भारत माता की – जय
भारत माता की – जय
मी म्हणेन बाबासाहेब आंबेडकर – तुम्ही सगळे दोन वेळा म्हणा- अमर रहे, अमर रहे।
बाबासाहेब आंबेडकर – अमर रहे, अमर रहे।
बाबासाहेब आंबेडकर – अमर रहे, अमर रहे।
बाबा साहेब आंबेडकर– अमर रहे, अमर रहे।
बस्तर आऊर बीजापुर जो आराध्य देवी मां दंतेश्वरी, भैरम गढ़ चो बाबा भैरम देव, बीजापुर चो चिकटराज आउर कोदाई माता, भोपाल पट्टम छो भद्रकाली के खूबे खूब जुहार।
सियान, सजन, दादा, दीदी मन के जुहार। लेका-लेकी पढ़तो लिखतो, नोनी बाबू मन के खुबे-खुबे माया।
मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी जे.पी.नड्डा जी, छत्तीसगडचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह जी, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंद कुमार साई जी, छत्तीसगड सरकारचे अन्य मंत्रीगण आणि मोठया संख्येने इथे आलेले बिजापूर बस्तरचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,
मी इथल्या आदि देवी आणि देवतांना सादर प्रणाम करतो ज्यांनी बिजापूरच्याच नव्हे तर संपूर्ण बस्तरवासियांना निसर्गाबरोबर राहायला शिकवले आहे. मी आज बिजापूरच्या भूमीवरून अमर शहीद गैन्सी यांचे देखील स्मरण करू इच्छितो जे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांशी लढताना शहीद झाले होते. असेच नेतृत्व जवळपास शंभर वर्षांपूर्वी महानायक वीर गुन्दाधुर यांच्या रूपाने इथे अवतरले होते. गैन्सी असो किंवा गुन्दाधुर,अशा अनेक लोकनायकांच्या शौर्य गाथा तुमच्या लोकगीतांमधून प्रत्येक पिढी दर पिढी विस्तारत आहेत.
मी या महान भूमीवरील वीर सुपुत्र आणि वीर कन्यांना देखील वंदन करतो. या भूमीवर आजही शौर्य आणि पराक्रमाच्या नवीन कथा लिहिल्या जात आहेत.
मित्रांनो , स्थानिक आव्हानांचा सामना करताना इथल्या विकासासाठी प्रयत्नशील इथल्या लोकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या सुरक्षा दलाच्या अनेक जवानांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. हे जवान रस्ते बनवण्यात, मोबाईलचे टॉवर उभारण्यात, गावांमध्ये रुग्णालये बांधण्यात, शाळा बांधण्यात, छत्तीसगडच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. छत्तीसगडच्या विकासात सहभागी अशा अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.नक्षलवादी माओवादी हल्ल्यात शहीद त्या वीर जवानांसाठी स्मारक बांधण्यात आले आहे. मी त्यांना वंदन करतो, आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो, आजचा 14 एप्रिल हा दिवस देशातील सव्वाशे कोटी लोकांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. आज भारतरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची जयंती आहे. आजच्या दिवशी तुम्हा सर्वाना भेटायला येऊन आशीर्वाद घेण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी हे खूप मोठे सौभाग्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर म्हणा-
जय भीम – जय भीम
जय भीम – जय भीम
जय भीम – जय भीम
आज बस्तर आणि बिजापूरच्या आसमंतात बाबासाहेबांच्या नावाचा दुमदुमणारा आवाज आपणा सर्वाना धन्य करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या जयघोषात जी आशा जुळलेली आहे , जी आकांक्षा जुळली आहे तिलाही मी वंदन करतो.
मित्रांनो , आमच्या सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी शहरी अभियानाचा प्रारंभ छत्तीसगडच्या भूमीवरूनच केला होता. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचा शुभारंभ देखील याच छत्तीसगडच्या भूमीवरून केला होता. या योजना राष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रगतीला गती देण्याचे काम करत आहेत.
आज जेव्हा मी पुन्हा एकदा छत्तीसगडला आलो आहे, तो ‘आयुष्मान भारत योजनेचा पहिला टप्पा आणि ‘ग्राम स्वराज अभियानाचा ‘ शुभारंभ करण्यासाठी आलो आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात गरीब, दलित, पीडित, शोषित, वंचित, मागास,महिला आणि आदिवासींना सक्षम करण्यासाठी ज्या काही योजना तयार केल्या आहेत, त्या योजनांचा लाभ या घटकांपर्यंत पोहोचेल हे या अभियानातून सुनिश्चित केले जात आहे. ग्राम स्वराज अभियान संपूर्ण देशभरात आजपासून 5 मे पर्यंत राबवले जाईल.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजनांचा शुभारंभ झाला आहे त्या देखील विकासाचे धोरण बदलण्यात एक नवा विक्रम स्थापन करण्यात यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो.
बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब खूपच शिकले-सवरलेले होते, उच्च-शिक्षित होते. जगातील समृद्ध देशांमध्ये अतिशय सुखासीन आरामदायी आयुष्य ते जगू शकले असते ,मात्र त्यांनी असे केले नाही. परदेशात शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले आणि त्यांनी आपले आयुष्य मागास समाजासाठी, वंचित समुदायासाठी, दलित आणि आदिवासींना समर्पित केले. त्यांना दलितांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे होते. जे शतकानुशतके वंचित होते त्यांना एक सन्माननीय नागरिकांप्रमाणे जगण्याची संधी देण्याचा त्यांनी निर्धार केला होता. विकासाच्या शर्यतीत जे मागे राहिले आणि ज्यांना मागे सोडून देण्यात आले, अशा समुदायांमध्ये आज चेतना जागृत झाली आहे, विकासाची भूक जागी झाली आहे, हक्कांचे स्वप्न निर्माण झाले आहे. ही चेतना बाबासाहेब आंबेडकरांचीच देणगी आहे.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, एका गरीब मातेचा मुलगा, अति मागास समाजातून आलेला हा तुमचा सहकारी आज देशाचा पंतप्रधान आहे तो देखील बाबासाहेबांमुळेच. मित्रानो, माझ्या सारख्या लाखो-करोडो लोकांची स्वप्ने, त्यांच्या आशा-अपेक्षा, त्यांच्या इच्छा, जागवण्यात बाबासाहेबाचे खूप मोठे योगदान आहे.
