"गेल्या 7 वर्षांत, महोबाने पाहिले आहे की कशा प्रकारे सरकार दिल्लीतील बंद खोल्यांमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे."
“शेतकऱ्यांना समस्यांमध्ये अडकवून ठेवणे हा काही राजकीय पक्षांचा नेहमीच आधार राहिला आहे. ते समस्यांचे राजकारण करतात आणि आम्ही उपाय शोधण्याचे राष्ट्रीय धोरण अवलंबतो.
“बुंदेलखंडमधील जनता प्रथमच सरकार विकासासाठी काम करताना पाहत आहे. यापूर्वीच्या सरकारांना उत्तर प्रदेशला लुटण्याचा कंटाळा आला नाही, आम्ही काम करताना थकत नाही.
घराणेशाही सरकारने शेतकऱ्यांना केवळ वंचित ठेवले. ते शेतकर्‍यांच्या नावाने घोषणा द्यायचे, मात्र शेतकर्‍यापर्यंत एक पैसाही पोहोचला नाही.
"कर्मयोगींचे डबल इंजिन सरकार बुंदेलखंडच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करत आहे"

भारत माता की, जय!

भारत माता की, जय!

जौन महोबा की धरा में, आल्हा-ऊदल और वीर चंदेलों की वीरता कण-कण में माई है, वा महोबा के वासियन को, हमाओ, कोटि-कोटि प्रनाम पौंचे।

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह, जीएस धर्मेश जी, संसदेतले माझे सहकारी आर के सिंह पटेल जी, पुष्पेंद्र सिंह जी, उत्तर प्रदेश विधान परिषद आणि विधानसभेतले स्वतंत्रदेव सिंह जी, राकेश गोस्वामी जी, इतर लोक प्रतिनिधी आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,

महोबाच्या ऐतिहासिक धरतीवर आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती येते. देश सध्या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि राष्ट्र निर्माण कार्यात आदिवासी बंधू-भगिनींच्या योगदानाला समर्पित आदिवासी गौरव सप्ताह साजरा करत आहे. या काळात वीर आल्हा आणि ऊदल यांच्या पुण्य भूमीवर येणे हे माझे भाग्य आहे. गुलामीच्या त्या काळात भारतात एक नवे चैतन्य जागृत करणारे गुरु नानक देव जी यांचे आज प्रकाश पर्वही आहे. देशातल्या आणि जगभरातल्या लोकांना मी गुरु पूरबच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. भारताची शूर कन्या, बुंदेलखंडची शान, वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचीही आज जयंती आहे. या कार्यक्रमा नंतर मी झाशी इथेही जाणार आहे. संरक्षण खात्याचा एक मोठा कार्यक्रम तिथे सुरु आहे.

बंधू-भगिनीनो,

गेल्या सात वर्षात दिल्लीतल्या बंदिस्त खोल्यांमधून बाहेर काढत देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत सरकार कसे आणले आहे याचा महोबा साक्षी आहे. देशाच्या माता-भगिनींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणाऱ्या योजना आणि निर्णयांची ही भूमी साक्षीदार राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच इथून संपूर्ण देशासाठी उज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्याची सुरवात झाली. काही वर्षांपूर्वी महोबा इथूनच मुस्लीम भगिनींना तिहेरी तलाकच्या त्रासापासून मुक्ती देण्याचे आश्वासन मी देशाच्या कोट्यवधी मुस्लीम भगिनींना दिले होते. महोबा इथे दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे.

बंधू-भगिनीनो,

आज बुंदेलखंडच्या बंधू-भगिनींना आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू-भगिनींना मोठी भेट देण्यासाठी मी आलो आहे.

आज अर्जुन सहायक प्रकल्प, रतौली धरण प्रकल्प, भावनी धरण प्रकल्प आणि मझगांव चिल्ली स्प्रिंकलर सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले. 3 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पांमुळे महोबा मधल्या लोकांच्या बरोबरच हमीरपुर, बांदा आणि ललितपुर जिल्ह्यातल्या लाखो लोकांना, लाखो शेतकरी कुटुंबानाही याचा लाभ मिळणार आहे. 4 लाखाहून अधिक लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. अनेक पिढ्यांपासून असलेली पाण्याची प्रतीक्षा आता समाप्त होणार आहे.

