अखिल भारतीय नागरी सेवा दिनाच्या रूपात आजचा हा दिवस एक प्रकारे पुनर्समर्पणाचा दिवस आहे. देशभरात आतापर्यंत ज्या महान व्यक्तींनी हे कार्य करण्याचे सौभाग्य मिळवले आहे, आज देशभरात कानाकोपऱ्यात या सेवेत कार्यरत तुम्हा सर्वाचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा.
तुम्ही सर्व इतके अनुभवी आहात. मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव नाही आणि आव्हानांचा अंदाजही नाही, असे काही नाही. ताकदही माहित आहे आणि आव्हाने देखील माहित आहेत, जबाबदाऱ्याही माहित आहेत. आणि आम्ही हे पाहिले आहे की याच उपलब्ध व्यवस्थेअंतर्गत, देशाला उत्तम यश देखील मिळाले आहे. मात्र 15-20 वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात खूप फरक आहे आणि पाच वर्षांनंतरच्या स्थितीतही बहुधा खूप फरक असेल. कारण 15-20 वर्षांपूर्वी आम्हीच सर्वकाही होतो, जे काही होते आम्हीच होतो. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्व गरजा आमच्या मार्गावरूनच जायच्या. त्याला शिकायचे असेल तर सरकारकडे यावे लागायचे, तो आजारी पडला तरी सरकारकडेच यावे लागायचे. त्याला सिमेंट हवे आहे, लोखंड हवे आहे तरीही सरकारकडेच यावे लागायचे. म्हणजेच आयुष्यातील तो कालखंड होता, ज्यात सरकारच सर्व काही होते. आणि जेव्हा सरकारच सर्व काही होते तेव्हा आम्हीच सर्व काही होतो आणि जेव्हा आम्हीच सर्व काही असतो तेव्हा वाईट गोष्टी येण्याची स्वाभाविक वृत्ती असते. त्रुटींकडे कानाडोळा करण्याची सवय देखील लागते, मात्र गेल्या 15-20 वर्षात एक स्पर्धात्मक काळ सुरु झाला आहे. आणि त्यामुळे सामान्य माणूस देखील तुलना करतो की सरकारचे विमान तर असे जाते, खासगी विमान असे जाते. आणि त्याला त्वरित वाटते की सरकार बेकार आहे, सरकारवाले बेकार आहेत, त्याला हा पर्याय का पाहायला मिळाला आहे.
पूर्वी त्याला सरकारी रुग्णालयात डॉक्टर प्रेमाने जरी आले, काही केले नाही, केवळ रक्तदाब तपासला, तरी त्याला वाटायचे की माझी तब्येत सुधारते आहे, डॉक्टरांनी माझी सेवा केली आहे. आज दहा वेळा जरी डॉक्टर आले, तरी हे सरकारी आहे, खासगी रुग्णालयात गेलो असतो तर बरे झालं असते. म्हणजेच सामान्य माणसाच्या आयुष्यात 10-15-20 वर्षात एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आता पर्याय उपलब्ध झाल्यामुळे सरकार नावाच्या व्यवस्थेची आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आणि विशेषतः नागरी सेवेशी संबंधित लोकांची जबाबदारी 20 वर्षांपूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. कामाचा व्याप वाढला नसून, आव्हाने वाढली आहेत. कामाच्या ओझ्यामुळॆ नुसत्या अडचणी निर्माण नाही झाल्यात तर आव्हानांचा तुलनेत उभे राहण्यात आम्ही कमी पडत आहोत. कोणतीही व्यवस्था स्पर्धेत असायलाच हवी आणि तीच दर्जात्मक बदल घडवून आणण्यात मोठी भूमिका पार पाडत असते. जर साचलेपण असेल, इच्छा-आकांक्षा नसतील, तुलनात्मक कुठलीही व्यवस्था नसेल तर वाटते जे आहे ते सर्व चांगले आहे. मात्र जेव्हा तुलनात्मक स्थिती येते, आपल्यालाही वाटते की आपल्याला पुढे जायचे आहे. आता त्यावर उपाय हा नाही की त्याला खाली पाडा, आपण पुढे दिसायला हवे, नाही, जे पुढे जाऊ शकतात त्यांना पुढे जाऊ द्यावे आणि हे योग्य ठरेल की जितक्या लवकर आपण आपली कार्यशैली बदलू, आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलू. जितक्या लवकर आपण नियामकाच्या भूमिकेतून बाहेर पडून एक सक्षम संस्था म्हणून विकसित होऊ, तेव्हा या आव्हानाचे रूपांतर संधीत होईल. जे आज आपल्याला आव्हान वाटत आहे, ते संधी बनेल आणि म्हणूनच बदलत्या काळात सरकार शिवाय उणीव जाणवू दे मात्र सरकार हे ओझे वाटू नये. अशी व्यवस्था कशी विकसित करायची. आणि ही व्यवस्था तेव्हाच विकसित होईल, जेव्हा आपण गोष्टींकडे त्या दृष्टीने पाहायला लागू.
