मोठ्या संख्येने जमलेल्या प्रिय बंधू आणि भगिनीनो,
केदारनाथला जाऊन आल्यावर बाबांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मला आज लाभले. आणि तिथून तुम्हा सर्वासमोर येण्याचे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्यही लाभले. मला माहित नव्हते, बाबांनी आश्चर्याचा धक्का दिला. मोठ्या भक्तिभावाने मला विशेष सन्मानाने गौरवले, अलंकृत केले. मी स्वामीजींचे, या संपूर्ण पतंजली परिवाराचे मनापासून आभार मानतो.
मात्र, ज्या लोकांमध्ये माझे संगोपन झाले आहे, ज्या लोकांनी माझ्यावर संस्कार केले आहेत, मला शिकवण दीक्षा दिली आहे, त्यातून मी हे चांगल्या प्रकारे जाणतो की जेव्हा तुम्हाला मान मिळतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमच्याकडून या या, अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत, जराही मागे-पुढे करू नका, त्या पूर्ण करा. तर एक प्रकारे मी काय करायला हवे, कसे जगायला हवे, याबाबतच्या सूचनांचा मोठा दस्तावेजच जणू गुरुजींनी माझ्यासमोर ठेवला आहे.
मात्र सन्मानाबरोबरच तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, सव्वाशे कोटी देशबांधवांच्या आशीर्वादाच्या सामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा स्वतःवर तेवढा विश्वास नाही, माझ्यावर एवढा विश्वास नाही, जितका माझा तुमच्यावर आणि देशबांधवांच्या आशीर्वादाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच तो आशिर्वाद ऊर्जेचा स्रोत आहे, संस्कार त्याच्या मर्यादांमध्ये बांधून ठेवतात आणि देशासाठी समर्पित आयुष्य जगण्यासाठी नेहमी नवी प्रेरणा मिळत राहते.
आज जेव्हा मी तुमच्यासमोर आलो आहे, तेव्हा तुम्हालाही अनुभव आला असेल कि कुटुंबातील कुणी सदस्य तुमच्याकडे आला आहे. आणि मी इथे पहिल्यांदाच आलेलो नाही, तुमच्याकडे अनेकदा येण्याचे सौभाग्य मला लाभले आहे, कुटुंबातील एक सदस्य या नात्याने येण्याचे भाग्य लाभले आहे. आणि हेही मला सौभाग्य लाभले आहे कि मी स्वामी रामदेवजी याना कशा प्रकारे ते जगासमोर उदयाला आले ते खूप जवळून पाहिले आहे. त्यांचा संकल्प आणि संकल्पाप्रति समर्पण, हीच त्यांच्या यशाची सर्वात मोठी जडी-बूटी आहे. आणि ही जडी-बूटी बालकृष्ण आचार्यजी यांनी शोधलेली जडी-बूटी नव्हे, ही स्वामीजींनी स्वतः शोधलेली जडी-बूटी आहे. बालकृष्णजींची वनौषधी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी पडते, मात्र स्वामी रामदेव यांची वनौषधी प्रत्येक संकटाचा सामना करून पुढे जाण्याची ताकद देणारी असते.
आज मला संशोधन केंद्राचे उदघाटन करण्याचे सौभाग्य लाभले. आपल्या देशाच्या भूतकाळाकडे जर थोडी नजर फिरवली तर एक गोष्ट लक्षात येते , आपण इतके प्रसिद्ध होतो, इतके पोहोचलेले होतो, इतक्या उंचीवर पोहोचलो होतो कि जेव्हा जगाचे याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांना तिथपर्यंत मजल मारणे बहुधा शक्य वाटत नव्हते, आणि म्हणूनच त्यांनी मार्ग अवलंबला होता, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला उद्धवस्त करण्याचा, त्याचा बीमोड करण्याचा. आणि गुलामगिरीचा संपूर्ण कालखंड, आपली संपूर्ण शक्ती,आपले ऋषी,मुनि , संत, आचार्य, शेतकरी, वैज्ञानिक, प्रत्येकाला, जो श्रेष्ठ होता त्याला वाचवण्यासाठी १०००, १२०० वर्षांच्या गुलामगिरीच्या कालखंडात त्यांची शक्ती संपवून टाकली.
स्वातंत्र्यानंतर जे काही उरले होते, त्यात काळानुसार बदल केला असता, नवीन स्वरूपात आणले असते आणि स्वतंत्र भारताच्या श्वासामध्ये ते आपण जगासमोर सादर केले असते, मात्र तसे झाले नाही. गुलामगिरीच्या काळात नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, स्वातंत्र्याचा एक मोठा कालखंड असा गेला ज्यात हे श्रेष्ठत्व विसरण्याचा प्रयत्न झाला. शत्रूंनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी तर आपण लढू शकलो, सुटू शकलो, वाचू शकलो, मात्र आपल्या माणसांनी जेव्हा विसरण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या तीन-तीन पिढ्या दुविधेच्या कालखंडात आयुष्य व्यतित करत राहिल्या.
मी आज मोठ्या अभिमानाने म्हणतो, अतिशय आनंदाने सांगतो कि आता विसरण्याची वेळ नाही, जे श्रेष्ठ आहे ते गौरवण्याची वेळ आहे, आणि हीच वेळ जगभरात भारताच्या आन-बान-शानचा परिचय करून देते. मात्र आपण ही गोष्ट विसरू नये कि भारत जगात या उंचीवर कसा पोहचला. तो यामुळे पोहचला कारण हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी सातत्याने संशोधनात आपले आयुष्य खर्ची घातले. नवनवीन शोध लावणे, नवनवीन गोष्टी मिळवणे आणि मानवजातीसाठी ते सादर करणे , काळानुसार त्यात बदल करणे. जेव्हापासून नावीन्यतेची, संशोधनाची उदासीनता आपल्यामध्ये आली, आपण जगासमोर प्रभाव पाडण्यात असमर्थ ठरू लागलो.
अनेक वर्षांनंतर जेव्हा माहिती तंत्रज्ञान क्रांती आली, जेव्हा आपल्या देशातील १८, २०, २२ वर्षांची मुले माऊसशी खेळता खेळता जगाला अचंबित करू लागली, तेव्हा पुन्हा एकदा जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले गेले. माहिती तंत्रज्ञानाने जगाला प्रभावित केले. आपल्या देशातील १८, २० वर्षांच्या तरुणांनी जगाला प्रभावित केले. संशोधन, नाविन्यता याची ताकद काय असते, आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहिली आहे. आज संपूर्ण जग सर्वांगीण आरोग्य सेवा, या बाबतीत खूप संवेदनशील आहे, सजग आहे. मात्र मार्ग सापडत नाहीये. भारताच्या ऋषी-मुनींची महान परंपरा, योग याचे जगाला आकर्षण निर्माण झाले आहे, ते शांततेच्या शोधात आहेत. ते बाहेरील जगाला कंटाळून अंतर्मनातील जग जाणण्याचा, पारखण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा वेळी हे आपणा सर्वांचे कर्तव्य बनते कि आधुनिक स्वरूपात संशोधन आणि विश्लेषणाबरोबर योग हे एक असे विज्ञान आहे, तना-मनाच्या तंदुरुस्तीसाठी, आत्म्याच्या चेतनेसाठी हे विज्ञान किती सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. मी बाबा रामदेवजी यांचे अभिनंदन करतो, त्यांनी योग ही एक चळवळ बनवली. सामान्य माणसामध्ये विश्वास निर्माण केला कि योगासाठी हिमालयातील गुहांमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या घरात, स्वयंपाकघराच्या बाजूला बसून देखील योग करता येतो, पदपथावरही करू शकतो, मैदानातही करू शकतो, बागेतही करू शकतो, मंदिराच्या परिसरातही करू शकतो.
हा खूप मोठा बदल झाला आहे. आणि आज त्याचाच परिणाम आहे कि २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, जगातील प्रत्येक देशात योगाचा उत्सव साजरा केला जातो, अधिकाधिक लोकांनी त्यात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न होतात. मी जगात जितक्या लोकांना भेटतो, माझा अनुभव आहे कि देशाबद्दल बोलतात, विकासाबद्दल बोलतात, गुंतवणुकीबाबत चर्चा करतात, राजकीय स्थितीची चर्चा करतात, मात्र एक गोष्ट आवर्जून करतात, मला योगाबाबत एक-दोन प्रश्न अवश्य विचारतात. हे कुतूहल निर्माण झाले आहे.
आपल्या आयुर्वेदाचे सामर्थ्य, थोडेफार आपणच त्याचे नुकसान केलेले आहे. आधुनिक विज्ञानाचे जे वैद्यकीय शास्त्र आहे, त्यांना वाटले कि तुमच्या सर्व गोष्टी काही शास्त्रावर आधारित नाहीत. आयुर्वेदवाल्याना वाटले कि तुमच्या औषधांमध्ये दम नाही, आता तुम्ही लोकांना बरे करता मात्र ते बरे होत नाहीत. तुम्ही मोठे कि आम्ही मोठे, याच वादात सगळा वेळ निघून गेला. आपले सर्व ज्ञान, आधुनिक ज्ञान,त्याची आपल्या परंपरांशी सांगड घालून पुढे नेले असते तर बहुधा मानवतेची खूप मोठी सेवा झाली असती.
मला आनंद आहे, पतंजली योग विद्यापीठाच्या माध्यमातून बाबा रामदेवजी यांनी जे अभियान राबवले, चळवळ चालवली, त्यात आयुर्वेदाचा महिमा सांगणे, इथपर्यंतच स्वतःला मर्यादित ठेवले नाही. जगाला जी भाषा समजते, बाबा रामदेव यांनी विडा उचलला, त्याच भाषेत भारतचे आयुर्वेद ते घेऊन येतील,आणि जगाला प्रेरित करतील. एक प्रकारे ते भारताची सेवा करत आहेत. हजारो वर्षे आपल्या ऋषी-मुनींनी तपश्चर्या केली आहे, जे साध्य केले आहे ते जगाला वाटण्यासाठी निघाले आहेत, वैज्ञानिक अधिष्ठानावर निघाले आहेत, आणि मला विश्वास आहे आणि आज मी जे संशोधन केंद्र पाहिले, अगदी त्याच्या बरोबरीने गंगा मातेच्या किनारी हे काम उभे आहे.
आणि म्हणूनच मी बाबांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. भारत सरकार, देशात जेव्हा अटलजींचे सरकार होते, तेव्हा आपल्या देशात एक आरोग्य धोरण आणले होते. एवढ्या वर्षांनंतर जेव्हा आमचे सरकार आले, तेव्हा पुन्हा एकदा आम्ही देशासाठी एक आरोग्य धोरण घेऊन आलो आहोत. सर्वांगीण आरोग्य सेवा घेऊन आलो आहोत. आणि आता जगाला केवळ निरोगी राहायचे आहे असे नाही, आजार होऊ नये इथवरच थांबायचे नाहीये, तर आता लोकांना वेलनेस म्हणजे मनानेही निरोगी राहायचे आहे आणि यासाठी उपाय देखील समग्र द्यावे लागतील. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर द्यावा लागेल, आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा सर्वोत्तम मार्ग आहे, स्वस्तातला मार्ग आहे स्वच्छता. आणि स्वच्छतेत कोण काय करते ते नंतर बघू. आपण ठरवू या, सव्वाशे कोटी देशबांधव ठरवू या कि मी घाण करणार नाही. कोणता मोठा संकल्प करण्याची आवश्यकता नाही, यामध्ये तुरुंगात जाण्याची गरज नाही, फाशीवर लटकण्याची गरज नाही, देशासाठी सीमेवर जाऊन जवानांप्रमाणे प्राण पणाला लावण्याची गरज नाही, छोटेसे काम, मी घाण करणार नाही.
तुम्हाला कल्पना आहे एक डॉक्टर जितकी आयुष्ये वाचवतो, त्यापेक्षा अधिक मुलांचे आयुष्य तुम्ही घाण न करून वाचवू शकता. तुम्ही एका गरीबाला दान करून जितके पुण्य कमावता, घाण न करून एक गरीब जेव्हा निरोगी राहील, तेव्हा तुमचे दान जे तुम्ही रुपयांमध्ये देता त्यापेक्षा अधिक मौल्यवान होईल. आणि मला आनंद आहे कि देशाची जी नवीन पिढी आहे, भावी पिढी, लहान-लहान मुले, प्रत्येक घरांमध्ये ते भांडतात. जर कुटुंबातील वृद्ध व्यक्तीने, जर एखादी वस्तू टाकून दिली, गाडीतून जात आहात, जर पाण्याची बाटली बाहेर फेकली, तर लहान मूल गाडी थांबवतो, पाच वर्षांचा लहान नातू गाडी थांबवतो, थांबा, मोदी आजोबांनी मनाई केली आहे. ती बाटली पुन्हा घेऊन या, असे वातावरण तयार होत आहे. लहान-लहान मुले देखील माझ्या या स्वच्छता चळवळीचे सैनिक बनले आहेत. आणि म्हणूनच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा,याला आपण जेवढे बळ देऊ, आपण आपल्या देशातील गरीबांची सर्वात जास्त सेवा करु.
घाण कुणी करत नाही, घाण आपण करतो. आणि आपणच पुन्हा अस्वच्छतेवर भाषण देतो. जर का एकदा आपण देशवासीयांनी घाण न करण्याचा निर्णय घेतला, या देशातून रोग नाहीसे करण्यात, निरोगीपणा आणण्यासाठी यशस्वी होण्यात अडथळे येणार नाहीत.
आपली उदासीनता इतकी आहे कि आपण एवढा मोठा हिमालय, हिमालयातील वनौषधी, भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या घटनांशी परिचित, हनुमानानी वनौषधींसाठी काय-काय केले नव्हते, त्या सर्व गोष्टींशी परिचित,आणि आपण इतके बेसावध झालो होतो कि जगातील देश, ज्यांना वनौषधी काय असते हे माहित नव्हते, मात्र जेव्हा त्यांना समजले याचे मोठे बाजार मूल्य आहे, जगातील अन्य देशांनी स्वामित्व हक्क घेतले. हळदीचे स्वामित्व देखील अन्य कोणता देश करुन घेतो, चिंचेचे स्वामित्व हक्कही अन्य देशाकडे आहेत. आपली ही उदासीनता, आपले सामर्थ्य विसरण्याची सवय, यांनी आपले खूप नुकसान केले आहे.
आज जगात वनौषधींची एक खूप मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मात्र जेव्हढ्या प्रमाणात जगभरात या वनौषधी भारताने पोहचवायला हव्या होत्या, अजून खूप काही करायचे शिल्लक आहे.
या पतंजली संस्थेद्वारे हे जे संशोधन होत आहे, हे जगातील लोकांना समग्र आरोग्यासाठी जी व्यवस्था आहे, त्यांना हि औषधे आगामी काळात उपयोगी पडतील. आपल्या देशात खूप वर्षांपूर्वी भारत सरकारने आयुर्वेदाचा प्रचार कसा व्हावा, त्यासाठी एक हाथी आयोग स्थापन केला होता. जयसुखलाल हाथी, त्यांचा आयोग होता. त्या आयोगाने जो अहवाल दिला होता, तो अहवाल खूप रोचक आहे. त्या अहवालाच्या सुरुवातीला लिहिले आहे कि आपले आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण त्याची जी पद्धत आहे, ती आजच्या युगाला अनुकूल नाही. ते एवढी मोठी पिशवी भरून वनौषधी देणार आणि मग म्हणणार हे उकळवून घ्या, एवढ्या पाण्यात उकळा, नंतर इतका रस राहील, एका चमच्यात घ्या, मग त्यात अमुक घाला, तमुक घाला, आणि मग घ्या. तर जी सामान्य व्यक्ती असते, तिला वाटते कि कोण एवढा कचरा करणार, यापेक्षा चला औषध घेऊ या, औषधाची गोळी खाऊ या, आपली गाडी सुरु होईल. आणि म्हणूनच त्यांनी म्हटले होते कि सर्वप्रथम आवश्यकता आहे, खूप वर्षांपूर्वीचा अहवाल आहे. आयुर्वेदिक औषधांचे वेष्टन. जर त्यांचे वेष्टन आधुनिक औषधांप्रमाणे केले तर लोक या सर्वांगीण आरोग्यसेवेकडे वळतील. आणि आज आपण पाहत आहोत कि आपल्याला त्या उकळून घेण्याच्या वनौषधी आणण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्ट तयार मिळत आहे.
मला वाटते की, आचार्यजींनी स्वतः यासाठी खूप मेहनत घेतली. आणि आज ज्या पुस्तकाचे लोकार्पण करण्याची मला संधी मिळाली आहे, मला खात्री आहे कि, जगाचे या पुस्तकाकडे लक्ष वेधले जाईल. वैद्यकीय शास्त्राशी संबंधित लोकांचे लक्ष जाईल. निसर्गदत्त व्यवस्था किती सामर्थ्यवान आहे, ते सामर्थ्य जर आपण समजून घेतले तर आयुष्य किती उज्वल होऊ शकते, ते एखाद्या व्यक्तीला खिडकी उघडून देऊ शकेल,पुढे जाण्याची खूप मोठी संधी देते.
मला विश्वास आहे कि बाळकृष्णजींची ही साधना, बाबा रामदेव यांचे अभियान स्वरूपातील समर्पित काम, आणि भारताची महान उज्वल परंपरा, त्याला आधुनिक स्वरूपात, वैज्ञानिक अधिष्ठानासह पुढे जाण्याचा जो प्रयत्न आहे, तो भारतासाठी जगात आपले एक स्थान बनवण्याचा आधार बनू शकतो. जगातील खूप मोठा वर्ग जो योगाशी जोडलेला आहे, त्याला आयुर्वेदाशीही जोडून घ्यायचे आहे, आपण त्या दिशेने प्रयत्न करू.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांबरोबर सहभागी होण्याचे सौभाग्य मला लाभले, माझा विशेष सन्मान केला, मी नतमस्तक होऊन बाबांना वंदन करतो, तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, आणि माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.