मित्रहो,

आपल्या उत्साहाचा मी आदर करतो. आपला स्नेह माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मात्र पुढे जागा नाही म्हणून आपण पुढे येण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे आणि तिथेही थोडी शांतता राखा.

मित्रहो,

गुरु नानक देव जी यांनी म्हटले आहे -

पहलां पानी जीओ है, जित हरिया सभ कोय!!

म्हणजे पाण्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे कारण पाण्यामुळेच अवघ्या सृष्टीला जीवन मिळते. शेकडो वर्षांपूर्वी महोबासह हा संपूर्ण प्रदेश जल संरक्षण आणि जल व्यवस्थापन यांचा उत्तम आदर्श होता.

बुंदेल, परिहार आणि चंदेल राजवटीत इथे तलावांचे जे काम झाले ते आजही जल संरक्षणाचे उत्तम उदाहरण मानले जाते. सिंध, बेतवा, धसान, केन आणि नर्मदा नदी यांच्या पाण्याने बुंदेलखंडला समृद्धी दिली आणि प्रसिद्धीही दिली. याच चित्रकुट, याच बुंदेलखंडने प्रभू राम यांना वनवासात सोबत केली, इथल्या वनसंपदेनेही त्यांना आशीर्वाद दिला. मात्र मित्रहो, काळाबरोबर हा प्रदेश पाण्याच्या समस्या आणि इथून पळ काढण्याचे, स्थलांतर करण्याचे केंद्र कसे ठरला हा प्रश्न आहे. आपल्या मुलीला लग्न करून या भागात पाठवायला लोक टाळाटाळ का करू लागले, इथल्या मुली,लग्न होऊन आपण पाणी असलेल्या भागात जावे अशी इच्छा का बाळगू लागल्या ? महोबाचे लोक, बुंदेलखंडचे लोक या प्रश्नांची उत्तरे जाणतात.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दीर्घ काळ शासन करणाऱ्यांनी आळीपाळीने हा प्रदेश उजाड करण्यात कोणती कसर ठेवली नाही. इथली जंगले, इथली संसाधने माफियांच्या स्वाधीन कशी केली हे कोणापासून लपलेले नाही. आता पहा या माफियांवर उत्तर प्रदेशात बुलडोझर चालवला जाऊ लागल्यावर काही जणांनी गदारोळ सुरु केला. त्यांनी कितीही गदारोळ केला तरी उत्तर प्रदेशाच्या, बुंदेलखंडच्या विकासाचे काम थांबणार नाही.

मित्रहो,

या लोकांनी, बुंदेलखंडच्या लोकांशी कसे वर्तन केले ते इथले लोक कधीच विसरणार नाहीत. हात पंप, नलिका विहिरी याबाबत बरच काही बोलले गेले मात्र आधीच्या सरकारने हे सांगितले नाही की पाण्याचाच अभाव असेल तर यात पाणी कसे येईल ? तलावांच्या नावाने उद्घाटने बरीच करण्यात आली मात्र झाले काय हे माझ्या पेक्षा आपणच उत्तम जाणता. धरणे, तलाव यांच्या नावाखाली खोदकामाच्या योजनांमध्ये कमिशन, दुष्काळ निवारणात घोटाळे, बुंदेलखंडला लुटत आधीचे सरकार चालवणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा स्वार्थ साधला आणि आपणा सर्वांची कुटुंबे मात्र पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी व्याकूळ राहिली याची त्यांना फिकीर नव्हती.

बंधू-भगिनीनो,

यांनी कसे काम केले याचे एक उदाहरण म्हणजे हा अर्जुन सहायक प्रकल्प आहे. वर्षानुवर्षे हा प्रकल्प रखडला, अर्ध्यावर पडून राहिला. देशात असे रखडलेले प्रकल्प, अशा रखडलेल्या सिंचन योजनांचा तपशील मागवायला 2014 नंतर मी सुरवात केली. अर्जुन सहाय प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी उत्तर प्रदेशच्या त्या काळातल्या  सरकारशी वारंवार चर्चा केली, अनेक स्तरावर चर्चा केली.  मात्र बुंदेलखंडच्या या गुन्हेगारांनी हा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात कोणतीही रुची दाखवली नाही. 2017 मध्ये योगी जी यांचे सरकार आल्यानंतर अखेर या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आणि आज हा प्रकल्प आपल्याला, बुंदेलखंडच्या लोकांना समर्पित आहे. बुंदेलखंडच्या लोकांनी अनेक दशके लोकांना लुटणारी  सरकार पाहिली. बुंदेलखंडचे लोक, इथल्या विकासासाठी काम करणारे सरकार प्रथमच पाहत आहेत. बुंदेलखंडच्या माझ्या बंधू-भगिनीनो, हे कटू सत्य कोणी विसरू शकत नाही की ते उत्तर प्रदेशची लुट करून थकत नव्हते आणि आम्ही काम करताना थकत नाही.

