उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, इथले ओजस्वी, तेजस्वी, परिश्रमी आणि यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, संसदेतले माझे सहकारी आणि माझे जुने मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय, जपानच्या दूतावासाचे हिरेका असारी आणि बनारस मधल्या माझ्या बंधु -भगिनींनो,
आपल्या देशाचा गौरव वाढवणाऱ्या एका कन्येचे मी गुणगान करू इच्छितो.आपण सर्वांनी पाहिले असेलच आसाम मधल्या नवगाव जिल्ह्यातल्या डीनगावची एक कन्या हिमा दास हिने कमालीची कामगिरी केली.मी आज विशेष ट्वीट केले आहे. ज्यांनी टीव्ही वर पाहिले असेल,त्या स्टेडियममधले समलोचक होते,त्यांच्यासाठी ही आश्चर्याची बाब होती की विश्व विजेत्यांना मागे टाकत हिंदुस्थानची एक कन्या सेकंदा-सेकंदाला पुढे जात आहे, ते समालोचक ज्या उत्कंठेने बोलत होते, कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटेल असेच होते. आपण नंतर पाहिले असेलच हिमा दास ने मोठी कामगिरी केली, भारताचे नाव उज्वल केले. हिमा विजयी झाली तेव्हा ती हात उंचावत तिरंगी झेंड्याची प्रतिक्षा करत धावत होती. ज्याची ती तीव्रतेने प्रतीक्षा करत होती तो तिरंगी झेंडा आला आणि विजयाबरोबरच तिने तिरंगा झेंडा फडकवला त्याचवेळी आपला आसामी गमछा गळ्यात घालायला ती विसरली नव्हती. तिला पदक मिळत होते तेव्हा, ती उभी होती तेव्हा, हिंदुस्तानचा तिरंगा फडकत होता आणि जन-गण-मन सुरु झाले,आपण पाहिले असेल 18 वर्षीय हिमा दासच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहत होत्या. त्या भारत मातेला समर्पित होत्या.हे दृश्य सव्वाशे कोटी हिंदुस्तानी जनतेला एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा देते. लहानश्या गावातली, भातशेती करणाऱ्या शेतकरी कुटुंबातली एक मुलगी 18 महिन्यांपूर्वी जिल्ह्यात खेळत होती, कधी राज्य स्तरावरही खेळली नव्हती,ती आज 18 महिन्यात हिंदुस्थानचे नाव उज्वल करून आली. हिमा दासचे मी अभिनंदन करतो आणि अनेक शुभेच्छाही देतो. आपणही टाळ्या वाजवून हिमा दासची प्रशंसा करा, प्रशंसा करा आपल्या या कन्येची,आसामच्या या कन्येने अवघ्या देशाचे नाव उज्वल केले.अभिनंदन.
बंधू- भगिनींनो, बाबा भोलेनाथ यांचा प्रिय श्रावण महिना सुरु होणार आहे. काही दिवसातच काशी मध्ये देश आणि जगभरातल्या शिव भक्तांचा मेळा भरणार आहे.या उत्सवाची जोमाने तयारी सुरु आहे. बंधू- भगिनींनो, आज आपण उत्सवाची तयारी करत आहोत मात्र सर्वात आधी अशा कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, ज्यांनी गेल्या काही दिवसात झालेल्या दुर्घटनेत आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे. बनारसमध्ये झालेल्या दुर्घटनेत अमूल्य जीवित हानी झाली ती दुःखद आहे. अशा सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुसऱ्याचे दुःख जाणून घेणे,सहयोग आणि सौहार्दाची भावना ही काशीची विशेष ओळख आहे.भोलेबाबा प्रमाणे भोळेपण, प्रत्येकाचे दुःख आपल्यात सामावून घेण्याचा गंगा मातेप्रमाणे स्वभाव हीच बनारसची ओळख आहे. देशात किंवा जगात बनारसी कुठेही राहुदे, तो आपले संस्कार विसरत नाही. मित्रहो शतकानुशतके बनारस असेच कायम राहिले आहे, परंपरांचे पालन करत वसले आहे. बनारसच्या पौराणिक ओळखीला नवा आयाम देण्यासाठी, काशीचा, एकविसाव्या शतकाच्या आवश्यकतेनुसार विकास घडवण्यासाठी गेली चार वर्षे निरंतर प्रयत्न सुरु आहेत. नव भारतासाठी एक नवे बनारस निर्माण करण्यात येत आहे, ज्याचा आत्मा पुरातन आणि काया नवीन असेल. ज्याच्या कणाकणात संस्कृती आणि संस्कार असतील मात्र व्यवस्था स्मार्ट यंत्रणेने युक्त असतील.बदलत्या या बनारसचे चित्र आता चहू बाजूने दिसू लागले आहे.
आज माध्यमात, सोशल मीडियात काशीचे रस्ते, चौक, घाट, तलाव यांची छायाचित्रे जे पाहतात त्यांचे मन प्रफुल्लित होते.डोक्यावर लटकणाऱ्या विजेच्या तारा आता गायब झाल्या आहेत. रस्ते प्रकाशात नाहून निघत आहेत. रंगीबेरंगी प्रकाशातली कारंजी मन वेधून घेत आहेत. मित्रहो, गेल्या चार वर्षात बनारस मधे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे आणि हा ओघ असाच सुरु राहणार आहे. 2014 नंतर आमच्यासमोर अनेक आव्हाने होती. आधिच्या सरकारचा काशीच्या विकासासाठी खूप सहयोग नव्हता,सहकार्य जाऊदे, अडथळे होते. मात्र आपण सर्वांनी मोठ्या बहुमताने लखनौमधे भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे तेव्हापासून संपूर्ण उत्तर प्रदेशासह काशीचा विकासही झपाट्याने होऊ लागला आहे. हा विकास असाच सुरु ठेवण्यासाठी आताच मी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे हे तीस पेक्षा जास्त प्रकल्प इथले रस्ते, पाणी पुरवठा, वाहतूक, स्वच्छता आणि शहर सुंदर करण्याशी संबंधित आहेत. याशिवाय प्राप्ती कर न्यायाधिकरणाच्या सर्किट बेंच आणि सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या सुविधेमुळे इथल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
बंधू-भगिनींनो, बनारसमध्ये ज्या सुधारणा होत आहेत त्याचा लाभ आजू- बाजूच्या गावांनाही होत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याशी संबंधित अनेक योजनांचे आज लोकार्पण करण्यात आले.इथल्या शेतकरी बंधू- भगिनींचे मी विशेष अभिनंदन करतो. या सभास्थानाच्या जवळच नाशिवंत मालासाठीचे केंद्र आहे जे आता तयार आहे. त्याचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले होते आणि आता लोकार्पण करण्याची संधीही मला लाभली आहे. मित्रहो, हे केंद्र इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठे लाभ दायक ठरणार आहे. बटाटा, मटार, टोमॅटो यासारख्या नाशिवंत फळभाज्या सडल्यामुळे होणारे नुकसान आता त्यांना सोसावे लागणार नाही. रेल्वे स्थानकही फार दूर नाही. यामुळे भाज्या आणि फळे, दुसऱ्या शहरात पाठवणे आता अधिक सुलभ होणार आहे.
बंधू- भगिनींनो, परिवहनापासून ते परीवर्तनापर्यंतच्या या मार्गावर सरकार वेगाने वाटचाल करत आहे. विशेष करून देशाच्या या पूर्व भागाकडे आमचे अधिक लक्ष केंद्रित आहे. थोड्या वेळापूर्वी आजमगड इथे, देशाच्या सर्वात लांब द्रुतगती मार्गाचे झालेले भूमिपूजन हा याच दृष्टिकोनाचा भाग आहे.
मित्रहो, काशी नगरी नेहमीच मोक्षदायिनी राहिली आहे. जीवनाचा शोध घेण्यासाठी इथे येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र जीवनात येणारी संकटे वैद्यक विज्ञानाच्या माध्यमातून कमी करण्यासाठीचेही केंद्र आता ठरत आहे. आपल्या सहकार्याने बनारस, पूर्व भारतात आता आरोग्य केंद्र म्हणून पुढे येत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख असणारे बीएचयु आता चिकीत्सेच्या क्षेत्रातही ओळखले जाऊ लागले आहे. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की बीएचयुने नुकताच एम्स समवेत जागतिक दर्जाच्या आरोग्य संस्था निर्मितीसाठी एक करार केला आहे. बनारसमधल्या स्थानिकांसमवेत इथे येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी दळणवळण सर्वात महत्वाचे आहे. म्हणूनच रस्ता असो किंवा रेल्वे,अनेक नव्या सुविधा आज काशीला मिळत आहेत. याच दिशेने केंट रेल्वे स्थानकाला नवे रंग रूप देण्याचे काम सध्या सुरु आहे. वाराणसीला अलाहाबाद आणि छप्राशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. वाराणसी ते बलिया पर्यंत विदयुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि आजपासून सेक्शनवर मेमु गाडीही सुरु झाली आहे. या गाडीला हिरवा झेंडा दाखवून मी आताच ही गाडी रवाना केली. सकाळी या गाडीने बलिया आणि गाझीपुरचे लोक इथे येऊ शकतील आणि आपले काम करून संध्याकाळी याच गाडीने घरी परतू शकतील.
मित्रहो, इथे, काशीमध्ये भक्तांना, श्रद्धाळूना उत्तम सुविधा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देश आणि जगभरातून बाबा भोलेच्या भक्तगणांना येण्या जाण्याची असुविधा होऊ नये यासाठी व्यवस्था केली जात आहे. पंचकोशी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचाही आज शुभारंभ झाला आहे. याबरोबरच श्रद्धा आणि सांस्कृतिक महत्वाची काशी मधली स्थाने जोडणारे दोन डझन रस्ते एक तर सुधारण्यात आले आहेत किंवा नव्याने निर्माण करण्यात आले आहेत.या रस्त्यांचेही थोड्या वेळापूर्वी लोकार्पण करण्यात आले आहे.
बंधू-भगिनीनो,आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर काशी प्रामुख्याने पुढे येत आहे.आंतरराष्ट्रीय कन्वर्शन केंद्र, रुद्राक्षचे आज भूमी पूजन झाले आहे. दोन वर्षापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे माझ्यासमवेत काशीला आले होते तेव्हा त्यांनी ही भेट भारताला, काशिवासियांना दिली होती. येत्या दीड-दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. आपणा सर्व काशिवासियांच्या वतीने, देशवासीयांच्या वतीने, या भेटीबद्दल मी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मित्रहो, मला आनंद आहे की केवळ काशीच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आणि आणि त्यांचे सहकारी पर्यटनाला प्रोत्साहन देत आहेत.यासाठी स्वच्छता आणि वारसा स्थळांचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. विशेषतः स्वच्छता,स्वच्छ भारत अभियान उत्तर प्रदेशातल्या जनतेने ज्या पद्धतीने पुढे नेले आहे ते निश्चितच प्रशंसनीय आहे. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी भारतासाठीचे आपले हे योगदान प्रशंसनीय आहे. मित्रहो, काशीचे महानपण, या नगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण जे काम करत आहात ते अतुलनीय आहे.
मात्र चार वर्षापूर्वीचा काळ आपण विसरता कामा नये.जेव्हा वाराणसीमधली व्यवस्था मोडकळीला आली होती. चोहो बाजूनी कचरा, घाण, खराब रस्ते, खांबावरून लटकणाऱ्या विजेच्या तारा, वाहतुकीच्या कोंडीने ग्रासलेले शहर, बाबद्पुरा विमानतळापासून शहराला जोडणारा रस्ता आपण विसरला नसाल, ज्यावर आपण अवलंबून होता. किती जणांना त्रास झाला असेल. गंगा नदीची, घाटांची काय स्थिती होती तेही सर्वाना माहित आहे संपूर्ण शहर आणि गावातल्या कचऱ्यामुळे, गंगा नदीवर परिणाम होत असे आणि आधीचे सरकार या साऱ्या व्यवस्थेबद्दल बेपर्वा होते. गंगा नदीच्या नावाखाली किती पैसा पाण्यात गेला त्याचा हिशेबच नाही. एकीकडे गंगा नदीच्या प्रवाहावर परिणाम होत होता,गंगा जलाच्या शुद्धतेवर संकट होते आणि दुसरीकडे काही जणांच्या तिजोऱ्या भरत होत्या अशा परिस्थितीत गंगा नदी स्वच्छ करण्याचा निश्चय केला गेला.गंगा मातेचे पाणी स्वच्छ करण्याचे अभियान वेगाने सुरु आहे. केवळ बनारसच नव्हे तर गगोत्रीपासून गंगा सागर पर्यंत एकाच वेळी प्रयत्न सुरु आहेत. केवळ साफ सफाई नव्हे तर शहरांमधला कचरा गंगा नदीत पडत कामा नये यासाठीही व्यवस्था करण्यात येत आहे.21 हजार कोटी रुपयांच्या दोनशेहून अधिक योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी सांडपाण्याशी संबंधित काही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही इथे करण्यात आले. मित्रहो, सरकार याचीही खातरजमा करत आहे की की हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण होईल तो नीट चालेल,योग्य पद्धतीने चालेल. कारण आधीच्या सरकारची ही कार्य पद्धती होती की प्रक्रिया प्रकल्प तर निर्माण केले जायचे मात्र ते ना पूर्ण क्षमतेने काम करत असत, ना दीर्घ काळ चालत असत. आता जे प्रकल्प निर्माण केले जात आहेत, त्यांच्या निर्मितबरोबर त्यांच्या अस्तित्वाचा अवधी ठरविला जात आहे की कमीत कमी 15 वर्षे तो चालावा. म्हणजेच आमचा भर केवळ सांडपाणी प्रकल्प निर्माण करण्यावर नाही तर तो चालवण्यावरही आहे. यासाठी वेळ आणि श्रम जास्त लागतात मात्र एक स्थायी व्यवस्था निर्माण केली जात आहे येत्या काळात बनारसच्या जनतेला याचे चांगलेपरिणाम दिसू लागतील .
बंधू-भगिनींनो, आज इथे जे काम होत आहे ते बनारसला स्मार्ट सिटी म्हणून घडवण्यासाठी आहे.नियंत्रण केंद्रासाठी काम वेगाने सुरु आहे.संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे, सार्वजनिक सुविधांचे नियंत्रण इथुन होणार आहे.अशा सुमारे 10 प्रकल्पांवर काम सुरु आहे. मित्रहो, स्मार्ट सिटी हे केवळ शहरांच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचे अभियान नव्हे तर देशाला एक नवी ओळख देण्याचे हे अभियान आहे.युवा भारत, नव भारताचे हे प्रतिक आहे.अशाच प्रकारे मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया,अभियान जनतेचे जीवन सुगम आणि सुलभ करण्याचे काम करत आहेत.यामध्ये उत्तर प्रदेशही अग्रगण्य भूमिका बजावत आहे. मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, आपण जे उद्योग धोरण आखले आहे, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे त्याचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत.काही दिवसांपूर्वी नोएडा मधे सॅमसंगच्या फोन निर्मिती करणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या कारखान्याचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली.यामुळे हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. आपल्याला हे ऐकून अभिमान वाटेल की गेल्या चार वर्षात मोबाईल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या दोनवरून 120 झाली आहे.ज्या पैकी 50 पेक्षा जास्त कारखाने आपल्या उत्तर प्रदेशात आहेत. हे कारखाने चार लाखाहून जास्त युवकांना आज रोजगार पुरवत आहेत.
मित्रहो,मेक इन इंडिया बरोबरच डिजिटल इंडिया हे अभियानही रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सिध्द होत आहे. याचाच परिणाम म्हणून टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस म्हणजेच टी सी एस च्या बी पी ओ ची आज इथे सुरवात झाली आहे. हे केंद्र बनारसमधल्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येईल. बंधू-भगिनीनो, रोजगाराच्या बाबतीत इथेही सरकार माता भगिनींकडे लक्ष पुरवत आहे. स्वयं रोजगारासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून हमी शिवाय कर्ज उपलब्ध करून द्यायचे असो किंवा एलपीजीचा मोफत सिलेंडर असो. गरीबमाता-भगिनींच्या जीवनात परिवर्तन घडत आहे. सर्वांपर्यंत स्वच्छ उर्जा पोहोचावी यासाठी इथे काशीमध्ये मोठा प्रकल्प सुरु आहे. शहर गॅस वितरण व्यवस्थेचे लोकार्पण हा त्याचाच भाग आहे.यासाठी अलाहाबाद पासून बनारस पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. बनारसमध्ये आठ हजार घरात पाईप गॅस पोहोचला आहे आणि भविष्यात 40 हजारपेक्षा जास्त घरात या जोडण्या देण्याचे काम सुरु आहे.मित्रहो, ही केवळ इंधनाशी सबंधित व्यवस्था नाही तर शहराची परीरचना बदलण्याचे अभियान आहे. पीएनजी असो किंवा सीएनजी, या पायाभूत सुविधा शहराचे प्रदूषण कमी करणार आहेत.आपण विचार करा की बनारसमधल्या बसगाड्या,कार आणि रिक्षा सीएनजीवर चालू लागतील तेव्हा याच्याशी संबंधित किती रोजगाराची निर्मिती होईल.
मित्रहो, जेव्हा मी जपानच्या पंतप्रधानांना भेटतो किंवा कोणतीही हिंदुस्तानी व्यक्ती जपानच्या पंतप्रधानांना भेटते तेव्हा मी सातत्याने पाहतो, जपानचे पंतप्रधान त्यांचा काशीमधला अनुभव, काशीमधल्या जनतेने जे स्वागत केले त्याबाबत, त्या व्यक्तीला वारंवार सांगतात.मागच्या वेळेला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माझ्यासमवेत आले,तेव्हा काशी वासियांनी त्यांचा जो सन्मान केला जे गौरवगान केले, त्याचा उल्लेख संपूर्ण फ्रान्स आज गौरवाने करत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष त्याचा उल्लेख करतात.ही काशीची परंपरा आहे,ही आपलेपणाची भावना आहे. काशीने आपला हा सुगंध अवघ्या जगात पोहोचवला आहे. काशीचा हा स्नेह अद्भुत आहे. काशीच्या माझ्या बंधु – भगिनीनो, काशीचा पाहुणचार जगाला दाखवण्याची संधी आता येणार आहे. आपण संपूर्ण तयारी कराल? शानदार स्वागत कराल? काशीचे नाव उज्वल कराल ? प्रत्येक अतिथीचे गौरव गान कराल?नक्की कराल? जानेवारी महिन्यात 21 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत काशीमधे प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.जगभरातले भारतीय या प्रवासी दिनासाठी इथे येणार आहेत. जगभरातले भारतीय लोक आहेत मग ते उद्योगपती, असतील राजनीतीक असतील,सरकार चालवत असतील, हे सर्व लोक संपूर्ण जगभरातून एकाच वेळी 21 ते 23 जानेवारीत काशीमधे येणार आहेत. काही लोक तर असे आहेत ज्यांचे पूर्वज तीन किंवा चार पिढ्या पूर्वी परदेशात स्थायिक झाले, त्यानंतर कधी परतले नाहीत,अशा लोकांची मुले पहिल्यांदा या भूमीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. एवढी मोठी घटना काशीसाठी महत्वपूर्ण आहे की नाही हे मला सांगा.या लोकांच्या स्वागताची तयारी आपल्याला करायला हवी की नाही? जगभरातून येणाऱ्या या लोकांचा पाहुणचार करण्याचे वातावरण प्रत्येक चौकात तयार व्हायला हवे की नाही? संपूर्ण जगात काशीची प्रशंसा व्हायला हवी की नको? आतापासूनच तयारीला लागा.21 ते 23 हे पाहुणे इथे राहतील आणि 24 ला हे सर्व पाहुणे प्रयागराज कुंभ दर्शन करतील आणि 26 जानेवारीला दिल्लीला पोहोचतील. माझ्या काशिवासियाना मी त्यांच्या पाहुणचार व्यवस्थित करावा असा आग्रह करत आहे. काशीवासी म्हणून मी सुद्धा आपल्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून 21 तारखेला आपणा बरोबर राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण जगभरातून लोक येणार आहेत. ही महत्वपूर्ण घटना आहे म्हणूनच त्यांच्या स्वागताची तयारी करण्यासाठी मी आपणा सर्वाना निमंत्रण देत आहे.
काशीच्या माझ्या बंधू-भगिनीनो,आज आपणाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आपणा सर्वाना अनेक योजना समर्पित करण्याची, भूमी पूजन करण्याची संधी मिळाली. आपला खासदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे की आपणासाठी जितके काम, जितकी मेहेनत मी करु शकेन तितकी मी करत राहीन. माझ्या काशीवासियांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्याबरोबर मोठ्याने म्हणा, हर हर महादेव. खूप-खूप धन्यवाद.