आता इथे काही प्रयत्न होत आहेत. तुम्ही केवळ या नागरी सेवा दिनाचेच उदाहरण घ्या, की आधी असे होते, आता असे का आहे? याचे उत्तर हे असू नये की पंतप्रधानांच्या मनात आले आणि आम्ही केले, नाही. विचार करण्याची पद्धत हि हवी की एवढी मोठी संधी असायची, आम्ही तिला एका विधीचे स्वरूप दिले. जर त्यात जीव ओतला, स्वतःला सहभागी करून घेतले, आगामी काळाचा विचार केला, तर तीच संधी आपल्याला एक नवी ताकद देते. या एका संधीत जो बदल दिसून येतो आणि जर तुम्हाला तो योग्य वाटत असेल, तर तुमच्या प्रत्येक कामात याच संधी अंतर्निहित आहेत. फक्त एकदा त्याला स्पर्श करण्याची गरज असते, अनुभूती यायला लागेल. आपण यातून या गोष्टी शिकू शकतो का. काय कारण असेल, तुम्ही देखील कधी त्या प्रक्रियेतून गेला असाल. तुम्ही देखील एखाद्या गावात काम केले, हळू-हळू जिल्ह्यात आलात, असे करत-करत आपण पोहोचले आहोत. आणखी बरेच लोक असतील, जे आधीही जिल्ह्यात काम करत होते, अजूनही जिल्ह्यात काम करतात. मात्र यापूर्वी त्यांना वाटले नाही, त्यामुळे शंभरहून कमी अर्ज आले आणि यावेळी अचानक जास्त आले. संख्यात्मक झेप तर घेतली आहे, आणि मी त्याचे स्वागत करतो. असेही होऊ शकते की कुणीतरी विचारले असेल की तू पाठ्वलेस की नाही? तेव्हा त्याला वाटले असेल की नाही पाठवले तरी प्रश्न विचारणार, त्यापेक्षा पाठवलेले बरे. मात्र जेव्हा माझ्यासमोर अहवाल आला, तेव्हा माझ्या डोक्यात वेगळेच विचार आले. मी म्हटले, असे करा, संख्यात्मक वाढ झाली हे चांगले आहे. 100 हून कमी होते, आता 500 पेक्षा अधिक झाले, चांगली गोष्ट आहे. आता थोडे दर्जात्मक विश्लेषण व्हायला हवे. ज्याला आपण भले पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक देऊ शकणार नाही, मात्र जरा गंभीरपणे पाहू तर कसे केले आहे. सर्वोत्कृष्ट गटात आलो, यात हे किती आहेत. मला ते आकडे सांगायचे नाहीत, थेट प्रक्षेपण सुरु आहे. मात्र तरीही मी यासाठी समाधानी आहे की एक सुरुवात तर झाली, संख्या वाढली. आता मला एका वर्षात दर्जात्मक बदल व्हायला हवा आहे. सर्वोत्कृष्टच्या खाली एखादा असायलाच हवा. कारण या यंत्रणेत असे लोक आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट असा शेरा लाभला आहे, म्हणूनच इथपर्यंत पोहोचले आहेत.
ठीक आहे, ते एखाद्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले असतील... चला तुम्हाला समजले. मात्र तरीही ठप्पा तर लागला की जे सर्वोत्कृष्ट आहे ते इथेच आहे. जर सर्वोत्कृष्ट इथेच आहे हा जर ठप्पा आहे तर तशाच प्रकारे कामगिरी करण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल आणि तुम्ही कधी पाहिले असेल की एक गृहिणी असते, कधी तिचा छंद, तिचे कौशल्य तिची क्षमता कुटुंबाच्या नजरेस पडत नाही. एक प्रकारे गृहित धरलेलं असते. मात्र कुटुंबाचा प्रमुख जर देवाने हिरावून घेतला, तर अचानक लक्षात येते की कालपर्यंत चुलीत अडकलेली एक गृहिणी संपूर्ण कुटुंबाचा डोलारा सांभाळू लागते. मुलांचे उत्तम प्रकारे संगोपन करते. आणि शेजार-पाजारच्या पुरुषांना लाज वाटेल इतक्या उत्तम प्रकारे आपले कौटुंबिक जीवन एका नव्या उंचीवर नेते. कालपर्यंत ती अनामिक होती, म्हणजे अंतर्निहित ताकद होती, जशी संधी आली, तिने स्वतःला फुलवले, विकसित करत जबाबदाऱ्या पार पाडल्या. इथे असे लोक असतील जे परीक्षा देताना प्रचंड तणावाखाली असतील, मात्र आता तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आली आहे. एवढी मोठी संधी आली आहे, अनेक गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही ती स्वीकारणार आहात का? मला वाटते, पदक्रमाचे ओझे तर आहेच. बहुधा ती ब्रिटिशांच्या काळातील देणगी आहे, जी मसुरीतूनही आपण बाहेर काढू शकलेलो नाहीत. मात्र मला सगळे काही येते, माझ्या वेळी तर असे होते. तू तर आता नवीन आला आहेस, आम्ही तर किती वर्षांपासून, २० वर्षांपूर्वी जिल्ह्यातून काम करून आलो आहोत, हे जे अनुभवाचे ओझे आहे, ते ओझे आपण हस्तांतरित करत आलो आहोत. तुम्ही विचार करा, वरिष्ठांनीही विचार करा, हा अनुभव ओझे तर बनत नाही ना. आपला अनुभव नव्या प्रयोगासाठी अडथळा तर बनत नाही ना. मला असे तर वाटत नाही ना की मी आता इथे सचिव बनलो आहे. त्या जिल्ह्यात मी आधी काम करायचो, मी माझ्या वेळेत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, नाही करू शकलो. 20 वर्षे उलटून गेली. आता हा नवीन मुलगा आला आहे, तो करतो आहे, माझे नाव खराब होईल. कुणी विचारेल की तू होतास नाही झाले, बघ या मुलाने करून दाखवले. तर माझ्या अनुभवाचे ओझे वाढत आहे, आणि मीच अडथळा बनत आहे. दुसऱ्या जिल्ह्याचे तर करेन, मात्र ज्या जिल्ह्यातून मी काम करून आलो आणि मी असताना नाही झाले. आता तू करून मान नाही मिळवू शकत... असे आहे. बरे वाटेल, वाईट वाटेल, मात्र हे आहे आपल्याला अभिमान वाटायला हवा की ज्या शेतात मी पेरले होते, तिथून मी निघालो, मात्र माझ्यानंतर जो आला त्याने पाण्याची व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर तिसरा आला, तो कुठूनतरी रोपटे घेऊन आला. चौथा आला त्याने त्याचा वटवृक्ष बनवला. पाचवा आला, माझ्याकडे फळ घेऊन आला. पाचही जणांचे योगदान आहे. या भावनेने जर आपण ही परंपरा पुढे नेली तर आपण ताकद जोडू आणि ताकद जोडणे हा आपला प्रयत्न असू शकतो. आपण प्रयत्न करायला हवेत.
मी गेल्या वेळीही म्हटले होते, नागरी सेवेची सर्वात मोठी ताकद काय आहे. आणि ही काही छोटी ताकद नाही. आणि गुजरातीत एक म्हण आहे हिंदीत काय आहे, मला माहित नाही. ठोठनिशार म्हणजे हुशार आणि कद्र म्हणजे जो अभ्यासात ढ आहे, त्याला जो अभ्यासात हुशार आहे त्याची किंमत त्याला जास्त जाणवते की हा हुशार आहे, जो ढ असतो त्यालाच हे माहित असते. पैसा एक गुण आहे तुमचा तो आम्हा राजकारण्यांना बरोबर समजतो. आणि मला वाटते की ही खूप मोठी ताकद आहे. तिला गमावून चालणार नाही. आणखी एक मोठी ताकद आहे ती अनामिकता.
अनेक अधिकारी तुम्ही पहा, ज्यांनी आपल्या कार्यकाळात, त्यांच्या मनात अशा काही कल्पना आल्या असतील, त्या प्रत्यक्षात आणल्या असतील, त्यांच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार केला असेल आणि त्याचा लाभ संपूर्ण देशाला मिळत असेल. मात्र शोधून सुद्धा सापडणार नाहीत, कोणती संधी होती, कुणाला कल्पना सुचली होती. कसे केले होते. ही अनामिका, ही या देशाच्या नागरी सेवेची सर्वोत्तम ताकद आहे असे मला वाटते. कारण मला माहित आहे की याचे सामर्थ्य काय असते. मात्र दुर्दैवाने त्यात घट तर होत नाही ना. मी समाज माध्यमांची ताकद ओळखणारा माणूस आहे. त्याचे महत्व जाणणारा माणूस आहे. मात्र यंत्रणांचा विकास जर त्यांच्या माध्यमातून होत असेल आणि यंत्रणेला जनतेशी जोडता येत असेल तर त्याचा उपयोग आहे. मी एखाद्या जिल्ह्याचा अधिकारी आहे आणि मी लसीकरणाचा प्रचार करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करत आहे की 20 तारखेला लसीकरण आहे, नक्की या, सर्वाना सांगा. मी समाज माध्यमांचा उपयोग करत आहे, मात्र जर मी लसीकरणात दोन थेंब पाजण्यासाठी गेलो असेन आणि माझे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध करत असेन तर अनामिकासाठी मी टीकेचा धनी बनतो. एकाच यंत्रणेचा मी कशा प्रकारे उपयोग करतो. आज मी पाहतो जिल्हा पातळीवरचे जे अधिकारी आहेत ते इतके व्यस्त आहेत, इतके व्यस्त आहेत, की बहुतांश वेळ यातच जातो. मी आजकाल माझ्या बैठकांमध्ये सर्वाना प्रवेशबंदी केली आहे. नाहीतर सगळ्या बैठकांमध्ये घेऊन बसतात. कोणती ताकद कुठल्या कामासाठी उपयोगात आणायची, कुठल्या नाही याचे भान जर राहत नसेल. लोकांपर्यंत पोहोचण्याचे उत्तम साधन आपल्या हाती आले आहे.
ई-शासनाकडून एम-शासनाकडे जग चालले आहे. मोबाईल शासन हे कालातीत सत्य आहे, आपण त्यापासून दूर राहू शकत नाही. मात्र ते लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असावे, जन-सुविधा पूर्ण करण्यासाठी हवे, मला वाटते ही अनामिका, ही आपली संपूर्ण ताकद आहे. ताजमहालची रचना किती जणांनी केली असेल, किती जणांनी संकल्पना दस्तावेज बनवले असतील, किती जणांनी मेहनत घेतली असेल, मात्र हे न तुम्ही जाणता, न मी जाणतो. मात्र ताजमहाल आपल्याला स्मरण करून देतो, या क्षेत्रातील लोकांनी हेच काम केले आहे आयुष्यभर, कधी त्याला स्वतःला विचारले निवृत्त झाल्यानंतर, 20 वर्षांनी विचारले की जरा पाच गोष्टी सांगा, तर त्यालाही आठवणार नाहीत, कारण त्यात तो एवढ्या समर्पण भावनेने जोडलेला होता, त्याला वाटले की माझे कर्तव्य होते, ते मी पार पाडले, चला पुढे चला. हि केवढी मोठी ताकद आहे आपल्या देशाकडे. आणि त्या ताकदीचे धनी तुम्ही आहात. आणि याचे मूल्य मी व्यवस्थित जाणतो. कारण आपल्याला माहित आहे की आपला फोटो इकडून तिकडे गेला तर आपली रात्र खराब होते, असे आहे आपले जग. आणि म्हणूनच मला माहित आहे की स्वतःची ओळख बनवल्याशिवाय देशासाठी दिवस-रात्र काम करणे ही छोटी गोष्ट नाही. त्याची मी चांगल्याप्रकारे प्रशंसा करू शकतो. त्याची ताकद मी ओळखतो. मात्र ही परंपरा आपल्या आधीच्या पिढीने आणि आपल्या ज्येष्ठ पिढीने निर्माण केली आहे तिचे जतन करणे आपल्या नवीन पिढीची खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याला कुठे इजा पोहोचू नये हे पाहणे गरजेचे आहे.
आपण हा नागरी सेवा दिन साजरा करत आहोत, तेव्हा प्रशासकीय सुधारणांसाठी जगभरातील समित्या स्थापन झाल्या असतील, आयोग स्थापन झाले असतील, केंद्र सरकारमध्ये असतील, राज्य सरकारांमध्ये असतील. आणि ज्यांनी बनवले असेल, त्यांनीही संपूर्ण वाचले नसेल. कारण 6 लोकांनी मजकूर लिहिला असेल आणि नंतर कुण्या तिसऱ्या व्यक्तीने ते संकलित केले असेल. हे जे सत्य आहे, कुणाला बरे वाटेल, कुणाला वाईट वाटेल, हे वास्तव आहे. आणि त्यानंतर पत्तादेखील माहित नसेल, कुठे पडला असेल. राज्यांमध्येही असे अनेक, प्रत्येक सरकारला वाटले असेल, काही सुधारणा करू, आयोग स्थापन करू, आणि ठीक आहे काही लोकांना कामे मिळतात निवृत्त झाल्यानंतर, मात्र परिवर्तन होत नाही. माझ्या अनुभवाने मी आज म्हणू शकतो, माझे सद्भाग्य आहे की मी देखील तुमच्याप्रमाणे या यंत्रणेत असतो, असे झाले नसते कारण मला कुठे प्रशिक्षण वर्ग मिळणार नव्हता, मात्र 16 वर्षे नोकरी केल्यावर काय बनू शकतो, उपसचिव, काय बनतो ? अं, संचालक बनतो, तर मी संचालकांच्या श्रेणीत आलो असतो कारण मी 16 वर्षे तुमच्यासोबत काम करत आहे. याच यंत्रणेत तुमच्याबरोबर काम करत आहे. आणि म्हणूनच माझे मत आहे आणि मी अनुभवले आहे, खरेच या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांचा जो अनुभव आहे आणि त्यांच्या ज्या सूचना आहेत, यापेक्षा सर्वोत्तम सुधारणांसाठी कोणताही आयोग सूचना देऊ शकणार नाही ,ही आपली चुकीची धारणा आहे. तुम्हा लोकांकडे जे आहे त्यापेक्षा उत्तम सूचना बाहेरून येऊच शकत नाही. आपण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करतो, आणि त्या अमलातही आणत नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्वात हे आणू शकतो का, छोटीशी व्यक्ती आपल्या अनुभवातून, हा जो प्रयोग सुरु आहे ना, जे पेपर लिहीत आहेत, नवीन तुकडीतील चार जणांना मी म्हटले की तुम्ही लिहून द्या, एक नवीन विचार प्रक्रिया येईल आपल्याकडे, आले, सर्वानी लिहिले. काही जणांनी जसेच्या तसे उतरवून काढले असेल. मी पूर्ण पाहिले नाही, हा मनुष्याचा स्वभाव आहे, होत असते. मात्र तरीही, काहींना काही असे आले असेल, ज्यात मंथन झाले असेल. आता हे यंत्रणेचे, प्रमुख लोकांचे काम आहे की हा जो प्रयोग केला , आपण कोणती पदवी मिळवण्यासाठी नाही केला, शैक्षणिक क्रमवारीसाठी नाही केला, माझा पेपर स्वीकारला जाईल यासाठी नाही केला. जे आले आहे, अनुभवाचे बोल आहेत, धरतीवर काम करणाऱ्या माणसाचे बोल आहेत, जे दररोज शेतकऱ्यांबरोबर आयुष्य जगतात, दररोज कारकुनी करणाऱ्यांबरोबर वेळ व्यतित करतात, जे आपल्या नवीन कॉम्पुटर ऑपरेटरसह काम करतात, कार्यालयीन वेळेमुळे,आणि ऋतुमानानुसार ज्या समस्या येतात, त्या ज्यांनी पाहिल्या आहेत, त्यांनी म्हटले आहे.
आपण ते एखाद्या ग्रंथाप्रमाणे धरू शकतो का? भले ते छोट्या व्यक्तीने म्हटले असेल, परंतु आतून म्हटले आहे त्यामुळे त्याची ताकद खूप मोठी आहे असा आपण दृष्टिकोन बनवू शकतो का? तुम्ही पहा, जेव्हा आतून एखादी गोष्ट येते तेव्हा त्याला स्वामित्व असते. स्वामित्व कुठल्याही यशाची पहिली हमी असते. यश तेव्हाच मिळते जेव्हा टीम स्वामित्व स्वीकारते. स्वामित्वाची संख्या जितकी अधिक वाढेल, यश तेवढ्याच वेगाने मिळते, जबाबदाऱ्या कमी होतात, भार हलका होतो, यशाचा लाभ सर्वाना मिळतो. हा जो प्रयत्न आहे एक प्रकारे स्वामित्वाची चळवळ आहे. हे दोन दिवस जे आपण एकत्र जमतो ना, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. एक स्वामित्वाची चळवळ आहे. प्रत्येकाला वाटते की हा देश माझा आहे, सरकार माझे आहे, जबाबदारी माझी आहे, परिणाम मला साधायचा आहे, समस्येवर तोडगा मला शोधायचा आहे.
एक गोष्ट निश्चित आहे की व्यक्ती म्हणून माणसाची खरी परीक्षा केव्हा होते, तुम्हाला नक्की माहित असेल कारण तुम्ही त्या जागेवर बसला आहात. अभावग्रस्त अवस्था व्यक्तीचे योग्य मूल्यमापन करत नाही. प्रभावग्रस्त अवस्था व्यक्तीचे योग्य मूल्यमापन करते. तुमच्याकडे सर्व काही आहे, तरीही तुम्ही अलिप्त आहात, तेव्हा समजते की हो, हे काहीतरी आहे. काही नसेल तर वाटते, ठीक आहे असेच जिंकले आहोत, तर कुणी पाहतच नाही, याचे महत्वच नाही. तुमच्याकडे सर्व प्रकारचा प्रभाव आहे, संपूर्ण शासकीय यंत्रणा तुमच्या बोटांवर आहे, तुमच्या शब्दाची ताकद आहे, तुमच्या सहीची, तर कुणाचे जग आमूलाग्र बदलते, तेव्हा तुम्ही काय करता ही तुमची परीक्षा आहे. आणि म्हणूनच अभावग्रस्त अवस्थेत व्यक्तीचे मूल्यमापन यशस्वी होत नाही, प्रभावग्रस्त अवस्थेत होतं.
त्याचप्रमाणे, प्रगतीमध्ये योगदान, बहुतांश वेळा आपण देशात अशा कालखंडातून गेलो आहोत, आपल्यापैकी बऱ्याचजणांची विचारसरणी टंचाईच्या स्थितीत कसा मार्ग काढायचा याबाबत आहे. विपुलतेच्या स्थितीत कसे काम करायचे, हे बऱ्याचदा आपला खूप मोठा वर्ग आहे त्यांच्या विचारात बसत नाही. त्यांना हे तर माहित असते की दुष्काळ असेल तर कसे योग्य व्यवस्थापन करायचे, मात्र त्याला हे माहित नव्हते की भरपूर पीक आले तर कसे व्यवस्थापन करायचे, तिथे तो पुन्हा चुकतो. त्याला हे माहित होते की इंजिनिअरिंग महाविद्यालयात रिक्त जागा असेल तर लोकांना कसा प्रवेश द्यायचा, मात्र जेव्हा जागा कमी पडतात आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते तेव्हा कसे व्यवस्थापन करायचे, तेव्हा तो अडचणीत सापडतो.