मित्रांनो,

शेतकऱ्यांना कायम समस्यांमध्ये  अडकवून ठेवणे हा काही राजकीय पक्षांचा आधार राहिला आहे.ते समस्यांचे राजकारण करतात आणि आम्ही उपायांचे राष्ट्रीय धोरण आणतो. केन-बेथवा नदीजोड उपाय आपल्याच सरकारने शोधला आहे, सर्व पक्षांशी संवाद साधून मार्ग सापडला आहे. केन-बेथवा जोडणीचा फायदा भविष्यात येथील लाखो शेतकऱ्यांना  होणार आहे. योगीजींच्या सरकारने गेल्या साडेचार वर्षांत बुंदेलखंडमध्ये अनेक जलप्रकल्पांवर काम सुरू केले आहे.आज मसगाव-चिल्ली तुषार सिंचन  योजनेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे लोकार्पण हे  सिंचनात येत असलेली आधुनिकता दर्शविते.  .

मित्रांनो,

मी ज्या गुजरातमधून आलो आहे त्या गुजरातचे जमिनीवरील वास्तव , पूर्वीच्या गुजरातमधील परिस्थिती बुंदेलखंडपेक्षा वेगळी नव्हती.आणि म्हणून मी तुमचा त्रास समजू शकतो, मला तुमची वेदना समजते. नर्मदा मातेच्या आशीर्वादाने, सरदार सरोवर धरणाच्या आशीर्वादाने आज गुजरातमधील कच्छपर्यंतच्या वाळवंटातही पाणी पोहोचत आहे.गुजरातमध्ये जे यश मिळाले तेच यश बुंदेलखंडमध्ये मिळवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस कार्यरत आहोत. बंधू आणि भगिनींनो, जसे बुंदेलखंडमधून स्थलांतर होते,तसे  माझ्या गुजरातमधील  कच्छमधून  सतत स्थलांतर होत असे. देशामध्ये लोकसंख्या वाढायची, कच्छ जिल्ह्यात कमी व्हायची.लोक कच्छ सोडून जायचे. पण जेव्हा मला सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा आज भारतात जे  वेगाने प्रगती करणारे  प्रमुख  जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपैकी  कच्छही  हा वेगाने प्रगती करणारा जिल्हा  बनला आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक भागातील माझे बंधू-भगिनीही कच्छमध्ये येऊन नशीब आजमावत आहेत.आणि मी माझ्या कच्छच्या अनुभवावरून सांगतो , बुंदेलखंडला आपण पुन्हा ती ताकद देऊ शकतो, पुन्हा नवजीवन देऊ शकतो.येथील माता-भगिनींची सगळ्यात मोठी अडचण दूर करण्यासाठी बुंदेलखंडमध्ये जल जीवन अभियानांतर्गत कामही वेगाने सुरू आहे.बुंदेलखंड तसेच विंध्याचलमध्ये प्रत्येक घरात जलवाहिनीद्वारे  पाणी पोहोचावे यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

बंधू आणि भगिनींनो,

घराणेशाही  सरकारांनी अनेक दशकांपर्यंत  उत्तर प्रदेशातील बहुतेक गावे तहानलेली ठेवली. कर्मयोगींच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात उत्तर प्रदेशातील ३० लाख कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा केला आहे. घराणेशाही  सरकारांनी  शाळांमध्ये मुलामुलींना  स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय यापासून  वंचित ठेवले, कर्मयोगींच्या दुहेरी इंजिन सरकारने मुलींसाठी शाळांमध्ये स्वतंत्र शौचालयेही बांधली आणि उत्तरप्रदेशमधील 1 लाखांहून अधिक शाळा आणि हजारो अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे  पाणीपुरवठा सुरु केला. जेव्हा गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य असते, तेव्हा हे अशाचप्रकारे काम होते,ते काम वेगाने केले जाते.

