आपणा सर्वांशी बोलल्या नंतर कळते की आपल्या देशाच्या खेळणी उद्योगामध्ये किती मोठे सामर्थ्य दडले आहे. ही ताकद वाढवणे, या उद्योगाची छाप निर्माण करणे हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक मोठा भाग आहे. देशाच्या पहिल्या टॉय फेअरची सुरवात करणाऱ्या कार्यक्रमाचा आपण एक भाग आहोत ही आपणा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. टॉय फेअर या कार्यक्रमात सहभागी होत असलेले मंत्री मंडळातले माझे सहकारी, खेळणी उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी, कारागीर बंधू- भगिनी, पालक, शिक्षक आणि प्रिय बालक वर्ग,

हे पहिले टॉय फेअर अर्थात खेळणी उत्सव म्हणजे केवळ एक व्यापारी किंवा आर्थिक कार्यक्रम नव्हे. देशाची शतकानुशतकापासूनची क्रीडा संस्कृती मजबूत करणारा हा एक दुवा आहे. या कार्यक्रमाच्या प्रदर्शनात कारागीर आणि शाळांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत 30 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश यामधून 1,000 पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. खेळण्यांची आकृती रचना,नवोन्मेश, तंत्रज्ञानापासून ते विपणन, पॅकेजींग पर्यंत चर्चा आणि संवादाचा हा मंच भाग ठरणार आहे इथे आपण आपले अनुभवही परस्परांना सांगू शकाल. टॉय फेअर 2021 मध्ये भारतातला ऑनलाइन गेमिंग उद्योग आणि ई-स्पोर्ट उद्योग यांच्या परीसंस्थेबद्दल जाणण्याचीही संधी मिळणार आहे. यामध्ये मुलांसाठीच्या उपक्रमांची रेलचेल आहे हे पाहून मला आनंद वाटला. या टॉय फेअरच्या आयोजनासाठी काम करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

मित्रहो,

खेळण्यांशी, भारताचे नाते तितकेच जुने आहे जितका या भूमीचा इतिहास प्राचीन आहे. सिंधू संस्कृती,मोहंजोदडो आणि हडप्पा कालखंडातल्या खेळण्यांवर तर संपूर्ण जगाने संशोधन केले आहे. प्राचीन काळात प्रवासी भारतात येत तेव्हा ते भारतातले खेळ शिकतही असत आणि आपल्या बरोबर ते नेतही असत. आज जगात लोकप्रिय असणारा बुद्धिबळ हा खेळ आधी ‘चतुरंग किंवा चादुरंगा’ या रूपाने भारतात खेळला जात असे.आधुनिक लूडो तेव्हा ‘पच्चीसी’ म्हणून खेळला जात असे. आपल्या धर्म ग्रंथात पाहिले असता बाल रामासाठी वेगवेगळया खेळण्यांची वर्णने आढळून येतात.गोकुळात गोपाळ कृष्ण घराबाहेर आपल्या सवंगड्यासमवेत कंदुक म्हणजे चेंडूने खेळायला जात असत.आपल्या प्राचीन मंदिरांमध्येही खेळ आणि खेळणी यांची शिल्पे कोरलेली आहेत.विशेषकरून तामिळनाडूमध्ये चेन्नई इथली मंदिरे आपण पाहाल तर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील की मंदिरात, वेगवेगळे खेळ,वेगवेगळी खेळणी तिथल्या भिंतीवर दिसून येतात.

मित्रहो,

कोणत्याही संस्कृतीमधे, खेळ आणि खेळणी ही श्रद्धा केंद्राचा भाग बनतात याचा अर्थ त्या समाजाला खेळांच्या विज्ञानाचे सखोल ज्ञान होते. आपल्याकडे अशी खेळणी तयार केली जात जी मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान देत, त्यांची जिज्ञासा विकसित करत. आजही आधुनिक खेळण्यांच्या तुलनेत, भारतीय खेळणी सरळसोपी आणि स्वस्तही असतात त्याचबरोबर सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीशी जोडलेलीही असतात.