ज्याप्रकारे देश पुढे जात आहे, ज्या प्रकारे देशात सामान्य लोकांच्या विचारांसह त्याची मेहनत जोडलेली आहे, विपुलतेचे दर्शन होत आहे. पाणी कमी असेल तर कशी आंघोळ करायची हे जमते मात्र वर कारंजे सुरु आहे आणि कमी पाण्यात अंघोळ करण्याची सूचना आली तर त्याचे पालन करणे कठीण होते. जिथे जिथे विपुलतेच्या शक्यता दिसत आहेत किंवा आपल्या डोळ्यांसमोर विपुलता दिसत आहे, त्यासाठी आपली रणनीती बदलू शकतो का? आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो का? नाही तर आपण मोठे होऊ शकणार नाही. आपले विचार सीमित राहतील. आपण ती आव्हाने स्वीकारून पुढे जाण्याचे ठरवले आहे.
जसे मी सुरुवातीला म्हटले आपले आपल्यात होते, दुसऱ्या जिल्ह्याबरोबर देखील स्पर्धा नव्हती. हा जो जिल्हा आहे, तिथे पाणी आहे म्हणूनच शेती चांगली होते. तिथे दुष्काळ आहे म्हणून शेती होत नाही. होतं,होतं , माझ्या पूर्वजांनीही हेच केले, असे होते. आता केवळ जिल्हा-जिल्हा नाही, जग इतके बदलले आहे की आता राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा आहे, आता देश-देशांमध्ये स्पर्धा आहे, काल आणि आजच्या दरम्यान स्पर्धा आहे. प्रत्येक क्षणी आपण या प्रथेच्या आव्हानांना पुरून उरायचे आणि असे जागतिक संदर्भातही करायची गरज आहे.
नागरी सेवेची आणखी एक ताकद, आणि मला वाटते तिची ताकदही आहे , तिचा धर्मही आहे, नागरी सेवेतील व्यक्तीला त्या धर्मापासून विचलित होण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तो जिल्ह्यात बसलेला असो, तालुक्यात बसलेला असो किंवा प्रमुख म्हणून बसलेला असो, त्याची ही जवाबदारी आहे, प्रत्येक प्रस्ताव, प्रत्येक घटना, प्रत्येक निर्णय देशहिताच्या तराजूतच तोलणे, त्याकडे विखुरलेल्या तुकड्यात पाहायचा अधिकार नाही. हा निर्णय मी इथे घेतो, मात्र माझ्या देशातील एखाद्या कानाकोपऱ्यात नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना? माझे तर इथे काम होऊन जाईल, माझी प्रशंसा होईल, मात्र माझा हा निर्णय देशातील एखाद्या कानाकोपऱ्यात नकारात्मक परिणाम तर करणार नाही ना, हा तराजू नागरी सेवेकडे असायला हवा. त्याचे प्रशिक्षणच तशा प्रकारे झाले आहे, त्यात कधीही उणीव भासू देऊ नका. सरकारे येतील, जातील, नेते येतील, जातील, ही यंत्रणा अजरामर आहे. आणि या यंत्रणेचा मूलभूत धर्म प्रत्येक निर्णय देशहिताच्या तराजूत तोलणे हा आहे. आणि भविष्यातही काय परिणाम होईल, ते देखील त्याला पाहावे लागेल. जर भविष्यातील परिणामांबाबत जर त्याने विचार केला नाही, तरी चालणार नाही. आणि म्हणूनच नागरी सेवेत आपण जे प्रशिक्षण मिळवले आहे, बदलते युग लक्षात घेऊन, आपण त्यात स्वतःला सयुक्तिक कसे बनवायचे. बदललेल्या जगात जर आपण असंयुक्तिक झालो, तर बहुधा स्थिती कुठल्या कुठे पोहोचेल, आपण कुठलेच राहणार नाही. आणि म्हणूनच आपली संस्थात्मक वाढ, संस्थात्मक विकास, संस्थात्मक यंत्रणा, नियमितपणे आपण तपासत राहिले पाहिजे, वंगणाची आवश्यकता आहे.
इथे मनुष्यबळ या विषयावर चर्चा झाली आहे, बऱ्याच प्रमाणात, मला माहित नाही मनुष्यबळात वंगण विषय आला की नाही. काय कारण आहे, आपण सर्व नागरी सेवेतील लोक आहोत, 25 वर्षे जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत, 30 वर्षे जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत, नेतृत्वाच्या निर्णयाअभावी नाही, विभागाच्या, दोन विभागांमध्ये फाईली अडकल्या आहेत, काय कारण आहे? आणि तोच मुद्दा जेव्हा भारताचे पंतप्रधान प्रगति (सक्रिय शासन आणि वेळेवर अंमलबजावणी) कार्यक्रम करतात आणि याच कार्यक्रमात त्याचा समावेश झाला की एवढे मुद्दे प्रगति कार्यक्रमात बघितले जाणार आहेत आणि झटपट 24 तासात निर्णय होणे, सर्व मंजुऱ्या मिळणे आणि प्रकल्प मंजूर होणे, 8-9 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर होणे, काय कारण होते? प्रगतीचे यश असेल तर मी स्तुती करू शकतो की देशाचा असा एक पंतप्रधान आहे जो तंत्रज्ञानाचा वापर करून प्रलंबित अनेक समस्यांवर तोडगा काढत आहे. माझ्यासाठी तो आनंदाचा विषय नाही, माझ्यासाठी त्यातून शिकण्याचा विषय आहे, आणि शिकण्याचा विषय हा आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी विचार करायला हवा की काय कारण आहे जो निर्णय तुम्ही 24 तासात घेतला, तो 15 वर्षे का रेंगाळत होता? रस्ते बनत आहेत, लोकांना गरज आहे, मात्र वनविभागात अडकले आहे, मात्र पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला मंजूर झाले, ही स्थिती योग्य नाही. प्रगतीच्या यशासाठी मोदींचा जयजयकार होणे, त्यातून देशाचे कल्याण होणार नाही, ती एक तात्पुरती गोष्ट आहे. देशाचे