व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्री विद्यासागर रावजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊबागडे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सुभाष भामरे जी, साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश हावरेजी, महाराष्ट्रातील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, राज्य विधानसभेतील आमदार आणि आज इथे मोठ्या संख्येने जमलेल्यामाझ्या बंधू–भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला देशातील तमाम जनतेला विजयादशमीच्या अनेकअनेक शुभेच्छा !
आपले सण–उत्सव आपल्या लोकांसोबत साजरे करता यावेत, अशी आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा असते. आपलाप्रत्येक उत्सव देशातल्या जनतेसोबत साजरा करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि याच भावनेतून आज इथेतुमच्यासोबत हा उत्सव साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.
आज दसऱ्याच्या या पवित्र दिवशी तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमले आहात. मलादिसतयं की कुठे बसायला जागाच उरलेली नाही, तुमच्यापैकी अर्धे जण तर बाहेर उन्हात उभे आहेत. मी तुमच्या सगळ्यांचाआणि तुमचे हे प्रेम, स्नेह, आपलेपण, हेच माझे सामर्थ्य आहे, माझी ताकद आहे. तुमच्या या प्रेमामुळेच मला एक नवी ऊर्जा, नवी ताकद मिळते.
मित्रांनो, दसऱ्यासोबतच आज शिर्डीच्या या पवित्र भूमीत आपण आणखी एका पवित्र क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाची सांगता आज होते आहे. थोड्यावेळापूर्वीच मला साईबाबांचे दर्शन करण्याची, त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. जेव्हाही मी पूज्य साईबाबांचे दर्शन करतो, त्यांचे स्मरण करतो, तेव्हा त्यांच्याकोट्यवधी भक्तांप्रमाणे, माझ्याही मनात जनसेवेची, लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची भावना जागृत होते, याभूमीवर मनाला एक नवी उभारी मिळते, कामाचा उत्साह येतो.
बंधू आणि भागिंनीनो, साईबाबांचे मंत्र, त्यांची शिकवण आपल्याला शिर्डीच्या कणाकणात बघायला मिळते. लोकसेवा, त्यागआणि तपस्येचा विषय जेव्हाही कोणत्या चर्चेत निघतो, तेव्हा प्रत्येकजण शिर्डीचे उदाहरण देतो. हे शिर्डी गाव आमच्या तात्यापाटील यांचं गाव आहे, दादा कोते पाटील यांचं गाव आहे. ही माधवराव देशपांडे, माल्सापती यांच्यासारख्या महापुरुषांचीधरती आहे. काशीराम शिपि आणि आप्पा जागले यांनी साईबाबांची त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत सेवा केली. कोंडाजी, गवाजी आणि तुकाराम यांचे नाव आणि कार्य कोण विसरू शकेल? या पवित्र भूमीवरच्या महान सुपुत्रांना मी आज वंदनकरतो आहे.
बंधू– भगिनींनो, साईबाबांचा मंत्र आहे “सबका मलिक एक है!” साईंचे हे चार शब्द जणू काही सर्व समाजाला एकत्रकरण्याचे सूत्रवाक्य बनले आहे. साई समाजाचे होते आणि समाज साईबाबांचा. साईबाबांनी समाजाची सेवा करण्याचे काहीमार्ग सांगितले होते आणि मला आज हे पाहून अतिशय आनंद होतो आहे, की श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ त्याचमार्गाने जात सातत्याने समाजाची सेवा करते आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सशक्त करण्याचे काम असो, अथवा मग अध्यात्माच्या मार्गाने समाजाच्या विचारातपरिवर्तन घडवून आणायचे असो, समाजात समरसता आणि सह्भावना जागृत करायची असेल, अशा सर्व कार्यांसाठी तुम्हीकरत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.
आजही या भूमीवरून आस्था, अध्यात्म आणि विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे. आणि त्यासाठी मीमहाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. गरिबांच्या कल्याणासाठी इतकी मोठी योजना सुरु करण्याच्या दृष्टीने यापेक्षा अधिकचांगली कुठलीच जागा असू शकत नाही. साईबाबांच्या चरणाशी बसून गरिबांसाठी काम करण्याइतकी धन्यता आणखी कुठेमिळू शकेल?
आणि म्हणूनच, महाराष्ट्र सरकार अभिनंदनास पात्र आहेत. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी बनणाऱ्यानव्या परिसराच्या भूमिपूजन समारंभात उपस्थित राहण्यात मला विशेष आनंद होत आहे. आजच इथे साईबाबा इंग्लिशमिडीयम शाळा, कन्या विद्यालय आणि महाविद्यालयाची पायाभरणी होत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की साईबाबांच्याजीवनतून प्रेरणा घेत त्यांचे दर्शन घेऊन सुरु होणाऱ्या या ‘साई नॉलेज पार्कमध्ये’ विद्यार्थ्यांना साईबाबांची शिकवण सहजतेनेआत्मसात करता येईल.
मित्रांनो, आज इथे दहा मेगावॉटच्या एका सौर प्रकल्पाचेही काम सुरु झाले आहे. यामुळे साई संस्थानाच्या उर्जा स्त्रोतात वाढहोईल. आणि स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात संस्थानाचे मोठे योगदान राहील. एकप्रकारे, साई विश्वस्त मंडळाकडून, आजदसऱ्यानिमित्त, साईभक्तांना मिळालेली ही एक मोठी भेटच आहे.
मित्रांनो, नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यतच्या सणा–सुदीच्या काळात देशातला प्रत्येक व्यक्ती घर, गाडी, दागिने अशासामानाची खरेदी करतो. ज्याची जेवढी शक्ती असेल, तो त्यानुसार पैसे वाचवतो आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरीभेटवस्तू खरेदी करतो. मला याचा खूप आनंद आहे की दसऱ्याच्या या पवित्र, मंगल दिवशी मला महाराष्ट्रातील अडीच लाखबंधू–भगिनींना आपले स्वतःचे घर देण्याची संधी मिळते आहे.
हे माझे बंधू–भगिनी ज्यांच्यासाठी, स्वतःचे घर नेहमीच एक स्वप्न राहिले आहे. अशा माझ्या या विशाल कुटुंबांतील सर्वसदस्यांचा एकत्रित गृहप्रवेश करवणे ही माझ्यादृष्टीने माझ्या गरीब बंधू–भगिनींची सर्वात मोठी सेवा आहे. या सेवेपेक्षा मोठीपूजा कोणती असू शकेल?
तुम्हा सर्वांना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, तयार झालेल्या या नव्या घरांमध्ये गृहप्रवेश करण्याच्या, आयुष्याच्या एकामहत्वाच्या क्षणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ही नवी घरे तुमच्या स्वतःच्या स्वप्नांचे प्रतीक तर आहेतच, सोबतच ते तुमच्याआशा आकांक्षांना नवे पंख देणार आहेत. तुमचे आयुष्य, तुमच्या मुलांचे आयुष्य एका सार्थक बदलाच्या मार्गावरून पुढे जातआहे. गरीबीवर विजय मिळवण्याच्या लढाईत, हे सर्वात महत्वाचे पहिले पाउल आहे.
मित्रांनो, ‘आपलं स्वतःचं घर’ आयुष्य जगण्यास सोपं बनवतं. आणि गरिबीशी लढण्याचा नवा उत्साह देते. घरामुळे एकसन्मानाचा भाव निर्माण होतो. आणि हेच लक्षात घेऊन, आम्ही 2022 पर्यत, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणारआहेत, तेव्हा देशातल्या प्रत्येक बेघर कुटुंबाला त्याचे स्वतःचे घर देण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करतो आहोत.
मला अत्यंत आनंद आहे की हे उद्दिष्ट गाठण्याचा जवळपास अर्धा रस्ता आम्ही इतक्या कमी वेळात पार केला आहे. बंधूआणि भगिनिनो, गरीब असो वा मध्यमवर्ग, गेल्या चार वर्षांपासून त्यांना झोपड्या किंवा भाड्याच्या घरातून, त्यांच्या स्वतःच्याघरात प्रवेश देण्यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत आहे. याआधीही असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत, मात्रदुर्दैवाने अशा प्रयत्नांचा उद्देश गरिबांना सक्षम करणे हा नव्हे, तर केवळ एका कुटुंबाच्या नावाचा प्रचार करणे हाच होता.
केवळ आपली मतपेढी तयार करणे हेच त्यांचे लक्ष्य होते. एक चांगले घर असावे, त्यात शौचालय असावे, वीज असावी, पाण्याची सोय असावी,गैसची व्यवस्था असावी, असा समग्र विचार याआधी कधीच केला गेला नाही. एखाद्या योजनेच्यामूळाशी राजकीय स्वार्थ असेल, असे आता केंद्र सरकारमध्ये कधीच घडत नाही. राजकीय स्वार्थाऐवजी आता फक्त आणिफक्त गरिबांच्या कल्याणाचाच विचार केला जातो. त्यातून त्यांचे जीवन अधिक सोपे करण्याची प्रेरणा मिळते. अशा प्रेरणेतूनकामाची गती कशी वाढते याचे प्रत्यक्ष उदाहरण सरकारच्या कामातून आज देशभरातील जनतेला दिसते आहे.
मित्रांनो, या आधी जी सरकारे होती त्या सरकारने आपल्या शेवटच्या चार वर्षात संपूर्ण देशात केवळ 25 लाख घरे बनवलीहोती. चार वर्षात 25 लाख.. किती? जरा बोला ना, काय झालं? चार वर्षात किती घरे बनविली होती? 25 लाख फक्त! मात्रगेल्या चार वर्षात, जेव्हापासून आमचे सरकार सत्तेत आले आहे, आम्ही देशभरात 1 कोटी 25 लाख घरे बांधली आहेत. त्यांनीचार वर्षात 25 लाख घरे बांधली आणि आम्ही तेवढ्याच कालावधीत 1 कोटी 25 लाख घरे बांधली आहेत.
म्हणजे जर तेच सरकार असतं, तर इतकी घरे बनवायला, २० वर्षे लागली असती. आणि तुम्हाला तुमचे घर मिळण्यासाठी २०वर्षे थांबावं लागलं असतं. वेगाने काम करणारे सरकार, गरिबांना तितक्याच वेगाने त्यांचे हक्क आणि लाभ कसे देते याचे हेउदाहरण आहे. आणि तुम्ही बघा, सगळं तर तेच आहे. तीच साधने, तेच स्त्रोत, काम करणारी माणसेही तीच, मात्र गरिबांचीसेवा करण्याच्या भावनेतून ज्यावेळी काम केलं जातं, त्यावेळी अशाच वेगाने आपल्याला त्या कामाची फळे मिळतात.
बंधू–भगिनिंनो, आधीच्या सरकारमध्ये एक घर बनवायला जवळपास 18 महिने लागत असत, दीड वर्ष लागत असे. यासरकारमध्ये एका वर्षाच्या आत, म्हणजे जवळपास 12 महिन्यांपेक्षाही कमी वेळेत घर बांधून पूर्ण होते. घर बांधण्याचा वेळतर वाचला आहेच, पण त्यासोबत आम्ही घराचं क्षेत्रफळ देखील वाढवलं आहे. त्यासोबतच घर बनवण्यासाठी मिळणारीसरकारी मदतीची रक्कमही 70 हजार रुपयांवरुन 1 लाख 20 हजार रुपयांपर्यत वाढवली आहे. आणि सर्वात महत्वाचेम्हणजे, याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. लाभार्थ्यांची निवडही वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने होतेआहे. इतकेच नाही, तर हे घर उत्तम दर्जाचे असेल, टिकावू असेल, त्यात शौचालयासहित सर्व सुविधा असतील याकडेहीविशेष लक्ष दिले जात आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत, आज इथे घर मिळालेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि आजमला इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या लाभार्थी भगिनींच्या चेहऱ्यावरीलआत्मविश्वास, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, यामुळे मला किती समाधान मिळाले, याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. जेव्हा मी कोणत्याही गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद बघतो, तेव्हा माझे जीवन, मी करत असलेले काम सफल झाले, असेमला वाटते. नव्याने काम करण्याची ऊर्जा मला त्यातून मिळते. आज इथल्या या सगळ्या बहिणींनी मला जे आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमचा संकल्प इथे सांगतो, की तुमच्या सेवेसाठी आम्ही आमच्या आयुष्यातला कण न कण वेचू.
बंधू आणि भगिनींनो, देशातल्या प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा देण्याच्या अभियानाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राने तर याबाबतीत अतिशय प्रशंसनीय कार्य केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून काम करत महाराष्ट्रालाहागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित केलं आहे. यासाठी राज्यातल्या 11 कोटी नागरिकांचे मी अभिनंदन करतो. यामुळेमहाराष्ट्रातील गावे आणि गल्ल्या तर स्वच्छ होतीलच, शिवाय हागवणीसारख्या आजारांपासून गरिबांच्या मुलांचे संरक्षणहोईल. शेतकऱ्याची मुले सुरक्षित राहतील.
मित्रांनो, जेव्हा गरिबांच्या आयुष्याची आणि आरोग्याची चर्चा होते,तेव्हा सध्या तर संपूर्ण जगात ‘आयुष्मान भारत’ म्हणजेप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची चर्चा सुरु आहे. या अंतर्गत, दरवर्षी देशातील सुमारे 50 कोटी नागरिकांना गंभीरआजारांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील लाखो परिवारांपर्यतही या योजनेचा लाभ पोहोचणार आहे. अद्याप तर ही योजना सुरु होऊन एक महिनाहीनाही झाला, मात्र देशभरातल्या रुग्णालयांमध्ये जवळपास 1 लाख रुग्णांनी आतापर्यत या योजनेचे लाभ घेतले आहेत. यायोजनेमुळे कुठल्यातरी गरीबाच्या मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार झालेत, तर कुठल्या गरीबाच्या ट्युमरची शस्त्रक्रियाझाली. कोणाचे 50 हजार रुपयांचा उपचारांचा खर्च दिला गेला तर कोणाचा तीन लाख रुपयांचा.
मित्रांनो, या योजनेअंतर्गत, आतापर्यत विम्याच्या रकमेचे जे दावे करण्यात आले आहेत, ते सरासरी प्रत्येक व्यक्तीमागे 20 हजार रुपये इतके आहेत. तुम्ही जरा विचार करा, हजारो रुपयांची ही रक्कम गरिबाला आपल्या खिशातून भरावी लागलीअसती. तो कदाचित एवढी रक्कम खर्चही करू शकला नसता, आणि म्हणूनच तो रुग्णालयात जाणे टाळत असे. आता मात्रसरकारने अशा गरिबांना आधार दिला आहे, त्यांना सांगितलं आहे की पैशांची चिंता करु नका. आधी आपले उपचार पूर्णकरा.
मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेमुळे देशात आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे जाळे वाढत चालले आहे. विशेषतः द्वितीयआणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये हजारो नवी रुग्णालये सुरु होण्याची शक्यता वाढली आहे. ह्या रूग्णालयांमुळे देशातल्यायुवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
बंधू– भगिनीनो, समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी, सर्वांचे आयुष्य सुलभ आणि सरळ असावे हेच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवूनसरकार काम करत आहे. मला असे कळले आहे, की महाराष्ट्रातील काही भागात पावसाची कृपा कमी झाली, म्हणावा तसापाऊस पडलेला नाही. मी आज इथे तुम्हाला आश्वस्त करतो, की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून तुम्हालालवकरात लवकर मदत मिळेल. याशिवाय, महाराष्ट्र सरकार जी पावले उचलेल, त्यात केंद्र सरकार, खांद्याला खांदा लावूनपूर्ण सहकार्याने सोबत उभे राहील.
बंधू– भगिनींनो, पाण्याच्या या संकटातून देशातल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच सरकार प्रधानमंत्री कृषी सिंचनयोजनेअंतर्गत, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम करत आहे. या अंतर्गत, महाराष्ट्रातही अनेकमोठ्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनेही आपल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणीटंचाईवर मातकरण्याचा अभूतपूर्व प्रयत्न केला आहे. या अभियानामुळे राज्यातली १६ हजार गावे दुष्काळमुक्त झालीत आणि सुमारे, ९हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम वेगाने सुरु आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे.
महाराष्ट्रातील जनतेने, सिंचन तलावांमधला गाळ काढण्याचे अभियानही यशस्वीपणे राबवले आहे, यासाठी मी त्यांचे विशेषअभिनंदन करतो. सिंचन तलावातून 9 कोटी घनमीटर इतका गाळ काढणे सोपे काम नाही. मात्र तुम्ही सगळ्यांनीलोकसमुदायातून हे काम यशस्वी करून दाखवत संपूर्ण देशालाच नवा मार्ग दाखवला आहे. मला असं सांगण्यात आलं कीजर हे काम कुठल्या कंत्राटदाराला दिलं असतं तर सहा कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च आला असता. मात्र हेच काम तुम्हीसामुदायिक परिश्रमातून यशस्वीपणे करुन दाखवले.
मित्रांनो, जर पीक अधिक असेल तरी त्याचा योग्य भाव शेतकऱ्याला मिळावा, यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करतोआहोत. आमच्याच सरकारने शेतकऱ्यांची किमान हमीभावाची कित्येक वर्षांची जुनी मागणी पूर्ण केली आहे. सरकारनेऊसासहित सर्व खरीप आणि रब्बीच्या 21 पिकांच्या किमान हमीभावात खर्चाच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यतचा हमीभावनिश्चित केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे, देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
मित्रांनो, आमचे सरकार शेतीसोबतच पर्यटनालाही प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात शिर्डीसारख्या जनतेचे श्रद्धास्थानअसलेली धार्मिक स्थळे आहेत, तर दुसरीकडे अजिंठा–वेरूळ सारखी ऐतिहासिक वारसास्थळेही आहेत, जिथे जगभरातीलपर्यटक येतात. लोकांच्या श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहासाला युवकांच्या रोजगाराशी जोडण्याचे एक मोठे अभियान आमच्यासरकारने सुरु केले आहे.
देशातील पर्यटन केंद्रांना एकमेकांशी जोडले जात आहे. तिथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत.इथे शिर्डीलाया शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करायला जेव्हा राष्ट्रपती महोदय आले होते, तेव्हा त्यांनी या विमानतळाची भेट पर्यटकांनादिली होती. मला असं सांगण्यात आलं आहे की इथून सध्या जी विमानसेवा सुरु आहे, त्यात येत्या काळात आणखी वाढहोणार आहे जेणेकरुन देशातला आणि जगातला प्रत्येक साईभक्त इथे येऊन साईबाबांचे दर्शन करु शकेल.
बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राच्या या भूमीने नेहमी देशाला सामाजिक समरसतेचा वस्तूपाठ घालून दिला आहे. छत्रपतीशिवाजी असो, बाबासाहेब डॉ आंबेडकर असोत किंवा मग पूज्य महात्मा फुले असोत, या सगळ्यांनी या भूमीत अशी मूल्येरुजवलीत, जी समता आणि एकतेलाच सामाजिक शक्ती मानतात. आपल्या या संत पुरुषांचे मार्गदर्शक विचार आपणकायम लक्षात ठेवायला हवे. स्वार्थासाठी समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या , समाजाला तोडणाऱ्या शक्तींपासून आपणसावध राहायला हवं, अशा सर्व शक्तींना आपण पराजित केलं पाहिजे. तोडणे खूप सोपे असते, मात्र जोडणे तेवढेच अवघड! आपल्याला जोडण्याची ताकद एकत्र आणून सक्षम बनवायची आहे.
‘सबका साथ–सबका विकास” आणि “एक भारत–श्रेष्ठ भारत” हा संकल्प आपल्याला आज विजयादशमीच्या निमित्तानेकरायचा आहे. आणि म्हणूनच मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आग्रह करतोय की तुम्ही हा संकल्प मनात घेऊन पुढे वाटचालकरा, आणि याच संदेशाच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे. साईबाबांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गावरुनआपल्याला वाटचाल करतो आहे. मला आज याचा खूप आनंद होतो आहे.
मित्रांनो, आज मी या पवित्र स्थानावरुन शताब्दी सोहळ्याची सांगता करतो आहे. या 31 ऑक्टोबरला तुम्हा सर्वांचे हेराज्यातले सरकार, चार वर्षे पूर्ण करणार आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे आधीच अभिनंदन करतो. तुम्ही असेच संपूर्ण ताकदीनिशी राज्यातल्या जनतेची सेवा करत रहा. तुम्हाला इथल्या जनतेचे भरपूर आशीर्वाद मिळतराहोत, अशीच माझी इच्छा आहे.
याच विश्वासाने, आज इथे दसऱ्याच्या दिवशी ज्यांना स्वतःची घरे मिळाली आहेत, अशा सर्व कुटुंबांचे पुन्हा एकदा खूप खूपअभिनंदन! हे नवे घर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचे माध्यम बनो, ह्या घरात राहतांना तुम्ही आणि तुमचे कुटुंबपुढे जावो, प्रगतीकरो, तुमची मुलं खूप यशस्वी होवोत, याच सदिच्छेसह मी माझे हे भाषण संपवतो. या पवित्र दिवशी तुम्ही मला इथेबोलावलेत, त्याबद्दल मी श्री साई विश्वस्त मंडळाचेही आभार मानतो. येणारा प्रत्येक सण तुमच्या आयुष्यात खूप खूप सुख–समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
याच शुभेच्छांसह, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार!!
धन्यवाद !