नमस्कार!
कर्नाटकचे राज्यपाल आणि म्हैसूरविद्यापीठाचे कुलपती श्री वजु भाई वाला जी, कर्नाटकचे शिक्षणमंत्री डॉ. सी एन अश्वथ नारायण जी, म्हैसूरविद्यापीठाचे कुलपती प्रो. जी. हेमंत कुमार जी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि सभ्य स्त्री पुरुष हो, सर्वात आधी आपणा सर्वांना 'मैसुरू दशारा', 'नाड्-हब्बा' निमित्त अनेकानेक शुभेच्छा.
थोड्या वेळापूर्वी मी काही छायाचित्रे पाहत होतो. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे अनेक निर्बंध असले तरी उत्सव साजरा करण्यातला उत्साह कायम आहे. खरे तर काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने या उत्साहावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. त्या संकटाचा तडाखा बसलेल्या सर्व कुटुंबांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार एकत्रितपणे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मित्रहो, आज तुमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. खरे तर अशा प्रसंगी आपल्या युवा मित्रमंडळींसोबत समोरासमोर बसून गप्पा मारण्याचा माझा प्रयत्न असतो. मैसूरमध्ये येणे, म्हैसूर विद्यापीठाचा गौरवपूर्ण वारसा लक्षात घेत शंभराव्या दीक्षांत समारंभात सहभागी होणे, ही निश्चितच गौरवाची बाब आहे. मात्र यावेळी आपली प्रत्यक्ष भेट घेण्याऐवजी आभासी पद्धतीने भेटावे लागते आहे. घटि-कोत्सवदा ई स्मरणीया समारं-भदा सन्दर्भ-दल्ली निमगेल्लरिगू अभिनंदने-गड़ु. इंदु पदवी प्रमाणपत्रा पडेयुत्तिरुव एल्लरिगू शुभाशय-गड़ु.बोधका सिब्बंदिगू शुभाशय-गड़न्नु कोरुत्तेने.
मित्रहो, म्हैसूर विद्यापीठ हे प्राचीन भारताची समृद्ध शिक्षण व्यवस्था आणि भविष्यातील भारताच्या आकांक्षा तसेच क्षमतांचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे.
या विद्यापीठाने 'राजर्षी' नालवाडी कृष्णराज वडेयार आणि एम विश्वेश्वरय्या यांचे दृष्टिकोन आणि संकल्प साकार केले आहेत. एकशे दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 'राजर्षी' नालवाडी कृष्णराज वडेयार यांनी म्हैसूरविद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले होते, हा माझ्यासाठी एक सुखद योगायोग आहे. तेव्हापासून आतापर्यंत या रत्नगर्भा प्रांगणाने अशा अनेक व्यक्तींना अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमांत दीक्षा घेताना पाहिले आहे, ज्यांनी राष्ट्र निर्मितीच्या कामात मोलाचे योगदान दिले आहे. भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजींसारख्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी या शैक्षणिक संस्थेत अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा दिली आहे. हे लक्षात घेत, आपल्या कुटुंबियांबरोबरच आम्हा सगळ्यांचाच आपणा सर्वांवर विश्वास आहे आणि त्याचबरोबर आपणा सर्वांकडून काही अपेक्षा सुद्धा आहेत. आज आपले विद्यापीठ, आपले प्राध्यापक, शिक्षक, आपणाला पदवी बरोबरच देश आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी सुद्धा सोपवीत आहेत.
मित्रहो, आपल्याकडे शिक्षण आणि दीक्षा हे युवकांच्या आयुष्यातले दोन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. हजारो वर्षांपासून आपल्याकडे ही परंपरा चालत आली आहे. जेव्हा आपण दीक्षा घेण्याबद्दल बोलतो, तेव्हा दीक्षा घेणे म्हणजे केवळ पदवी प्राप्त करण्याची संधी नाही. आजचा हा दिवस आयुष्यातील पुढचे ध्येय गाठण्यासाठी नवे संकल्प करण्याची प्रेरणा देतो. आता आपण सगळे एका औपचारिक विद्यापीठ परिसरातून बाहेर पडून प्रत्यक्ष आयुष्याच्या विद्यापीठाच्या विशाल परिसरात प्रवेश करत आहात. या परिसरात आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर आयुष्याच्या परिसरात आपणाला करून बघायचा आहे.
मित्रहो, महान कन्नड लेखक आणि विचारवंत गोरूरु रामस्वामी अय्यंगार् यांनी म्हटले आहे – शिक्षणवे जीवनद बेलकु. म्हणजेच शिक्षण हे आयुष्यातील कठीण मार्गांवर प्रकाश दाखविणारे माध्यम आहे. आज आपल्या देशात फार मोठे परिवर्तन घडून येते आहे, अशा या वेळी त्यांचे हे वचन अगदी संयुक्तिक आहे. आपली शिक्षणपद्धती, भारतातील शैक्षणिक यंत्रणा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेत पुढे जाण्यासाठी सहाय्यक ठरावी, यासाठी गेल्या पाच सहा वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्मितीपासून संरचनात्मक सुधारणांवर विशेष लक्ष देण्यात आले. भारताला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी, आमच्या युवावर्गाला अधिक स्पर्धात्मक घडविण्यासाठी, गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
मित्रहो, स्वातंत्र्यप्राप्तीला इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा 2014 सालापूर्वीपर्यंत देशात 16 आयआयटी होत्या. गेल्या सहा वर्षांमध्ये सरासरी दर वर्षी एक नवी आयआयटी सुरू करण्यात आली. त्यापैकी एक कर्नाटकमध्ये धारवाड येथेही आहे. 2014 सालापर्यंत भारतात ट्रिपल आयटींची संख्या 9 होती, त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये 16 ट्रिपल आयटी स्थापन झाल्या आहेत. मागच्या पाच-सहा वर्षांमध्ये सात नव्या आयआयएमची स्थापना करण्यात आली आहे. त्यापूर्वी देशात तेरा आयआयएम होत्या. याच धर्तीवर सुमारे सहा दशके देशात केवळ सात एम्सच्या माध्यमातून देशाला सेवा प्राप्त होत होत्या. 2014 सालानंतर त्याच्या दुप्पट म्हणजेच 15 एम्स देशात स्थापन झाल्या आहेत किंवा त्या सुरू होण्याची प्रक्रिया चालू आहे.
मित्रहो, मागच्या पाच सहा वर्षांमध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न हे केवळ नव्या संस्था सुरू करण्यापुरते मर्यादित नाहीत. या संस्थांमध्ये प्रशासनातील सुधारणांपासून लिंगभेद दूर करण्यासाठी तसेच सामाजिक समावेशाची खातरजमा करण्यासाठी सुद्धा काम करण्यात आले आहे. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार निर्णय घेता यावेत, यासाठी अधिक स्वायत्तता सुद्धा बहाल केली जाते आहे. पहिल्या आय आय एम अधिनियमांतर्गत देशभरातील आय आय एम ना जास्त अधिकार प्रदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातसुद्धा पारदर्शकतेची कमतरता होती, ती दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. आज देशात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पारदर्शकतेची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. होमिओपॅथी आणि इतर भारतीय उपचार पद्धतींच्या अध्ययनात सुधारणा करण्यासाठी सुद्धा दोन नवे कायदे तयार केले जात आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सुधारणांमुळे देशातील युवकांना वैद्यकीय शिक्षणासाठी जास्त जागा मिळतील, याची खातरजमा केली जाते आहे.
मित्रहो, राजर्षी नालवाडी कृष्णराज वडेयार यांनी पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना म्हटले होते की माझ्यासमोर एका ऐवजी दहा महिला पदवीधर दिसल्या असत्या तर मला आनंद झाला असता. आज माझ्या समोर मला अनेक मुली दिसत आहेत, ज्यांनी आज पदवी प्राप्त केली आहे. मला सांगण्यात आले आहे की आज या ठिकाणी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. बदलत्या भारताची ही आणखी एक ओळख आहे. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर देशातील मुलींच्या नोंदणीची सरासरी मुलांच्या तुलनेत जास्त आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात सुद्धा, नावीन्यता आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांत सुद्धा मुलींची संख्या वाढली आहे. चार वर्षांपूर्वी देशाच्या आयआयटीमध्ये केवळ आठ टक्के मुली असत. ही संख्या यावर्षी दुपटीपेक्षा जास्त वाढून 20 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
मित्रहो, शिक्षणक्षेत्रात या ज्या काही सुधारणा झाल्या आहेत, त्यांना नव्या राष्ट्रीय धोरणामुळे नवी दिशा आणि नवे सामर्थ्य मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिशु वर्गापासून पीएचडी पर्यंत देशाच्या संपूर्ण शैक्षणिक रचनेमध्ये मूलभूत बदल घडवून आणणारी एक फार मोठी मोहीम आहे. आपल्या देशातील सामर्थ्यशाली युवकांना अधिक स्पर्धात्मक घडविण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले जाते आहे. आपल्या युवकांना नोकऱ्यांच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेता यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कौशल्य, कौशल्य वाढ आणि कौशल्य विकास या आजच्या काळाच्या गरजा आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात यावर बराच भर देण्यात आला आहे.
मित्रहो, म्हैसूर विद्यापीठाने हे धोरण लागू करण्यासाठी वचनबद्धता दर्शविली आहे, तत्परता दर्शवली आहे, याचा मला आनंद वाटतो. मला वाटते की या धोरणाच्या आधारे आपण बहुपर्यायी अभ्यासक्रम सुरू करत आहात. आता आपण आपल्या स्वप्नांना आणि सामर्थ्याला अनुरूप अशा विषयांची निवड करू शकता. जागतिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृती यांचा एकाच वेळी अभ्यास करू शकता. आपण स्थानिक बाबींच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकता.
मित्रहो, आपल्या देशात चहूकडे ज्या प्रकारे सुधारणा होत आहेत, तशा यापूर्वी कधीच झाल्या नाहीत. यापूर्वी जे काही निर्णय घेतले जात, ते काही विशिष्ट क्षेत्रांपुरते घेतले जात आणि इतर क्षेत्रे मात्र सुधारणांपासून वंचित राहत. मागच्या सहा वर्षांमध्ये मात्र बहुविध सुधारणा झाल्या आहेत, बहुविध क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या शिक्षण क्षेत्राचे भवितव्य सुनिश्चित करतानाच, आपणासारख्या युवा मित्रांनाही सक्षम करीत आहे. शेतीशी संबंधित सुधारणा शेतकऱ्यांना सक्षम करत आहेत तर श्रम क्षेत्रातील सुधारणा, श्रमिक आणि उद्योग या दोन्ही घटकांना विकासाची, सुरक्षेची आणि वाढ करण्याची संधी देत आहेत. थेट लाभ हस्तांतरणामुळे आपल्या सार्वजनिक वितरण यंत्रणेत सुधारणा दिसून आल्या आहेत, त्याच वेळी रेराच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांना संरक्षण प्राप्त झाले आहे. देशाला करांच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर यंत्रणा अस्तित्वात आली, त्याचप्रमाणे करदात्याला त्रासातून मुक्त करण्यासाठी फेसलेस असेसमेंट सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली. नादारी आणि दिवाळखोरी संहितेमुळे दिवाळखोरीच्या समस्येसाठी एक कायदेशीर चौकट तयार झाली, त्यामुळे थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून आपल्या देशातील गुंतवणूक वाढत आहे.
मित्रहो, मागच्या सहा-सात महिन्यांमध्ये आपण पाहिले असेल की सुधारणांचा वेग आणि परीघ दोन्ही विस्तारत आहेत. कृषी असो, अवकाश असो, संरक्षण असो, हवाई वाहतूक असो, श्रम असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासासाठी आवश्यक ते बदल केले जात आहेत. हे कशासाठी केले जात आहे? आपल्यासारख्या कोट्यवधी युवकांसाठी हे बदल केले जात आहेत. हे दशक भारताचे दशक म्हणून ओळखले जावे, यासाठी केले जात आहेत. आज आपण आपला पाया मजबूत केला, तरच हे दशक भारताचे दशक म्हणून ओळखले जाईल. युवा भारताच्या आयुष्यात हे दशक फार मोठी संधी घेऊन आले आहे.
मित्रहो, देशातील उत्कृष्ट शिक्षण संस्था असलेल्या म्हैसूर विद्यापीठाला सुद्धा नव्या परिस्थितीनुसार नाविन्याची कास धरावी लागेल. माजी कुलपती, महान कवी, साहित्यिक कुवेम्पु यांनी विद्यापीठाच्या मुख्य परिसराला 'मान सांगगोत्री अर्थात मनाचा शाश्वत प्रवाह' असे नाव दिले आहे, त्यावरून आपणास सतत प्रेरणा घ्यायची आहे. आपणास इनक्युबेशन सेंटर, तंत्रज्ञान विकास केंद्र, उद्योग आणि शिक्षण यांच्यातील संबंध तसेच आंतरशास्त्रीय संशोधन अशा विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यापीठाने सुद्धा समकालीन आणि जागतिक मुद्द्यांच्या बरोबरीने स्थानिक संस्कृती, स्थानिक कला आणि इतर सामाजिक समस्यांशी संबंधित संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या परंपरेचा विस्तार करावा, अशी अपेक्षा आहे.
मित्रहो, आज आपण या महान परिसरातून बाहेर पडत आहात. या वेळी मी आपणा सर्वांना आग्रहाने सांगू इच्छितो की आपल्यापैकी प्रत्येकाकडे जी काही क्षमता आहे, जे काही सामर्थ्य आहे, त्याच्या आधारे सर्वोत्कृष्ट साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. एका विशिष्ट परिघात अडकून पडायची, एका विशिष्ट साच्यात स्वतःला कोंडून घ्यायची आवश्यकता नाही. कदाचित ज्या साच्यात तुम्ही स्वतःला बसवू पहाल, तो तुमच्यासाठी घडवलाच गेला नसेल. स्वतःसाठी वेळ काढा, अंतर्मुख व्हा, आयुष्याने प्रत्यक्ष जगण्याशी संबंधित जे काही तुमच्या समोर ठेवले आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, त्यातूनच आपणा सर्वांना पुढे जाण्याचा मार्ग निवडता येईल. नवभारत ही संधींची भूमी आहे. कोरोनाच्या या संकटकाळात सुद्धा आपण पाहिले असेल की आपल्या विद्यार्थ्यांनी कितीतरी नवे स्टार्टअप सुरु केले आहेत. हे स्टार्टअप केवळ कर्नाटकाचे नाही तर देशाचे सुद्धा फार मोठे सामर्थ्य आहे. असंख्य संधींच्या या धरतीवर आपण सर्व आपल्या सामर्थ्याने, आपल्या प्रतिभेने देशासाठी बरेच काही कराल, असा विश्वास मला वाटतो. आपला सर्वांचा विकास हा केवळ आपल्यापुरता मर्यादित नसेल, तर तो देशाचाही विकास असेल. जेव्हा आपण आत्मनिर्भर व्हाल, तेव्हा देश सुद्धा आत्मनिर्भर होईल. मी पुन्हा एकदा सर्व मित्रमंडळींना उज्वल भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा देतो. अनेकानेक धन्यवाद.