कल्याण यात आहे की माझी यंत्रणा सुरळीतपणे चालत असेल, प्रत्येक अधिकाऱ्यांमध्ये एक वंगण व्यवस्था असायला हवी, सहकार्य असायला हवे. घर्षण शक्ती वाया घालवते, वंगण शक्तीला सुलभ बनवते. आपण त्या दिशेने विचार करू शकतो का? अजूनही मी समजू शकत नाहीये. सरकारचे दोन विभाग न्यायालयात का लढत आहेत, मी समजू शकलो नाही. न्यायालयात दोन वेगवेगळे विभाग, वेगवेगळी मते, सरकार एक. अखिल भारतीय नागरी सेवा या नात्याने आपण आपले कच्चे दुवे स्वीकारू शकतो का? कुणी जबाबदारीला घाबरत आहे? दायित्वापासून पळत आहे? का कुठे अहंकार आड येत आहे? नागरी सेवा दिनानिमित्त मला वाटते ही आत्मचिंतनाची संधी देखील असायला हवी. देशातील न्यायालयांचा किती वेळ वाया जात आहे, देशातील सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्यात किती अडथळे येत आहेत. आणि खटला हरणे जिंकणे याचे कारण काय तर, एका अधिकाऱ्याने पूर्ण विचार न करता जर फाईलमध्ये एक ओळ लिहिली आणि एखाद्या स्वारस्य असलेल्या गटाने त्या फाईलला हात लावला, प्रकरण बिघडते. एकत्रित बसून चर्चा करून आणि असा विचार करण्याची गरज नाही की कुणी लवकर निर्णय घेतो ते वाईट विचाराने घेतो. असं आरोप करणाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणतेही आरोप पूर्ण केलेले नाहीत. आणि म्हणूनच मनात अपराधी भावना बाळगण्याची गरज नाही, जर सत्यनिष्ठेने प्रामाणिकपणे जनसामान्यांच्या हितासाठी केले असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला वाईट ठरवू शकत नाही. क्षणभरासाठी काही झाले, होऊ दे, बघू, मी तुमच्याबरोबर आहे.
सत्यनिष्ठेने काम व्हायला हवे, कोण अडवत आहे पाहू. आणि आज एक संधी आली आहे हिंमतीने निर्णय घेण्याची, आज एक संधी आली आहे पठडीबाहेरचा विचार करण्याची, आज एक संधी आली आहे निर्धारित मार्गापेक्षाही नवीन मार्गावर पाऊल ठेवून परिस्थिती बदलण्याची आणि मला वाटते माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अशी संधी आयुष्यात खूप कमी मिळाली असेल, जी आज आली आहे. कारण मी अशा विचारांचा माणूस आहे.
इथे सुधारणा, कामगिरी, परिवर्तन यावर भाष्य होत आहे. राजकीय इच्छाशक्ती सुधारणांसाठी प्रेरित करते तर तुमची कर्तव्य शक्ती कामगिरीसाठी प्रेरित करते. राजकीय इच्छाशक्ती सुधारणा करू शकते मात्र जर टीमची कर्तव्यशक्ती कमी पडली तर कामगिरी होत नाही आणि लोकसहभाग नसेल तर परिवर्तन होत नाही. तर या तीन गोष्टी, राजकीय इच्छाशक्ती सुधारणा करू शकते, मात्र नोकरशाही व्यवस्था, प्रशासन कामगिरी करून दाखवतो. आणि लोकसहभाग परिवर्तन घडवतो. आपल्याला या तिन्ही गोष्टी एका सूत्रात बांधणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण या तिन्ही गोष्टी एका सूत्रात बांधतो तेव्हा इच्छित परिणाम मिळतो.
मला वाटते नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने आपण आत्मचिंतन करण्यात संकोच बाळगू नये. विचार करा, ज्या दिवशी नागरी सेवेसाठी तुमची निवड झाली असेल तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला कोणत्या रूपात पाहिले असेल, तुमच्या मित्रमंडळींनी कसे पाहिले असेल आणि तुम्हीही जेव्हा घरातून निघाला असाल तो क्षण आठवा. मला वाटते, तोच क्षण, त्याच्यापेक्षा मोठा सर्वोत्तम तुमचा कोणता मार्गदर्शक असूच शकत नाही, जो आयुष्याचा पहिला क्षण होता. तोच तुमच्या आयुष्याची ताकद आहे. जर दुसरे काही असेल तर तुमची गाडी रुळावरून घसरली आहे, जर तो कायम असेल तर तुम्ही खऱ्या मार्गावर आहात, माझे शब्द आठवण्याची गरज नाही आणि भारतातील तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी तुम्हाला सांगितले असेल कुठली आठवण काढायला, ज्या दिवशी तुम्ही नागरी सेवेसाठी निवडले गेलात त्या क्षणी तुमच्या मनात जे विचार होते तेच तुमची प्रेरणा असतील, मला नाही वाटत या देशाचे काही नुकसान होईल. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. तेच आठवा, पुन्हा पुन्हा आठवा, नागरी सेवा दिन आठवा, पुन्हा एकदा जरा 30-40 वर्षे 25 वर्षे मागे जा, जरा तो क्षण आठवा,जेव्हा आईवडिलांना कळले असेल की तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, आयएएस बनून पुढे जात आहात, मसुरीसाठी निघणार आहात. तो क्षण आठवा, रेल्वे स्थानकावर तुमचे आई-वडील सोडायला आले असतील, ते क्षण आठवा. बस, स्थानकावर तुमचे मित्र सोडायला आले असतील, तो क्षण आठवा. ते आधीचे 24,48 तास आठवा, आयुष्यात कशा कशा प्रकारची स्वप्ने घेऊन निघाला होतात, त्यात काही बदल, वळण तर आले नाही ना? कुणा इतरांच्या उपदेशाची आवश्यकता नाही, कुठल्याही प्रेरक कथेची आवश्यकता नाही, हीच एक खूप मोठी ताकद आहे.
सरकारचा एक स्वभाव असतो. यात खूप मोठ्या बदलाची गरज आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. खरोखरच आकड्यांच्या खेळामुळे बदल होतो का? तुम्हा लोकांमध्ये एक कथा प्रचलित आहे, बहुधा तुम्हाला माहीतही असेल . एका बागेत काही जण काम करत होते. एका ज्येष्ठ व्यक्तीने पाहिले. हे दोघेजण इतकी मेहनत करत आहेत, घाम गाळत आहेत. एक खड्डा खोदत आहे आणि दुसरा माती भरत आहे. तर त्याला कुतूहल वाटले. थोडे जागरूक नागरिक होते. त्यांनी जाऊन विचारले हे काय करत आहात? तुम्ही दोघेच जण, नाही म्हणाले, दोन नाही आम्ही तिघेजण आहोत. विचारले, तीन आहात ? म्हणाले तिसरा आज आला नाही. तर म्हणाले काय काम करत आहात? त्यावर म्हणाले, माझे काम आहे खड्डा खणणे, जो आज आला नाही त्याचे काम आहे झाड लावण्याचे आणि याचे काम आहे माती घालण्याचे. पण तो आला नाही, मात्र आमचे काम सुरु आहे. तो खड्डा खणतोय, मी माझे काम करतोय, तो नाही आला. काम झाले? झाले, जेवढे तास करायचे होते केले, जेवढी माती काढायची होती काढली, जेवढी घालायची होती, घातली. देशाला काय फायदा झाला. का? कारण एक नव्हता ना.
परिणामावर केंद्रित, आपल्याला प्रत्येक गोष्ट तोलून पाहायला हवी, आणि यावेळी प्रथमच मोठी हिंमत दाखवली आहे, गेल्यावर्षी अर्थसंकल्पाबरोबर एक निष्कर्ष संबंधित दस्तावेज दिला होता, खूप कमी लोकांनी त्याचा अभ्यास केला असेल. प्रथमच भारतात अर्थसंकल्पाबरोबर एक निष्कर्ष संबंधित दस्तावेज दिला. आपण तळागाळापर्यंत ही गोष्ट आपली संस्कृती म्हणून प्रचलित करू या की प्रत्येक गोष्ट निष्कर्षांच्या तराजूतून मोजायची, उत्पादनाच्या तराजूतून नाही. उत्पादन कॅग साठी ठीक आहे, निष्कर्ष ही कॅग+1ची पायरी आहे आणि ती देशाची लोकशाही आहे,जी कॅग पेक्षा दोन पावले पुढे आहे. आणि म्हणूनच आपण कॅग केंद्रित उत्पादन पाहिले तर देशात बदल कदाचित पाहू शकणार नाही, मात्र कॅग + च्या दृष्टिकोनातून निष्कर्षासह पाहिले तर आपण देशासाठी काही देऊन जाऊ.
स्वातंत्र्यानंतर 70वर्षांनी प्रथमच सर्व प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करत देशाचा अर्थसंकल्प 31 मार्चला सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 1एप्रिलला नवीन अर्थसंकल्प, नवीन पैसे खर्च करणे सुरु होणे, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी प्रथमच घडले आहे. तुम्हीच तर लोक आहात, ही तुमचीच तर कमाल आहे, तुम्हीच तर करून दाखवलंत. याचा अर्थ असा झाला की आजही आमच्या सहकाऱ्यांमध्ये, माझ्या या सैन्यामध्ये जे ठरवू ते करून दाखवण्याची धमक आहे, हे मी अनुभवतोय. आणि म्हणूनच माझा विश्वास अनेक पटीने अधिक आहे. लोक कधी निराशेने बोलतात, मी तुमचे स्मरण करतो, तुम्हा लोकांचे कर्तव्य आठवतो, निराशा नावाची कोणतीही गोष्ट माझ्याजवळ येत नाही, मला स्पर्श करत नाही.
गेल्या तीन वर्षात मी अनुभव घेतला आहे , माझा गुजरातचा अनुभव तर प्रचंड आहे, मात्र इथे माझा तीन वर्षाचा अनुभव आहे, तीन वर्षात मी अनुभवले की एक विचार मी मांडला असेन आणि मला त्याचा परिणाम मिळाला नाही असे काही घडलेले मला आठवत नाही, कुणी केले? आणि म्हणूनच सुधारणा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, मला ती समस्या नाही, बहुधा जास्तच आहे. मात्र कृतीसाठी कर्तव्य खूप आवश्यक असते आणि हे काम कोण करतं, मला सांगा? पंतप्रधानांनी म्हटले की माझ्या मनात एक विचार आला आहे, ती कल्पना धोरणात कोण बदलते? तुम्ही करता. योजनेत कोण परिवर्तित करतं? तुम्ही करता. जबाबदाऱ्यांची वाटणी कोण करतं? तुम्ही करता. संसाधने कुठून काढता? तुम्ही करता. ठरवल्यानंतर देखरेख कोण करते? तुम्ही करता. कुठे त्रुटी राहिल्या ते शोधते कोण? तुम्हीच शोधता. चूक कुठे झाली कोण शोधते? तुम्हीच शोधता. सगळे काही, बाहेरची व्यक्ती जेव्हा पाहिल तेव्हा तिला आश्चर्य वाटेल की हेच लोक आपल्या त्रुटीही शोधतात. हेच लोक आपल्या चुकाही शोधतात. हेच लोक आहेत ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. अशी एकजिनसी यंत्रणा, ही खूप मोठी देणगी आहे देशाला अखिल भारतीय नागरी सेवा. आणि म्हणूनच आजचा दिवस देशासाठीही खूप महत्वपूर्ण आहे की ही एक यंत्रणा आहे जी देशाला अशा प्रकारे प्रत्येकवेळी स्वतःच्या कसोटीवर तावून सुलाखून, स्वतःला सुधारते, कदाचित अपेक्षेपेक्षा दोन पावले मागे राहत असतील, मात्र प्रयत्न असतो अपेक्षा पूर्ण करण्याचा, आणि हिच टीम तर ते करते. या टीमप्रति देशबांधवांच्या आदरभावना कशा वाढतील? सामान्य माणसाच्या मनात ही भावना का निर्माण झाली आहे? कधीतरी तुम्ही सुद्धा आत्मचिंतन करा, तुम्ही वाईट लोक नाही आहात, तुम्ही,काही वाईट केलेले नाही, तुम्ही वाईट करण्यासाठी निघाला नाहीत, मात्र तरीही सामान्य लोकांमध्ये तुमच्याप्रति भावना होण्याऐवजी अभाव का आहे? काय कारण आहे? हे आत्मचिंतन आपण करायला हवे. आणि आत्मचिंतन केले तर मला नाही वाटत,की कुठल्या खूप मोठ्या बदलाची गरज भासेल. छोटासा मुद्दा असतो, जो सांभाळावा लागतो. जर आपण तो सांभाळला तर आपोआप अभावाचे भावनेत रूपांतर होते.
