करतो, अंतराळ तंत्रज्ञानाचा आपण उपयोग केला तर आपण कमीत कमी वळणे ठेवून सरळ रस्ता बनवू शकतो, आपण त्याची रचना आखू शकतो, सर्व काही करू शकतो.मला आदिवासीना जमिनीचा हक्क द्यायचा  होता. मी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग केला.आता काही आणखी दाखल्याची गरज नव्हती,अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी थेट सांगू शकतो की ही वनजमीन आहे, याचा शेतीसाठी वापर केला जात असे, 15  वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून मी ठरवू शकतो की त्याचा हक्क असेल तर त्याला ती जमीन देऊ शकतो. 

सध्या न्याययंत्रणेत विशेषतः गुन्हेगारीविषयक खटल्यात, तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे, अचूक न्यायाच्या शक्यता वाढल्या आहेत.मोबाईल फोन पुरावा ठेवतो आणि आपल्याला पुरावा म्हणून सुविधा उपलब्ध होते.न्यायवैद्यक विज्ञानांची  मोठी भूमिका आहे. अपघाताच्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पाहून निकाल देणे सुलभ होते.तात्पर्य असे आहे की न्यायालयीन यंत्रणा आणखी सक्षम   आणि सुलभ करण्यात तंत्रज्ञान न्यायवैद्यक विज्ञान मोठी भूमिका बजावू शकते.आपण जितक्या लवकर या नव्या बाबी आत्मसात करू तितके आपण अचूक निर्णय देऊ.क्रिकेटमध्ये पूर्वी पंच निर्णय ठरवत असत आता थर्ड अंपायर निर्णय देतो की चेंडू नो बॉल होता का, खेळाडूने झेल घेतला आहे की नाही,निर्णय झाल्यावर लाईट दर्शवून निर्णय जाहीर केला जातो.आता कोणी म्हणेल की पंचाची नोकरी गेली, नोकरी गेली नाही तर क्षमता वाढली.म्हणूनच आपण जेवढ्या सुलभपणे तंत्रज्ञान आत्मसात करू त्याचा मोठा फायदा होणार आहे असे मी मानतो.

आता रविशंकरजीनी  जनहितार्थाचा उल्लेख केला.आपल्या देशाची ही मानसिकता आहे, या देशाचे नागरिक असे आहेत.मी एक उदाहरण देऊ इच्छितो,ते देणे जास्त उचित आहे म्हणून देत आहे.मला क्षमा करा. 2014  मध्ये ज्या निवडणूक झाल्या तेव्हा माझ्या पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर केले 

काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत होता त्या निवडणुकीच्या आधीआपल्याला आठवत असेल त्या वेळी दिल्लीत मोठी बैठक झाली.संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, आता निवडणूक आल्या आहेत आता देशासाठी काय  जाहीर करणार याकडे.त्यांनी सांगितले की 9 गॅस सिलेंडर ऐवजी 12 सिलेंडर देण्यात येणार. 2014  ची निवडणूक एकीकडे,9 आणि 12 सिलेंडर एकीकडे  आणि एकीकडे वेगळी ती व्यक्ती. सत्तेवर आल्यानंतर मी देशवासियांना लाल किल्ल्यावरून एक छोटे आवाहन केले.आपल्याला परवडत असेल तर अनुदान सोडून देण्याचे आवाहन केले.मी एवढेच सांगितले आणि मी मोठ्या अभिमानाने सांगतो की देशातल्या एक कोटी 20  लाख परिवारांनी हे अनुदान सोडून दिले.या सर्वांची ताकद काय आहे याची दखलच घेण्यात आली नव्हती. 

मी डॉक्टरांना आवाहन केले की आपल्याकडे काम खूप असेल, रुग्ण खूप असतील, एका कामात मला मदत कराल का? प्रत्येक महिन्याच्या  9 तारखेला गरीब गर्भवती महिलेला मोफत सेवा पुरवावी. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, देशातल्या हजारो प्रसूती तज्ज्ञांनी आपल्या रुग्णालयाबाहेर फलक लावले की नऊ तारखेला कोणतेही शुल्क न घेता गरीब गर्भवती महिलेला वैद्यकीय सेवा पुरवली जाईल. 

गुजरातमध्ये मोठा भूकंप आला त्यावेळेला मी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आवाहन केले की सहा महिन्याचा वेळ द्या. मोठया संख्येने हे विद्यार्थी आले आणि माझ्यासमवेत काम करण्यासाठी उभे राहिले.आज मी देशातल्या वकील मित्रांना आवाहन करतो की हे जनकल्याणासाठी आम्ही अँप तयार केले आहे त्यामध्ये आपली नोंदणी करा,त्याद्वारे  एखाद्या गरिबाला मदत हवी असेल तर कायदेविषयक  मोफत सेवा द्यायला पुढे या. संपूर्ण देशात  गरिबांना कायदेविषयक मोफत मदत देण्यासाठी एक वातावरण तयार करायला आपण पुढाकार घेऊ.ही तंत्रज्ञानाची कमाल आहे की  जनकल्याणार्थ प्रो बोनो द्वारे ही व्यवस्था उभी करण्यात येत आहे.तंत्रज्ञानाने आपण त्यात रजिस्टर करू शकतो, गरजूही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इथे पोहोचू शकतो किंवा छोट्या मोठ्या संस्थांच्या माध्यमातून येऊ शकतो. माझ्या देशातली गरीबविधवा शिक्षिका रांगेत उभी राहून गॅस सिलेंडरवरचे अनुदान सोडू शकते, माझ्या देशातले स्त्री रोग तज्ञ्  नऊ तारखेला गरीब गर्भवती महिलेची सेवा करायला तत्पर असतील, माझ्या देशाचा युवक, आपत्तीकाळात आपले अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावत असेल, माझ्या देशातले माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, त्यांना सांगितल्यानंतर 36  तास खाण्यापिण्याची तमा न बाळगता   देशातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 42  हजार युवक 36  तास  400  समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करत असतील तर मला विश्वास आहे की माझे वकील मित्रही गरिबांच्या मदतीसाठी या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे येतील, आणि देशाचे भविष्य घडवण्यासाठी मदत करतील. 

या अपेक्षेसह आपण सुरु केलेल्या या नव्या कार्यासाठी , खानविलकरजींना  अनेक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, सरन्यायाधीशांचे अभिनंदन करतो.डिजिटल इंडिया च्या दिशेने, न्यायिक व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर आपल्यासाठी खूप मोलाचा ठरेल.खूप- खूप धन्यवाद. 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.