बंधू आणि भगिनींनो, आज इथे माझ्यासमोर बहुतांश शेतकरी आहेत, शेतात काम करणारे लोक आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाणारे लोक आहेत. काही लोक स्वयंरोजगार करणारे असतील, काही विद्यार्थी देखील असू शकतील. तुम्ही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या- मोठ्या आवाजात नाही दिले तरी चालेल, मनात अवश्य विचार करा-जर कुणाच्या आयुष्यात काही चांगले होण्याची उमेद असते, काही बनण्याचा, काही मिळवण्याचा उद्देश असतो तेव्हा तो दुप्पट मेहनत करतो कि नाही करत? करतो कि नाही करत? आणि ज्याला काही करायचेच नाही, तो काय करतो, झोपून राहतो कि नाही राहत झोपून? ज्याच्या मनात एखादे स्वप्न असते तोच जागा असतो कि नसतो जागा?तोच मेहनत करतो कि नाही करत? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा .
बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्याला खात्री वाटत असेल कि यंदा चांगला पाऊस होईल आणि पावसाची सुरवात चांगली झाली तर मला सांगा, शेतकरी अधिक जोमाने काम करेल कि नाही करणार? पाऊस येत आहे, ढग दाटून आले, तो मेहनत करायला सुरुवात करतो कि नाही करत? कारण त्या ढगांबरोबर त्याची स्वप्ने देखील जुळलेली असतात.
बंधू आणि भगिनींनो, आज बाबासाहेबांच्या प्रेरणेने मी बिजापूरच्या लोकांमध्ये, इथल्या प्रशासनामध्ये हाच एक नवा विश्वास जागवण्यासाठी आलो आहे, एक नवी इच्छा जागवायला आलो आहे. मी हे सांगायला आलो आहे की केंद्रातील सरकार तुमच्या आशा, आकांक्षा, तुमच्या इच्छा , महत्वाकांक्षांच्या मागे ठाम उभे आहे.
आज मी बिजापूर जिल्ह्याचीच का निवड केली याचे देखील एक कारण आहे. मला नीट आठवत नाही, मात्र तुम्हाला एक जुना किस्सा सांगतो. तसा मी अभ्यासात खूप हुशार नव्हतो. जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा असाच साधारण विद्यार्थी होतो. मात्र काही मुले माझ्यापेक्षाही मागे होती. जेव्हा शाळा सुटायची, शाळॆची वेळ संपायची, तेव्हा अनेकदा आमचे जे गुरुजी होते ते त्या मुलांना थांबायला सांगायचे. त्यांना अतिशय धीराने पुन्हा शिकवायचे , एकेक मुलाकडे लक्ष द्यायचे. त्यांना विश्वास द्यायचे कि तू अभ्यासात कच्चा नाहीस. मी पाहिले होते की अशी मुले, जर गुरुजीनीं त्याच्या खांद्यावर हात ठेवला , थोडी मदत केली, थोडी हिंमत दिली , तर अशी मुले काही दिवसात अन्य विद्यार्थ्यांशी बरोबरी साधतात तर काही त्यांना मागे टाकून पुढे जाऊन क्रमांक पटकवायचे .
मला वाटते की इथे बहुतांश लोक असे असतील ज्यांनी आपल्या आयुष्यात असं होताना पाहिले असेल. निरनिराळ्या क्षेत्रात तुम्ही पाहिले असेल की जे अशक्त आहेत, मागे आहेत, जर त्यांना थोडेसे जरी प्रोत्साहन मिळाले तरी इतरांच्या पुढे जाण्याची ताकद त्यांच्यात असते आणि अतिशय वेगाने पुढे निघूनही जातात. आज मी बिजापूरला येण्याचे हेच कारण आहे की त्यांच्यावर देखील मागास जिल्ह्याचा जो शिक्का लावण्यात आला आहे आणि देशात बिजापूर असा एकमेव जिल्हा नाही . शंभरहून अधिक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षातही हे जिल्हे अजूनही मागासलेले आहेत. यात त्यांची काहीच चूक नाही. बाबासाहेबांच्या संविधानाने एवढ्या संधी दिल्या, पुढे जाण्यासाठी प्रेरित केले मात्र तरीही शंभरहून अधिक जिल्हे विकासाच्या स्पर्धेत मागे का राहिले?
बंधू आणि भगिनींनो, आपली मुलेही तंदुरुस्त असावीत हा अधिकार या जिल्ह्यात राहणाऱ्या मातांना नव्हता का ? त्यांच्यात रक्ताची कमतरता नसावी? त्यांचीही उंची चांगली वाढावी? त्यांनाही विकासात भागीदार बनवले जावे अशी आशा या जिल्ह्यांमधील लोकांनी ठेवली नव्हती का? रुग्णालये, शाळा, रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वातंत्र्यानंतरही देशात बरेच काही घडूनही जर काही उणीव राहून गेली ज्यामुळे देशातील शंभरहून अधिक जिल्हे आजही सामान्य स्तराच्या देखील मागे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे जे मागास जिल्हे म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. तुमच्या बिजापूर जिल्ह्याकडे काय नाही? सगळे काही आहे.
बंधू आणि भगिनींनो, मी आज बिजापूरला यासाठी आलो आहे जेणेकरून तुम्हाला सांगू शकेन , तुम्हाला विश्वास देऊ शकेन की तुम्ही जे मागे राहिला होतात, ज्यांच्या नावाबरोबर मागास जिल्ह्याचा शिक्का लावण्यात आला आहे , तिथे आता नव्याने, नव्या विचारासह , मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे. आणि मला बिजापूरचे आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचे आहे कि मी जानेवारी महिन्यात शंभर-सव्वाशे जिल्ह्यांच्या लोकांना बोलवले होते आणि त्यांना मी सांगितले होते कि आज जिथे आहेत, पुढील तीन महिन्यात जे जलद गतीने पुढे जातील त्या जिल्ह्यात मी 14 एप्रिलला जाईन. मी बिजापूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी तीन महिन्यात हे जे शंभरहून अधिक मागे होते, त्यांना सुधारून पहिल्या क्रमांकाचे बनवले. आणि एक प्रकारे त्यांनी जे करून दाखवले आहे त्याला मी सलाम करायला इथे आलो आहे, त्याला वंदन करायला मी आलो आहे आणि हे पाहून एक नवीन प्रेरणा देखील घ्यायला आलों आहे जेणेकरून देशातील त्या 115 जिल्ह्यांना समजेल कि जर बिजापूर शंभर दिवसात एवढी प्रगती करू शकतो तर 115 जिल्हे देखील येत्या काही महिन्यात अतिशय वेगाने प्रगती करू शकतात.
मी या 115 विकासकांक्षी जिल्ह्यांना केवळ अभिलाषी नाही, केवळ आकांक्षी नाही, विकासकांक्षी जिल्हे म्हणू इच्छितो. आता हे जिल्हे आश्रित नाही, मागास राहणार नाहीत. ते पराक्रम आणि परिवर्तनाचे नवे मॉडेल म्हणून उदयाला येतील या विश्वासासह आम्ही पुढे जात आहोत.
बंधू आणि भगिनींनो, तुम्ही विचार करत असाल की मी ही गोष्ट एवढ्या दाव्यानिशी कशी काय करू शकतो? इथे येण्यापूर्वी आमच्या सरकारने बिजापूरसह 100 हुन अधिक जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे आणि काही कामे सुरु करून त्याचे परिणाम जाणून घेतले आहेत. तीन महिन्यांचा आमचा अनुभव सांगतो की जर जिल्ह्यातील सर्व लोक , जिल्ह्यातील प्रशासन, जिल्ह्यातील लोक-प्रतिनिधी, प्रत्येक गल्ली-परिसर-गाव जर या अभियानात एकत्र आले , एखाद्या लोकचळवळीप्रमाणे सर्वानी यात योगदान दिले तर ते काम होऊ शकते जे गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतरही झालेले नाही, ते आज होऊ शकते.
मित्रांनो, जुन्या मार्गावरून चालतांना तुम्ही कधीही नव्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही. जुन्या पद्धतीमुळे जग बदलू शकत नाही. काळानुरूप पद्धती देखील बदलाव्या लागतात. जर नवीन उद्दिष्टे साध्य करायची असतील तर नवीन पद्धतीने काम करावेच लागते. बिजापूरसह जे देशातील 115 मागास जिल्हे आहेत, त्यांच्यासाठी देखील आमचे सरकार नव्या दृष्टिकोनासह काम करत आहे. हा दृष्टिकोन काय आहे, याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो. इथे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव बसले आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने त्यांना हे समजेल. आपले शेतकरी बांधव धान्याची शेती करतात, मक्याची शेती करतात, डाळी उगवतात. मला या शेतकरी बांधवाना विचारायचे आहे की तुम्ही या सर्व पिकांना एकसमान पाणी देता का? धान्यांसाठी जेवढे पाणी देता तेवढेच मक्यालाही देता का? तेवढेच भाज्यांनाही देता का? तेवढंच तुम्ही भातालाही देता का? तुमचे उत्तर असेल, नाही देत. हो ना? भातासाठी जास्त देता, अमुक पिकासाठी इतके देता, तमुक पिकासाठी इतके देता, वेगवेगळ्या पिकांसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काम करता हो कि नाही ? सामान्य शेतकरी देखील असेच करतो. त्याचप्रमाणे जेव्हा वेगवेगळ्या गरजा असतात, तेव्हा त्यांच्या अडचणी, त्यांच्या त्रुटी, त्यांची आव्हाने देखील निरनिराळी असतात. हेच लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या परीने पुढली रणनीती आखावी लागेल, विकासाची आपली स्वतःची योजना तयार करावी लागेल. स्थानिक साधनसंपत्तीनुसार करावे लागेल.
तुमच्याशी चर्चा करून इथले प्रशासन तुमच्या प्रत्येक गरजांनुसार, त्या कशा पूर्ण केल्या जातील याबाबत योजना तयार करेल. अनेक छोट्या-छोट्या उपाययोजना तुम्हाला विकासाच्या मोठ्या स्पर्धेत अव्वल क्रमांकावर घेऊन जातील. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र आणि राज्याचे पथक, गावे, तालुक्यातील लोक खांद्याला खांदा भिडवून चालतील.
मित्रांनो , आज इथे या मंचावरून देशात सामाजिक न्याय सुनिश्चित करणाऱ्या , देशातील सामाजिक असमतोल दूर करणाऱ्या एका खूप मोठ्या योजनेचा शुभारंभ झाला आहे. ‘आयुष्मान भारत’ या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा आज 14 एप्रिल, आंबेडकरांच्या जयंतीदिनी या भूमीवर, छत्तीसगडच्या भूमीवर, बिजापूर जिल्ह्याच्या भूमीवर शुभारंभ केला जात आहे. पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला आहे. आणि पहिल्या टप्प्यात देशातील प्राथमिक आरोग्याशी निगडित विषयांमध्ये मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. या अंतर्गत देशातील प्रत्येक मोठ्या पंचायतीमध्ये म्हणजे सुमारे दीड लाख ठिकाणी , भारतातील दीड लाख गावांमध्ये उप-केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य आणि कल्याण केंद्रे म्हणून विकसित केले जाईल. आणि मी तर युवकांना सांगेन कि mygov.in वर जा आणि ही जी आरोग्य आणि कल्याण केंद्रे आहेत, त्यांचा आपल्या सामान्य भाषेत कसा शब्दप्रयोग करायला हवा, याबाबत मला सूचना करा, मी नक्की त्याचा अभ्यास करेन.आज आता ते आरोग्य आणि कल्याण केंद्र म्हणून लोकप्रिय झाले आहे. मात्र पुढे जाऊन गावातील गरीब आणि निरक्षर व्यक्ती देखील बोलू शकेल, ओळखू शकेल, असा शब्द मला या योजनेला द्यायचा आहे, आणि तो देखील तुमच्या सूचनांनुसार द्यायचा आहे. गावातील लोकांच्या सूचनांमधून द्यायचा आहे.
2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तुम्ही कल्पना करू शकता केवढे मोठे काम अंगावर घेतले आहे. म्हणजे देश जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असेल , तोपर्यंत देशभरात आरोग्य आणि कल्याण केंद्राचे एक जाळे पसरलेले असेल. यात देखील त्या 115 जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाईल जे आता विकासाच्या शर्यतीत इतरांपेक्षा थोडे मागे आहेत.
बंधू आणि भगिनींनो, या कल्याण केंद्रांची आवश्यकता का आहे? हे मला तुम्हाला सविस्तरपणे सांगायचे आहे. जेव्हा आपण आरोग्य आणि कल्याण केंद्राबाबत बोलतो तेव्हा आपला प्रयत्न केवळ आजारावर उपचार करणे नाही तर आजार होण्यापासून रोखण्याचा देखील आमचा संकल्प आहे. आपल्या देशात रक्तदाब, मधुमेह याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. हृदयरोगाच्या आजाराशी संबंधित समस्या, मधुमेह, श्वास घ्यायला होणारा त्रास , कर्करोग हे असे आजार आहेत, ज्यामुळे 60 टक्के लोकांचा दुःखद मृत्यू होतो. मात्र हे असे आजार आहेत ज्यांच्यावर वेळीच उपचार केले तर ते आणखी बळावण्यापासून रोखता येऊ शकते.
आता आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्येही ही नवीन व्यवस्था उभारण्यात येत आहे. या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या देखील मोफत करण्याचा भरपूर प्रयत्न केला जाईल.
मित्रांनो, योग्य वेळी होणारी तपासणी कशी फायदेशीर ठरते याचेही उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा, 35 वर्षांचा एखाद्या युवकाने तपासणी करून घेतली आणि त्याला रक्तदाबाचा आजार असल्याचे लक्षात आले तर भविष्यात होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपासून त्याचा आधीच बचाव होऊ शकेल. जर आधीच तपासणी करून घेतली, योग्य वेळी औषधे घेतली, योग, व्यायाम किंवा अन्य काही पथ्ये पाळली तर मोठा खर्च आणि धोका दोन्हीपासून वाचता येऊ शकते.
मी आज जेव्हा कल्याण केंद्राचे उद्घाटन करत होतो, तेव्हा 30-35 वर्षांची एक भगिनी मला तिथे भेटली. तिला माहित नव्हते तिला मधुमेह आहे. डॉक्टरांना येऊन सांगितले कि मला खूप पाणी पिण्याची तलफ येते , मला चक्कर येते , मला थकवा जाणवतो. जेव्हा डॉक्टरांनी तपासले तेव्हा कळले कि तिचा मधुमेह खूप वाईट अवस्थेत आहे. 30-32 वर्षांची महिला, तिला माहीतच नव्हते की तिला काय आजार आहे. मात्र आज कल्याण केंद्रात आली तेव्हा तिला कळले आणि आता तिला समजेल काय खायचे , कसे खायचे, कसे राहायचे. ती त्यावर नियंत्रण मिळवून अन्य आजारांपासून स्वतःला वाचवू शकेल. उपचारांपेक्षा महत्वावर भर देणारा हा विचार आरोग्य आणि कल्याण केंद्रे गावागावांत पोहचवणार आहेत.
ही आरोग्य आणि कल्याण केंद्रे एक प्रकारे गरीबांचे फॅमिली डॉक्टर म्हणून काम करतील. जुन्या काळी मध्यमवर्गीय आणि मोठ्या कुटुंबांमध्ये फॅमिली डॉक्टर असायचे. आता ही कल्याण केंद्रे अशीच असतील, जशी तुमच्या कुटुंबाचाच एक भाग बनतील, तुंमच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली जातील.
मित्रांनो , आयुष्मान भारताचा विचार केवळ सेवेपर्यंत मर्यादित नाही, तर लोकसहभागाचे एक आव्हान देखील आहे जेणेकरून आपण निरोगी, समर्थ आणि समाधानी नवीन भारताची निर्मिती करू शकू. आज तर आयुष्मान भारताच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. आता पुढचे उद्दिष्ट सुमारे ५० कोटी गरीब जनतेला गंभीर आजारा दरम्यान ५ लाख रुपयापर्यंत , एका वर्षात पाच लाख रुपये आर्थिक सुरक्षा पुरवण्याचे आहे. यावर अतिशय जलद गतीने काम सुरु आहे.
बंधू आणि भगिनींनो, जेव्हा प्रेरणेबरोबरच संसाधनांचा योग्य वापर केला जातो तेव्हाच परिवर्तन घडू शकते. आज इथे मंचावर आम्ही विकासकांक्षी बिजापूरबरोबरच विकासकांक्षी छत्तीसगडचाही उल्लेख केला आहे. अटलजींनी दाखवलेल्या मार्गावर चालत गेल्या 14 वर्षात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री रमण सिंग यांनी विकासाशी संबंधित योजना कठोर परिश्रमासह, तुम्हा लोकांच्या सहकार्याने , तुम्हा लोकांच्या कल्याणासाठी पुढे नेट आहेत. चार वर्षांपूर्वी केंद्रात रालोआचे सरकार आल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नांना , छत्तीसगडच्या विकास संकल्पाला अधिक बळ मिळाले आहे. इथे शासन-प्रशासन जनतेच्या जवळ पोहोचले आहे. आदिवासी भागांचा वेगाने विकास करण्यासाठी आणि अनेक जनहिताच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून छत्तीसगड सरकारने नवीन विक्रम रचला आहे. बस्तर आणि सरगुजामध्ये विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, सहीधर जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संस्था उभ्या राहणे या भागात नव्या क्रांतीचे माध्यम बनले आहे.
मला इथे एक लक्ष्मी नावाची मुलगी भेटली, तिने ड्रोन तयार केले आहे. कुणी कल्पना तरी करेल का की छत्तीसगड-रिवाच्या आदिवासी क्षेत्रात लक्ष्मी नावाची इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी ड्रोन बनवेल. ती मला सांगत होती की मी 50 मीटर पर्यंत ड्रोन उडवते आणि मागे -पुढे देखील घेऊन जाते. मला आनंद झाला.
तुम्ही ऐकले असेल, आपल्याला माहित आहे नगरनार इथल्या पोलाद कारखान्याचे काम पूर्ण होत आहे आणि पोलाद कारखान्याचे काम, लवकरच तो कारखाना देखील सुरु होईल. आज जेव्हा बस्तरच्या तरुण मुलांना इंजिनीअरिंग, वैद्यकीय महाविद्यालयच नव्हे तर यूपीएससी आणि पीएससी परीक्षांमध्ये यशस्वी झालेले पाहतो, तेव्हा माझा विश्वास अधिक पक्का होतो कि तुमचे राज्य योग्य दिशेने प्रगती करत आहे. जेव्हापासून छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आले आहे तेव्हापासून आरोग्य सेवांमध्येही क्रांतिकारी बदल झाला आहे. यापूर्वी राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये होती, आज मला सांगण्यात आले कि इथे दहा वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या देखील अनेक पटीने वाढली आहे. बिजापूर आणि आसपासच्या भागात आता आरोग्य सुविधांमध्ये निरंतर सुधारणा होत आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. जिल्ह्यांच्या रुग्णालयापासून बाजारांपर्यंत आता मोठमोठी तज्ञ मंडळी आपल्या सेवा पुरवत आहेत. मी त्यांच्या सेवाभावी वृत्तीची मनापासून प्रशंसा करतो. आणि मला इथे अनेक डॉक्टर भेटले, कुणी तामिळनाडूतून आले आहेत, कुणी उत्तरप्रदेशातून आले आहेत आणि आपला पूर्ण वेळ या जंगलात व्यतीत करत आहेत. ज्या देशाकडे अशा तरुण डॉक्टरांची फौज आहे , तिथे माझ्या गरीबाला आता आजारपणामुळे होणारा त्रास सहन करावा लागणार नाही, हा माझा विश्वास दृढ बनला आहे.
आता थोड्या वेळापूर्वी इथल्या जिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिटचा शुभारंभ करण्याची संधी देखील मला मिळाली. मला हे सांगायचे आहे कि पंतप्रधान डायलिसिस योजनेअंतर्गत आता देशातील 500 हून अधिक रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध केली जात आहे. याचा लाभ सुमारे अडीच लाख रुग्णांनी घेतला आहे ज्यांनी सुमारे 25 लाख डायलिसिसचे सेशन केले आहेत. छत्तीसगडच्या नकाशात सर्वात खाली दिसणारा सुकमा, दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांमध्ये विकासाचे जे जाळे विणण्यात आले आहे , ते प्रशंसेला पात्र आहे, मी इथल्या सरकारचे अभिनंदन करतो.
छत्तीसगडला विकासाच्या मार्गावर अधिक जलद गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार दुहेरी धोरणावर काम करत आहे. पहिला प्रयत्न या क्षेत्रात अधिकाधिक विकासाचा आहे तर दुसरा जे युवक भरकटलेले आहेत त्यांना शक्य त्या सर्व मार्गानी विकासाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्याचा आहे. गेल्या चार वर्षात छत्तीसगड आणि विशेषतः बस्तरमध्ये विकासाच्या अभूतपूर्व योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
बस्तरच्या नक्षलग्रस्त भागांमध्ये चारशे किलोमीटरहून अधिक लांब रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे . ज्या गावांपर्यंत पूर्वी जीप देखील पोहचत नव्हती, ती गावे आता नियमित चालणाऱ्या बसेसनी जोडली गेली आहेत.
सौभाग्य योजनेअंतर्गत, बस्तरच्या प्रत्येक घरात विजेची जोडणी सुनिश्चित केली जात आहे. घरांमध्ये पोहोचलेला प्रकाश शेतकरी, विद्यार्थी, दुकानदार, छोटे उद्योजक, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. बस्तरमध्ये हजारोंच्या संख्येने सौर पंपांचे वितरण देखील केले जात आहे. हे सौर पंप शेतकऱ्यांची खूप मोठी मदत करत आहेत. आज या भागांमध्ये मोठ्या संख्येने शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, सरकारी शिधावाटप दुकाने, बँकांच्या शाखा, एटीएम या सर्व व्यवस्था उपलब्ध केल्या जात आहेत. मोबाईल टॉवर बसवण्यात येत आहेत. बस्तर आता रेल्वेच्या माध्यमातून रायपूरशी जोडले जात आहे.
आज एका रेल्वे मार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या आत ते जगदलपूर पर्यंत पोहोचेल. या वर्ष अखेरपर्यंत जगदलपूर मध्ये एक नवीन पोलाद कारखाना देखील कार्यरत होईल. यामुळे बस्तरच्या युवकांनाही मोठ्या संख्येने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
जगदलपूर मध्ये नवीन विमानतळ देखील तयार होत आहे आणि येत्या काही महिन्यात तो देखील कार्यरत होईल. विमानसेवेद्वारे संपर्क व्यवस्था या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जाईल.
मित्रांनो , बस्तर बदलत आहे. गेल्या काही दशकात बस्तर बरोबर ज्या प्रकारची ओळख जोडली गेली होती ती देखील बदलत आहे. भविष्यात बस्तरची नवी ओळख एक आर्थिक केंद्र म्हणून होणार आहे , पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून होणार आहे. वाहतुकीचे एक मोठे केंद्र म्हणून होणार आहे. इथून रायपूरच नाही तर हैदराबाद, नागपूर आणि विशाखापट्टणम् पर्यंत संपर्क वाढेल.
नवीन भारताबरोबरच नवीन बस्तर इथल्या लाखो लोकांचे आयुष्य सुलभ बनवणार आहे. दहा दशकांपासून त्यांच्या जीवनात जो अंधार होता , त्या अंधारातून त्यांना बाहेर काढेल. नवीन बस्तर नव्या अपेक्षांचे बस्तर असेल, नव्या आकांक्षांचे बस्तर असेल, नव्या महत्वाकांक्षांचे बस्तर असेल. आता असे म्हणता येईल की सूर्य भलेही पूर्वेला उगवत असेल मात्र तोही दिवस दूर नाही जेव्हा छत्तीसगडमध्ये विकासाचा सूर्य दक्षिणेकडे उगवेल, बस्तरमधून उगवेल. हा भाग प्रकाशमान झाला तर पूर्ण प्रदेश प्रकाशमान होईल. इथे आनंद असेल तर संपूर्ण प्रदेश आनंदमय होईल.
बंधू आणि भगिनींनो, सरकारी योजना आणि सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे , ज्यांना त्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे, हे नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. क्षेत्रीय असमतोलाच्या मागे जे कारण आहे, त्यात हे देखील एक आहे. आणि मला आनंद आहे कि रमण सिंग यांचे सरकार या बाबतीत संवेदशील आहे, चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला जात आहे.
थोड्या वेळापूर्वी मला जांगला विकास केंद्रात जाण्याची संधी मिळाली. या केंद्रामागची भावना अशी आहे की या क्षेत्रातील लोकांसाठी एकाच ठिकाणी सर्व सरकारी सेवा मिळाव्यात जेणेकरून इथे-तिथे धावपळ करण्यात जनतेचा वेळ आणि ऊर्जा वाया जाणार नाही. मग ते ग्रामपंचायतीचे कार्यालय असो, सरकारी शिधावाटप केंद्र असो, पटवारी असो, रुग्णालय असो, शाळा असो, या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे एक खूप मोठी सेवा असेल.
मित्रांनो , देशात क्षेत्रीय असमतोल दूर करण्याचा एक उपाय संपर्क वाढवणे हा आहे. म्हणूनच महामार्ग असेल, रेल्वे असेल, हवाई मार्ग असेल किंवा आयवे असेल- इन्फर्मेशन वे , संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. ज्या काळात फोन आणि इंटरनेट सर्वात मोठी गरज बनत चालले आहे. त्या काळात जर एखाद्या भागात संपर्काची चांगली व्यवस्था नसेल तर त्याला पुढे जाणे कठीण होईल हेच कारण आहे बस्तरला जोडण्यासाठी बस्तर नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 6 जिल्ह्यांमध्ये सुमारे चारशे किलोमीटर लांब ऑप्टिकल फायबर जाळे उभारण्यात आले आहे.
मला आता जांगलाच्या ग्रामीण बीपीओत दाखवण्यात आले की कशा प्रकारे याचा वापर लोकांचे उत्पन्न तर वाढवेलच , त्यांचे जगणे देखील सुलभ करण्याचे काम करेल. छत्तीसगडमध्ये भारत नेट प्रकल्पावर देखील वेगाने काम होत आहे. मला सांगण्यात आले आहे की दहा हजारांपैकी चार हजार ग्राम पंचायती भारत नेटशी जोडण्यात आली आहेत आणि उर्वरित काम पुढल्या वर्षीपर्यंत पूर्ण करण्याची तयारी आहे.
मित्रांनो, संपर्काचे आणखी एक माध्यम आहे रेल्वे. आज दल्लीराजहरा भानुप्रताप रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की चालकापासून गार्डपर्यंत , हा जो आता आपण गाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यांचे संपूर्ण संचलन, चालक देखील, गार्ड देखील सगळे काही महिला करत आहेत. ही देशवासियांसाठी देखील आनंदाची बातमी असेल की छत्तीसगडच्या आदिवासी जंगलांमध्ये आपल्या मुली रेल्वेगाडी चालवत आहेत. दल्लीराजहरा ते रावगढ़ आणि रावगढ़ ते जगदलपुररेल्वे मार्ग, सुमारे २३ वर्षांपूर्वी हा प्रस्ताव आला होता, मात्र अनेक वर्षे कुठले काम सुरु होऊ शकले नव्हते. या ना त्या प्रकारे दल्लीराजहरा से रावगढ़ दरम्यान काम सुरु तर झाले मात्र त्याची प्रगती न च्या समान होती.
आम्हाला या प्रकल्पाबाबत चिंता वाटली ज्यामुळे बस्तरच्या उत्तरी भागात नवा रेल्वे मार्ग पोहोचला आहे.
आज सुमारे 1700 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे, 1700 कोटी रुपये. हे रस्ते बिजापूर व्यतिरिक्त कांकेर, कोंडागांव, सुकमा, दंतेवाड़़ा, बस्तर, नारायणपुर आणि राजनांद गावात रस्त्याचे आधुनिक जाळे उभारेल. प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजने अंतर्गत देखील 2700 किलोमीटर , दोन हजार सातशे किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले जातील. बस्तर आणि सरगुझा सारख्या विशाल आदिवासी गावांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी विमानतळाचा विकास केला जात आहे. भविष्यात या क्षेत्रांनाही उडान योजनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
बंधू आणि भगिनींनो, बिजापूरमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पेयजल योजनांची देखील आज पायाभरणी करण्यात आली. या व्यतिरिक्त इंद्रावती आणि मिघालचल नद्यांवर दोन पुलांचे बांधकाम देखील आज सुरु झाले आहे.
बंधू आणि भगिनींनो, हे सरकार गरीब, दलित, पीडित, शोषित , वंचित आदिवासींचे सरकार आहे. गेल्या चार वर्षात गरीब आणि आदिवासींच्या कल्याणासाठी घेण्यात आलेले निर्णय , नवीन कायदे याची साक्ष आहेत. याच मालिकेत आज वन-धन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याअंतर्गत वन-धन विकास केंद्रे उघडण्यात येत आहेत. सरकारने हे सुनिश्चित केले आहे की जंगलातील उत्पादनांना योग्य भाव बाजारपेठेत गेल्या बरोबर मिळायला हवा. या केंद्रांच्या माध्यमातून वनातून मिळणाऱ्या उत्पादनांचा प्रचार केला जाईल, यात मूल्यवर्धन केले जाईल, आणि मग त्यासाठी बाजारपेठ उभी केली जाईल.
मित्रांनो, मूल्य वर्धन, किती फायदा होतो, हे मी आज इथे पाहिले . कच्ची चिंच जी आज विकतात, ती 17-18 रुपये किलोच्या आसपास विकली जाते.मात्र जेव्हा तुम्ही यातून बिया काढून टाकता आणि ती एखाद्या चांगल्या वेष्टनात घालून विकता, तेव्हा हीच 17-18 रुपयेवाली चिंच 50-60 रुपये किलोपर्यंत पोहोचते, म्हणजे तीन पटीने किंमत वाढते.
बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही इथे वन-धन योजनेचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री जन-धन योजना, वन-धन योजना आणि तिसरी तुम्ही ऐकली असेल, आम्ही अर्थसंकल्पात घोषणा केली होती – गोवर्धन योजना. जर गावात गरीबातील गरीबाला वन-धन, जन-धन आणि गोवर्धन या तीन योजना उपलब्ध करून द्या, गावाचे अर्थकारण बदलून जाईल, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो.
आदिवासीचे हित लक्षात घेऊन वन-अधिकार कायदा अधिक कठोरपणे लागू केला जात आहे. अलिकडेच आणखी एक मोठा निर्णय या सरकारने घेतला आहे, तो आहे बांबूंशी संबंधित जुन्या कायद्यात बदल. मित्रांनो, कित्येक वर्ष जुना हा कायदा होता, ज्या अंतर्गत बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. आणि वृक्षांचा दर्जा दिल्यामुळे बांबू कापण्यात, बांबू कुठे ने-आण करण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या, त्रास होत होता.
मात्र आता केंद्र सरकारने वन कायद्यात बदल करून बांबू, ज्याचा समावेश वृक्षांच्या यादीत केला जात होता, आम्ही तो रद्द केला आहे आणि आता तुम्ही बांबूचा बिनधास्त व्यवसाय करू शकता, बांबूची शेती करू शकता, बांबू विकू शकता.
बंधू भगिनींनो, हे पाणी, ही जमीन, हे जंगल तुमचे आहे. यावर तुमचा अधिकार आहे. हीच भावना सरकारने ओळखली आणि 60 वर्षे जी एक व्यवस्था सुरु होती, त्यातही बदल केला. सरकारद्वारा खोदकामाशी संबंधित जुन्या कायद्यात परिवर्तन करण्यात आले आहे. आम्ही नियम बनवला आहे की आता जे काही खनिज येईल त्याचा एक भाग स्थानिक रहिवाश्यांवर खर्च करणे आवश्यक असेल. यासाठी खाणकाम केले जाणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.
कायद्यात बदल केल्यानंतर छत्तीसगडला सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त निधी या नव्या व्यवस्थेमुळे मिळाला आहे. सरकारने हा देखील नियम बनवला आहे की प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत 60 टक्के निधी पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य सेवा, शिक्षण , महिला आणि बाल कल्याण यावरच खर्च केला जाईल.
बंधू आणि भगिनींनो, आदिवासींच्या मिळकती बरोबरच शिक्षणावरही सरकार प्राधान्यक्रमानुसार काम करत आहे. यावर्षी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे. सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे कि २०२२ पर्यंत देशातला प्रत्येक तालुका जिथे आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे किंवा किमान २० हजार आदिवासी लोक तिथे राहत आहेत, अशा ठिकाणी एक एकलव्य आदर्श निवासी शाळा बांधली जाईल.
याशिवाय सरकारचे एक मोठे काम आदिवासी सन्मान, आदिवासी अभिमानशी देखील जोडलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात आदिवासींच्या योगदानाला प्रथमच एखाद्या सरकारकडून अशा प्रकारे सन्मानित केले जात आहे. सरकारने ठरवले आहे कि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे आदिवासींनी स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिले आहे , स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आदिवासींच्या इतिहासाशी जोडलेला आहे, अशा ठिकाणी एक सर्वोत्तम संग्रहालय उभारले जाईल जेणेकरून भावी पिढयांना समजेल कि देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या आदिवासी बंधू भगिनींनी किती बलिदान दिले आहे, किती स्वाभिमानाची लढाई ते लढले आहेत.
मित्रांनो , आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक असमतोल नाहीसा करण्याचे बँक हे मोठे माध्यम आहे. आज बँकेचा कारभार अनिवार्यपणे जीवनाशी जोडलेला आहे. आज मला इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेचे उद्घाटन करण्याची देखील संधी लाभली. मला सांगण्यात आले आहे की लोकांना जर बँकेत काम असायचे तर २० किलोमीटर, २५ किलोमीटर लांब प्रवास करावा लागत होता. शिवाय बँकांमध्ये अपुरे कर्मचारी असल्यामुळे त्रास अधिक वाढायचा. आता ही शाखा सुरु झाल्यामुळे तुम्हाला एक खूप मोठी मिळणार आहे.
आम्ही टपाल कार्यालये देखील आता बँकेच्या कामासाठी खुली केली आहेत. जिथे टपाल कार्यालय असेल, तिथे देखील बँकिंगचे काम होईल. आम्ही गावांमध्ये बँकमित्र उपलब्ध केले आहेत, ते देखील बँकेचे व्यवहार करतात. आम्ही प्रधानमंत्री जन-धन योजनेनंतर बँकिंग व्यवस्थांचा प्रसार गावागावांपर्यंत घेऊन जाण्यासाठी नवनव्या योजना आखल्या आहेत. भीम ऍप द्वारे आपल्या मोबाईल फोनमधून पूर्ण बँकिंगचे व्यवहार प्रत्येक नागरिक करू शकतो. ते देखील आपल्याला पुढे न्यायचे आहे.
बंधू भगिनींनो, बँकेत खाते असण्याचे किती फायदे आहेत , हे त्यांना चांगले माहित आहे ज्यांची जनधन खाती उघडण्यात आली आहेत. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज देशभरात ३१ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. छत्तीसगडमध्ये देखील एक कोटी ३० लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. हे ते लोक आहेत, जे गरीब आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, मागास आहेत, ज्यांना कधी कुणी विचारत नव्हते.
आज मला छत्तीसगडची एक महिला सविता साहूजी यांच्या ई-रिक्षातून फिरण्याची संधी देखील मिळाली. सविताजी यांच्याबाबत मला सांगण्यात आले की कुटुंबात त्यांना काही अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही आणि ई-रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला. त्यांनी सदस्य समितीचा मार्ग निवडला. सरकारने देखील त्यांची मदत केली आणि आता त्या एक सन्माननीय आयुष्य जगत आहेत.
स्वच्छ भारत अभियान असेल, स्वस्थ भारत अभियान असेल, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेचा विस्तार असेल , सुकन्या समृद्धी योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लेकी-बहिणींना सक्षम करण्याचे काम हे सरकार करत आहे.
उज्वला योजनेचा देखील मोठा लाभ छत्तीसगडच्या महिलांना मिळत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये १८ लाख महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा देखील आहे. म्हणूनच मुद्रा योजनेच्या अंतर्गत बँक हमीशिवाय कर्ज दिले जात आहे. या भागातील युवकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्या.
मी आज शासन-प्रशासन संबंधी अधिकारी, कर्मचारी यांनाही आवाहन करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्याना विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करावा आणि तो तडीस नेऊन दाखवावा.
बंधू आणि भगिनींनो, सरकार केवळ योजना बनवण्यावरच लक्ष देत नाही तर हे देखील सुनिश्चित केले जात आहे की त्यांच्यापर्यंत या योजना कशा प्रकारे पोहचवायच्या , शेवटच्या व्यक्तीला कसा लाभ मिळेल. माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की देशातील शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार जे काम करत आहे, ते पुढे नेण्यात उत्साहाने सहभागी व्हा. तुमचा सहभाग हीच या सरकारची ताकद आहे आणि हीच ताकद २०२२, जेव्हा स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील, तेव्हा नवीन भारताचा संकल्प सिद्ध करतील. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या महापुरुषांची स्वप्ने ती साकार करतील.
तुम्ही सर्व इथे आलात याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि हिंसेच्या मार्गावर गेलेल्या युवकांना मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्य घटना दिली , तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेत आहे. तुमच्या अधिकारांबाबत चिंता करणे सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही शस्त्रास्त्रे हाती घेण्याची गरज नाही, आयुष्य उध्वस्त करण्याची गरज नाही. आणि मी त्या माता-पित्याने सांगू इच्छितो की तुमची मुले, तुमच्या काही मुली या मार्गावर गेल्या आहेत. मात्र जरा विचार करा त्यांचा नेता कोण आहे. त्यांचा एकही नेता तुमच्या भागातील नाही, तुमच्या भागात जन्माला आलेला नाही, तो बाहेरून कुठूनतरी आलेला आहे. आणि ते मरत नाहीत , ते जंगलात लपून सुरक्षित राहतात आणि तुमच्या मुलांना पुढे करून त्यांचा बळी देतात. अशा लोकांच्या मागे तुम्ही तुमच्या मुलांना वाया घालवणार आहात का? ते तुमच्या राज्यातूनही येत नाहीत, बाहेरून येतात. त्यांची आडनावे पाहिलीत, त्यांची नावे वाचलीत तर कळेल कि ते कोण आहेत आणि कुठून आले आहेत. आपल्या मुलांना मारण्याचा अधिकार त्यांच्या हाती का द्यायचा?
आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करेन सरकार तुमच्या हितांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्याला विकासाच्या मार्गावर जायचं आहे. तुमच्या मुलांना शालेय शिक्षण मिळावे, तुमच्या शेतमालाला पूर्ण भाव मिळावा, तुम्हाला सन्मानाचे आयुष्य जगता यावे. औषधेअस्तील, शिक्षण असेल, कमाई असेल तुमच्या या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात आणि यासाठी या कामात सुरक्षा दलांचे जवान , तुमच्या इथे शाळा चालू राहाव्यात, शिक्षक यावेत यासाठी ते आपले आयुष्य वेचतात. तुमच्या भागात रस्ते तयार व्हावेत, यासाठी ते बलिदान देतात. तुमच्या इथे टेलिफोनचा टॉवर उभारला जावा यासाठी ते गोळ्या झेलतात. विकासासाठी ते मुठीत जीव घेऊन तुमची सेवा करण्यासाठी आले आहेत.
चला माझ्या बंधू भगिनींनो, विकासाच्या मार्गावर चालूया. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाऊया. 115 विकासाकांक्षी जिल्हे आहेत, आकांक्षावाले जिल्हे आहेत, त्यात एक बदल घडवून आणण्याचा संकल्प करूया. आयुष्मान भारताचे स्वप्न पूर्ण मेहनतीने आपण पूर्ण करू.
याच एका अपेक्षेसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल, एवढा मोठा भव्य कार्यक्रम या जंगलांमध्ये आयोजित केल्याबद्दल तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो.
जय भीम – जय भीम, जय हिंद।