मित्रहो,

पुनर्वापर आणि रिसायकलिंग,भारतीय संस्कृतीचा भाग राहिले आहेत त्याची प्रचीती आपल्या खेळण्यांमध्येही दिसते. बरीचशी भारतीय खेळणी नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक वस्तूंपासून तयार केली जातात, त्यासाठी वापरण्यात येणारे रंगही नैसर्गिक आणि सुरक्षित असतात. आताच वाराणसीतल्या लोकांशी संवाद साधला. वाराणसी मधली लाकडाची खेळणी आणि बाहुल्या पहा, राजस्थानमधली मातीची खेळणी पहा, आंध्रप्रदेशमधली इटिकोप्पका बोम्मलू आणि बुधनीची लाकडी खेळणी आहेत.कर्नाटक मध्ये चन्नपटनाची खेळणी आता आपण पाहत होतो, तेलंगणच्या निर्मल इथली खेळणी, चित्रकूटची लाकडी खेळणी, धुबरी- आसामची टेराकोटाची खेळणी, यामध्ये किती वैविध्य आहे, किती वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. मात्र या सर्वात एक समानता आहे ती म्हणजे ही सर्व खेळणी पर्यावरण स्नेही आणि कल्पक आहेत. ही खेळणी देशाच्या युवकाला आपल्या इतिहास आणि संस्कृतीशीही जोडतात आणि सामाजिक – मानसिक विकासाला सहाय्यक ठरतात. म्हणूनच आज मी देशातल्या खेळणी उत्पादकांना आवाहन करतो की आपण अशी खेळणी तयार करा जी पर्यावरण आणि जिज्ञासा अशा दोन्हींसाठी उत्तम असतील. खेळण्यांमध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का ? ज्या गोष्टी पुन्हा उपयोगात आणता येतील अशा गोष्टींचा वापर करू शकतो का ? मित्रहो, आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय दृष्टीकोन आणि भारतीय विचार याबाबत बोलले जाते. जगाला देण्यासाठी भारताकडे एक आगळा दृष्टीकोनही आहे. आपली परंपरा,पेहेराव,आहार-विहार, प्रत्येक ठिकाणी हे वैविध्य एक ताकद म्हणून दिसून येते. अशाच प्रकारे भारतीय खेळणी उद्योगही या आगळ्या भारतीय दृष्टीकोनाला प्रोत्साहन देऊ शकते. आपल्याकडे खेळणी ही पिढ्यानपिढ्या राखली आणि जपली जातात.आजीच्या काळातली खेळणी कुटुंबातल्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीलाही दिली जातात. सणासुदीला लोक आपल्या कुटुंबातली खेळणी बाहेर काढून पारंपारिक संग्रह परस्परांना दाखवत असत. आपली खेळणी भारतीय सौदर्याने नटलेली असतील तर भारतीय विचार आणि भारतीयत्वाची भावना मुलांमध्ये अधिक दृढ होईल, या मातीशी त्याची नाळ जोडलेली राहील.

प्रिय बालक आणि मित्रहो,

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या कवितेत म्हटले होते, ‘ मी जेव्हा तुला रंगीत खेळणी आणतो, माझ्या मुला, मला समजते की ढग, पाणी यावर रंगांचा खेळ का चालतो आणि फुले रंगछटेमध्ये का रंगवली जातात,जेव्हा मी तुला रंगीत खेळणी आणतो, माझ्या मुला’. एक खेळणे मुलाला आनंदाच्या रम्य जगात नेते. खेळण्याचा एक-एक रंग मुलाच्या भावविश्वात अनेक रंगांची उधळण करतो. आज इथली खेळणी पाहून मुलांच्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या आहेत आपल्या लहानपणच्या त्याच भावना आपण आपल्या स्मृतीत जपून ठेवल्या आहेत. कागदाची नाव, भोवरा, गोट्या, पतंग, शिटी, झोपाळे, बाहुला-बाहुली अशी कितीतरी खेळणी आपल्या बालपणाचा भाग राहिली आहेत.विज्ञानाचे कितीतरी सिद्धांत, कितीतरी गोष्टी,चक्राकार गती, दाब,घर्षण या गोष्टी आपण खेळण्यांशी खेळता खेळता आपोआप शिकतो. भारतीय खेळण्यांचे हे वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच मनोविज्ञानही असते. भोवऱ्याचे उदाहरण घेतले तर त्याच्याशी खेळता खेळता त्यांना गुरुत्वाकर्षण आणि संतुलन याचा धडा मिळतो. गलोलशी खेळताना मुलांना कळत-नकळत गतिमान उर्जेची प्राथमिक माहिती मिळत असते.कोडे सोडवण्यासाठी चालना देणारी खेळणी नियोजन पूर्वक विचार आणि प्रश्न सोडवण्याची विचार शक्ती विकसित करतात.अशाच प्रकारे तान्ह्या बाळालाही फिरणारा खेळणा पाहून चक्राकार हालचाल समजू लागते. लागते. पुढे जाऊन त्यांना वर्गात, पुस्तकात याच गोष्टी शिकवल्या जातात तेव्हा त्याचा संबंध त्यांना खेळाशी जोडता येतो. प्रात्यक्षिक पैलू त्यांना समजतो.केवळ पुस्तकी ज्ञानातून त्यांना हे आकलन होऊ शकत नाही.