बंधू आणि भगिनींनो,

आमच्या सरकारने बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलली आहेत.गेल्या 7 वर्षात 1600 हून अधिक दर्जेदार बियाणांची निर्मिती करण्यात आली आहे.यातील अनेक बियाणी कमी पाण्यात जास्त उत्पादन देतात.आज सरकार बुंदेलखंडच्या मातीला अनुकूल भरड धान्ये, कडधान्ये आणि तेलबियांवर लक्ष केंद्रित करत आहे.गेल्या काही वर्षांत डाळी आणि तेलबियांची विक्रमी खरेदी झाली आहे.अलीकडेच, मोहरी, मसूर यांसारख्या  अनेक डाळींसाठी  किमान आधारभूत किंमत  400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवण्यात  आली आहे. भारत खाद्यतेलाच्या क्षेत्रात  स्वयंपूर्ण झाला पाहिजे, दरवर्षी खाद्यतेल आयात करण्यासाठी 80 हजार कोटी रुपये परदेशात पाठवले जातात , ते 80 हजार कोटी शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजेत, तुम्हाला ते मिळावेत, , देशातील शेतकऱ्यांना ते मिळाले पाहिजेत, यासाठी  राष्ट्रीय अभियान सुरु करण्यात आले आहे. यामुळे बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांनाही मोठी मदत होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

घराणेशाही सरकारांना शेतकऱ्यांना केवळ वंचित ठेवायचे होते.ते शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा करायचे ,पण शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही.तर पंतप्रधान शेतकरी  सन्मान निधीतून आम्ही आतापर्यंत १ लाख ६२ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत.ही संपूर्ण रक्कम प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचली आहे.  किसान क्रेडिट कार्डच्या  सुविधेपासूनही छोटे शेतकरी आणि पशुपालकांना घराणेशाही सरकारांनी वंचित ठेवले होते. आमच्या सरकारने छोट्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेशी  जोडण्याचे काम केले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

बुंदेलखंडमधून होणारे स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीने हा प्रदेश रोजगाराच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.बुंदेलखंड एक्सप्रेस, हा बुंदेलखंड द्रुतगती मार्ग आणि उत्तर प्रदेश संरक्षण मार्गिका  हे देखील याचा मोठा पुरावा आहेत.येत्या काळात येथे शेकडो उद्योग उभारले जातील, तरुणांना येथे रोजगार मिळेल.आता या भागांचे भवितव्य,केवळ एका महोत्सवाची बाब ठरणार नाही.इतकेच नव्हे तर या प्रदेशाचा  इतिहास, श्रद्धा  , संस्कृती आणि निसर्गाचा खजिनाही रोजगाराचे मोठे माध्यम बनत आहे. हे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे. या स्थानाला गुरू गोरखनाथ जी यांचा  आशीर्वाद लाभला आहे.राहिला सागर सूर्य मंदिर असो, माँ पितांबरा शक्तीपीठ असो, चित्रकूट मंदिर असो, सोनगिरी तीर्थक्षेत्र असो, इथे काय नाही? बुंदेली भाषा, काव्य, साहित्य, गीत-संगीत आणि महोबाचा अभिमान- देशावरी पान याकडे कोण आकर्षित होणार नाही? रामायण सर्किट योजनेंतर्गत येथे अनेक तीर्थक्षेत्रे विकसित केली जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

अशा अनेक कार्यक्रमांसह डबल इंजिन असलेले सरकार हे दशक उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडचे दशक बनवण्याच्या दिशेने कार्यरत आहे.या  दुहेरी इंजिनाला  तुमच्या आशीर्वादाचे सामर्थ्य मिळत राहील,या विश्वासाने तुम्हा सर्वांची परवानगी घेऊन मी येथून झाशीच्या कार्यक्रमाला निघणार आहे.तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप खूप  आभारी आहे. माझ्यासोबत बोला -

भारत माता की, जय!

भारत माता की, जय!

भारत माता की, जय!

खूप - खूप  धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi