Dadi Janki is a true Karma Yogi, who continues to serve society even at the age of 100 years: PM
PM Modi appreciates the work done by the Brahma Kumaris institution in many fields, including in solar energy
Brahma Kumar and Kumaris have spread the message of India's rich culture throughout the world: PM
By 2030, India aims to generate 40% energy from non-fossil fuels. By 2022, our aim is to ensure 175 GW of clean energy: PM
Let us further the use of digital transactions and make the system more transparent: PM Modi
We have amended the Maternity Bill. This will benefit working women as leaves have been enhanced from 12 to 26 weeks: PM

ब्रह्मकुमारी संस्थेचे सर्व सदस्य, आंतरराष्ट्रीय संमेलन आणि सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून आलेल्या सर्व लोकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. ॐ शांती म्हणून आपणा सर्वाना अभिवादन करतो. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे संस्थापक, दादा लेखराजजी यांनी ज्या विचाराला संस्थात्मक रूप दिले आणि स्त्री शक्तीच्या माध्यमातून हा विचार पुढे नेला, त्या आंदोलनाला आज 80 वर्षे होत आहेत यामुळे दादा लेखराजजी यांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभत असेल. आपल्या देशात 80 वर्षाचे विशेष महत्व मानले जाते. जगात 25 वर्षे, 50 वर्षे, 75 वर्षे, 100 वर्षे, यांचे महत्व मानले जाते, मात्र भारतात 80 वर्षांना विशेष महत्व आहे. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेची 80 वर्षे म्हणजे सहस्त्र चंद्र दर्शन पर्व असते. 80 वर्षाच्या प्रवासात त्या व्यक्ती किंवा संस्थेला एक हजार पूर्ण चंद्राचे दर्शन घडलेले असते.

आज ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय, दादा लेखराजजी यांच्या प्रयत्नातून सुरु झालेले ब्रम्हकुमारी आंदोलन सहस्त्र चंद्र दर्शन समयातून, संपूर्ण मानवजातीला शीतलता प्रदान करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला नवी ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करेल.

गेल्या वर्षी दादी जानकीजी यांनी शताब्दी पूर्ण केली, त्या एकशे एक वर्षाच्या आहेत आणि आजही एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे आपणा सर्वाना आशीर्वाद देत आहेत. मी इथूनच दादीजींना प्रणाम करतो. दोन दिवसांनी चेटी चंद पर्व साजरे केले जाईल. संपूर्ण हिंदुस्तानमध्ये संवत्सर समय असतो. मी आपणा सर्वाना नव संवत्सर, चेटी चंदच्या खूप-खूप शुभेच्छा देतो.

आपणा सर्वाना भेटण्याची संधी मला काही वेळा लाभली आहे. आपणा सर्वांचा माझ्यावर अपार स्नेह राहिला आहे. उच्च विचार आचरणाऱ्या संस्थापकाच्या जीवनात 80 वर्षे हा काळ कमी नव्हे. आज जगातल्या परिस्थितीकडे पाहता, मानवी स्वभाव लक्षात घेता, कोणतीही संघटना किंवा व्यवस्था 10 वर्षे,15 वर्षे, 20 वर्षानंतर विखरायला सुरवात होते. गट बनू लागतात, एकातून दहा संस्था निर्माण होतात. दादा लेखराजजी यांची कमाल आहे की त्यांनी जी मूल्ये, जे आदर्श ठेवून ब्रम्ह कुमारी विश्वविद्यालय, ब्रह्म कुमारी आंदोलन चालवले, स्त्री शक्तीला प्राधान्य देऊन चालवले, 80 वर्षांनंतरही आज त्याच मानसिकतेने, तितक्याच प्रखरतेने, त्याच एकजुटीने,त्यांचा संदेश जगभरात पोहचवला जात आहे, लाखो कार्यकर्त्यांची साखळी तयार केली आहे. ब्रम्हकुमार, ब्रम्हकुमारी, भारताचा आध्यात्मिक संदेश जगभरात पोहोचवत आहेत. आपणा सर्वांचे अभिनंदन.

आपणा सर्वाना भेटण्याची संधी मला काही वेळा मिळाली आहे. आपल्या सर्वांचे विचार, चिंतन मी जवळून अनुभवले आहे, समजण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपणा सर्वांचा सहवास मला लाभला आहे.

सध्या कामाची व्यग्रता जास्त असते, वेळेच्या समस्येमुळे मी आपणा सर्वाना प्रत्यक्ष भेटू शकत नाही मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपणा सर्वांचे दर्शन मला लाभले. ब्रम्हकुमारी कार्य योजनेचे वैशिष्ट्य असते, आज आपण नवे वैशिष्टय दाखवले. प्रकाशाच्या माध्यमातून आपण सर्वानी अभिवादन केले आणि मी आपणा सर्वाना टीव्हीवर पाहत आहे. दादा लेखराज आणि दादीजींच्या नेतृत्वाखाली अवघ्या जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करत आहात. आपण अशा एका देशाचे प्रतिनिधी आहोत, अशा देशाचे पुत्र आहोत, ज्याला,आपले विचार दुसऱ्यावर लादणे आवडत नाही. ज्ञानाला कोणतीही सीमा नसते, ज्ञानाला वेळेचे बंधन नसते, ज्ञानाला पासपोर्ट लागत नाही, व्हिजा लागत नाही, ज्ञान युगानुयुगे मानवी संपदा असते, ज्ञान कालातीत असते, नित्य नूतन असते आणि त्या ज्ञानाच्या मार्गावरच आपल्याला जीवनातले सत्य उमगते या विचारधारेवर आपला विश्वास आहे.

ब्रम्हकुमारी माध्यमातून हा निरंतर प्रयत्न सुरु आहे आणि भारताचे हे वैशिष्ट्य आहे. ईश्वर एक आहे हे या देशाने सर्वाना सांगितले आहे. हिंदूंचा देव वेगळा, मुसलमानांचा देव वेगळा, ख्रिश्चनांचा देव वेगळा, पारश्यांचा देव वेगळा ही आमची शिकवण नव्हे आणि म्हणूनच आमच्या शास्त्रांनी, वेदकाळापासून आम्हाला हेच शिकवले

एकमसत, विप्रा: बहुधा वदन्ति

सत्य एकच आहे, ऋषी मुनी ते वेगवेगळ्या मार्गाने सांगतात.

वेगवेगळे लोक वेगवेगळ्या रूपाने व्याख्या करतात. मात्र सत्याप्रती आपल्या दृष्टीकोनाची भावना तीच आहे. शांतिवनात आपण सौर प्रकल्प सुरु केला आहे असे मला समजले. शांतिवनाशी निगडित रुग्णालय पाहण्याची संधी मागे मला मिळाली होती, गरीबांची सेवा कशी केली जाते हे मी प्रत्यक्ष पाहिले होते. सौर ऊर्जेसाठी आपण इतके कार्य करत आहात, अबू रोडवर असलेले केंद्र सौर उर्जेवर चालवण्याचा निर्णय आपण काही वर्षांपूर्वी घेतला होता, जेव्हा जागतिक तापमान वाढीची एवढी चर्चाही नव्हती, तेव्हा आपण हा निर्णय घेतला होता. दूर दृष्टीने आपण काम करता हे यातून प्रतीत होत आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली देशात ऊर्जा क्रांती येत आहे, मानवी जीवनात ऊर्जा क्रांती येत आहे. निसर्गामध्ये सौर ऊर्जेचे जेवढे महत्व आहे तेवढेच व्यक्तित्वामध्ये शौर्य व ऊर्जेचे महत्व आहे आणि जिथे तेज आहे, सामर्थ्य आहे, संकल्प आहे तिथे व्यक्तित्व नवी शिखरे पार करु शकते. अबू सारख्या ठिकाणी 3 मेगा वॅट सौर ऊर्जा; हा प्रयत्न खूप प्रेरक ठरेल असा मला विश्वास आहे.