मित्रहो,

आपणा सर्वांनी हे पाहिले असेल की रचनात्मक खेळणी मुलांची समज कशी विकसित करतात, त्यांच्या कल्पनेला कसे पंख देतात.आपल्या खेळण्यांच्या सभोवती मुले काल्पनिक जग निर्माण करतात. मुलांना तुम्ही खेळण्यातली भांडी द्या, ती अशी वागतील जणू काही संपूर्ण स्वयंपाकघर त्यांना सांभाळायचे आहे आणि अख्खे कुटुंब आज त्यांच्याकडेच जेवणार आहे. प्राणी असणारी खेळणी त्यांना दिलीत तर मनातल्या मनात ते एक जंगल निर्माण करतात, त्यांना जो योग्य वाटेल त्याचा आवाज काढू लागतात.त्यांना वाटते हा सिंह आहे तर तो अशी गर्जना करेल. त्यांना स्टेथोस्कोप दिला तर थोड्याच वेळात ते डॉक्टर बनतील, फॅमिली डॉक्टर बनतील आणि संपूर्ण कुटुंबाच्या तब्बेतीची तपासणी करतील.असेच केवळ एक बॉल आला की ते संपूर्ण घराचे फुटबॉल मैदान करतील. रॉकेटचे खेळणे मिळाले की अंतराळ मिशन हाती घेतल्याप्रमाणे वागतील.त्यांच्या स्वप्नाच्या भरारीला सीमाच नसतात.त्यांना केवळ एक खेळणे हवे असते जे त्यांची उत्सुकता आणि सृजनशीलता यांना चालना देतील. उत्तम खेळणी ही कालातीत असतात. आपण जेव्हा मुलांबरोबर खेळू लागतो तेव्हा त्या खेळण्याच्या बरोबर आपण आपल्या बालपणात विहार करू लागतो. म्हणूनच मी सगळ्या माता- पित्यांना आवाहन करतो की आपण आपल्या मुलांच्या अभ्यासात जसे सहभागी होता त्याप्रमाणेच त्यांच्या खेळांमध्येही सहभागी व्हा.आपले घर काम, कार्यालयाचे काम सोडून तासनतास मुलांशी खेळतच राहा असे माझे म्हणणे नाही. मात्र आपण त्यांच्या समवेत खेळांमध्ये सहभागी तर होऊ शकता. आजकाल कुटुंबामध्ये खेळण्याची वेळ आता मोबाईल, दूरचित्रवाणी यांच्या पडद्याने घेतली आहे. मात्र आपल्याला खेळ आणि खेळणी यांची भूमिका जाणून घेतली पाहिजे. खेळण्यामागची वैज्ञानिक बैठक, मुलांच्या विकासात, त्यांच्या शिक्षणातली त्यांची भूमिका पालकांनीही जाणून घेतली पाहिजे आणि शिक्षकांनीही शाळेत त्यावर प्रयोग केले पाहिजेत. या दिशेने आता देश प्रभावी पावले उचलत आहे, व्यवस्थेत आवश्यक ते परिवर्तन घडवत आहे. आपल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचे प्रतिबिंब दिसत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, खेळावर आधारित आणि उपक्रम आधारित शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. ही अशी शिक्षण व्यवस्था आहे जिथे कोडी आणि खेळांच्या माध्यमातून मुलांची तर्कसंगत आणि रचनात्मक विचारशक्ती वाढीला लागेल याकडे लक्ष पुरवण्यात आले आहे.

