नमस्कार!
वाराणसीमध्ये उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकारी स्मृती ईराणी जी, कारपेट क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक मंडळी, माझे विणकर बंधू- भगिनी आणि तिथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर.
काशीच्या पवित्र भूमीमध्ये देशभरातून जमलेल्या, परदेशातून आलेल्या आपण सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. जगभरातल्या जवळपास 38 देशांमधले अडीचशेपेक्षांही जास्त पाहुणे प्रतिनिधी या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्याची माहिती मला देण्यात आली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि देशातल्या इतर राज्यांमधूनही कार्पेट क्षेत्राशी संबंधित लोक या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. आपणा सर्वांचे या बनारसमध्ये बनारसचा खासदार म्हणून मी खूप-खूप स्वागत करतो.
मित्रांनो, देशात सध्या देशामध्ये सण-उत्सवांचे दिवस आहेत. दसरा, दुर्गापूजेनंतर पहिल्यांदाच मला तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन बनारसबरोबर जोडले जाण्याची संधी आज मिळाली आहे. आपण सर्वजण धनत्रयोदशी आणि दीपावली सणाच्या तयारीमध्ये गुंतलेले असणार. वर्षाच्या या मोठ्या, महत्वाच्या सणाच्या काळात आपण लोक सर्वात जास्त कामात गढून गेलेले असता. इतर सर्वसामान्य दिवसांच्या तुलनेत अशा सण-उत्सवाच्या काळात जरा जास्तच काम आपल्याला असते. कारण आपल्या मालाला मागणीही याच काळात जास्त येत असते. आपल्या श्रमाला, आपल्यामधल्या कलेला एक प्रकारे पुरस्कार मिळण्याचा हाच तर सर्वोत्तम काळ असतो.
मित्रांनो, वाराणसी आणि उत्तर प्रदेशातल्या विणकर आणि व्यापारी बंधू-भगिनींसाठी यंदा सणाचा काळ दुप्पट आनंद घेवून आलेला आहे. दीनदयाळ हस्तकला संकुलामध्ये यंदा पहिल्यांदाच ‘इंडिया कार्पेट एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. आता दिल्लीच्या बरोबरीनेच वाराणसीमध्ये भारतातल्या कारपेट उद्योगाला, आमच्या विणकरांना, डिझाईनर्स, व्यापारी वर्गाला, आपले कौशल्य दाखवण्याची, आपली उत्पादने दुनियेसमोर आणण्याची संधी मिळत आहे.
मित्रांनो, ज्या ध्येयाने, ज्याउद्दिष्टासाठी दीनदयाळ हस्तकला संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे, त्या ध्येयाकडे आम्ही वेगाने वाटचाल करीत आहोत, हे पाहून मला आनंद वाटत आहे. हे क्षेत्र म्हणजे विणकरांचे, कारपेट उद्योगाचे एक केंद्रस्थान बनले आहे. देशभरामधले हस्तशिल्प व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या एकूण कलाकारांपैकी एक चतुर्थांश लोक, श्रमिक आणि व्यावसायिक बंधू-भगिनी येथे वास्तव्य करतात. वाराणसी असो, भदोई असो, मिर्जापूर असो, ही स्थाने कारपेट उद्योगाची महत्वाची केंद्रे आहेत. आणि आता पूर्व भारत, हे संपूर्ण क्षेत्र देशातल्या वस्त्रोद्योगाचे निर्यात केंद्राचेही विश्वैक केंद्रबिंदू बनले आहे. इतकेच नाही तर दीनदयाळ हस्तकला संकूलही आता हस्तकलेविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
मित्रांनो, हस्तशिल्पकारांना, लहान आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारावर सरकारच्यावतीने भर देण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. ज्याठिकाणी वस्तूचे उत्पादन होते, त्या स्थानी सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यावेळी वाराणसीमध्ये होत असलेल्या ‘इंडिया कारपेट एक्स्पो’ सुद्धा या प्रयत्नाच्या मालिकेतील, एक मोठा टप्पा आहे. याचबरोबर वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आमच्या ‘फाईव्ह एफ’ दृष्टिकोनही एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. आणि ज्यावेळी मी ‘फाईव्ह एफ’ याविषयी बोलत असतो, त्या पाच एफचा अर्थ आहे की, ‘फार्म टू फायबर’, ‘फायबर टू फॅक्टरी’, ‘फॅक्टरी टू फॅशन’, ‘फॅशन टू फॉरेन’ अशा पद्धतीने शेतकरी आणि विणकर यांना थेट जगभरातल्या बाजारपेठांना जोडण्यासाठी एक महत्वपूर्ण आणि मोठा प्रयत्न सरकार करत आहे.