शेजारी गुजरातमध्ये मोठा पुढाकार घेतला गेला. देशात सौर ऊर्जेबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवण्यासाठी सर्व राज्यातल्या सरकारांना प्रेरणा मिळाली. गुजरात सरकारचा प्रयत्न सफल ठरला. आज शांतीवनही सौर ऊर्जेशी जोडले जात आहे, हे निसर्ग संरक्षणाचे काम आहे. शांतिवनात सौर प्रकल्पाद्वारे,एका दिवसात 38 हजारहून जास्त लोकांचे जेवण बनवणे शक्य आहे. निसर्ग संरक्षणासाठी आपण केवढे मोठे कार्य करत आहात. सौर कंदील, घरासाठी सौर प्रकाश यंत्रणा, सौर चूल, घरो-घरी पोहचवण्याची मोहीमही आपण हाती घेतली आहे. समाजात मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न आपणाकडून होत आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे तर निसर्गाच्या सानिध्याने गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात कसा बदल घडवता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

जागतिक तापमान वाढ या संकटाचा मुकाबला जग करत आहे, त्यासाठी भारत कशी मदत करू शकेल यादृष्टीने भारताने संकल्प केला आहे की 2030 पर्यंत म्हणजे 13 वर्षात देशाच्या ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी 40 टक्के ऊर्जेची पूर्तता नवीकरणीय उर्जेपासूनच करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत तेव्हा 2022 मध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात भारत काय पुढाकार घेऊ शकतो, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काय कामगिरी करू शकतो याचा विचार करून भारताने, 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचा संकल्प केला आहे, हे फार मोठे उद्दिष्ट आहे. सरकार, समाज, संस्था, ज्याप्रमाणे आपण 3 मेगावॅट घेऊन आला आहात, त्याप्रमाणे या सर्वानी या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग केल्यास मानव जातीची,निसर्गाची, परमात्म्याची मोठी सेवा घडेल. या कामाशी आपण जोडले गेला आहात, मी आपणा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. निसर्ग संरक्षणासाठी आपण इतरही अनेक कामे करत आहात, त्याचाही मोठा फायदा होईल.

अशाच प्रकारे आपण वृक्षांसाठी काम करत आहात, आपल्याकडे वृक्षांना परमात्मा मानले गेले आहे. हरित क्रांती, दुग्ध क्रांती, ऊर्जा क्रांती, अशा निसर्ग संरक्षणाबरोबरच मानवी जीवनाला नवी दिशा देणाऱ्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. मी आपले खूप-खूप अभिनंदन करतो. ऊर्जा बचतीसाठी भारत सरकारने एलईडी ब्लबचा कार्यक्रम हाती घेतला आहे ही माहिती आपण घरो-घरी पोहोचवाल. नगर पालिकेत, महानगरपालिकेत, लोकांच्या घरा-घरात सुमारे 22 कोटी एलईडी लावण्यात आले आहेत त्यामुळे जवळपास 11 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. ब्रम्हकुमारीची 8500 केंद्रे आहेत. सौर ऊर्जेद्वारा आपण एक नवी दिशा दिलीत त्याप्रमाणे, एलईडी बल्‍बसाठी ब्रम्हकुमार, ब्रम्हकुमारी देशात जागृती करू शकतात. यामुळे ऊर्जेची बचत होईल, गरीब माणसाचे पैसे वाचतील, महापालिकांचे पैसे वाचतील, हे पैसे दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणता येतील. एके काळी 400 - 500 रुपयांना विकला जाणारा एलईडी आज 50 -60 रुपयांना मिळत आहे. ब्रम्हकुमारी द्वारे समाजासाठी केल्या जाणाऱ्या कामात या कामाची जोड दिली जाऊ शकते.

आज आपण आयात केलेल्या पेट्रोल, डिझेलवर अवलंबून आहोत. आपण जर पवन ऊर्जा, जल ऊर्जा, सौर ऊर्जा, यावर भर दिला तर पेट्रोलियमसाठी एवढे पैसे खर्च करावे लागतात, कोट्यवधी रुपये लागतात त्याची बचत होईल आणि हिंदुस्तानमधल्या गरिबांसाठी त्याचा उपयोग करता येईल. त्या दृष्टीने आपले योगदान म्हणजे योग्य दिशेने चाललेले काम आहे. यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात.

निसर्गाचे शोषण करू नये असेच आपल्या शास्त्रात म्हटले आहे. निसर्गाचे शोषण हा आपल्याकडे गुन्हा मानला गेला आहे. निसर्गाकडून योग्य रीतीने आपण घ्यायला हवे आणि याबाबत काम करण्यासाठी आपले प्रयत्न नक्कीच उपयुक्त ठरतील.

ब्रह्मकुमारी संस्थेचा मंत्र, 'एक ईश्वर, एक विश्व परिवार' हे आपल्या देशाचे मूळ चिंतन आहे. 'वसुधैव कुटुम्बमकम' हा इतका विशाल, व्यापक आणि चिरंतन विचार याच भूमीने दिला आहे. वेळो वेळी त्याची अभिव्यक्ती वेगळी असेल, भाषा वेगळी असेल पण विचार तोच असेल, म्हणूनच भारत, जगात न्याय, समृद्धी साठी प्रयत्नशील राहिला आहे. भारताच्या प्रयत्नातूनच आज जगभरात आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी मोहीम सुरु आहे, जगातले आणखी देशही यामध्ये सहभागी होत आहेत. आज आपण सर्व जण जमलो आहोत, 80 वर्ष साजरी करत आहोत, एवढा मोठा समारंभ होत आहे, देशभरातले लोक आले आहेत, त्याचे औचित्य साधून, मी आपणा सर्वाना एक आग्रहाने सांगू इच्छितो की आज इथून निघण्यापूर्वी, आपण विचार करा की 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांनी जी स्वप्ने बाळगली होती, ती पूर्ण करण्यासाठी काही करण्याची आपली सर्वांची जबाबदारी नाही का?सामूहिक रूपाने करण्याची, संकल्प करून करण्याची, योग्य दिशेने करण्याची आपली जबाबदारी नाही का? जगातली एवढी मोठी लोकसंख्या आपल्या जीवनात बदल घडवते तेव्हा विश्व कल्याणासाठी मोठा आधार ठरू शकतो. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात, 2022 पर्यंत ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या माध्यमातून, ब्रम्हकुमार आणि ब्रह्मकुमारी यांच्या माध्यमातून, भारतातल्या आठ हजारहून जास्त शाखांच्या माध्यमातून, दोन, तीन पाच, सात आपल्याला योग्य वाटेल तितके संकल्प घ्या. 2022 पर्यंत ते पूर्ण करण्याचा निर्णय करा आणि पहा आपले केवढे मोठे योगदान राहील. भारतात ज्याप्रमाणे हे कार्य घडते आहे त्यात आपणही नवा जोम भराल असा मला विश्वास आहे. गेल्या काही दिवसात आपण पाहिले असेल, नोटाबंदीनंतर, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातल्या निर्णायक लढ्याच्या दिशेने आपण आगेकूच करत आहोत. देश पुन्हा काळ्या पैश्याच्या दिशेने जाऊ नये यासाठी डिजिटल तंत्रज्ञान मोठे काम करू शकते. रोखीचा व्यवहार जेवढा कमी होईल, डिजिटल चलनाचा जेवढा जास्त उपयोग होईल तेव्हा देशात आपण स्वच्छ व्यवस्था विकसित करू शकू. सर्व ब्रम्हकुमार आणि ब्रम्हकुमारी आपल्या मोबाईलवर भीम अँप डाउनलोड करून छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल देवाण घेवाणीसाठी, रोख रहित व्यवहारांच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करू शकतात का ? मी आज आपल्यासमवेत आहे भलेही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलो असेन, मात्र माझे एवढे नाते नक्कीच आहे की मी आपल्याला हक्काने सांगू शकेन की ब्रम्हकुमारींद्वारे या कामावर भर दिला जावा आणि देशात परिवर्तनाच्या सूत्रधाराच्या रूपात आपली इतकी मोठी संस्कारित मनुष्य शक्ती उपयोगात यावी.

ब्रह्मकुमारी आंदोलनात ब्रम्हाकुमार आहेतच पण ब्रह्मकुमारी खूप सक्रिय आहेत. आपल्या देशात आजही लाखो बालके लसीकरणापासून वंचित आहेत. यामुळे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराला ही बालके बळी पडतात. माता मृत्यूदर, शिशु मृत्यूदर हे चिंतेचे विषय आहेत. कुपोषण ही चिंतेची बाब आहे. इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत, भारत सरकार, घरा- घरासाठी एक जबाबदारी निश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. लसीकरण कार्यक्रम असेल तेव्हा आमचे ब्रह्माकुमार आणि ब्रह्मकुमारी यांनी, एक स्वयंसेवक म्हणून त्याच्याशी बांधील राहावे. लहान-लहान मुलांचे आयुष्य वाचवण्यासाठी उपयोगी पडावे, केवढी मोठी सेवा होईल. आपण तर याच सेवाधर्माशी बांधील आहात. आपण हे मोठे काम करू शकता.

मी आणखी एका कार्यक्रमासाठी आपल्याकडे आग्रह धरतो. ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय, असा ऑनलाईन कोर्स सुरु करू शकते का, ज्याद्वारे हिंदुस्तानच्या जनतेला ऑनलाईन परीक्षेसाठी प्रेरित करता येईल, शिक्षित करता येईल,परीक्षा घेता येईल, प्रमाणपत्र कोर्स करता येईल आणि माझ्या मनात यासाठी विषय आहे पोषण.पोषणाबाबत आपल्याकडे अज्ञान आहे.वयानुसार आहार कसा असावा, शरीराला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, या ज्ञानाचा अभाव आहे. दोन वेळेला पोट भरले की काम झाले अशी विचारधारा आहे. ज्यांची आर्थिक स्थिती ठीक आहे, दोनवेळा चांगले खाणे खाऊ शकतात त्यांनाही काय खायचे, कसे खायचे,काय खायचे नाही,याविषयी माहित नसते.शरीराला पोषणासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, कोणत्या गोष्टी नसल्यास शरीराला हानी होऊ शकते, याबाबत ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ऑनलाईन प्रशिक्षण, ऑनलाईन परीक्षा घेऊन ही मोहीम उभारू शकते का? हिंदुस्तानची सर्व विद्यापीठे आपल्याबरोबर जोडता येऊ शकतात का? आपल्या संघटनेत महिलांची संख्या भरपूर आहे. आणि महिलांची सक्रिय भूमिकाही आहे. पोषक आहाराबाबतच्या उणीवा दूर करायच्या असतील, मुलांना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर आपण फार मोठे योगदान देऊ शकता.या बाबतही विचार करावा असा माझा, तुम्हाला आग्रह आहे.या कामासाठी आपण पुढाकार घेतला तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करावे, जी काही मदत लागेल ती करावी असा आग्रह मी भारत सरकार, राज्यसरकारांना करेन. एक चळवळ आपण उभारू शकतो. नववी, दहावी, अकरावी, बारावीत शिकणाऱ्या मुलींना पोषक आहाराचे ज्ञान असेल तर परिवार सांभाळताना, स्वयंपाकघरावर त्यांचाच पगडा असणार. आपण विचार करू शकता, त्या किती मोठा बदल घडवून आणू शकतात. आपल्या माध्यमातून हे काम उत्तम साध्य होऊ शकते.म्हणूनच 2022 साठी एक संकल्प घेण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो.

भारत सरकारने महिला सशक्तीकरणासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. आपण पाहिले असेल की, नोकरदार महिलांसाठी, बाळंतपणाची असलेली रजा काही दिवसापूर्वी, 12 आठ्वड्यावरून 26 आठवडे करण्यात आली यामुळे, बालकाला देखभालीची सर्वात जास्त आवश्यकता असलेल्या काळात आई आपल्या मुलाबरोबर राहू शकेल, त्याला वेळ देऊ शकेल. सुरवातीचे काही महिने बालकांच्या जीवनात फारच महत्वाचे असतात. आईचे सानिध्य मोठी भूमिका बजावू शकते. जगात कदाचित दोन किंवा तीनच देश आहेत जे बाळंतपणाची रजा 26 आठवड्यापेक्षा जास्त देतात. जगातले समृद्ध आणि प्रगतिशील देशही 26 आठवड्यापेक्षा जास्त रजा देत नाहीत, भारताने एवढा मोठा निर्णय घेतला आहे. कारण आमच्या माता - भगिनींचे सशक्तीकरण, देशाच्या सशक्तीकरणात नवी ऊर्जा, नवी गती प्राप्त करून देऊ शकते आणि हा प्रवास सफल होण्याच्या दिशेने नेऊ शकते. सुकन्या समृद्धी योजना असू दे, गर्भवती महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात 6000 रुपये जमा करण्याची योजना असू दे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना असू दे. उज्‍ज्‍वला योजने अंतर्गत एक मोठे अभियान चालवण्यात आले. आमच्या गरीब माता-भगिनी चुलीत लाकडे पेटवून स्वयंपाक करत असत, एक माता लाकडे वापरून चूल पेटवून स्वयंपाक करत असेल तर तिच्या शरीरात एका दिवसात 400 सिगारेटचा धूर जातो असे वैद्यक क्षेत्रातल्या लोकांचे म्हणणे आहे. मुले खेळत असतात त्यांनाही हा धूर सहन करावा लागतो. आपल्या माता भगिनींच्या तब्बेतीचे काय हाल होत असतील? भारत सरकारने आपल्या गरीब मातांची ,लाकडाचा वापर होणाऱ्या चुलीपासून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर जोडणी देण्याचे मोठे अभियान हाती घेतले. गेले दहा महिने हे अभियान चालवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटी गरीब कुटुंबाना गॅस सिलेंडर मिळाले आहेत, लाकडाच्या चुलीपासून सुटका झाली आहे. धुरापासून सुटका मिळाली आहे. तीन वर्षात 5 कोटी कुटुंबाना हे सिलेंडर पोहोचवण्याचा संकल्प आहे.

आपली मातृ शक्ती, महिला शक्तीला मदत कशी मिळेल यावर आमचा भर आहे. ब्रम्हकुमारी द्वारे यात मोठे योगदान मिळू शकते. आपण काम करतच आहात, अनेक प्रकारची कामे करतच आहात पण मी आग्रह करतो की, आपण सक्रियतेने या कामांवर भर द्याल तर मोठा परिणाम साध्य करण्यात आपले योगदान राहील.

आज पुन्हा आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे. निसर्गाचे संरक्षण , मातृ शक्ती रक्षण, बालकाच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रयत्न, या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांमध्ये एक ठेव म्हणून आहेत.या कार्यक्रमासाठी सर्व देशातून लोक आले आहेत, ते भारताचे हे महान चिंतन विचार बरोबर घेऊनच परततील, ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचेल, मानव कल्याणासाठी त्याचा उपयोग होईल. दादा लेखराजजींनी जे काम हाती घेतले होते, त्याला आपल्या प्रयत्नांनी, नवी ऊर्जा मिळेल. 100 वर्षाच्या असूनही इतके कठोर परिश्रम, दादींचे जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, नव्या ऊर्जेने लोकांना काम करण्याची ताकद मिळत राहील.

स्वच्छ भारत अभियानाची, दादीजी आमच्या सदिच्छादूत राहिल्या आहेत. दादीजींनी ब्रम्हकुमारी द्वारे स्वच्छता अभियानाला बळ दिले आहे. शुभ्र वस्त्रांकित आमचे हे ब्रम्हकुमार, ब्रम्हकुमारी, स्वच्छता आंदोलनाला मोठे बळ देऊ शकतात. 2022 पर्यंत असे संकल्प घेऊन वाटचाल करा. 2019 मध्ये महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे. स्वच्छता ही जनतेची सवय बनावी, हे आंदोलन सवयीत कसे बदलेल यावर आमचा कटाक्ष आहे.

मी आज आपल्याशी संवाद साधताना काही गोष्टीसाठी आग्रह धरतो. मला विश्वास आहे की आपण हे साध्य कराल. आपल्याजवळ सामर्थ्य आहे, संघटना आहे, संकल्प आहे. पवित्र कार्याने आपण प्रेरित आहात. आपल्याकडून इसिप्त साध्य होण्याचा विश्वास आहे. जगभरातून आलेल्या सर्व महानुभावांचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान प्राप्त होत राहू दे.

आपणा सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपणा सर्वाना माझ्याकडून, ओम शांती, ओम शांती, ओम शांती.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.