काश्मीरमध्ये पूर येतो, आणि लष्करातील लोक कुणाचेही आयुष्य वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावतात, तेव्हा तेच लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, भले नंतर दगडफेक करतात, मात्र एका क्षणासाठी त्याच्याही मनात येते की हे आहेत माझ्यासाठी जीव देणारे लोक. हे सामर्थ्य तुमच्यात आहे, ही ताकद तुमच्यात आहे. अशा उज्वल भविष्यकाळासह पुढे जाणारे आपण लोक आहोत.
2022 , स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.आपल्याला तुकड्यांमध्ये देश चालवायचा नाही , आपण एका स्वप्नांसह देश जोडायला हवा. प्रत्येक स्वप्न संकल्पात परिवर्तित करण्यासाठी आपण प्रेरक संस्था म्हणून भूमिका पार पाडायला हवी. सव्वाशे कोटी देशबांधवांच्या मनात ही भावना का जागू नये?2022, स्वातंत्र्यसैनिकांनी जी स्वप्ने पाहिली आणि ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि ज्यामुळे आपण इथवर पोहोचलो, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपला देखील काही संकल्प असायला हवा. आपण देखील काही ठरवायला हवे. जी यंत्रणा मी पाहतो आहे तिचेही काही संकल्प असतील की नाही? ज्या लोकांशी मी व्यवहार करतो,त्यांच्याबरोबर, माझ्या स्वप्नांबरोबर त्यांनाही मी खेचून आणेन की नाही? मी त्यांनाही सोबत घेईन की नाही?.2022, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, हे भारत सरकारमध्ये बसलेल्या छोट्या ते मोठ्या प्रत्येक नोकराचे जर स्वप्न बनले नाही तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या त्या वीरांप्रति आपण अन्याय करू, ज्यांनी देशासाठी प्राण पणाला लावले. हा आपणा सर्वांचा संकल्प असायला हवा.
गंगेच्या स्वच्छतेबाबाबत आपण बोलतो. कुणी ना कुणी नागरी सेवेतील व्यक्ती असेल ज्याच्याकडे गंगेच्या किनाऱ्यावरील कुठलं ना कुठलं गाव असेल? गंगेच्या किनाऱ्यावर असे कोणतेही गाव नसेल जे कुठल्याही नागरी सेवेतील व्यक्तीशी निगडित नसेल. राजीव गांधी यांच्या काळापासून गंगा स्वच्छतेचा विषय चर्चिला जात आहे. तिच्या किनाऱ्यावर जी गावे आहेत तिथे कोणत्या ना कोणत्या नागरी सेवेतील व्यक्ती प्रभारी असेल. तो जिल्ह्यात असेल तेव्हा ते गाव आले असेल, तालुक्यात असेल तेव्हाही आले असेल. जर मी नागरी सेवेत आहे, देशाला गंगा स्वच्छ करायची आहे, भारत सरकारचा गंगा स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आहे, किमानपक्षी मी गंगेच्या किनाऱ्यावरील त्या गावात घाण जाऊ देणार नाही इतका संकल्प माझे सहकारी करू शकत नाही का? एकदा का तिथल्या प्रभारी अधिकाऱ्याने ठरवले की मी ज्या गावाचा अधिकारी आहे तिथून कुठल्याही प्रकारचा कचरा आता गंगेत जाणार नाही, कोण म्हणते गंगा स्वच्छ होऊ शकत नाही? करायच्या पद्धती इथेच कराव्या लागतील. आपली स्वप्ने आणि संकल्प यांना सूक्ष्म स्तरावर व्यवस्थापन कसे असावे याच्याशी आपण स्वतःला जोडायला हवे. जबाबदारी घ्यावी लागेल, स्वामित्व भावना , जर या गोष्टी आपण केल्या तर आपण परिवर्तन घडवू शकतो. आणि असे मानून चाला की जग मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहे. बदलत्या जगात भारताच्या लोकशाही मूल्यांकडे भारताला वेगळ्या पद्धतीने जग पाहत आहे. कालपर्यंत आपण आपली गुजराण करण्यासाठी जे काही करत होतो, करत होतो, मात्र 2022 पूर्वी आपण स्वप्ने पाहायला हवीत की जगात भारत एक सामर्थ्यवान देश म्हणून कसा उदयाला येईल. हे स्वप्न पाहून आपण वाटचाल करायला हवी. आणि हे काही निवडक व्यक्तींचे कर्तव्य नाही, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांचे कर्तव्य नाही, सरकारी व्यवस्थेत जगणाऱ्यांचे अधिक कर्तव्य आहे. हे जर झाले, आणि प्रशासक असत किंवा शासक असो, प्रत्येक जण जर एकाच दिशेने चालला, मनाच्या तारा जुळल्या, मला विश्वास वाटतो की आपण नक्कीच परिणाम साध्य करू शकू.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे आपण नेहमी स्मरण करतो. या यंत्रणेला भारतीय संदर्भात विकसित करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नानुसार बनविण्याचे काम, प्रत्येकाने प्रयत्न केला. आता आपणा सर्वांची जबाबदारी आहे की बदलत्या युगात, आव्हानांच्या काळात, स्पर्धात्मक वातावरणात आपण स्वतःला कशा प्रकारे सिध्द करू आणि सामान्य माणसाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.
मी पुन्हा एकदा तुम्हाला या नागरी सेवा दिनी देशभरातील आणि जगातील कानाकोपऱ्यात बसलेल्या याच क्षेत्रातील आपल्या सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो आणि देशाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या जितक्या पिढ्यानी काम केले आहे, त्या सर्वांचे ऋण स्वीकारतो, त्यांचे आभार मानतो, तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद !