कांडला म्हणजे एकप्रकारे छोटा भारत आहे. मिनी इंडिया. आणि आज विमानतळावरून कांडला बंदरापर्यंत येत असलेल्या या रस्त्यावर आपण सर्वांनी मिळून माझे ज्याप्रकारे स्वागत केले, सन्मान केला म्हणजे एक प्रकारे संपूर्ण भारतच रस्त्याच्या दुतर्फा उभा आहे, असे चित्र निर्माण झाले होते. आपण इतक्या प्रेमाने केलेले स्वागत, दिलेला सन्मान याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.
मुख्यमंत्री म्हणून कार्य करताना, कच्छविषयी मला वाटणारा जिव्हाळा, प्रेम काही वेगळया शब्दांमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही. मी वारंवार कच्छला येत होतोच. कच्छच्या या भूमीमध्ये एक ताकद आहे. 200 वर्षांपूर्वी एखादा कच्छी परिवार कामानिमित्त जगाच्या दुस-या टोकाला गेला असला तरी आणि त्याची चैथी, पाचवी पिढी जरी या क्षेत्रापासून दूर राहत असली तरी जर का त्याची तब्येत थोडी बिघडली की त्याला आपल्या गावी कधी एकदा परत जाता येईल, असे वाटते. कारण आपल्या कच्छच्या हवेमुळे आपला आजार बरा होईल, असे त्याला वाटत असते. आपल्या कच्छचे लोक पाणीदार तर आहेतच परंतु ते बिनापाणीही आयुष्य कंठतात. पाण्याचे महात्म्य कच्छच्या लोकांना चांगलंच माहीत आहे. अथांग समुद्र, मरूभूमी, पर्वतराजी, गौरवपूर्ण इतिहास, पाच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या प्राचीन मानवी संस्कृतीचे पुरावे, अशा कच्छकडे आणखी काय नाही, अनेक गोष्टी आहेत. फक्त हिंदुस्थानकडे संपूर्ण दुनियेला खूप काही देण्याची ताकद या भूमीमध्ये आहे आणि जगाला लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित करण्याचे सामर्थ्य या धरतीमध्ये आहे.
आत्ता नितीनजी सांगत होते की, आज वैश्विक अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, जगाच्या बाजारपेठेचे महात्म्य आजच्या काळात वाढले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा लाभ उठविण्यासाठी या स्पर्धेमध्ये भारताने आघाडीवर राहून, पुढे वाटचाल केली पाहिजे. विश्व व्यापारामध्ये भारताने आपले स्थान पक्के केले पाहिजे. यासाठी भारताकडे उत्तमोत्तम बंदरांची सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. या कांडला बंदरामध्ये आणि आज ज्या गोष्टी तिथे निर्माण होत आहेत, ते पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात येईल की, इतक्या कमी अवधीमध्ये संपूर्ण आशियामध्ये सर्वात प्रमुख बंदर म्हणून आपले स्थान कांडलाने कसे निर्माण केले?
गेल्या दोन वर्षांमध्ये मग द्रवरुप किंवा घन माल वहन करणारी नौका (लिक्विड कार्गो असेल अथवा ड्राय कार्गो) असेल , बंदर क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या लोकांना तसेच या क्षेत्राची अर्थनीती माहीत असलेल्या तज्ञांना या मालवाहतुकीमध्ये झालेली वाढ पाहून नक्कीच अचंबा वाटला असेल. कांडला बंदराची प्रगती पाहून त्यांना आश्चर्य वाटत असेल. बंदराच्या व्यवहारात काम करणारे लोकही या प्रगतीकडे नवलाने पाहत असतील. संघटना असते, ती हळूहळू काम करत असते. परंतु आपण सगळयांनी मिळून, एकत्रितपणाने बंदराची ताकद वाढवलेली असते. एक ताकद आहे, पायाभूत सोई-सुविधांची. तर दुसरी ताकद आहे क्षमतेची, पारदर्शकतेची आणि त्याचा इतका मोठा परिणाम देशावरही होवू शकतो. त्याचा लाभ देशाला किती मोठ्या प्रमाणात होतो, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.14203400_1495458598_inner1.jpg)
आज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे एक सभा केंद्र बनवण्यात येत आहे. विशाल क्षेत्रावर मोठे सभा केंद्र बनवले जात आहे. इथल्या लोकांची आवश्यकता लक्षात घेवून त्याची निर्मिती करण्यात येत आहे. या सभा केंद्राचा आराखडा मी पाहिला, परंतु मला वाटतेय की, रवीभाई यांनी हा आराखडा अतिशय घाबरत, घाबरत बनवला असावा. त्यांना इतक्या प्रचंड कार्यासाठी निधी कोठून येणार? इतके मोठे काम कसे होणार? असे प्रश्न पडले असावेत, म्हणून त्यांनी भीत भीत योजना तयार केली असावी. माझ्या लक्षात हे आल्यानंतर मी नितीनजींना म्हणालो, काम चांगले आहे. तो आराखडा लहान करून, ते काम कमी करू नये. परंतु हेच काम थोडं वेगळया पद्धतीने करता येईल का याचा विचार करावा. त्यांनी मला विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला. आणि नंतर नव्याने विचार करून सांगतो, असंही म्हणाले. आता या सभा केंद्राचा विचार केला तर ज्याप्रकारे कच्छचा विकास होत आहे, तो पाहिला पाहिजे. कच्छ जिल्हयाचा ज्या वेगाने विकास होत आहे, तितका वेग संपूर्ण हिंदुस्थानमधल्या कोणत्याही जिल्हयाने गाठलेला नाही. सर्वात तेजीने पुढे जात असलेल्या जिल्हयाचे नाव कच्छ आहे. आज या गावांकडे पाहिल्यानंतर, 1998च्या भयंकर चक्रीवादळाने आम्हाला संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं, याची कोणाला कल्पनाही येणार नाही. 2001 च्या प्रलंयकारी भूकंपाने कच्छ जिल्हा जमीनदोस्त झाला होता. परंतु या जिल्हयाची ताकद लक्षात घ्या, इथल्या लोकांचे गुण पाहा, संकटांनंतरही आज हा जिल्हा वेगाने प्रगती करत आहे. आणि कांडला काही फक्त गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणार आहे, असे नाही. वाहतुकीच्या दुनियेचा विचार केला तर हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेमध्येही कांडला बंदर अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे. आणि आम्हीही याच दिशेने कार्य करून पुढे जाण्याचा विचार करीत आहोत. सागरी व्यापार करण्याची हजारों वर्षांपासून भारताची परंपरा आहे. पाच हजार वर्षांपूर्वी लोथलमध्ये सागरी व्यापाराचे मोठे केंद्र होते. त्याच्याच बाजूला बल्लभी विद्यापीठ होते. या बल्लभी विद्यापीठामध्ये 80 पेक्षा जास्त देशांमधील मुले अध्ययन करीत होते. आणि लोथलच्या बंदरावर 84 देशांचे ध्वज फडकत असायचे, असं सांगितलं जातं. हजारो वर्षांपूर्वी महासमुद्रात वापरल्या जाणा-या जहाजांची बांधणी कच्छमध्ये केली जात होती. आमचे पूर्वज या वैशिष्ट्यपूर्ण कामात वाकबगार होते. जहाज बांधणीची परंपरा कच्छची होती. आम्ही जगाला जहाजांचा पुरवठा करत होतो. ही आमची ताकद होती. आज हेच सामथ्र्य आपण पुन्हा एकदा प्राप्त करू शकतो.
आज कांडला बंदरामध्ये इमारतीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात आवाक होते. आणि आमचे कच्छी लोक हंदुस्थानच्या कानाकोप-यात जाऊन लाकडाचा व्यापार करतात. या इमारतीच्या लाकडाला ‘मूल्यवर्धक वस्तू’ असे मानून कच्छी भूमीमध्ये हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करून लाभदायक ठरू शकतो. दुनियाभरातून लाकूड इथे आल्यानंतर आणि त्यावर कलाकारी असेल, हस्तकला यासारखे उद्योग करून तेच लाकूड चांगल्या रुपामध्ये पुन्हा संपूर्ण देशात जाऊ शकणार आहे. इथं येणा-या लाकडापासून घर बनू शकेल, इमारत, निवास, मंदिर, पूजा घर अशा गोष्टी बनू शकतात. आणि आपण दुनियेला वेगळी कलाकुसरीची छानशी भेट देवू शकणार आहे. ही कला इथेच विकसित करता येऊ शकते. मीठाचा व्यापार आपण जितका सागरी मार्गाने करू तितका त्याचा खर्च कमी होणार आहे. आपल्याला साडेसात हजार किलोमिटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे, त्यामुळे सागरकिनारी मार्ग परिवहन आपण विकसित करण्याची आवश्यकता आहे. असा किनारी मार्ग सुविधाजनक असेल तर आपण रस्ते आणि रेल्वे यांच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याची काय गरज आहे? सागरी मार्गांनी हिंदुस्थानातच जहाजांच्या माध्यमातून माल आपण का नाही पाठवायचा? कोलकात्यालाही सागरी जहाजाने माल पाठवता येवू शकतो. रस्ते, रेल्वेने संपूर्ण हिंदुस्थानला ओलांडून कोलकत्याला माल पाठवण्याची आवश्यकता नाही, तर समुद्री मार्गाने थेट माल पाठवता येतो. अशा पद्धतीने व्यवस्थेमध्ये संपूर्ण परिवर्तन करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. या नवीन बदलांचा लाभ आगामी काही दिवसांमध्ये मिळू शकणार आहे.
आमच्या नितीनजींचे एक स्वप्न आहे, लोथलमध्ये भारताची जी महान ताकद आहे, त्याचा परिचय संपूर्ण विश्वाला झाला पाहिजे. याप्रकारचे एक संग्रहालय कसे बनेल, हे पाहिले पाहिजे. विश्व व्यापारामध्ये अमेरिकेतील विद्यापीठांनी खूप महत्वपूर्ण काम केले आहे. मनुष्य बळ विकासाचे काम महत्वपूर्ण आहे. आणि आत्ताच मुख्यमंत्री सांगत होते, त्यांनी सागरी विद्यापीठाच्या प्रस्तावाचे विधेयकही विधानसभेत मंजूर केले आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मनुष्य बळ विकासाचे हे काम केवळ गुजरातच्या सागरी किनारी प्रदेशालाच उपयोगी ठरणार नाही तर हिंदुस्थानच्या व्यापाराच्या दृष्टीनेही एक शक्ती, ताकद देणारे ठरणारे आहे, असा मला विश्वास वाटतो.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.26934300_1495460953_inner3.jpg)
या देशाच्या गरीबाचे आयुष्य बदलवून टाकायचे आहे. मग स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी असेल, नाहीतर झोपडीमध्ये वीज पोहोचवण्यासाठी असेल हे प्रयत्न झाले पाहिजेत. आमचं स्वप्न आहे, 2022 पर्यंत या देशातल्या गरिबातल्या गरीब माणसाचेही राहते, स्वतःचे घर असले पाहिजे. या स्वमालकीच्या घरात त्याच्याकडे वीज असली पाहिजे, घरात पाणी आले पाहिजे, आणि त्याच्या घरामध्येच शौचालयही पाहिजे. असे घर सगळयांना मिळाले पाहिजे, असे स्वप्न उराशी बाळगून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काम करायचे आहे.
सध्याचे चालू वर्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. भारतातल्या गरिबातल्या गरीब व्यक्तीचे कल्याण कसे होईल, हा विचार केंद्रस्थानी ठेवून त्यांनी देशहिताविषयी चिंतन केले होते. समाज कल्याणाचा एक वेगळा विचार उपाध्यायजींनी दिला होता. आज दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून मी कांडला बंदर न्यासाला, नितीनजींना आणि त्यांच्या विभागाला एक गोष्ट सुचवू इच्छितो की, आपण या कांडला बंदराचे रूपांतरण पंडित दीनदयाळ विश्वस्त बंदर न्यास, कांडला असे विधिवत करू शकतो का, याचा विचार करावा. अशी प्रक्रिया सुरू करावी असं वाटतं, कारण दीनदयाळजींनी गरिबांच्या उद्धारासाठी काम केले. कांडला बंदराला त्यांचे नाव लावणे उचित ठरणार आहे. कांडला बंदरावर काम करताना दीन-दयाळूपणाचा भाव आमच्या मनात कायम राहिला पाहिजे. तरच आपण समाजातल्या दबलेल्या, वंचित, शोषित, पीडित घटकांसाठी काम करू शकणार आहे. त्याच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी आपण दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेने काम करू शकणार आहे.
मला पुन्हा एकदा कच्छच्या भूमीवर आपल्या समोर येण्याची संधी आपण दिलीत. आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद दिले, यासाठी मी आपला आभारी आहे. मी नितीनजींचा आभारी आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. खूप खूप धन्यवाद.