मित्रहो,

खेळण्यांच्या क्षेत्रात भारताकडे परंपराही आहे आणि तंत्रज्ञानही आहे. भारताकडे संकल्पनाही आहे आणि कौशल्यही आहे. आपण जगाला पर्यावरण स्नेही खेळण्यांकडे वळवू शकतो. आपले सॉफ्ट वेअर अभियंते कॉम्प्यूटर गेमच्या माध्यमातून भारतातल्या कथा, मुल्ये,जगापर्यंत पोहोचवू शकतात.मात्र असे असूनही 100 अब्ज डॉलरच्या जागतिक खेळणी बाजारात आपला वाटा खूपच कमी आहे. देशात, 85 % खेळणी बाहेरून येतात, परदेशातून मागवली जातात.गेल्या सात दशकात भारतीय कारागीर, भारतीय वारसा यांची जी उपेक्षा झाली त्याचा परिणाम म्हणजे भारतात बाजारपेठ ते कुटुंबापर्यंत परदेशी खेळणी आली आहेत, ती केवळ खेळणी नव्हेत तर एक विचार प्रवाह आपल्या घरात घुसला आहे. भारतीय मुलांना आपल्या देशातले वीर, आपले नायक यांच्यापेक्षा परदेशातल्या नायकांविषयी जास्त गोडी वाटते. या लोंढ्याने, बाहेरून आलेल्या पुराने आपल्या स्थानिक व्यापाराची मजबूत साखळी तोडली आहे, उध्वस्त केली आहे. कारागीर आपली कला पुढच्या पिढीला द्यायला फारसे उत्सुक नाहीत,आपली पुढची पिढी या व्यवसायात येऊ नये असा विचार करू लागले आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचे आहे. खेळ आणि खेळणी या क्षेत्रातही देशाला आत्मनिर्भर करायचे आहे. वोकल फॉर लोकल व्हायचे आहे. यासाठी आपल्याला आजच्या गरजा जाणून घ्याव्या लागतील. जागतिक बाजारपेठ, जगाचे प्राधान्य समजून घ्यावे लागेल. आपल्या खेळण्यांमध्ये मुलांसाठी आपली मुल्ये, संस्कार आणि शिक्षणही असले पाहिजे त्याच बरोबर त्यांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकानुसार असली पाहिजे. या दिशेने देशाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षी पासून खेळण्यांच्या दर्जाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आयात होणाऱ्या खेळण्यांची प्रत्येक खेपेलाही नमुना चाचणी करण्याचो परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी खेळण्यांबाबत बोलणेही सरकार आवश्यक समजत नसे. हा काही गंभीर विषय नाही असे सरकार मानत असे. मात्र देशाने आता खेळणी उद्योगाला 24 प्रमुख क्षेत्राचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय खेळणी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. यामध्ये 15 मंत्रालये आणि विभागाचा समावेश करण्यात आला आहे ज्याद्वारे हा उद्योग स्पर्धात्मक व्हावा, खेळणी क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हावा आणि भारतातली खेळणी जगभरात पोहोचावीत. या संपूर्ण अभियानात राज्यानाही समान भागीदार करत खेळणी संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या बरोबर खेळणी पर्यटनाच्या शक्यताही देश मजबूत करत आहे. भारतीय खेळांवर आधारित खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात टॉयकाथॉन-2021 चे आयोजनहि करण्यात आले होते.या टॉयकाथॉनमध्ये 12 लाखपेक्षा जास्त युवा, शिक्षक आणि तज्ञांनी नोंदणी केली होती आणि 7,000 पेक्षा जास्त नव कल्पना मांडल्याची माहिती मला देण्यात आली आहे. दशकांपासूनची उपेक्षा आणि अडचणी असूनही भारताची प्रतिभा आणि कौशल्य आजही संधीनी युक्त आहे. ज्याप्रमाणे भारताने आपल्या भूतकाळात आपली उर्जा आणि आनंद यांनी मानवतेमध्ये रंग भरले ती उर्जा आजही तितकीच सळसळती आहे. आज टॉय फेअरच्या या प्रसंगी आपण या उर्जेला आधुनिक रूप देणे, या शक्यता साकार करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. लक्षात घ्या की आज मेड इन इंडियाला मागणी आहे तर आज हॅडमेड इन इंडिया साठीही तितकीच मागणी वाढली आहे. आज लोक खेळण्याकडे केवळ एक उत्पादन म्हणून नव्हे तर त्या खेळण्याशी जोडलेल्या अनुभवाशीही समरस होऊ इच्छितात. म्हणूनच आपल्याला हॅडमेड इन इंडियालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. आपल्याला हे ध्यानात ठेवायचे आहे की आपण जेव्हा एखादे खेळणे बनवतो तेव्हा आपण एक बाल मन घडवतो, बालपणीचा अपार आनंद आणतो,त्यामध्ये स्वप्ने निर्माण करतो.हाच आनंद आणि उल्हास आपला भविष्य काळ निर्माण करणार आहे. मला आनंद आहे की देश आपली जबाबदारी आज जाणत आहे. आपले हे प्रयत्न आत्म निर्भर भारताला तीच स्फूर्ती देतील जी स्फूर्ती बालपणी एक नवी दुनिया निर्माण करत असे . याच विश्वासाने आपणा सर्वाना पुन्हा एकदा अनेक अनेक शुभेच्छा आणि जगात हिंदुस्तानच्या खेळण्यांची पताका फडकवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत, अखंड प्रयत्न करायचे आहेत.आपल्या खेळण्यांसमवेत नव नवे तंत्रज्ञान, विज्ञान आणि नव नवे विचार यांचा मेळ घालायचा आहे. हे टॉय फेअर आपल्याला या दिशेने नेण्यासाठी एक ठोस पाऊल म्हणून सिद्ध होईल याचा मला विश्वास आहे.आपणा सर्वाना पुन्हा एकदा अनेक अनेक शुभेच्छा देतो.

खूप- खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Modi blends diplomacy with India’s cultural showcase

Media Coverage

Modi blends diplomacy with India’s cultural showcase
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 नोव्हेंबर 2024
November 23, 2024

PM Modi’s Transformative Leadership Shaping India's Rising Global Stature