प्रदर्शनाच्या या चार दिवसांमध्ये एकापेक्षा एक उत्तोमत्तम डिजाईनच्या वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे. कोट्यवधी रुपयांची प्रचंड मोठी व्यापारी उलाढाल होईल. सामंजस्याचे विविध करार होतील. व्यवसाय, व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. विणकरांना नवीन माल तयार करण्याच्या ‘ऑर्डर्स’ मिळतील. परदेशातून जे व्यापारी मंडळी आली आहेत, त्यांनाही आपली संस्कृती, काशी आणि भारतामध्ये झालेल्या बदलाचा, नवीन व्यावसायिक वातावरणाचा अनुभव घेता येईल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो, भारतामध्ये हस्तशिल्पाची खूप प्राचीन, दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. भारतामधल्या ग्रामीण भागामध्ये आजही सूतकताईसाठी चरख्याचा उपयोग मोठ्याप्रमाणावर केला जातो. बनारसच्या भूमीची तर यामध्ये अधिकच महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. बनारसची ओळख ही संत कबीर यांच्याशी जोडली गेली आहे, तितकीच इथल्या हस्तशिल्पाचा परिचय जगाला आहे. संत कबीर सूत कताई करीत होते आणि सूट कताईच्या निमग्नतेतून जीवनाविषयी अमूल्य संदेशही देत होते. कबीरदासजींनी म्हटले आहे की,-
कहि कबीर सुनो हो संतो, चरखा लखे जो कोय !
जो यह चरखा लखि भए, ताको अवागमन न होय !!
याचा अर्थ असा आहे की, चरखा म्हणजे आपल्या जीवनाचे सार आहे. हे ज्यांना समजले, त्यांना या जीवनाचे मर्मही चांगले ठावूक झाले आहे. ज्याठिकाणी हस्तशिल्पाचा संबंध जीवनाशी इतक्या व्यापकतेने जोडला गेला आहे, त्याठिकाणी विणकरांचे जीवन सुकर, सुलभ बनवण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था बनवली जाते, त्यावेळी मनामध्ये एकप्रकारे वेगळीच आनंदाची भावना निर्माण होते.
साथींनो, आपल्या देशामध्ये हस्तशिल्प-व्यापार, त्याचा एकूणच कारभार यापेक्षाही जास्त प्रेरणादायक म्हणजे स्वातंत्र्यासाठी केला गेलेला संघर्ष आहे. या संघर्षामध्येही स्वावलंबन हे स्वातंत्र्याचे माध्यम बनले होते. गांधीजी, सत्याग्रह आणि चरखा या गोष्टी आपल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये किती महत्वपूर्ण होत्या, हे आपल्याला खूप चांगलेच माहिती आहे.
हस्तशिल्पाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा संदेश देण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळेच भारत आज संपूर्ण जगामधला सर्वात मोठा कारपेट उत्पादक देश बनला आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांपासून तर हाथाने बनवलेल्या जाजमाच्या उत्पादनामध्ये भारताने दुनियेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही गोष्ट लाखो विणकर, डिजाइनर, व्यापारी यांच्या परिश्रमामुळे आणि सरकारने तयार केलेल्या धोरणामुळे शक्य झाले आहे.
मित्रांनो, आज दुनियाभरच्या कारपेट बाजारपेठेपैकी एक तृतीअंश पेक्षाही जास्त म्हणजे 35 टक्के हिस्सा भारताचा आहे. आगामी दोन-तीन वर्षांमध्ये या हिस्सेदारीमध्ये वाढ होवून तो 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ नजिकच्या भविष्यामध्ये जगामध्ये कारपेटची जितकी बाजारपेठ असेल आणि कारपेटची व्यापारी, व्यावसायिक उलाढाल होईल, त्यापैकी निम्मा हिस्सा भारताकडे असणार आहे. आपणा सर्वांकडे असेल.
गेल्या वर्षी आम्ही 9 हजार कोटी रुपयांचे कारपेट निर्यात केले आहेत. यावर्षी जवळपास 100 देशांमध्ये आम्ही कारपेट निर्यात केले आहेत. हे प्रशंसनीय कार्य नक्कीच आहे, परंतु आपण काही एवढ्यावरच थांबणार नाही. आपल्याला यापेक्षाही खूप पुढे जायचे आहे. 2022पर्यंत म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला ज्यावर्षी 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, तोपर्यंत कारपेट निर्यातीचा आकडा अडीचपटींनी वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भारताची कारपेट निर्यात 2022पर्यंत 25 हजार कोटी रुपयांपर्यंत आपल्याला पोहोचवली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
विशेष म्हणजे आपल्या केवळ निर्यातीमध्ये वाढ झाली आहे, असे नाही. तर देशातल्या एकूण कारपेट उलाढालीमध्ये गेल्या चार वर्षांत तिपटीपेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. चार वर्षांपूर्वी कारपेटची बाजारपेठ 500 कोटींची होती. आज या बाजारपेठेत 1600 कोटींची उलाढाल होत आहे.
देशामध्ये कारपेटची बाजारपेठ विस्तारत आहे, यामागे दोन कारणे स्पष्ट आहेत. एक तर देशातल्या मध्यमवर्गाचा सातत्याने विस्तार होत आहे. आणि दुसरे कारण म्हणजे कारपेट उद्योगाला त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
मित्रांनो, सध्या कारपेट उद्योगाला आलेल्या चांगल्या दिवसांचा विचार केला तर एक लक्षात येते की, देशातल्या संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्राचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आज भारतामध्ये लहानत लहान आणि मोठ्यात मोठे कारपेट बनवले जाते, विशेष म्हणजे असा दुनियेतला एकमेव देश आहे. इतकेच नाही तर, भारतात बनवण्यात आलेली कारपेट हीकला आणि शिल्प यांच्याबाबतीत उत्कृष्ट असतात. त्याचबरोबर आपली कारपेट पर्यावरण स्नेही आहेत. या सर्व गोष्टी म्हणजे, आपल्यामध्ये असलेली हुशारी, आपल्याकडे असलेले कौशल्य यांची कमाल आहे. संपूर्ण दुनियेमध्ये ‘मेड इन इंडिया कारपेट’ दिसतात. आता जगामध्ये ‘मेड इन इंडिया कारपेट’ हा एक मोठा ‘ब्रँड’ तयार झाला आहे.
मित्रांनो, या आपल्या ‘ब्रँड’ला आता आणखी मजबूत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहे. कारपेट निर्यात करण्यासाठी कोणत्याही समस्या निर्माण होवू नयेत यासाठी देशांतर्गत आवश्यक त्या सोई सुविधा देण्यात येत आहेत. देशभरामध्ये गोदाम आणि शोरूम यांच्या सुविधा देण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू आहे. यामुळे एका मोठ्या बाजारपेठेपर्यंत आपला माल सहजतेने पोहोचवणे तुम्हाला शक्य होणार आहे.
इतकेच नाही तर, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. भदोई आणि श्रीनगर येथे कारपेट परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कारपेट टेक्नॉलॉजी’ म्हणजेच ‘आयआयसीटी’च्या वतीने जागतिक दर्जाची प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. आमची उत्पादने अगदी शून्य दोषाची म्हणजे अगदी निर्दोष असावीत, त्यामध्ये खोट, कमी काढण्यासाठी कोणतीच जागा नसावी आणि त्याचबरोबर त्या मालाचे उत्पादन करताना पर्यावरणाचा विचार केला गेला आहे, हे उत्पादनातून दिसून यावे, स्पष्ट व्हावे, यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
कारपेटच्याबरोबरच हस्तशिल्पाच्या इतर मालाचेही विपणन आणि विणकरांना इतर बाबतीत मदत करण्यासाठीही अनेक योजना, व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये वाराणसीत नऊ कॉमन फॅसिलिटी सेंटर बनवण्यात आले आहेत. या केंद्रांचा लाभ आता हजारो विणकरांना मिळत आहे.
मित्रांनो, गुणवत्तेशिवाय विणकरांना, लहान व्यापारी वर्गाला पैशाची चणचण भासू नये, यासाठी सरकारच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत, 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जात असल्यामुळे खूप मोठी मदत मिळत आहे. विणकरांसाठी मुद्रा योजनेमध्ये 10 हजार रुपयांच्या ‘मार्जिन मनी’ची सुविधा देण्यात आली आहे.
इतकेच नाही तर आता जी मदत म्हणून कर्ज विणकरांना देण्यात येत आहे, ते अगदी कमी कालावधीमध्ये थेट त्यांच्या बँकखात्यामध्ये जमा होत आहे. ‘पहचान’ या नावाने, विणकरांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. यामुळे मधल्या दलालांना बाजूला सारण्यात मदत झाली आहे.
याशिवाय भदोई, मिर्जापूर मेगा कारपेट क्लस्टर आणि श्रीनगर कारपेट क्लस्टर यांच्यामार्फत विणकरांना आधुनिक माग देण्यात येत आहेत. माग चालवण्याचे कौशल्य यावे, यासाठी प्रशिक्षणाची सुविधाही देण्यात आली आहे. विणकरांच्या कौशल्यामध्ये वृद्धी व्हावी यासाठी खास ‘कौशल्य विकास’ योजनेमध्ये विविध कार्यक्रम सुरू केले आहेत.
मित्रांनो, याआधी ज्या ज्यावेळी मी विणकर बंधू-भगिनींबरोबर बोलत असे, त्यावेळी एक गोष्ट नेहमीच मला ऐकायला मिळत असे, ती म्हणजे, आमची पुढची पिढी, आमची मुलं आता या व्यवसायामध्ये काम करू इच्छित नाहीत. यापेक्षा गंभीर परिस्थिती काय निर्माण होवू शकते? आज आत्ता यावेळी आपण कारपेट क्षेत्रात संपूर्ण दुनियेत शीर्ष स्थानी आहोत. अशावेळी आपल्या येणा-या पिढीलाही प्रेरणा देवून, प्रोत्साहन देवून या व्यवसायाचे लाभ पटवून देणे तितकेच आवश्यक आहे.
हेच ध्येय निश्चित करून आयआयसीटी भदोई येथे ‘कारपेट तंत्रज्ञानामध्ये बी.टेक. अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. देशाच्या इतर भागातही प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम चालवण्याची योजना आहे. विणकरांच्या कौशल्याबरोबरच त्यांच्या मुलांनी आणि इतर युवकांनी या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे, यासाठीही योजना तयार केली आहे. गरीब विणकर कुटुंबातील मुलांच्या प्रशिक्षण शुल्कापैकी 75 टक्के शुल्क सरकारच्यावतीने देण्यात येते.
राष्ट्राची शक्ती आहे, त्यासाठीही सरकार कटिबद्ध आहे. आगामी काळामध्ये देशासाठी, बनारससाठी या कलेचे प्रदर्शन करण्याच्या खूप मोठ्या संधी मिळणार आहेत.
पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये काशीमध्ये प्रवासी भारतीय संमेलन भरविण्यात येणार आहे. या संमेलनामध्ये आपल्या कलेचा प्रचार, प्रसार करण्याची संधी मिळणार आहे. हे संमेलन आपली कला जगामध्ये पोहोचवण्याचे एक मोठे माध्यम बनणार आहे. संपूर्ण जगामधून येणारे व्यापारी आपल्या हस्तशिल्पाबरोबरच आपली संस्कृतिक स्मृती आणि बदलती काशी यांचा आनंदही घेवू शकणार आहेत.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धनत्रयोदशी, दीपावली आणि छठ पूजा यांच्या आधीच शुभेच्छा देतो. आणि या यशस्वी आयोजनाबद्दल, काशीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दिल्याबद्दल मंत्रालयाला, माझ्या विणकर बंधू-भगिनींना, आयात-निर्यातीशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांना, काशी येथे आल्याबद्दल आणि काशी एक वेगळे प्रतिष्ठा केंद्र बनवल्याबद्दल मी पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद देतो.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद !!