स्त्री आणि पुरुष गण, संस्कृती आणि साहित्याच्या तरंग आणि उमंगाने भरलेल्या कोलकात्याच्या या वातावरणात आल्यावर मन आणि मेंदू आनंदाने भरून जातो. एक प्रकारे ही माझ्यासाठी स्वतःला ताजेतवाने करण्याची आणि बंगालची वैभवशाली कला आणि संस्कृति जाणून घेण्याची आणि त्याला वंदन करण्याची संधी आहे. मित्रांनो , आता थोड्या वेळापूर्वी इथे आल्यावर , सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्यावर अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा खोडकर वय होते, जीवन जीवनातील रहस्ये उलगडणे आणि सोडवणे जसे प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या मनात असायचे, तसे माझ्याही मनात होते. खूप काही जाणून घ्यायची उत्कट इच्छा असायची. अनेक प्रश्न असायचे, आणि ढीगभर उत्तरेही असायची , त्यापैकी अनेक उत्तरे निवडणे खूप कठीण असायचे. त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी, स्पष्टीकरणासाठी कधी इथे तर कधी तिथे शोध सुरु असायचा. आणि तेव्हा त्या वयात कोलकात्याची ही भूमी, बेलूरमठची ही पवित्र माती मला इथे घेऊन यायची.
आज तुमच्याबरोबर असताना, या सर्व गोष्टींकडे पाहत होतो तेव्हा मन त्या भावनांनी भरून गेले होते. आणि हे प्रदर्शन, असे वाटत होते जणू काही ते क्षण मी स्वतः जगत आहे , जे त्या महान चित्रकारांनी, कलाकारांनी , रंगकारानी रचले आहेत, जगले आहेत. बांग्ला भूमीची, बंगालच्या मातीची ही अद्भुत शक्ति, आकर्षित करणारा सुगंध यांना वंदन करण्याची ही मला संधी आहे. याच्याशी निगडित भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.
मित्रांनो , आज पश्चिम बंगालसह भारताच्या कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रात एक खूप महत्वपूर्ण दिवस आहे, खूप मोठा दिवस आहे. भारताची कला, संस्कृती आपला वारसा 21 व्या शतकानुसार जपण्यासाठी आणि त्यांचे पुनरुत्थान, नूतनीकरण आणि पुनर्वसन करण्याचे देशव्यापी अभियान आज पश्चिम बंगालच्या या मातीतून सुरु होत आहे. या अभियानाचा खूप मोठा फायदा कोलकाताला, पश्चिम बंगालला तर मिळणार आहेच. यासाठी पश्चिम बंगालच्या कला आणि संस्कृतीशी संबंधित तुम्हा सर्व सहकाऱ्यांना आणि कला, संस्कृतीसाठी समर्पित बंगालच्या जनतेचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो , परंपरा आणि पर्यटन, हे दोन असे विषय आहेत ज्यांचा आपल्या वारशाशी आणि आपल्या भावनांशी, आपल्या ओळखीशी थेट संबंध आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे कि भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याला नव्या रंगरूपात जगासमोर आणायचा, जेणेकरून भारत जगात वारसा पर्यटनाचे मोठे केंद्र बनून उदयाला येईल. वारसा पर्यटनाची पश्चिम बंगालसह संपूर्ण देशातील पर्यटन उद्योग मजबूत करण्यात खूप मोठी भूमिका राहील. यामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. या कार्यक्रमानंतर रविंद्र सेंतु-हावड़ा ब्रिज पर्यटकांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी इंटरेक्टिव प्रकाश आणि ध्वनी सुविधा देखील सुरु होणार आहे.
मित्रांनो, आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचे जतन व्हावे आणि त्यांचे आधुनिकीकरण देखील व्हावे ही देशाची नेहमीच इच्छा राहिली आहे. या भावनेशी सहमत होत, केंद्र सरकार देशातील ऐतिहासिक इमारतींचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार करत आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसीच्या वारसा स्थळांपासून याची सुरुवात केली जात आहे. .या इमारतींमध्ये नवीन दालने , नवीन प्रदर्शने , नाटके आणि संगीत कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. देशातील पाच महत्वाची संग्रहालये आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवली जाणार आहेत. याची सुरुवात जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक कोलकातातील भारतीय संग्रहालयापासून केली जात आहे. याशिवाय दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, श्रीनगरमधल्या विद्यमान संग्रहालयांचा दर्जा देखील उंचावला जात आहे. मित्रांनो , देशातील ही वारसा स्थळे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे तर गरजेचे आहेच मात्र त्यावर देखरेख आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करायला हवी. हे लक्षात घेऊन भारतीय वारसा संवर्धन संस्थेची निर्मिती आणि त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत विचार सुरु आहे.
मित्रानो, कोलकाता, भारताच्या सर्वोच्च सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. तुमच्या भावना लक्षात घेऊन आता कोलकाताची ही समृद्ध ओळख नव्या रंगरूपात जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोलकाताची 4 महत्वपूर्ण दालने, ओल्ड करन्सी इमारत असेल, बेल्वेडेयर हाउस असेल, विक्टोरिया मेमोरियल असेल किंवा मेटकाफ हाउस असेल, यांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इथे केंद्र सरकारची जी टांकसाळ आहे, तिला नाणे आणि वाणिज्य संग्रहालय म्हणून विकसित करण्याचा देखील विचार आहे.
मित्रांनो , व्हिक्टोरिया मेमोरियलच्या 5 दालनांपैकी 2 दालने दीर्घकाळ बंद राहणे हे बरोबर नाही. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते. माझी विनंती आहे कि जे तिसरे दालन आहे, तिथे स्वात्रंत्र्य चळवळीत बंगालच्या क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाला स्थान दिले जावे.
विप्लवी भारत नावाने संग्रहालय व्हावे, ज्यात नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑरबिंदो घोष, रास बिहारी बोस, खुदी राम बोस, देशबंधु, बाघा जतिन, बिनॉय, बादल, दिनेश,यासारख्या प्रत्येक महान सैनिकाला स्थान मिळायला हवे. मित्रांनो , स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये जे झाले, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल ज्या भावना देशाच्या मनात होत्या, त्या आपण सगळेच जाणतो. देशाच्या त्या भावनांचा सन्मान करत नेताजी यांच्या नावाने लाल किल्ल्यावर संग्रहालय उभारण्यात आले, अंदमान, निकोबार बेटांपैकी एका बेटाचे नामकरण नेताजींच्या नावे करण्यात आले. जेव्हा आझाद हिंद सरकारला 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला स्वतःला लाभले. नेताजी यांच्याशी संबंधित फाईली खुल्या करण्याची मागणी अनेक वर्षे होत होती, जी आता पूर्ण झाली आहे.
मित्रांनो, नव्या वर्षात, नव्या दशकात आता पश्चिम बंगालच्या अन्य सुपुत्रांच्या योगदानाचाही योग्य सन्मान व्हायला हवा असे देशाला वाटत आहे. आता आपण सर्वजण ईश्वर चंद्र विद्यासागरजी यांची 200वी जयंती साजरी करत आहोत. तसेच 2022 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील, तेव्हा आणखी एक सुखद योगायोग घडत आहे. 2022 मध्ये महान समाज सुधारक आणि शिक्षणतज्ञ राजा राममोहन राय यांची 250 वी जयंती येते आहे. देशाचा आत्मविश्वास जगवण्यासाठी, समाजात मुली, बहिणी, युवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आहेत, तो वारसा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. त्यांचे 250 वे जयंती वर्ष आपण एक पर्व म्हणून साजरे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
मित्रांनो , देशाचा वारसा जपणे, आपली महान व्यक्तिमत्वे, आपल्या इतिहासाचे हेच चित्रण राष्ट्र निर्माणाचा प्रमुख घटक असतो. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे कि इंग्रजांच्या राजवटीदरम्यान आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाचा जो इतिहास लिहिण्यात आला, त्यात इतिहासातील काही महत्वाच्या बाबी वगळण्यात आल्या आहेत.
मित्रांनो , गुरुदेव टागोरांनी 1903 मध्ये आपल्या लेखात जे लिहिले होते, त्याचा उल्लेख आज मला बंगालच्या या पवित्र भूमीवर आवर्जून करायचा आहे. त्यांनी लिहिले होते-“भारताचा इतिहास तो नाही जो आपण परीक्षांसाठी वाचतो आणि आठवतो. काही लोक बाहेरून आले, पिता आपल्या मुलाची हत्या करतो, भावाभावांमध्ये मारामारी, सिंहासनासाठी संघर्ष होत राहिला हा भारताचा इतिहास नाही. या इतिहासात तर या गोष्टीचे वर्णनच नाही कि तेव्हा भारताचे नागरिक, भारताचे लोक काय करत होते? त्यांचे काही अस्तित्वच नव्हते का?”
मित्रांनो , गुरुदेवांनी आपल्या लेखात एक अतिशय महत्वपूर्ण उदाहरण देखील दिले होते वादळाचे. त्यांनी लिहिले होते की, “कितीही वादळे येवोत, त्या संकटाच्या वेळी, तिथल्या लोकांनी त्या वादळाचा सामना कसा केला हे अधिक महत्वाचे असते.”
मित्रांनो , गुरुदेवांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले होते कि इतिहासकारानी ते वादळ घराच्या बाहेरूनच पाहिले. जे लोक त्या वादळाचा सामना करत होते, ते इतिहासकार त्यांच्या घरी गेलेच नाहीत. आता जे बाहेरून पाहतील त्यांना केवळ वादळच दिसेल ना . त्या वादळाचा, तेव्हा तिथल्या सामान्य लोकांनी कसा सामना केला याकडे इतिहासकारांची नजर गेलीच नाही.” त्यामुळे भारतवर्षाच्या इतिहासातील अनेक गोष्टी मागेच राहिल्या.
मित्रांनो, आपल्या देशाचा इतिहास आणि त्याचा वारसा यावर नजर टाकली, तर काही लोकांनी सत्तेचा संघर्ष, हिंसा, उत्तराधिकाराची लढाई यापुरताच सीमित ठेवलेला आढळतो. मात्र या सगळ्यामध्ये, जसे गुरुदेव म्हणाले , इतिहासाचा जो आणखी एक पैलू आहे तो अधिक महत्वपूर्ण आहे. आज मला त्याबाबतही तुमच्यासमोर चर्चा करायची आहे.
मित्रांनो, अस्थिरतेच्या त्या काळात, हिंसाचाराच्या वातावरणात, त्याचा सामना करणे, देशाची चेतना जागृत ठेवणे, ती सांभाळणे, ती पुढल्या पिढी पर्यंत पोहोचवणे देखील महत्वाचे होते. दशकामागून दशके, पिढयानपिढ्या , शतकामागून शतके हे कार्य कुणी केले ?” आपली कला, आपले संत, आपले प्रेक्षक यांनी केले.आणि म्हणूनच , भारताच्या काना-कोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि संगीताशी संबंधित विशेष परंपरा पाहायला मिळतील. भारतातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला बुद्धीजीवी, संतांचा प्रभाव पाहायला मिळेल. या व्यक्तींनी, त्यांच्या विचारांनी,कला आणि साहित्याच्या विविध स्वरुपानी , इतिहास आपल्या परीने समृद्ध केला आहे सनी तुम्ही हे सगळे चांगल्या तऱ्हेने जाणता कि अशा महान व्यक्तींनी, , भारताच्या इतिहासातील काही सर्वात मोठ्या सामाजिक सुधारणांचे नेतृत्व केले. भारताला आदि शंकराचार्य, थिरुनावुक्कारासार यांच्यासारख्या कवी संतांचा आशीर्वाद मिळाला. अंदाल, अक्का महादेवी, भगवान बसवेश्वर, गुरु नानक देवजी द्वारा दाखवण्यात आलेला मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देतो. जेव्हा भारताच्या निरनिराळ्या भागात भक्ती आंदोलन सुरु झाले तेव्हा त्या प्रदीर्घ काळात अनेक संत आणि सुधारकांची गीते, विचार यांनी त्याला सम्रुद्ध केले. संत कबीर, तुलसीदासजी, एकनाथ जी, नामदेव जी, संत तुकाराम जी समाजाला जागरूक करतच राहिले. भारतातील असा कुठलाही कोपरा नव्हता जिथे त्या काळात अशा प्रकारचे महापुरुष कार्यरत नव्हते. समाज परिवर्तनासाठी राजा राममोहन राय जी आणि ईश्वरचंद्र विद्यासागरजी यांनी केलेले प्रयत्न आजही तेवढेच प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारे आपण ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, यांच्यासारख्या अनेक व्यक्तिमत्त्वांना भारताला, भारताच्या इतिहासाला समृद्ध करताना पाहिलं आहे.
सामाजिक सुधारणा, समाजातील कुप्रथांविरोधात आवाज उठवणे, त्या काळात महिला सबलीकरणाचे एवढे प्रयत्न करणे, हे देशाची चेतना जागरूक ठेवण्याचे ते प्रयत्न होते. आणि जितकी नावे तुम्ही ऐकली, अनेक नावे मी घेऊ शकलो नाही , मात्र त्यांनी साहित्य, कला, संगीत यांनाच आपल्या संदेशाचे माध्यम बनवले. हीच आहे कला-संगीत-साहित्य यांची ताकद. त्यांनी शस्त्रांच्या शक्तीने नाही, लोकशक्तीने परिवर्तन आणण्याचा इतिहास रचला. शस्त्रासमोर त्यांनी शास्त्राचे सामर्थ्य दाखवून दिले.
मित्रांनो, कुठल्याही प्रदेशाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व तिथल्या लोकांच्या भावना करतात. गीत, संगीत, कला-साहित्य यांच्या माध्यमातून जे सांगितले जाते, तीच लोकभावना असते. राजकीय आणि सैन्यशक्ति तर तात्पुरती असते, मात्र कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून ज्या लोकभावना अभिव्यक्त होतात ,त्या कायमस्वरूपी असतात. आणि म्हणूनच आपला समृद्ध इतिहास, आपला वारसा जतन करणे, त्याचे संवर्धन करणे भारतासाठी, प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. हीच एक अशी संपत्ती आहे जी आपल्याला जगातील अन्य देशांपासून वेगळी करते.
मित्रांनो, संस्कृतीचे रक्षण करण्याबाबत डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी म्हणाले होते-“आम्हाला दुःख या गोष्टीचे नाही कि पाश्चिमात्य ज्ञानाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले. दुःख या गोष्टीचे आहे की, हे ज्ञान आपल्यावर भारतीय संस्कृतीशी तडजोड करत थोपवण्यात आले. दोन्हीमध्ये समन्वय साधण्याची, ज्यात भारतीय संस्कृतीला नजरेआड केले जाणार नाही, ती संपवली जाणार नाही हे पाहणे गरजेचे होते. डॉक्टर मुखर्जी यांचे हे मत त्या काळी देखील महत्वपूर्ण होते आणि आजही प्रासंगिक आहे. आपल्याला जगातील प्रत्येक संस्कृतीकडून काही ना काही शिकायला मिळू शकते, मात्र भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर गदा येणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे.
मित्रांनो, बंगाली भूमीत जन्मलेले आणि वाढलेले सुपुत्र, संत यांनी नेहमीच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्त्व समजून घेतले आणि त्याद्वारे बौद्धिक नेतृत्व दिले. जरी आकाशात फक्त एकच चंद्र चमकतो , मात्र पश्चिम बंगालने जगाला भारताची चमक दाखवण्यासाठी अनेक चंद्र दिले आहेत. नेताजी सुभाष चंद्र, शरत चंद्र, बंकिम चंद्र, ईश्वर चंद्र, जगदीश चंद्र, केशव चंद्र, बिपीन चंद्र अशा अनेक चंद्रांनी भारताची ओळख आणखीनच उजळवली आहे.
चैतन्य महाप्रभु यांच्यापासून ते राजा राम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत अनेकांनी संपूर्ण जग आणि संपूर्ण भारताला जागृत करण्याचे कार्य केले आहे. या सर्व महापुरुषांनी संपूर्ण जगाला सांगितले की खरा भारत काय आहे आणि त्याची खरी ताकद काय आहे. आपले खरे भांडवल ही आपली संस्कृती आहे, आपले भूतकाळाचे ज्ञान -विज्ञान आहे याची जाणीव त्यांनी भारतालाही करून दिली. नझरुल इस्लाम आणि लालन फकीर यांच्या कविता आणि सत्यजित रे यांच्या चित्रपटांनीही या विचारसरणीचा विस्तार केला आहे.
मित्रांनो, भारताचे ज्ञान-विज्ञान आणि प्राचीन ओळख यांच्याशी देशाला आणि जगाला परिचित करून देण्याचे काम जे बंगालच्या मातीने केले आहे , तो वारसा नवीन भारतात देखील जिवंत ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, इथल्या तरूणांची जबाबदारी आहे. हीच योग्य वेळ आहे , येथून प्रत्येक क्षेत्रात नवीन आणि सक्षम नेतृत्व निर्माण करण्याची जे संपूर्ण जगात भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. मिशिगन विद्यापीठात काही लोकांशी संवाद साधताना स्वामी विवेकानंद जे म्हणाले होते , ते शब्द आपण सर्वानी लक्षात ठेवले पाहिजेत.
स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले होते- “ भले सध्याचे शतक तुमचे आहे, परंतु 21 वे शतक भारताचे असेल.” स्वामी विवेकानंदांचा तो विश्वास, तो संकल्प सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी, प्रत्येक भारतीयाने पूर्ण शक्तीने अविरत काम करत राहायला हवे. आणि या मोहिमेमध्ये, जेव्हा पश्चिम बंगालचा बौद्धिक वर्ग, तुम्हा सर्व साथीदारांची ऊर्जा, तुमचा आशीर्वाद मिळेल , तेव्हा संकल्प पूर्ण करण्याचा वेगही आणखी वाढेल. मी स्वतः आणि केंद्र सरकार देखील तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याकडून शिकण्याचाही प्रयत्न करू. आजच्या या महत्वाच्या प्रसंगी ज्या आत्मीयतेने तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिलीत तुम्ही जो सत्कार, सन्मान केलात, त्यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी देशवासियांना देखील आवाहन करतो कि जेव्हा तुम्ही कोलकाता येथे जाल तेव्हा या चार ऐतिहासिक ठिकाणांना अवश्य भेट द्या. आपल्या त्या महापुरुषांचे विचार, त्यांची कला, त्यांच्या भावना, त्या काळातील जनमानसाची अभिव्यक्ती तुम्ही पहा, जाणून घ्या आणि जगालाही दाखवून द्या. खूप खूप धन्यवाद.